कुंडलिनी...हठयोग
मागे पातंजल योगशास्त्रावर लेख लिहला होता तेव्हा कांही जणांनी कुंडलिनी बद्दल विचारणा केली होती. आज आपण त्या संबंधी थोडी माहिती पाहू.
सर्व जण मान्य करितात की ब्रह्माचा-परमात्म्याचा अंश प्रत्येक जीवात वास करत असतो. पण जीवाला त्याची जाणिव नसते. अद्वैत तत्वज्ञान सांगते की मायेचा पडदा जीवावर अज्ञानाचे झापड घालतो. हा पडदा दूर केला की जीवाला आपण ब्रह्मच आहो याची जाण होते. हठयोगात हे जरा निराळ्या पद्धतीने सांगितले आहे. त्यांनी "कुंडलिनी" नावाची एक शक्ती प्रत्येकाच्या शरीरात वास करीत असते असे मानले. ही शक्ती निद्रित असते. ती झोपलेली आहे म्हणून तुम्हाला "जाण" नाही, तुम्ही जर तिला "जागृत " करू शकला तर तुम्हाला समाधी लाभते, तुम्ही ब्रह्माशी एकरूप होता. सर्व हठयोग्यांचे "लक्ष्य" एकच, कुंडलिनी जागृत करणे. हठयोगाची माहिती पहिल्यांदी करून घेऊ व मग कुंडलिनीकडे वळू.
पातंजल योगशास्त्रात आसनाला महत्व नाही. करीत असलेली कुठलीही गोष्ट सुखकारक रीतीने करतां यावी एवढीच आसनाकडून अपेक्षा. हठयोगात मात्र आसन, प्राणायाम, मुद्रा, बंध यांना फार महत्व आहे, किंबहुना तो यांवरच अवलंबून आहे. प्रथम शरीराच्या तंदुरुस्तीकरता सुरवात झाली असावी पण पुढे मात्र त्याचे ध्येयही पारलौकिक गती हेच ठरले. आज योगासने म्हणून जे काही शिकवले जाते ती ही वरील आसनेच. आपणास लक्षात आले असेलच की मुख्य आसने ही मेरुदंड (पाठीचा कणा) व पोट यांचे आरोग्य सुधारावयास मदत करतात. इतर फायदे तदनुषंगाने प्राप्त होतात. तर अशा या आसनांवर प्राविण्य मिळवणे ही पहिली बाब. या आसनांच्या सहाय्याने शरीरातील "नाड्या" शुद्ध करणे हा प्रमुख उद्देश असतो. नाडी म्हणजे जीच्या मधून शरीरातील शकीचे अभिसरण होते ती. शरीरविज्ञानातील शीर, मज्जा, नस वगैरे यांचा हिच्याशी काहीही संबंध नाही. तर प्राणायाम व आसने यांच्या सहाय्याने आपणास या नाड्यांवर विजय मिळवून त्यांना शुद्ध करावयाचे असते. जास्त माहिती पुढे येणारच आहे. त्याच बरोबर षटकर्मे म्हणून आणखी एक महत्वाची बाब इथेच बघू. शरीरात मेदवृद्धी असणे, कफवातादी विकारांचे प्राबल्य असणे इत्यादी विकारांवर मात मिळवण्यासाठी साधकाने (१) धौती, (२) बस्ती, (३) नेती, (४) त्राटक, (५) नौली व (६) कपालभाती ही षटकर्मे उपयोगात आणावीत.. बर्याच जणांना केरलीय आयुर्वेदिक पद्धतीत्तील "पंचकर्मे" माहीत असतीलच. इथे त्यांची जास्त माहिती देत बसत नाही पण शरीरशुद्धी हा महत्वाचा उपयोग.
प्राणायाम हा तिसरा महत्वाचा भाग. याचीही इथे जास्त माहिती देत बसणे उचित होणार नाही. फक्त एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहोजे की प्राणायाम म्हणजे केवळ श्वासोच्छ्वास नव्हे. ज्याच्या जोरावर ही क्रिया चालू असते त्या शक्तीला "प्राण" म्हणावयाचे व या शक्तीच्वा निरोध करावयास शिकणे म्हणजे प्राणायाम. प्राणायामाच्या अभ्यासात येतात मुद्रा व बंध. प्राणायाम करतांना तुमचे शरीर जा स्थीतीत आहे त्याला म्हणावयाचे मुद्रा, बंध. ब्रह्म, योग, सिंह, शांभवी, काकी या काही महत्वाच्या मुद्रा व महा, उड्डियान, जालंधर, मूल वगैरे काही मह्त्वाचे बंध. यातील तीन बंध आपण कुंडलिनीच्या संदर्भात बघणार आहोतच.
वरील पाच गोष्टींवर काबू मिळवणे म्हणजे हठयोगाचा अर्धा अभ्यास पुरा करणे. पण या सर्व क्रिया "शारीरिक" आहेत. हे झाले साधन, "साध्य", ते पुढेच आहे.
हठयोग ही एक कष्टसाध्य साधना आहे. हठ म्हणजे बलात्कार. स्वत:चे शरीरावर बलात्कार करून, त्याला कष्ट देऊन करावयाची साधना म्हणजे हठयोग. दुसरा अर्थ : ह म्हणजे उजव्या नाकपुडीतून व ठ म्हणजे डाव्या नाकपुडीतून वाहणारा श्वासोच्छ्वास. या प्राणापानांचे ऐक्य घडवून आणणे हे साध्य..हे फार कष्टप्रद आहे म्हणून हा हठयोग.
शरीरात ७२००० नाड्या आहेत. त्यातील ईडा, पिंगला व सुषुम्ना ह्या महत्वाच्या. नेहमी ईडा व पिंगला ह्या दोन नाड्यांमधून प्राणशक्ती वहात असते. त्यांच्यावर ताबा मिळवणे हे उद्दिष्ट.
पाठीच्या कण्यात दोन बाजूस इडा व पिंगला या नाड्या असून मध्ये सुषुम्ना आहे. सुषुम्ना मस्तकातील शहस्रार चक्रापासून खालील मुलाधार चक्रापर्यंत आहे. (चित्र पहा).
इडा व पिंगला या दोन नाड्यांमधून प्राणवायु वहात असतो. तो त्यांचा मार्ग बंद करून त्यांना सुषुम्ना नाडीतून वहावयास लावणे हा पहिला भाग. प्राणायाम, जालंधर बंध, उड्डियान बंध व मूलबंध यांच्या सहाय्याने प्रथम वर जाणारा प्राणवायु व खाली सरणारा अपान वायु यांच्यावर विजय मिळवून त्यांची दिशा बदलली जाते. हे दोन वायु एकमेकावर आदळून सुषुम्ना नाडीत प्रवेश करतात. तेथे ते उष्णता निर्माण करतात व निद्रित कुंडलिनीला जागृत करतात.
कुंडलिनीची माहिती पुढील भागात.
शरद
प्रतिक्रिया
17 Dec 2013 - 5:16 pm | स्पा
इंटरेस्टिंग
वाचतोय
17 Dec 2013 - 6:28 pm | इष्टुर फाकडा
पुभाप्र !
17 Dec 2013 - 5:22 pm | अनिरुद्ध प
फोटु दिसत नाही आहे.
17 Dec 2013 - 5:37 pm | नीलकांत
उत्सुकता आहे. पुढच्या भागाची वाट बघतो आहे.
17 Dec 2013 - 6:00 pm | सुहास..
आवडेश !!
अवांतर : कबीरा बंद का केलात ?
17 Dec 2013 - 6:31 pm | मुक्त विहारि
पु.भा.प्र.
17 Dec 2013 - 6:47 pm | मारकुटे
शास्त्रीय दृष्ट्या अस्तित्वात नसलेल्या गोष्टी का शिकवत आहात?
19 Dec 2013 - 12:56 am | विजुभाऊ
शास्त्रीय दृष्ट्या अस्तित्वात नसलेल्या गोष्टी का शिकवत आहात?
योग हा अशास्त्रीय कसा काय म्हणताय? ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत त्या अशास्त्रीय कशा काय ठरवता?
19 Dec 2013 - 9:20 am | मारकुटे
वरती चित्रामधे जी विविध चक्र दाखविली आहेत ती प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत का? शास्त्रीय दृष्ट्या त्यांचे अस्तित्व सिद्ध झाले आहे काय? जर असेल तर पुरावा द्या आणि नसेल तर ... माझा प्रश्न पुन्हा वाचा.
31 Dec 2013 - 4:49 pm | आनन्दा
शास्त्रीय द्रुष्टया सिद्ध झाले नसेल तर त्याचे अस्तित्व मानायचेच नाही का?
17 Dec 2013 - 9:38 pm | प्रसाद गोडबोले
वाचत आहे !
अवांतर :संक्षीं ची ह्या धाग्याला नजर लागु नये म्हणुन येथे काळी बाहुली उलटी टांगता येईल काय ??
17 Dec 2013 - 10:37 pm | कवितानागेश
वाचतेय...
17 Dec 2013 - 10:39 pm | जोशी 'ले'
वाचतोय...
पुभाप्र
17 Dec 2013 - 11:21 pm | अर्धवटराव
ढिश्क्लेमर टाकुन ठेवा राव... कि ये जानकारी केवल पढने के लिए है, प्रेक्टीस करनेके लिए इसका उपयोग ना करे, वगैरे वगैरे..
18 Dec 2013 - 12:39 pm | म्हैस
मारकुटे
तुम्हाला पटत नसेल तर द्या न सोडून ……… कुणी शिकण्याचा आग्रह केलाय का?
हे सगळं खरं अहे. पण हे करायचं कसं ? प्राणाला इडा आणि पिंगला मधून stop करून सुशुम्नेत कसा आणायचं ?
शरद साहेब. १ प्रश्न आहे तुम्ही स्वतः हठयोग करता का?
18 Dec 2013 - 1:06 pm | प्रचेतस
शरदसर, हा धागा काही पटला नाही ब्वॉ.
18 Dec 2013 - 3:26 pm | विअर्ड विक्स
लेखामागील दृष्टीकोन - सकारात्मक का नकारात्मक ?
आपल्या लेखातील माहिती खरी व मांडणी बद्ध आहे. परंतु , हा लेख वाचल्यानंतर किती लोक योगकडे ( मुद्दाम योगा लिहिले नाही, कारण तो मुल शब्दाचा अपभ्रंश आहे.) वळतील ?
हठ योगाबाबत आपण दोन्ही अर्थ सांगितले असले तरी, हठ म्हणजे शरीरावर बलात्कार हा अर्थ चुकीचा आहे.
हठ योगबद्दलची थोडक्यात माहिती अशी -
१. हठ योग हा चतुरंग योग म्हणून ओळखला जातो
२. आसन, प्राणायाम , बंध आणि मुद्रा आणि नादानुसंधान
३. नादानुसंधान हि कल्पना अंतरंग योगशी जवळीक साधणारी आहे
४. शुद्धीक्रीयांना फार महत्त्व दिले गेलेले आहे
५. आजकाल आपण जो काही योगाभ्यास करतो , तो सर्वतः हठ योगवर आधारित आहे.
मी हि प्रतिक्रिया केवळ एक योगसाधक म्हणून दिलेली आहे त्यामुळे मी यम नियमांचे पालन करायचा प्रयत्न केलेला आहे. तरी कृपया यातून वाद उद्भवू नयेत हि माफक अपेक्षा...
18 Dec 2013 - 3:36 pm | बाळ सप्रे
प्रत्यय लावताना मात्र "योगा"च करावा लागतो.. "योगकडे" नव्हे "योगाकडे" हे बरोबर :-)
31 Dec 2013 - 4:50 pm | आनन्दा
+१
31 Dec 2013 - 4:55 pm | आनन्दा
तुम्ही बहुधा मराठी बलात्कार समजत आहात. बलात्कार चा अर्थ फक्त बलप्रयोग एव्हढाच आहे. यातले कोणतेही आसन आपोआप होत नाहे. त्याचा अभ्यास करणार्याला ते बलात्काराने करावे लागते. विशेषतः काही विशिष्ट आसन, प्राणायाम , बंध हे तर काही विशेष शारिरिक योग्यता असलेलेच करू शकतात.
हठयोगात सांगितलेल्या खेचरीचा अभ्यास करण्यासाठी कधी कधी काही शस्त्रक्रियादेखील कराव्या लागतात.
18 Dec 2013 - 3:41 pm | विअर्ड विक्स
पण जिभेला व हाताला योग म्हणायचीच सवय जडलेली आहे..
19 Dec 2013 - 2:32 am | चिन्मय खंडागळे
आत्मा-परमात्मा वगैरे राहूद्यात पण इंगला पिंगला सुषुम्ना वगैरे नाड्या खरोखरच शरीरात अस्तित्वात असतात का? त्यातून प्राणवायू जात असतो म्हणजे काय? प्राणवायू आणि अपान वायू एकमेकांवर 'आदळतात' म्हणजे काय? मूलाधार चक्र कसं दिसतं? इथे बरेच डॉक्टर लोक येतात. ते काही सांगू शकतील काय?
19 Dec 2013 - 5:12 pm | शरद
मिपावरील लेख हे माहिती या सदराखाली येतात तेव्हा ते "विकी"वरील लेखांसारखे असतात. त्यांना "नेचर"मधील लेख समजू नये. शब्दसंख्येचे बंधन पाळावयाचे म्हटल्यावर काटछाट अनिवार्य आहे. चार ठिकाणी वाचलेली माहिती सर्वसामान्य वाचकाला विषयाची ओळख करून देण्यासाठी एकत्र केलेली असते. त्यात चूक आढळू नये याची शक्य तो काळजी घेतली जाते.आणि तरीही एखादी चूक आढळली तर जाणकारांनी अवष्य दुरुस्त करावी. मात्र प्रतिसादात असे लिहितांना जास्त जबाबदारीने लिहावे. श्री.विविसाहेब,शालेय संस्कृत-मराठी शब्दकोषात हठ= जबरी असा अर्थ दिला आहे. कोष न बघता आपण मला चूक म्हणणे खेदजनक आहे. आपण दिलेल्या (५) पैकी पहिल्यात हठयोगाचे दुसरे नाव आहे. मी "समाधी" करैता आणखी दहा नावे सांगू शकेन, सगळी देण्याची गरज नाही, त्यांनी ज्ञानात फार भर पडते असेही नाही. बाकी चार गोष्टी लेखात दिलेल्या आहेतच. नादानुसंधान कुंडलिनीच्या संदर्भात येते, ते तिथे पहावयास मिळेलच. नाडी, चक्रे ही योगाची परिभाषा आहे, शरीरशास्त्राचा तेथे संबंध नाही, हे लेखात स्पष्ट लिहले आहे. धागा सकारात्मक वा नकारात्मक काहीच नाही. माझे मत कुठे दिसस्ले कां ?
श्री. अर्धवटरावजी, इथले किरकोळ लेख वाचून कोणी प्रक्टिसला लागते काय? च्छ्या!
श्री. म्हैस, अहो, प्रत्यक्ष माउलींनी सांगितले आहे की "हा मार्ग म्हणजे दात नसलेल्याने लोखंडाचे चणे खाणे आहे". नाही, हा मार्ग माझ्यासारख्या बापुड्याचा नाही. तुमच्या दुसर्या प्रश्नाचे उत्तर पुढील लेखात मिळेल.
श्री. चिन्मय, वर सांगितल्याप्रमाणे कोणताही डॉक्टर तुम्हाला मदत करू शकणार नाही. (जरा श्री.विवि साहेबांना विचारून बघा)
कुंडलिनीवरील लेख पुढच्या आठवड्यात.
शरद
21 Dec 2013 - 2:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> मिपावरील लेख हे माहिती या सदराखाली येतात तेव्हा ते "विकी"वरील लेखांसारखे असतात. त्यांना "नेचर"मधील लेख समजू नये.
हाहा लै भारी हं सर...!!! :)
-दिलीप बिरुटे
19 Dec 2013 - 6:51 pm | विअर्ड विक्स
हठ या शब्दाचा अर्थ जबरी हा अर्थ कोणीच नाकारलेला नाही , पण तो अर्थ हठ योगात अभिप्रेत नाही. गैर समज नको. मी मांडलेले मुद्दे ज्ञान प्रदर्शनासाठी नाही तर लोकांना खऱ्या हठ योगाची ओळख व्हावी यासाठी आहे. व्यक्तिश: मी महान नि तुम्ही लहान हि वृत्ती माझ्यात नाही. आणि तरीसुद्धा तुम्हास तसे वाटले तर क्षमस्व....
@ चिन्मय - प्राण वायू हा पंच प्राण म्हणून ओळखला जातो. प्राण, अपान, उदान, समान आणि व्यान. यातील अपान वायू हा सर्वश्रुत आहे. परंतु याविषयी माहिती शरद यांच्या पुढील लेखात येईल म्हणून सविस्तर लिहिणे टाळतो...
चक्र व कुंडलिनी या संकल्पना आहेत. यातील मूलाधार चक्र हे गुदाद्वाराजवळ स्थित असते. सविस्तर शरदजींच्या लेखात येइलच...
20 Dec 2013 - 1:17 pm | म्हैस
हि चक्र , ह्या नाड्या सध्या डोळ्यांनी दिसत नहि. कुठल्याही यंत्राने त्यांचं अस्तित्व दाखवता येत नाही . कुंडलिनी जेव्हा अज्ञाचाक्रात जाते तेव्हाच ह्या सध्या डोळ्यांना अगोचर असणार्या गोष्टी साधकाला दिसू लागतात .
शरद साहेब मला काही प्रश्न विचारायचे होते म्हणून तुम्ही स्वत करता का असं विचारला बाकी काही नहि. असो. पुढच्या लेखाची वाट बघत आहे
22 Dec 2013 - 12:41 am | शैलेन्द्र
ह्म्म
यालाच भ्रम होणे, भास होणे किंवा वेड लागणे असंही म्हणतात का?
20 Dec 2013 - 1:33 pm | सुप्रिया
वाचतेय. पुढिल भागाच्या प्रति़क्षेत.
20 Dec 2013 - 2:27 pm | कवितानागेश
चक्रं, ऑरा आणि त्यांचे रंग हल्ली ऑरा फोटोग्राफीनी बघतात, असं खूप लोकांकडून ऐकले आहे आणि त्याची प्रोफाईल्स पाहिली आहेत. कुणाला उत्सुकता असेल तर बघता येइल.
मी स्वतः अश्या यन्त्रावर काही करुन पाहिले नाही. कुणीतरी फुकट करुन देइल तेंव्हा बघेन आणि लगेच सांगेन. :)
20 Dec 2013 - 4:23 pm | इरसाल
१ डे वर्कशॉप झाले होते. एच्चारचा मेल ट्रान्सलेटकरुन हिंदीत चिटकवला हाये.
दिव्य ऊर्जा के साथ जोड़ने और मन की शक्ति से न्यूरॉन्स के माध्यम से शरीर के विभिन्न भागों में इसे स्थानांतरित करने की प्रक्रिया " - मनोवैज्ञानिक neurobics के रूप में परिभाषित किया गया है . हम मनोवैज्ञानिक neurobics द्वारा विभिन्न बीमारियों को ठीक करने और शरीर के सात ऊर्जा अंक सक्रिय कर सकते हैं . हम मन की शक्ति के माध्यम से ब्रह्मांडीय ऊर्जा लेने के रूप में शब्द मनोरोगी ' मन ' के लिए खड़ा है . यह भी , तनाव प्रबंधन मन को सशक्त बनाने और एक स्वस्थ शरीर होने में मदद करता है . चक्रों के लिए सार्वभौमिक दिव्य ऊर्जा के प्रवाह को सक्रिय करने और जिससे तंत्रिका तंत्र के अवरुद्ध ऊर्जा को सक्रिय करने के चक्र में सक्षम बनाता है . यह भी शरीर चिकित्सा और प्रतिरक्षा प्रणाली में सुधार में सहायता करता है.
साइको Neurobics व्यवस्थित ढंग से शरीर की चिकित्सा शक्ति बढ़ जाती है जो शरीर में जैव विद्युत आवेगों का प्रवाह बढ़ जाता है. " शरीर को स्वस्थ बनाने के लिए शरीर के अंदर फार्मेसी चलाता है , जो हर किसी के अंदर एक अदृश्य डॉक्टर नहीं है " . चिकित्सा विज्ञान की यह फार्म कुछ पांच हजार साल पहले अस्तित्व में है, लेकिन अब फिर से खोज की जा रही है .
प्रशिक्षण के कुछ विषयों में शामिल हैं :
साइको neurobics का परिचय
भीतर अदृश्य डॉक्टर की खोज
हीलिंग मन और शरीर
दवा के रूप में ध्यान
विभिन्न मुद्राएं और उनके महत्व
प्रैक्टिकल चिकित्सा सत्र
Neorobic एसपीए
21 Dec 2013 - 2:35 pm | साती
भाषा प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या सहजयोग शिबीरातील वाटतेय.
21 Dec 2013 - 9:50 am | सुधीर
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
22 Dec 2013 - 7:41 pm | चित्रगुप्त
संत ज्ञानेश्वर यांनी 'समाधी' घेऊन आपला देह सोडला, त्या प्रक्रियेबद्दल काही सांगता येईल का? म्हणजे त्यांनी नेमके काय केले, कसे केले, या प्रकारची आणखी उदाहरणे कोणती आहेत? आजच्या घडीला ही विद्या जाणणारे कुणी आहेत का, वगैरे?
मानवी शरिरातील उदरपटल अर्थात 'डायफ्राम' याचा उल्लेख योगावरील प्रचीन साहित्यात येतो का? (रामदेव बाबा "सिर्फ डायफ्राम तक हवा भरे" सांगतात, ते खरेतर चूक आहे, कारण फुफ्फुसे डायफ्रामच्या वर असल्याने त्याखाली हवा भरणे शक्यच नाही. यावर तुमचे मत काय आहे?
पतंजलींच्या योगसूत्रात 'कुंडलिनी' बद्दल उल्लेख बहुधा नाही, असे का? (असल्यास ते सूत्र नेमके कोणते आहे?)
26 Dec 2013 - 6:32 am | शरद
पुढील माहिती केवळ वाचनावरूनचीच आहे. जास्त माहिती श्री. विविसाहेबांकडून मिळेल अशी आशा करू. किंवा आपण त्यांना त्यांच्या योगावरील लेखामध्येही विचारू शकता. समाधी अनेक प्रकारांनी मिळवता येते. सर्वात सोपे म्हणजे आध्यात्मिक गुरूने "शक्तिपाता"ने शिष्याला समाधी मिळवण्यास समर्थ करणे. ते सोडा. असा सद्गुरू कुठे शोधणार ? दुसरा मार्ग म्हणजे हठयोग, भक्तियोग, राजयोग इ. प्रकारांनी कष्ट करून प्रगति करणे. इथेही सद्गुरू लागणारच पण गीतेत भगवंतांनी दिलासा दिला आहे की.समजा या जन्मात तुम्हाला सफलता मिळाली नाही तरी तुमचे कष्ट फुकट जात नाहीत, पुढच्या जन्मात तुम्ही तेवढी शिदोरी घेऊन पुढची वाटचाल करू लागाल. समाधीचे दोन प्रकार. सविकल्प (सबीज) व निर्विकल्प(निर्बीज). सविकल्प समाधी मध्ये इतर विषय मनातून गेले असले तरी मी इष्ट देवतेचें द्यान करत आहे ही भावना शिल्लक रहातेच. निर्विकल्प समाधीत ध्याता, ध्यान आणि ध्येय यांचाही निरास झालेला असतो. "तस्यापि निरोधे सर्वनिरोधानिर्बीज: समाधी" ही ध्येयभूत समाधी. तुमचा जगाशी असलेला संबंध संपूर्णपणे तुटलेला असतो. तुम्ही आनंदस्वरूप होता. शरीर असले नसले काहीच फरक पडत नाही मीराबई त्याला "यहा तो खाली खोल" म्हणते. संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यावर आता जमीनीखाली त्यांचे शरीर आहे की नाही याला काही महत्व नाही. आता दरवेळी जमीनीखालीच समाधी घेतली पाहिजे असे नाही. बरेच जण जलसमाधी, अग्नीसमाधी घेतात. आता असे लोक कुठे भेटतात ? सांगणे अवघड आहे, नाही? पण जर तुम्ही अध्यात्मवाटेवरील प्रवाशांची पुस्तके वाचलीत तर तुम्हाला ते त्यांना हिमालयात, गिरिनारला ... असे लोक भेटले असे सांगतात. विश्वासार्ह्य ? तुमच्यावर अवलंबून. मला विचाराल मला नाही वाटत की असे महात्मे भेटल्यावर तुम्ही चार पैसे मिळवण्याकरिता पुस्तके खरडाल !
मी प्रथमच लिहले आहे कीं योगशास्त्रातील संज्ञा शरीरशास्त्रात शोधू नका. येथे पाच वायू आहेत, प्राण वर जातो, अपान खाली. तुम्ही त्यांचे मार्ग बदलू शकता. तेव्हा उदरपटल फुफ्फुसाखाली आहे,त्यच्याखाली वायू कसा जाणार हे प्रश्न तेथे लागूच नाहीत.
हठयोगाची सुरवात शरीरशुद्धीकरिता झाली असावी व मग तो समाधी वळला. त्यामुळे पातंजलींनी कुडलिनीबद्दल काही लिहले नाही. पण हटयोगाने समाधी मिळवण्याकरिता तुम्हाला यम-नियम-ध्यान धारणा इ. गरज आहेच.
शरद
31 Dec 2013 - 3:58 pm | प्यारे१
समाधी शब्दाच्या अर्थांमध्ये फरक आहे.
ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेली 'संजीवन समाधी' नि सद्गुरुंच्या अनुग्रहाने शिष्याच्या अनुभवास येणारी 'समाधी' ह्या वेगळ्या अवस्था आहेत एवढंच.
हा संपूर्ण विषय अधिकारी गुरुंनी अधिकारी शिष्याला व्यक्तिगत रित्या सांगण्याचा शिकवण्याचा विषय आहे असं माझं मत आहे. गुरु जिवंत असणं ह्या साठी आवश्यक असतं.
31 Dec 2013 - 4:55 pm | प्रचेतस
रायगडावर जगदीश्वराच्या प्रांगणात अध्यात्मावर जोरजोरात चर्चा चालू असताना समोरच्या शिवसमाधीकडे एकटक बघत असता माझी आणि धन्याची समाधी लागली होती त्याची आठवण आली.
31 Dec 2013 - 5:09 pm | आनन्दा
संत ज्ञानेश्वर यांनी 'समाधी' घेऊन आपला देह पंचत्वात विलीन केला (सोडला नाही) असे म्हणतात. म्हणजे प्रथम प्रुथ्वि तत्वाचा लय आपतत्वात, नंतर आपतत्वाचा लय तेजतत्वात असे करत करत शेवटी सर्व तत्वे आकाश तत्वात विलीन झाली असे वाचलेले आठवते.
वारकरी संप्रदायची अशी धारणा आहे की याच्या उलट प्रकारे ते पुन्हा केव्हाही देह धारण करू शकतात.
याचा अर्थ थोडा वेगळा असावा. विकी असे म्हणतो.
"The diaphragm functions in breathing. During inhalation, the diaphragm contracts and moves in the inferior direction, thus enlarging the volume of the thoracic cavity (the external intercostal muscles also participate in this enlargement). This reduces intra-thoracic pressure: In other words, enlarging the cavity creates suction that draws air into the lungs."
थोडक्यात डायफ्राम आकुन्चन करून हवा भरू नका, तर सहज जेव्हढी हवा येइल तेव्हढीच येउद्या. बहुधा कपालभाती मधील सूचना असावी.
26 Dec 2013 - 12:55 pm | म्हैस
नहि. तुम्हाला जर तसा वाटत असेल तर हा विषय तुमच्यासाठी नाही असं समजा . म्हणजे सगळे योगी भामिष्ट , वेडे असतात असं म्हणायचं का तुम्हाला? हेच कारण आहे ह्या विषयाला गुप्त ठेवण्याचं .
@चित्रगुप्त -
परम सत्याची अनुभूती होणं , आपण नक्की कोण आहोत कुठून आलोय , कोठे जायचं , आपलं खरं स्वरूप समजणं हे कुंडलिनी सहस्त्रारात पोच्ल्यावारची अनुभूती आहे . ह्या अवस्थेनंतर शरीराची गरज उरत नहि. समाधी घेण्याचा अर्थ प्राण स्वताहून शरीराबाहेर काढून त्याचं परमात्म्याशी मिलन करण .
हो असे अनेक लोक आहेत ज्यांना हे योग सामर्थ्य प्राप्त आहे .
पातंजल योगसूत्र हे शरीराशी related अहे. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी काही योगासने आणि प्राणायामाचे सोपे प्रकार जे सामान्य लोकांना करता येतील आणि त्यामुळे लोक आपला आरोग्य चांगला ठेवू शकतील त्यासाठी पातंजल योगसूत्र आहे .
परंतु हठयोग हा अध्यात्माशी related आहे . त्यातली आसन आणि प्राणायाम हे अवघड अहेत. ते सामान्य माणसांना जमण्यासारखे नाहीत. तसाच हठयोग हा पुस्तके वाचून किवा स्वताच्या मनाला वाटेल ती आसन करून चालत नहि. तो सिद्ध गुरूंच्या मार्गदर्शना खालीच करावा लागतो . कारण इथे कुंडलिनी स्वच्छेने जागृत होत नाही तर तिला forcefully जागृत केल जातं . त्यामुळे तिला योग्य तऱ्हेने controll करणं फार महत्वाचं असतं . म्हणून ह्या गोष्टी पातंजल गोय्सुत्रात दिल्या नहियेत. पण छोट्या छोट्या सिधींची वर्णनं आणि त्यांचे प्रयोग पातंजल मध्ये दिलेले अहेत. जे थोड्याश्या प्रयत्नाने कोणीही करू शकतो
27 Dec 2013 - 11:58 pm | विअर्ड विक्स
sorry for jumping in... पण प्रतिसाद फार भरकटल्या सारखे वाटले म्हणून लिहितोय.....
कुंडलिनी हि एक संकल्पना आहे तिचा शरीरात शोध घेऊ नये..... समाधी वा कुंडलिनी शक्ती जागृतीचा मला स्वानुभव नाही परंतु कुंडलिनीचा उल्लेख हा फक्त हठ्योगात आहे, पतजलींनी संकल्पना मांडलेली नाही. त्यामुळे ती पातंजल योग सूत्रात नाही. पातांजालीना आसन व प्राणायाम मन वा तनाची स्थिरता वाढावी यासाठी उपदेशिला आहे वा त्यांनी यांत जास्त गुरफटू नये असे सुद्धा स्पष्ट सांगितले आहे कारण योगाचे अंतिम ध्येय समाधी आहे ना कि शरीर स्वास्थ्य !!!!
ज्याप्रमाणे गिर्यारोहकाला everest सर केल्यावर जो आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो तो शब्दांत वा भावनेत नाही मांडू शकत तसेच काहीसे या दिव्यत्वाचे आहे असे समजावे.
31 Dec 2013 - 5:17 pm | आनन्दा
पटले नाही. अहो ते पतंजली आहेत. मला वाटते त्या सूत्रांचे नावच गुह्यसूत्रे असे आहे. तेव्हा जर कुंडलिनीचा उल्लेख आवश्यक असेल तर वर दिलेल्या कारणासाठी तर ते नक्कीच टाळणार नाहीत. :) काहीतरी दुसरे कारण असेल. जाता जाता,
असे आपल्याला का वाटते? माझा यात काही अभ्यास नाही म्हणून विचारतो. आपण काही रिसर्च केला आहे का?
27 Dec 2013 - 6:20 pm | चित्रगुप्त
आणि
... हे मुळात पतंजली सूत्रे न वाचता, समजून न घेता लिहिले आहे की काय, असे वाटते... कृपया खुलासा करावा. ही योगसूत्रे नुस्ती समजण्यास आयुष्य खर्चावे लागते. प्रत्यक्षात उतरवणे फार पुढची गोष्ट. अष्टांगयोगात आसने आणि प्राणायाम या सुरुवातीच्या अवस्था आहेत.
खरेतर पतंजलिंच्या योगसूत्रांत आसनांची वा प्राणायामाची माहिती दिलेली नाही. कुणी 'पातंजल योग' म्हणून आसने, प्राणायामाचे क्लासेस घेत असेल, त्यावरून हे मत बनले आहे का?
असे आहे, तर त्यापैकी चार-पाच जणांची नावे, माहिती देता येइल का? की हे लोक हिमालयाच्या गुहांमधे वगैरे राहणारे, प्रसिद्धी परान्मुख वगैरे असल्याने अशी माहिती देता येणार नाही?
अश्या लोकांशी प्रत्यक्ष संपर्क करता आल्यास बरेच काही शिकता येईल.
27 Dec 2013 - 10:37 pm | वाटाड्या...
कुंडलिनी जागृत केलेले कुणी असेल आणि स्वच्छेने त्यांनी त्यांचे अनुभव इथे टाकल्यास मला वाटते ह्या लेखातल्या विषयाला पुष्टी मिळेल. अर्थात काही वाह्यात लोक त्याचीसुद्धा टर उडवायला कमी करणार नाहीत....
- वाट्या कुंडलिनीकर
31 Dec 2013 - 3:04 pm | म्हैस
हे १००% खरा आहे. तुम्ही पतंजली योगसूत्र पूर्ण वाचा.
१०१% टक्का चूक ......... हे मी मला काय वाटत हे सांगत नाहीये तर माझ्या आत्तापर्यंतच्या अभ्यासावरून सांगते. कुंडलिनीचा उल्लेख शेकडो ठिकाणी आहे. गीता, ज्ञानेश्वरी वाचली आहे का? योग चूडामणी माहित आहे का? तुम्हीच म्हणताय कुंडलिनी शक्ती जागृतीचा तुम्हाला अनुभव नाही स्वानुभव नाही त्यामुळे ती फक्त संकल्पना आहे हे म्हणही बरोबर नाही आणि शरीरात नाहीतर कुठे असते कुंडलिनी?
@ वाटाड्या...
कुंडलिनी जागृतीचे अनुभव जाहीरपणे सांगायला परवानगी नसते. ते फक्त गुरूंना सांगायचे असतात. आणि त्यांची परवानगी असेल तरच इतरांना सांगता येतात. तरीही जाणून घ्यायचं असेल तर स्वामी मुक्तानान्दांचा ' चित्शक्ती विलास' नावाचं पुस्तक आहे . त्यांचच पुन्हा 'कुंडलिनी' नावाचं पुस्तक आहे. गुळवणी महाराजांची बरीच पुस्तके आहेत . तिथून सुरुवात करू शकता . बेस्ट source ज्ञानेश्वरी आहे (मूळ ज्ञानेश्वरी. त्याच्यावरच्या टीका किवा परीक्षणे नाहीत. ) . संस्कृत समजत असेल तर सरळ भग्वद गीता .
31 Dec 2013 - 5:24 pm | विअर्ड विक्स
@ म्हैस - शब्दश: अर्थ घेऊन शब्दच्छल करणे माझ्या तत्त्वत बसत नाही......
आपण कुंडलिनीचा उल्लेख पातंजल योग सूत्रात आहे असे पहिले म्हणाला होतात त्यावर स्पष्टीकरण म्हणून "फक्त " शब्द होता....
कुंडलिनीचा शोध शरीरात घेऊ नये या वाक्याचा अर्थ असा घ्या कि, अशा शक्तींचा शोध तन चक्षूने न चेता मन चक्षु ने घेणे असा होतो.....
31 Dec 2013 - 3:57 pm | मदनबाण
वाचतोय...
12 Apr 2018 - 5:20 am | चित्रगुप्त
वाचनीय धागा पुन्हा एकदा.