क्वीन बद्दल अगदी पहिल्या दिवसापासून सतत चांगले वाचायला मिळाले. पिरा ने जो लेख लिहिला तो तर प्रचंड आवडला. त्यावर आलेल्या अनेक प्रतिक्रिया देखील उत्तम होत्या. सगळं वाचून एक कल्पना करू शकत होते की साधारण काय असेल. चित्रपटाचा आशय हळूहळू उलगडत होता. मग त्यावर बरीच इतर चर्चा सुद्धा झाली. ती चित्रपटा इतकीच गाजली. अजूनही काही ना काही निघतच आहे. मग युरोपच का, त्यात पुन्हा अमके शहरच का किंवा चांगलेच अनुभव कसे इ. इ. त्यावर आलेले पुन्हा चांगले वाईट प्रतिसाद. हे सगळं वाचताना मला माझ्या आयुष्याताल्याच काही जुन्या घटना आठवल्या. त्या काळापुरती चित्रपट न बघताही मी रानीशी जोडले गेले. कुठेतरी वाटलं की स्त्री मुक्ती किंवा स्त्री पुरुष समानता वगैरे सोडून देऊयात. पण केवळ एकटीने एखादी गोष्ट करणे किंवा मला हे जमू शकतं हा आत्मविश्वास, स्वतः निर्णय घेण्याची क्षमता अशा अनेक गोष्टी जेव्हा आपल्यालाही सापडतात, तो एक वेगळा आनंद असतो. अशा प्रकारची क्वीन आपल्या प्रत्येकी मध्ये असते, काही विशिष्ट घटना किंवा वेळेला कधी पहिल्यांदा जाणवते तर कधी नव्याने. जे काही विचार डोक्यात आले ते उतरवत असतानाच क्वीन आलेला दिसतोय युट्युब वर असे नवऱ्याने सांगितले. cam print असल्यामुळे क्वालिटी यथातथाच होती. अथ ते इति, संपूर्ण चित्रपट आवडला. कलाकार, दिग्दर्शक, लेखक, सगळ्या दृष्टीकोनातून आवडला. चित्रपटासाठी एक कथानक हवे जे रानीच्या बाबतीत लग्न मोडणे आणि एकटीने हनिमून ला जाणे इथून सुरु होते. आणि एका स्वतंत्र विचारसरणीच्या, जगाला सामोरे जाऊ शकणाऱ्या रानीच्या नव्या व्यक्तीमत्वाने संपते. मध्ये जे काही आहे ते असं का? अमुकच का? तमुकच का? कारण हे सगळे कथानकाचा एक भाग आहे. जे दाखवायचे आहे ते उत्तमरीत्या साकारले गेले आहे. क्वीन एक चित्रपट होता आणि त्याची कथा वेगळी होती. प्रत्येकीसाठी ती वेगळी असणारच. हेच का आणि तेच का याला उत्तर नाही. जी कथा घेतली ती चित्रपटाने १०० टक्के लोकांसमोर आणली. कलाकारांनी विशेषतः कंगनाने राणीचे अनेक कंगोरे सुरेख दाखवले. प्रत्येक वाक्यागणिक आणि प्रसंगा गणिक ती खुलत गेली. हा चित्रपट म्हणजे तिचे खुलणे. स्वतःशी संवाद होणे. स्त्री मुक्ती, समानता वगैरे सगळे आहेच. पण मला भावलं ते तिचं खुलणं. तिचं एक व्यक्ती म्हणून घडणं.
मग पुन्हा स्वतःच्या आयुष्यात डोकावणे सुरु झाले. माझ्यातली रानी मला भेटली त्याची कथा.
बारावीपासून शिक्षणाच्या निमित्ताने घराबाहेर होते. स्वतंत्र आयुष्याची सुरुवात तिथून झाली. त्यामुळे एकटीने अनेक गोष्टी नेहमीच केल्या. त्यापूर्वीही केल्या होत्या. मग शिक्षण संपून नोकरी सुरु झाली. नोकरीच्या निमित्ताने पहिला परदेशप्रवास घडला. जपान. तिथे ही बरेचदा माझ्यातली क्वीन मला सापडली.पण जपानमध्ये असताना भाषा हा एक महत्वाचा मुद्दा होता ज्यामुळे इतर जगाशी फारसे जोडले जाणे शक्य नव्हते. त्यात तिथे कामाची स्थिती अशी होती की २ महिन्यात जवळपास रोज सकाळी ८ ते रात्री ८ किमान आणि शनि रवि सुद्धा काम. सुट्टी नाहीच. स्वतःसाठी वेळच नव्हता. जपान झालं आणि पुढची संधी होती राणीच्या देशाची. जगाला वेड लावणारं लंडन शहर. आणि तेथून जवळच कामाचे ठिकाण. युके मध्ये आले तेव्हा भाषा येते या एका मुद्द्यावर मी जाम खुश होते. यावेळी मला हवं तसं मी फिरू शकेन, ह्याव करेन आणि त्याव करेन अशा लय बाता मारल्या. पहिल्या ४ आठवड्यात लेस्टर म्हणजेच मी ज्या शहरात होते तिथेच मज्जा केली. ४ महिन्यांपासून इथे राहत असून सुद्धा काही सहकार्यांना ज्या जागा माहित नव्हत्या त्या शोधून, तिथे एकटीने फिरून आले. मुख्य एका राहिले होते ते म्हणजे लंडन. पण कुणी सोबत आले की मग जाऊ असा विचार मी करत होते. तिथे त्या वेळी असणारे सगळे भारतीय सहकारी आधीच जाउन आले होते. एकटी ने जायला मला काही प्रश्न नव्हता तसा. पण सोबत असेल तर अजून मजा येईल एवढेच. त्यात इतर लोक्स एकटीने कुठे फिरतेस असे सारखे म्हणून मला अजूनच अनुत्साहित करायचे. असे करता करता भारतात परत जायचा दिवस जवळ येऊ लागला आणि आता लंडनला जायचेच हा विचार मनात पक्का झाला. लेस्टर मध्ये मी एकटीने फिरत असले तरी लंडन विषयी एक अप्रूप होते. एवढ्या मोठ्या शहरांत फिरायला जमेल का ही धाकधूक होती. एकीकडे होणारा नवरा जर्मनीतून प्रोत्साहन देत होता. धीर देत होता. सुदैवाने इथली माझी टीम खूपच छान होती. आणि जवळपास सगळ्यांमध्ये मी लहान. त्यामुळे सगळे आपापल्या परीने मदत करत होते. एका ब्रिटीश कलीगने नकाशा दिला. प्रत्येकाने काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. या भागात जाऊ नकोस, पर्स सांभाळ वगैरे अगदी आपुलकीने, प्रेमाने सगळे सांगत होते. काही भावना या जगात सगळीकडे सारख्या असतात नाही. एकटी जाते आहे म्हणून एकच दिवस बघून परत यायचं असं ठरवलं. पुन्हा जाता येईल नंतर. मग तिथे जाउन एका दिवसात काय होईल, कसे बघता येईल हे सगळं आंतरजालावर शोधलं. आपल्याला स्वतःला यातलं काय बघायला जास्त आवडेल याचा विचार केला. कारण प्रत्येक सहकारी काहीतरी वेगळं सांगायचा. हे सगळं ठरवून मग त्याप्रमाणे ऑनलाईन तिकिटे काढली. नोकरी सुरु झाली तेव्हा मिळालेले क्रेडीट कार्ड तोपर्यंत कधी वापरले नव्हते. स्वतःच्या क्रेडीट कार्डाचा पहिल्यांदाच उपयोग केला. आणि शुक्रवारी तयारी केली. उगाचच जरा जास्तच गाजावाजा झालेल्या माझ्या लंडन ट्रीप साठी मी सज्ज होते. या पूर्वतयारीने मला बराच आत्मविश्वास आला होता. पण धाकधूक होतीच. शनिवारी पहाटे ६ वाजताची बस होती. घरापासून बस स्थानकापर्यंत जायला बस होती आणि मी बरेचदा हे वाचलं होतं की सकाळी ५ पासून बसेस सुरु होतात. त्याप्रमाणे अंधारातच ५ ला बाहेर पडले. रस्त्यावर शुकशुकाट. बस stop वर आले आणि पहिला धक्का बसला. शनि रवि बस ६ वाजता सुरु होतात. २ मिनिटे काहीच सुचत नव्हते. पण लंडन ला जायचे हे पक्के होते. माझ्या घरापासून बस स्थानकाचा साधारण रस्ता पायी जायला माहित होता. त्याच्या जवळपासच्या भागात मी ३-४ वेळा गेले होते. जाऊयात आता पायीच म्हणून निघाले. taxi बोलवायला नंबर नव्हता. एक सहकारी माझ्याच इमारतीत राहत होता आणि त्याच्याकडे गाडी होती. पण पुन्हा परत जाउन एवढ्या पहाटे तो उठला नाही तर पुढची बस जाइल अशी भीती वाटली. त्यामुळे तशीच निघाले. पावले भरभर पडत होती. आणि ५ मिनिटातच सुमेध चा फोन. कसे त्याला कळले माहित नाही पण तो एवढ्या सकाळी उठला होता. याचे तर अजून ४ वाजताहेत पहाटेचे. निघालीस का? सांगितलं की हो असं झालंय आणि मी पायी निघाले आहे. पोचले की फोन करते. पण त्याची झोप उडाली होती. एवढ्या पहाटेच्या वेळी कशी जाशील हीच काळजी. जाशील गं तू पण फोन चालू राहू देत. मी एकीकडे गुगल नकाशे बघतो आणि तुला सांगतो. भारतात काय गेले नाही का कधी मी? उगाच अति नको करूस म्हणून उसना आव आणला. पण अंधारात, थंडीत आणि त्या निर्जन रस्त्यावर भीती वाटत होती. नको नको हो हो करता करता मी बरेच पुढे आले. आता मुख्य शहराच्या जवळ आले होते. शनिवार पहाट. हिवाळ्याची सुरुवात झाली होती त्यामुळे अंधार. काही लोकांसाठी वीकेंड सुरु झाला होता नुकताच. एक मोठा चौक आला. मला जो रस्ता माहित होता त्या रस्त्याने जाणार तेवढ्यात तिथे एक कल्लूंचा मोठ्ठा घोळका दिसला. सगळे मद्यधुंद अवस्थेत होते. ५-६ पोरं आणि २ पोरी. पुन्हा पावलं थबकली. आणि पुढच्याच क्षणी दुसऱ्या रस्त्याने जाऊयात या मनातून मिळालेल्या उत्तराप्रमाणे वळसा घालून दुसऱ्या रस्त्याला लागली. ठिकठीकाणी मुख्य ठिकाणी जाण्यसाठी मार्गदर्शक बाण होते. एकीकडे ते बघत, मधेच सुमेध च्या एखाद्या फोन ला उत्तर देत, कधी त्याच्याकडून गुगल ची मदत घेऊन, असाच एखादा घोळका अजून नाहीये ना याकडे सतर्क नजर ठेवत पुढच्या दहा मिनिटात बस स्थानकावर पोचले. तिथे २ लोकं दिसले आणि जीवात जीव आला. इथूनच सुटते ना बस याची खातरजमा करून घेतली. आणि शांत झाले. तू झोप आता असं सुमेधला सांगून फोन परत पर्स मध्ये टाकला. पुढच्या १० मिनीटात एक बाई तिथे आली आणि लंडन ला जाणारी बस यायची आहे ना म्हणून विचारले. एका अनोळखी देशात, अनोळखी शहरात मी तिथल्याच एका बाईला मदत करत होते. Smile मग उगाच गप्पा सुरु झाल्या. मी सकाळी पायी आले या ठिकाणापासून हे ऐकून ती बाई म्हणाली. You are brave girl. good girl. I liked it. I can never do that. आणि एवढ्यात बस आली.तिकीट तपासून आत बसले आणि मी खरंच इतकी ब्रेव्ह आहे का हा विचार करतच लंडन ला पोहोचले. तिथल्या hop on hop off बस चे ऑनलाईन तिकीट काढले होते. माझ्या नियोजित स्थानाकाधीच मला या बसेस दिसल्या आणि मी उतरून घेतले. सुरु झाला एका स्वप्नातील शहराचा प्रवास. एकटीने. तू एकटी जाणार असे अनेक लोक भुवया उंचावून मला म्हणाले होते. तेव्हाही मला एकटीने जायला प्रॉब्लेम नव्हता. आता तर मला अत्यानंद होत होता. उतरून त्या भव्य शहराला न्याहाळत प्रवास सुरु झाला.
ओपन top या बस च्या वरच्या मजल्यावर जाऊन बसले. जाताना हेडफोन्स ठेवले होते ते घेतले. एक जागा शोधली आणि बसले. हळूहळू शहराच्या जुन्या इमारती, मॉल्स अशा रस्त्यारस्त्यातून बस निघाली. हेडफोन्स कानात घातले. पण भाषा कुठलीतरी भलतीच ऐकू येत होती. २-४ बटनांशी खेळून पहिले पण जमेना. थोडी खटपट केली आणि जर्मन ऐकू आले. हे जर्मन आहे एवढं समजण्या इतपत तेव्हा येत होतं. त्यावरून मग इंग्रजी ही जमले. हे काही खूप कठीण नव्हते पण घाबरून काही सुचत नव्हते. दिसायला लहानशी घटना होती पण मला फार तीर मारल्यासारखे वाटत होते. सावरून आता फोटो काढायला सुरुवात केली. इमारतींचे इतिहास ऐकत ऐकत पुढे एका ठिकाणी बस थांबली, समोर होते madame tussaud . एकाच दिवसात लंडन बघायचे असल्याने शक्य तेवढी बाहेरची ठिकाणे बघायची असे ठरवले होते. त्यामुळे हे संग्रहालय बाद होते. आता गर्दी सुरु झाली होती. आपल्यालाच एवढे प्रश्न पडतात किंवा काही कळत नाही असं उगाच एक डोक्यात होतं. सगळेच इथे पर्यटक म्हणून आलेले. अनेकांना तर इंग्रजी येतही नाही. इथे बस थांबली होती तेव्हा नवीन चढणाऱ्या लोकांचे अनेक प्रश्न ऐकताना, बघताना कुठेतरी मनातल्या मनात वेगळाच आत्मविश्वास वाढला होता.
जेव्हा बस मी ठरवलेल्या पहिल्या ठिकाणी पोचली तेव्हा उतरले. लंडन आय. संपूर्ण शहराची सफर घडवणारा आकाश पाळणा. भूक लागली होती. जवळच mac donalds दिसले. तिथे जाउन बर्गर खाल्ला. आणि पुढचे दहा मिनिट तिथल्या एका बाकावर शांत बसून खाल्ला. आज सकाळपासून झालेले गोंधळ आठवत होते. यायच्या आधीची धाकधूक आठवत होती. युके ला जाणार का असा ऑफिसमध्ये आलेला प्रश्न आठवत होता. मग व्हिसा आणि एकेक तयारी. मागचे ४ आठवडे आठवत होते. या प्रत्येक दिवशी मला स्वतःला काहीतरी नवीन अनुभवल्यासारखे वाटत होते. आणि आज एकटीने लंडन मध्ये फिरत होते. Smile त्या क्षणी इथली पर्यटनस्थळे विसरून आता बस इथे आलोय ना हेच फक्त सुखद होते. विचारांमधून बाहेर पडून पुढे गेले. प्रवेशासाठी जागा कुठून आहे ते पाहिले. ऑनलान तिकीट होते पण ते validate करून घ्यायचे होते. थोडी विचारपूस करता काम झाले आणि पुन्हा एकदा लढाई जिंकल्याच्या आविर्भावात बाहेर आले तर तोबा गर्दी. आपले लंडन इथे सुरु होणार आणि इथेच संपणार असे वाटले. जवळ जाऊन पहिले तर रांग अगदी भरभर पुढे जातेय हे दिसले. अर्ध्या तासात अगदी जवळ आले आणि भव्य अशा त्या आकाश पाळण्यात चढले. सगळे आपापल्या गप्पांमध्ये दंग होते आणि मी स्वतःच्याच तंद्रीत. लंडन शहर सुंदर आहेच, पण त्या क्षणी मला ते इतके सुंदर वाटले की शब्दात नाही व्यक्त होऊ शकत त्या भावना. फोटो काढले. मधेच सुमेध ची आठवण आली. त्याच्यासोबत परत यायचे असे म्हणत परत ते विचार बाजूला केले. मी हे सगळे प्रत्यक्ष पहिले याचा एक तरी पुरावा असावा म्हणून स्वतःचा एक फोटो काढला. उंचावरून दिसणारे लंडन अनुभवून परत बाहेर आले. इथेच एका बोट ट्रीप चे आरक्षण केले होते. हातात नकाशा होताच, त्याच्या मदतीने आणि थोडं विचारत, शोधत पुढे आले आणि या बोटीत चढले. आता दीड तास निवांत होता. लंडन शहरातील एकाहून एक सुंदर अशा इमारती, स्थापत्यशास्त्राचे उत्तमोत्तम नमुने, थेम्स चा खळाळता प्रवाह आणि स्वतःशी संवाद साधत शांतपणे बोटीतून प्रवास. सोबतीला काही भारतीय लोकांनी केलेली सांडा पांड, थोडासा वैताग आणि तरीही हे सगळं विसरायला लावणारं लंडन. बोटीचा प्रवास संपला, लंडन ब्रिज वर जाउन आले. इतर कुठलेही संग्रहालय बघायला आज एका दिवसात जमणार नव्हते त्यामुळे फक्त या प्रत्येक कोपऱ्यातून दिसणारे शहर अनुभवणे सुरु होते. दुपार ढळली होती. कधीही न भेटलेली नवऱ्याच्या परिचयातील एक मैत्रीण लंडन ला मला घ्यायला येणार होती. माझे परतीचे आरक्षण रद्द करून मी तिच्या घरी जायचे असा नंतर बेत बदलला. आता बसेस ला प्रचंड गर्दी होती. मग भारतीय पद्धतीने घुसून, तिथे उभं राहण्यापुरती जागा मिळवली. बस मधूनच बाहेरून लॉर्डस दिसले. मुख्य स्थानकावर येउन मग पुन्हा या बस कंपनीचे ऑफिस शोधले. दीड ते दोन किमी अंतर असेल. गल्ली बोळा धुंडाळत, हातात नकाशा आणि फक्त रस्त्यावरच्या खाणाखुणा आणि दिशादर्शक यांच्या मदतीने तिथे पोहोचले. (५ वर्षांपूर्वी मोबाइल वर एवढी प्रगती झालेली नव्हती.) तिकीट रद्द करून दुसर्या दिवशीचे काढले. परत व्हिक्टोरिया स्टेशन ला आले. अजून एकदाही मुंबईतील व्हिक्टोरिया प्रत्यक्ष पहिले नव्हते ते आज इथलेच पाहिले. मैत्रीण भेटली. त्यांच्यासोबत buckingham palace पाहिला. राणीचा देश अशी ज्या देशाची ओळख आहे त्या राणीचा राजवाडा. अंधार पडला होता त्यामुळे तिच्या घरी जायला निघालो. रात्री तिच्याकडे घरची मस्त खिचडी खाउन दुसऱ्या दिवशी परत आले. तेव्हा मला जणू लंडन माझे दुसरे माहेरघर असे वाटत होते. आधल्या दिवशी पायी फिरल्यामुळे, आणि मुख्य म्हणजे नकाशाच्या मदतीने सगळे रस्ते स्वतः शोधल्यामुळे बस स्थानक सहज सापडले. बस पुन्हा लेस्टर ला यायला निघाली.
यापूर्वीच्या अनेक घटना होत्याच, पण या दोन दिवसांनी मला वेगळं घडवलं. एकटीने काय कधी फिरले नव्हते का? कित्येकदा. स्वतंत्र राहिले नव्हते का? चांगली ५ वर्षे. स्वतःचे निर्णय स्वतः घेतले नव्हते का? सगळेच. कुठले शिक्षणक्षेत्र निवडायचे इथपासून तर नवरा निवडीपर्यंत सगळे निर्णय माझे होते. त्यासाठी योग्य जडण घडण आई बाबांची होती आणि त्यांचा पाठींबा सुद्धा. यानंतर पुढे अजून २-३ वेळा या शहरात कामानिमित्ताने राहिले. पर्यटक म्हणून नाही. पण प्रत्येक भेटीत ही पहिली भेट आठवायची आणि सुखावून जायची. त्याच दिवशी वेगळे काय घडले होते? लंडनच का? या प्रश्नाचे उत्तर नाही. वयाच्या २३ व्या वर्षी एकटीने तिथे फिरणे हे कदाचित कुणासाठी क्षुल्लक असेल. पण एका खूप लहान गावात वाढलेल्या मला जेव्हा पुण्यात सुद्धा सुरुवातीला सांस्कृतिक धक्का होता तो प्रवास आज लंडन पर्यंत आला होता आणि तो माझ्यासाठी एक मैलाचा दगड होता. माझ्या मनातली राणी या दिवशी सिंहासनावर विराजमान झाली होती. स्वप्नातही मी एकटी पर्यटक म्हणून स्वतःच्या कर्तुत्वावर हे शहर फिरेल असे कधी वाटले नव्हते. या दिवसात जे घडलं आणि त्यातून मला जे वाटलं त्यापैकी कुठल्याही असं का किंवा असं आजच का याला उत्तर नाही. मी मुक्त झाले नाही किंवा बंधनात पडले नाही. अचानक स्त्री पुरुष समानता हे सगळं या भेटीतून कधी आलं नाही. आत्मविश्वास आधी ० होता आणि आता अचानक १०० झाला असेही काही नाही. एका दिवसाने किंवा या २ महिन्यात आयुष्य आमुलाग्र बदलले नाही. जिंदगी बदल दी वगैरे नाही. पण तरीही मी एका वेगळ्या दुनियेत होते. आतून एक वेगळा आवाज आला होता. यापुढे आपण खूप काही करू शकतो या आशा नव्याने पल्लवित झाल्या होत्या. स्वतःला कमी समजायचे नाही हे पुन्हा पुन्हा जाणवून देणारा हा दिवस होता. यामुळेच कदाचित, पण आयुष्यात कधीही आणि कुठेही तुझे आवडते शहर असे कुणी विचारले तर माझे उत्तर कधीच बदलणार नाही. लंडन. कारण तिथे माझ्या मनातली राणी मला भेटली. आजतागायत ती विराजमान आहे... आणि राहील...
आपल्या सगळ्यांमध्ये एक रानी दडलेली आहेच. त्यासाठी लंडन काय आणि मुंबई काय? कधी कुठल्या घटनेतून हे घडेल तो प्रत्येकीचा चित्रपट...
प्रतिक्रिया
10 Apr 2014 - 4:27 pm | यशोधरा
सुरेख, संयत लिखाण. फार आवडले.
लिहित जा..
10 Apr 2014 - 11:51 pm | मूकवाचक
+१
10 Apr 2014 - 4:28 pm | पिलीयन रायडर
मस्त.. अगदी सुंदर लिहीलय..!!
सविस्तर प्रतिक्रिया द्यायची आहेच.. सध्या फक्त पोच..
10 Apr 2014 - 4:34 pm | त्रिवेणी
मस्त.
गेल्या २-३ दिवसांपासुन पुण्यात एकटीने कुठे जावे की नाही हाच विचार होता सध्याच्या घट्नापाह्ता.पण तुझा हा लेख वाचुन माझ्यातला आत्मविश्वास पुन्हा वाढ्ला.
10 Apr 2014 - 4:40 pm | समीरसूर
छान लेख! आणि प्रत्येकीमध्ये एक क्वीन असते हे जाम पटलं. आणि प्रत्येकामध्ये एक किंग्...देर है तो बस अपने इस वजूद को जानने की, अपने आपको पहचानने की...
सुरेख लिखाण!
14 Apr 2014 - 5:00 pm | सूड
>>प्रत्येकामध्ये एक किंग्...देर है तो बस अपने इस वजूद को जानने की, अपने आपको पहचानने की..
प्रचंड सहमत !!
10 Apr 2014 - 4:45 pm | केदार-मिसळपाव
मस्त जमलय. लिहीत राहा. बाकी आता पुन्हा बिगर-इंग्रजी भाषा बोलणार्या देशात आहात त्यामुळे इथेही मस्त अनुभव येत असतील.
10 Apr 2014 - 4:56 pm | पैसा
अतिशय छान लिहिलंस! हे लिखाण अगदी तळापर्यंत हलवून गेलं. पार १८-१९ वर्षाची असतानाची आठवण आली. तेव्हा मोबाईलच काय, लँडलाईन फोन नव्हते त्या काळात कॉलेज संपल्यावर मी आणि माझ्याहून जरा लहान चुलतबहीण आम्ही दोघीचजणी मुंबई, पुणे ते थेट वर्धा नागपूर फिरून आलो होतो त्याची आठवण झाली! या लेखाला माझ्याकडून फाईव्ह स्टार!
10 Apr 2014 - 5:08 pm | उदय के'सागर
वाटलं पुन्हा एकदा क्वीन चित्रपटाची समीक्षा की काय? पण खुप छान लेख जमलाय, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर संपूर्ण लेख वाचतांना वाटलं की ठीक आहे.. एवढं काय त्यात पण ज्या शेवटच्या ६-७ ओळींमधे तुम्ही लिहीलं आहे त्यातच लेखाने मनाला जिंकलं ते भिडलं.
हे विशेष आवडलं >>
10 Apr 2014 - 5:23 pm | सखी
६-७ ओळींमधे तुम्ही लिहीलं आहे त्यातच लेखाने मनाला जिंकलं ते भिडलं.
हेच म्हणणार होते, संपूर्ण लेख/अनुभव आवडला पण या ६-७ ओळी म्हणजे केकवरचं आईसिंग! वाचणखुणेत साठवुन ठेवतेय.
10 Apr 2014 - 5:27 pm | शुचि
+1
10 Apr 2014 - 5:54 pm | निवेदिता-ताई
+१
10 Apr 2014 - 5:14 pm | कुसुमावती
खुप छान लिहिलयस मधुरा. या लंडन सफरीचा अनुभव तुला तुझ्यातल्या राणीची जाणिव करुन देणारा असल्याने विशेष आहे, तु जपान आणि जर्मनीत केलेल्या भटकंतीचे अनुभवही वाचायला आवडतील.
10 Apr 2014 - 6:02 pm | रेवती
मनातले विचार छान उतरलेत. मलाही कायकाय आठवून गेलं. प्रसंग वेगळे असतील पण भावना तीच!
10 Apr 2014 - 6:12 pm | आतिवास
अनुभव आवडले. जगताना आपण घडत जातो ते असे - हेही जाणवलं.
10 Apr 2014 - 6:30 pm | Anvita
छान लेख!
10 Apr 2014 - 6:35 pm | यसवायजी
छान लिहिलंयस मधुरा.
@ आजतागायत ती विराजमान आहे... आणि राहील... >> असेच होवो. :)
बाकी, ते देश जरी भारतापेक्षा जास्त सुरक्षीत असले तरी एकटीने (किंवा एकट्यानेसुद्धा) फिरणे म्हणजे जोखीम आहेच. न्युरेन्बर्गच्या स्टेशनवर पहाटे साडेचारला, मुलीला त्रास देणारा एक घोळका पाहिलाय. आम्ही चौघे असुनही तिकडे न बघता सरळ स्टेशन गाठले होते. :(
10 Apr 2014 - 7:07 pm | प्यारे१
क्लॅप्स क्लॅप्स क्लॅप्स!
सुंदर, शांत, आत्मतृप्त वाटत लिहीलेलं लिखाण!
10 Apr 2014 - 7:16 pm | आत्मशून्य
तुम्हाला क्विन समजला. आणी हे आम्हाला सुरेख प्रकारे सांगितल्याबद्दल तर विशेष आभार.
-लत्ता प्रहारी
10 Apr 2014 - 7:41 pm | मधुरा देशपांडे
सर्वांचे मनापासून आभार.
यसवायजी, हो परदेशातही संपूर्ण सुरक्षित असे नाहीच. जर्मनीत तुझ्यासारखा अनुभव ऐकला नाही पण असू शकतो. इटली किंवा फ्रांस मध्ये पाहिलंय. पहिले २ मिनिट मी प्रचंड घाबरले होते. त्यांचा सगळा गोंधळ आपापसात चालू होता पण ते बघूनच भीती वाटत होती. नेमका दुसरा रस्ता माहित होता म्हणून टाळता आले.
10 Apr 2014 - 8:10 pm | राही
सुंदर, संयत, अभिनिवेशविरहित लिखाण अत्यंत आवडले. आत्मशक्तीचा साक्षात्कार निव्वळ अप्रतिम.
स्वतःचा स्वतःला शोध लागण्याचा क्षण अवर्णनीय असतो.
शेवटच्या काही ओळी म्हणजे एक लेणे आहे.
अभिनंदन.
10 Apr 2014 - 8:36 pm | किसन शिंदे
खरं तर शिर्षक पाहून 'आता पुन्हा तेच का?' असं वाटून धागा उघडला, पण खालच्या प्रतिक्रिया वाचून लेख वाचायला सुरूवात केली अन् एक अतिशय सुंदर लेख वाचल्याचं समाधान मिळालं. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला स्वतःमध्ये नव्याने काही गवसत जाते अन् त्या गवसण्याचा आनंद काही औरच असतो आणि लंडन शहराच्या पहिल्या भेटीतून तो आनंद तुम्हाला गवसला.
जियो! असेच लिहित रहा..
10 Apr 2014 - 8:51 pm | शुचि
=)) सेम हियर!!!
पण आधी सांगीतल्याप्रमाणे, शेवटच्या काही ओळी आवडून गेल्या.
10 Apr 2014 - 8:37 pm | अजया
मधुरा, लेख अत्यंत आवडला!
10 Apr 2014 - 9:00 pm | इशा१२३
परत वाचला आणि परत तेवढाच आवडला..
10 Apr 2014 - 9:04 pm | मराठे
फार छान लिहिलंय. खूप आवडलं.
10 Apr 2014 - 9:07 pm | मितान
मधुरा, खूप संयत आणि ओघवतं लिहिलं आहेस.
स्त्री असो की पुरूष; स्वतःची ओळख पटण्याचा असा एखादा क्षण यावाच लागतो. तुझा अनुभव अनेकांचा/अनेकींचा स्वतःचा असेल हे नक्की :)
11 Apr 2014 - 10:54 am | अस्मी
खरंच अतिशय सुंदर लेख..अनुभव!! अगदी मनापासून आवडला.
एकदम पटलं.
10 Apr 2014 - 9:10 pm | सानिकास्वप्निल
खूप सुरेख लिहिले आहेस मधुरा
लेख वाचताना काही आठवणी जाग्या झाल्या...लेख मनाला स्पर्शून गेला :)
10 Apr 2014 - 9:10 pm | वन्दना सपकाल
खुपच सुंदर.... सुरेख लिहल आहे.
10 Apr 2014 - 11:10 pm | Prajakta२१
शेवटचे वाक्य एकदम कळसच !
अशाच लिहित्या राहा !
:-)
10 Apr 2014 - 11:56 pm | अप्पा जोगळेकर
फारच छान. आक्रस्ताळेपणा नाही, स्त्री मुक्तीचा अभिनिवेश नाही. कल्लू हा शब्द मात्र विशेष खटकला.
11 Apr 2014 - 5:17 am | नगरीनिरंजन
आक्रस्ताळेपणा आणि अभिनिवेश नाही आणि आपण स्वतंत्र आहोत नि केवळ आपल्या भीतीच्याच आता मर्यादा आहेत असे कुठेतरी जाणवल्यासारखे लिखाण असल्याने आवडले.
आपल्या स्वातंत्र्यासाठी आपणच जबाबदार आहोत हे समजणे ही स्वतंत्र होण्याची पहिली पायरी आहे.
सहमत आणि त्यामागची निगेटीव्ह कनोटेशन्सही. असे पूर्वग्रह आणि भीती मनात नसतील तर काहीच अवघड नाही.
11 Apr 2014 - 12:34 pm | बॅटमॅन
अभिनिवेशरहित पण नेमका प्वाइंट पोचवणारे लिखाण लोक का उचलून धरतात आणि फुकाचा अभिनिवेश टर्न ऑफ का ठरतो हे या धाग्यावरून सहजीच कळून येते.
11 Apr 2014 - 12:47 pm | मधुरा देशपांडे
कल्लू हा शब्द वापरायला नको होता हे मान्य. पुढच्यावेळी काळजी घेण्यात येईल.
पण लिहिताना मनात कुठलाही वर्णद्वेष नव्हता. त्यावेळची भीती ही त्यांचा जो दंगा सुरु होता त्यामुळे होती. त्यात एकंदरीत धिप्पाड शरीर यष्टीने त्यात भर घातली. त्यांच्या रंग किंवा देश याविषयी कुठलाही द्वेष किंवा पूर्वग्रह नाही.
11 Apr 2014 - 7:29 am | स्पंदना
मधुरा![](https://fbcdn-sphotos-a-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/t1.0-9/s403x403/10013647_771081166237038_1696318367_n.jpg)
पहिल्या वाक्यानंतर लिखाणाची डेप्थ जाणवली. अन जसजस तुझ मन तू उलगडत गेलीस तसे न कळत डोळे वाहतात की काय अस वाटु लागल.( आईपण बयो! आईपण! मग स्व्तःच्या पोरीची छबी डोळ्यासमोर येत अन दुसर्याच दु:ख अन सुख थोडफार का असेना उलगडु लागत. मग दुसर्या व्यक्तीचा अपमान कळतो, अन त्याचा आनंदही सुखावतो) खरच ग! खरच! हेच शहर अन तेच ठिकाणापेक्षा मनातला स्व जागवणारा एखादा कोपराही आपल्याला रानी बनवुन जातो.
या लेखाला वरती ५ स्टार्स तर मिळाले आहेतच. माझ्याकडुन तुला आतिषबाजी बहाल. अन एक मानाचा मुजरा राणीसरकारांना!
11 Apr 2014 - 11:14 am | ऋषिकेश
छानच.. लिहित रहा!
11 Apr 2014 - 12:32 pm | तुमचा अभिषेक
डर के आगे जीत है, आयुष्यातील भिती अन संकोचाचा एक भलामोठ्ठा पडाव तुम्ही त्या दिवशी पार केलात. खूप छान अनुभव आणि तितक्याच आत्मीयतेने तो शब्दबद्ध केलात . आपला एक उनाड दिवस आम्हीही जगलो तुमच्याबरोबर :)
11 Apr 2014 - 2:57 pm | बहिरुपी
+१ अतिशय संयत आणि तरल. आणखी येवु द्यात.
11 Apr 2014 - 1:18 pm | michmadhura
अतिशय सुंदरपणे मांडलं आहेस तू. मस्तच.
11 Apr 2014 - 4:02 pm | मुक्त विहारि
आवडला..
11 Apr 2014 - 6:46 pm | अनन्न्या
सहजतेने शब्दबद्ध केलस, मस्त!
11 Apr 2014 - 7:20 pm | विशाखा राऊत
आवडेश
~
12 Apr 2014 - 12:04 am | साती
लेख भारीच.
लेखाचा शेवट तर अप्रतिम.
12 Apr 2014 - 12:01 pm | नंदन
तंतोतंत!
12 Apr 2014 - 12:32 am | अनन्त अवधुत
शेवट तर फार सुंदर केलाय.
लेखाचा मथळा पाहून मला वाटले, परत एकदा पॉपकॉर्न घेवून बसावे लागणार कि काय :)
आवडला हेवेसांनल.
12 Apr 2014 - 12:41 pm | भाते
आणखी अशाच लिहित रहा.
14 Apr 2014 - 11:40 am | मधुरा देशपांडे
सगळ्यांच्या प्रोत्साहनपर प्रतिसादासाठी धन्यवाद.
मिपाने या लेखाची खास दाखल घेतली त्यासाठी विशेष आभार. :)
14 Apr 2014 - 5:24 pm | राही
वेठीला स्त्रीमुक्तिला धरु नको, वादासि जाऊ नको |
तीन्हीकाळ विदारक नख नको, तीव्रें वचें ती नको||
सीमान द बोव्हा हवी तर असो (बापडी), (पण) कोणासि हाणू नको |
ज्याचीया स्मरणे शक्तिमान तू, ते स्वत्व सोडू नको !
14 Apr 2014 - 6:11 pm | बॅटमॅन
गावयास राहीकृत स्तोत्र हे, मागे पुढती बघू नको |
-बॅटंत फंदी.
14 Apr 2014 - 6:37 pm | शुचि
स्तोत्र की फटका?
14 Apr 2014 - 11:27 pm | राही
छे छे. फटका अजिबातच नाही. त्यांच्या धाग्यातल्या भूमिकेशी सुसंगत असाच श्लोक आहे तो. कौतुकच आहे.
शिवस्तुतीचा मूळ सुप्रसिद्ध श्लोक 'वेदाभ्यास नको श्रुती पढु नको, तीर्थासी जाऊ नको' हा सर्वांना माहीत असेलच. त्याचा शेवटचा चरण 'ज्याचीया स्मरणे पतीत तरती, तो शंभु सोडू नको' असा आहे.
14 Apr 2014 - 11:29 pm | शुचि
होय होय स्तोत्र आत्ता आथवले :) धन्यवाद. मला आधी वाटले की अनंतफंदी यांचा फटका आहे तो -
.
.
संसारामधे ऐक आपुला उगाच भटकत फिरु नको
वाला :)
14 Apr 2014 - 11:41 pm | राही
खूपच साधर्म्य आहे खरे. आणि त्यात बॅटन्त फंदी ह्यांनी एक ओळ फटका रूपात मारली. त्यामुळे ते स्तोत्र नसून फटकाच असणार असे वाटणे स्वाभाविकच. आफ्टर ऑल, बॅटन्त फंदी उवाच आहे तो.
15 Apr 2014 - 1:10 am | श्रीरंग_जोशी
मनापासून केलेलं हे लेखन खूप आवडलं अन भावलं.
स्त्री असो वा पुरुष आयुष्यात बर्याच गोष्टी पहिल्यांदा करताना आव्हान जाणवते व यशस्वीपणे पार पडल्यावर जो आत्मविश्वास मिळतो त्यास तोड नसते.
अवांतर - एक निरिक्षण
माझ्या पिढितील अनेक मुलांमध्ये एक सवय असायची. माध्यमिक शाळेत गेल्यावर पालकांचा हात सुटतो व या मुलांना घराबाहेरचे काम करताना सतत कुणीतरी सवंगडी लागायचा. जसे शिकवणी लावणे, पुस्तक खरेदीला जाणे, बिल भरणे इत्यादी. जसे एखाद्या पुढार्याचा सचिव नेहमी बरोबर असतो तसेच हा सवंगडी प्रत्येक ठिकाणी बरोबर हवाच असा अट्टहास असायचा. अक्षरशः एखाद्या मुलीला प्रेमपत्र देतानाही हा सवंगडी लागायचाच.
अशा लोकांचे पुढे जाऊन (भारतातल्या दुरवरच्या शहरात अथवा परदेशात नोकरी लागल्यास) काय होत असावे याबद्दल कुतुहल आहे ;-).
15 Apr 2014 - 7:24 am | राही
पाण्यात पडल्यावर पोहता येतं म्हणतात. तसंच होतं. विमानातली रेस्ट-रूम किंवा टीवी सारख्या सोयी कशा वापराव्या हेही माहीत नसलेली मुलं आरामात ट्रांज़िटमध्ये विमान बदलून (अगदी जे.एफ.के. सारख्या अवाढव्य विमानतळावरही)अंतर्गत रोचेस्टरसारख्या उणे सतरा तपमान असलेल्या ठिकाणी व्यवस्थित उतरतात. मला त्या ऑलिव रिड्ले कासवांच्या संरक्षित अंड्यांची आठवण येते. कुत्र्यांनी, पक्ष्यांनी खाऊ नये म्हणून पिंजर्यात झाकून ठेवलेली ती अंडी फुटताच नवजात पिले किनार्याच्या दिशेने तुरुतुरू पळत सुटतात आणि एका लाटेसरशी समुद्रात विलीन होऊन जगाच्या आणि स्वतःच्या प्रवासाला निघतात. किनार्याची दिशा त्यांना आपोआप कळते.
जाता जाता : आपल्याकडे कदाचित संयुक्त कुटुंबपद्धतीच्या प्रभावामुळे मुले फार संरक्षित असतात. त्यांच्या उच्च शिक्षणाचा भारसुद्धा आईवडील उचलतात. त्यामुळे कदाचित, लहान वयात कायदेशीर अर्थार्जन करण्याची प्रथा बालकामगार सोडले तर अभिजन वर्गात नाही. त्यामुळे थोडा आळस, भीती आणि बेफिकिरी अंगी बाणते, जी ओवरकम करण्यात उमेदीच्या काळातली शक्ती आणि वेळ फुकट जातो.
15 Apr 2014 - 12:25 pm | केदार-मिसळपाव
"यांच्या उच्च शिक्षणाचा भारसुद्धा आईवडील उचलतात. त्यामुळे कदाचित, लहान वयात कायदेशीर अर्थार्जन करण्याची प्रथा बालकामगार सोडले तर अभिजन वर्गात नाही. त्यामुळे थोडा आळस, भीती आणि बेफिकिरी अंगी बाणते, जी ओवरकम करण्यात उमेदीच्या काळातली शक्ती आणि वेळ फुकट जातो."
अगदी अगदी....
16 Apr 2014 - 2:26 am | सुवर्णमयी
लेखन आवडले
16 Apr 2014 - 3:00 am | चाणक्य
छान लिखाण. आवडल