===================================================================
जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७... ०८ (समाप्त)...
===================================================================
पुढच्या दिवशी सकाळी पेत्राहून आमचा प्रवास "वादी रम"च्या दिशेने सुरू झाला. अरबी भाषेत वादी म्हणजे दरी किंवा नदीचे (बहुतेक वेळेस कोरडे झालेले) पात्र. संपूर्ण अरबस्थान अनेक कोरड्या वाद्यांनी भरलेले आहे. फार पूर्वी कोरड्या पडलेल्या नद्यांची पात्रे किंवा आता क्वचितच पडणार्या पावसाच्या वेगाने वाहणार्या पाण्याच्या प्रवाहाने बनलेले वाळूचे आणि वालुकाश्माचे भूस्तरीय आकार असे त्यांचे स्वरूप असते. काही वाद्या जुन्या काळापासून प्रसिद्ध आहेत. ज्या वेळेस आजच्यासारखी वाहतुकीची व्यवस्था नव्हती तेव्हा व्यापाराचे आणि धार्मिक प्रवासांचे मार्ग या वाद्यांतून जात असत. प्राचीन काळी पाण्याने समृद्ध असलेल्या वाद्यांच्या काठी वस्ती होती. त्यातले एक मोठ्या राजकीय-आर्थिक-सांस्कृतिक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे "वादी पेत्रा उर्फ पेत्रा व्हॅली उर्फ पेत्रा दरी" हे एका मोठ्या नाबातियन साम्राज्याच्या राजधानीचे ठिकाण होते, तेथूनच आजचा प्रवास सुरू झाला होता.
पेत्राच्या जवळच असलेली "वादी रम" तिच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे आणि चित्रविचित्र नैसर्गिक भूस्तरीय रचनांमुळे एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण झाली आहे. या दरीचे नाव तिथल्या रम् नावाच्या जॉर्डनमधल्या सर्वात उंच डोंगरावरून (जबल रम्) पडले आहे. प्राचीन काळात इथे प्रचलित असलेल्या अरेमिक भाषेत रम् म्हणजे उंच आणि अरबीत जबल म्हणजे पर्वत / डोंगर.
या दरीचे अजून एक आकर्षण म्हणजे तिचे "लॉरेन्स ऑफ अरेबिया" शी असलेले नाते. पहिल्या महायुद्धाच्या काळातल्या लॉरेन्सच्या कहाण्या या दरीत आणि तिच्या आसपासच्या प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर घटलेल्या आहेत.
वादी रमला चंद्रदरी (वादी कमर उर्फ Valley of the Moon) असेही संबोधले जाते. ही जॉर्डनमधली क्षेत्रफळाने सर्वात मोठी (७२० चौ किमी) आणि समुद्रसपाटीपेक्षा बर्याच वर (सर्वात उंच ठिकाण समुद्रसपाटीपेक्षा १७०० मीटर) असलेली दरी आहे. वादी रम पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केलेली आहे. या दरीतले वाळवंट आणि त्यांत विखुरलेले वालुकाश्मांचे असंख्य नैसर्गिक आकार पाहत भटकायला (ट्रेकिंग करायला), गिर्यारोहण करायला, उंटांवरून किंवा चारचाकीतून सफर करायला आणि येथे असलेल्या पर्यटक छावण्यांत रात्रीची वस्ती करण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात.
सकाळची न्याहारी आटपून आमची वादी रमच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. वादीच्या परिसरात शिरल्याबरोबर लगेच वादी रमचे आकर्षण असणारे वाळवंट आणि वालुकाश्मांचे आकार दिसायला सुरुवात झाली...
वादी रम : ०१
.
वादी रम : ०२
.
वादी रम : ०३
तासाभराच्या सफरीनंतर आम्ही आमच्या पर्यटक छावणीत पोहोचलो. चारी बाजूंनी अथांग वाळवंट, त्यात मध्येच वर आलेल्या एका नैसर्गिक कोरीवकामाने सजलेल्या डोंगराच्या काटकोनी बेचक्यांत ही छावणी होती. खजुरांच्या झावळ्यांनी शाकारलेले दोन-तीन सार्वजनिक वापरासाठीचे मंडप होते आणि त्यांच्यापासून थोड्या अंतरावर एक-दोन-तीन पर्यटक राहू शकतील असे अनेक आकारांचे तंबू होते. छावणीच्या दुसर्या टोकाला सार्वजनिक स्वच्छतालये होती. एकंदरीत, वाळवंटात रात्र घालवण्याचा अनुभव पर्यटकांना देण्याची ही छान सोय होती असे म्हणायला हरकत नाही.
वादी रम : ०४
आपापल्या तंबूंत सामान टाकून आम्ही सगळे मध्यवर्ती मंडपात पाय पसरून खिनभर आराम करायला बसलो. चहा-कॉफीपान झाले. संध्याकाळच्या खाण्यापिण्याची ऑर्डर देऊन झाले. मग उरलेला वेळ कारणी लावायला ४ X ४ गाडीने वादी रमच्या वाळवंटाची सफर करायला निघालो. दर वळणावर वाळवंटाची वेगवेगळी रुपे आणि वाळूच्या माराने घासून बनलेले डोंगरांचे विचित्र आकार दिसत होते. वाळू आणि टेकड्यांवर उनसावल्यांनी चालवलेले खेळ त्या आकारांची मजा अजूनच रंगीबेरंगी करत होते...
वादी रम : ०५
.
वादी रम : ०६
.
वादी रम : ०७
.
वाटेत एका ठिकाणी अरॅमिक भाषेतले प्राचीन प्रस्तरलेखन आणि प्राचीन प्रस्तरचित्रे (Petroglyph) पाहायला मिळाली...
वादी रम : ०८ : अरॅमिक भाषेतले प्राचीन प्रस्तरलेखन
.
वादी रम : ०९ : प्राचीन प्रस्तरचित्रे
.
आमचा बदू (वाळवंटात राहणारे भटका अरब) वाटाड्या जरा जास्तच चलाख निघाला. त्याने वाळवंटात बराच फेरफटका मारवला, (त्याच्या फायद्याच्या) भर वाळवंटातल्या भेटवस्तूंच्या दुकानात नेऊन वेळ खाल्ला आणि "आता परतायला हवे" असे म्हणायला लागला. "पण अजून एक फार महत्त्वाचे आकर्षण राहिले आहे त्याचे काय ?" असे म्हटल्यावर "आता उशीर झाला, तेथे जाऊन यायला ४-५ तास लागतील आणि मग परतायला खूप रात्र होईल." असे कारण सांगू लागला. मग आम्ही पण जोर लावून धरला आणि अम्मानमधल्या पर्यटक कंपनीच्या मॅनेजरला फोन लावला (मोबाईल की जय हो !)... परिणामी आम्ही जगप्रसिद्ध लॉरेन्स ऑफ अरेबियाच्या घराकडे निघालो.
लवकरच आमचा लढा लॉरेन्स इतकाच यशस्वी झाल्याचे ध्यानात आले ! कारण पोहोचायलाच दोन तास लागतील असे म्हणणार्या बदूने आम्हाला अर्ध्या पाऊण तासातच लॉरेन्सच्या घरापर्यंत पोहोचवले !
हीच ती दोन डोंगरांच्या बेचक्यांतली जागा जिला लॉरेन्सने त्याच्या ब्रिटिश साम्राज्याला मदत करणार्या ऑटोमान साम्राज्याविरुद्धच्या लढ्याच्या वेळी घर बनवले होते...
वादी रम : १० : लॉरेन्स ऑफ अरेबियाने वस्ती केलेले ठिकाण
आता त्या जागेत वादी रमच्या विकासासाठी काम करणार्या संस्थेचे कार्यालय आणि कार्यशाळा आहेत. त्या जागेपुढे असलेल्या एका वालुकाश्माच्या शीळेवर लॉरेन्स आणि त्याच्याबरोबरीने ऑटोमान साम्राज्यापासून स्वतंत्र होण्यासाठी संघर्ष करणारा अमीर (राजपुत्र) अब्दुल्ला यांचे चेहरे कोरलेले आहेत. हा राजपुत्र अब्दुल्ला पुढे कैरो कॉन्फ़रन्सच्या अन्वये ट्रान्सजॉर्डनचा आणि नंतर स्वतंत्र जॉर्डनचा पहिला राजा झाला.
वादी रम : ११ : लॉरेन्सबरोबरची अस्मादिकांची भेट
.
वादी रम : १२ : राजपुत्र अब्दुल्लाचे वालुकाश्मावरचे कोरीव चित्र
.
लॉरेन्सच्या निवासस्थानाच्या जागेला भेट देण्याच्या यशस्वी मोहिमेचा आनंद मनात घोळवत आम्ही परत निघालो. रमत गमत परतूनही अगदी योग्य वेळेवर रम् वाळवंटातला सूर्यास्ताचा नजारा बघण्याच्या जागेकडे पोहोचलो...
वादी रम : १३ : सूर्यास्त ०१
.
सूर्यास्त बघायला एका मोक्याच्या टेकडीवर चढाई करून मस्तपैकी जागा पटकावली. टेकडीवरून थोड्या दूरवर आमची रात्री वस्ती करायची छावणी दिसत होती. म्हणून "लवकर चला, लवकर चला." अशी भुणभूण करणार्या बदूला सुट्टी देऊन सूर्यास्त झाल्यावर चालत परतू असे ठरवले.
आता आम्ही आमच्या वेळाचे राजे होतो... उच्चासनावरून आजूबाजूच्या जागेचे निरीक्षण सुरू केले...
वादी रम : १४ : सूर्यास्त ०२
.
वादी रम : १५ : सूर्यास्त ०३
.
वादी रम : १६ : सूर्यास्त ०४
.
सूर्यास्त झाल्यावर प्रकाश झपाट्याने कमी होऊ लागला. टेकडीवरून जवळ दिसणारी छावणी वाळूत पाय रुतणार्या वाटेने जाताना वाटते तितकी जवळ नाही हे लवकरच ध्यानात आले ! टेकडीच्या उंचीवरून जमिनीच्या सपाटीवर आल्यावर छावणीही दिसेनाशी झाली होती. अर्ध्या एक तासाने नक्की छावणीच्या दिशेने चाललो आहे की विरुद्ध असा प्रश्न पडायला लागला ! आता काय करावे ? दूरदूरवर एखादा माणूस किंवा दिवाही दिसत नव्हता. जवळच्या टेकडीवर चढून परत आपल्या छावणीच्या दिशेचा अंदाज घ्यावा असा विचार झाला. तेवढ्यात, अचानक त्या अंधारात एका टेकडीमागून एक बदू चार उंट घेऊन अवतरला आणि उंटाची सफारी करा म्हणून मागे लागला ! त्याच्याशी वाटाघाटी करून "आमच्या छावणीकडे नेणारी उंटाची सफारी" अश्या डबल बेनेफिट स्कीमवाला यशस्वी करार केला आणि काळजीचे रुपांतर मजेशीर सफारीत झाल्याने निर्धास्त झालो...
वादी रम : १७ : उंटाची सफारी
.
छावणीत परतलो तेव्हा बर्यापैकी काळोख झालेला होता. हात-तोंड घुवून ताजेतवाने होऊन संध्याकाळच्या कार्यक्रमाची वाट पाहत मंडपात हातपाय पसरून आराम करू लागलो.
थोड्याच वेळात संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी छावणीच्या कर्मचार्यांची लगबग सुरू झाली. खाणेपिणे, छावणीच्या विस्तवाभोवती नाचणे, उत्तररात्र ओलांडून जाईपर्यंत गप्पा-गोष्टी-विनोद, इत्यादी कार्यक्रम पूर्वी ठरवल्याप्रमाणे अगदी साग्रसंगीत झाले. शेवटी रात्री दोन वाजता बंदिस्त तंबूत जावून झोपण्यापेक्षा हवेशीर उघड्या मंडपातच ताणून दिली.
(क्रमशः )
===================================================================
जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७... ०८ (समाप्त)...
===================================================================
प्रतिक्रिया
30 Oct 2014 - 11:31 am | बॅटमॅन
लॉरेन्स ऑफ अरेबिया पाहिल्यापासून वादी रम बद्दल एक वेगळेच आकर्षण मनात राहिलेले आहे. लेख वाचून तृप्त झालो, आता पुनरेकवार चवीचवीने सावकाश वाचतो.
30 Oct 2014 - 11:45 am | खटपट्या
हेच म्हणतो !!
30 Oct 2014 - 2:21 pm | केदार-मिसळपाव
खुप छान वाटले वाचुन.
30 Oct 2014 - 3:27 pm | दिपक.कुवेत
पेत्रा दरी, वादी रम सगळच लोभसवाणं आहे. पेत्रा दरीचे फोटो तर फारच आवडले गेले आहेत. रखरखीत वाळवंटहि तुमच्या फोटोतुन संदर भासु लागत.
30 Oct 2014 - 5:51 pm | पैसा
तिथले वातावरण पाहता शिलालेख आणि प्रस्तरचित्रांचे वय ठरवायचा प्रयत्न कोणी केला नसेल असं वाटतंय. वादी शब्द चांगलाच ओळखीचा आहे. (हिंदी सिनेमांमुळे) वादियाँ मेरा दामन कोण विसरेल!हे बदु म्हणजे बदाउनी लोकांचे जवळचे का? की तेच ते?
30 Oct 2014 - 11:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे शिलालेख थामुदिक कालखंडातले (इ स पूर्व ४ थे शतक ते इ स ४ थे शतक) असावेत असे समजले जाते. अरामिक आता लुप्त झालेली भाषा आहे.
बदू (इंग्लिश्मध्ये bedouin) हा अरबस्तानातल्या भटक्या अरब जमातींसाठी वापरला जाणारा अरबी शब्द आहे.
1 Nov 2014 - 12:09 pm | पैसा
बदूला किती शेपट्या लावल्यात त्या! एन्ग्लिश इस अ वेर्य फुन्न्य लन्गुअगे.
1 Nov 2014 - 12:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
मूळ अरबी शब्द "बदू, badw, بَدْو" आणि त्याचे अनेकवचन "बदविन, badawiyyīn/badawiyyūn, بَدَوِيُّون" असे आहे. भाषाअशिक्षित गोर्यांनी उच्चारला कठीण वाटणार्या शब्दाचे नेहमीप्रमाणेच अपभ्रंश केलेला आहे.
30 Oct 2014 - 6:52 pm | चौकटराजा
चीन , व्हेनेझुएला, जॉर्डन, उत्तर अमेरिका ( नेवाडा, उता , अरिझोना ) ई देशात नेहमीचेच पर्वत , समुद्र किनारे ई पेक्षा वेगळी पृथ्वी पहावयास मिळते. त्यातीलच हे एक दिसतेय ! फारच विचित्र कला निसर्गाने केलीय ! वाह !
30 Oct 2014 - 10:08 pm | एस
अहाहा!
30 Oct 2014 - 10:18 pm | शिद
मस्त फोटो व वर्णन.
वाळू अशी लालसर का दिसतंय?
30 Oct 2014 - 11:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
वाळूत असलेल्या खनिजांमुळे तेथिल वाळू व वालुकाश्म सुर्यप्रकाश पडल्यावर असे रंग उधळतात.
31 Oct 2014 - 5:46 pm | शिद
अच्छा. धन्यवाद.
30 Oct 2014 - 11:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
बॅटमॅन, खटपट्या, केदार-मिसळपाव, दिपक.कुवेत, चौकटराजा आणि स्वॅप्स : अनेक धन्यवाद !
31 Oct 2014 - 12:05 am | सतिश गावडे
मस्त प्रवास वर्णन !!!
फोटोही अप्रतिम आहे.
31 Oct 2014 - 7:38 am | अत्रुप्त आत्मा
+++१११
31 Oct 2014 - 11:25 am | सिरुसेरि
छान लेख आणी फोटो . हिदाल्गो , प्रिन्स ऑफ पर्शिया , सहारा या हॉलीवूडच्या चित्रपटांची आठवण झाली.
31 Oct 2014 - 5:05 pm | मदनबाण
नवा प्रवास चालु झाला तर... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- LIVE UPDATE - मी देवेंद्र गंगाधर फडणवीस... शपथ घेतो की
1 Nov 2014 - 12:21 pm | प्रचेतस
अद्भूत आहेत ही ठिकाणं.
रखरखीत उजाड वाळवंट सुद्धा किती सुंदर दिसतंय.
2 Nov 2014 - 10:55 am | डॉ सुहास म्हात्रे
वाळवंट रखरखीत असले तरी त्याचे दिवसभरात बदलत जाणारे विविध रंग आणि आकार मोठे चित्ताकर्षक असतात.
अगदी रब अल् खाली या जगातल्या एका मोठ्या उडत्या वाळूच्या (शिफ्टिंग सँड) वाळवंटातही तगून राहिलेले जीवन थक्क करणारे असते !
2 Nov 2014 - 6:16 pm | प्रचेतस
ह्यावर एक लेख अवश्य येऊ द्यात.
उडती वाळू म्हणजे वार्यामुळे वाळूची सतत स्थलांतरीत होत जाणारी टेकाडेच ना? सॅण्ड ड्युन्स?
3 Nov 2014 - 6:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
शिफ्टिंग सँड वाळूच्या वादळांनी जेवढी जागा बदलते त्यापेक्षा जास्त वार्याने २४ तास भूरभूरत राहून जागा बदलत राहते. त्यामुळेच तिच्यावर पाण्याच्या लाटांसारख्या वळ्या दिसतात.
2 Nov 2014 - 10:51 am | डॉ सुहास म्हात्रे
सतिश गावडे, अत्रुप्त आत्मा, सिरुसेरि, मदनबाण आणि वल्ली : धन्यवाद !
2 Nov 2014 - 5:34 pm | मुक्त विहारि
पण आज राहवलेच नाही... (ते क्रमशः.... वाचल्यामुळे , परत एकदा मोह बाजूला ठेवून वाखूसा केले)
शेवटी आम्ही मोहापुढे हार मानली आणि सगळे भाग वाचून टाकले....
नेहमीप्रमाणेच इ.ए. स्टाइलचे प्रवासवर्णन....(आजकाल उपमा सुचत नाहीत)