मुंबई - पुणे - मुंबई

चिन्मय श्री जोशी's picture
चिन्मय श्री जोशी in जनातलं, मनातलं
5 May 2014 - 5:05 pm

मित्र मंडळी हो, आज मी तुम्हाला एक ष्टोरी सांगणार आहे. अनुभवकथन का काय म्हणतात तसलीच थोडीशी .

टायटलवर जाऊ नका . त्या सिनेमाशी (आणि मुक्त बर्वेशी ) माझ्या ब्लॉगचा (आणि माझा सुद्धा) काहीही संबंध नाही .
तरी स्टोरी म्हणलं कि काहीतरी भारी असणारच कि नाही ?? तसं बघायला गेल तर आपण सगळे (भारतीय लोक ) स्टोऱ्या ऐकण्यात आणि सांगण्यात इतके पटाईत असतो, कि विचारता सोय नाही. आणि मी सुद्धा त्यातलाच एक..

तर नमनाचे तेल संपवून आपण त्या स्टोरी कडे वळू .

मित्रहो हि ष्टोरी आहे मी आणि मुंबई नावाच्या शहरातल्या माझ्या अनुभवांची ..

तसं बघायचं तर मुंबईमध्ये माझा मामा राहतो आणि फिरायला म्हणून मुंबईला बरेच वेळा जायचा योग आला . पण ते म्हणजे तुळशीबागेतली खरेदी २ मिनिटात आटोपती घेण्यासारखंच होतं .

तर मला मुंबई ला जायचा प्रसंग आला कारण आम्ही चार टाळकी (पक्षी : घोडे, उडाणटप्पू इ.) पदवीधर झालो . आमचा नम्बर Accenture नावाच्या एका IT कंपनी मध्ये campus selection मध्ये लागला (हल्ली campus selection ला वधू परीक्षे इतकेच महत्व आले आहे ). आमच्या मागच्या ७ पिढ्या स्वर्गात धाडल्याचे पुण्य आमच्या गाठी (स्त्रियांनी पदरी असे वाचण्यास हरकत नाही) बांधले गेले. आणि तीर्थरूपांनी आम्हाला (दुर्मिळ अशा) कृतज्ञ नजरेने बघितले ..

तर या कंपनी ने आम्हास आमचे मूळ स्थान (पक्षी: कर्मभूमी ) पुण्यनगरीचा निरोप घेऊन मुंबा नगरीत आमच्या कर्तुत्वाचे झेंडे गाडण्यास पाचारण केले ..
(वरील वाक्य हे शिवकालीन बखरीच्या भाषाप्रभावाखाली लिहिले आहे - इति इतिहासकार बुडकुळे )

खर तर मी जन्माचा, हाडाचा आणि जिभेचा पुणेकर आहे (पुणेरी लोक पंचेन्द्रीयांमध्ये सर्वाधिक वापर जिभेचा करतात आणि सर्वात कमी कानाचा हे मी affidevit वर लिहून द्यायला तयार आहे - टीप: स्टैम्प पेपर चा खर्च वगळून) .
पुणे आणि मुंबई या दोन शहरांमध्ये माधुरी दीक्षित आणि ओमपुरीच्या सौंदर्याइतकंच साम्य आहे . त्यामुळे मला हवं तर मद्रासला पाठवा पण मुंबई ला नको असा माझा आग्रह. गरज पडलीच तर वेळ प्रसंगी धोतर लुंगी सारखे गुंडाळायची मी मनाची तयारी केली होती .. पण तिकडे लेहमन ब्रदर्स नि माती (खरं तर पैसे) खाल्ली आणि रिसेशनच्या भीतीने आम्ही मुंबानगरीस जाण्यास तयार झालो .
(एक शंका - आपल्या इथल्या पतसंस्थांपासून प्रेरणा घेऊनच लेहमन ब्रदर्स चा घोटाळा झाला असेल का ?? कोणीतरी PHD ला घ्यायला विषय बराय)

मुंबई नगरी मध्ये अस्मादिकांनी नोकरीच्या निमिताने पाउल ठेवले आणि IT नावाच्या एका जादुई नगरीशी परिचय झाला . MNC मध्ये असल्या मुळे आमची सुरवातीच्या दिवसात चांगलीच बडदास्त ठेवली होती . राहायला AC रूम आणि जायला रिक्षा असल्याने लोकल नावाच्या अवघड पेपरशी अजून सामना झालाच नव्हता . पुण्यात अभावानेच दिसणार मुला-मुलींमधल मोकळं वातावरण . सदैव घाई गडबड आणि पळापळ . हे सगळ वेगळच वाटत होतं .
सुरुवातीचे नवलाईचे दिवस संपले आणि हळू हळू या शहराच्या वैशिष्ट्यांची जाणीव होऊ लागली. त्यातलीच काही (पुणेरी) निरीक्षणे पुढीलप्रमाणे .

१. पुण्यातल्या भगिनी समाज हा मुंबई च्या तुलनेत खूपच मागासलेला आहे
(चाणाक्ष पुणेकरांनी नोंद केली असेलच कि मुंबई साठी भगिनी हा शब्द वगळण्यात आला आहे )

मुंबईमध्ये समस्त महिला मंडळ पुरुषांना लाजवेल (शब्दशः अर्थ घेणे ) अशा प्रकारे कर्तुत्व (??) गाजवून दाखवीत असते .

२. पुण्यातील रिक्षामध्ये मीटर नावाची शोभेची वस्तू असते . परंतु मुंबई मध्ये वेळ हि गोष्ट चितळ्यांच्या बाकरवडी इतकीच प्रत्येकाला प्रिय असल्या मुळे; मीटर चा उपयोग मुंबई मध्ये रिक्षातून उतरल्यावर( वाद घालण्याचा) वेळ वाचावा म्हणून भाडे ठरवण्यासाठी करतात ..

३. मुंबईकर अत्यंत उधळपट्टी करणारे असून रात्री ११ वाजे पर्यंत दुकाने, सिग्नल इ. गोष्टी चालू ठेऊन विजेचा प्रचंड अपव्यय करतात .
यावर सगळ्या मुंबई मध्ये सुद्धा महाराष्ट्राप्रमाणेच लोड शेडींग चालू करावे असे पत्र मंत्रालयात पाठवायचा क्रांतिकारी विचार स्फुरला होता, परंतु आमच्या बिल्डींग चे ९ व मंत्रालयाचे १० असे १९ मजले विजेशिवाय चढाई करायच्या कल्पनेनी तो बेत रहित झाला . असो.

४. पानिपतच्या लढाई मध्ये लढायला गेलेले सगळे सैनिक एकाच विरार फास्ट लोकल मध्ये सामान, घोडे इ. सहित मावू शकले असते . परंतु त्या काळी पेशवाई मध्ये हत्ती पॉप्युलर असल्याने मराठ्यांचा पराभव झाला . असो .

५. पूर्वीच्या काळी ज्या लोकांनी तप करून क्रोध जिंकून घेतला होता त्यांचे वंशज हल्ली मुंबई मध्ये दुकान चालवतात . त्यामुळे पुणेकरांना, मुंबईमध्ये खरेदी करताना "खेकसणे" या खरेदीच्या अविभाज्य आणि मनोरंजनात्मक अंगाला मुकावे लागते .. . (याला पुण्यातील मॉल सुद्धा अपवाद नाहीत)

६. पुण्यातील दुचाकीस्वाराच्या अंगी जन्मजात असणारे गुण (जसे अष्टावधान, multi-tasking व चपळता ) हे मुंबईकरांकडे नसल्याने ते बहुधा वाहतुकीचे नियम पाळतात किंवा सरळ "बेस्ट/लोकल "सारख्या पर्यायांचा वापर करतात .

७. मुंबई च्या प्रदूषित व खाऱ्या हवेचा मराठी भाषिकांना मानसिक त्रास होतो व ते घराबाहेर पडले कि मराठी विसरून (तोडकं-मोडकं ) हिंदी बोलू लागतात .. परंतु असे कोणी जाहीर बोलून दाखवल्यास त्यांना राग येतो व तो राग शमवण्यासाठी ते थेट शिववडा ष्टॉल वर किंवा झुणका भाकर केंद्रावर जातात आणि आपण मराठी असल्याचे सिद्ध करून दाखवतात ..

८. मुंबईच्या लोकल मध्ये समस्त महिलावर्ग सर्व घरगुती कामे (आंघोळ व १/२ नंबर सोडून) मोठ्या उत्साहाने सामुदायिक रित्या पार पाडतो .

९. मुंबई मध्ये उकाडा खूप असल्याने तेथे कपड्यांचा वापर (खर तर आकार) कमी असणे हि अगदी सामान्य गोष्ट आहे . (सुज्ञ वाचकांना अधिक सांगणे न लगे ).
असे असले तरी सुद्धा मुंबईकरांना स्वेटरची खूप हौस आहे व ते दिवाळीच्या शॉपिंग मध्ये स्वेटर खरेदी करून थंडी आली अशी स्वताची समजूत घालून घेतात.
(हे म्हणजे अमेरिकेत बिन ढोल ताशांचा गणेशोत्सव साजरा करण्यासारखेच आहे . असू दे, असते एका एका शहराची मजबुरी)

१०. बस, रिक्षा किंवा लोकलचा संप असेल तेव्हा मुंबईकर शक्यतो सुट्टी टाकून संपाला नैतिक पाठींबा देतात.
(पुणेकर मुळात स्वावलंबी असल्याने पुण्यात संप नसताना आणि असताना विशेष फरक जाणवत नाही .)

११. मुंबईचा पाउस आणि पुण्याची PMT हे ब्रम्हदेवाने एकाच वेळी जन्माला घातले असावेत .
( इतके बेभरवशी प्रकार जगात शोधून सापडणार नाहीत .)

१२. सर्वसामान्य मुंबईकर एका वर्षाच्या लोकल पास वर पृथ्वी प्रदक्षिणे इतके अंतर प्रवास करून त्याची किंमत पुरती वसूल करतो . व वाचवलेल्या पैशातून चौपाटी वर भेळपुरी खाउन celebration करतो.

असो . जास्त लांबड न लावता माझे मुंबईपुराण इथेच थांबवतो . . ३ वर्षांच्या माझ्या अनुभवातून दिसलेली मुंबई इथे सांगायचा प्रयत्न केला आहे . मुंबईकरांना त्यांच्या शहराविषयी विशेष अभिमान नसल्याने मी हा लेख प्रसिद्ध करू शकलो . (असलाच अभिमान एखाद्याला, तरी माझ्याशी वाद घालायला वेळ मात्र नक्की नसेल अशी माझी खात्री आहे )

टीप: पुण्या साठी सुद्धा लेख लिहून तयार आहे .. पण सुरक्षिततेच्या कारणामुळे मी पुण्यापासून किमान हजार मैल लांब गेल्याशिवाय तो प्रसिद्ध करू इच्छित नाही ..
सुज्ञ वाचकांनी मला माफ करावे हि विनंती .

प्रवास

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

5 May 2014 - 5:14 pm | टवाळ कार्टा

मी प य ला "मुंबैकर" :)

दिपक.कुवेत's picture

5 May 2014 - 5:43 pm | दिपक.कुवेत

मजा आली वाचुन आणि मला माझे लोकलचे दिवस आठवले. कधीहि, कोणत्याहि वेळि जा एखाद्या नदिसारखी ती माणसांचे लोंढे वाहुन नेतच असते. एक वेळ चक्रव्युह भेदणं सोपं जाईल पण एका दारातुन आत शीरुन दुसर्‍या दारापर्यंत जायला जी कसरत करावी लागते ती हाडाचा मुबैकरंच जाणे. मुंबईच्या लोकल, त्यात येणारे अनुभव हा एक व्यापक विषय आहे. अजुन बरचं काहि लिहिता आलं असतं. असो.

(पार्ट टाईम मुंबईकर) दिपक

पैसा's picture

5 May 2014 - 5:49 pm | पैसा

मस्त खुसखुशीत लिहिलंय! मला आधी वाटलं शिणेम्याची श्टुरी आहे का काय! बघितलं ते वेगळंच. मारा दोघांनाही. आमचा फुल्ल सपोर्ट हाये.

- कोकणी.

जेपी's picture

5 May 2014 - 5:52 pm | जेपी

धागा पुर्ण वाचला नाय .तळटिप वाचल्यावर आंची ची आटवण आली.तिला बी सवय अशिच सवय हाय.आधि एक लेख लिआयचा आन नंतर त्याची दुसरी बाजु मांडायची.पुणे मुंबेकरानी धाग फाट्यावर न मारल्यास 100वा प्र.द्यायला येण.

छान लिहिलय. आपल्या दृष्तीने मुंबैकर गडबडीत असतात, धावपळ वगैरे करतात पण एका वेगळ्या गावातून (राज्यातून)आलेल्या ललनेने "तुम्ही पुणेकर नेहमी इतकी धावाधाव का करत असता?" असे विचारले. तिला मुंबैला पाठवायला हवे.

शब्दाशब्दाशी सहमत. आताशा उन्हाळ्याच्या दिवसात अगदीच अपरिहार्य कारण असल्याशिवाय घाट उतरुन खाली जायचं म्हणजे जीवावर येतं.

-वीकांती मुंबैकर ;)

चिन्मय श्री जोशी's picture

5 May 2014 - 6:36 pm | चिन्मय श्री जोशी

धन्यवाद प्रतिसादाबद्दल

मुक्त विहारि's picture

5 May 2014 - 7:24 pm | मुक्त विहारि

छान लिहिले आहे.

(आमचे डोंबोली हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने, पुणे आणि मुंबई, ह्यांच्यातले सगळे गूण आमच्या गावातच एकवटले आहेत.हेवेसांनल.)

आदिजोशी's picture

5 May 2014 - 7:35 pm | आदिजोशी

निरिक्षण वाढवा. लेखात नोंदवलेली निरिक्षणे अगदी बाळबोध आणि वरवरची आहेत.
पुण्याला शहर म्हणण्याचे धाडस आवडले.
तुम्ही मुंबईत कुठे राहता हे कळलं असतं तर अजून बरं झालं असतं.
आज काल ठाणे, कल्याण, मिरा रोड, वसई, विरार, पनवेल, पालघर इथली लोकं आम्ही मुंबईत राहतो असे खुशाल ठोकून देतात.

लेखनाबद्दल सूचना - कंसातली वाक्य कमी करा. दर २ वाक्यांनंतर अडखळून वाचनाची मजा निघून जाते. जे लिहायचंय (स्वगत / प्रकट) ते शक्यतो एकाच स्वरूपात लिहा. लिखाण आणि वाचन दोन्हीही ओघवते झाले तर मजा वाढते.

सोत्रि's picture

5 May 2014 - 8:04 pm | सोत्रि

शब्दाशब्दाशी सहमत!

सूचनेमध्ये जे लिहीलेय तेच लिहणार होतो, श्रम वाचवल्याबद्दल धन्यवाद!

-(एकेकाळी विरारला राहून मुंबईत राहतो असे खुशाल ठोकणारा) सोकाजी

तुमचा अभिषेक's picture

5 May 2014 - 11:26 pm | तुमचा अभिषेक

तुम्ही मुंबईत कुठे राहता हे कळलं असतं तर अजून बरं झालं असतं.
आज काल ठाणे, कल्याण, मिरा रोड, वसई, विरार, पनवेल, पालघर इथली लोकं आम्ही मुंबईत राहतो असे खुशाल ठोकून देतात.

>>>>>>>

+७८६
माहीमच्या पुढे मुंबई संपली. कुर्ल्यालाही उपनगर बोलले जाते.
ते नक्कीच मुंबई उपनगरात राहायला असतील.
कारण जे मुंबईत राहतात ते आरामात गर्दीच्या विरुद्ध दिशेने वार्‍याची खिडकी पकडून प्रवास करतात.
जन्मापासून करतोय, आणि म्हणूनच नोकरीधंद्यासाठी असो वा कशासाठीही मुंबई सोडवत नाही. *music2*

>>जन्मापासून करतोय, आणि म्हणूनच नोकरीधंद्यासाठी असो वा कशासाठीही मुंबई सोडवत नाही.
बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जिला मुंबई म्हणतात अशा मुंबईतले दिसता. उपनगरातले नाही. आम्हा बदलापूरकरांसारखा अडीच तास वन वे ट्रॅव्हल करुन हापिसात गेला असतात मग कळलं असतं पुणं किती सुसह्य आहे ते. एक गाडी चुकली की पुढची वीस-पंचवीस मिनटं ताटकळत राहणं ज्यानं अनुभवलंय त्याला आणि फक्त त्यालाच हे कळू शकतं.

खुद्द मुंबईत असाल तर त्यासारखं सुख नाही हे ही तितकंच खरं!! :) बाकी चालू देत.

आदिजोशी's picture

6 May 2014 - 4:36 pm | आदिजोशी

बदलापूर मुंबईचे उपनगर नाही. ते ठाण्यापलिकडे येतं. मुंबईची उपनगरं दहिसर आणि मुलुंडला संपतात.

बदलापूर हे मुंबैचं उपनगर आहे असं मी कुठेतरी म्हटलंय का? आपल्यासारख्या सुज्ञ आणि ज्येष्ठ मिपाकराकडून असा प्रतिसाद वाचून मिपाकर असल्याची शरम वाटली. ;)

शैलेन्द्र's picture

8 May 2014 - 9:58 am | शैलेन्द्र

तुम्ही इथल्या बर्‍याच जणांच्या अस्मितांवर वार करताय..
आम्ही डोंबिवलीवाले एक दिवस घरी बसलो तर मुंबईतले अर्धे हापीसं बंद पडतात. (आम्ही तसे घरी बसत नाही हा भाग वेगळा, गाड्या बंद आहेत हे घरातच समजूनही ठेसणावर जाउन दोन घटका मजा बघणारी जमात आमची.)

कुंदन's picture

5 May 2014 - 11:59 pm | कुंदन

नवा हय वोह. शिकेल हळु हळु.

चैतन्य ईन्या's picture

6 May 2014 - 4:09 pm | चैतन्य ईन्या

साधारण १८ वर्षांपूर्वी आमचा एक मित्र कल्याणहून पुण्यात आला होता. सदशिवात एकाच ठिकाणी २ भाऊ वेगवेगळे लॉज चालवतात. पहिला मुंबईत फारसा राहिला नव्हता पण दुसरा मुंबईमध्ये १० वर्ष इन्स्पेक्टर होता. पहिल्याकडे त्याला घेवून गेलो, प्रथम प्रश्न तुम्ही कुठले. हा प्रामाणिकपणे उत्तरला कल्याण. समोरून अच्छा म्हणजे मुंबई म्हणा की. कसले बकाल शहर ह्या. नकोच तिथली लोक.
दुसऱ्याकडे गेलो. परत पहिला प्रश्न तुम्ही कुठले ह्याचे उत्तर मुंबई. इन्स्पेक्टरसाहेब गरजले अहो हो पण मुंबई म्हणजे नक्की कुठले. मित्राचे उत्तर कल्याण. त्यावर पुढे इन्स्पेक्टरसाहेबानी अर्धातास झोडला कल्याण कसली आली मुंबईत वगैरे. फायनली दोन्ही ठिकाणी न राहता मित्र शेवटी एका ठिकाणी पेईंगगेस्ट बनून राहिला.

पण हल्ली हाच प्रकार पुण्यात पण होती. काय पिंपळे सौदागर आणि कुठलेही बुद्रुक बिद्रूकला लोक पुणे म्हणतात. तस्मात असे सगळीकडेच असते.

आदूबाळ's picture

6 May 2014 - 5:27 pm | आदूबाळ

कल्याण मुंबैत येतच नाही. मुंबैच्या आधीपासून कल्याणला स्वतंत्र अस्तित्त्व आहे. कल्याण बंदर प्राचीन व्यापारी मार्गावरचं महत्त्वाचं ठाणं होतं.

मुंबै-पुणे प्रवासात खिडकीबाहेरच्या देखाव्यात कल्याण-आधी आणि कल्याण-नंतर असा सरळ फरक आहे. बकालियत कमी कमी होत जाते. अंबरनाथ ते घाटमाथा हा सर्वात बेष्ट प्याच आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 May 2014 - 6:39 pm | राजेंद्र मेहेंदळे

केवळ कल्याणचा उल्लेख आल्याने वादात उडी घेणे भाग आहे
१.माझे कल्याण किमान ४०० वर्षांपासुन म्हणजे जेव्हा मुंबैचा शोध फिरंग्याना लागला नव्हता तेव्हापसुन अस्तित्वात आहे.
२. शिवाजीमहाराजांनी सुरतेवर स्वारी केली तेव्हा कल्याण आणि भिवंडी हा त्यातला महत्वाचा टप्पा होता.
३.शुर्पारक (नालासोपारा) आणि श्रीस्थानक (ठाणे) या बंदरातुन जो व्यापर चालत असे त्याची वाहतुक कल्याण/माळशेज घाट मार्गेच होत असे अशी माहीती आहे.
४.काळु आणि उल्हास नदीच्या संगमावरचे हे शहर फार प्राचीन आहे.माझे स्वतःचे घर किमान २०० वर्षंपासुन पारनाक्याला आहे.
डोंबिवलि/कोपर वगैरे दलदलीत भराव घालुन आगर्यांनी चाळी बांधलेल्या शहरांशी कल्याणची तुलना होणे नाही.

बाकी चालु द्या

पैसा's picture

6 May 2014 - 6:41 pm | पैसा

हे तुमच्या प्रिय डोंबोलीला काय म्हणतात बघा!

मुक्त विहारि's picture

6 May 2014 - 7:24 pm | मुक्त विहारि

किंबहूना आहेच.

पुढे मग ह्याच गोष्टीतून धडा घेवून, नरीमन पॉइंट आणि इतर भाग बनवल्या गेले असतील.

आणि बादवे,

केवळ भराव हाच निकष असेल तर,

आमच्या द्रुष्टीने खरी मुंबई ही फक्त फोर्ट भागापुरतीच मर्यादीत.

तुमचा अभिषेक's picture

7 May 2014 - 12:19 am | तुमचा अभिषेक

केवळ भराव हाच निकष असेल तर,
आमच्या द्रुष्टीने खरी मुंबई ही फक्त फोर्ट भागापुरतीच मर्यादीत.

का?
म्हणजे मुंबई सात बेटांची बनलेली आहे मलाही इतपतच इतिहास भूगोल माहीत आहे, ती सात बेटे काय फोर्ट परीसरातच होती का सारी? गूगाळायला हवे, मात्र आमच्या माझगावला डोंगर आहे, तसेच एकंदरीतच हिल एरीया आहे तर तो नक्कीच भर टाकून बनवलेला भाग नाही.

मुक्त विहारि's picture

7 May 2014 - 2:49 pm | मुक्त विहारि

मुंबईचा परीसर फार कमी होता.गिरणगांव परीसर मुंबईत गणल्या जात न्हवता.

गेल्या शतकाच्या सुरुवाती पर्यंत दादरला पण मुंबईत गणले जात न्हवते.

पुढे मुलुंड आणि बोरीवली पर्यंत ब्रुहन्-मुंबई झाली.

तस्मात सध्या तरी जिथ पर्यंत लोकल तिथपर्यंत मुंबई आणि जिथपर्यंत पी.एम.टी. तिथपर्यंत पुणे, असा साधा हिशेब आहे.

आणि शेवटी काय हो.

तुम्ही कुठेही राहा....

मध्यवर्ती ठिकाण एकच, डोंबिवली....

तुमचा अभिषेक's picture

8 May 2014 - 12:54 am | तुमचा अभिषेक

मध्यवर्ती ठिकाण एकच, डोंबिवली....
>>>>>

हे कश्याचे मध्यवर्ती ठिकाण माहीत नही मात्र....

फोर्ट परीसर हेड ऑफ मुंबई - तर - माझगाव हार्ट ऑफ मुंबई !!

सुनील's picture

8 May 2014 - 2:06 pm | सुनील

हे कश्याचे मध्यवर्ती ठिकाण माहीत नही मात्र....

आँ? असं काय करता?

डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिम-उत्तर्-दक्षिण दिशांना प्रत्येकी दोन किलोमिटरला स्पर्श करून जाणारे एखादे काल्पनिक वर्तुळ काढा. त्याच्या मध्यभागी डोंबोली!!! हाकानाका!!!!

;)

आत्मशून्य's picture

11 May 2014 - 2:42 am | आत्मशून्य

=))

=))

लय मज्या आला धागा आन प्रतिसाद वाचुन.

स्वगत- गड्या आपला गावच बरा.......

(लातुरकर) जेपी

बबन ताम्बे's picture

5 May 2014 - 7:37 pm | बबन ताम्बे

मस्त निरिक्षण.

आवडले.

चिन्मय खंडागळे's picture

5 May 2014 - 8:15 pm | चिन्मय खंडागळे

८. मुंबईच्या लोकल मध्ये समस्त महिलावर्ग सर्व घरगुती कामे (आंघोळ व १/२ नंबर सोडून) मोठ्या उत्साहाने सामुदायिक रित्या पार पाडतो .

तुम्हाला कसं हो माहित? व्हिडिओ कोचने जाता वाट्टं? *mosking*

मुंबई देशात अव्वल राहण्यायोग्य शहर.
दुसरे चेन्नई, तिसरे हैदराबाद, चौथे बेंगळूरू.

महाराष्ट्रात मुंबई पाठोपाठ नागपूरने क्रमांक पटकावला. नागपूर हे देशात तेरावे.

पुणे चौदावे आहे.

कोणाला शक असेल तर लिंक शोधून देईन या सर्व्हेची / बातमीची. :)

यशोधरा's picture

7 May 2014 - 8:31 am | यशोधरा

टिनपाट सर्व्हे असेल तो ;)

तुमचा अभिषेक's picture

5 May 2014 - 11:31 pm | तुमचा अभिषेक

मुंबईमध्ये समस्त महिला मंडळ पुरुषांना लाजवेल (शब्दशः अर्थ घेणे ) अशा प्रकारे कर्तुत्व (??) गाजवून दाखवीत असते .
>>>>>>>>
पुरुष सुद्धा जर मुंबईकर असतील तर नाही लाजत. बाहेरच्यांना मुंबई कल्चर झेपायला थोडा वेळ लागणारच. शेवटी बॉलीवूड सिटी आहे मुंबई, मायानगरी उगाच नाही म्हणत :)

तुमचा अभिषेक's picture

5 May 2014 - 11:33 pm | तुमचा अभिषेक

मुंबईकरांना त्यांच्या शहराविषयी विशेष अभिमान नसल्याने मी हा लेख प्रसिद्ध करू शकलो . (असलाच अभिमान एखाद्याला, तरी माझ्याशी वाद घालायला वेळ मात्र नक्की नसेल अशी माझी खात्री आहे )

एकत हे चुकीचे विधान आहे किंवा मी त्याला अपवाद आहे.
यातले नक्की काय ते ठरवत बसायला मात्र मला वेळ नाही ;)

तुमचा अभिषेक's picture

5 May 2014 - 11:36 pm | तुमचा अभिषेक

. पुण्यातील रिक्षामध्ये मीटर नावाची शोभेची वस्तू असते . परंतु मुंबई मध्ये वेळ हि गोष्ट चितळ्यांच्या बाकरवडी इतकीच प्रत्येकाला प्रिय असल्या मुळे; मीटर चा उपयोग मुंबई मध्ये रिक्षातून उतरल्यावर( वाद घालण्याचा) वेळ वाचावा म्हणून भाडे ठरवण्यासाठी करतात ..

मुंबईमध्ये रिक्षा ????????

मुंबईमध्ये रिक्षा ????????

मुंबईमध्ये रिक्षा ????????

आहो मुंबईत टॅक्सी चालते

ओ भाऊ, ते तुमच्या अंधेर्नगरीत रिक्शा चालते नाय का?

तुमचा अभिषेक's picture

5 May 2014 - 11:43 pm | तुमचा अभिषेक

व वाचवलेल्या पैशातून चौपाटी वर भेळपुरी खाउन celebration करतो.

हे मात्र खरे, भेलपुरी खावी ती समुद्राच्या खार्‍या वार्‍यांच्या सोबतीनेच .. यासाठी +७८६ :)

तुमचा अभिषेक's picture

5 May 2014 - 11:46 pm | तुमचा अभिषेक

मुंबईचा पाउस आणि पुण्याची PMT हे ब्रम्हदेवाने एकाच वेळी जन्माला घातले असावेत .
( इतके बेभरवशी प्रकार जगात शोधून सापडणार नाहीत .)

>>>>>>

मुंबईच्या पावसावर तर स्पेशल लेख बनेल. किंबहुना मी माझ्या बरेच सुखाच्या लेखांमध्ये उल्लेख केला आहे त्याचा. पण असो, इथे त्याची जाहीरात नको :)

तुमचा अभिषेक's picture

5 May 2014 - 11:50 pm | तुमचा अभिषेक

याबद्दलही हा लेख बरेच गैरसमज पसरवतोय, खरे तर मुंबईची हवा-पाणी देशभरातल्या सर्वांनाच सूट होते. म्हणून देशाच्या कोणत्याही कोपर्‍यातील व्यक्ती येऊन इथे राहू शकते, कायमची स्थायिक होऊ शकते.

सानिकास्वप्निल's picture

6 May 2014 - 12:46 am | सानिकास्वप्निल

तुमचा अभिषेक ह्यांच्या प्रत्येक प्रतिसादाशी सहमत +११११११११११११११११

टीप: पुण्या साठी सुद्धा लेख लिहून तयार आहे .. पण सुरक्षिततेच्या कारणामुळे मी पुण्यापासून किमान हजार मैल लांब गेल्याशिवाय तो प्रसिद्ध करू इच्छित नाही ..

बरे.
मग कधी जाताय? :P

राही's picture

6 May 2014 - 11:04 am | राही

सानिका-स्वप्निलशी जोरदार सहमत.

बोबो's picture

6 May 2014 - 5:05 am | बोबो

आवड्या :)

राही's picture

6 May 2014 - 11:08 am | राही

जोरदार लढवताय किल्ला. लढा तुम्ही. आम्ही आहोतच सपोर्ट द्यायला.
बाकी मुंबईसमोर पुणं एकदम मिळमिळीत वाटतं. म्हणूनच कदाचित पुणेकरांचा झणझणीत मिसळ हा (अभि)मानबिंदू असावा.

तुमचा अभिषेक's picture

6 May 2014 - 1:48 pm | तुमचा अभिषेक

बाकी मुंबईसमोर पुणं एकदम मिळमिळीत वाटतं.

मुंबई हे एक जागतिक दर्जाचे शहर आहे, त्याला सिद्ध करायला ईतर कुठल्या शहराला कमी लेखायची गरज नाही. मुंबई-पुणे हे भांडण फक्त मराठी लोकांमध्येच चालते, तसेच काही ठराविक निकष लाऊनच. अन्यथा मुंबईची तुलना इतर कुठल्याही शहराशी करणे चूकच.

तसेच मी पुण्याविरुद्ध किंवा पुणेकरांविरुद्ध किल्ला लढवत नसून जन्मापासून आजपर्यंत मुंबईकर म्हणून मुंबईच्या प्रेमापोटी लिहितोय.

असो, मी विचारात पडलोय की लेखकाच्या खालील वाक्यावर अजूनपर्यंत कुठल्याही पुणेकर महिलांनी आवाज कसा नाही उठवला ?

पुण्यातल्या भगिनी समाज हा मुंबई च्या तुलनेत खूपच मागासलेला आहे

यशोधरा's picture

7 May 2014 - 8:34 am | यशोधरा

असो, मी विचारात पडलोय की लेखकाच्या खालील वाक्यावर अजूनपर्यंत कुठल्याही पुणेकर महिलांनी आवाज कसा नाही उठवला ?

पुण्यातल्या भगिनी समाज हा मुंबई च्या तुलनेत खूपच मागासलेला आहे

अज्ञानी लेखकाशी वाद घालायला पुणेकर भगिनी आणि मैत्रीण वर्गाला इन्ट्रेष्ट नाय. थोडक्यात लेखकूंचा अनुल्लेख. पुणेरी ष्टायल. ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

7 May 2014 - 7:53 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>>लेखकूंचा अनुल्लेख. पुणेरी ष्टायल.
हाहाहाहाहा !!! नवीन विनोद ऎकून जाम मज्जा आली... अजुन एक सांगा ना..'

प्रसाद१९७१'s picture

6 May 2014 - 11:20 am | प्रसाद१९७१

खरे तर अगदीच बालिश लेख. असले लेख १९८० च्या आसपास विनोदी समजले गेले असते.

तुमचे निरिक्षण वाढवायची गरज आहे. सर्व च चुक आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

23 May 2014 - 1:50 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत. अन्यथा पुणेरी लोक झेंडे गाडायला कधीपासून लागले? पुण्याच्या राघोबांनी अटकेपार झेंडे फडकवले/लावले. गाडले नाही. कदाचित हिंदाळलेल्या मराठीत झेंडे गाडत असतील पण मराठीत झेंडा रोवतात्/फडकवतात/लावतात आणि मुडदे गाडतात (किंवा उकरतात).

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 May 2014 - 12:54 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मस्त रे चिन्मया. ७०च्या दश्कात गेल्यासारखे वाटले.
धकाधकीच्या जीवनातून वेळ मिळाला तर काजुवाडी,भाऊचा धक्का,आंबेवाडी,पणशीकर्,आयडियल बूक डेपो येथे जावून ये हो.
(माजी मुंबईकर्)माई

भाते's picture

6 May 2014 - 1:38 pm | भाते

आता तो पुण्याचा लेख लवकर येऊ द्या.
मुंबई-पुणे हा मिपावरचा ऑल टाइम फेवरेट विषय आहे. कितीही वेळा चघळला तरी मज्जा येते. :)

पुणे म्हणजे माधुरी दीक्षित ?
आणि मुंबई म्हणजे ओम पुरी ?

णिषेध ! णिषेध ! णिषेध !

मुंबई हे एक जागतिक दर्जाचे शहर आहे, त्याला सिद्ध करायला ईतर कुठल्या शहराला कमी लेखायची गरज नाही. मुंबई-पुणे हे भांडण फक्त मराठी लोकांमध्येच चालते, तसेच काही ठराविक निकष लाऊनच. अन्यथा मुंबईची तुलना इतर कुठल्याही शहराशी करणे चूकच.

आंतरराष्ट्रीय म्हणायचे आणि चढाओढ मात्र लावताना मात्र एतद्देशीय शहरांशी ....

मुंबईने खरे तर न्यूयॉर्क, लंडन अशा शहरांशी स्पर्धा करावी.. असे माझे एक पुणेकर म्हणून मत आहे

>>आंतरराष्ट्रीय म्हणायचे आणि चढाओढ मात्र लावताना मात्र एतद्देशीय शहरांशी ....

मुंबईने खरे तर न्यूयॉर्क, लंडन अशा शहरांशी स्पर्धा करावी.

जे ब्बात !!

तुमचा अभिषेक's picture

6 May 2014 - 7:14 pm | तुमचा अभिषेक

आंतरराष्ट्रीय म्हणायचे आणि चढाओढ मात्र लावताना मात्र एतद्देशीय शहरांशी .... मुंबईने खरे तर न्यूयॉर्क, लंडन अशा शहरांशी स्पर्धा करावी.. असे माझे एक पुणेकर म्हणून मत आहे

एक्झॅक्टली !

म्हणूनच मी कुठेही माझ्या पोस्टमध्ये अमुकतमुक मुंबईमध्ये एखाद्या शहरापेक्षा चांगले आहे अशी तुलना करत नाहीये.
अन्यथा एखाद्या शहरात मुंबईपेक्षा मिसळ छान मिळत असेल म्हणून तेथील रहिवाशी त्यावरून स्वताला मुंबईपेक्षा भारी समजायला लागले तर त्यांना उत्तर देण्यात काय शहाणपणा आहे सांगा.

त.टी. - वरचे फक्त उदाहरण आहे, अन्यथा लहानपणी नाक्यावरच्या सदूशेटच्या द्कानात जी खाल्ली ती मिसळ जगात आणखी कुठे मिळत नसावी. फक्त एकच पंगा होता, सोबतीला स्लाईस ब्रेड द्यायचा, म्हणोन पाव आम्ही बेकरीतून मागवायचो, बाकी आमच्या माझगाव-भायखळा परिसरासारख्या बेकर्‍याही जगाच्या पाठीवर कुठे नसाव्यात पण उगाच विषय भरकटवायला नको :)

चिन्मय खंडागळे's picture

6 May 2014 - 4:56 pm | चिन्मय खंडागळे

मुंबई-पुणे हे भांडण फक्त मराठी लोकांमध्येच चालते

कायच्याकाय! असं काही 'भांडण'च अस्तित्वात नाही. असलंच तर मुळामुठेच्या काठावरच्या एकदोन पेठांमध्ये राहणार्‍या लोकांच्या 'मनात' असेल. टिपीकल मुंबईकराला कर्जतच्या पलिकडे माणसं राहतात की नुसतीच जंगलं आहेत याचीसुद्धा माहिती (आणि पर्वा) नसते!
मुंबई-पुणे असं काही भांडण आहे म्हणणे म्हणजे एखाद्या राजमहालातल्या बटकीने राणीसाहेबांबद्दल 'तिची नि माझी ना खूप स्पर्धा असते' असं राणीच्या ओढण्या वाळत घालताघालता महालातल्या एखाद्या खोज्याला सांगण्यासारखं आहे. *lol*

तुम्ही जाज्ज्वल्य हुंबैकर काय? ;)

पिलीयन रायडर's picture

6 May 2014 - 5:41 pm | पिलीयन रायडर

मुंबईला कुणी एक भिकार म्हणलं तर आपण सात भिकार म्हणुन मोकळं व्हावं असं मुंबैकरांबद्दल पुलंनीच लिहुन ठेवलय ना!! इथे तर मुंबैकर फारच हळवे झालेत!!

थॉर माणूस's picture

6 May 2014 - 6:07 pm | थॉर माणूस

खरं आहे...
पुर्वीची मुंबई राहीली नाही आता... :D

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 May 2014 - 7:11 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मुंबईकर हळवा झाला होता- ६४ साली ट्राम बंद झाल्या तेव्हा. नंतर जुन्या दुमजली बसेस बंद झाल्या तेव्हा एकदा परत.
(भावूक्)माई

तुमचा अभिषेक's picture

6 May 2014 - 7:22 pm | तुमचा अभिषेक

नंतर जुन्या दुमजली बसेस बंद झाल्या तेव्हा एकदा परत.

ट्रामचे मला माहीत नाही, पण त्या दुमजली बसेसच्या वरच्या मजल्यावरच्या, पहिल्या सीटवर बसून समोरच्या सताड उघड्या खिडकीतून र्रप्पारप्प येणारा वारा अंगावर झेलायचा.. स्साली एस्सेलवर्ल्डची राईड झक मारेल .. शाळेचा गणवेष, संध्याकाळी आऊट शर्ट, कॉलर वर, वाढलेले केस, त्या सुसाट वार्‍यांवर उडायला लागले की स्टाईलमध्ये त्यांतून हात फिरवायचा.. बरेचदा खिडकीच्या बाहेर डोके काढायचा वा चक्क त्या खिडकीवर बसायचा मोह व्हायचा मग कंडक्टर मामांच्या शिव्या खायच्या.. हळवे तर ही पोस्ट टाईपताना पण व्हायला होतेय.. ज्यांनी हि मजा घेतली त्यांनाच मुंबई कळली ..

एकदम मान्य. कुलाब्याला असताना शास्त्री हॉल(ग्रांट रोड) मध्ये राहणाऱ्या मावशीकडे जायला १२३ क्रमांकाची बस पकडून जात असे( दुचाकि असुनही ) ते केवळ दुमजली बसच्या वरच्या मजल्यावर ड्रायव्हर च्या वरच्या सीट वर बसून हवा खायला. हि बस आर सी चर्च ते ताडदेव अशी चर्चगेट स्टेशन मार्गे मरीन ड्राईव्ह वरून जाते आणि चौपाटीला परत आत वळते. अनेकदा जाऊनही मनाचे समाधान झालेले नाही. उन्हाळा पावसाला हिवाळा प्रत्येक ऋतू मध्ये हा अनुभव अविस्मरणीय आणि आगळा असे. आजही ती बस आहे पण आता दुमजली नाही.(how green was my valley)

तुमचा अभिषेक's picture

7 May 2014 - 12:16 am | तुमचा अभिषेक

अहाहा, मरीनड्राईव्ह मार्गे म्हणजे तर क्या बात ..
माझा रोजचा प्रवास तिने दादर ते भायखळा असायचा. हायवेवरूनही तिने सुसाट जाण्यात मजा असायची.
डबल डेकर बसच्या खालच्या मजल्यावर बसणारे तर मला अरसिक आणि बोरींग लोक वाटायचे.
कधी वरचा मजला भरला तर तेथील कंडक्टर खाली जिन्यात येऊन रस्ता अडवायचा.. का, तर वर लोड येऊ नये. मग तिथेच उभे राहा जोपर्यंत वरतून उतरणारा कोणी खाली येत नाही, पण खाली कधी नाही बसलो ;)

सुनील's picture

7 May 2014 - 8:26 am | सुनील

अंधेरीहून फोर्टात जायला दोन मार्ग होते - वरळी, पेडर रोडसारख्या पॉश लोकवस्तीतून जाणारा एकमजली बसचा ८४ मर्यादित आणि भेंडीबाजारातून जाणारा दुमजली बसचा ४ मर्यादित (दोहोंपैकी कुठल्याशा एका मार्गाचा उल्लेख वडील O2 एक्स्प्रेस असा करीत. बहुधा ते जुने नाव असावे)

चांगला दीडएक तास लागे. पण आमची पसंती पॉश भागातून जाणार्‍या ८४ पेक्षा भेंडीबाजारातून जाणार्‍या ४ ला. वरची "पायलट सीट" मिळण्यासाठी एखादी बस सोडून द्यावी लागली तरी हरकत नसायची!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 May 2014 - 4:27 pm | निनाद मुक्काम प...

८४ बस
जुनी आठवण
आमच्या कुर्ल्यावरून पूर्व सुटते,

व कुर्ला वेस्ट मधून माहीम ला वळसा घालून अजून एक बस चर्चगेट ला जाते.
भारतभेटीत आलो की कधीतरी पहाटे ह्यापैकी पहिली बस पकडून मुंबई फिरत फिरत जाण्याचे सुख नाही.
प्रत्येक स्टोप तेथील आजुबाच्याचा परिसराकडे पाहून कॉलेज चे दिवस , जुन्या आठवणी आठवतात..
@ अभी
येथे मूवी ह्यांनी आधीच सांगितले त्याप्रमाणे मुंबई क्रमक्रमाने विकसित होत गेली व म्हणूनच टप्या टप्याने तिच्यात नवीन शहरे सामावली केली. मुंबई ची उपनगरात पत्र परदेशातून पाठवायचे झाले तर शेवटी पत्यात मुंबई असा उल्लेख होतो.
मुंबई मध्ये प्रवेश करण्यासाठी टोल हा मुलुंड व ठाण्याच्या हद्दीत हरीहोम नगर च्या नाक्यावर भरावा लागतो ह्यापुढे तो लागत नाही तेव्हा मुंबई ची उपनगरे ही मुंबईच मानली जाते.
जगामध्ये लंडन असो किंवा आणि इतर मोठी शहरे तेथे वास्तव्य केले म्हणून सांगू शकतो ह्या शहराची उपनगरे ह्या शहरांची खरी शान आहे,
बाय द वे मुंबईकरांच्या मध्ये सुद्धा चातुर्वर्ण्या सिस्टीम
अनुक्रमे , वेस्टन ,सेन्ट्रल व हार्बर अशी आहे.
मुंबई व उपनगरे असा पोटभेद निवडणूक आयोगाने न करता मुंबई ला दक्षिण , ईशान्य अश्या दिश्यांच्या मध्ये विभागले आहे.
बाय द वे आमचे कुर्ला खरे तर मुंबई चा खर्या अर्थाने मध्यवर्ती भाग आहे.
वेस्टन , सेन्ट्रल व हार्बर ला सार्वजनिक वाहतुकीने थेट जोडणारा दुवा म्हणजे कुर्ला.

बाकी जन्माने डोंबिवलीकर असल्याने कल्याण संबधी एवढे निरीक्षण नोंदवू इच्छितो की
कल्याण इतिहासात अजूनही रमले आहे.
अस्सल डोंबिवलीकर हा मनाने पुणेकर व कर्माने मुंबईकर असतो

वाक्य मिपावर पूर्व प्रकाशित , निमुपोज म्हणून मूवी म्हणतात त्यात थोडी भर घालून
पुणे व मुंबई ला सांस्कृतिक , आर्थिक सामाजिक दृष्ट्या जोडणारा दुवा म्हणजे डोंबिवली.
परंपरा जोपासत आधुनिकतेची कास धरणारे डोंबिवली.
काही उत्साही पुणेकरांच्या सारखे आपण मुंबईत राहतो किंवा नोकरी संबंधी तेथे आपले पाय लागले असे लेख काढून सांगणारा डोंबिवलीकर नव्हे.
त्याच्यासाठी मुंबई ही कर्मभूमी आहे.
मात्र अस्सल डोंबिवलीकर हा आम्ही मुंबईत राहतो असे कधीच सांगत नाही ते सांगणारे नवे डोंबिवलीकर.

डोंबिवली व मुंबईकर वर्तमानकाळात जगतात.

ह्या ब्रीदाला जागून माझ्यापुरते सांगायचे झाले तर,

मी आहे आहे म्युनिकर .
निनाद , मुक्काम पोस्ट जर्मनी
वाक्य मिपावर पूर्व प्रकाशित , निमुपोज

आयला,

नेमके, हेच वाक्य मला अपेक्षित होते.

आता तुम्ही वादावर जवळजवळ पडदा टाकलाच आहे.

तरीपण, आमच्या डोंबिवलीबाबतीतील २ महत्वाच्या गोष्टी.

१. नुतन वर्ष मिरवणूक , पहिल्यांदा डोंबिवलीतूनच निघाली

२. लंडन मधील हाईड पार्कच्या धरतीवर , भारतातील पहिले मुक्त व्यासपीठ, डोंबिवलीतील रोटरी क्लबला सुरु झाले.

असो,

एकूण काय तर सध्या तरी , आर्थिक्,सामाजीक आणि व्यावहारीक बाबतीत डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण.

मुवि, अहो मध्ये तुम्ही गल्फला मध्यवर्ती म्हणाला होतात ना ;) की तिकडेही केली "गल्फिवली" =))

>>१. नुतन वर्ष मिरवणूक , पहिल्यांदा डोंबिवलीतूनच निघाली

ह्याला पुरावा काय? चैत्र प्रतिपदेच्या मिरवणूका तशा बदलापूरातही होतात म्हटलं.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 May 2014 - 2:07 pm | निनाद मुक्काम प...

महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त अनिवासी बहुदा डोंबिवली मधून असावेत.

>>महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त अनिवासी बहुदा डोंबिवली मधून असावेत.

बरं मग??

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 May 2014 - 7:29 am | निनाद मुक्काम प...

डोंबिवली ही विद्येची नगरी आहे असे अप्रत्यक्ष अधोरेखित केले ,इतकेच

निनाद, उद्या जर्मनीला युरोपचे पॅरीस म्हणशील! *lol*

प्यारे१'s picture

10 May 2014 - 1:15 pm | प्यारे१

पुणेकरांची विनोद करण्याची लेव्हल फारच घसरलेली दिसते.

किमान शहराशी शहर एवढी तरी जोडी जमवा! उगा काहीतरी टोकं जुळवायची आणि आडवं होऊन हॉ हॉ हॉ!

निनाद, तू आयडी बदलली का? का? *boredom*

प्यारे१'s picture

10 May 2014 - 2:42 pm | प्यारे१

अरारारा!
तुम्ही मिपावरच्या 'ज्येष्ठ सदस्या' ना? (इतर भूमिकांचा विचार न करता सदस्या म्हणूनच प्रतिसाद देत आहात असं गृहीत धरुन. )

आपल्या प्रतिसादाचा टोन असा आहे की प्रतिसाद फक्त निनाद साठी आहे. तसंच असेल तर इतर ठिकाणचं आपलं प्रतिसाद देणं काय भूमिकेतून असतं हे कळेल काय?

स्मायल्या पहा, गंमतीत धागा चालला आहे ना? माझी तरी तीच समजूत आहे.

प्यारे१'s picture

10 May 2014 - 5:37 pm | प्यारे१

धागा गमतीत आहे काय? बरेच प्रतिसाद तसे वाटत नाहीत. :)
बाकी समजुतीची समजूत काय कधीही घालता नि वळवता येतेच की. ;)

यशोधरा's picture

10 May 2014 - 5:43 pm | यशोधरा

बरोबर, आपापली समजूत :)

निनाद's picture

15 May 2014 - 7:46 am | निनाद

आं?
नाही! माझा बिल्ला नंबर आणि नावही तेच आहे!
का?
(की हे निनादमुपोजर्मनीला उद्देशून होते?)

यशोधरा's picture

15 May 2014 - 7:51 am | यशोधरा

:)

>>डोंबिवली ही विद्येची नगरी आहे असे अप्रत्यक्ष अधोरेखित केले ,इतकेच

ते ठीकाय, पण डोंबोलीतले लोक त्यांच्या विद्येचा उपयोग त्यांच्या सो कॉल्ड मध्यवर्ती शहराचा विकास करण्यासाठी करु शकत नाहीत याचा खरंतर खेद वाटायला हवा तुम्हाला. परदेशी स्थायिक होणं हेच एक उच्चविद्याविभूषित असल्याचं लक्षण मानत असाल तर मग काय बोलणार!! असो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 May 2014 - 2:04 am | निनाद मुक्काम प...

हेच एक
हेच एक असे नाही.
पण एक अनेक निकषांच्या पैकी एक निकष आहे. असे मला वाटते.
@
यशो
मला उद्देशून काही गमतीत लिहिले आहे ते माझ्या डोक्यावरून गेले त्यामुळे प्रतिवाद तोही गमतीत घालता आला नाही.

यशोधरा's picture

14 May 2014 - 6:27 am | यशोधरा

व्य नि बघ. :)

व्वा! काय आठवण आणुन दिलि यार. १००% खरे. त्या सीट साठी बस स्टॉपला थांबण्या अगोदर उडि मारुन चढावे लागायचे.

स्वलेकर's picture

8 May 2014 - 6:50 pm | स्वलेकर

व्वा! काय आठवण आणुन दिलि मित्रा. १००% खरे. त्या सीट साठी बस स्टॉपला थांबण्या अगोदर उडि मारुन चढावे लागायचे.

चिन्म्या मर्दा, एवडं चांगलं लिवतैस, कायतर वेगळ्या विषयावर लिव की. काय तेच तेच पुणे-मुंबै, पुणे-मुंबै? आँ??

(शिप्पूरच्या डोंगरावरचा)

बॅटमॅन's picture

7 May 2014 - 10:20 am | बॅटमॅन

नै तं काय! पुणे अन मुंबै सोडून उरलेल्या म्हाराष्ट्राकडं बग म्हणा जरा.

आदिजोशी's picture

7 May 2014 - 3:53 pm | आदिजोशी

मुंबई आणि थोडं फार पुणे सोडलं तर उर्वरीत महराष्ट्रात बघण्यासारखं आहेच काय?

अगदी हेच म्हणायला आलो होतो.

यसवायजी's picture

7 May 2014 - 6:27 pm | यसवायजी

मुंबै म्हाराष्ट्रात हाय काय? *mosking*

बघण्यासारखी बहुतेक स्थळे या दोन्ही शहरांच्या बाहेर आहेत, इतकेच सांगतो. प्रश्न त्यामुळे फेल गेलेला आहे.

व्हाईट कॉलर नोक्र्यांचे जास्त प्रमाण ही एक बाजू सोडल्यास दोन्हींकडे वेगळे आहे तरी काय, असा माझा उलट सवाल आहे.

टीचभर मुंबै अन चिमूटभर पुणं सोडून अख्खा महाराष्ट्र उरलेला आहे तिकडे कधीतरी बघावे. असो.