११,९५३ – ११,९५३, अरे नाहि नाहि शेअरमार्केट चा निर्देशांक नाहिये हा. सकाळी प्रत्येक क्रिकेट रसिक हि संख्या घोकतच उठला असेल. करोडो रुपयांचे कोलगेट स्माईल देणार्या, स्विपशॉट किंवा लॉंग ऑफ ला चेंडु तडकावणार्या सचिन तेंडुलकरच्या एखाद्या पोस्टरला त्यांनी मनोभावे नमस्कार केला असेल आणि “सच्चिन धाऽऽऽऽऽऽऽऽऽव रे! धाव!” अशी आर्त साद त्या क्रिकेटच्या देवाला घातली असेल. “सचिन तेंडुलकर लारापेक्षा फक्त १५ धावा मागे”, “सचिन विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर” अश्या मथळ्यांशिवाय “आज सचिन विश्वविक्रम घडविणार” या वाक्यासमोर “उद्गारचिन्हा” ऐवजी “प्रश्नचिन्ह” बघुन माझ्याप्रमाणेच अनेकांची “खचकली” असेल. “इडियट सालेऽऽ हा काय प्रश्न झाला का?? झक मारायला पत्रकार आणि क्रिडा समिक्षक झाले का?? तेंडल्या म्हणजे काय यांना म्युनसिपाल्टिचा बेजबाबदार अधिकारी वाटाला काय??” असे प्रश्न चेहर्यावर आपसुक आले असतील. तर काहि विघ्नसंतोषी समाजकंटक किंवा ऑस्ट्रेलियाचे कट्टर भारतीय समर्थक “सचिनने आज १३ धावा केल्या तरी बस झालं!” , “सचिन म्हातारा झालाय, सचिनला हाकला” असे म्हणत कडकडा बोटं मोडत बसले असतील.
पण “सचिन संपला” हि गोष्ट ०८-०८-२००८ किंवा ०९-०९-२००९ या दिवशी जगबुडि होणार इतकीच धादांत खोटि आहे. जेव्हा डॉन ब्रॅडमन म्हणाले “सचिन माझ्यासारखाच खेळतो!” तिथे अवघा संदेहो तुटला आहे. सचिन हा प्रत्यक्ष इश्वरी अवतार आहे या एकाच गोष्टिवर मी डोळॆ झाकुन विश्वास ठेवतो. ब्रायन लारा हा देखिल माझासाठी देव असला तरी तो गावकुसा बाहेरचा देव झाला. माझ्या देव्हार्यात सचिन-गावस्कर-कपिल-कुंबळे-गांगुली हे पंचायतन आहे. यातल्या शेवटच्या ३ नावांवर काहिजण हसतील देखिल पण हसोत बापडे, भारत जिंकावा म्हणुन मी व अनेकांनी केलेले अनेक नवस याच पंचायतनाने पूर्ण केले आहेत यात वाद नाहि. गावस्कर-कपिल यांना प्रत्यक्ष खेळताना पाहिल्याचं फारच अंधुक आठवतय. कपिलने विश्वचषक उचलला तेव्हा माझा जन्म देखिल झाला नव्हता. पण तरी त्यांचं देव्हार्यातील पारंपारीक स्थान मी हलवले नाहिये. पाकिस्तानच्या १० गड्यांना एकहाती तंबुत पाठविणार्या कुंबळेचा बॉल बर्याचदा सुतापेक्षाहि सरळ जातो हे माहित असुनहि मी त्यावर तुडुंब खुष आहे. त्याला कोणी कितिहि डिवचल तरी त्याला जे काहि सांगायच-करायचय ते तो मैदानात सिध्द करतो. सौरव गांगुलीबाबत म्हणाल तो उद्दाम आहे पण महाराजा उद्दाम वागणारच. साध्या सोज्वळ भारतीय संघाला त्यानेच “अरे” ला “का रे?” विचारायची हिंमत दिली हे कोणी नाकारु शकत नाहि. इंग्लंडला नॅटवेस्ट सीरीज जिंकल्यावर त्याने टि-शर्ट गरगरवुन फ्लिंटॉप आणि कंपनीला जी काहि म्हणुन खुन्नस दिली होती त्यासाठी मी त्याच्यावरुन १०० ग्रेग चॅपेल ओवाळुन टाकले आहेत. मध्ये त्याच्या माजोरडेपणामुळेच वर्षभर त्याला टिममधुन बाहेर ठेवलं होतं. पण पिंजर्यात गेला म्हणुन वाघ गवत खात नाहि हेच त्याने धडाकेबाज पुनरागमन करुन सिध्द केलं. सध्या महाराजाचं संस्थान खालसा होण्याच्या मार्गावर आहे पण तो महाराजा होता आहे आणि राहिल. तर सचिन – सौरव गांगुली किंवा कुंबळे यांना हातात कधी बॅट न पकडलेल्यांनी किंवा सोबर्सला आपणच बॅटिंग शिकवली होती अणि वॉर्नला आम्हिच चेंडु वळवायला शिकवल होतं अश्या तोर्यात टाकुन बोलणार्यांचा मला मनस्वी राग आहे. तसा तर सचिनला किंवा अनिल कुंबळेला नावे ठेवणारा प्रत्येक जण माझासाठी समाजकंटक असुन त्यांना किमान ५ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा द्यावी अशी एक जनहित याचिका मी न्यायालयात दाखल करायच्या विचारात आहे.
असो, तर मुळ मुद्दा ११९५३ या संख्येचा आहे. सचिन रमेश तेंडुलकर हा (देव)माणुस ब्रायन लारा नामक व्यक्ती पेक्षा फक्त १५ धावांनी मागे होता. बंगरुळ कसोटितच हा विक्रम तो मोडणार असे वाटत असताना हाय रे दैवा घात ची झाला. वैयक्तीक १३ धावांवर असताना तो बाद झाला होता. मात्र आज(१७-१०-०८) त्याने ८८ धावा ठोकत आपल्या अर्धशतकांचेहि अर्धशतक साजरे केलेच पण त्याने लाराचा ११,९५३ धावांचा विक्रम मोडला आता १२,०२७ धावांसहित तेंडुलकर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. तसे बघता सचिन विक्रम करण्यासाठी कधीच मैदानात उतरत नाहि पण तो मैदानात उतरला कि किमान ५ सामन्यांमागे एखादा विक्रम त्याच्या नावावर आपोआप घडत जातो. आज फलंदाजी मधले कुठले असे विश्वविक्रम सचिनच्या नावावर उरले आहेत हा पीएच डि करण्यासारखा विषय आहे. आता त्याच्या पाठी लारा ११,९५३, ऍलन बॉर्डर ११,१७४, स्टीव वॉ १०,९२७, राहुल द्रविड १०,३४१ आणि रीकी पॉंन्टिंग १०,२३९ असे पाच जण त्यातल्या त्यात ’जवळ’ आहेत त्यापैकी लारा, बॉर्डर आणि स्टिव वॉ हे तर क्रिकेट मधुन निवृत्त झाले आहेत. आणि द्रविड-पॉन्टिंग त्यापेक्षा किमान १६०० धावांनी मागे आहेत.
१५ नोव्हेंबर १९८९ या दिवशी त्याने वयाच्या १६व्या वर्षी कराचीत पाकिस्तान विरुध्द आपल्या कारकिर्दिची सुरुवात केली. आणि ३५ वर्षांचा सचिन आजहि भल्या-भल्यांच्या तोंडचे पाणी पळवत धावतोच आहे. आजवर त्याने ४१७ एकदिवसीय सामन्यांत एकुण ४२ शतके व ८९ अर्धशतकांसहित, ४४.३३ च्या सरसरीने १६,३६१ धावा कुटल्या आहेत. यात सर्वोच्च धावसंख्या आहे १८६* आहे. गोलंदाजीत ४४.१२ च्या सरासरीने १५७ विकेट्स मिळवल्या आहेत. १५२ कसोटी सामन्यांत एकुण ३९ शतके व ५० अर्धशतकांसहित ५४.०२ च्या सरासरीने १२,०२७ धावा काढल्या आहेत. २४८* या कसोटितील सर्वोच्च धावा आहेत.
सचिनला कॅप्टनशीप फारशी मानवली नाहि. नाहि म्हणायला टायटन कप जिंकला वानखेडेवर, पण तो अपवाद ठरला. त्याकडुन कर्णधारपद काढुन घेतले आणि परत त्याची फलंदाजी बहरली. तो नंतर गांगुली, द्रविड, सेहवाग, कुंबळे, धोनी यांच्या सोबत खेळाला पण त्याने कुठेहि आपण फार कोणी मोठे असल्याचे दाखवले नाहि. कर्णधार-प्रशिक्षक-निवड समिती यांच्या बरोबर त्याचे कधी वाद झाले नाहित. त्यांनी ठरवल त्या क्रमांकावर तो फलंदाजीला उतरला. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा सचिन म्हणुनच सर्वांचा आदर्श ठरला. हरभजन-सायमंड वादात तोच सर्वप्रथम हरभजनच्या मागे खंबीरपणे उभा राहिला. वैयक्तीक आयुष्यात देखिल त्याने कधीहि वाद-विवादांना उपजु दिले नाहि. तो मध्ये सलग ३-४ सामन्यांत एकेरी धावसंख्येवर बाद झाला तेव्हा प्रेक्षकांनी त्याचे हुर्यो उडवली होती. पण सचिन खचला नाहि. खुद्द लतादिदि त्याच्यामागे उभ्या राहिल्या व त्यांनी विनंती केली "सचिनवर प्रेम करा, त्याची हुर्यो उडवु नका!" आणि सचिन "परत" आला.
सचिन तेंडुलकर एक गारुड आहे. सगळ्यांना लहानपणी तेंडुलकर व्हायची स्वप्ने पडतात. सगळ्यांना सचिनची प्रसिध्दी दिसते, त्याचे मान-मरातब दिसतात, त्याची पारीतोषके, दिसतात, त्याच्या जाहिराती आणि त्याची फेरारी दिसते पण सचिनची मेहनत किती जणांना दिसते? सचिनला एका मुलाखतीत विचारले तुझ्या यशाचे रहस्य काय? त्यावर सचिन उत्तरला: “there in no shortcut to success! Hardwork is the only way!” मेहनत-मेहनत-मेहनत हिच सचिनची त्रिसुत्री आहे. विनोद कांबळीची एक आठवण इथे सांगण्यासारखी आहे – "मागे एकदा इंग्लंड दौर्यावर गेले असताना सकाळी ६ वाजता भिंतीवर पलीकडुन काहितरी सतत धपऽधप असं आपटत होत, मी बघितले तर शेजारच्या खोलीत सचिन रबरी चेंडु घेऊन मॅचची तयारी करत होता!!" कदाचित बाकिचे खेळाडु व सचिन यांच्यात हा फरक आहे आणि म्हणुनच सचिन ग्रेट आहे.
सचिनने निवृत्त व्हावे असे म्हणणारे आता किमान पुढील २ सीरीजपर्यंत गप्प बसतील. तरी सचिन २०११ चा वर्ल्डकप खेळेल याबद्दल मला खात्री आहे. किंवा किमान त्याने एकदिवसीय सामन्यात ५० शतके व १०० अर्धशतके करावीत तर कसोटीत देखिल ५० शतके व ७५ अर्धशतके करावीत आणि मग वटल्यास निवृत्त व्हावे अशी "रास्त" अपेक्षा आहे. इथे त्यावर अपेक्षा लादल्या जात आहेत असे वाटेलहि पण सचिनला पुढील ३ वर्षात एकुण १९ शतके अज्जिबात कठीण नाहियेत.
आज सचिन सर्वोच्च धावा काढणारा फलंदाज झाला आहे. एक भारतीय आणि त्यातुन मराठी माणुस असे झेंडे उभारत चालल्याचा सार्थ अभिमान आहे. त्याचे नाव आता विक्रमादित्यच ठेवायला हवे. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवराय या दोन मराठी दैवतांची माफी मागुन या तिसर्या दैवतासाठी मी म्हणेन – "विक्रमांचा महामेरु। भारतीय संघासी आधारु। अखंड स्थितीचा निर्धारु। "श्रीमंत" योगी॥"
- सौरभ वैशंपायन(मुंबई)
प्रतिक्रिया
20 Oct 2008 - 9:40 pm | संदीप चित्रे
गेल्या २/३ दिवसांपासून ह्या विषयावर लिहिन म्हणतोय आणि कामाच्या रगाड्यात जमत नाहीये :(
--
>> माझ्या देव्हार्यात सचिन-गावस्कर-कपिल-कुंबळे-गांगुली हे पंचायतन आहेत.
काय बोललास मित्रा ! जियो !! आमच्या पिढीचं भाग्य असं की आम्ही तुझ्या पंचायतनची पूर्ण कारकीर्द पाहिली :)
कपिल देव तर साक्षात देव होता. त्यानंतर नंतर कधीतरी लिहिनीच :)
>> सचिनला कॅप्टनशीप फारशी मानवली नाहि.
विव्ह रिचर्डसने एक खूप सुरेख वाक्य सांगितलंय. तो म्हणाला होता की सचिनसारख्या खेळाडूंना कॅप्टन्सी वगैरे असल्या ओझ्याखाली दाबू नये. त्यांना मोकळं सोडावं आणि सांगावं गो.. गेट देम टायगर :)
आपल्याकडे लोक काहीही बरळतात रे, तेंडल्याला हाकला वगैरे ! च्यायला तुमच्या-माझ्यापेक्षा त्याला स्वतःचं क्रिकेट जास्त समजत असेलच ना !! योग्य वेळ त्यालाच ठरवू द्या !
21 Oct 2008 - 12:22 am | व्यंकु
सचिनवर टिका करण्याची, त्याला नावं ठेवायची कुणाचीही लायकी नाही(त्यात मीही येतो)
21 Oct 2008 - 3:13 am | भडकमकर मास्तर
सचिनला कॅप्टनशीप फारशी मानवली नाहि
कृपया सचिनवर अशी टीका करू नये.... सचिनला काय मानवते आणि काय मानवत नाही ते त्याचे त्याला चांगले कळते....
ज्यांनी कधीच एखाद्या देशाच्या क्रिकेट संघाची कॅप्टनशीप केली नाही, अशा लोकांनी त्याला नावे ठेवल्याबद्दल स्वतः स्वतःवरच जनहित याचिका दाखल करावी.
सचिन २०११ पर्यंत खेळणार असे म्हणून त्याचा अपमान करू नये... तो २०१५ पर्यंत ( किंवा भारत वर्ल्ड कप जिंकेपर्यंत) खेळणार आहे....
सचिन २०१५ विश्वचषकापर्यंत पर्यंत खेळला तर त्याला या सात वर्षांमध्ये आणखी ३६ टेस्ट शतके आणि आणखी ३४ एकदिवसीय शतके करणे अवघड नाही... ७५ टेस्ट शतके आणि ७५ एकदिवसीय शतके केलेला एकमेवाद्वितीय माणूस व्हायची त्याला संधी आहे, ती त्याने नक्की पूर्ण करावी अशी माझी त्याच्याकडून रास्त अपेक्षा आहे......
मी देव नाही, असे खुद्द सचिनने वागळेकाकांना सांगितले आहे... मला संशय आहे की तो खोटे बोलत असावा..
. ( माझा मित्र म्हणतो, मला त्याचे पटले , तो देव कसा असेल? तो तर तेंडुलकर आहे)
खुद्द लतादिदि त्याच्यामागे उभ्या राहिल्या व त्यांनी विनंती केली "सचिनवर प्रेम करा, त्याची हुर्यो उडवु नका!"
त्या दिवशी लतादिदींनी सचिनवर प्रेम करायची चाहत्यांना विनंती केली आणि खरंच अंतःकरण भरून आलं...
... तेव्हापासून मी सचिनवर अधिकच प्रेम करू लागलो.... लतादिदींचा शब्द कसा मोडणार ?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
21 Oct 2008 - 4:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
खुद्द लतादिदि त्याच्यामागे उभ्या राहिल्या व त्यांनी विनंती केली "सचिनवर प्रेम करा, त्याची हुर्यो उडवु नका!"
आणि सचिनने दिदींच्या गाण्याचं विश्लेषण केलं का?
त्या दिवशी लतादिदींनी सचिनवर प्रेम करायची चाहत्यांना विनंती केली आणि खरंच अंतःकरण भरून आलं...
मलातर रडूच आलं हो मास्तर ...
(ए, कोणाला ते "बंदीनी"चं गाणं आणि बंदीवान कुठेही असला, पिंजर्यात किंवा देवळात, बंदीवानच असतो असं काही आठवतंय? संस्कृतमधून वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन.)
अदिती
अवांतरः सचिनाय वाढवासरानी शुभेच्छानि।
21 Oct 2008 - 12:32 pm | मनिष
__/\__
=))
21 Oct 2008 - 3:15 am | बेसनलाडू
('देव'भोळा)बेसनलाडू
21 Oct 2008 - 12:27 pm | घाशीराम कोतवाल १.२
सचिनवर टिका करण्याची, त्याला नावं ठेवायची कुणाचीही लायकी नाही(त्यात मीही येतो)
सचिन २०१५ विश्वचषकापर्यंत पर्यंत खेळला तर त्याला या सात वर्षांमध्ये आणखी ३६ टेस्ट शतके आणि आणखी ३४ एकदिवसीय शतके करणे अवघड नाही... ७५ टेस्ट शतके आणि ७५ एकदिवसीय शतके केलेला एकमेवाद्वितीय माणूस व्हायची त्याला संधी आहे, ती त्याने नक्की पूर्ण करावी अशी माझी त्याच्याकडून रास्त अपेक्षा आहे......
सचिन रमेश तेंडुलकर भारतींयाचा देव आहे अस खुद्द हेडन म्हट्ला होता
खरच सचिन is sachin
मी आता तसा कोतवाल नाही बरं?
21 Oct 2008 - 1:17 pm | भडकमकर मास्तर
सचिन रमेश तेंडुलकर भारतींयाचा देव आहे अस खुद्द हेडन म्हट्ला होता
खुद्द हेडन म्हणाला असे हे ऐकून विश्वास बसेना...
हेडन हा ऑस्ट्रेलिअन लोकांचा गॉड आहे असं सचिन कधीच म्हणाला नाही तरी असं म्हणावंसं वाटतं की हेडन म्हणजे अगदी हेडन आहे...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
21 Oct 2008 - 5:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हेडन हा ऑस्ट्रेलिअन लोकांचा गॉड आहे असं सचिन कधीच म्हणाला नाही तरी असं म्हणावंसं वाटतं की हेडन म्हणजे अगदी हेडन आहे...
दुसरं हेडन मला सेटनसारखं काहीसं ऐकू आलं! ;-)