जॉर्डनची भटकंती : ०८ : मृत समुद्र आणि परतीची कथा

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
9 Nov 2014 - 8:15 pm

===================================================================

जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७... ०८ (समाप्त)...

===================================================================

जलसफर संपवून किनार्‍यावर आल्यावर भुकेची जाणीव झाली आणि एक मस्त रेस्तराँ शोधून पोटोबा आटपून घेतला. परत शहरात एक छोटा फेरफटका मारून 'धनिकांचे क्रीडांगण' आणि 'समुद्रकिनार्‍यावरचे मरुस्थल' समजल्या जाणार्‍या अकाबाचा निरोप घेऊन आम्ही मृतसमुद्राच्या दिशेने निघालो.

जॉर्डनला भेट देण्यासाठी माझ्या मनात जी दोन मोठी आकर्षणे होती ती म्हणजे पेत्रा दरी आणि मृत समुद्र होती. इतर सर्व ठिकाणे बोनस होती. पेत्रा दरी बघून झाली होती. त्यामुळे आता मृत समुद्राच्या दिशेने कूच करताना तो कधी दृष्टिपथात येईल याबद्दल मनात खूपच उत्सुकता दाटून आली होती. अडीच तीन तासांच्या साधारण २०० किमी प्रवासानंतर गाडी मृत समुद्राच्या पूर्व किनार्‍याने धावू लागली आणि जरा हायसे वाटले. मात्र खाली उतरून समुद्राच्या पाण्यात शिरायला अजून अर्धा पाऊण तास लागेल असे मार्गदर्शकाने सांगितले आणि जरासे हिरमुसले व्हायला झाले!


मृत समुद्राचे प्रथम दर्शन

===================================================================

मृत समुद्र

सद्या ५० X १५ किमी आकाराचा असलेल्या (हा आकार हळू हळू कमी होत आहे) मृत सागर अनेक अर्थांनी एक आश्चर्य आहे. त्यातले सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मोठ्या प्रमाणात असलेल्या क्षारांमुळे अतीघन असलेल्या त्याच्या पाण्यात माणूस हातपाय न हालवतासुद्धा तरंगू शकतो ! किंबहुना या समुद्रात बुडून मरणे प्रयत्न करूनही शक्य नाही !!

या समुद्राच्या पाण्याची दरवर्षी काही मीटरने कमी कमी होत जाणारी पातळी हे एक फार मोठे पर्यावरण संकट आहे. त्यामुळे हा समुद्र नष्ट होण्यापासून कसा वाचवता येईल यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न चालू आहे. इतर बाबतीत बरेच मतभेद असले तरी जॉर्डन, इझ्रेल आणि लेबॅनॉन या देशांचे याबाबतीत एकमत आहे. जागतिक बँक या संबंद्धींच्या प्रकल्पांना आर्थिक साहाय्य करत आहे.

मृत सागराची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत

१. मृत समुद्राची समुद्रसपाटी सर्वसाधारण समुद्रसपाटीपेक्षा ४२७ मीटर खाली आहे आणि ती अजून खाली जात आहे. कारण त्याचा रक्त समुद्रापासून संपर्क तुटलेला आहे आणि त्याला पाण्याचा पुरवठा करणार्‍या जॉर्डन नदी व इतर लहान नद्या त्याला जितके पाणी पुरवतात त्यापेक्षा जास्त पाणी बाष्पीभवन होऊन हवेत जाते.

२. समुद्रसपाटीपेक्षा ४२७ मीटर खाली असलेला मृत समुद्राचा किनारा ही पाण्याने न झाकलेली पृथ्वीवरील सर्वात खोल जागा आहे.

३. मृत समुद्राच्या पाण्याची खोली ३०६ मीटर आहे. त्यामुळे ते जगातील सर्वात जास्त खोल लवणसागर / लवणतलाव आहे.

४. त्याच्या पाण्यात ३४.२% क्षार आहेत. हे प्रमाण सर्वसाधारण समुद्रात असलेल्या ३.५% क्षारांपेक्षा ९ पटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच त्याच्या पाण्यात हातपाय न हालवता माणूस तरंगू शकतो! क्षारांच्या अतिरेकी प्रमाणामुळे मृत समुद्राला लवणसागर (Salt Sea) असेही म्हटले जाते.

५. क्षारांच्या अतिरेकी प्रमाणामुळे या समुद्रात एकही प्रकारची वनस्पती अथवा प्राणी जिवंत राहू शकत नाही. यावरूनच याचे मृत समुद्र हे नाव पडले आहे.

६. अनेक प्रकारचे क्षार असलेल्या मृत समुद्राची माती अंगाला लावून समुद्रात अंघोळ केल्याने बरेच कातडीचे रोग बरे होतात असा समज आहे. येथे येणार्‍या पर्यटकांत हे एक महत्त्वाचे आकर्षण असते. तसेच ही माती वापरून बनवलेली अनेक सौंदर्यप्रसाधने आणि औषधी गुणधर्मांचे दावे असलेली उत्पादने जगभर विकली जातात.

७. मृत समुद्राच्या इझ्रेली किनार्‍यावरचा "हायवे ९०" हा जगातला सर्वात खोलवर (सर्वसाधारण समुद्रसपाटीच्या ३९३ मीटर खाली) असलेला रस्ता आहे.

.


१९६० ते २००७ सालापर्यंत मृत समुद्राचा कमी कमी होत गेलेला आकार.
समुद्राच्या कोरड्या झालेल्या दक्षिण टोकात आता समुद्राचे पाणी पाटाने आणून मिठागरे चालवली जातात. (जालावरून साभार)

.


मृत समुद्राच्या किनार्‍यावरील एका हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी बनवलेला तरंगता आकार (जालावरून साभार)

===================================================================

मृतसमुद्र जॉर्डन व इझ्रेल या दोन देशांच्या मध्ये आहे. त्यामुळे त्याच्या पूर्व किनार्‍यावर जॉर्डनमध्ये व पश्चिम किनार्‍यावर इझ्रेलमध्ये अनेक हॉटेल्स व रिसॉर्ट्स आहेत. ती मृत समुद्रात तरंगण्याची मजा उपभोगणे, त्यातली क्षारयुक्त औषधी समजली जाणारी माती अंगाला लावून आपले कांती सतेज करणे / कातडीचे रोग बरे करणे आणि या आगळ्यावेगळ्या जागतिक कीर्तीच्या आकर्षणाला भेट देणे अश्या अनेक कारणांसाठी जगभरातून येणार्‍या पर्यटकांनी सदैव गजबजलेली असतात.

पर्यटकांची गर्दी टाळून मृत समुद्राचे डोळा भरून दर्शन घेता यावे यासाठी मुख्य थांब्यावर पोहोचण्यापूर्वी मार्गदर्शकाने एक मोक्याचे ठिकाण पाहून गाडी थांबवली...


मृत समुद्र : ०१ : किनार्‍यावर जमलेले क्षार

.


मृत समुद्र : ०२ : किनारपट्टीवरच्या वालुकाश्मांचे आकर्षक आकार

.

अर्ध्या तासाच्या सफरीनंतर आले एकदाचे आमचे समुद्रात उतरण्यासाठी राखीव केलेले रिसॉर्ट ! सगळेजण पटापट गाडीतून उतरून कपडे बदलण्याच्या खोल्यांमध्ये शिरले आणि पोहण्याचे पोशाख घालून समुद्राकडे निघाले. कधी एकदा त्या पाण्यात शिरतो आणि तरंगतो असे झाले होते ! समुद्रानेही अजिबात निराशा न करता अगदी गुढघाभरापेक्षा कमी पाण्यातही आरामात आपल्या पाठीवर तरंगत ठेवले...


मृत समुद्र : ०३

.


मृत समुद्र : ०४

.

तेथे आलोच आहोत तर इतर पर्यटकांबरोबर मृत समुद्राची माती (भाळी नाही तर) सर्वांगाला चोपडून परत एकदा समुद्रस्नान केले...


मृत समुद्र : ०४ : मृत्तीकास्नान

.

या समुद्रात पोहायला... नाही नाही... तरंगायला जरी मजा येत असली तरी एक कडक पथ्य मात्र न चुकता पाळायला लागते... ते म्हणजे त्याच्या पाण्याचा एकही थेंब डोळ्यात जाऊ न देणे ! क्षारांनी संपृक्त असलेले हे पाणी डोळ्यांची किती जळजळ करते हे ते अनुभवल्याशिवाय कळणे कठीण आहे (हे स्वानुभवावरून सांगत आहे)!!! ते पाणी नाकतोंडात गेले तरी बर्‍यापैकी तारांबळ उडते !

समुद्रात तरंगून झाल्यावर शॉवर घेऊन समुद्रकिन्यार्‍यावरच असलेल्या गोड्या पाण्याच्या तलावात डुंबण्याची सोय केलेली होती. तो तलाव फारच मोक्याच्या ठिकाणी होता. समुद्रकिनार्‍यावर गोड्या पाण्यात पोहत असतानाच समुद्राच्या पलीकडच्या इझ्रेलच्या किनार्‍यावरच्या डोंगरावर होणारा सूर्यास्ताचा नजाराही बघायला मिळाला. असा अनोखा प्रसंग दिसणारी ठिकाणे जगात (असलीच तर) फारच विरळ असावीत...


मृत समुद्र : ०४ : सूर्यास्त

.

मनसोक्त डुंबून झाल्यावर आमची गाडी परत अम्मानच्या दिशेने धावू लागली आणि आम्ही सर्वजण डुलक्या घेऊ लागलो. अम्मानला आल्यावर सर्वप्रथम नेहमीच्या प्रथेप्रमाणे गरम गरम शॉवर घेतला आणि जॉर्डनमधली शेवटची संध्याकाळ साजरी करायला ताजेतवाने झालो. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करताना केलेल्या चौकशीत असे कळले की आमच्याच हॉटेलमध्ये रोज रात्री जेवण-संगीत-नृत्य असा लोकप्रिय कार्यक्रम होतो. मग काय त्यातल्या जागा राखून ठेवल्या आणि थोडा वेळ आजूबाजूच्या रस्त्यांवरून फेरफटका मारला.

फिरताना एक जॉर्डेनियन लग्नाची वरात बघायला मिळाली. तिची ही चित्रफीत...

जॉर्डेनियन लग्नातली वरात

अम्मानच्या शेवटच्या रात्री अनपेक्षितपणे सापडलेल्या मैफिलित अरबी संगीत आणि नृत्याच्या सोबतीने चवदार जेवणाचा आस्वाग घेताना रात्रीचे बारा-साडेबारा कसे वाजले ते कळलेच नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी साडेनऊची परतीची बस पकडायची होती म्हणून नाईलाजाने खोलीवर परतलो. दिवसभराच्या शिणाने निद्रादेवी कधी प्रसन्न झाली ते कळलेसुद्धा नाही.

===================================================================

परतीची कथा

दुसर्‍या दिवशी सगळेजण लवकरच आवरून भरपेट न्याहारी करून बसच्या वेळेच्या अर्धा तास अगोदरच नऊ वाजता थांब्यावर पोहोचलो. तेथे चौकशी केली तर कळले की ती बस साडेआठलाच निघून गेली होती ! ते का असे विचारले तर एक नाही अनेक समज दिल्याप्रमाणे उत्तरे मिळाली ती अशी:

१. अशी वेळ बदलणे हा आमचा हक्क आहे हे तिकिटाच्या मागे (बारीक अक्षरात अरबीत) लिहिलेले आहे ते पहा.

२. राखीव जागा असल्या तरी त्या कमीत कमी २४ तास अगोदर रिकन्फर्मेशन करणे आवश्यक असते. तेही तिकिटाच्या मागे (बारीक अक्षरात अरबीत) लिहिलेले आहे ते पहा. तुम्ही रिकन्फर्मेशन केले नाहीत.

३. रिकन्फर्मेशन केले असतेत तर तुम्हाला बदललेली वेळ आम्ही सांगितली असती नाही का ?

बसच्या राखीव तिकिटांसाठीही इतकी बंधने असतील याची आमच्या सौदी व्यवस्थापकालाही कल्पना नव्हती अथवा शंका आली नव्हती. बसेस आधुनिक असल्या तरी जॉर्डन-सौदी मधला सरकारी व्यवहार भारतापेक्षा फार वेगळा नाही हे पाहून "ड्वाळे पाणाव्ले" !

पण दु:खात सुख इतकेच की "बसचे तिकीट त्याच प्रकारच्या दुसर्‍या बसला चालेल किंवा न वापरल्यास त्याचे पैसे परत मिळतील" असे कळले. पण लगेचच त्या प्रकाराची बस दिवसाला एकच आहे आणि पुढच्या आठवडाभरापेक्षा जास्त वेळेचे पूर्ण आरक्षण झाले आहे अशी खुशखबरही हसत हसत दिली गेली ! तिथली सरकारी विनोदबुद्धीही आपल्याशी स्पर्धा करणारी आहे याची पुरेपूर खात्री पटली.

मग आम्ही इतर काही व्यवस्था होते काय याची चौकशी सुरू केली. थोड्याच वेळात आम्हाला कळून चुकले की अम्मान-दम्माम असा १७०० किमी आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे खाजगी वाहन मिळणे शक्य नाही. आम्हा सर्वांनाच एका दिवसानंतर कामावर हजर होणे आवश्यक होते. त्यामुळे हा प्रवास तुकड्यातुकड्यात करण्याला पर्याय नाही असे ठरले. अम्मानपासून आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत (अल् हादिथा सीमाचौकी) जायला जरा घासाघीस करून का होईना पण एक खाजगी टेम्पो ट्रॅव्हलर टाईपचा टॅक्सीवाला मिळाला आणि हायसे वाटले. परतीच्या प्रवासाला सुरुवात तर झाली, पुढचे पुढे पाहू असे म्हणून आम्ही निघालो...


नकाश्यात दाखविलेल्या मार्गानेच पण उलट दिशेने परतीचा प्रवास (मूळ नकाशा जालावरून साभार)

या सगळ्या गडबडीत अल् हादिथा सीमाचौकीपर्यंत दुपार टळून गेली होती. सीमारक्षकांनी त्याचे सोपस्कार त्याच्या खाक्याप्रमाणे संथपणे केले आणि सीमारेषेवर एक तास खर्च झाला. पण नशिबाने इतर काही समस्या उभी राहिली नाही.

सौदी अरेबियात सीमेवरच्या बस स्टँडवर चौकशी केली तर असे कळले की तेथून दम्मामला जाणारी बस मिळणे शक्य नाही. तीच गत खाजगी गाड्यांची, साधारण १४०० किमीचा आणि फक्त एका दिशेचा प्रवास करायला खाजगी गाडी मिळणे म्हणजे दिवास्वप्न हे अर्ध्या तासांच्या शोधानंतर घ्यानात आले. मग सीमारेखा ते सौदी अरेबियातले जवळांत जवळचे जरा मोठे असलेले शहर "अरार" या अंतरासाठी एक खाजगी गाडी मिळाली त्यांत सर्वजण कोंबून कोंबून बसवले आणि प्रवास पुढे चालू झाला.

अरारच्या बस थांब्यावर आम्हाला पोचवून चालक ताबडतोप माघारी फिरला. थांब्याच्या आत जाऊन चौकशी केली तेव्हा कळले की आरारमधून दोन वेगवेगळे मार्ग जातात आणि त्यावर दोन स्वतंत्र बस थांबे आहेत... आणि टॅक्सीवाल्याने आम्हाला चुकीच्या थांब्यावर उतरवले होते ! परत बाहेर येऊन खाजगी वाहन शोधून योग्य थांब्यावर जाणे आले. अरार तसे काही फार मोठे ठिकाण नाही त्यामुळे जी एकच टॅक्सी (ती टॅक्सी आहे हा तिच्या चालकाचा दावा होता. आमचा त्यावर अजिबात विश्वास बसला नाही. पण म्हणतात ना की, अडला नारायण... ) मिळाली त्यात आम्ही सहा, आणखी दोन-तीन पाशिदरं आणि आमच्या सगळ्यांच्या सामानाने खचाखच भरलेली, दोरीने बांधलेली अर्धवट उघडी गाडीची ट्रंक असा आमचा गोतावळा त्या दुसर्‍या थांब्याच्या दिशेने धावू लागला. "हॉर्नशिवाय इतर सर्व काही वाजणार्‍या" गाड्यांच्या कथा खूप ऐकल्या आहेत, पण अशी गाडी प्रथम पाहतच नव्हतो तर चक्क अनुभवत होतो ! अर्थात या माझ्या सांगण्यात एक चूक आहे... त्या गाडीचा हॉर्न वाजत होता आणि चालक ते सगळ्यांना कळावे याची पुरेपूर काळजी घेत होता !

दुसरा बस थांबा बर्‍यापैकी मोठा होता. त्या बरोबरच तेथे त्याच्या आकाराला साजेशी प्रवाशाची गर्दी उसळलेली होती. आमच्या टूर व्यवस्थापकाने कसेबसे स्थानकातल्या व्यवस्थापकाला गाठून आमची रडकथा सांगितली. शिवाय त्या कथेत आम्ही सर्व दम्माममधल्या स्पेशियालिस्ट हॉस्पिटलमध्ये काम करतो हे पण मोठ्या खुबीने सांगितले. स्थानक व्यवस्थापकाने आम्हा सर्वांना एकदा न्याहाळले. तो आमच्या हुच्च पार्श्वभूमीने प्रभावित झाला की त्याला आमचे अवतार बघून दया आली हे नक्की कळले नाही पण त्याने "तुमच्या न वापरलेल्या तिकिटांच्या बदल्यात तडक दम्मामकडे जाणार्‍या संध्याकाळच्या आरामबसची तिकिटे देतो, पण आतापर्यंत स्वखर्चाने केलेल्या प्रवासाचे पैसे परत मिळणार नाहीत." असे सांगितले. अगोदरच १०-१२ तास चांगलीच वरात निघाल्याने त्याचे हे शब्द आम्हाला वरदानापेक्षा कमी नव्हते. त्याचे आभार मानून आम्ही नविन तिकीटे ताब्यात घेतली. या "सगळ्या धावपळीत तुम्ही माझी बरीच आबाळ केलेली आहे" अशी तक्रार पोटोबा बराच वेळ करत होता तिकडे आता लक्ष गेले. ताबडतोप थांब्यावरचेच एक बर्‍यापैकी क्षुधाशांती भवन शोधून पोटोबाचे समाधान केले आणि बसायला एक चांगली जागा शोधून बसची वाट पाहू लागलो.

बस वेळेवर सुटली आणि पुढे काही समस्या न येता तिच्या निर्धारीत वेळेवर दुसर्‍या दिवशी सकाळी नऊला दम्मामला पोहोचली. अश्या तर्‍हेने एक वेगळा अनुभव जमेला बांधून आम्ही जवळ जवळ १२ तास उशीरा, थकले भागलेले पण सुरक्षितपणे पोहोचलो... हुश्श!

(समाप्त)

===================================================================

जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७... ०८ (समाप्त)...

===================================================================

प्रतिक्रिया

मधुरा देशपांडे's picture

9 Nov 2014 - 8:23 pm | मधुरा देशपांडे

मस्त वर्णन आणि सुंदर फोटो. अत्यंत माहितीपुर्ण अशी ही जॉर्डनची लेखमाला खूप आवडली.

एस's picture

9 Nov 2014 - 8:45 pm | एस

मस्त सफर झाली. शेवटचा परतीचा प्रवास तर फारच जवळचा (वेगळ्या भारतीय अर्थाने) वाटला! :-)

शिद's picture

11 Nov 2014 - 7:25 pm | शिद

मस्त॑च झाली सफर.

लहाणपणापासूनच मृत समुद्राचं आकर्षण आहे. कधी योग जुळून येतो कुणास ठाऊक.

मृत समुद्रात कोणला तरी तरंगता पाहयचे होते, ते आज पाहता आले ! ;)
पुढच्या भागाची वाट पाहतो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- एक आँख मारु तो... ;) { Tohfa 1984 }

मस्त झाली ही पण सफर आमची!!या सफरीतल्या माहितीचा उपयोग लवकरच करुन घ्यायचा विचार आहे!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2014 - 5:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या सफरीसाठी अनेक शुभेच्छा !

समीरसूर's picture

10 Nov 2014 - 11:27 am | समीरसूर

लाजवाब वर्णन आणि फोटो!!! खूप आवडले. :-)

या समुद्राविषयी खूप ऐकलेले आहे. आपणांस तिथे जाऊन तिथला अनुभव घेण्याचे भाग्य लाभले याबद्दल आपले खास अभिनंदन!!

आपण एखादे सुंदर पुस्तक लिहावे अशी एक नम्र सूचना करू इच्छितो. मी विकत घेणार हे नक्की! आणि त्याची छानपैकी जाहिरातदेखील (शब्द तोंडाचा) करणार हे नक्की! तेव्हा आता कराच सुरुवात. :-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2014 - 5:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनेक धन्यवाद !

केवळ तुमच्या सारख्या वाचकांमुळेच तर लेख लिहायला हुरुप येतो.

खटपट्या's picture

10 Nov 2014 - 11:48 am | खटपट्या

म्रुत समुद्राची खूप छान माहीती !! एकंदर मालिका अविस्मरणीय !!

मृत्युन्जय's picture

10 Nov 2014 - 12:12 pm | मृत्युन्जय

सुंदर वर्णन सगळ्या डॉक लोकांची अक्षरे अतिशय घाणेरडी असतात पण लिखाण आणी वर्णन करण्याची हातोटी उत्तम असते असे दिसते. :)

बाकी

बसेस आधुनिक असल्या तरी जॉर्डन-सौदी मधला सरकारी व्यवहार भारतापेक्षा फार वेगळा नाही हे पाहून "ड्वाळे पाणाव्ले" !

हे मात्र मान्य नाही हा डॉक. भारतातल्या गाड्या काहीही झाले तरी वेळेच्या आधी निघणे शक्यच नाही. एकवेळ तासभर उशिरा निघतील किंवा निघणारच नाहित. पण आधी? शक्यच नाही ते :)

एकदा महडवरुन रायगडला चाललो होतो. सकाळी नवाची गाडी होती. मरमर करत हरिहरेश्वरवरुन पहाटे साडेपाच सहाची पहिली एसटी पकडुन वेळेच्या बरोबर ५ मिनिटे आधी पोचलो. अर्धा तास झाला तरी गाडी लागली नाही त्यामुळे मनात शंकेची पाल चुकचुकली की कदाचित्त आमची घड्याळे मागे असावीत आणि आम्ही पोचण्या आधीच बस निघुन गेली असावी अशी दुष्ट शंका मनात आली म्हणुन चौकशी कक्ष शोधला. तिथे कोणीच नव्हते (टी टाइम उ सी). साधारण १०.३० वाजता चौकशी कक्षावर चेहरा दिसला त्यांना विनम्र भाषेत विचारले की " साडेनवाची रायगड गाडी लागली नाही का अजुन?" त्यावर अतिशय गोंधळलेल्या चेहर्‍याने चौकशी कक्षावरच्या माणसाने उत्तर दिले "अरेच्च्या रायगड गाडी लागली नाही का अजुन? विसरले वाटते." विसरले? विसरले???? गाडी लावायला विसरले? मग इकडुन तिकडुन कुठुनतरी गाडी मिळवौन अजुन तासाभराने प्रस्थान झाले. तिकडे मृत समुद्राच्या काठाशी अशी कोणाची मेमरी मेली तर नव्हती ना? मग भारताशी काम्पिटिशन असुच शकत नाही :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2014 - 5:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

+D

मस्त झाली जॉर्डनवारी.
पुलेशु

बॅटमॅन's picture

10 Nov 2014 - 1:12 pm | बॅटमॅन

वा वा वा. क्या बात! मृत समुद्रात तरंगलेले पहायचे होते मदनबाण साहेबांप्रमाणेच ते पाहिले. मज्या आली. एक नंबर सफर आणि फटू!!!!

पुढील देश कोणता?

विलासराव's picture

10 Nov 2014 - 1:40 pm | विलासराव

सफर आवडली.

मृत समुद्राची माहीती खुप छान आहे. प्रवासवर्णनी छान.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Nov 2014 - 4:27 pm | अत्रुप्त आत्मा

जब्ब्बरदस्त! मृत समुद्र जिवंत केलात अगदी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2014 - 5:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

मृत समुद्र जिवंत केलात अगदी. +D

दिपक.कुवेत's picture

10 Nov 2014 - 5:13 pm | दिपक.कुवेत

मस्तच सफर घडवली. परतीचा प्रवास तुम्हाला असा/ह्या पद्धतीने करावा लागेल हे स्वप्नातहि वाटले नसेल नै???

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2014 - 5:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

परतीचा प्रवास करताना वात आला होता... पण सर्व लोकांनी सहकार्याने आणि खेळिमेळीने एकमेकांचे मनोरंजन करत वेळ घालवला. त्यामुळे आता तो सगळा प्रसंग त्रासदायक आठवण न राहता एक गंमतीदार अनुभव म्हणून लक्षात राहीला आहे !

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2014 - 5:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

मधुरा देशपांडे, स्वॅप्स, मदनबाण, खटपट्या, सौंदाळा, बॅटमॅन, विलासराव आणि जागु : तुम्हा सर्वांसाठी अनेक धन्यवाद !

जेपी's picture

10 Nov 2014 - 5:54 pm | जेपी

धन्यवाद सरजी,तुमचे प्रवासवर्णन वाचुन कळाले की जग किती मोठे आहे.इथेच कळाल आमच्या गावापलीकडे जग आहे.कंबोडीया ट्रिप प्लॅन केली आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2014 - 7:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या कंबोडिया सहलीसाठी अनेक शुभेच्छा !

कपिलमुनी's picture

10 Nov 2014 - 8:18 pm | कपिलमुनी

ही सफर मस्तच झाली.

पुढची कधी ?

मृत समुद्र निव्वळ अद्भूत. मजा आली ही जॉर्डनची सफर वाचून.

स्पंदना's picture

12 Nov 2014 - 4:47 am | स्पंदना

अग्गो बाई!! खरच तरंगत की माणुस त्या पाण्यावर.
लेख अतिशय माहीतीपूर्ण अन मनोरंजक..

पुढच्या बस मध्ये माझी शिट राखून ठिवा काय? आन त्या टिकटीच्या माग अस फाईन बीन काय लिवु नगा, येक्कच रुल त्यो बी जाड ठळ्ळक अक्सरात, आपर्णा आल्याबीगर गाडी हलनार नाय....काय?

छान झाली सफर.मस्त माहितीपुर्ण.
पुढल्या ट्रिपला माझी बी शिट अपर्णाताईच्या शेजारी ठेवा बरका.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Nov 2014 - 8:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

कपिलमुनी, वल्ली, aparna akshay आणि इशा१२३ : अनेक धन्यवाद !

@ aparna akshay आणि इशा१२३ : शिटा परमनंट रिजर्व हाय्त. काळजी नसावी ! तुमच्यासार्खी प्याशिंदरं आसल्याबिगर टिरीपमदे काय दम नाय बगा :)

धन्यवाद नवीन देशचि ओलख करुन दिल्यबद्दल ...तसे आम्हि तुम्चे दम्माम चे शेजरि, मी जुबैल ला मुक्कामी असतो. मस्तच सफर घडवली आपन.

विशालभारति's picture

15 Nov 2014 - 11:46 pm | विशालभारति

तुमच्या मुळे तरि निदान जग पाह्णे होते. धन्यवाद!

आज फक्त पहिले २ भाग वाचुन काढले.
असे वाटले होते एका फटक्यात सगळॅ भाग संपवु, पण पुन्हा पुन्हा रोमन स्थापत्य कला पाहताना, तुम्ही लिहिलेला इतिहास वाचताना आणि सगळॅ रिप्लाय पाहताना वेळ कसा निघुन गेला कळालेच नाही.
माझे रिप्लाय भागा प्रमाने थोडक्यात

भाग १ :अम्मान -
किल्ल्याचे अवशेष आवडले, परंतु तुम्ही म्हणता तसे रंगबेरंगी गोष्टींना विरोध खरेच अजुन ही आहे जॉर्डन मध्ये ?
घरे खुपच चिकटुन वाट्ली.
तुम्ही इतिहास खुप छान सांगितला आहे. लिखान एकदम आवडले.
मृत आणि रक्त संमुद्रा बद्दल पण काही सांगता येइल का ? नेट वर वाचल्यावर कळेल पण तुम्ही छान आणि योग्य सांगताल. सहज कुतुहल म्हणुन.

भाग २: जेराश सफर अविस्मरणीयच असेल, खुप मस्त वाटले रोमन स्थापत्य पाहुन. एकदम जबरी शहर.

क्रमश: (फक्त लेखात क्रमशः टाकुन सतवणार्‍या लेखकांना रिप्लाय पण क्रमशाच)

मृत समुद्राचे कुतुहल याच भागात वाचायला मिळाले, आधि रिप्लाय टाकला आणि मग वाचले.. मस्त एकदम

सूड's picture

25 Nov 2014 - 6:04 pm | सूड

आवडलं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Nov 2014 - 1:50 am | डॉ सुहास म्हात्रे

पालव, विशालभारति, गणेशा, आणि सूड : अनेक धन्यवाद !

सस्नेह's picture

26 Nov 2014 - 1:35 pm | सस्नेह

सफरीचे जॉर्डन प्रकरण नेहमीइतकेच रोचक !

स्वाती दिनेश's picture

26 Nov 2014 - 4:51 pm | स्वाती दिनेश

ही लेखमाला खूप आवडली,
स्वाती

पैसा's picture

26 Nov 2014 - 6:03 pm | पैसा

नेहमीप्रमाणेच अप्रतिम लिहिलंय! त्या समुद्रात उतरल्यावर सगळे अंग चिकचिकीत होत असेल ना?

नेबो पर्वत सहल छान, घर आवडले.
मदाबा ची माहिती सुरेख दिली आहे, मदाबा केराक रस्ता आवडला. विशेषता धरण अआणि ते ओसाड रानातील वस्तिवरील फुलाचे झाड. केराक किल्ला छान.

पेत्रा बद्दल काय बोलु.. शब्दच नाहित त्याबद्दल.. प्रत्येक कलाकुसरीला एक कथा चिकटली आहे असे जानवले.
पाण्याचा जसा प्रवाह असतो, तसा पर्वतांवर रंगाचा एक प्रवाह .. एक लहर दिसली.. अतिशय जीवंत कलाकृती वाटली पेत्रा.
पुर्वी कधीच नाव ही ऐकले नव्ह्ते.

सांदण, हस्तीप्रस्तर (राजगड) आणि महाराष्ट्रातील लेणी यांची मध्ये मध्ये आठवण येत होती.. परंतु प्रवाही शैली आणि सुंदर रंगभरीत कलाकृती म्हणुन पेत्रा खरेच खुप छान आहे.

हा भाग अत्ता पर्यंतचा सर्वात सुरेख टप्पा वाटला.

पुढील प्रवासाला नक्कीच तजेला मिळाला असेल येथील कलाकृतीने.

क्रमशा :

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Nov 2014 - 7:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्नेहांकिता, स्वाती दिनेश, पैसा आणि गणेशा : अनेक धन्यवाद !

सर्व भाग वाचुन काढले.. निव्वळ अप्रतिम. वादी रम सुंदर आहे एकदम.
बर्याच वेळा नंतर वाळवंटातुन येवुन समुद्र किणार्याचे बंदर पाहणे छान वाटले असेन ना

रामदास२९'s picture

30 May 2017 - 1:58 pm | रामदास२९

आपला लेख अतिशय उत्तम. आपण प्रवास वर्णन लिहा. शुभेछा _/\_