===================================================================
जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७... ०८ (समाप्त)...
===================================================================
...नव्या-जुन्याची सरमिसळ असलेल्या अम्मानमधून आमची गाडी अज्लून किल्ल्याकडे निघाली...
आता यापुढे काही दिवस अम्मानच्या बाहेर पडून जॉर्डनची भटकंती करायची आहे, तिचा संपूर्ण मार्ग निळ्या रंगाने आणि प्रवासाच्या दिशा तांबड्या बाणांनी खालच्या नकाश्यात दाखवल्या आहे...
जॉर्डनमधिल भटकंतीचा मार्ग (मूळ नकाशा जालावरून साभार)
अज्लून किल्ला
अम्मानच्या उत्तरपश्चिमेला अज्लून नावाच्या प्रादेशिक राजधानीच्या ठिकाणी एक प्राचीन किल्ला आहे. त्या गावावरून नाव पडलेला हा किल्ला बाराव्या शतकात (इ स ११८४ ते ११८५) आयुबीद राजवटीमध्ये सालादीनच्या पुतण्याने बांधलेला आहे. किल्ल्याभोवती १६ मीटर रुंद आणि १२-१५ मीटर खोल खंदक आहे.
या किल्ल्याचा उपयोग मुख्यतः ख्रिश्चन क्रुसेडर्सचा प्रतिकार करण्यासाठी केला गेला. त्याच्या मोक्याच्या ठिकाणामुळे तेथून आजूबाजूच्या मोठ्या प्रदेशावर लक्ष ठेवणे शक्य होत असे. त्या किल्ल्याजवळून जाणाऱ्या तीन मुख्य रस्त्यांमुळे जॉर्डन, सिरीया आणि इजिप्तमधले दळणवळण सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचा खूप उपयोग झाला. अज्लूनच्या जवळ लोखंडाच्या खाणी असल्याने तर अर्थातच या किल्ल्याचे महत्त्व अनन्यसाधारण होते. १२६० साली मंगोल आक्रमणात त्याची बरीच नासधूस झाली. पण त्यापेक्षा जास्त नुकसान १९२६-२७ साली झालेल्या शक्तिशाली भूकंपात झाले.
किल्ल्याच्या मध्यभागी पूर्वी अस्तित्वात असलेल्या बायझांटाईन ख्रिश्चन चर्चच्या चौथऱ्यावर बांधलेली ८०० वर्षे पुराणी मशीद आहे. जुन्या इमारतींवर पूर्वी ग्रीक लिखाण होते असे म्हणतात. २०१३ साली झालेल्या पाऊस आणि बर्फाच्या अतिवृष्टीमुळे मशीदीची पश्चिमेकडील भिंत पडून त्या मलब्यात बायबलची प्रत आणि काही क्रूस मिळाले होते.
चला तर करूया या महत्त्वाच्या प्राचीन किल्ल्याची सफर...
अज्लून किल्ला : ०१ : दुरून होणारे दर्शन
.
अज्लून किल्ला : ०२ : जवळून
.
अज्लून किल्ला : ०३ : किल्ल्याभोवतालच्या मोटेवरील मुख्य प्रवेशद्वाराकडे नेणारा पूल
.
...
अज्लून किल्ला : ०४ व ०५ : अंतर्भाग
.
अज्लून किल्ला : ०६ : किल्ल्यावरून दिसणारे आधुनिक अज्लून शहर आणि आजूबाजूचा परिसर
.
किल्ल्यातून बाहेर पडून प्राचीन रोमन अवशेषांसाठी प्रसिद्ध असणार्या जेराश शहराकडे निघालो. हा दुसरा थांबा बराच वेळ घेणारा असल्याने वाटेत एका रेस्तराँमध्ये पोटपूजा केली...
अरबी तंदूर ०१ : दूरून
.
अरबी तंदूर ०२ : जवळून
.
जेवणाची सुरुवात (स्टार्टर्स) : वरून घड्याळाप्रमाणे सलाद, हुमस, खुब्ज, पिकल्, फिलाफिल
.
जेराश शहर (मध्यपूर्वेतले पॉम्पेई)
आमचा पुढचा थांबा होता जेराश. ही जागा अम्मानच्या ४८ किमी उत्तरेला आहे. झाडीने आच्छादिलेल्या टेकड्यांनी वेढलेल्या आणि समुद्रसपाटीपासून २५० ते ३०० मीटर उंचीवर असलेल्या या सपाट जागेवर गेल्या ६,५०० वर्षे सलग मनुष्यवस्ती आहे. सुपीक जमीन व योग्य हवामानामुळे येथे प्राचीन काळापासून अनेक प्रकारची धान्ये व फळांची शेती केली जाते.
इ स पूर्वी ३३१ मध्ये अलेक्झांडरने इजिप्तच्या मोहिमेवरून परतताना येथे त्याच्या वृद्ध होऊ लागलेल्या सैनिकांसाठी जेरॅस्मेनॉस (Gerasmenos म्हणजे ग्रीक भाषेत वयोवृद्ध माणूस) नावाच्या शहराची पायाभरणी केली. आजचे जेराश हे नाव त्याचेच अपभ्रंशित रूप आहे.
रोमन जनरल पॉम्पे याने इथले शहर इ स ६३ ला काबीज केले. रोमन सत्तेचा काळ या शहराचे सुवर्णयुग होते. जेराशची रोमन काळातल्या सर्वोत्कृष्ट दहा शहरांत (डीकॅपोलीस लीगमध्ये) गणना केली जात असे. ७४९ साली झालेल्या शक्तिशाली भूकंपात या शहराची खूप पडझड झाली. नंतरही लहानमोठे भूकंप व युद्धे यामुळे या शहराचे अनेकदा अतोनात नुकसान झाले.
हे शहर प्रसिद्ध गणिती निकोमाकस ऑफ जेरेसा (Nicomachus of Gerasa, इ स ६० ते १२०) याचे जन्मस्थान आहे.
आज हे ठिकाण रोमन शहरी स्थापत्यकलेचे जगातले सर्वोत्तम अवशेष समजले जातात. हे अवशेष अनेक शतके वाळूखाली पुरले गेले होते आणि म्हणूनच ते इतक्या चांगल्या अवस्थेत राहिले असावेत. गेली ७० वर्षे त्यांच्या उत्खननाचे काम चालू आहे. येथील अवशेषांत दगडी फरसबंदीचे (पेव्ह्ड) रस्ते, प्रशस्त चौक, टेकड्यांवरील देवळे, सुंदर नाट्य-सभागृहे (अँफिथिएटर्स), सार्वजनिक स्नानगृहे, कारंजी, शहराची तटबंदी, इत्यादीचे रोमन स्थापत्यकलेतील उत्तम नमुने आहेत. यामुळे या शहराला काहीश्या चुकीने मध्यपूर्वेचे पॉम्पेई म्हटले जाते, चुकीने अश्याकरिता की भूकंपाने या शहराचे खूप नुकसान झाले असले तरी येथे पाँपेईसारखा ज्वालामुखीचा उद्रेक कधीच झालेला नाही.
रोमन स्थापत्यकलेच्या खाली असलेल्या भूस्तरांत पौरात्य-पाश्चिमात्य कलांचा संगम असलेले अवशेष आहेत. जगाच्या पूर्व-पश्चिम संधिभागावर वसलेल्या या जागेचा दीर्घ इतिहास पाहता हे अपेक्षितच होते म्हणा.
चला तर या सर्वात जास्त शाबूत असलेल्या प्राचीन रोमन शहराच्या फेरफटक्याला...
वेशीवरचे स्वागत
शहराच्या वेशीवर रोमन सम्राट हेड्रीयनने या शहराला इ स १२९-१३० मध्ये दिलेल्या भेटीच्या स्मरणार्थ उभारलेली कमान आपले स्वागत करते...
जेराश : ०१ : शहराच्या वेशीवरची हॅड्रीयन कमान
.
या शहराची संरक्षक भिंत मजबूत व कलापूर्ण बांधणीची होती. तिचा शाबूत असलेला काही भाग याची ग्वाही देतो...
जेराश : ०२ : संरक्षक भिंतीचा एक भाग
शहरात शिरल्या शिरल्या बॅगपाईप आणि ढोलाच्या बँडने आमचे जंगी स्वागत केले
जेराश : ०३ : जेराश शहरात स्वागत करणारा बॅगपाईप बँड
मंदिरे
इथल्या मंदिराची बरीच पडझड झालेली आहे. तरीसुद्धा एका टेकडीवरचे झेउसचे प्रशस्त मंदिर बरेच शाबूत होते. या मंदिराच्या खांबाच्या मांडणीची खासियत म्हणजे ते देवळाच्या एका टोकाची कुजबूजही दुसर्या टोकाकडे पोचवत असत. त्यामुळे त्यांना "जेराशचे कुजबुजणारे स्तंभ (whispering columns of Jerash) असे म्हणत. आम्ही गेलो तेव्हा मंदिराच्या पुनःस्थापनेचे काम चालू होते...
जेराश : ०४ : टेकडीवरचे झेउसचे मंदिर
देवळाच्या भव्य खांबांच्या टोकावरची नक्षी लक्षवेधक होती.
जेराश : ०५ : झेऊसच्या मंदिराच्या स्तंभांची कोरीव टोके
तेथे अजून एका आर्टेमिसच्या मंदिराचेही अवशेष आहेत...
जेराश : ०६ : आर्टेमिसच्या मंदिराच्या खिडकीवरील कोरीवकाम
या दोन मोठ्या मंदिराबरोबरच जेराशमध्ये अनेक छोटी मंदिरे पण आहेत.
फोरम आणि कोलोनेड
शहराच्या मध्यभागी असणारी प्रशस्त वर्तुळाकार फरसबंदी (फोरम) आणि तिच्या सभोवती उभे केलेल्या खांबांच्या रांगा (कोलोनेड) असलेले चौक हे रोमन नागरी स्थापत्यशास्त्राचे वैशिष्ट्य आहे. ही जागा बाजारहाट करण्याचे आणि नागरिकांनी गप्पा मारायला भेटण्याचे ठिकाणही (कट्टा) असे त्यामुळे तिला फोरम असे म्हटले जाते. जेराशचा कोलोनेड बराच प्रशस्त आहे आणि आजतागायत बर्याच चांगल्या अवस्थेत टिकलेला आहे...
जेराश : ०७ : रोमन ओव्हल फोरम आणि कोलोनेडचा एक भाग
.
जेराश : ०८ : पुर्णाकृती रोमन ओव्हल फोरम आणि कोलोनेड (जालावरून साभार)
कार्डो (रस्ते)
जेराशचे कोलोनेडने सुशोभित केलेले रस्ते (कार्डो), त्याच्या आजूबाजूला असलेल्या धनिकांच्या भव्य घरांचे सुंदर स्थापत्य आणि रस्त्याशेजारी असलेली मोठमोठी कारंजी पर्यटकांना जेराशच्या गतवैभवाची पुरेपूर कल्पना देतात...
जेराश : ०९ : कार्डो आणि कोलोनेड
.
जेराश : १० : कार्डोवरील कारंजे असलेले एक स्थळ
अँफिथिएटर
अँफिथिएटर नाही तर ते कसले रोमन शहर म्हणायचे ? जेराशच्या अँफिथिएटरची गणना जगातल्या मोठ्या रोमन अँफिथिएटरमध्ये केली जाते (जेराश डिकॅपोलीस लीग मध्ये गणले जात होते ते काही उगाच नाही !). विशेष आश्चर्य असे की याच्या रंगभूमीवरून आणि तिच्या समोरच्या अर्धगोलाच्या मध्यात वक्त्यासाठी असलेल्या एका फरशीवर उभे राहून केलेली कुजबूजही रंगमंदिराच्या अगदी सर्वात दूरच्या रांगेतीलही प्रेक्षकांपर्यंत स्पष्टपणे ऐकू येते अश्या प्रकारची प्रगल्भ ध्वनिकी (अकॉस्टिक्स) असलेली याची रचना आहे !
जेराश: ११ : दक्षिण जेराशमधिल अँफिथिएटर
शहराच्या दक्षिणेस असलेल्या या मोठ्या अँफिथिएटर बरोबरच उत्तरेस अजून एक छोटे अँफिथिएटर आहे.
सर्कस / हिप्पोड्रोम
ग्रीकोरोमन संस्कृतींचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांच्या घोड्यांच्या आणि घोड्यांनी ओढलेल्या रथांच्या शर्यती. या खेळांसाठी खास मैदान बांधले जात असे. रोमन आणि ग्रीक मैदानांच्या आकारमानात थोडाफार फरक असला तरी त्याचा आराखडा सर्वसाधारणपणे सारखा असे. रोमन अश्या मैदानाला त्याच्या लंबगोल / गोल आकारामुळे सर्कस असे म्हणत तर ग्रीकांनी त्याला हिप्पोड्रोम (ग्रीक भाषेत "हिप्पॉस" म्हणजे घोडा आणि "ड्रोमॉस" म्हणजे धावमार्ग) असे नाव दिले होते.
जेराश : १२ : सर्कस अथवा हिप्पोड्रोम (रोमन रथांच्या शर्यतींचे मैदान)
इतर काही
जेराश : १३ : दक्षिणव्दार
.
जेराश : १४ : आधुनिक जेराशच्या पार्श्वभूमीवर दिसणारे प्राचीन जेराश (जालावरून साभार)
.
या शिवाय शहरात ठिकठिकाणी रोमन संस्कृतीची निशाणे सार्वजनिक स्नानगृहांच्या रूपात आहेत.
जेराशमधे फिरताना तेथील अवशेषांची भव्यता आणि सौंदर्य आपल्याला क्षणभर तरी रोमन काळात नेतात. हे शहर त्याच्या मूळ स्वरूपात त्या काळाचे एक अतिशय प्रभावी आणि प्रसिद्ध शहर असणार यात काहीच शंका वाटेनाशी होते.
जेराशमध्ये फिरताना देहभान विसरायला झाले. पण तरीही उन्हे उतरू लागली आणि थकलेले पाय हॉटेलवर परतण्यासाठी गाडीकडे निघाले.
(क्रमशः )
===================================================================
जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७... ०८ (समाप्त)...
===================================================================
प्रतिक्रिया
12 Aug 2014 - 1:16 am | प्यारे१
मी पहिला....
नेहमीप्रमाणंच मस्त!
12 Aug 2014 - 6:15 am | चौकटराजा
आपल्या या धाग्यावरून रोमचे साम्राज्य व त्याच बरोबर त्यांची हे अफलातून वास्तूशैली किती ठिकाणी पसरलीय ते कळते.
काही ठिकाणे रोमच्या सर्कस , सेंट पीटर्स चा परिसर , कलोसियम च्या समोरची आर्च यांचीच आठवण करून देतात.( जणु काय मी नुकताच रोम बघून आलोय असे हे वाक्य आहे. ) कॉलोनेड व कॉरिन्थियन शैलीचे कॉलम यांचे फोटो फार सुंदर आलेयत.बाकी अॅम्फी थिएटर च्या रंगमंचाला असा त्रिमिती " बॅकड्रॉप" प्रथमच पहात आहे. मस्त !
12 Aug 2014 - 7:27 am | अजया
मस्त फोटो अाणि वर्णन.विशेषत:काॅरिन्थीअन स्तंभ अाणि रोमन अँम्फीथिएटर फार आवडले.त्या दणदणीत रोमन वास्तुंना हे काॅरिन्थीअन स्तंभ विशेष देखणेपणा देतात.
12 Aug 2014 - 9:08 am | इशा१२३
दोन्ही भाग वाचले...जोर्डनविषयी उत्सुकता आहेच.मागच्या आमच्या एका ट्रीपची टुर मॅनेजर मुलगी ६ वेळा युरोप वारि केलेली,इतरही देश फिरलेली.तीला मी विचारले होते कि तूला सगळ्यात जास्त कोणता देश आवडला? तिचे उत्तर 'जोर्डन' होते.आता हा वाळवंटी प्रदेश हिला का आवडला असावा असा मला प्रश्ण पडला होता.त्याचा उलगडा आता होईल.धन्यवाद..मस्त फोटो..एंफिथिएटर केवढे भव्य..
13 Aug 2014 - 8:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रशांत आवले, चौकटराजा, चौकटराजा आणि इशा१२३ : जॉर्डनमध्ये सहा-सात दिवस काय बघायचं असा मलाही प्रश्न पडला होता. पण आमच्या मनोरंजन प्रबंधकाची हमी आणि माझ्या मनातल्या पेत्रा व मृत सागराचे आकर्षण या व्यतिरिक्त बरेच काही पाहिले-अनुभवले. सगळे दिवस मजेत गेले. ते सगळे पुढच्या भागांंत येईलच.
13 Aug 2014 - 11:21 pm | खटपट्या
सर्व फोटो आणि वर्णन मस्त !!
14 Aug 2014 - 9:39 am | प्रचेतस
काय सुरेख आहे जेराश.
तीन ग्रांथिक धर्मांचा संगम आणि त्याहीपेक्षा जुन्या रोमन संस्कृतीशी थेट नाते.
फोटो अतिशय सुरेख.
सौदी अरेबियाला लागून असलेल्या जॉर्डनमध्ये बहुत काळापासून इस्लामिक राजवटी असूनही हे सर्व टिकले कसे याचे आश्चर्य वाटते.
18 Aug 2014 - 10:00 am | पैसा
सुंदरच शहर आणि त्याचे खूप माहितीपूर्ण वर्णन. मात्र हे कसे टिकले याचे उत्तर एक्का साहेबांनी दिलंय. भूकंपाने वाळूत गाडल्यामुळे सुरक्षित राहिले.
14 Aug 2014 - 11:59 am | प्रशांत
नेहमिप्रमाणे मस्तच
14 Aug 2014 - 11:18 pm | अत्रुप्त आत्मा
तुफ्फान....! संरक्षक भिंत , नक्षीदार खांब>>> लाइक इट...!लाइक इट...!
16 Aug 2014 - 11:45 am | डॉ सुहास म्हात्रे
खटपट्या, वल्ली, प्रशांत आणि अत्रुप्त आत्मा : अनेक धन्यवाद !
16 Aug 2014 - 12:51 pm | स्पंदना
किती वेळ लागतो वाचायला. पुन्हा पुन्हा फोटो पाह्यले.
सुरेख.
22 Aug 2014 - 1:25 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
22 Aug 2014 - 1:23 pm | मदनबाण
मागचा आणि हा भाग वाचला... पुढच्या भागाची वाट पाहतो. :)
फोटु नेहमी प्रमाणेच मस्त ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis
22 Aug 2014 - 1:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
पुढचा भाग (३) अगोदरच टाकला आहे...
http://www.misalpav.com/node/28526
22 Aug 2014 - 1:35 pm | मदनबाण
ओह्ह... नजरेतुन सुटला वाटतं.वाचतो आता.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis
22 Aug 2014 - 4:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
आताच चवथाही टाकला :)
23 Aug 2014 - 11:40 am | प्रभाकर पेठकर
अप्रतिम वर्णन आणि आकर्षक छायाचित्रांनी जॉर्डन सफर रंगतदार झाली आहे.
रोम शहरापासून जवळ असलेले पॉम्पेई शहर अवशेष पाहिले आहेत. इ. स. ७९ साली झालेल्या ज्वालामुखी उद्रेकात आख्खे शहर गाडले गेले. जवळ जवळ १० हजार वस्ती असलेल्या ह्या शहरात दोनेक हजार प्रेतांचे सांगाडे मिळाले. बाकी सर्व भस्मसात झाले. पण मूळ शहर उत्खननात बाहेर काढले असून चांगला गाईड मिळाला तर २-३ तासांची सफर कारणी लागते.
आज जॉर्डनची ही सफर 'पाहताना' जुन्या स्मृती जागृत झाल्या.
24 Aug 2014 - 12:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
पॉम्पेई ज्वालामुखीच्या उद्रेकाने उडालेल्या लाव्हा आणि राखेखाली झाकले गेले तर जेराश भूकंपाने उद्धवस्त झाले आणि निर्जन होऊन वाळूखाली झाकले गेले. पण त्यामुळेच शेकडो वर्षे त्यांचे प्राचीन स्वरूपच कायम राहिले !