भ्रमणगाथा - ५ सुवर्णनगरी...

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
12 Oct 2008 - 4:15 pm

ह्या आधी : भ्रमणगाथा - ४

झेक रिपब्लिकची राजधानी, गोल्डनसिटी अर्थात सुवर्णनगरी जिला म्हणतात त्या प्रागमध्ये आम्ही आलो होतो. हे प्राचीन शहर तितक्याच प्राचीन इमारतींसाठी आणि स्थापत्त्यासाठी प्रसिध्द आहे. गोथिक आणि बरॅक स्थापत्त्यशास्त्रांचा प्रभाव या शहरावर दिसतो. दोन्ही महायुध्दांमध्ये बरीच हानी होऊनही ,बर्‍याच इमारतींची पडझड होऊनही परत त्या इमारती जशाच्या तशा बांधून काढून प्राग आपल्या पुरातन दिमाखात परत उभे राहिले आणि सार्‍या युरोपाने सुवर्णनगरीचा मान दिला! युरोपातल्या सर्वात सुंदर शहरांपैकी हे एक! रात्री जरी बराच उशीर झाला होता तरी सकाळी लवकरच चहापाणी उरकून, प्रागच्या मुख्य स्टेशनात गाडी पार्क करून, हातात नकाशा घेऊन ह्या नगरीत फिरायला बाहेर पडलो.

मुख्य स्टेशनाची इमारत पहाण्यासारखी आहे. तसं पाहिलं तर इथल्या प्रत्येकच इमारतीवर कोरीव काम केलेले दिसते. कमनीय युवती,सिंह आदिंचे पुतळे भव्य प्रवेशद्वारांवर दिसतात. प्रवेशदारेही अगदी पाहण्यासारखी आणि भव्य! जुन्या वाड्यांच्या मोठमोठ्या शिसवी,सागवानी कोरीव दरवाजांची आठवण यावी असे!

नाचणारे घर अर्थात डान्सिंग हाऊस पहायची उत्सुकता सर्वांनाच होती.दुसर्‍या महायुध्दात बेचिराख झाल्यानंतर बर्‍याच उशिरा म्हणजे १९९२ मध्ये क्रोएशियन आणि कॅनेडियन आर्किटेक्टने मिळून ह्या इमारतीचा आराखडा केला. १९९६ साली हे बांधकाम पूर्ण झाले.ह्या इमारतीच्या अगदी विचित्र अशा डिझाइनमुळे बरेच वादंग झाले पण तत्कालीन झेक अध्यक्ष हावेल तेथून अगदी जवळच राहत होता. त्याने ही आगळीवेगळी इमारत सांस्कृतिक केंद्र व्हावी म्हणून प्रस्ताव उचलून धरला आणि ही 'चिवित्र' इमारत आकाराला आली. फ्रेड आणि जिंजर ह्या दोन प्रसिध्द नर्तकांचे जोडनाव ह्या इमारतीला दिले आहे. सर्वात वरच्या मजल्यावर फ्रेंच उपाहारगृह आहे तर इतर मजल्यांवर बहुराष्ट्रीय कंपन्यांची हापिसे! लोकं गमतीने ह्या नाचणार्‍या घराला पिणारे घर (ड्रंक हाऊस) असेही म्हणतात. हावेलचे येथे सांस्कृतिक केंद्र करण्याचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले.

स्टेशनाच्या अगदी लगतच आहे ते 'नारोदनी' म्हणजे 'नॅशनल म्युझिअम'. युरोप आणि जगाला जोडणारे सांस्कृतिक संग्रहालय असे वर्णन असणारे झेक रिपब्लिकमधील हे सर्वात मोठे संग्रहालय. भव्य ग्रंथालय,इतिहास,विज्ञान, कला, संगीत त्यातही झेक संगीताचे एक वेगळे दालन आदि विविध दालने तर येथे आहेतच; पण आशियाई,आफ्रिकन आणि अमेरिकन संस्कृतीची माहिती देणारीही अनेक दालने येथे आहेत. अर्थात हे एकच संग्रहालय पहायला दिवस काय आठवडा पुरला नसता. वेळेअभावी अर्थातच आम्ही ते पाहू शकलो नाही.

तसेच पुढे चालत चर्च पर्यंत गेलो. तिथल्या टॉवरवर लिफ्टने गेलो.शेवटचा मजला लाकडी,पुरातन पायर्‍यांवरून चढलो.पूर्ण लाकूडकामाने युक्त असा तो पोटमाळाच वाटला. फक्त त्याला चारही बाजूंनी खिडक्या आहेत. त्यांचे कोयंडेही अगदी जुन्या पध्दतीचे आहेत. तेथून सार्‍या प्रागचा नजारा डोळे भरून पाहिला आणि कॅमेर्‍यात बंद करून घेतला.

चालत चालत प्रागच्या मुख्य चौकात आलो. ओल्ड टाउन स्क्वेअर येथे असलेले चर्च आणि त्या चर्चावर असलेले ऍस्ट्रोनॉमिकल घड्याळ हा अत्यंत कुतुहलाचा भाग आहे. यापूर्वी म्युनस्टरला असे घड्याळ आम्ही पाहिले होतेच पण आद्य आणि वेगळे ऍस्ट्रॉनॉमिकल घड्याळ म्हणजे प्रागचेच! इस. १४१० मध्ये कदान नावाच्या घड्याळजीच्या मदतीने चार्ल्स विद्यापीठातील गणित आणि खगोलशास्त्राचा प्राध्यापक सिंडॅलने हे घड्याळ तयार केले.अर्थात ह्या घड्याळाचा कर्ता कोण ह्यावरही प्रवाद आहेतच. १५५२ पर्यंत ते व्यवस्थित चालत होते. मग मात्र बंद पडले. ते मग दोन तीन वेळा दुरुस्त केले व ते करतानाच त्यात ख्रिस्तपुराणातील व्यक्तिरेखा आणि घड्याळाच्या बाजूचे चार पुतळे यांची भर घातली. ऍस्ट्रॉनॉमिकल डायल, सूर्य आणि चंद्राच्या जागा, १२ महिन्यांसाठीची कॅलेंडर डायल आणि प्रत्येक तासाला खिडकीबाहेर येणार्‍या ख्रिस्तपुराणातील अपोस्टल्स आणि इतर व्यक्तिरेखा हे ह्या घड्याळाचे मुख्य आकर्षण!

घड्याळाच्या डाव्या बाजूला दोन पुतळे आहेत. एक म्हणजे वॅनिटी - हातात आरसा घेतलेला ,स्वतःच्याच सौंदर्यात मग्न असलेला पुतळा आत्ममग्नता दर्शवतो. तर त्याच्या शेजारी असलेला सोने घेऊन जाणारा ज्यू लोभीपणाचे प्रतिक आहे. 'ज्यू'च का? चे उत्तर असे की ज्यू आधीच लोभी आणि कंजूष म्हणून ओळखले जातात ( आपल्याकडील मारवाड्यांसारखेच जणू ..) त्यात सोने वाहून नेणारा ज्यू म्हणजे तर लोभीपणाचा कळसच ! उजव्या बाजूला आहे एक सापळा, त्याच्याच हातात घड्याळाचा तास.. मृत्यूचे प्रतिक असलेल्या सापळ्याच्या हातात काळाची दोरी आहे आणि एकेक तासाचे टोल वाजवताना तो जाणीव करून देतो आहे.. वेळ पुढे पळतो आहे,मी जवळ येतो आहे. त्याच्या शेजारी असलेला योगी मात्र वाद्य वाजवण्यात तल्लीन आहे,सार्‍या जगापासून,सार्‍या मोहजालातून अलिप्त आहे. आयुष्यातली महत्त्वाची सत्येच हे पुतळे सांगतात.

आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा १२.५५ झाले होते आणि एक वाजता टोल वाजला की अपोस्टल्स बाहेर येणार त्याची वाट पाहत अलोट गर्दी थांबली होती.आम्हीही त्या गर्दीतला ठिपका होऊन एक वाजायची वाट पाहू लागलो. बरोब्बर एक वाजता मृत्यू सापळ्याने दोर ओढायला सुरुवात केली. तास वाजे झणाणा.. सुरु झाले. घड्याळावरचा कोंबडा आरवला आणि ख्रिस्तपुराणातल्या त्या बारा व्यक्तिरेखांच्या पुतळ्यांनी एकेक करून दर्शन दिले. कॅमेर्‍यांचा क्लिकक्लिकाट झाला. एक वेगळाच अनुभव गाठीशी बांधून आम्ही पुढे निघालो.

सिल्व्हर लाईन असे अधोरेखित केलेल्या रस्त्यांवरून फिरताना खरोखरीच सुवर्णकाळात फिरतो आहोत असे वाटत होते. बांधीब दगडी रस्ते, लहान गल्ल्यांतून चालत लहान मुलाचे कुतुहल डोळ्यात घेऊन त्या नगरीला डोळे भरून पाहत होतो. ख्रिस्टलसाठी प्रसिध्द असलेल्या प्रागमध्ये ख्रिस्टलचे मनमोहक आकार असलेले प्राणी,पक्षी,फुलदाण्या, घंटा,लोलक ,अलंकार आणि कितीतरी वस्तू पाहत पुढे चाललो होतो. आठवण म्हणून एखादी लहानशी वस्तू घ्यायचा विचार मात्र मनातच ठेवावा लागला कारण पुढच्या प्रवासात ती नाजूक वस्तू घरापर्यंत व्यवस्थित पोहोचेल याची खात्री वाटत नव्हती. रंगीबेरंगी खेळणी,बाहुल्या यांचे जणू प्रदर्शनच दुकानादुकानांत मांडलेले होते. अगदी अंगठ्याएवढी चिमुकली ठकू बाहुली पासून ते फूटभर उंची पर्यंतच्या वेगवेगळ्या आकारातल्या तश्शाच बाहुल्या एका रांगेत उंचीप्रमाणे मांडून ठेवल्या होत्या. त्या एकात एक बसवता येतात ही नवीच माहिती कळली.(आतापर्यंत फक्त एकात एक डबेच ठेवता येतात असा माझा समज होता.) तिथेच एका टपरीवजा दुकानात सळयांना मैद्याचे गोळे विशिष्ट आकारात लावून भाजत होते. आणि बदाम, पिस्ते ,कॅरामल मध्ये घोळवून ते खायला देत होते. आम्हीही त्याचा आस्वाद घेतला. एकदम 'झाटनामाटिक' लागते ते!

असेच हिंडत असताना एक बुध्दिबळाचे पट मांडून ठेवलेले दुकान दिसले. इतक्या विविध पध्दतीने सजवलेले चतुरंग दळ त्या पटांवर मांडलेले होते. ती बारीक कलाकुसर पाहतानाच एका षटकोनी पटाने लक्ष वेधले त्यात चक्क तीन प्रकारच्या सोंगट्या होत्या. काळ्या,पांढर्‍या आणि लाल! तिघांनी एका वेळी खेळायचा हा षटकोनी बुध्दीबळपट आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो.

हे आश्चर्य मनात घेऊनच आम्ही चार्ल्स पूलाकडे आलो. व्लटावा नदीवर राजा चार्ल्सच्या कारकिर्दीत इस.१३५७ मध्ये ह्या पूलाचे बांधकाम सुरू झाले.पूर्णपणे दगडी बांधकाम असलेला हा भक्कम पूल बांधायला ५० च्या वर वर्षे लागली आणि जवळजवळ १८७० पर्यंत पलिकडच्या भागाला जोडणारा हा एकच दुवा होता. नंतर मग इतर अनेक पूल बांधले गेले तरी ह्या चार्ल्सपूलाची शान काही वेगळीच! आता ह्या पुलावरून वाहने नेता येत नाहीत. फक्त चालत पलिकडे जायचे.त्या पूलावरून चालताना मुळामुठेवरचे पूर्वीचे जुने पूल उगाचच आठवत राहिले. जाताना दोन्ही बाजूंचे सौंदर्य पाहत,रमत गमत,आस्वाद घेत जायचे. घाईगडबडीत जाण्याची ही जागा नव्हे. त्याच पुलापासून पाऊण एक तासाच्या बोटींच्या फेर्‍याही निघतात. होडीत बसून सैर करत, बिअर नाहीतर कॉफी पित प्रागची शोभा पाहण्याची नशा काही वेगळीच.. पण वेळेअभावी आमची ती संधी हुकली.

चार्ल्स पूल पार करून आम्ही पुरातन किल्ल्याकडे आलो. अतिपुरातन १० व्या शतकात बांधलेला हा कॅसल म्हणजे फक्त राजमहालच नव्हता तर प्रागचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र होता. १४ व्या शतकात राजा चार्ल्सच्या सर्व महत्त्वाच्या राजकीय हालचाली येथूनच होत असत. राजसत्ता आणि धर्मसत्ता दोन्हीचे हे महत्त्वाचे केंद्र! मेरीमातेचे चर्च ही तेथली पहिली इमारत, नंतर मग संत जॉर्जची बॅसिलिका, संत व्हिटुसचे कथीड्रल बांधले गेले. आजही सर्वोच्च पदासाठीचा महाल येथेच आहे.देशाचे महत्त्वाचे सण येथेच साजरे केले जातात. मौल्यवान राजमुकुटही येथेच ठेवलेला आहे. विशेष म्हणजे येथे असलेली संग्रहालये आणि जुने महाल अध्यक्षांची कार्यालये सोडता जनतेला पहायला खुले आहेत.जुन्या आणि नव्याला जोडणारा हा प्राग कॅसल आज मोठ्या रुबाबात सांस्कृतिक आणि ऐतिहासिक खुणा जपतो आहे.

एकदम दोस्ती करावी असं वाटलं प्राग मला.. वेळ खूपच कमी पडला. परत कधीतरी प्रागला यायच अशी खूणगाठ मनाशी बांधलीच. साल्झबुर्गला जायचे होते. कालच्या स्टाऊच्या (ट्राफिक जाम)अनुभवाने पाय निघत नसतानाही गाडीच्या दिशेकडे जावे लागले. पावसाची रिपरिप चालू झाली होती. अपेक्षेप्रमाणेच सारे अंदाज कोसळले. नऊ सव्वानऊ पर्यंत पोहोचू असे वाटत असताना साल्झबुर्गमध्ये पोहोचलो तेव्हा ११ वाजून गेले होते. पोटात भूक आणि डोळ्यात झोप घेऊन आम्ही योहानाच्या दारात उतरलो. खिचडी खाऊन उद्याची स्वप्ने मनात घेऊन झोपलो .

अधिक चित्रांसाठी रसिकांनी हे कलादालन पहावे.

प्रवासलेख

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

12 Oct 2008 - 4:37 pm | यशोधरा

किती मस्त लिहिले आहेस!! आणि फोटूपण लय भारी गं!

सहज's picture

12 Oct 2008 - 4:38 pm | सहज

नेहमीप्रमाणे सुंदर सचित्र वर्णन!

असा बुद्धीबळपट पाहीला नव्हता. 'चिवित्र' इमारत भारी आहे.

एका दिवसात भरपुर पाहीले की. प्रागमधे वेळ कमी पडला म्हणजे अजुन बरेच काही पहाण्यासारखे असणार. प्राग इतर युरोपीन शहरांपेक्षा स्वस्त वाटले का?ह्या भागात खाण्याचे वर्णन कमी आहे. :-) बहुतेक तहानभूक विसरले होतात हे सर्व पहाताना.

प्राग आवडले.

साल्झबुर्ग मुशाफिरीची वाट पहात आहे.

प्रमोद देव's picture

12 Oct 2008 - 4:44 pm | प्रमोद देव

असा बुद्धीबळपट पाहीला नव्हता

सहजरावांशी सहमत आहे.
बाकी , लेखनशैलीबद्दलची आणि लेखिकेच्या लेखनकौशल्याबद्दलची सर्व विशेषणे आता संपलेली आहेत.
तेव्हा, एकच म्हणतो...झकास!

शितल's picture

12 Oct 2008 - 5:56 pm | शितल

स्वाती ताई,
खुपच छान वर्णन केले आहेस. आ़णि फोटो तर खुपच छान आहेत. :)

रेवती's picture

12 Oct 2008 - 8:09 pm | रेवती

घड्याळ व पुतळे आवडले. पुतळे तसे असण्यामागचं कारण समजलं. घड्याळ जरा जास्तच आवडलं. सूर्य चंद्राच्या जागा व घड्याळाची एकूणच रंगसंगती आवडली.
सगळे फोटो आवडले.

रेवती

टारझन's picture

12 Oct 2008 - 9:13 pm | टारझन

स्वाती तैनी टोन कायम ठेवला आहे.

कॅमेर्‍यांचा क्लिकक्लिकाट झाला

हे जबरा

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

प्राजु's picture

12 Oct 2008 - 9:27 pm | प्राजु

घड्याळ, पुतले, तो बुद्धीबळाचा पट.. आणि झांटामाटीक खाऊ.. सगळेच मस्त.
फोटो आणि वर्णन.. स्वातीताई आता तुझ्या या शैलीसाठी काहीतरी वेगळा शब्द शोधावा लागेल. सारखं सारखं तेच तेच छान, अप्रतिम, रसाळ वर्णन .. असं काय लिहायचं ?? नवीन शब्द शोधावा लागेल आता. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मृदुला's picture

12 Oct 2008 - 9:59 pm | मृदुला

लेख आवडला. नाचणारी इमारत पहायला जायला हवे!

बेसनलाडू's picture

12 Oct 2008 - 10:25 pm | बेसनलाडू

ओघवते सचित्र प्रवासवर्णन. तिसर्‍या फोटोमधील इमारत छान वाटते आहे.
(वाचक)बेसनलाडू

शाल्मली's picture

12 Oct 2008 - 11:06 pm | शाल्मली

स्वातीताई,
आपल्या भ्रमंतीचं वर्णन झकासच झालं आहे.
परत एकदा फिरुन आल्यासारखं वाटलं. :)
मस्त लेख.
--शाल्मली.

छोटा डॉन's picture

13 Oct 2008 - 1:23 am | छोटा डॉन

आपल्या भ्रमंतीचं वर्णन झकासच झालं आहे. परत एकदा फिरुन आल्यासारखं वाटलं.

+१ , सहमत आहे ....

शब्दश : पुन्हा एकदा फिरुन आल्यासारखे वाटले ...
एकदम व्यवस्थीत आणि डिटेल वर्णन आहे, बरेच काही पाहताना समजले नव्हते ते आता समजले ...
आता कुणी विचारले भारतात की "काय पाहिलेस बाबा तिकडे ?" तर त्याच्या तोंडावर फेकायला एकदम जबरदस्त विदा मिळाला ....
धन्यवाद !

खुद के साथ बाता : आयला मी जे "पटेल फोटो" काढत बसलो त्या नादात एवढी सगळी माहिती घेणे विसरलोच .
कुणी विचारले असते की हे काय आहे तर शप्पथ सांगता नसते आले, आता काही टेन्शन नाही. जमले एकदम !

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

सर्वसाक्षी's picture

12 Oct 2008 - 11:11 pm | सर्वसाक्षी

सचित्र प्रागवर्णन आवडले. तुझी प्रवासाचा संपूर्ण तपशिल ठेवून तो सुसंबद्धपणे मांडण्याची शैली छानच आहे.
पहिल्या दोन इमारती पाहून बॅलार्ड पिअर आठवते:)

झकासराव's picture

13 Oct 2008 - 7:34 am | झकासराव

भ्रमणगाथा मस्त सुरु आहे की. :)
घडाळ्याच्या जवळच्या चार पुतळ्यांमागची कल्पना मस्त आहे अगदी.

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

विसोबा खेचर's picture

13 Oct 2008 - 8:03 am | विसोबा खेचर

स्वाती,

'मिपाची अधिकृत प्रवासवर्णनकार' म्हणून आता तुझ्या नावाची घोषणा करायला हरकत नाही! :)

मस्त फोटू... बुद्धिबळाचा पट तर क्लासच..

तात्या.

एक अवांतर शंका - ही मंडळी बघावं तेव्हा नुसती मजेत फिरत असतात मग पोटापाण्याचे उद्योग केव्हा करतात? :)

नंदन's picture

13 Oct 2008 - 4:27 pm | नंदन

प्राग-ऐतिहासिक सफर मस्तच. वाचनाच्या ओघात येणारे फोटोज, त्या त्या स्थळांची माहितीही सुरेख. आता साल्झबुर्गच्या वर्णनाची वाट पाहतो आहे :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

लिखाळ's picture

13 Oct 2008 - 4:30 pm | लिखाळ

>>प्रागैतिहासिक <<
हा हा .. हे मस्तच !

वृत्तांत फारच छान.. ओघवते वर्णन.. मी सुद्धा साल्जबुर्गची वाट पाहतो आहे :)
--लिखाळ.

सुमीत's picture

13 Oct 2008 - 5:24 pm | सुमीत

सचित्र दर्शन झाले प्राहा चे, नेहमी प्रमाणेच छान.
प्राहा च्या नेमक्या प्रदर्शनीय स्थळांची सहल घडवून आणली स्वाती ताईने.

मनस्वी's picture

13 Oct 2008 - 7:23 pm | मनस्वी

बर्‍याच इमारतींची पडझड होऊनही परत त्या इमारती जशाच्या तशा बांधून काढून प्राग आपल्या पुरातन दिमाखात परत उभे राहिले

शिकण्यासारखे आहे.
ड्रंक हाऊस बघून मजा वाटली.

तेथून सार्‍या प्रागचा नजारा डोळे भरून पाहिला आणि कॅमेर्‍यात बंद करून घेतला.

छान दिसतोय.. पण प्रत्यक्ष बघायला जबरीच वाटत असेल.

तिघांनी एका वेळी खेळायचा हा षटकोनी बुध्दीबळपट

सह्हीच आहे!
स्वातीताई, वर्णन आणि फोटो नेहेमीप्रमाणेच सुरेख!
साल्झबुर्ग लवकर येउदेत..

मनस्वी

लवंगी's picture

13 Oct 2008 - 8:45 pm | लवंगी

माज़ी ३ वर्षाची लेक या ठकूच्या मागे वेडी आहे.. तिच्या बेबीसीटरकडे अश्या एकत एक घालायच्या ठकू आहेत.. मी खूप दिवस शोधतेय पण इथे मिशैगन मध्ये मिळताच नाही.

नंदन's picture

13 Oct 2008 - 11:20 pm | नंदन

ऑनलाईन मिळतील बहुतेक. मूळच्या रशियन बाहुल्यांचा प्रकार आहे. Matryoshka dolls नावाचा.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Oct 2008 - 9:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रागची सफर झकास झाली. घड्याळ, त्याची प्रतिके, नाचणारी इमारत, तिघांनी एका वेळी खेळायचा षटकोनी बुध्दीबळपट अफलातूनच.
आपल्या सुंदर लेखनशैली आणि चित्रांनी आम्ही वाचकांनी प्राग डोळ्यात साठवले.

साल्झबुर्गच्या सफरीच्या प्रतिक्षेत.

सुनील's picture

13 Oct 2008 - 9:42 pm | सुनील

नेहेमीप्रमाणेच सुरेख ओघवते वर्णन आणि सुंदर फोटो.

ह्या देशांत वावरताना भाषेची काही अडचण जाणवते का?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती दिनेश's picture

14 Nov 2008 - 9:27 pm | स्वाती दिनेश

भ्रमणमंडळाच्या वतीने सर्वांना धन्यवाद.
साल्झबुर्गला जरा उशीरच झाला आहे, पण आत्ताच हिमगुंफा मिपाकरांसाठी खुल्या केल्या आहेत.
प्रागमध्ये भाषेची अडचण थोडी जाणवते,पण इंग्रजीत बर्‍यापैकी संवाद साधता येतो.बर्‍याच देशात जर्मनही समजते.
एका दिवसात धावपळ झालीच त्यामुळे खाणे अर्थातच दुय्यम ठरले. पहाण्याला जास्त महत्त्व दिले आणि पिझ्झा खाऊन वेळ भागवली.
स्वाती