हिमालय. त्याचं वेड लागतं.
नशीबाची साथ असेल तर नेहमीचं चाकोरीबद्ध आयुष्य जगताना कधीतरी तुम्हांला हिमालयाच्या परिसरात चलण्याची संधी मिळते. ट्रेकसाठी. सोबत कोणी असेल की नाही, आपल्याला जमेल की नाही, सुट्ट्या मिळतील की नाही, बाकी घरी आपण नसताना काही अडचण तर होणार नाही, हे आणि असे अनंत व्यर्थ प्रश्न मनात उभे राहतात. खरं तर कोणाचंच काहीच अडत नसतं, पण तरीही हिमालयापेक्षाही अडचणींचे पहाड पार करुन जाणं कठीण वाटायला लागतं.. तरीही अखेरीला सर्व काही जमून येतं आणि हिमालयाचं प्रथम दर्शन होतं! आणि मग हिमालयाचं वेड लागतं.
हिमालय. भव्य हा शब्दही खुजा वाटेल, असं त्याचं रुपडं. जणू काही एखादा भव्य दिव्य ध्यानस्थ पुराण पुरुष. एकदा हिमालयाच्या वाटा चालल्या की तिथून मन काढून घेणं महाकठीण.
कधी खळाळत वाहणारे झरे, कधी घनगंभीर नाद करत वाहणारे जलप्रपात, ऐसपैस पसरलेली हिरवीगार पठारं, त्यांचं सौंदर्य वाढवणारी रानफुलं, एकाच वेळी मनात धडकी भरवणारे आणि त्याचबरोबर रौद्र रुपाची भुरळ घालणारे करकरीत कडे आणि पहाड. घनदाट जंगलं. खोल दर्या. कधी मैलोगणती केवळ मोठमोठ्या पत्थरांचे मार्ग. झुळझुळणार्या झुळूका, सोसाटणारा बोचरा वारा, हिमवादळं. सणाणणारा पाऊस! सोनेरी पहाटवेळा, अंगार ओकणार्या दुपारवेळा. हळूहळू सभोवताल शांतवत येणार्या आणि आसमंतावर आपल्या स्निग्ध, चंदेरी प्रकाशाची चादर ओढणार्या रात्री. आकाशगंगेचं दर्शन. तुटणारे तारे. पहाडाच्या टोकावर जाऊन जरासा हात उंचावला, तर हाताला लागेल असा भला मोठा चंद्र. आभाळाच्या भाळावरचा चंदेरी टिळा.. इतकं पुरेसं नाही म्हणून ह्या सार्याला व्यापून उरणारी आणि तरीही अजूनही थोडी उरणारी प्रगाढ शांतता. अनेकविध रुपं दाखवत हिमालय चकित करुन सोडत राहतो. घेत असलेला अनुभव अजब वाटावा, तोवर पुढचा अनुभव अर्तक्य वाटत राहतो. हिमालयाची वाट चालता, चालता हळूहळू पण सातत्याने अंतर्मन हे सारं सारं टिपत जातं आणि सभोवतालच्या भव्यतेच्या जाणीवेने विनम्र बनत जातं. थोडसं दबतं, क्वचित घाबरतंही. स्वतःच्या नगण्यतेची जाणीव होते. हिमालयाला शरण जाण्याखेरीज पर्याय नसतो. एका कोणत्या तरी क्षणी हिमालयाशी आपली नाळ जुळते. खूण पटते. हिमालय त्याच्या भव्य दिव्य, क्वचित विक्राळ रुपासकटही आश्वासक भासू लागतो. आपलासा वाटतो. ह्याचसाठी तर सगळा अट्टाहास केलेला असतो! अजून काय हवं?
त्याच्या सान्निध्यात काही दिवस फार फार सुखात जातात. कसल्याही चिंता आठवत नाहीत, भेडसावत नाहीत. आनंदडोह भरुन वाहतो. तुम्हीं हो बंधू, सखा तुम्हीं हो... शब्द सरतात. सगळं नुसतं पहायचं आणि अनुभवायचं. बस्स!
आणि कधीतरी हे आनंदपर्वही संपुष्टात येतं. नेहमीच्या चाकोरीत परतायचा दिवस समोर येऊन वाकुल्या दाखवतो. नको, नको वाटतं. इलाज नसतो. डोळे पाणावल्याशिवाय रहात नाहीत. सुरु असलेल्या आनंदपर्वातून एकदम धाडकन फेकून दिल्यासारखं वाटतं! भिरभिरलेली अवस्था असताना कधीतरी लक्षात येतं की हिमालय कधीचाच मनात वस्तीला आलेला असतो. हिमालयापासून दूर जाण्याची भीती आता इतकी भेडसावत नाही. नेहमीच्या रुक्ष जगात परतण्याचा त्रास जरासा कमी होतो. कळतं, हे परतणं तात्पुरतं आहे, पुढल्या भेटीचा योग येईतोवरच. हिमालय नक्कीच पुन्हा साद देणार असतो. साद ऐकू आली की पुन्हा एकदा नगाधिराजाच्या दर्शनाची तीच बेचैनी उरी घेऊन ह्या पंढरीची वाट चालू लागायची.. अजून काय....
“There is no such sense of solitude as that which we experience upon the silent and vast elevations of great mountains. Lifted high above the level of human sounds and habitations, among the wild expanses and colossal features of Nature, we are thrilled in our loneliness with a strange fear and elation – an ascent above the reach of life's expectations or companionship, and the tremblings of a wild and undefined misgivings.."
*****
सप्टेंबर २०१३ मध्ये मी काश्मीरमध्ये सोनमर्गच्या पुढे हिमालयामध्ये एक ट्रेक केला, त्या दरम्यान काढलेल्या प्रकाशचित्रांपैकी काही.
प्रतिक्रिया
24 Jan 2014 - 8:11 pm | मधुरा देशपांडे
अप्रतिम वर्णन आणि फोटो
24 Jan 2014 - 8:13 pm | स्वाती दिनेश
यशो,
सुरेख वर्णन आणि फोटो..
स्वाती
24 Jan 2014 - 8:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरेख वर्णन आणि स्सही फोटो.
''कधी खळाळत वाहणारे झरे'' पासून ते ''आभाळाच्या भाळावरचा चंदेरी टिळा'' पर्यंत आलेलं वर्णन केवळ क्लास.
बाकी, लेख आवरल्यासारखा वाटतोय. अर्थात पुढील भाग असेल तर प्रतिक्षेत.
-दिलीप बिरुटे
24 Jan 2014 - 8:37 pm | यशोधरा
प्रा डॉ, इतकाच लेख. पुढे मग शब्द संपले. :)
28 Jan 2014 - 12:53 am | विजुभाऊ
खरच स्वप्नवत.
स्पीचलेस.........
24 Jan 2014 - 8:26 pm | किसन शिंदे
निव्वळ सुरेख फोटो! डोळ्याचे पारणे फिटलं.!!
बहुत दिसापासून या फोटो आणि लेखाची वाट पाहत होतो. शेवटून दुसरा...नाही शेवटाचा, नाही नाही...तिसरा.! जाऊ दे...सगळेच फोटो स्वप्नवत आले आहेत. :)
24 Jan 2014 - 8:30 pm | आदूबाळ
काय जब्बरदस्त फोटो!
बर्याच फोटोंना एक इंप्रेशनिस्ट लुक आला आहे. टचप केले आहेत का?
24 Jan 2014 - 8:35 pm | यशोधरा
पोस्ट प्रोसेसिंग केलेलं आहे आदूबाळ, अर्थात, फोटो अगदीच बदलून टाकण्याइतकंही नाही.
24 Jan 2014 - 8:32 pm | इन्दुसुता
यशो,
सुरेख वर्णन आणि फोटो..
अगदी असेच म्हणते
24 Jan 2014 - 9:06 pm | जेनी...
सुंदर .... पूढे शब्द संपले !
24 Jan 2014 - 9:17 pm | अजया
यशो,किती भाग्यवान आहेस तू हे सर्व बघितलस पण,मनात साठवलस पण आणि सुंदर शब्दात व्यक्त पण करु शकलीस!
24 Jan 2014 - 9:41 pm | प्यारे१
@धागाकर्ती यशोधरा,
सुंदर वर्णन नि अफाट प्रकाश चित्रं.
छानच.
24 Jan 2014 - 9:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर शब्दांत हिमालयाबद्दलची भावना पकडली आहे ! फोटोही सुंदरच !
एकदा हिमालयाची सफर केली की नुसतं हिमालय हे नाव समोर आलं की मनात जरास गलबलतंच.
24 Jan 2014 - 9:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर शब्दांत हिमालयाबद्दलची भावना पकडली आहे ! फोटोही सुंदरच !
एकदा हिमालयाची सफर केली की नुसतं हिमालय हे नाव समोर आलं की मनात जरास गलबलतंच.
24 Jan 2014 - 10:06 pm | मीराताई
लेख आणि फोटो, दोन्हीही अप्रतिम आहेत.
24 Jan 2014 - 10:28 pm | आनन्दिता
अप्रतिम....
डोळ्याचं पारणं फिट्लं!!
24 Jan 2014 - 10:40 pm | भटक्य आणि उनाड
अप्रतिम वर्णन... हिमालयात राहतोय...अनुभवतोय..आमचि अर्धी नोकरी हिमालयाजवळ..
24 Jan 2014 - 10:56 pm | मोदक
लकी आहात राव.
छ्या.. :(
25 Jan 2014 - 4:28 am | यशोधरा
हायला! नशीबवान आहातच पण हिमालयापाशी/ त मुक्काम सोपा नाही! दंडवत तुम्हांला.
25 Jan 2014 - 10:59 am | भटक्य आणि उनाड
___/\___ ___/\___
24 Jan 2014 - 10:41 pm | अर्धवटराव
तू तिकडेच वस्ती कर. आठवडाभर फिरुन विकेंडला असे धागे टाक. आमच्या आठवडाभराच्या मौसगीके लिए इतना काफी असेल.
निव्वळ अप्रतीम.
25 Jan 2014 - 4:51 am | यशोधरा
तू तिकडेच वस्ती कर. >> अग्गागा! नुसत्या कल्पनेने जीव हरखला की :)
24 Jan 2014 - 10:43 pm | सखी
सगळचं अप्रतिम आहे, फोटो तर क्लासचं, तिथ प्रत्यक्षात बघताना तर काय होत असेल. खरचं भाग्यवान आहेस तु,तुला हे सगळं अनुभवता आलं. खूप दिवस वाट पहात होते याची.
24 Jan 2014 - 10:57 pm | सर्वसाक्षी
सर्वच चित्रे अतिशय सुरेख, खूप आवडली. शेवट्ची दोन तर खास आवडले.
24 Jan 2014 - 11:00 pm | आतिवास
याची वाट पहात होते.
"देर आये; दुरुस्त आये" :-)
24 Jan 2014 - 11:07 pm | पहाटवारा
यशोधरा .. अप्रतीम फोटो अन मुक्तकहि.. मस्ट से .. काण्ट अग्री मोर !
हिमालय अन त्याच्या पायथ्याचा परिसर .. हिमाचल, गढवाल्-कुमाउं-ऊत्तरांचल अन थेट पूर्वे़कडे कालिम्पोंग-दार्जीलिंग, गंगटो़क ..सगळिकडची त्याची जादू अनुभवलीये... यातला कुठला अधीक सुंदर असा प्रश्न पडावा..
हिमालय म्हंटले की डोळ्यापुढे हिमशिखरांच्या रांगा येतात .. पण तुमच्या फोटोंमधून जाणवणार्या .. त्याच्या कुशीत लपलेल्या हिरवाईची अन खळखळणार्या पाण्याचीहि तितकीच किमया आहे .. जसेहि ऊत्तरेकडून पूर्वोत्तराकडे जावे, तस-तसे ठिक्-ठिकाणाचे वेजीटेशन( मराठि??) बदलते पण जादू तीच !
असे फोटो पाहिले कि एकच प्रश्न पडतो .. आता परत कधी जमेल..???
-पहाटवारा
25 Jan 2014 - 11:06 am | यशोधरा
पहाटवारा, माझिया जातीचे मज भेटो कोणी.. :)
29 Jan 2014 - 8:54 pm | वडापाव
वेजीटेशन = वनश्री
24 Jan 2014 - 11:16 pm | तुमचा अभिषेक
काय क्लास फोटो आहेत.. बरेच फोटो पाहून फोटोच आहेत की चित्रे की आणखी काही.. निव्वळ अप्रतिम... आपण कुठल्यातरी शहरी खुराड्यात राहतोय असे वाटायला लागलेय हे बघून..
24 Jan 2014 - 11:18 pm | तुमचा अभिषेक
लेखही तितकाच सुंदर !!!
24 Jan 2014 - 11:24 pm | प्रचेतस
नितांत सुंदर, फोटो आणि लेख दोन्हीही.
24 Jan 2014 - 11:27 pm | धन्या
मस्त !!!
फोटो खुपच सुंदर आहेत.
24 Jan 2014 - 11:44 pm | विनोद१८
यशोधराबाई, अतिशय सुन्दर लिखाण. तुम्ही शब्दातून उभा केलेला हिमालय तितक्याच प्रभावीपणे प्रकाशचित्रातुन सादर केलाय. शब्द-चित्रान्च्या अप्रतिम मिलाफाचा उत्तम नजराणा सादर केलाय. त्याबद्दल धन्यवाद.
@ इ.ए. तुम्ही म्हणालात 'एकदा हिमालयाची सफर केली की नुसतं हिमालय हे नाव समोर आलं की मनात जरास गलबलतंच.' सहमत, त्याची मनाला एक आस लागुन राहते, हिमालय पाहिला की स्वता:ला विसरायला होते हे खरे.
विनोद१८
24 Jan 2014 - 11:45 pm | अत्रुप्त आत्मा
जब्बरदस्त! __/\__
25 Jan 2014 - 12:08 am | सानिकास्वप्निल
अप्रतिम फोटोज आणी सुरेख वर्णन +१
___/\___ ___/\___
25 Jan 2014 - 12:28 am | संजय क्षीरसागर
आणि सुरेख वर्णन.
25 Jan 2014 - 1:34 am | श्रीरंग_जोशी
वाह, काय ते वर्णन, काय ती चित्रे..... नि:शब्द!!
25 Jan 2014 - 2:07 am | आनन्दिता
ताई ट्रेक बद्दल अजुन माहीती दिलीस तर बरे होईल.. म्हणजे ट्रेक चं स्वरुप, ट्रेक कोण अरेंज करतं, मार्ग कसा आहे, वगैरे वगैरे...
25 Jan 2014 - 4:50 am | यशोधरा
हो, लिहिते इथेच.
25 Jan 2014 - 2:20 am | रेवती
चित्रे भारी आलीयेत. वर्णन करता येणं अशक्य आहे हे आधीही एकांकडून ऐकल्याने कमी वर्णन समजून घेतले आहे.
25 Jan 2014 - 2:31 am | मयुरा गुप्ते
सुंदर चित्रदर्शी वर्णन आणि त्याहुनही अप्रतिम फोटोस...
-
मयुरा.
25 Jan 2014 - 4:50 am | यशोधरा
सर्वांचे मनापासून आभार. :)
25 Jan 2014 - 4:58 am | नंदन
वर्णन आणि फोटो - दोन्ही अप्रतिम!
दोनेक महिन्यांपूर्वी हिमालयाचं निवांत दर्शन घ्यायचा सुदैवाने योग आला होता; त्यामुळे वाचताना अनेक खुणा पटत गेल्या.
25 Jan 2014 - 7:22 am | जुइ
वर्णन आणि फोटु दोन्ही भावले.
25 Jan 2014 - 9:35 am | ज्ञानोबाचे पैजार
अत्युत्तारस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज:।
पूर्वापरौ तोयनिधी वगाह्य स्थित: पृथिव्या इव मानदण्ड:॥
26 Jan 2014 - 6:07 pm | पिवळा डांबिस
फोटो पाहून अगदी याच ओळी मनात आठवल्या!!!!
सुरेख!!
25 Jan 2014 - 10:14 am | सुहास..
व्वा !
25 Jan 2014 - 10:18 am | चौकटराजा
हे वर्णन वाचून दुर्गाबाई भागवत यांच्या " ऋतुचक्र" ची आठवण यावी इतकं दर्जेदार लेखन आहे.प्रकाशचित्रेही भारीच आलीयत. इथे काही फिल्टर्स वापरले आहेत काय? कारण मधे वातावरण येकदम किल्यर दिसतेय म्हणून .
हिमालयावरून एक आठवले- ओ पी च्या संगीतात कश्मीरातील हिमाल दिसतो. रवींच्या कुमाउतला तर एस डी आर डी च्या
मधे पूर्वांचल मधला.
'डोळीयासी शीतलता मनासी शांतता हिमालयाची ही महता तोचि भारताचा त्राता ' असे म्हणावेसे वाटते.
25 Jan 2014 - 10:55 am | मृत्युन्जय
वर्णन करायला शब्द संपले. अवर्णनीय म्हणता येइल. काय सुरेख फोटो आहेत. काश्मीरला जाउन आलो आहे आणि फोटोही काढलेत. ते चांगले काढले आहेत असे माझे मत आहे. होते. हे फोटो पाहिल्यावर मी त्या काश्मीरवर आणि हिमालयावर किती अन्याय केला आहे ते कळाले. निव्वळ सुख. दुसरा शब्दच नाही.
25 Jan 2014 - 11:09 am | तिमा
हिमालय हा स्वर्गच आहे, आणि तो तुम्ही मूर्तिमंत उभा केलाय. आधी मुक्तकातून आणि त्यानंतर उत्कृष्ट फोटोंतून.
तुमचे फोटो पाहिल्यावर आमचा कॅमेरा कायमचा म्यान करावासा वाटतोय.
25 Jan 2014 - 10:44 pm | पैसा
क्लास अपार्ट!
25 Jan 2014 - 11:03 pm | सस्नेह
खरंच शब्द सरले.
फोटो अधिक सुरेख की शब्द अस प्रश्न पडला.
25 Jan 2014 - 11:32 pm | कवितानागेश
...हरवलेय. परत सापडले की लिहिते.
26 Jan 2014 - 4:26 pm | रुस्तम
मस्त........... जबरदस्त......
26 Jan 2014 - 4:59 pm | कुंदन
मस्त आहेत सगळेच फोटो.
27 Jan 2014 - 12:23 pm | यशोधरा
सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार! :)
27 Jan 2014 - 12:32 pm | दिपक.कुवेत
अतिशय ओघवतं........लिहिलेल्या प्रत्येक शब्दागणीक आम्हिहि ते अनुभवतो आहोत असं वाटतय. फोटो तर निव्वळ अप्रतिम. फोटो नुसते ईथे पाहुन हि हालत होतेय तर प्रत्यक्षात तिथे काय होत असेल ह्याची कल्पनाच करवत नाहि. असा निसर्ग सोडुन येताना डोळे पाणावले आणि जीव गलबलला नाहि तर नवलच. फोटो अजुन असले तर टाक किंवा लिंक दे कि.
27 Jan 2014 - 1:30 pm | मुक्त विहारि
शेवटी आज वाचला...
आणि परत एकदा न्युनगंड निर्माण झाला.
एका पेक्षा एक सुंदर फोटो आणि तसेच अप्रतिम वर्णन...
सरस्वती आणि फोटोग्राफीची कला, दोन्ही प्रसन्न असलेली माणसे फार दुर्मिळ.
(तुमच्या अशाच वाचनेबल लिखाणाच्या प्रतिक्षेत) मुवि.
27 Jan 2014 - 3:40 pm | बॅटमॅन
फोटो अतिशय आवडले. अजून टाकले असते तर अजून मजा आली. फटू पाहून नि:शब्द व्हायला झाले खरेच.
27 Jan 2014 - 4:22 pm | गणपा
एक एक फोटो निव्वळ अप्रतीम !
27 Jan 2014 - 4:26 pm | सूड
सहीच !!
27 Jan 2014 - 4:43 pm | arunjoshi123
आवडले.
27 Jan 2014 - 5:08 pm | प्रमोद देर्देकर
सगळे फोटो अप्रतिम , शेवटुन २ रा तर लाजवाब मी वॉलपेपर म्हणुन कॉपी करुन घेतलाय.
बाकी कुठुन कसा कसा प्रवास झाला हे सर्व वाचायला आवडेल. शिवाय कोणता कॅमेरा वापरलाय.
माझी काश्मीरची सहल मे-२०१४ ला पक्की झाली आहे तेव्हा या सर्वाचा उपयोग होइल.
धन्स
27 Jan 2014 - 7:03 pm | यशोधरा
धन्यवाद. कॅमेरा Nikon D 60, लेन्सेस 18-55 आणि 55-200. वाइड अॅंगल असावी असं फार वाटलं. तुम्ही कुठे जाणार हिमालयात? ट्रेकींग की साइट सीईंग? तुम्हांला नक्की काय माहिती हवी आहे ते सांगितलं तर तसं त्या अनुषंगाने सांगता येईल.
ओह, तुम्ही काश्मीरात फिरणार आहात, मी खूप नाही फिरले काश्मीर पण, श्रीनगरमध्ये दाल लेक मस्ट. शिकार्यात बसून नेहमीची सहल तर कराच पण दाल लेक backwaters जरुर पहा. कमळांची वाहती शेती पहा.श्रीनगरला श्री आदि शंकराचार्यांची समाधी आहे. जरुर पहा. (मला जमले नाही :( पण, मी जिथे राहिले होते, तिथून रोज दर्शन होत होते. स्थापत्यशास्त्रही फार सुरेख आहे म्हणे. तिथे लष्कर आहे, एकदम सेफ. सोनमर्ग पहा. स्वर्गाची सुरुवात इथून होते :) आणि सगळ्यात महत्वाचे, लष्कराचे ऐका.
मी सुट्टी आणि प्रवास हे समीकरण जुळवण्याच्या दृष्टीने ते दिल्ली आणि दिल्ली ते श्रीनगर हा प्रवास विमानाने केला. येताना परतीचा प्रवासही तसाच. श्रीनगराला पोचल्यावर सोनमर्ग गाठलं - वेळ ४ तास. तिथे बेस कॅम्प. तिथून पुन्हा ३ -४ किमीवर निचनई पासपरेंत जीपने. निचनई पासपाशी पोहोचल्यावर चढायला सुरुवात करायची. इथून जनसंपर्क जवळजवळ सुटल्यात जमा. फोनची रेंज वगैरे विसरायचं आणि सुखाने जगायला सुरुवात करायची! ;)
सोनमर्ग ७८०० फू -निचनई पास व शेकदुरु ११५०० फू - विशनसर + किशनसर हे जुळे तलाव (शेवटचा फोटो, सर = तलाव)१२००० फू -गडसर पास १२५०० फू - गडसर १२००० फू - सतसर १२०००फू (एकामागून एक असे सात तलाव) - झच पास (१३५०० फूट) - गंगबाल आणि नंदकोल जुळे तलाव ११५०० फू - नारनाग ७४५० फू ( ही पूर्ण उतरण आहे ४५ अंशातली. ) इथून जीपने श्रीनगर, दुसर्या दिवशी परतीचा प्रवास.
अजून एक सुरेख अनुभव म्हणजे भारतीय लष्कराशी झालेली गाठभेट, झालेल्या गप्पा. तीनही लष्करी कॅम्प्सवर मराठी जवान/ सैनिक मोठ्या संखेने होते आणि त्यांच्याशी हिमालयाच्या भूमीवर मराठीतून गप्पा मारताना मला काय वाटलं हे मी सांगूच शकत नाही! भारतीय लष्कर काय चीज आहे हे समजायला प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी कोअर हिमालयात फेरी मारावी.
काळजी करु नका. आम्ही आहोत, काहीपण गरज लागली तर आमच्याकडे सांगावा धाडा, सांगणारे आपले सैनिक. रात्री खूप थंडी पडली म्हणून आम्ही कॅंपमध्ये सुरक्षित आहोत की नाही, कसली गरज तर नाही हे ४-५ किमीचा रस्ता तुड्वून जातीने येऊन पाहणारे सैनिक. तेही रात्री! त्यांच्या जिवावर आम्ही खुल्या दिलाने आणि निर्भय होऊन फिरलो. त्यांच्या विषयी वेगळे लिहायचे मनात आहे, पाहूयात कसे जमते.
मराठीच लोक येत्यात हो हितं जास्त करुन! सह्याद्रीची खाज असती ना रगतात! मग काय तर! इति एक जवान :) आणि खर सांगू तर, ट्रेकसाठी निचनईला पहिलं पाऊल पुढे टाकलं तसा सह्याद्री आठवल्याशिवाय राहिला नाही. परत येताना शेवटच्या टप्प्यावर एका कमांडोने विचारले, कैसा लग रहा हैं? त्याला उस्फूर्तपणे सांगितले, सारे जहाँसे अच्छा! :)
ओह, आणि अजून एक. एके- ४७ हातात धरली राव! कस्लं सह्ही! :) अर्थात, मॅगॅझिन काढून मगच दिली धरायला ;)
28 Jan 2014 - 1:33 pm | प्रमोद देर्देकर
धन्स सगळ्या उत्तरांना . आत्तापर्यंत हे सगळे हिन्दि पिक्चर फिल्म मध्ये पहात आलोय. जुनी कितितरी गाणी जसे ए निले गगन के तले, बेताब व्हॅली वगैरे. तेव्हा तिथला निसर्ग मोठी मोठी झाडे हे सर्व
तिथे खुप काळ राहुन सगळा परिसर बघावेसे वाटते. पण तुम्ही उल्लेखल्या प्रमाणे आपणच मनावर घेत नाही, काही ना काही कारणं सांगुन ते मागेच राहते आता स्वःता हा जावुन येईन तेव्हा खुप छायाचित्र काढेन.
28 Jan 2014 - 8:21 pm | सखी
यशो छान माहीती दिली आहेस, मी नोंद करुन ठेवते आहे तु दिलेल्या टीपा. तु इथे कुठल्यातरी ट्रेक/ग्रुपबरोबर गेली होतीस का? असशील तर ती पण माहीती दे ना प्लीज. तुला काही खास ट्रेनींग घ्यावे लागले का? किती दिवसांची होती ही ट्रिप? साधारण खर्च किती आला? लहान मुलांना नेता येण्यासारखं आहे का (५ वर्षाच्या पुढे)?
28 Jan 2014 - 8:58 pm | यशोधरा
हो सखी. मी बंगलोरच्या एका ट्रेक्स अरेंज करणार्या कंपनी थ्रू गेले होते. केवळ ट्रेक्च खर्च ११,०००/- ह्यात प्रवासाचा खर्च अंतर्भूत नाही. तो तुमचा. इतरही खर्च साधारण २००० ते ३००० धरुन चाल.
खास ट्रेनिंग घेऊ शकलीस तर उत्तमच पण मी असे काही घेतलेले नाहीये. आठवड्याचा ट्रेक. लहान मुलांसाठी हा ट्रेक अजिबात नाही. इनफॅक्ट मुलांसाठी नाहीच. खरं तर एका बॅच मध्ये ११ -१२ वर्षांचा मुलगा होता आपल्या आई बाबांसोबत. पण हा खरंच कठीण ट्रेक वाटला मला. नशीबाने त्या मुलाने पण एंजॉय केला वगैरे ठीके पण रिस्क घेऊ नयेत. मध्ये वाटेत असताना एकदा आमचा गाईडच डी हायड्रेट झाला म्हणजे पहा.
बर्यापैकी कठीण चढ उतार, केवळ पत्थरांवरुन चालत जाणे (हे boulders पार करायला मला जाम भीती वाटत राहिली सतत), मैलोनमैल चालणे, हिमालयातला पाऊस, सडकवणारा गारांचा वर्षाव, कधी घसरडे रस्ते, २ एक ठिकाणी अतिशय गार पाण्यातून नाले ओलांड्णे -आणि इथे पाण्याला बराच फोर्सही असतो - वगैरे शारीरीक आणि मानसिक कस पाहणारा असा ट्रेक आहे. तू करणार का? तसे असेल तर आत्तापासून फिट्नेस वाढवायला सुरु कर. :) बेस्ट लक. :)
त्याआधी सोपे आणि छोटे ट्रेक करत रहा.
28 Jan 2014 - 10:57 pm | विकास
बर्यापैकी कठीण चढ उतार, केवळ पत्थरांवरुन चालत जाणे....
त्या बिचार्या हिमालयाचे असे मार्केटींग करता काय? ;)
बाय द वे, हे तुम्ही उन्हाळ्यात केले असणार. तरी देखील हिमालयातला उन्हाळा म्हणजे तापमान कसे असते?
29 Jan 2014 - 8:56 am | यशोधरा
हिमालय कधीच बिचारा नसतो, कधीच नाही :)
हा ट्रेक पोस्ट समर कराययच्यापैकी आहे.उन्हाळ्यानंतर. हिमालयात तापमान अतिशय बदलते असते. वारे, पाऊस, मळभ ह्यावर फार अवलंबून असे वाटले. हा माझा पहिलाच कोअर हिमालयातील ट्रेक होता. पाऊस, बर्फांच्या गारा वगैरे पडल्या की हवामान एकदम खाली उतरते, इतके की पोटातून कुडकुडायला होते. पहिल्याच दिवशी अशा पावसाचा दणका आम्हांला मिळाला. दुसर्या दिवशी सूर्यनारायण मेहेरबान होऊन कपड्यांसकट आम्हीही सुकायची वेळ आली!
पण रात्रीचे - पहाटेचे तापमान सिंगल डिजीटमध्ये जाते. पहाटवेळा चक्क उबदार असू शकतात. दुपारची उन्हे कडक असतात. तेह्वा डबल डिजिटमध्ये. अर्थात पाऊस वगैरे कोसळला की लगेच उतरते तापमान, कारण तिथे पाऊस पडताना पाहिलाच नाही, कोसळतोच एकदम!
मात्र, तापमानाचे नक्की आकडे माहित नाहीत. :) पुढल्या वेळेस नक्की नोट करेन. ;)
29 Jan 2014 - 7:55 pm | सखी
धन्यवाद यशो. मग सध्यातरी अवघडच दिसतयं कारण सध्या ट्रेक करणं शक्य नाही, पूर्वी करायचो. तुम्हाला उंचीवर जाण्यासाठी काही खास गोष्टी घ्याव्या लागल्या का? तसेच थंडीसाठी आणि पावसासाठी संरक्षण म्हणूनही काही बरोबर घ्यावेच लागले असेल ना? तु ज्या कंपनीतर्फे गेली होतीस त्यांची साईट असेल तर दे ना. अंदाज घेतीय कशा पध्दतीचा ट्रेक आहे हा, म्हणून इतके प्रश्न :)
29 Jan 2014 - 11:06 pm | यशोधरा
तुम्हाला उंचीवर जाण्यासाठी काही खास गोष्टी घ्याव्या लागल्या का? - एक स्वेटर, एक जॅकेट. थर्मल्स. लेयर्स मध्ये कपडे घालायचे. म्हणजे २ टीशर्ट्स - त्यावर स्वेटर वगैरे असे. बाकी ग्लोव्ज, लोकरी टोपी. लोकरी पायमोजे. रेनकोट किंवा पाँचो.
www.indiahikes.in.
27 Jan 2014 - 6:39 pm | Mrunalini
वाव... काय सुरेख फोटो आहेत. खुप सुंदर
27 Jan 2014 - 6:44 pm | शिद
एकदम सही फोटो आले आहेत सगळे.. लॅपटॉपचे वॉलपेपर शोभतील असे.
27 Jan 2014 - 7:25 pm | मूकवाचक
आणि अप्रतिम लेख! _/\_
27 Jan 2014 - 8:05 pm | विकास
एकदम सुंदर फोटो आणि वर्णन!
“There is no such sense of solitude as that which we experience upon the silent and vast elevations of great mountains..."
या वरून मला, मला वाटते कवी अनीलांची एक कविता आहे, ती आठवली: "अशाच एखाद्या तळ्याकाठी बसून रहावेसे मला वाटते, जेथे शांतताच निवारा शोधत थकून आलेली असते" अशा काहीशा त्या ओळी होत्या. येथे नुसते तळे अथवा पाणीच नाही तर सभोवताल असा मिळत असेल.
अजून वर्णन वाचायला आवडेल. धन्यवाद!
27 Jan 2014 - 8:18 pm | यशोधरा
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते
जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते
जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही
गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही
सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारुन मासळी, मधूनच वर नसते येत
पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपर्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो
हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते,
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते!
- अनिल
27 Jan 2014 - 8:48 pm | विकास
अरे वा!
धन्यवाद! तुम्ही काढलेली छायाचित्रे बघताना आणि वर्णन वाचताना आज अनेक वर्षांनी ही कविता आठवली. जालावर पटकन शोधायचा प्रयत्न केला पण कदाचीत चुकीचे शब्द घातल्यामुळे असेल पण मिळाली नव्हती! :)
28 Jan 2014 - 1:22 am | उपास
मस्तच..
21 Jan 2016 - 8:47 pm | राघव
अप्रतीम कविता.. लेख.. फोटू.. अन् अनेक अव्यक्तही.. __/\__
राघवा.. इथं जीव ओवाळावा असा हिमालय.. वर्णन करणार यशो.. अन् बधीर तू!
मायो, तुझ्या पावलांचे फोटू काढून पाठवून दे कसे जरा... नमस्कार घालावा म्हणतो..!
स्वगतः छ्या... हे काही बरोबर नाही हां राघवा.. असे कसे इतके छान धागे सुटतात तुझ्या नजरेतून.. :(
28 Jan 2014 - 1:35 am | प्रभाकर पेठकर
हिमालयाचे सौंदर्य, भव्यता छायाचित्रांद्वारे डोळेभरून पाहता आले आणि शब्दांनी आंजारुन-गोंजारुन मनपक्षास रोमांचित केले.
चवथ्या छायाचित्रात डोंगर उतारावर कांही दगड पडताना दिसत आहेत ते काय आहे?
28 Jan 2014 - 9:03 am | यशोधरा
पेठकरकाका, तो फोटो गडसर पास चढताना काढलेला आहे. किशनसरपासून वर चढताना. खुरटं गवत आणि छोटे मोठे दगड. लोक वर चढताना दिसत आहेत. मध्येच तलावात पत्थर आहेत. वरुन फोटो काढल्याने लहान वाटत आहेत, प्रत्यक्षात मोठे आहेत.
28 Jan 2014 - 9:20 am | विकास
मला देखील तो प्रश्न पडला होता. पण आता कळले की ते आकाश नसून आकाशाचे प्रतिबिंब आहे आणि डोंगर उतार आहे...
28 Jan 2014 - 9:23 am | यशोधरा
हो, आकाशाचे प्रतिबिंब आहे :) आणि पहाडाचा उतार आहे.
28 Jan 2014 - 2:57 pm | प्रभाकर पेठकर
छायाचित्रे पाहताना छायाचित्राचा वरचा भाग संगणकाच्या कक्षेबाहेर गेला. उर्वरित भाग न्याहाळताना ते आकाशाचे प्रतिबिंब आहे हे लक्षात आले नाही. आता पुन्हा पाहिल्यावर भ्रमनिरास झाला. धन्यवाद.
28 Jan 2014 - 5:03 am | चित्रगुप्त
केवळ अद्भुत..
28 Jan 2014 - 9:44 am | विटेकर
देवतात्मा हिमालय !
28 Jan 2014 - 9:49 am | यशोधरा
देवतात्मा >> अगदी, अगदी :)अगदीच त्रिवार सत्य. हिमालय केवळ दगडा मातीचा बनलेला नाही. त्याला स्वतःचं अस्तित्व आहे आणि हिमालयातून फिरताना ते खरंच जाणवतं. ही माझी हिमालयात दुसरी खेप होती आणि ह्याहीवेळी मी हाच अनुभव घेतला आहे.
28 Jan 2014 - 9:56 am | विटेकर
म्हणून तर हिमालयाला भारतमातेचे मस्तक म्हटले आहे.
.
.
.
.
.
मस्तकपर हिमराज विराजित उन्नत माथा माता का |
चरण धो रहा विशाल सागर देश यही सुंदरता का ||
28 Jan 2014 - 11:54 am | राही
अप्रतिम प्रकाशचित्रे. शब्दचित्रेही सुंदर, पण फोटोज़ कणभर सरसच.
28 Jan 2014 - 12:19 pm | हासिनी
अप्रतिम फोटो!
:)