✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मुंबई - पुणे - मुंबई

च
चिन्मय श्री जोशी यांनी
Mon, 05/05/2014 - 17:05  ·  लेख
लेख
मित्र मंडळी हो, आज मी तुम्हाला एक ष्टोरी सांगणार आहे. अनुभवकथन का काय म्हणतात तसलीच थोडीशी . टायटलवर जाऊ नका . त्या सिनेमाशी (आणि मुक्त बर्वेशी ) माझ्या ब्लॉगचा (आणि माझा सुद्धा) काहीही संबंध नाही . तरी स्टोरी म्हणलं कि काहीतरी भारी असणारच कि नाही ?? तसं बघायला गेल तर आपण सगळे (भारतीय लोक ) स्टोऱ्या ऐकण्यात आणि सांगण्यात इतके पटाईत असतो, कि विचारता सोय नाही. आणि मी सुद्धा त्यातलाच एक.. तर नमनाचे तेल संपवून आपण त्या स्टोरी कडे वळू . मित्रहो हि ष्टोरी आहे मी आणि मुंबई नावाच्या शहरातल्या माझ्या अनुभवांची .. तसं बघायचं तर मुंबईमध्ये माझा मामा राहतो आणि फिरायला म्हणून मुंबईला बरेच वेळा जायचा योग आला . पण ते म्हणजे तुळशीबागेतली खरेदी २ मिनिटात आटोपती घेण्यासारखंच होतं . तर मला मुंबई ला जायचा प्रसंग आला कारण आम्ही चार टाळकी (पक्षी : घोडे, उडाणटप्पू इ.) पदवीधर झालो . आमचा नम्बर Accenture नावाच्या एका IT कंपनी मध्ये campus selection मध्ये लागला (हल्ली campus selection ला वधू परीक्षे इतकेच महत्व आले आहे ). आमच्या मागच्या ७ पिढ्या स्वर्गात धाडल्याचे पुण्य आमच्या गाठी (स्त्रियांनी पदरी असे वाचण्यास हरकत नाही) बांधले गेले. आणि तीर्थरूपांनी आम्हाला (दुर्मिळ अशा) कृतज्ञ नजरेने बघितले .. तर या कंपनी ने आम्हास आमचे मूळ स्थान (पक्षी: कर्मभूमी ) पुण्यनगरीचा निरोप घेऊन मुंबा नगरीत आमच्या कर्तुत्वाचे झेंडे गाडण्यास पाचारण केले .. (वरील वाक्य हे शिवकालीन बखरीच्या भाषाप्रभावाखाली लिहिले आहे - इति इतिहासकार बुडकुळे ) खर तर मी जन्माचा, हाडाचा आणि जिभेचा पुणेकर आहे (पुणेरी लोक पंचेन्द्रीयांमध्ये सर्वाधिक वापर जिभेचा करतात आणि सर्वात कमी कानाचा हे मी affidevit वर लिहून द्यायला तयार आहे - टीप: स्टैम्प पेपर चा खर्च वगळून) . पुणे आणि मुंबई या दोन शहरांमध्ये माधुरी दीक्षित आणि ओमपुरीच्या सौंदर्याइतकंच साम्य आहे . त्यामुळे मला हवं तर मद्रासला पाठवा पण मुंबई ला नको असा माझा आग्रह. गरज पडलीच तर वेळ प्रसंगी धोतर लुंगी सारखे गुंडाळायची मी मनाची तयारी केली होती .. पण तिकडे लेहमन ब्रदर्स नि माती (खरं तर पैसे) खाल्ली आणि रिसेशनच्या भीतीने आम्ही मुंबानगरीस जाण्यास तयार झालो . (एक शंका - आपल्या इथल्या पतसंस्थांपासून प्रेरणा घेऊनच लेहमन ब्रदर्स चा घोटाळा झाला असेल का ?? कोणीतरी PHD ला घ्यायला विषय बराय) मुंबई नगरी मध्ये अस्मादिकांनी नोकरीच्या निमिताने पाउल ठेवले आणि IT नावाच्या एका जादुई नगरीशी परिचय झाला . MNC मध्ये असल्या मुळे आमची सुरवातीच्या दिवसात चांगलीच बडदास्त ठेवली होती . राहायला AC रूम आणि जायला रिक्षा असल्याने लोकल नावाच्या अवघड पेपरशी अजून सामना झालाच नव्हता . पुण्यात अभावानेच दिसणार मुला-मुलींमधल मोकळं वातावरण . सदैव घाई गडबड आणि पळापळ . हे सगळ वेगळच वाटत होतं . सुरुवातीचे नवलाईचे दिवस संपले आणि हळू हळू या शहराच्या वैशिष्ट्यांची जाणीव होऊ लागली. त्यातलीच काही (पुणेरी) निरीक्षणे पुढीलप्रमाणे . १. पुण्यातल्या भगिनी समाज हा मुंबई च्या तुलनेत खूपच मागासलेला आहे (चाणाक्ष पुणेकरांनी नोंद केली असेलच कि मुंबई साठी भगिनी हा शब्द वगळण्यात आला आहे ) मुंबईमध्ये समस्त महिला मंडळ पुरुषांना लाजवेल (शब्दशः अर्थ घेणे ) अशा प्रकारे कर्तुत्व (??) गाजवून दाखवीत असते . २. पुण्यातील रिक्षामध्ये मीटर नावाची शोभेची वस्तू असते . परंतु मुंबई मध्ये वेळ हि गोष्ट चितळ्यांच्या बाकरवडी इतकीच प्रत्येकाला प्रिय असल्या मुळे; मीटर चा उपयोग मुंबई मध्ये रिक्षातून उतरल्यावर( वाद घालण्याचा) वेळ वाचावा म्हणून भाडे ठरवण्यासाठी करतात .. ३. मुंबईकर अत्यंत उधळपट्टी करणारे असून रात्री ११ वाजे पर्यंत दुकाने, सिग्नल इ. गोष्टी चालू ठेऊन विजेचा प्रचंड अपव्यय करतात . यावर सगळ्या मुंबई मध्ये सुद्धा महाराष्ट्राप्रमाणेच लोड शेडींग चालू करावे असे पत्र मंत्रालयात पाठवायचा क्रांतिकारी विचार स्फुरला होता, परंतु आमच्या बिल्डींग चे ९ व मंत्रालयाचे १० असे १९ मजले विजेशिवाय चढाई करायच्या कल्पनेनी तो बेत रहित झाला . असो. ४. पानिपतच्या लढाई मध्ये लढायला गेलेले सगळे सैनिक एकाच विरार फास्ट लोकल मध्ये सामान, घोडे इ. सहित मावू शकले असते . परंतु त्या काळी पेशवाई मध्ये हत्ती पॉप्युलर असल्याने मराठ्यांचा पराभव झाला . असो . ५. पूर्वीच्या काळी ज्या लोकांनी तप करून क्रोध जिंकून घेतला होता त्यांचे वंशज हल्ली मुंबई मध्ये दुकान चालवतात . त्यामुळे पुणेकरांना, मुंबईमध्ये खरेदी करताना "खेकसणे" या खरेदीच्या अविभाज्य आणि मनोरंजनात्मक अंगाला मुकावे लागते .. . (याला पुण्यातील मॉल सुद्धा अपवाद नाहीत) ६. पुण्यातील दुचाकीस्वाराच्या अंगी जन्मजात असणारे गुण (जसे अष्टावधान, multi-tasking व चपळता ) हे मुंबईकरांकडे नसल्याने ते बहुधा वाहतुकीचे नियम पाळतात किंवा सरळ "बेस्ट/लोकल "सारख्या पर्यायांचा वापर करतात . ७. मुंबई च्या प्रदूषित व खाऱ्या हवेचा मराठी भाषिकांना मानसिक त्रास होतो व ते घराबाहेर पडले कि मराठी विसरून (तोडकं-मोडकं ) हिंदी बोलू लागतात .. परंतु असे कोणी जाहीर बोलून दाखवल्यास त्यांना राग येतो व तो राग शमवण्यासाठी ते थेट शिववडा ष्टॉल वर किंवा झुणका भाकर केंद्रावर जातात आणि आपण मराठी असल्याचे सिद्ध करून दाखवतात .. ८. मुंबईच्या लोकल मध्ये समस्त महिलावर्ग सर्व घरगुती कामे (आंघोळ व १/२ नंबर सोडून) मोठ्या उत्साहाने सामुदायिक रित्या पार पाडतो . ९. मुंबई मध्ये उकाडा खूप असल्याने तेथे कपड्यांचा वापर (खर तर आकार) कमी असणे हि अगदी सामान्य गोष्ट आहे . (सुज्ञ वाचकांना अधिक सांगणे न लगे ). असे असले तरी सुद्धा मुंबईकरांना स्वेटरची खूप हौस आहे व ते दिवाळीच्या शॉपिंग मध्ये स्वेटर खरेदी करून थंडी आली अशी स्वताची समजूत घालून घेतात. (हे म्हणजे अमेरिकेत बिन ढोल ताशांचा गणेशोत्सव साजरा करण्यासारखेच आहे . असू दे, असते एका एका शहराची मजबुरी) १०. बस, रिक्षा किंवा लोकलचा संप असेल तेव्हा मुंबईकर शक्यतो सुट्टी टाकून संपाला नैतिक पाठींबा देतात. (पुणेकर मुळात स्वावलंबी असल्याने पुण्यात संप नसताना आणि असताना विशेष फरक जाणवत नाही .) ११. मुंबईचा पाउस आणि पुण्याची PMT हे ब्रम्हदेवाने एकाच वेळी जन्माला घातले असावेत . ( इतके बेभरवशी प्रकार जगात शोधून सापडणार नाहीत .) १२. सर्वसामान्य मुंबईकर एका वर्षाच्या लोकल पास वर पृथ्वी प्रदक्षिणे इतके अंतर प्रवास करून त्याची किंमत पुरती वसूल करतो . व वाचवलेल्या पैशातून चौपाटी वर भेळपुरी खाउन celebration करतो. असो . जास्त लांबड न लावता माझे मुंबईपुराण इथेच थांबवतो . . ३ वर्षांच्या माझ्या अनुभवातून दिसलेली मुंबई इथे सांगायचा प्रयत्न केला आहे . मुंबईकरांना त्यांच्या शहराविषयी विशेष अभिमान नसल्याने मी हा लेख प्रसिद्ध करू शकलो . (असलाच अभिमान एखाद्याला, तरी माझ्याशी वाद घालायला वेळ मात्र नक्की नसेल अशी माझी खात्री आहे ) टीप: पुण्या साठी सुद्धा लेख लिहून तयार आहे .. पण सुरक्षिततेच्या कारणामुळे मी पुण्यापासून किमान हजार मैल लांब गेल्याशिवाय तो प्रसिद्ध करू इच्छित नाही .. सुज्ञ वाचकांनी मला माफ करावे हि विनंती .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रवास

प्रतिक्रिया द्या
33147 वाचन

💬 प्रतिसाद (193)

प्रतिक्रिया

मुंबई हे एक जागतिक दर्जाचे

एम.जी.
Tue, 05/06/2014 - 15:50 नवीन
मुंबई हे एक जागतिक दर्जाचे शहर आहे, त्याला सिद्ध करायला ईतर कुठल्या शहराला कमी लेखायची गरज नाही. मुंबई-पुणे हे भांडण फक्त मराठी लोकांमध्येच चालते, तसेच काही ठराविक निकष लाऊनच. अन्यथा मुंबईची तुलना इतर कुठल्याही शहराशी करणे चूकच. आंतरराष्ट्रीय म्हणायचे आणि चढाओढ मात्र लावताना मात्र एतद्देशीय शहरांशी .... मुंबईने खरे तर न्यूयॉर्क, लंडन अशा शहरांशी स्पर्धा करावी.. असे माझे एक पुणेकर म्हणून मत आहे
  • Log in or register to post comments

>>आंतरराष्ट्रीय म्हणायचे आणि

सूड
Tue, 05/06/2014 - 16:19 नवीन
>>आंतरराष्ट्रीय म्हणायचे आणि चढाओढ मात्र लावताना मात्र एतद्देशीय शहरांशी .... मुंबईने खरे तर न्यूयॉर्क, लंडन अशा शहरांशी स्पर्धा करावी. जे ब्बात !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एम.जी.

+७८६

तुमचा अभिषेक
Tue, 05/06/2014 - 19:14 नवीन
आंतरराष्ट्रीय म्हणायचे आणि चढाओढ मात्र लावताना मात्र एतद्देशीय शहरांशी .... मुंबईने खरे तर न्यूयॉर्क, लंडन अशा शहरांशी स्पर्धा करावी.. असे माझे एक पुणेकर म्हणून मत आहे एक्झॅक्टली ! म्हणूनच मी कुठेही माझ्या पोस्टमध्ये अमुकतमुक मुंबईमध्ये एखाद्या शहरापेक्षा चांगले आहे अशी तुलना करत नाहीये. अन्यथा एखाद्या शहरात मुंबईपेक्षा मिसळ छान मिळत असेल म्हणून तेथील रहिवाशी त्यावरून स्वताला मुंबईपेक्षा भारी समजायला लागले तर त्यांना उत्तर देण्यात काय शहाणपणा आहे सांगा. त.टी. - वरचे फक्त उदाहरण आहे, अन्यथा लहानपणी नाक्यावरच्या सदूशेटच्या द्कानात जी खाल्ली ती मिसळ जगात आणखी कुठे मिळत नसावी. फक्त एकच पंगा होता, सोबतीला स्लाईस ब्रेड द्यायचा, म्हणोन पाव आम्ही बेकरीतून मागवायचो, बाकी आमच्या माझगाव-भायखळा परिसरासारख्या बेकर्‍याही जगाच्या पाठीवर कुठे नसाव्यात पण उगाच विषय भरकटवायला नको :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एम.जी.

मुंबई-पुणे हे भांडण फक्त

चिन्मय खंडागळे
Tue, 05/06/2014 - 16:56 नवीन
मुंबई-पुणे हे भांडण फक्त मराठी लोकांमध्येच चालते
कायच्याकाय! असं काही 'भांडण'च अस्तित्वात नाही. असलंच तर मुळामुठेच्या काठावरच्या एकदोन पेठांमध्ये राहणार्‍या लोकांच्या 'मनात' असेल. टिपीकल मुंबईकराला कर्जतच्या पलिकडे माणसं राहतात की नुसतीच जंगलं आहेत याचीसुद्धा माहिती (आणि पर्वा) नसते! मुंबई-पुणे असं काही भांडण आहे म्हणणे म्हणजे एखाद्या राजमहालातल्या बटकीने राणीसाहेबांबद्दल 'तिची नि माझी ना खूप स्पर्धा असते' असं राणीच्या ओढण्या वाळत घालताघालता महालातल्या एखाद्या खोज्याला सांगण्यासारखं आहे. *lol*
  • Log in or register to post comments

तुम्ही जाज्ज्वल्य हुंबैकर काय

प्यारे१
Tue, 05/06/2014 - 19:00 नवीन
तुम्ही जाज्ज्वल्य हुंबैकर काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे

मुंबईला कुणी एक भिकार म्हणलं

पिलीयन रायडर
Tue, 05/06/2014 - 17:41 नवीन
मुंबईला कुणी एक भिकार म्हणलं तर आपण सात भिकार म्हणुन मोकळं व्हावं असं मुंबैकरांबद्दल पुलंनीच लिहुन ठेवलय ना!! इथे तर मुंबैकर फारच हळवे झालेत!!
  • Log in or register to post comments

खरं आहे...

थॉर माणूस
Tue, 05/06/2014 - 18:07 नवीन
खरं आहे... पुर्वीची मुंबई राहीली नाही आता... :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

खर आहे

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 05/06/2014 - 19:11 नवीन
मुंबईकर हळवा झाला होता- ६४ साली ट्राम बंद झाल्या तेव्हा. नंतर जुन्या दुमजली बसेस बंद झाल्या तेव्हा एकदा परत. (भावूक्)माई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

खरंय खरय,

तुमचा अभिषेक
Tue, 05/06/2014 - 19:22 नवीन
नंतर जुन्या दुमजली बसेस बंद झाल्या तेव्हा एकदा परत. ट्रामचे मला माहीत नाही, पण त्या दुमजली बसेसच्या वरच्या मजल्यावरच्या, पहिल्या सीटवर बसून समोरच्या सताड उघड्या खिडकीतून र्रप्पारप्प येणारा वारा अंगावर झेलायचा.. स्साली एस्सेलवर्ल्डची राईड झक मारेल .. शाळेचा गणवेष, संध्याकाळी आऊट शर्ट, कॉलर वर, वाढलेले केस, त्या सुसाट वार्‍यांवर उडायला लागले की स्टाईलमध्ये त्यांतून हात फिरवायचा.. बरेचदा खिडकीच्या बाहेर डोके काढायचा वा चक्क त्या खिडकीवर बसायचा मोह व्हायचा मग कंडक्टर मामांच्या शिव्या खायच्या.. हळवे तर ही पोस्ट टाईपताना पण व्हायला होतेय.. ज्यांनी हि मजा घेतली त्यांनाच मुंबई कळली ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

एकदम मान्य. कुलाब्याला असताना

सुबोध खरे
Tue, 05/06/2014 - 19:36 नवीन
एकदम मान्य. कुलाब्याला असताना शास्त्री हॉल(ग्रांट रोड) मध्ये राहणाऱ्या मावशीकडे जायला १२३ क्रमांकाची बस पकडून जात असे( दुचाकि असुनही ) ते केवळ दुमजली बसच्या वरच्या मजल्यावर ड्रायव्हर च्या वरच्या सीट वर बसून हवा खायला. हि बस आर सी चर्च ते ताडदेव अशी चर्चगेट स्टेशन मार्गे मरीन ड्राईव्ह वरून जाते आणि चौपाटीला परत आत वळते. अनेकदा जाऊनही मनाचे समाधान झालेले नाही. उन्हाळा पावसाला हिवाळा प्रत्येक ऋतू मध्ये हा अनुभव अविस्मरणीय आणि आगळा असे. आजही ती बस आहे पण आता दुमजली नाही.(how green was my valley)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

अहाहा, मरीनड्राईव्ह मार्गे

तुमचा अभिषेक
Wed, 05/07/2014 - 00:16 नवीन
अहाहा, मरीनड्राईव्ह मार्गे म्हणजे तर क्या बात .. माझा रोजचा प्रवास तिने दादर ते भायखळा असायचा. हायवेवरूनही तिने सुसाट जाण्यात मजा असायची. डबल डेकर बसच्या खालच्या मजल्यावर बसणारे तर मला अरसिक आणि बोरींग लोक वाटायचे. कधी वरचा मजला भरला तर तेथील कंडक्टर खाली जिन्यात येऊन रस्ता अडवायचा.. का, तर वर लोड येऊ नये. मग तिथेच उभे राहा जोपर्यंत वरतून उतरणारा कोणी खाली येत नाही, पण खाली कधी नाही बसलो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

डबल डेकर

सुनील
Wed, 05/07/2014 - 08:26 नवीन
अंधेरीहून फोर्टात जायला दोन मार्ग होते - वरळी, पेडर रोडसारख्या पॉश लोकवस्तीतून जाणारा एकमजली बसचा ८४ मर्यादित आणि भेंडीबाजारातून जाणारा दुमजली बसचा ४ मर्यादित (दोहोंपैकी कुठल्याशा एका मार्गाचा उल्लेख वडील O2 एक्स्प्रेस असा करीत. बहुधा ते जुने नाव असावे) चांगला दीडएक तास लागे. पण आमची पसंती पॉश भागातून जाणार्‍या ८४ पेक्षा भेंडीबाजारातून जाणार्‍या ४ ला. वरची "पायलट सीट" मिळण्यासाठी एखादी बस सोडून द्यावी लागली तरी हरकत नसायची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

८४ बस

निनाद मुक्काम …
Wed, 05/07/2014 - 16:27 नवीन
८४ बस जुनी आठवण आमच्या कुर्ल्यावरून पूर्व सुटते, व कुर्ला वेस्ट मधून माहीम ला वळसा घालून अजून एक बस चर्चगेट ला जाते. भारतभेटीत आलो की कधीतरी पहाटे ह्यापैकी पहिली बस पकडून मुंबई फिरत फिरत जाण्याचे सुख नाही. प्रत्येक स्टोप तेथील आजुबाच्याचा परिसराकडे पाहून कॉलेज चे दिवस , जुन्या आठवणी आठवतात.. @ अभी येथे मूवी ह्यांनी आधीच सांगितले त्याप्रमाणे मुंबई क्रमक्रमाने विकसित होत गेली व म्हणूनच टप्या टप्याने तिच्यात नवीन शहरे सामावली केली. मुंबई ची उपनगरात पत्र परदेशातून पाठवायचे झाले तर शेवटी पत्यात मुंबई असा उल्लेख होतो. मुंबई मध्ये प्रवेश करण्यासाठी टोल हा मुलुंड व ठाण्याच्या हद्दीत हरीहोम नगर च्या नाक्यावर भरावा लागतो ह्यापुढे तो लागत नाही तेव्हा मुंबई ची उपनगरे ही मुंबईच मानली जाते. जगामध्ये लंडन असो किंवा आणि इतर मोठी शहरे तेथे वास्तव्य केले म्हणून सांगू शकतो ह्या शहराची उपनगरे ह्या शहरांची खरी शान आहे, बाय द वे मुंबईकरांच्या मध्ये सुद्धा चातुर्वर्ण्या सिस्टीम अनुक्रमे , वेस्टन ,सेन्ट्रल व हार्बर अशी आहे. मुंबई व उपनगरे असा पोटभेद निवडणूक आयोगाने न करता मुंबई ला दक्षिण , ईशान्य अश्या दिश्यांच्या मध्ये विभागले आहे. बाय द वे आमचे कुर्ला खरे तर मुंबई चा खर्या अर्थाने मध्यवर्ती भाग आहे. वेस्टन , सेन्ट्रल व हार्बर ला सार्वजनिक वाहतुकीने थेट जोडणारा दुवा म्हणजे कुर्ला. बाकी जन्माने डोंबिवलीकर असल्याने कल्याण संबधी एवढे निरीक्षण नोंदवू इच्छितो की कल्याण इतिहासात अजूनही रमले आहे. अस्सल डोंबिवलीकर हा मनाने पुणेकर व कर्माने मुंबईकर असतो वाक्य मिपावर पूर्व प्रकाशित , निमुपोज म्हणून मूवी म्हणतात त्यात थोडी भर घालून पुणे व मुंबई ला सांस्कृतिक , आर्थिक सामाजिक दृष्ट्या जोडणारा दुवा म्हणजे डोंबिवली. परंपरा जोपासत आधुनिकतेची कास धरणारे डोंबिवली. काही उत्साही पुणेकरांच्या सारखे आपण मुंबईत राहतो किंवा नोकरी संबंधी तेथे आपले पाय लागले असे लेख काढून सांगणारा डोंबिवलीकर नव्हे. त्याच्यासाठी मुंबई ही कर्मभूमी आहे. मात्र अस्सल डोंबिवलीकर हा आम्ही मुंबईत राहतो असे कधीच सांगत नाही ते सांगणारे नवे डोंबिवलीकर. डोंबिवली व मुंबईकर वर्तमानकाळात जगतात. ह्या ब्रीदाला जागून माझ्यापुरते सांगायचे झाले तर, मी आहे आहे म्युनिकर . निनाद , मुक्काम पोस्ट जर्मनी वाक्य मिपावर पूर्व प्रकाशित , निमुपोज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

अस्सल डोंबिवलीकर हा मनाने पुणेकर व कर्माने मुंबईकर असतो....

मुक्त विहारि
Wed, 05/07/2014 - 23:30 नवीन
आयला, नेमके, हेच वाक्य मला अपेक्षित होते. आता तुम्ही वादावर जवळजवळ पडदा टाकलाच आहे. तरीपण, आमच्या डोंबिवलीबाबतीतील २ महत्वाच्या गोष्टी. १. नुतन वर्ष मिरवणूक , पहिल्यांदा डोंबिवलीतूनच निघाली २. लंडन मधील हाईड पार्कच्या धरतीवर , भारतातील पहिले मुक्त व्यासपीठ, डोंबिवलीतील रोटरी क्लबला सुरु झाले. असो, एकूण काय तर सध्या तरी , आर्थिक्,सामाजीक आणि व्यावहारीक बाबतीत डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

मुवि, अहो मध्ये तुम्ही गल्फला

बॅटमॅन
Wed, 05/07/2014 - 23:35 नवीन
मुवि, अहो मध्ये तुम्ही गल्फला मध्यवर्ती म्हणाला होतात ना ;) की तिकडेही केली "गल्फिवली" =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

>>१. नुतन वर्ष मिरवणूक ,

सूड
Wed, 05/07/2014 - 23:49 नवीन
>>१. नुतन वर्ष मिरवणूक , पहिल्यांदा डोंबिवलीतूनच निघाली ह्याला पुरावा काय? चैत्र प्रतिपदेच्या मिरवणूका तशा बदलापूरातही होतात म्हटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त

निनाद मुक्काम …
गुरुवार, 05/08/2014 - 14:07 नवीन
महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त अनिवासी बहुदा डोंबिवली मधून असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

>>महाराष्ट्रातून सगळ्यात

सूड
गुरुवार, 05/08/2014 - 19:28 नवीन
>>महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त अनिवासी बहुदा डोंबिवली मधून असावेत. बरं मग??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

डोंबिवली ही विद्येची नगरी आहे

निनाद मुक्काम …
Sat, 05/10/2014 - 07:29 नवीन
डोंबिवली ही विद्येची नगरी आहे असे अप्रत्यक्ष अधोरेखित केले ,इतकेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

निनाद, उद्या जर्मनीला युरोपचे

यशोधरा
Sat, 05/10/2014 - 09:04 नवीन
निनाद, उद्या जर्मनीला युरोपचे पॅरीस म्हणशील! *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

पुणेकरांची विनोद करण्याची

प्यारे१
Sat, 05/10/2014 - 13:15 नवीन
पुणेकरांची विनोद करण्याची लेव्हल फारच घसरलेली दिसते. किमान शहराशी शहर एवढी तरी जोडी जमवा! उगा काहीतरी टोकं जुळवायची आणि आडवं होऊन हॉ हॉ हॉ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

निनाद, तू आयडी बदलली का? का?

यशोधरा
Sat, 05/10/2014 - 14:13 नवीन
निनाद, तू आयडी बदलली का? का? *boredom*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अरारारा!

प्यारे१
Sat, 05/10/2014 - 14:42 नवीन
अरारारा! तुम्ही मिपावरच्या 'ज्येष्ठ सदस्या' ना? (इतर भूमिकांचा विचार न करता सदस्या म्हणूनच प्रतिसाद देत आहात असं गृहीत धरुन. ) आपल्या प्रतिसादाचा टोन असा आहे की प्रतिसाद फक्त निनाद साठी आहे. तसंच असेल तर इतर ठिकाणचं आपलं प्रतिसाद देणं काय भूमिकेतून असतं हे कळेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

स्मायल्या पहा, गंमतीत धागा

यशोधरा
Sat, 05/10/2014 - 17:07 नवीन
स्मायल्या पहा, गंमतीत धागा चालला आहे ना? माझी तरी तीच समजूत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

धागा गमतीत आहे काय? बरेच

प्यारे१
Sat, 05/10/2014 - 17:37 नवीन
धागा गमतीत आहे काय? बरेच प्रतिसाद तसे वाटत नाहीत. :) बाकी समजुतीची समजूत काय कधीही घालता नि वळवता येतेच की. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

बरोबर, आपापली समजूत

यशोधरा
Sat, 05/10/2014 - 17:43 नवीन
बरोबर, आपापली समजूत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

नाही!

निनाद
गुरुवार, 05/15/2014 - 07:46 नवीन
आं? नाही! माझा बिल्ला नंबर आणि नावही तेच आहे! का? (की हे निनादमुपोजर्मनीला उद्देशून होते?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

(No subject)

यशोधरा
गुरुवार, 05/15/2014 - 07:51 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

>>डोंबिवली ही विद्येची नगरी

सूड
Tue, 05/13/2014 - 22:55 नवीन
>>डोंबिवली ही विद्येची नगरी आहे असे अप्रत्यक्ष अधोरेखित केले ,इतकेच ते ठीकाय, पण डोंबोलीतले लोक त्यांच्या विद्येचा उपयोग त्यांच्या सो कॉल्ड मध्यवर्ती शहराचा विकास करण्यासाठी करु शकत नाहीत याचा खरंतर खेद वाटायला हवा तुम्हाला. परदेशी स्थायिक होणं हेच एक उच्चविद्याविभूषित असल्याचं लक्षण मानत असाल तर मग काय बोलणार!! असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

हेच एक

निनाद मुक्काम …
Wed, 05/14/2014 - 02:04 नवीन
हेच एक हेच एक असे नाही. पण एक अनेक निकषांच्या पैकी एक निकष आहे. असे मला वाटते. @ यशो मला उद्देशून काही गमतीत लिहिले आहे ते माझ्या डोक्यावरून गेले त्यामुळे प्रतिवाद तोही गमतीत घालता आला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

व्य नि बघ.

यशोधरा
Wed, 05/14/2014 - 06:27 नवीन
व्य नि बघ. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

व्वा! काय आठवण आणुन दिलि यार.

स्वलेकर
गुरुवार, 05/08/2014 - 18:50 नवीन
व्वा! काय आठवण आणुन दिलि यार. १००% खरे. त्या सीट साठी बस स्टॉपला थांबण्या अगोदर उडि मारुन चढावे लागायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

व्वा! काय आठवण आणुन दिलि

स्वलेकर
गुरुवार, 05/08/2014 - 18:50 नवीन
व्वा! काय आठवण आणुन दिलि मित्रा. १००% खरे. त्या सीट साठी बस स्टॉपला थांबण्या अगोदर उडि मारुन चढावे लागायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

चिन्म्या मर्दा, एवडं चांगलं

यसवायजी
Tue, 05/06/2014 - 21:10 नवीन
चिन्म्या मर्दा, एवडं चांगलं लिवतैस, कायतर वेगळ्या विषयावर लिव की. काय तेच तेच पुणे-मुंबै, पुणे-मुंबै? आँ?? (शिप्पूरच्या डोंगरावरचा)
  • Log in or register to post comments

+१

बॅटमॅन
Wed, 05/07/2014 - 10:20 नवीन
नै तं काय! पुणे अन मुंबै सोडून उरलेल्या म्हाराष्ट्राकडं बग म्हणा जरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

बॅटॅ

आदिजोशी
Wed, 05/07/2014 - 15:53 नवीन
मुंबई आणि थोडं फार पुणे सोडलं तर उर्वरीत महराष्ट्रात बघण्यासारखं आहेच काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अगदी हेच म्हणायला आलो होतो.

सूड
Wed, 05/07/2014 - 17:59 नवीन
अगदी हेच म्हणायला आलो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

तुम्ही काहीही म्हणा हो. पण,

यसवायजी
Wed, 05/07/2014 - 18:27 नवीन
मुंबै म्हाराष्ट्रात हाय काय? *mosking*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

बघण्यासारखी बहुतेक स्थळे या

बॅटमॅन
Wed, 05/07/2014 - 18:32 नवीन
बघण्यासारखी बहुतेक स्थळे या दोन्ही शहरांच्या बाहेर आहेत, इतकेच सांगतो. प्रश्न त्यामुळे फेल गेलेला आहे. व्हाईट कॉलर नोक्र्यांचे जास्त प्रमाण ही एक बाजू सोडल्यास दोन्हींकडे वेगळे आहे तरी काय, असा माझा उलट सवाल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

टीचभर मुंबै अन चिमूटभर पुणं

बॅटमॅन
Wed, 05/07/2014 - 18:39 नवीन
टीचभर मुंबै अन चिमूटभर पुणं सोडून अख्खा महाराष्ट्र उरलेला आहे तिकडे कधीतरी बघावे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+साडेबत्तेचाळीस

प्यारे१
Wed, 05/07/2014 - 20:21 नवीन
+साडेबत्तेचाळीस ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+अष्ट्यात्तर

आदूबाळ
Wed, 05/07/2014 - 21:38 नवीन
*biggrin* +अष्ट्यात्तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

+ एकोणवीसशे अष्टेचाळीस !!

सूड
Wed, 05/07/2014 - 23:50 नवीन
+ एकोणवीसशे अष्टेचाळीस !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

माझे बाकिचे लेख हि वाचुन पाहु शकता तुम्हि.. मिपा वर उपलब्ध आहेत

चिन्मय श्री जोशी
गुरुवार, 05/08/2014 - 13:01 नवीन
माझे बाकिचे लेख हि वाचुन पाहु शकता तुम्हि.... मिपा वर उपलब्ध आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

लिहिल आहे आधिच....

चिन्मय श्री जोशी
गुरुवार, 05/08/2014 - 13:24 नवीन
मिपा वर माझे आधि प्रसिद्ध झालेले लेख बघु शकता... किन्वा माझा ब्लोग वाचाय्ला येथे भेट द्या. http://kahitariasech.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

टीचभर मुंबई

सुबोध खरे
Wed, 05/07/2014 - 20:00 नवीन
टीचभर मुंबई http://en.wikipedia.org/wiki/Economy_of_Mumbai एकदा वाचून तर पहा मग पुणे काय किंवा उर्वरित महाराष्ट्र कुठे आहे ते समजेल. रच्याकने-- economy of pune पण विकी वर टाकून पहा
  • Log in or register to post comments

मुंबै अन पुणे सोडून

बॅटमॅन
Wed, 05/07/2014 - 20:06 नवीन
मुंबै अन पुणे सोडून महाराष्ट्रात बघण्यासारखं काय आहे असा माजुर्डा सवाल कोणी करत असेल तर सॉरी, आपण स्वस्थ बसू शकत नाही. बाकी चालूद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अगदी मनातले लिहलेत

मराठी_माणूस
Wed, 05/07/2014 - 20:55 नवीन
अगदी मनातले लिहलेत स्वतःच्या पोळीवर तुप ओढून घेतलेली शहरे. कुपमंडुक धागा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

स्वतःच्या पोळीवर तुप ओढून घेतलेली शहरे.

धर्मराजमुटके
Wed, 05/07/2014 - 21:05 नवीन
ओके. म्हणजे कसे ? म्ह्णजे पोळीवर तुप ओढून घेणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

हेच ते. णुस्ता पैसा पैसा आनी

यसवायजी
Wed, 05/07/2014 - 20:43 नवीन
हेच ते. णुस्ता पैसा पैसा आनी पैसा. तुमच्याकड्न असा रेप्ल्य बघून मिपाकर म्हणुन शरम काकाय ती वाटली. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा