द ईएमआय ट्रॅप

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
16 Jul 2014 - 1:44 pm

गेल्या दोन-तीन दशकांत, पैसा आणि त्याचं महत्त्व या गोष्टींत कमालीचा बदल होत गेलेला आहे. शिवाय बदलत गेलेत ते पैसा मिळवण्याचे आयाम, तो साठवण्याची परिमाणं, त्याच्या व्ययाच्या पद्धती, त्याचा व्यय करण्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय आणि त्याच्या व्ययातून मिळणारं समाधान.
lifestyleफार पूर्वी नाही, अगदी तीन एक दशकांपूर्वीच्या परिस्थितीची कल्पना करूया. एखादी गोष्ट खरेदी करण्याची प्रक्रिया साधारण अशी असायची. सर्वप्रथम गोष्ट हवी आहे की तिची गरज आहे याचा विचार व्हायचा. अर्थातच गरज असल्यासच बहुदा तो पुढे नेला जात असे. मग त्या गोष्टीची किंमत किती हे बघणं आलं. ब्रँड वैगरे दुय्यम गोष्टी असत. किंमत बघून तितके पैसे आपल्याकडे जमलेले आहेत का? नसल्यास ते जमेपर्यंत खरेदी तहकूब. असल्यास ते इतर कुठल्या कारणासाठी राखून ठेवलेले नाहीत ना? त्यांचा इतर कुठे अधिक सदुपयोग होऊ शकतो का? हे प्रश्न पडताळले जात असत. आणि या सगळ्यातून जर निर्णय पुढे सरकलाच, तर ती गोष्ट विकत घेतली जाई. अपवाद इथेही असतीलच, परंतु सर्वसाधारण प्राधान्यक्रम हे असे असावेत.
आता हे क्रम प्रचंड बदलले आहेत. गरजेच्या गोष्टींआधी हव्या असलेल्या गोष्टी येतात. त्याही हव्या यासाठी असतात की त्या दुस-या कुणाकडे असतात, पण आपल्याकडे नसतात. जागतिकीकरणामुळे एका गोष्टीसाठी पाच कंपन्यांचे पर्याय असतात. प्रत्येक कंपनीच्या ब्रँडची एक पत असते. अर्थातच जास्त पत असलेला ब्रँड घेणं ही प्रथम पसंती असते. इथवर गोष्टी स्वाभाविक आहेत.
पुढे पैशाची गोष्ट येते जिथे ओढून ताणूनचा प्रकार बळावलेला आहे. कर्जसंस्कृती आधीही होती, परंतु त्या वाटेला जाणं हे काहीसं कमीपणाचं होतं. आता तसं नाही. कर्जहीन माणूस म्हणजे इच्छाहीन, आकांक्षाहीन माणूस. कारण, इच्छा तिथे पैसे, पैसे तिथे कर्ज असं समीकरणच आहे. भरीस भर म्हणून आलेला प्रकार म्हणजे क्रेडिट कार्ड. या क्रेडिट कार्ड संस्कृतीच्या प्रमाणाबाहेर लाडांमुळे आपणच आपल्याला कसे पिंज-यात बांधतो हे अनेकांना कळत नाही.
परवा एका मॉलमधे मी एक जाहिरातीचा फलक बघितला. त्यावर लिहिलं होतं, ‘डिझायनर वॉचेस. ईएमआय लो ऑफर्स, १९९९ ओनली.’आता घडयाळ ही गरजेची गोष्ट मानली, तरी डिझायनर घडयाळ ही चैनीची बाब होते. तर ही कुठल्याशा परदेशी कंपनीची लाखो रुपयांची घडयाळं मंडळी आता हप्त्यावर घेणार हा विचार करून हसू आलं. घर ठीक आहेत, गाडया ठीक आहेत, इलेक्ट्रॉनिक उपकरणं ठीक आहेत, पण घडयाळासारखी गोष्ट हप्त्यावर म्हणजे कहरच. उद्या कपडे, बूट, वाणसामान, तेल याही गोष्टींच्या ईएमआय ऑफर्स येतील. जगणंच ईएमआय वर होईल.
इथे पूर्वीचे सगळे क्रम उलटे झालेले आहेत. गरजेपेक्षा इच्छा, किमतीपेक्षा ब्रँड, आणि कुवतीपेक्षा ऑफर या गोष्टी मोठया झालेल्या आहेत. भारतीय ग्राहकाच्या मानसिकतेचा नेमका हाच कमकुवत दुवा आहे आणि तो कंपन्यांनी बरोबर हेरलेला आहे. मला आठवतंय माझा एक मित्र माझ्याकडे चांगला कॅमेरा कुठला अशी चौकशी करत होता. मी सहज ‘बजेट किती’ विचारलं असता तो म्हणाला होता की, ‘बजेट असं काही नाही, भारी पाहिजे कॅमेरा. तसंही ईएमआयवर घेणार आहे मी.’ ते ईएमआय दरमहा द्यायचा असतो हे त्याला ठाऊक होतं की नाही, कल्पना नाही.
ईएमआय, क्रेडिट कार्ड यांनी त्याच वेळेला एखादी गोष्ट खरेदी करणं शक्य होतं यात दुमत नाही. परंतु त्यामुळे प्रलोभित होऊन आपण आपल्या कुवतीच्या कक्षा बळेच रुंदावतो आणि मग ठरावीक रक्कम दर महिन्याला खात्यातून वजा होणार आहे, त्यावर भक्कम व्याज आपल्याला द्यावं लागणार आहे, या गोष्टींची बोच भूल दिल्यागत तेव्हा आपल्याला जाणवत नाही. परंतु नंतर तो ईएमआय खात्यातून वजा व्हायला लागतो, तेव्हा मात्र आपल्याला ते ओझं जड होतं.
तेव्हा या ईएमआयच्या सापळ्यात आपण कमीत कमी अडकलेलंच हिताचं आहे. भलत्या उडया मारून नंतर लटकण्यापेक्षा सावध पावलं उचलणं कधीही योग्य असतं. माझ्या एका मित्राचे बाबा म्हणतात, Luxuries should never be bought with borrowed funds.’ अशी उदाहरणं, असे फलक बघितले की मला हे वाक्य नेहमी आठवतं.

हा लेख प्रहार वृत्तपत्रात छापून आला होता त्याचा हा दुवा

अर्थकारणविचार

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

14 May 2015 - 4:55 pm | वेल्लाभट

कहर आहे चायला !

अश्या प्रकारे, कर्ज काढुन प्रगती होते आहे, असे वाटायचे आही.. हा धागा आधी पाहिला असता तर तसेच माझे मत मांडले असते..

परंतु हा EMI ट्रॅप खरेच नको असे वाटत आहे.. माझे सगळे क्रेडिट कार्ड आनि घराचे सोडुन बाकीचे ईएमाय बंद करणार आहे..
खुप होरपळलो या चक्कर मध्ये.. खुप तोटा..
मान्य घरामध्ये फायदा झाला २५ लाखाचे घर ४ वर्षात ९५ लाखाचे झाले.. परंतु इतर गोष्टी चुकल्याच.. आणि त्या चुकल्या म्हणुनच आता किंमत कळते आहे...
सविस्तर लिहेन कधीतरी.. परंतु सगळ्यातुन बाहेर येवुनच ..
धागाकर्त्याचे म्हणणे आज मला योग्य वाटत आहे..

माणसाने समाधानाने रहावे.. आनंद तुमच्याकडे किती गोष्टी आहेत त्यात नाही असा अनुभव.
-
एक क्रेडिट कार्ड आणि गाडीत फसलेला , पहिल्यांदा सगळे बोलतात अगदी तसेच बोलत होतो मी.. वेळ बदलली.. सगळे बदलले.. त्यामुळॅ आधीच्या चुकांवर मात करुन आत पुन्हा तशी चुक कदापी करणार नाही..
० % व्याजावर पण मी आता कुठली गोष्ट घेणार नाही...