द ईएमआय ट्रॅप

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
16 Jul 2014 - 1:44 pm

गेल्या दोन-तीन दशकांत, पैसा आणि त्याचं महत्त्व या गोष्टींत कमालीचा बदल होत गेलेला आहे. शिवाय बदलत गेलेत ते पैसा मिळवण्याचे आयाम, तो साठवण्याची परिमाणं, त्याच्या व्ययाच्या पद्धती, त्याचा व्यय करण्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय आणि त्याच्या व्ययातून मिळणारं समाधान.
lifestyleफार पूर्वी नाही, अगदी तीन एक दशकांपूर्वीच्या परिस्थितीची कल्पना करूया. एखादी गोष्ट खरेदी करण्याची प्रक्रिया साधारण अशी असायची. सर्वप्रथम गोष्ट हवी आहे की तिची गरज आहे याचा विचार व्हायचा. अर्थातच गरज असल्यासच बहुदा तो पुढे नेला जात असे. मग त्या गोष्टीची किंमत किती हे बघणं आलं. ब्रँड वैगरे दुय्यम गोष्टी असत. किंमत बघून तितके पैसे आपल्याकडे जमलेले आहेत का? नसल्यास ते जमेपर्यंत खरेदी तहकूब. असल्यास ते इतर कुठल्या कारणासाठी राखून ठेवलेले नाहीत ना? त्यांचा इतर कुठे अधिक सदुपयोग होऊ शकतो का? हे प्रश्न पडताळले जात असत. आणि या सगळ्यातून जर निर्णय पुढे सरकलाच, तर ती गोष्ट विकत घेतली जाई. अपवाद इथेही असतीलच, परंतु सर्वसाधारण प्राधान्यक्रम हे असे असावेत.
आता हे क्रम प्रचंड बदलले आहेत. गरजेच्या गोष्टींआधी हव्या असलेल्या गोष्टी येतात. त्याही हव्या यासाठी असतात की त्या दुस-या कुणाकडे असतात, पण आपल्याकडे नसतात. जागतिकीकरणामुळे एका गोष्टीसाठी पाच कंपन्यांचे पर्याय असतात. प्रत्येक कंपनीच्या ब्रँडची एक पत असते. अर्थातच जास्त पत असलेला ब्रँड घेणं ही प्रथम पसंती असते. इथवर गोष्टी स्वाभाविक आहेत.
पुढे पैशाची गोष्ट येते जिथे ओढून ताणूनचा प्रकार बळावलेला आहे. कर्जसंस्कृती आधीही होती, परंतु त्या वाटेला जाणं हे काहीसं कमीपणाचं होतं. आता तसं नाही. कर्जहीन माणूस म्हणजे इच्छाहीन, आकांक्षाहीन माणूस. कारण, इच्छा तिथे पैसे, पैसे तिथे कर्ज असं समीकरणच आहे. भरीस भर म्हणून आलेला प्रकार म्हणजे क्रेडिट कार्ड. या क्रेडिट कार्ड संस्कृतीच्या प्रमाणाबाहेर लाडांमुळे आपणच आपल्याला कसे पिंज-यात बांधतो हे अनेकांना कळत नाही.
परवा एका मॉलमधे मी एक जाहिरातीचा फलक बघितला. त्यावर लिहिलं होतं, ‘डिझायनर वॉचेस. ईएमआय लो ऑफर्स, १९९९ ओनली.’आता घडयाळ ही गरजेची गोष्ट मानली, तरी डिझायनर घडयाळ ही चैनीची बाब होते. तर ही कुठल्याशा परदेशी कंपनीची लाखो रुपयांची घडयाळं मंडळी आता हप्त्यावर घेणार हा विचार करून हसू आलं. घर ठीक आहेत, गाडया ठीक आहेत, इलेक्ट्रॉनिक उपकरणं ठीक आहेत, पण घडयाळासारखी गोष्ट हप्त्यावर म्हणजे कहरच. उद्या कपडे, बूट, वाणसामान, तेल याही गोष्टींच्या ईएमआय ऑफर्स येतील. जगणंच ईएमआय वर होईल.
इथे पूर्वीचे सगळे क्रम उलटे झालेले आहेत. गरजेपेक्षा इच्छा, किमतीपेक्षा ब्रँड, आणि कुवतीपेक्षा ऑफर या गोष्टी मोठया झालेल्या आहेत. भारतीय ग्राहकाच्या मानसिकतेचा नेमका हाच कमकुवत दुवा आहे आणि तो कंपन्यांनी बरोबर हेरलेला आहे. मला आठवतंय माझा एक मित्र माझ्याकडे चांगला कॅमेरा कुठला अशी चौकशी करत होता. मी सहज ‘बजेट किती’ विचारलं असता तो म्हणाला होता की, ‘बजेट असं काही नाही, भारी पाहिजे कॅमेरा. तसंही ईएमआयवर घेणार आहे मी.’ ते ईएमआय दरमहा द्यायचा असतो हे त्याला ठाऊक होतं की नाही, कल्पना नाही.
ईएमआय, क्रेडिट कार्ड यांनी त्याच वेळेला एखादी गोष्ट खरेदी करणं शक्य होतं यात दुमत नाही. परंतु त्यामुळे प्रलोभित होऊन आपण आपल्या कुवतीच्या कक्षा बळेच रुंदावतो आणि मग ठरावीक रक्कम दर महिन्याला खात्यातून वजा होणार आहे, त्यावर भक्कम व्याज आपल्याला द्यावं लागणार आहे, या गोष्टींची बोच भूल दिल्यागत तेव्हा आपल्याला जाणवत नाही. परंतु नंतर तो ईएमआय खात्यातून वजा व्हायला लागतो, तेव्हा मात्र आपल्याला ते ओझं जड होतं.
तेव्हा या ईएमआयच्या सापळ्यात आपण कमीत कमी अडकलेलंच हिताचं आहे. भलत्या उडया मारून नंतर लटकण्यापेक्षा सावध पावलं उचलणं कधीही योग्य असतं. माझ्या एका मित्राचे बाबा म्हणतात, Luxuries should never be bought with borrowed funds.’ अशी उदाहरणं, असे फलक बघितले की मला हे वाक्य नेहमी आठवतं.

हा लेख प्रहार वृत्तपत्रात छापून आला होता त्याचा हा दुवा

अर्थकारणविचार

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Jul 2014 - 1:56 pm | राजेंद्र मेहेंदळे

काही अंशी खरे आहे तुमचे म्हणणे..पण असे बघा...आज मी कमावतोय...उद्याचे माहीत नाही.
आत्ता वय आहे,हौस आहे,खरेदीची क्षमता आहे. (ईएम आय वर का होईना)वस्तू आत्ताच मिळाली तर त्याचा उपभोग घेउ शकतो.नाहीतर चणे आहेत तेव्हा दात नाहीत आणि दात आहेत तर चणे नाहीत असे व्हायचे.

आणि हो..ईकॉनॉमी शुड बी रोलींग हे तत्वसुद्धा आहेच.त्यामुळे कही बाबतीत तरी ईएम आय ला पर्याय नाही.

आणि मी पयला.हे राहीलेच

केदार-मिसळपाव's picture

17 Jul 2014 - 8:33 pm | केदार-मिसळपाव

पण ते चणे ठिसुळ आहेत की लोखंडाचे ते तपासुन बघा नाहितर आपले दातच पडायचे खातांना.
डिझायनर घड्याळाचे उदाहरण चपलख आहे इथे.

एस's picture

18 Jul 2014 - 1:03 pm | एस

अगदी चपखल प्रतिसाद. ;-)

मराठी कथालेखक's picture

16 Jul 2014 - 2:03 pm | मराठी कथालेखक

If you buy things you don't need, you will soon sell things you need. - Warren Buffett

माझे काही मित्र Brand च्या प्रेमात बुडून प्रचंड पैसा खर्च करताना दिसतात... अर्थात अतिरेकी कंजुसपणा ही करु नये. मध्यममार्गी असावे. बचतीचे उद्दिष्ट असावेत.
माझा एक अनुभव : मी चांगल्या mutual funds मध्ये वगैरे पैसे गुंतवले आणि मग जेव्हा ते छान वाढताना बघितलेत तेव्हा आपोआपच माझा खर्चिकपणा कमी झाला आणि बचतीकडे कल वाढला.

कवितानागेश's picture

16 Jul 2014 - 2:12 pm | कवितानागेश

हे सगळं ब्रॅन्ड्स्चे आणि इतर महागड्या गोष्टींचे वेड स्पर्धेतून निर्माण होतं.
आणि स्पर्धा तर आपापल्या परीनी सगळेच निर्माण करतायत.......
आपली स्वतःची 'गरज आणि कुवत' काय आहे याचा विचार करणं फार कठीण जातं , एकदा का तुलना करण्याचं भूत डोक्यावर बसलं की.

आदूबाळ's picture

16 Jul 2014 - 2:15 pm | आदूबाळ

कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑटोमोबाईल, बांधकाम हे उद्योग ईएमायच्या जिवावर फोफावतात. उद्या सगळ्यांनीच ईएमायवर या वस्तू घ्यायचं थांबवलं तर त्या क्षेत्रांत मंदी येईल. त्याचा स्पिलओव्हर इफेक्ट म्हणून नोकर्‍या जातील, कर्जचुकवेगिरी वाढेल, महागाई, वगैरे वगैरे.

कर्जाऊ पैसे देण्याच्या माध्यमातूनच बँका अर्थव्यवस्थेत पैसे "निर्माण" करतात. तेही मंदावेल.

माझ्यामते मुख्य मुद्दा उधळपट्टी, कॉन्स्पिक्युअस कंझम्प्शन बंद करायचा आहे. थोड्या घाऊक प्रमाणात बोलायचं तर अर्थसाक्षरतेचा आहे. फक्त ईएमायला दोष देऊन कसं भागेल? हे म्हणजे अपघात होतात म्हणून रस्त्याने चालणं बंद करण्यासारखं आहे.

मराठी कथालेखक's picture

16 Jul 2014 - 2:41 pm | मराठी कथालेखक

गरजेचा विचार करुन वस्तू विकत घेणं योग्य.
उदा: जर मी बर्‍यापैकी भटकंती करुन फोटोग्राफी करणार असेन, मी खरंच चांगला फोटोग्राफर असेन (भले व्यावसायिक नसेन) तर मी महागडा कॅमेरा घेण्याचं समर्थन होतं अन्यथा घरगुती फोटो काढायला पाच-सात हजारांचा कॅमेराही चालू शकतो. आणि जर मी अशा प्रकारे निसर्गरम्य ठिकाणी भटकंती करण्यात जास्त (फावला) वेळ घालवत असेन तर मला दिखावूपणाची ,ब्रँडेड घड्याळ वा कपड्यांची फारशी गरज नाही मग त्या वस्तूंत मी पैसे वाचवणे योग्य. याउलट मला पार्टी ,समारंभ वगैरेंची जास्त आवड असेल तर मला महागडे कपडे, घड्याळ ई ची गरज अधिक भासेल पण अशा समारंभात माझा आणि माझ्या कुटूंबाचा जास्त वेळ जाणार असेल तर घरी ५२ ईंची ऐवजी ३२ इंची टीवी असून चालण्यासारखे आहे. थोडक्यात सांगायचे तर कुठे तरी समतोल साधावा.

चौकटराजा's picture

16 Jul 2014 - 3:57 pm | चौकटराजा

कशासाठी कर्ज घायचे कशासाठी नाही याचे सर्वसाधारण उत्तर असे असू शकते की स्थावर गोष्टीसाठी कर्ज घ्यावे. शिक्षणासाठी कर्ज घ्यावे. व्यवसायाचा भाग म्हणून कर्ज घ्यावे. उदा. अगदी सेकंड थर्ड कितवेही घर असेल तर कर्ज घ्यावे.उच्च शिक्षणाने पुढे चांगली अर्थप्राप्ती होते सबब कर्ज घेण्यास हरकत नाही. भारी क्यामेरा व्यवसायासाठी घ्यायचा असेल तरीही कर्ज घ्यावे. पण तोच हौस म्हणून घ्यायचा असेल तर कर्ज कशासाठी ?हे झाले सरळसोट अर्थशास्त्र पण हौस, प्रतिष्ठा यांचे प्रभावाखाली जे मन काम करणारे असते बहुदा मुर्खाचे असते. पण अर्थ्व्यवस्था चालण्यासाठी अशी माणसे आवश्यक असतात. बिशेषतः मुक्त अर्थ्व्यवस्थेत तर क्याबरे पहाणारे, वेश्येकडे जाणारे, शुभ क्र गाडीसाठी घेणारे, लगनात निमंत्रण पत्रिकेलाही लाखो खर्च करणारे, निरनिराळ्या रंगाचे प्रेशस स्टोन वापरणारे, व्यवसाय वृद्धी, संततिप्राप्ती साठी याग करणारे,पार्ट्या देणारे व घेणारे असे लोक असावे लागतातच. कारण त्यातून जाहिरात कंपन्या, बिल्डर. सेल्समन, वॉचमन हॉटेले ई अनेकाना रोजगार मिळणार असतो.समाजात सगळेच सुज्ञ लोक होणे यातून कल्याणा च्या कल्पनेबरोबर यादवीचा ही धोका संभवतो.

मराठी कथालेखक's picture

16 Jul 2014 - 4:57 pm | मराठी कथालेखक

तुमचे म्हणणे खरे असेल. पण ०% किंवा तत्सम अल्प व्याजदराने कर्ज मिळते म्हणून पण घेतले जाते. म्हणजे EMI ने ५०-६० हजारांचा camera घेणार्‍याकडे ५०-६० हजार कॅश (म्हणजे सेविंग, एफ डी ई) नसतीलच असे नाही पण एफ डी वर मिळणार्‍या व्याजापेक्षा कर्ज वा EMI स्वस्त पडत असेल तर तसे घेणे शहाणपणाचेच ठरते.

पगला गजोधर's picture

16 Jul 2014 - 4:46 pm | पगला गजोधर

आमचे औरंगाबादचे बोकीलकाका म्हणतात, पूर्वीच्या काळी लोकं वर्तमान विकून भविष्य सुखी करायला बघायचे.
(रेफ: निवृत्तिवेतनातूनच घर बांधायचे), आजच्या काळी लोक भविष्य विकून, वर्तमानात सुख विकत घ्यायला पाहतात (जे कि तुम्ही लेखात मांडलय)
(मी पूर्वीची लोक बरोबर कि आजचे बरोबर, यावर भाष्य करत नाही आहे, कृपया हळू घ्या)

संजय क्षीरसागर's picture

16 Jul 2014 - 5:13 pm | संजय क्षीरसागर

(दोन वेळा `कृपया हळू घ्या' म्हटलंय!) आणि पुढे डिस्क्लेमर टाकलायं : `मी पूर्वीची लोक बरोबर कि आजचे बरोबर, यावर भाष्य करत नाही आहे.'

तुमचं बरोबर आहे. `वर्तमान स्वस्थ असला पाहिजे' ही मजेत जगण्यासाठी एकमेव कंडीशन आहे.

भविष्य गहाण टाकून तुम्ही `वर्तमानात अस्वस्थ आहात', की `भविष्यात जगू' म्हणून `वर्तमान सोसतायं' यानं काही फरक पडत नाही.

आदिजोशी's picture

16 Jul 2014 - 5:18 pm | आदिजोशी

EMI हे एक बूमरँग आहे. वळून परत आल्यावर पकडायचा दम असेल तरच वापरावे :)

किसन शिंदे's picture

16 Jul 2014 - 6:50 pm | किसन शिंदे

अॅड्याशी सहमत. ईएमआय झेपणार्यांनीच त्याच्या वाटेला जावे. बाकी एकुण लेखाशी बर्याच प्रमाणात सहमत आहे.

कपिलमुनी's picture

16 Jul 2014 - 6:30 pm | कपिलमुनी

विषय चर्चेसाठी उत्तम आहे..
पुढे वाचण्यास उत्सुक !

सुबोध खरे's picture

16 Jul 2014 - 7:01 pm | सुबोध खरे

luxury becomes necessity when your neighbour buys it
इति सुबोध खरे

वपुंच्या 'दोंदे' ह्या कथेची थोडी आठवण झाली.
त्यातच एक वाक्य आहे, की "कर्ज काढणं म्हणजे एक भला मोठा दगड डोंगरावरून खाली ढकलून देणं, आणि कर्ज फेडणं म्हणजे तोच दगड पुन्हा वर नेऊन ठेवणं".

स्पार्टाकस's picture

16 Jul 2014 - 9:31 pm | स्पार्टाकस

इएमआय हा घर, गाडी घेण्यासाठी काहीसा अविभाज भाग झालेला आहे. मात्रं अनेकदा या वस्तूंच्या दुप्पट किंमत आपण व्याजासकट भरत असतो. विशेषतः घर घेताना.

एक उदाहरण :

गृह कर्ज - ३० लाख
व्याजदर - १० % फ्लोटींग.. हा नेहमी वाढतोच. मात्रं मूळ दरापेक्षा कमी कधीच होत नाही.
कर्जचा कालावधी - २० वर्ष
इएमआय - २८९५०/-

आता २० वर्षांपर्यंत इएमाआय भरत बसलो तर परत केलेली रक्कम -
२८९५० * १२ * २० = ६९,४८,०००/-

म्हणजेच मूळ कर्जाच्या दुप्पटीपेक्षा जास्त पैसे इएमआय रुपाने परत केले !!

अर्थात जर गृह कर्जाचे हप्ते पूर्ण वीस वर्ष भरत बसलो तरच. लवकर लोन बंद केले तर किती तरी प्रमाणात हे पैसे वाचू शकतात.

आदूबाळ's picture

16 Jul 2014 - 9:39 pm | आदूबाळ

महागाई वाढेल वीस वर्षांत त्याचं काय? समजा महागाई व्याजदरापेक्षा जास्त रेटने वाढली तर?

राजेश घासकडवी's picture

16 Jul 2014 - 10:23 pm | राजेश घासकडवी

अहो, ज्यांनी वीस वर्षांपूर्वी पाच-दहा लाखांना घरं घेतली, ते नक्की कुठच्या सापळ्यात अकडलेले आहेत? महिन्याला पाच दहा हजार रुपये इएमआय! अबबबबबबबब!!! तेच घर आज कितीपट किमतीला मिळेल? त्यांनी त्यावेळी कर्ज न घेता, घर न घेता बचत केली असती, तर आज ते घर परवडेल का? समजा परवडलं, तरी गेली वीस वर्षं कुठच्यातरी घरासाठी भाडं भरावं लागलंच असतं नाही का?

उगाच सापळे वगैरे शब्द वापरायला काय जातंय? रास्त दराने कर्ज घेता येण्याचा सर्वसामान्य माणसाला फायदाच होतो. अतिरेक केला तर तोटा होतो हे बरोबरच. कर्ज हे एक साधन म्हणून वापरावं, आपल्या मर्यादेत रहावं वगैरे ठीक आहे. पण कर्ज काढण्याची प्रथाच वाईट वगैरे मूळ लेखातला टोन पटत नाही.

पण कर्ज काढण्याची प्रथाच वाईट वगैरे मूळ लेखातला टोन पटत नाही. >> असा काही टोन जाणवला नाही, पण केवळ ब्रेंडच्या हव्यासापायी कुवतीपेक्षा आणि विनागरज आपलं बजेट केवळ इएमआय भरण्याची (फसवी) सोय उपलब्ध आहे म्हणून ताणू नये,असे म्हणणे असल्यासारखे वाटते.

आता अर्थात, मूळ मुद्दा वगळून एमआय असतातच त्यासाठी वगैरे बरीच चर्चा होऊ शकतेच म्हणा.

@ वेल्लाभट
- लेख आवडला, पटला. धन्यवाद.

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Jul 2014 - 1:37 pm | llपुण्याचे पेशवेll

बुल्स आय.

३० लाखाच्या घराची २० वर्षांनी किमंत किती झाली असेल ? समजा १ करोड झाली. मला तरी सौदा फायद्याचाच वाटतोय.

अमेरिकन त्रिशंकू's picture

17 Jul 2014 - 3:41 am | अमेरिकन त्रिशंकू

३० लाखाचे २० वर्षात १ कोटी म्हणजे रेट ऑफ रिटर्न साधारण ६.२५% झाला. (१.०६२५^२०*३० = ३.३६*३० = १ कोटी).
भारतातील चलनवाढ साधारण ८-९% धरली तरी सौदा घाट्यातलाच आहे. (१.०८५^२०*३० = १.५ कोटी)

हेच पैसे एफ.डीमध्ये ८-९% नी ठेवले तर जास्त फायदा होईल.

थोडक्यात काय तर घर हे राहाण्याकरता घ्या गुंतवणूक हे मुख्य ध्येय ठेवून घेउ नका.
जेव्हाकेव्हा घर विकायची वेळ येईल (आलीच तर) तेव्हा फायदा झाला असेल तर उत्तमच पण नुसते ३० लाखाचे १ कोटी झाले म्हणजे गुंतवणूक चांगली असे नाही.

काही अंशी तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण २० वर्षानंतर ३० लाखाच्या घराची किंमत १ करोड पेक्षा खूप जास्त असणार हे नक्की. कदाचित २ करोड पेक्षाही जास्त असू शकते
पेठकर काकांच्या शेवटच्या प्रतिसादाशी सहमत

लष्करातून निवृत्त होताना २००४ साली मी माझे घर मुंबईत (मुलुंड येथे )१८ लाख रुपयाला विकत घेतले (७५० चौ. फूट). त्या घराची आज किंमत ८५ लाख पर्यंत येते आहे. हिशेब करा परतावा किती टक्के मिळतो ते. सर्व व्यवहार धनादेशाने केलेला आहे. ( राहते घर विकत येत नाही पण म्हातारपणी रिव्हर्स मोर्तगेज ठेवून मरेपर्यंत पेन्शन सदृश्य दरमहा रक्कम मिळू शकते)
३ लाख माझ्या खिशातून आणि १५ लाख्रुपये एच डी एफ सी चे कर्ज. याचा महिन्याचा हप्ता(?) १४२०० रुपये आहे. यात मला २०,०००/- रुपये मुदलात आणि १,५०,०००/- व्याजात आयकरातून सुट मिळते. म्हणजे ५१,००० रुपये वर्षाला कर बचत. म्हणजे मला प्रत्यक्ष हप्ता रुपये १०,०००/- च पडतो

हीच गोष्ट मी जर होंडा अकोर्ड तेंव्हा १८ लाखाला घेतली असती तर आज तिची किंमत १. ८ लाख आली असती वर त्याचा हप्ता तेंव्हा रुपये ५५, ००० पडला असता( मोटारीचे कर्ज फक्त ७ वर्षासाठी मिळते.)
तात्पर्य आपण इ एम आय कशासाठी घेतो आहे आणि त्याचा फायदा काय आणि तोटा काय हे प्रत्येकाने तारतम्य ठेवून घ्यावे

चौकटराजा's picture

17 Jul 2014 - 10:46 am | चौकटराजा

आमचा प्रतिसाद पहावा.
आतापर्यंत एकही कर्जाचा अर्ज न भरलेला शहाणा व मूर्ख- चौकटराजा.

धन्या's picture

17 Jul 2014 - 2:45 pm | धन्या

वीस वर्षांपूर्वी विकत घेतलेल्या राहत्या घराची किंम आजच्या बाजारभावाने कितीही कोटी असली तरी ती कागदावरील किंमत असते. ती किंमत रुपयांमध्ये रुपांतरीत करावयाची झाल्यास ते राहते घर विकावे लागेल. राहते घर विकल्यानंतर राहण्यासाठी आपल्या घराच्या किंमतीत आपल्याच घरासारखे जुने घर विकत घेता येऊ शकते. नविन घर घ्यावयाचे झाल्यास आपल्या घराच्या किंमतीत निदान काही लाख तरी टाकावे लागतात. काय फायदा मग अशा वीस लाखाचे एखादा कोटी रुपये झाल्याचा? आपल्या घराची किंमत कोटीमध्ये आहे अशा धारणेपलिकडे त्याला काहीही अर्थ नाही.

कुणी जर राहत्या घराबरोबरच गुंतवणूक म्हणून असे एखादे जास्त घर घेतले असेल तर त्या घरालाच हे "वीस लाखाचे एक कोटी" गणित लागू होते.

सुबोध खरे's picture

17 Jul 2014 - 6:43 pm | सुबोध खरे

धन्या साहेब
राहते घर हे सुद्धा एक फार महत्त्वाचे साधन असू शकते. माझ्या ओळखीतील किंवा माहितीतील चार उदाहरणे अशी आहेत.
१) ६० व्या वर्षी निवृत्त झाल्यावर निवृत्तीवेतन नव्हते फक्त फंड होता.मुल बाळ नसलेले जोडपे. व्याजदर कमी झाल्याने त्यात भागेना. त्यातुंन वैद्यकीय खर्च वाढत चाललेला. कोणाकडे हात पसरणार. शेवटी आमच्या सोसायटीतील ( मुलुंड चे) घर विकले २० लाख रुपये आले. तेवढेच घर पार्वती पायथ्याला पुण्यात तेंव्हा ११ लाखाला आले उरलेले ९ लाख रुपये व्याजावर ठेवून त्या जोडप्याचे उर्वरित आयुष्य समाधानात गेले.
२) एक जोडपे बांद्र्याला राहत होते. निवृत्तीवेतन नाही. मुले अमेरिकेत. मुंबईत राहून काय करायचे? बांद्र्याचे घर विकले ४० लाखाला. १२ लाखाला कोथरूडला भावाच्या शेजारी ३ बेडरूमचे घर घेतले. उरलेले २८ लाख ब्यांकेत ठेवून आपल्या भावन्डान्सोबत आनंदात आहेत. शिवाय मुले अमेरिकेतून येतात त्यांच्यासाठी मोठे घरहि झाले.
अशी अजून २ उदाहरणे आहेत.
असो. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेंव्हा लोकसंख्या ४० कोटी होती. भारताचे क्षेत्रफळ वाढले नाही पण लोकसंख्या तिप्पटी हून जास्त झाली आहे. तेंव्हा घराच्या किमती कमी होण्याची शक्यता नाही. केंव्हाही स्वतःचे घर असणे हे उत्तम. त्याहून जास्त पैसे असतील तर दुसरे घर घ्यावे भाड्याने द्यावे. आणि जेंव्हा परवडेनासे होईल तेंव्हा मोडून खावे.

डॉक्टरसाहेब, तुम्ही दिलेली उदाहरणे रास्त असली तरी ते अपवादात्मक परिस्थितीतच होते.

बेकार तरुण's picture

18 Jul 2014 - 7:29 am | बेकार तरुण

अपवादात्मक परिस्थितिच होत अस वाटत नाहि मला. घर घेण हे गुंतवणुक म्हणुन असु दे वा रहायला असु दे, त्याचि किंमत वाढण हे जरि कागदि असलं तरि याचाच अर्थ असाहि होतो कि त्या भागातिल घरांचि भाडि देखिल साधारण त्याच रेट मधे वाढलि आहेत. सो स्वतचे घर नसेल तर भाडे हि तेवढेच वाढेल. सो झेपेल तेवढे कर्ज घेउन स्वताचे घर घेणे शहाणपणाचे ठरु शकते. आणि एक म्हंणजे अनेक ईकॉनोमिक सायकल्स आल्या आणी गेल्या पण घराच्या किमति वाढतच राहिल्या आहेत. आपला ई एम आय तोच राहिल (थोड्या फार फरकाने) पण आपले भाडे नक्किच वाढत राहिल.

बाकि मूळ लेखातिल मुद्द्याशि सहमत आहे. घड्याळ हे उदाहरण पण चपखल आहे.

आदूबाळ's picture

18 Jul 2014 - 2:09 pm | आदूबाळ

नाही, भाड्याची घरं हे स्वतंत्र मार्केट आहे.

घरं (residential property) भाड्याने देण्यात ५-७% च्या वर रिटर्न मिळत असेल असं वाटत नाही. (अपवादः कॉट बेसिस, सर्विस अपार्टमेंटस वगैरे. पण ती प्युअर टेनंसी नव्हे.)

घर विकत घेऊन त्याचा ईएमाय आलेल्या भाड्याच्या पैशांत बसला आहे असं उदाहरण माझ्यातरी पहाण्यात नाही. (तुमच्या असल्यास सांगा - लगेच इन्वेस्ट करू!)

प्रभाकर पेठकर's picture

18 Jul 2014 - 2:12 pm | प्रभाकर पेठकर

घर घेऊन भाड्याने देण्यापेक्षा दुकान घेऊन (मोक्याच्या ठिकाणचं) भाड्याने देणं जास्त सोयिस्कर. सगळा ईएमाय गेला नाही तरी बराच रिलिफ मिळतो.

बायकोने साठ लाखाचे दुकान विकत घेतले त्याचे भाडे मिळते १५०००. आता विचार करा ह्याच साठ लाखाची पुन्यापासुन ४० ते ५० किमी च्या परिसरात साधारण ४ ते ५ एकर जिरायत जमिन सरासरी १२ ते १५ लाख रु एकर ने आली असती त्यात विहिर खोदन्याचा मोटार पाइपलाइनचा खर्च २ ते ३ लाख. व फळ झाडे लावण्याचा खर्च २ लाख या वरच्या खर्चालाही शासकिय अनुदान आहे, व कालावधी १ ते दिड वर्ष आता दिड वर्षाने या जमिनीची विक्री करावयाची ठरवली तर साधारण फळबाग बागायत जमिनिची एकरी किंमत कमित कमी २५ लाख रुपये एकर चालु आहे व्यवहार बसता बसता सहा महिने गेले तरी दोन वर्षांनी जमिनीची किंमत येते येते १.१० ते १.२५ कोटी मग हे जे दुकान घेतले त्याची वाढुन वाढुन दोन वर्षांनी किंमत किती वाढेल्,समजा स्वतःकडेच ठेवले तर त्याचे भाडे किती येइल.

प्रभाकर पेठकर's picture

19 Jul 2014 - 2:30 pm | प्रभाकर पेठकर

माझ्या प्रतिसादातील '(मोक्याच्या ठिकाणी)' हा मुद्दा आपण लक्षात घेतलेला दिसत नाहिये.
६० लाखात घेतलेले दुकान कुठल्या गावात, परिसरात आणि किती चौरस फुटाचे आहे हे लिहीलेले नाही.
पण पुण्यात जिथे मी उपहारगृह चालवत होतो तिथे २५० चौरस फुटाच दुकानाचे भाडे २००००/- रुपये होते ते दुका॑न मालकाने ८ की १० लाखात घेतले होते.
शहरातील मुख्य उलाढालीच्या केंद्राजवळ दुकानांचा प्रत्येक चौरस फुटाचा खरेदी दर आणि त्यातून मिळणार्‍या भाड्याच्या रकमेचा परतावा दोन्ही जास्त असतात. अशा केंद्रापासून जेवढे दूर जाल तेवढे प्रत्येक चौरस फुटाचा खरेदी दर कमी असतो (म्हणजे तेव्हढ्याच पैशात जास्त जागा मिळते) तसेच भाडेही कमी मिळते पण जागा जास्त असल्याने फायदाच होतो.

ह्यातून कर्जाचा संपूर्ण ईएमाय निघत नाही पण बर्‍यापैकी रिलिफ मिळतो. आणि कालांतराने दुकानाची संपूर्ण मालकी तुमच्याकडे येऊन वाढीव भाडे (वाढत्या महागाई नुसार) कायम तुम्हास मिळते.

बाबा पाटील's picture

19 Jul 2014 - 7:30 pm | बाबा पाटील

तरी सरळ वैद्यकिय व्यवसायाचा विचार केला तर त्यातुन संपुर्ण परतावा मिळण्यासाठी म्हातारपण उजाडावे लागेल. त्याच्या उलट सध्या पुण्याच्या जवळपास ५०-६० कि.मी.च्या परिसरात जरी एकरामध्ये जमिन घेतली तर त्वरित खेळते भांडवल उपलब्ध होते. सध्या माझ्या भागात २२०० ते २८०० रु स्के.फु. चा जागेचा भाव आहे,बिल्डरला डेव्हलपमेंट साठी लागतात सरासरी १५०० रु. म्हणजे त्याचा खर्च होतो ४००० रु प्रती स्के.फुट , प्रत्यक्षात यापेक्षाही बराच कमी खर्च लागतो. सध्या दुकानाचा भाव चालु आहे १० ते १८ हजार प्रती स्के. फु.म्बायकोने घेतलेले दुकान आहे ४८० स्के.फु. प्रत्यक्षात मोजल्यावर भरते २८ * १२=३३६ म्हणजे कारपेट आणी बिल्ट अप मधला फरक मला तरी कळला नाही. मग या दुकानामागचा हिशोब कसा पडला तुम्हीच सांगा.
या पेक्षा असे म्हातारपणाचा विचार करुन असे फुकट भांडवल अडकवुन ठेवण्यापेक्षा ते इतर धंद्यात लावले अथवा शेतजमिनित लावले तर मिळणारा परतावा कित्येक पटीने अधिक असतो. नशिब याच्यात तिने कुठेही किरकोळ कर्ज सोडले तर व्यवसायिक कर्ज घेतले नाही म्हणुन काही वाटत नाही पण हिच गोष्ट जर कर्जाने केली असती तर.....
आता मी माझा विचार सांगतो. थोडी थोडी बचत रेग्युलर करत जा. दोन तिन वर्षात पुरेसे पैसे साठतात्,त्यावेळी टोकन अमाउंट टाकुन एखादा जमिनिचा व्यवहार पक्का करा,ज्या दिवशी कागद होइल त्याच्या दुसर्‍या दिवशी त्याला गिर्हाइक पाहायला सुरुवात करा हा यात कधी कधी मसल पॉवर वापरावी लागते.तर कधी अंगावर आले तर लगेच पुर्ण खरेदी खताची तयारी ठेवा. कर्ज काढुन नव्हे. त्यांन्तर जमिन पुढच्या पार्टीला फिरवा १० रुपाचे अगदी २० हजार नाही तरी कमित कमी १५ ते १८ रुपये नक्की होतात्,हिच रक्कम जेंव्हा लाखात असते त्यावेळी फरक खुप मोठा पडतो.

प्रभाकर पेठकर's picture

19 Jul 2014 - 8:59 pm | प्रभाकर पेठकर

माझी उपहारगृहाची जागा कोथरुडात होती. तिथे २००००/- हा भाड्याचा दर होता. तुमच्या परिसराची मला कल्पना नाही. त्यामुळे कदाचित तुमची गणितं तुमच्या व्यवसायासाठी बरोबर की चुक मी ठरवू शकत नाही. तेंव्हा असो.माझ्या अनुभवानुसार शहरातील व्यवसायाची जागाच मला जास्त फायदेशिर वाटते. भविष्यातील माझी गुंतवणूक त्या दृष्टीनेच असेल.

अनुप ढेरे's picture

18 Jul 2014 - 2:59 pm | अनुप ढेरे

सहमत. जास्तीत जास्त कर्ज काढलं तर २० वर्षाच्या ईएमायच्या अर्ध भाडं येईल साधारण असं बर्‍याच ठीकाणी दिस्तं. पण हळूहळू भाडं वाढवता पण येईल. ईएमाय तेव्ढाच रहाणार आहे. कधीतरी हे फायद्यात येईलच.

अनुप ढेरे's picture

18 Jul 2014 - 3:02 pm | अनुप ढेरे

अर्र. सॉरी. वरचा प्रतिसाद अर्धवट वाचला होता. हेच बेकार तरुण यांनी लिहिलं आहे.

आजानुकर्ण's picture

19 Jul 2014 - 9:40 pm | आजानुकर्ण

राहण्यासाठी स्वतःचे घर असावे. इतपत रियल इस्टेट सामान्य माणसांना पुरेशी आहे. गुंतवणूक म्हणून रियल इस्टेटकडे पाहणे हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे हे कर्ज-व्याज-उत्पन्न-भाडं यांची साधी आकडेमोड करुन कळते. अमुकतमुकाने १० लाखात घेतलेल्या घराची आता १ कोटी किंमत आहे ह्या सांगोवांगीच्या माहितीवर विश्वास ठेवून गुंतवणुकीचे निर्णय घेऊ नयेत असे वाटते. कायदेशीर व्हाईट मनी कमावणाऱ्याला म्युच्युअल फंडांसारखी टॅक्स एफिशियन्ट साधने उपलब्ध आहेत. एनपीएससारख्या उत्तम पेन्शन योजना आहेत. सेबीसारख्या संस्था या गोष्टींवर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवून आहेत. हवे असल्यास अगदी ३ दिवसात खात्यात पैसे येतील इतकी चांगली लिक्विडिटी आहे. ऐपतीप्रमाणे गुंतवणूक करता येते. कर्जाच्या जाळ्यापासून बाहेर राहता येते. अधिक धाडस करण्याची इच्छा असेल तर थेट शेअर बाजारात गुंतवणूक करु शकता.

याउलट घराच्या बाबतीत ब्रोकरपासून, सोसायटी, महापालिका हजार कटकटी असतात. सरकार व्हॅटसारखा पूर्वलक्ष्यी बांबू लावतं. घराच्या कायदेशीरपणाबाबत अनेकदा आपण अंधारात असतो. शिवाय घराच्या बाबतीत होऊ शकणारा बहुतेक फायदा आधीच बिल्डरने घशात घातलेला असतो. प्रचंड प्रमाणात काळा पैसा, आणि स्पेक्युलेशन याच्यावर विश्वास ठेवून हे मार्केट सुरु आहे मात्र तरीही शेअर बाजाराच्या तुलनेत मिळणाऱ्या रिटर्न्समध्ये फारसा फरक नाही. जमिनीच्या व्यवहारात तर शहाण्या माणसाने अजिबात पडू नये.

मी २००५ ला पुन्यात साडेतिन लाखात अडीच गुंठे जागा घेतली त्यावर २००८ ला २८ लाख खर्च करुन घर बांधले त्याच्या साठी सहा लाखाचे कर्ज काढले त्याचा हप्ता १० हजार,पण आता घराची किंमत आहे सरासरी दिड ते दोन कोटी. नक्कीच फायद्याचा सौदा आहे, पण २००८ ला च पहिली अल्टो विकुन इंडिगो घेतली त्यानंतर २०११ ला ती विकुन जवळ जवळ १७ हजार हप्त्याने लक्झरी लिनिया घेतली त्यानंतर दोन वेळा सिग्नला थांबलो असताना अपघात झाले त्यात समोरच्या गाड्यांची पुर्ण मोडतोड झाली माझ्या गाडीची बाहेरच्या भागाची दैनिय अवस्था होती पण आतमध्ये मला हलकासा धक्का बसण्याव्यतिरिक्त काहिही जाणवले नाही,मी एकच विचार केला जर तेथे मि अल्टो अथवा इंडिगो मध्ये असतो तर........... माझे या गाडीत गेलेले अतिरिक्त पैसे नक्की वसुल झाले होते. कारण जो पर्यंत मी चालतो फिरतो आहे तोपर्यंत माझा व्यवसाय चालु आहे.मी खुर्चीत नसेल तर तेथे कुत्र फिरकणार नाही त्यामुळे हाय एंड सेप्टी फिचर्स असलेली गाडी हि माझी गरज आहे,त्यामुळे या गोष्टींचा वेगळा विचार होवु शकतो.

इएमआय हा घर, गाडी घेण्यासाठी काहीसा अविभाज भाग झालेला आहे. मात्रं अनेकदा या वस्तूंच्या दुप्पट किंमत आपण व्याजासकट भरत असतो.

पण त्यावर सुद्धा जास्त पैसे भरून व्याज वाचवता येतं . तुम्हाला तुमच्या प्राप्तीकरा वर मिळणारी सूट आणि तुम्ही भरत असलेलं व्याज हे साधारण एका पातळीवर आलं की गृह कर्ज फेडून टाकण्यावर भर द्यावा आणि कर वाचान्व्ण्यासाठी दुसरे उपाय (अजून एखादं घर? ) शोधावेत.

व्याज वाचवणं कधी ही आपल्या हातात असतं आणि दर महिन्याला हाती मिळणारी रक्कम या एकाच गोष्टीवर लक्ष न देत जर हफ्ते वाढवत राहिलो आपण तर गृह कर्ज खूप फायदेशीर ठरतं हा माझा वैयक्तिक अनुभव आहे .

बाकी लेख खूप पटलाय . डिझायनर घड्याळा एवढं चपखल उदाहरण मला विचार करून ही सापडत नाहीये.

माझ्या ही माहिती मध्ये असे खूप लोक आहेत जे घरातलं फर्निचर करायला पण वैयक्तिक कर्ज घेतात. या गोष्टी हळू हळू करण्यात पण मजा असते. मुख्य म्हणजे जेंव्हा करायचा तेंव्हा करेन पण छान च करेन असा जर एक विचार असला तर माणूस पिअर प्रेशर ला सहज सहजी बळी पडत नाही. आणि त्यांच्याकडून अशा चुका होत नाहीत असं माझं मत आहे.

रेवती's picture

17 Jul 2014 - 1:22 am | रेवती

लेख आवडला.

प्रभाकर पेठकर's picture

17 Jul 2014 - 3:07 am | प्रभाकर पेठकर

मोक्याच्या ठिकाणच्या स्थावर मालमत्तेसाठी काढलेले (परवडणारे) कर्ज स्वस्तच पडते. अगदी ठरवून ठराविक रक्कम शिल्लक टाकणे फार कमी लोकांना जमते. बहुतेकांच्या शिलकीला अनेक वाटा फुटतात आणि ध्येयप्राप्ती होत नाही. कर्ज घेतले असेल तर मारुनमुटकून परतफेड केली जाते आणि आपसुक पैसा मालमत्तेच्या स्वरुपात शिल्लक पडतो. जी माणसं खर्चिक असतात त्यांच्यासाठी पैसा साठविण्याचा हा सुलभ मार्ग आहे.
'ऋण काढून सण करु नये' असे जे आपले पूर्वज सांगत आले आहेत त्यात तथ्य आहे. सण साजरे करण्यासाठी, बडेजाव मिरविण्यासाठी कर्ज काढू नये. पण, मुलांचे शिक्षण आणि क्वचित अपरिहार्यतेतून येणारे आजारपणाचे खर्च उचलण्यासाठी कर्ज काढावे लागते. तसेच, सोन्या-चांदीचे भाव उतरले असताना थोडेफार कर्ज काढून केलेली खरेदीही यथायोग्यच म्हणायला हवी.

खटपट्या's picture

17 Jul 2014 - 5:30 am | खटपट्या

१००% सहमत !!

सुबोध खरे's picture

17 Jul 2014 - 10:29 am | सुबोध खरे

असेच म्हणतो.
पेठकर साहेब एकदम खिळ्याच्या डोक्यावर मारले आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Jul 2014 - 1:33 pm | राजेंद्र मेहेंदळे

पण ईथे फक्त वास्तू हा लेखाचा (ई एम आयचा) विषय नाहीये. एकुणच कर्ज वाईट असा सूर दिसतोय.
सर्व प्रतिसाद बघता ज्या वस्तूंची किंमत दिवसागणिक वाढते (अ‍ॅप्रिसिएशन) ती ई एम आय वर घ्यायला हरकत नसावी. म्हणजे " वाजली तर वाजली नाहीतर मोडुन खाल्ली"
डेप्रिसिएशनवाल्या वस्तूबाबत मात्र खरेच गरज आहे का ? हा विचार केला जावा.

आदिजोशी's picture

17 Jul 2014 - 2:14 pm | आदिजोशी

पेठकर काका आणि मेहेंदळे काकांशी एकदम सहमत

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Jul 2014 - 2:36 pm | राजेंद्र मेहेंदळे

काका मत बोलो नाआआआआअ :(

पाषाणभेद's picture

17 Jul 2014 - 5:02 am | पाषाणभेद

कार्य आहे घरचं, होवू दे खर्च

समजा एखाद्या वस्तूचा इएमआय करायचाच असेल तर आपल्या गरजेच्या मॉडेलचा विचार करावा. उगाचच इएमआय मिळतो म्हणून २९ इंचाच्या टिव्हीऐवजी ५१ इंची टिव्ही घेवू नये.

सुबोध खरे's picture

17 Jul 2014 - 10:28 am | सुबोध खरे

+१००

मराठी कथालेखक's picture

17 Jul 2014 - 10:58 am | मराठी कथालेखक

कर्जाला फायनान्सच्या भाषेत Financial Leverage म्हणतात कारण फायदेशीर व्यवसायात कर्ज घेवून व्यवसाय वृध्दींगत करणे योग्य ठरते (cost of capitalच्या तत्वानुसार). स्थावर मालमत्ता ही गुंतवणूक आहे आणि गरजही त्यामुळे त्याकरिता कर्ज घेणे योग्यच. पण ज्या वस्तूंच्या किमती (पुनर्विक्री) झपाट्याने कमीच होणार आहेत त्याकरिता कर्ज घेणे कदाचित फारसे योग्य होणार नाही. पण पुन्हा तुलना आहेच की एखाद्या विक्रेत्याने खप वाढावा वा विक्री उद्दिष्ट गाठता यावे याकरिता अगदी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन दिले असल्यास त्या पर्यायाचा विचार करण्यास हरकत नाही कारण तुमची गुंतवणूक तुम्हाला त्या व्याजापेक्षा अधिक परतावा देत असते.

बाकी वस्तूच्या उपयूक्ततेचा विचार नेहमीच करावा अगदी जवळ नगद असेल , कर्ज घ्यायची गरज नसेल तरीही. कारण आपल्याला आवश्यक नसलेली वस्तू आपण उगाच विकत घेवून आपले मेहनतीने कमवलेले पैसे वाया का दवडावे ? एकूणातच तारतम्य महत्वाचे आणि काही वेळा चुका करुनच शहाणपण येते हे ही तितकेच खरे... (अनेकदा वस्तू घेतल्यावर काही काळाने वाटते आपण ही वस्तू उगाच घेतली.)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Jul 2014 - 11:45 am | विश्वनाथ मेहेंदळे

मी तर म्हणतो कन्झ्युमरिझम हवा. त्यायोगे कंपन्या प्रॉफिट करतात. मी त्यांचे शेअर्स घेतो, ते वाढतात. बँका कर्ज देऊन मालदार होतात. मी त्यांचे शेअर्स घेतो, ते वाढतात. नातेवाईक आणि मित्रांना शक्यतो सांगतो की उधळपट्टी करू नका, काहीन्ना पटत नाही, मग सोडून देतो आणि अजून काही शेअर्स खरेदी करतो. मज्जानी लाईफ :-)

कपिलमुनी's picture

17 Jul 2014 - 1:24 pm | कपिलमुनी

अवांतर : सर्व प्रकारचे कर्ज घेताना त्याचा विमा काढावा ..
जेणे करून तुमचा जॉब गेला किंवा मृत्यू झाला तर त्याचा फटका घरच्यांना बसणार नाही..
अगदी पर्सनल लोन ला सुद्धा जॉबलॉस चा विमा मिळतो..

बाकी सेव्हिंग , महिन्याचा खर्च , महिन्याचा पगार आणि ईएमआय याचे गुणोत्तर कसे असावे यावर वाचायला आवडेल..
म्हणजे पुढे गृहकर्ज काढताना काळजी घेता येइल

कर्जदाराच्या विम्याबरोबर वस्तूचाही विमा काढावा.

चित्रगुप्त's picture

17 Jul 2014 - 2:34 pm | चित्रगुप्त

सर्व प्रकारचे कर्ज घेताना त्याचा विमा काढावा ..

कर्जाचा विमा' याबद्दल अधिक माहिती द्यावी. आधीच घेतलेल्या गृहकर्जाचा विमा होऊ शकतो का? साधारणतः किती प्रिमियम लागतो?

आधीच घेतलेल्या गृह कर्जाचा पण विमा होऊ शकतो. साधारण पाने जर हा विमा केला असेल तर ज्या वेळी क्लेम करायची वेळ येईल त्या वेळेला उरलेली कर्ज रक्कम ही insured sum म्हणून दिली जाते. जर कर्जदार चा मृत्यू झाला असेल तर त्याच्या कुटुंबियांना मिळते . ते कर्ज फेडू शकतात. प्रिमियम हा रकमेवर अवलंबून असतो. साधारण कर्ज सुरु होताना हा पर्याय जर निवडला तर वन टाईम हफ्ता हा कर्जाच्या रकमेवर धरला जातो . कर्ज काढल्यावर काही काळाने जर विमा काढायचा असेल तर तेंव्हा सम insured साठी पर्याय पण निवडता येतो. उदा. दहा लाखांवर १५ वर्षांसाठी १०००० वन टाईम हफ्ता अथवा मंथली प्रिमियम. मंथली प्रिमियम अर्थात च महाग पडतं .

माझ्या मते जर कर्जानंतर काही काळाने विमा काढायचा असेल तर त्या वेळी गृह कर्ज विम्य पेक्षा टर्म इन्शुरन्स जास्त आय्देशीर ठरतो. तो मोठ्या पल्ल्यासाठी आणि मोठ्या रकमे साठी अत्यंत कमी प्रिमियम मध्ये मिलतो. अर्थात क्लेम सेटलमेंट हिस्टरी बघून च विमा कंपनी निवडावी या इन्शुरन्स साठी.

सृजातै माझ्या डोक्यात जरा कंफुजन आहे.

विमा नक्की कशाचा काढायचा? "ऑब्जेक्ट इन्शुअर्ड" काय आहे? कर्जदार, की ज्यासाठी कर्ज घेतलंय ती (पक्षी: तारण ठेवलेली) मालमत्ता, की कर्ज (पर्यायाने बँकेची रीपेमेंट रिस्क?)

hitesh's picture

12 May 2015 - 11:48 am | hitesh

माणुस व घर दोन्हीचा.

कर्जाचा लायेबिलिटी इन्शुरन्स होतो का माहीत नाही

कवितानागेश's picture

19 Jul 2014 - 9:05 am | कवितानागेश

अगदी बरोबर. टर्म इन्श्युरन्स केन्व्हाही जास्त चांगला. पण जॉबलॉससाठीपण काहीतरी सोय करुन ठेवावी लागते हल्ली.

आदिजोशी's picture

17 Jul 2014 - 1:35 pm | आदिजोशी

प्लॅनींग आणि ऐपत ह्या नुसार कर्ज घेतले तर ते एक अतिशय चांगले रिसोर्स म्हणून वापरता येऊ शकते. ह्या दोन गोष्टींचा विचार न करता घेतलेले कर्ज बहुतेक करून घेणार्‍याला झोपवते.

सुनील's picture

17 Jul 2014 - 2:23 pm | सुनील

स्साला ह्ये घाटी लोकान्ला जगायचा कसा ते बी समजत नाय. आधी मस्त तंगडी ताणून झोपायचा आणि मग अंथरूण अ‍ॅडजस्ट करायचा हे पन ह्यान्ला कोणी शिकवलं नाय.

ह्यांचा तुक्राम्म्हाराज सांगतो - ठेविले अनंते तैसेची रहावे! तो तरी काय करणार? तो बी घाटीच. बापजाद्यांनी ठेवलेले दुकान बी चालवता येईना. (शेवटी मारवाड्यानीच घेतलं असणार!)

;)

कपिलमुनी's picture

17 Jul 2014 - 4:01 pm | कपिलमुनी

आनंद यादव होइल :)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

17 Jul 2014 - 3:53 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

कर्ज काढून केसरी वा थॉमस कूकच्या सहलीला जाणारा ह्यांचा एक मित्र होता.नंतर आजारपणात औषधासाठी चार ठिकाणी पैशासाठी फोन.
चैनीच्या गोष्टींसाठी कर्ज नको.ऐपत असेल तरच अशा वस्तु घ्याव्यात.घर्,गाडीसाठी आवश्यक कर्ज घेण्यात गैर आहे असे वाटत नाही.

कपिलमुनी's picture

17 Jul 2014 - 4:00 pm | कपिलमुनी

त्यांचा आडनाव नेफळे का ;) ;)

संजय क्षीरसागर's picture

18 Jul 2014 - 9:58 am | संजय क्षीरसागर

चैनीच्या गोष्टींसाठी कर्ज नको. ऐपत असेल तरच अशा वस्तु घ्याव्यात. घर, गाडीसाठी आवश्यक कर्ज घेण्यात गैर आहे असे वाटत नाही.

दोन वाक्यात सर्व मथितार्थ!

गाडी सुद्धा आवश्यक असेल तरच, म्हणजे रोज कामाला जायला लागत असेल तरच.

आदिजोशी's picture

17 Jul 2014 - 7:17 pm | आदिजोशी

लोन घेऊन फायदा तसेच नुकसान झाल्याची ओळखीतली उदाहरणे आहेत का? ती इथे सांगितली तर नक्कीच फायदा होईल.

पाषाणभेद's picture

18 Jul 2014 - 12:57 am | पाषाणभेद

फारच उत्तम धागा. रथी-महारथींच्या प्रतिसादात चांगल्या वाईट गोष्टी समजत आहेत. सर्वांचेच धन्यवाद.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Jul 2014 - 7:17 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ईथे बहुतेक जणांचा सुर कर्ज हे प्रकरण वाईट आहे असा दिसतोय. गरजेच्या वस्तु (घर, अपवादात्मक स्थितीमधे गाडी ) घेण्यासाठी कर्ज घेणं नक्कीच वाईट नाही. पण गरज नसलेल्या आणि उगीच दुसर्‍याकडे आहे ते आपल्याकडे पाहिजेचं ह्या वृत्तीच्या लोकांचं मात्र मला हसु वाटतं आणि त्यातुनही क्रेडीट कार्डावरील खरेदी हा आख्खा वेगळा रिस्की प्रकार आहे.

माझ्याकडे गेली ४-५ वर्ष क्रेडीट कार्ड्स असुन मी आजपर्यंत एकदाच त्यावरुन खरेदी केली आहे. जी आहेत ती सुद्धा मी कॅन्सल करुन घेणारे. आमच्याकडे कुठलीही महागाईची (चैनीची) वस्तु घ्यायची असेल तर त्यासाठी आम्ही प्लॅन करुन रिकरींग काढतो ते मॅचुअर झालं की वस्तु घेतो. भले काही महिने उशिरा मिळेल वस्तु पण डोक्याला ताप रहात नाही.

घरासाठी कर्ज ही खरेकाकांनी म्हणल्याप्रमाणे उत्तम गुंतवणुक आहे. बा द वे, रिव्हर्स मॉर्गेजिंग काय प्रकार आहे?

चौकटराजा's picture

18 Jul 2014 - 8:29 am | चौकटराजा

म्हणजे समजा आपल्याकडे एक फ्लॅट आहे व तो मोक्याच्या एरियात आहे. आपल्याला मूल नाही किंवा आपल्याला आपली मुले फारशी किमत देत नाहीत. अशा वेळी आपल्या म्हातारपणी आपल्याला केअर टेकर ठेवायचा आहे. त्याला महिन्याला
रू. १५००० इतके वेतन देणे भाग आहे. आपल्याकडे आपले पेन्शन फक्त रू १००००इतकेच येते. अशावेळी त्याल वेतन काय देणार कप्पाळ ? आपल्याला हा फ्लॅट विकून तालुक्याच्या गावाला जाता येईल तिथे नव्याने घेतलेला फ्लॅट व आताचा विकलेला फ्लॅट यांच्या फरकाला मुदत बंद ठेवीत गुंतवून रू १०००० पेक्षा आपले मासिक उत्पन्न वाढविता येईल. पण मानसिक रित्या आपल्याला तालुक्याच्या गावाला जाणे शक्य नसेल तर आपल्या फ्लॅट ला बँकेकडे गहाण ठेवायचा त्या बदल्यात बॅ़क आपल्याला पेंशनसारखे वेतन देत जाईल. आपल्या पश्च्यात फ्लॅट बेंकेच्या मालकीचा. व आपल्याला न
विचारणार्या पोरांच्या हातात धत्तूरा. याला म्हणतात रिवर्स मॉर्टगेज .

सुबोध खरे's picture

18 Jul 2014 - 9:49 am | सुबोध खरे

रिव्हर्स मोर्टगेज म्हणजे जसे आपण आपले घर तारण ठेवून कर्ज घेतो तसे बँक आपले घर खरेदी करून आपल्याला दर महा हप्ता म्हणून पैसे देते. आपण आपले २० लाखाचे घर जर २० वर्षासाठी रिव्हर्स मोर्टगेज ठेवले. तर बँक आपल्याला वीस वर्षे पर्यंत साधारण २० ते २२ हजार रुपये देते. याच्या मधील कालावधीत आपला मृत्यू झाला तर जितकी रक्कम बँकेने आपल्याला दिली आहे तितकी रक्कम आपला वारस भरून ते घर ताब्यात घेऊ शकतो किंवा आपण घेतलेली रक्कम आणि घराचे सध्याचे मुली यातील फरक आपल्या वारसाला देऊन बँक घर ताब्यात घेते. आपल्या निवृत्ती वेतनाला हा एक पर्याय ठरू शकतो. हो आणि वरील वीस वर्षे आपण आपल्या घरात राहू शकता. फक्त ते आपल्याला विकत येत नाही.पण आपल्याकडे जर मधल्या कालावधीत पैसे आले तर आपण ते भरून या तारणातून आपले घर सोडवू शकता. वरील वीस ते बावीस हजारात व्याजाचा सुद्धा समावेश आहे असे मला वाटते. या बाबतीत शंका निरसन तज्ञ व्यक्तींनी करावे अशी मी विनंती करीत आहे.

संजय क्षीरसागर's picture

18 Jul 2014 - 10:01 am | संजय क्षीरसागर

*smile*

एकच सुधारणा. आपण त्या घरात स्वत: किंवा जोडीदार जिवंत असेपर्यंत राहू शकतो, केवळ २० वर्षे नाही. वीस वर्षानंतर उत्पन्न बंद होईल किंवा जागेच्या वाढलेल्या किमतीनुसार नवीन उत्पन्न चालू होऊ शकेल.

एखाद्या गोष्टीची आपल्याला गरज आहे का? किंवा हौस्,मौज म्हणून असल्यास परवडणारी आहे का? याचा विचार प्रत्येक खरेदीआधी केल्यास कर्ज, क्रेडीट कार्ड वापरून आपला फायदा करुन घेता येउ शकतो.
मी फक्त गृहकर्ज घेतलय. जिथे शक्य असेल तिथे फक्त क्रेडीट कार्ड वापरून पेमेंट करतो. ०% असल्यास EMI ने पैसे भरतो. कुठलेही अरितिक्त चार्जेस नसलेले क्रेडीट कार्डच वापरतो. वेगवेगळ्या बिलिंग सायकलची २-३ कार्ड वापरून जास्तीत जास्त उशीरा पण न विसरता आणी लेट चार्ज लागण्यापूर्वी पेमेंट करतो.

संजय क्षीरसागर's picture

18 Jul 2014 - 11:01 am | संजय क्षीरसागर

कार्ड रिसायकलींगनं उशीरा पैसे भरुन विषेश फायदा होत नाही, त्यापेक्षा लगेच पेमेंट करुन होणारी मानसिक सुटका जास्त श्रेयस आहे. करुन पाहा.

रेवती's picture

18 Jul 2014 - 4:30 pm | रेवती

हेच म्हणते.

मराठी कथालेखक's picture

18 Jul 2014 - 3:13 pm | मराठी कथालेखक

क्रेडिट कार्ड हे फक्त व्यहवाराचे सोयीस्कर साधन आहे असे समजावे (म्हणजे कॅश बाळगण्याची कटकट नाही वगैरे फायदे). याशिवाय पॉईंट्स मिळाल्याने होणारा फायदा , इतर ऑफर्स (सिनेमाच्या तिकिटाच्या वगैरे) यांचा अवश्य लाभ घ्यावा. पण लिमिट मोठे आहे म्हणुन खर्च करत सुटू नये. खरेतर लिमिटही कमीच ठेवावे. म्हणजे साधारण मासिक खर्चाच्या फारतर दीडपट-दुप्पट वगैरे. याचा अजून एक फायदा की आपल्या क्रेडीट कार्डाच्या बाबत काही फ्रॉड झालाच तरी होणारे नुकसान कमी असेल.
शक्यतो क्रेडिट कार्डाचे पेमेंट लवकरच करावे कारण तसेही सेवींग खात्यात पगार आल्यावर ४% दराने मिळणारे व्याज फार काही मोठे नसते. शिवाय बँकेत पैसे असताना खर्चायचा मोह होत राहील.
याशिवाय स्वतःला काही नियम घालावेत. उदा: घेतलेला मोबाईल किमान दोन वर्षे बदलणार नाही. नवीन मोबाईल घेताना आधी बजेट ठरवावे आणि त्यातच खरेदी करावी ई.

विषय संपला!

रामपुरी's picture

19 Jul 2014 - 1:42 am | रामपुरी

एकंदर (प्रतिसाद आणि लेख) दोन्हीकडे सूर असा दिसतोय कि फक्त "गरजेच्या" गोष्टींसाठी कर्ज काढायला हरकत नाही. माझ्यामते काही ठिकाणी चैनीच्या वस्तूंसाठी पण कर्ज काढायला हरकत नाही.
उदा. मला ६०" टिव्ही घ्यायचा आहे पण आत्ता माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. मला ०% व्याजाने दुकानदार २४ महिन्यांसाठी कर्ज द्यायला तयार आहे. आणि मला खात्री आहे की मी २४ नव्हे तर १२ महिन्यातच ते पैसे फेडू शकतो. तर मी तो टिव्ही आत्ताच का घेऊ नये? की "चैनीच्या वस्तूंसाठी कर्ज घ्यायचे नाही" एवढ्याच कारणासाठी मी १२ महिने वाट बघायची? आता यामध्ये मी फक्त एवढेच भान ठेवीन की माझे सगळे पैसे महिनाअखेरीला खर्च होत नाहीत आणि माझ्या महिन्याच्या बचतीवर नवीन कर्जाचा फार मोठा परिणाम होत नाही. जर योग्य मेळ जमवता आला तर चैन आणि बचत दोन्ही साधता येईल. क्रेडीट कार्ड हे सुद्धा एक प्रकारे कर्जच आहे. योग्य आर्थिक नियोजन करून त्याचा खूप चांगला वापर करून घेता येतो हा स्वानुभव.

अमेरिकन त्रिशंकू's picture

19 Jul 2014 - 2:19 am | अमेरिकन त्रिशंकू

थिओरेटिकली हे करणं सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात हा स्लिपरी स्लोप होउ शकतो.
कधी थांबायचं हे कळलं तर जगातले खूपसे प्रॉब्लेम्स आलेच नसते.

रामपुरी's picture

19 Jul 2014 - 2:29 am | रामपुरी

थिओरेटिकलीच नव्हे पण प्रॅक्टीकली सुद्धा हे शक्य आहे. फक्त सगळे लगाम हातात घट्ट असले पाहीजेत.

अमेरिकन त्रिशंकू's picture

19 Jul 2014 - 2:42 am | अमेरिकन त्रिशंकू

आणि माझं म्हणणं असं आहे की फार थोड्यांना हे लगाम घट्ट ठेवणं जमतं.

२४ महिन्यासाठी बिनव्याजी कर्ज द्यायला दुकानदार तयार आहे. त्यासाठी त्याने आगोदरच किमत वाढवून ठेवली नाही आहे हे बघा. जुना माल गळ्यात मारत नाही ना याची खात्री करा. बाकी सौदा फायद्याचा आहे.

चित्रगुप्त's picture

19 Jul 2014 - 3:34 am | चित्रगुप्त

मला ६०" टिव्ही घ्यायचा आहे

"घ्यायचा आहे" हा निश्चय झाला, म्हणजे ती तुमची गरज आहे. चैन नव्हे. प्रत्येकाची गरज आणि चैन यांची व्याख्या वेगवेगळी असू शकते. फक्त गरजा भागवत जगणे हे काय जगणे झाले? चैन ही हवीच.

गरज म्हणजे ज्याच्याशिवाय पर्याय नाही असा खर्च आणि चैन म्हणजे असा खर्च, जो केला नाही तरी चालेल.

प्रत्येकाची गरज आणि चैन यांची व्याख्या वेगवेगळी असू शकते.

प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असली तरी व्याख्या सर्वांसाठी एकच आहे.

फक्त गरजा भागवत जगणे हे काय जगणे झाले? चैन ही हवीच

या अ‍ॅटिट्यूडमुळे आर्थिक पेच निर्माण होतो. मूळ गोष्ट मनःस्वास्थ्य आहे. तुमच्याकडे वस्तू कुठली आहे यापेक्षा, तुम्ही तिचा निवांतपणे उपभोग घेऊ शकत नसाल, तर वस्तूला अर्थ नाही. आनंद स्वास्थ्यपूर्ण उपभोगात आहे, वस्तूत नाही.

फ्लॅट कितीही मोठा असला आणि तुम्हाला इएमायचं ओझं असेल तर बेचैनी कायम राहील. टिवी कितीही भारी असला तरी तो निवांतपणे पाहण्यात, हप्त्याचा विचार मधे येऊन सुख हिरावेल. आणि कार कितीही हायटेक असली तरी ड्रायवींगचा आनंद मिळणार नाही.

वॉरेन बफेशी किमान एका गोष्टीत तरी मी संपूर्ण सहमत आहे: (हे रुपकात्मक असलं तरी अर्थपूर्ण आहे) अनावश्यक वस्तूंची खरेदी, आवश्यक वस्तू विकायला भाग पाडेल!

पियू परी's picture

19 Jul 2014 - 12:01 pm | पियू परी

आमच्या माहितीत एकजण आहेत. नवरा बायको दोघेही नोकरी करतात. कर्ज काढुन खुप मोठे घर घेतले आहे. दोघांचा एकुलता एक मुलगा खुप लहान आहे. दोघे सकाळी ८ ला जातात ते रात्री ९-१०-११ कसेही परत येतात. मुलाचा सहवास मिळत नाही. जे घर घेतले आहे तिथे फक्त झोपायला येतात. आम्हालाच खुप वाईट वाटते ते बघुन (त्यांना वाटते कि नाही माहित नाही).

धड येत नसेल. त्यात (स्वैपाक जमत नसल्यास) जेवणाची बोंब. घरी नोकरीची विवंचना आणि ऑफिसमधे मुलाची ओढ. अशी एकूण परिस्थिती आहे!

शिल्पा नाईक's picture

14 May 2015 - 5:53 pm | शिल्पा नाईक

पण स्वतःचे हक्काचे घर तर आहे. शिवाय थोडे नियोजन करुन पार्ट पेमेंट करुन लवकर सुटता येत. अन मग हवा तेवढा वेळ देता येइल मुलांना. (स्वानुभव)

हा हा! अहो काही दिवसांपूर्वीच अरमानी च्या कपड्यांसाठी EMI ची योजना आलीये! :D
म्हणजे आता न परवडणारे बूट, कपडेसुद्धा कर्ज काढून घ्यायची सोय झालीये लोकांची!!
हि बघा लिंक.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 May 2015 - 9:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

चला म्हणजे आता ह्या क्षेत्रातली डिफॉल्टर मंडळी लगेचं ओळखता येतील.

gogglya's picture

14 May 2015 - 3:52 pm | gogglya

कर्ज हप्ते न भरल्यामुळे कार जप्त करणे ईत्यादी प्रकार ऐकुन होतो. आता परिधान केलेली वस्त्रे कोणी काढुन नेणार असेल तर कहरच होईल!