कुंडलिनी
कुंडलिनी ही एक शरीरात वास करणारी शक्ती आहे. निरनिराळ्य़ा लोकांना तिचा साक्षात्कार निरनिराळ्या प्रकारे झाल्याने तिच्या व्याख्या नानाविध प्रकारांनी केल्या आहेत. तंत्रसाहित्यात कुल व अकुल हे शब्द शक्ती व शिव वाचक आहेत. कुलकुंडलिनी वा कुंडलिनी म्हणजे वेटोळ्या घातलेल्या स्वरूपातील शक्ती. या शक्तीचे चित् व अचित् असे दोन भेद आहेत. चित् शक्ती आत्म्याशी अभिन्न स्वरूपात राहते. अचित् शक्ती जगत प्रकाशित करते. ही कुलकुंडलिनी शरीरात सुप्त अवस्थेत असते. कुंडलिनी शरीरात मुलाधार चक्रात गहन निद्रेत असते. सहस्रारचक्रात वास करणार्या शिवापाशी मुलाधारचक्रात वास करणार्या निद्रित कुंडलिनीला जागृत करून नेणे हे योग्याचे ध्येय.
ही कुंडलिनी जप, तप, ध्यान, कीर्तन, भक्ती, ज्ञान, कर्म, मुद्रा, बंध, शक्तिचालन, प्राणायाम, शक्तिपात इ. प्रकारांनी जागृत होते.
हठयोगातील प्राणायाम व बंध यांचा कसा उपयोग केला जातो याचा थोडासा विचार पुढे केला आहे.साधे एक, दोन, तीन शिकावयास गुरू लागतो. तेव्हा इथे गुरूची व कठोर परिश्रमाची नितांत गरज आहे. इथे आपण फक्त प्राथमिक माहिती बघणार असल्याने अत्यंत थोडक्यात काही गोष्टींची नोंद करू.
प्राणायाम ... श्वासोच्छ्वासावर प्रभुत्व मिळवणे. पूरक (बाहेरचा वायू नासापुटाने उदरात भरून घेणे), कुंभक (पूरकाने आत घेतलेला वायू उदरात धारण करून ठेवणे) , रेचक (उदरातील वायूला नासापुटाने बाहेर सोडणे) व यांमधील विराम म्हणजे प्राणायाम. श्वास घ्या, थोडा वेळ थांबा, श्वास सोडा, थोडा वेळ थांबा, परत श्वास घ्या ही प्रक्रीया. यातील निरनिराळे प्रकार म्हणजे उदा. एका नाकपुडीने श्वास घ्रेऊन दुसर्या नाकपुडीने सोडणे. ही शारीरिक प्रक्रीया झाली. याला म्हणावयाचे अगर्भ प्राणायाम. जर आपण प्रणवाच्या मात्रांचे, पूरकाच्या वेळी "उ"चे कुंभकाचे वेळी "म्" चे व रेचकाचे वेळी "अ"चे ध्यान केले तर तो झाला सगर्भ प्राणायाम.
प्राणायामाने आरोग्य सुधारते, अनेक रोग बरे होतात, आयुष्य वाढते असे शारीरिक फायदे होतात व वृतीला स्थिरपणा येतो,चांचल्य कमी होते, रज-तम वासना कमी होतात, सत्व गुणाचा प्रकाश पसरतो असे आध्यात्मिक लाभ होतात. हठयोगात नाडीशुद्धी हा एक मोठा फायदा. नाडीशुद्धी झाली व चित्ताची एकाग्रता साधता आली की साधकाला अनाहत नाद ऐकू येऊ लागतो. तबल्यावर थाप मारल्यावर जो आवाज येतो तो आहत, "ठोकल्याने", तार "छेडल्याने" आलेला नाद. अनाहत नाद अशा कोणत्याही आहताने निर्माण झालेला नसतो. हा अनाहत नाद तुम्हाला ऐकू येऊ लागला की तुम्ही तुमच्या लक्षाच्या जवळ आला आहात असे समजावे. अशी समाधी म्हणजे नादानुसंधानी समाधी. या मार्गावर पोचण्यास प्राणायामास यम-नियम-ध्यानादिंची जोड आवश्यक असते.
बंध ... . कुंभकाचे वेळी प्राणनिरोध करीत असतांना नवद्वारांपैकी काही द्वारे बंद करावयाची असतात. त्या वेळी या बंधांचा उपयोग होतो. शरीरातील एखाद्या विशिष्ट भागातून वायू खेचून दुसर्या एखाद्या भागात स्थिर करण्या साठी बंधांचा वापर होतो. . हठयोगात "बंधां" ना फार महत्व आहे. प्राणायामाने प्रभुत्व मिळवलेला प्राणवायू आपल्याला पाहिजे तेथे, पाहिजे त्या नाडीत नेणे, तेथे तो थांबविणे हे या बंधांचे काम. निरनिराळ्या आसनांत हे करतात. शरीरातील वायूंवर विजय मिळवूवच त्यांच्या सहाय्याने कुंडलिनीला जागृत करावयाचे असल्याने बंधांचा अभ्यास अनिवार्य आहे.आपण तीन बंध बघणार आहोत
जालंधर बंध ... कंठाचा संकोच करून हनुवटीला छातीच्या वरच्या बाजूस कंठाजवळ असलेल्या आडव्या दोन्ही हाडांच्या मध्यभागी दाबून धरावे म्हणजे जालंधर बंध होतो.कंठस्थानी असलेल्या शिरांचे जाळे बांधले जाते म्हणून याला जालंधर बंध म्हणतात.आणखी एक विचार. मूर्धस्थानी असलेल्या पूर्णचंद्रातून स्त्रवणारे अमृत देहाच्या मध्यभागी आले की जाठराग्नीने शुष्क होऊन जाते. याच कारणाने देह लवकर जीर्ण होतो. जालंधर बंधाने अमृत सरळ पचन मार्गात न उतरता सर्व शरीरभर पारते व योग्याचा देह लवकर जीर्ण होत नाही. (योगी काही शतके जगू शकतो याचे कारण ?)
उड्डियान बंध ... हा बंध उदरस्थानी करावयाचा असतो. नाभिस्थानाचा खालचा भाग व वरचा भाग अशा या दोनही
भागांचा संकोच करून पोटाला पृष्ठ्वंशाकडे खेचून घ्यावे. पाठीला पोक येऊं न देता सर्व शरीर ताठ ठेवावे. यालाच उड्डियानबंध म्हणतात. या बंधाने पोट नेहमी साफ राहते. ज्याचे पोट साफ़ त्याचे आरोग्य उत्तम. याला "मृत्युमातंगकेसरी" म्हटले आहे व याच्या अभ्यासाने "वृद्धोsपि तरुणायते" वृद्धही तरुण होतो असे म्हटले आहे. उड्डियान बंधाने प्राण, अपान,व्यान,उदान व समान या पाचही वायूंची कार्ये सुव्यवस्थित होत असल्याने शरीराचे सर्वांगिण आरोग्य सुरक्षित रहाते म्हणून "सर्वेषामेव बंधानामुत्तमोह्युड्डियानक:" असा याचा गौरव केला आहे.
मूलबंध ...सिद्धासनात सांगितल्याप्रमाणे डाव्या पायाची टाच सीवनीच्या (उपस्थ व गुदद्वार यांच्यामध्ये असलेली शीर) मध्यभागी दाबून बसवावी. गुदद्वाराचे अधिकात अधिक आकुंचन करूनपान वायूला वर खेचावे. शरीर ताठ ठेवावे. दृष्टि नासाग्री असावी. मूलबंधाने अपान वायू हा उर्ध्वगामी होत असतो. अनाहत ध्वनी अभिव्यक्त होण्यास मूलबंधाचा चांगलाच उपयोग होत असतो.
आपण नेहमी श्वासोच्छ्वास करतो तेव्हा डाव्या व उजव्या नाकपुडीतून आत येणारा वायु ईडा व पिंगला नाडीतून प्रवास करत असतो. प्राणायामाच्या अभ्यासाने व बंधांच्या उपयोगाने आपण ही नैसर्गिक क्रिया बदलून टाकतो. आता ईडा व पिंगला यांचा वापर बंद करावयाचा आहे .त्या ऐवजी सुषुम्ना नाडीतून प्राणवायू न्यावयाचा आहे. पण सुषुम्नाचे तोंड तर बंद असते. ते उघडण्यासाठी प्रथम बंधांच्या सहाय्याने उर्ध्वगामी, वर जाणारा प्राणवायू खाली वळवावयाचा व मूलबंधच्या उपयोगाने खाली सरणारा अपान वायु उर्ध्वगामी करावयाचा. प्राणवायू व अपानवायू यांचा संगम नाभीच्या अधोभागी होतो. त्यांच्या समागामाने स्वाधिष्ठानचक्रातील व मणीपूरचक्रातील अग्नी प्रदिप्त होतो. ह्या अग्नीच्या तापाने कुंडलिनी जागृत होते व सुषुम्ना नाडीचे तोंड उघडते. प्राण व अपान सुषुम्ना नाडीतून वर जाऊ लागले की नाद उत्पन्न होतो. तोच अनाहत नाद. वर लिहले आहे की अनाहत नाद ऐकू येऊ लागला की समजावे की तुम्ही ध्येयाच्या जवळ पोचला अहात. तुम्ही त्यापासून मिळणार्या आनंदात बेहोष होता. अनेक संतांनी या अनाहत नादाबद्दल रम्य अभंग लिहले आहेत. आता सुषुम्ना नाडीचे तोंड उघडले आहे, कुंडलिनी जागृत झाली आहे व ती आता आपले मूलाधार चक्रातील स्थान सोडून वर सह्स्रारचक्राकडे निघाली आहे. पुढील भाग मी रुक्ष गद्यात सांगणार आहेच पण माझा आग्रह आहे की आपण तिच्या प्रवासाचे वर्णन श्री माउलींच्या शब्दात वाचावेच. गीतेत कुंडलिनीचा उल्लेखच नाही पण या बालयोग्याने अध्याय ६ मध्ये आपल्या नाथपंथातील विचार मोठ्या रसिकपणाने मांडले आहेत. परत एकदा, वाचाच.
कुंडलिनी ...मुलाधार चक्रात अचित् शक्ती सर्पासारखे साडेतीन वेटोळी घालून अधोमुख निजलेली असते. आता ती प्राण-अपान वायूंच्या संयोगाने निर्माण झालेल्या अग्नीच्या तापाने जागृत होते. सुषुम्ना नाडीचे तोंड उघडले गेलेले असल्याने ती त्या नाडीत प्रवेश करते व वर सहस्रारचक्रात जाण्यास प्रवृत्त होते. तिच्या बरोबर प्राणवायू व साधकाचे मनही असतात. तिचा मार्ग तेव्हढा सुकर नाही. तिला जातांना वाटेतील षटचक्रांमधून (चित्र पहा) पुढे जावयाचे असते. ही महाकठीण क्रीया सद्गुरूच्या सहाय्यानेच शक्य होते. वर वर जातांना कुंडलिनी जे जे पार्थिव ते ते सर्व सर्व गिळंकृत करते. जेव्हा प्राण-मन यांच्यासह ती सहस्रारचक्रात वास करणार्या शिवाशी एकरूप होते तेव्हा साधकाला समाधीचा अनुभव प्राप्त होतो. साधकाचे मन ब्रह्मात लीन होते व विषयविचारापासून तो पूर्णत: अलिप्त होतो. समाधी बद्दल इथे लिहण्याचे कारण नाही. तो एक निराळाच विषय आहे. पण कुंडलिनी जागृतीमुळे होणारे परिणाम थोशक्यात बघू. प्राणवायू सुषुम्ना नाडीतून वाहू लागला की सहाजिकच तो ईडा- पिंगला मधून वाहणे कमी होते. साधकाचा श्वासोच्छ्वास कमी कमी होऊ लागतो. त्याची जीवनाला आवष्यक असलेली उर्जेची गरज कमी कमी होऊ लागते. अन्न-पाणी न घेता तो दीर्घ काळ राहू शकतो. ( याला Hybernation म्हणावयाचे काय ?) प्राणवायू मूर्धस्थानी स्थिरावला की त्याला केवलकुंभक म्हणतात. आचार्य म्हणतात "केवलकुंभकाचे वैभव प्रतीतीला येण्यासाठी चित्तची शुद्धी, सावधानता आणि अभ्यासाची धृढता यांची गरज आहे."
ही झाली कुंडलिनीची प्राथमिक माहिती. हिच्यावर प्रभुत्व मिळाले तर तुम्ही समाधी सुख मिळवू शकता. पण अपार कष्टाने मिळवलेल्या या सुखात विघ्नेही आहेत. तुम्हाला अनेक सिद्धीं प्राप्त होतात. त्यांची यादी देत नाही परंतु इहलोकातील नानाविध सुखे तुमच्या पायाशी लोलण घेतात व साधक त्यांतच गुरफटण्याचा संभव असतो. तंत्रग्रंथांत या विषयी धोक्याच्या सुचना दिलेल्या दिसतात. आपला त्याच्याशी काही संबंध नाही म्हणा.
या अतिप्राथमिक महिती नंतर अनेकांना जरा पुढील माहिती गोळा करावी असे वाटेल. जालावर बरीच माहिती मिळते. प्रथम विकीवर जा व नंतर तेथील संदर्भ बघा. हाती काही लागले नाही तर निराश होऊं नका. नाही तरी जालावर वा योगवर्गांत शिकण्याची ही गोष्टच नाही. एक कुतुहलाची बाब म्हणजे कुंडलिनी व षटचक्रे खरेच शरीरात आहेत कां व असतील तर ती कुठे आहेत ? श्री. रेळेकर यांचे :कुंडलिनी" याच नावाचे एक इन्ग्रजी पुस्तक आहे. (मिळाले तर) अवष्य वाचा.
एक फुस. (शरद सरांचा फुकटचा सल्ला) वेळ सत्कारणी लावावयाचा असेल हठयोगावर वेळ घालवू नका. तो वायाच जाईल. त्या ऐवजी सहजयोग, राजयोग, भक्तीयोग यांपैकी कोणताही मार्ग जास्त फायदाचा आहे !
मागे एका सज्जनाने सल्ला दिला होता. लिहणे संपले एक डिस्क्लेमर टाकत जा. आज तो मानतो. मला या विषयात रस आहे, मी चार बूके वाचतो, पण अभ्यास नाही. जर कुणाला काही जास्त माहिती पाहिजे असेल, विचारा व मला माहीत असेल तर सांगेन पण ती मिळेलच असे नाही.
शरद
प्रतिक्रिया
30 Dec 2013 - 6:07 pm | मुक्त विहारि
"मला माहीत असेल तर सांगेन पण ती मिळेलच असे नाही."
हे तर अजिबात समजले नाही....
असो...
गोविंद, गोविंद
30 Dec 2013 - 6:11 pm | स्पा
सगळे डोक्यावरून गेले
30 Dec 2013 - 6:12 pm | बॅटमॅन
फुस तर लेखाच्या विरुद्धच वाटतो आहे ;) हठयोग करण्यात अर्थ नसेल तर इतके माहात्म्य कशास सांगावे कुंडलिनीचे?
रागावू नका सर पण आपल्या लेखात अंतर्विरोध वाटतो आहे.
30 Dec 2013 - 6:34 pm | सूड
छ्या !! समाधी लावायला येव्ढा आटापिटा कशाला !! मुगाची खिचडी, पोह्याचे पापड आणि आलं मिरची घातलेलं दीडेक ग्लास ताक पोटात गेलं की आपोआप समाधी लागते.
30 Dec 2013 - 7:37 pm | चित्रगुप्त
माझ्या स्वतःच्या एका अवचित, काहीही सहेतुक प्रयत्न वा साधना न करता आलेल्या अनुभवामुळे मला कुंडलिनी 'जागृत होणे' या शब्दप्रयोगाऐवजी 'कुंडलिनिची जाणीव होणे' हा शब्दप्रयोग जास्त नेमका वाटू लागला आहे.
शरीरांतर्गत रक्ताभिसरणादि क्रिया अव्याहत चाललेल्याच असून त्यांची जाणीव आपल्याला होत नसते. तसेच 'कुंडलिनि' चे कार्यही जन्मभर अव्याहत चालत असते, पण आपल्या जाणीवेच्या कक्षेत ते येत नाही, असे माझे मत झाले आहे.
काही वर्षांपूर्वी एकदा पहाटे उठून बसताच मला संपूर्ण पाठीच्या कणात - अगदी खालपासून मस्तकापर्यंत- विलक्षण जोरात विद्युत्प्रवाह चालत असल्यासारखे जाणवले. त्यावेळी काहीतरी विलक्षण वेगळाच आनंद दाटून आला होता. आधी मी जरा घाबरलो, तेवढ्यात "ही कुंडलिनी आहे, नुस्ते बघत रहा" असे जणू शब्द कानावर आले. हा अनुभव किती वेळ चालला, हे कळले नाही, नंतर हळू हळु हा प्रकार थांबला.
या अनुभवाबद्दल मी फारसे कुणाला सांगितले नव्हते, पण आज आठवले.
हा अनुभव त्यानंतर आजतागायत कधीही आला नाही, आणि त्याची आसही नाही. मात्र या अनुभवापूर्वी मला मोक्ष, कुंडलिनी, समाधी, ध्यान इत्यादिंबद्दल वाचायला, बोलायला फार आवडायचे आणि हे सर्व जाणून घ्यावे असे वाटायचे. या अनुभवानंतर मात्र हे सर्व थांबले, आणि मिपाच्या भाषेत 'अध्यात्म वगैरेंना फाट्यावर मारून' मी आपले साधे, सहज, आणि सृजनशील जीवन समरसून जगू लागलो.
हा माझा अगदी वैयक्तिक अनुभव आहे, त्यावरून मला कसलेही खंडन वा मंडन करायचे नाही, या अनुभवाला मी 'कुंडलिनी ची अनुभूति' असे मानत असलो, तरी इतरांनीही तसेच मानावे, असा माझा बिल्कुल आग्रह नाही. जे झाले, ते अवचित घडून आले, आणि त्यानंतर माझे जीवन जास्त समाधानी, आनंदी झाले, एवढेच.
30 Dec 2013 - 8:27 pm | स्पा
' @@@@@@कुंडलिनि' चे कार्यही जन्मभर अव्याहत चालत असते, पण
आपल्या जाणीवेच्या कक्षेत ते येत नाही,
प्रचंड सहमत
30 Dec 2013 - 8:44 pm | प्रकाश घाटपांडे
प्रतिसाद आवडला.
31 Dec 2013 - 8:54 pm | प्यारे१
+१
या उपाधीमाजी गुप्त| चैतन्य असे सर्वगत| ते तत्त्वज्ञ संत| स्वीकारीती||
;)
>>>जे झाले, ते अवचित घडून आले, आणि त्यानंतर माझे जीवन जास्त समाधानी, आनंदी झाले, एवढेच.
+१११११११
रुखरुख, वखवख थांबणे, एखाद्या गोष्टीबाबत हाव न वाटणे, असली तरी ठीक, नसली तरी ठीक असं काही होतं का?
1 Jan 2014 - 8:53 pm | चित्रगुप्त
होय, असेच.
30 Dec 2013 - 8:39 pm | कैलासवासी सोन्याबापु
बापरे हे तर गजब वेगळे विज्ञान आहे हो!!! सुरस आहे!!! सही वाटले वाचायला!!! मुख्य म्हणजे ते कुंडलिनी चे प्रतिक असलेले सर्पाचे चित्र!!! , मी गेले कित्येक दिवस "भारतीय संस्कृतीतले शक्ति चे महत्व अधोरेखीत करणारे पण सटल" अशी एक टॅटू आयडीया शोधत होतो आता हेच वापरेन म्हणतोय!!!!, माझे स्वत: चे आबा आयुर्वेदाचार्य होते सो मी ह्या विज्ञानाचा आदर करतोच करतो. :)
ह्यावर वाचन केलेच पाहीजे!!! (चेक्ड)
31 Dec 2013 - 5:34 pm | कंजूस
ही कुंडलिनी जागृत करण्याची कला अथवा सिध्दि म्हणू फारच थोड्यांना अवगत असावी असे वाटते .
इलेक्ट्रिक रे नावाचा मासा नाही का आठशे व्होल्टसचा झटका देऊ शकतो .
असं काही असेल यावर माझातरी विश्वास आहे .फक्त मोरोपंतांची शिकवणी लावली की मलाही केकावली करता येईल असा गैरसमज मला नाही .
इतका लेखप्रपंच करून सविस्तर माहिती दिलीत फार फार धन्यवाद .
ज्या कोणास साध्य आहे त्यांनी ही कला पुढच्या पिढीत पोहोचवली मात्र पाहिजे .
1 Jan 2014 - 9:37 pm | arunjoshi123
शरीरात करंट वाहताना मी अनुभवले (जाणिवेने, चित्रगुप्तजींसारखे) आहेत. पण ते लोकल फॉल्टी फंक्शन असावे. मला तर ताणच वाटला. नो अदर चेंज.
1 Jan 2014 - 11:46 pm | विजुभाऊ
इथे मिपावर एक सदस्य होते. त्याना नर्मदा परीक्रमी दरम्यान कुंडलिनी जागृतीचा काही अनुभव आला.
मात्र त्याची परिणीती वेगळ्याच घटनेत झाली
2 Jan 2014 - 2:54 pm | म्हैस
सहमत.
हठयोग हा १ मार्ग झाला . इतर मार्ग आहेत कि कुंडलिनी जागृत करण्याचे. आणि एखादा विषय अवघड असेल तर त्याची माहितीच घ्यायची नाही असं थोडाच असतं....
शरद साहेब.. पुढचा लेख लिहिणार आहात का? त्यात सप्तचाक्रांची माहिती आली तर बऱ होईल
2 Jan 2014 - 8:23 pm | स्वप्नांची राणी
>>नाडीशुद्धी झाली व चित्ताची एकाग्रता साधता आली की साधकाला अनाहत नाद ऐकू येऊ लागतो. तबल्यावर थाप मारल्यावर जो आवाज येतो तो आहत, "ठोकल्याने", तार "छेडल्याने" आलेला नाद. अनाहत नाद अशा कोणत्याही आहताने निर्माण झालेला नसतो. हा अनाहत नाद तुम्हाला ऐकू येऊ लागला की तुम्ही तुमच्या लक्षाच्या जवळ आला आहात असे समजावे.<<
असा अनाहत नाद कानात इन्फेक्शन झालेले असले तर ऐकु येतो. पोहणे शिकत असताना मला त्याचा भयाण अनुभव आला. कसलि नाडीशुद्धी आणि कसली चित्ताची एकाग्रता....डोके फिरून गेले होते नुसते... :(
3 Jan 2014 - 8:15 pm | आदूबाळ
याची आठवण झाली.
3 Jan 2014 - 7:30 am | निनाद
एका मोठ्या विषयाचा संक्षिप्त परिचय चांगला झाला आहे.
चित्रगुप्त यांनी सांगितलेला अनुभव हा अनेक इतर ठिकाणी वाचलेल्या अनुभवांसारखाच आहे. जसे की पॉल ब्रंटन (हिमालयातील एक तपस्वी), जगन्नाथ कुंटे (नर्मदे हर हर) व इतर अनेक. त्याअर्थी हा अनुभव बहुदा निसर्गाशी तादात्म्य पावलेल्यांना येत असावा असे वाटते.
अजून वाचायला आवडेल. शक्तीपात साधनेशक्तीही कुंडलिनी जागृती होते असे म्हणतात. परंतु त्याचे उपाय ऐकल्यावर ते जमणे अशक्य वाटले. जसे की ३ लक्ष वेळा कपालभाती प्राणायाम. शिवाय त्याच्या जोडीला लागणारी इतर योगासने व बंध.
कुणाकडे काही शॉर्टकट ;) ???
3 Jan 2014 - 10:45 am | मेघा देसाई
ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका मध्ये कुंडलिनि बद्दल सांगितले आहे पण कोणता अध्याय ते आठवत नाहि.
पण कुंडलिनि कशी जागृत करता येते योग मागाने हे सांगितले आहे.
लेख आवडला
3 Jan 2014 - 12:11 pm | म्हैस
३ लक्ष वेळा कपालभाती प्राणायाम, योगासने व बंध हे सगळा हठ्योगामध्ये करतात. शक्तिपात साधनेत ह्याची गरज नसते. कारण शक्तिपाताने आधी कुंडलिनी जागृत होते आणि मग ती साधकाच्या प्रगतीसाठी लागणारी योगासने, प्राणायाम, बंध स्वतः करून घेते. (साधक करत नाही. आपोआप त्याच्याकडून करून घेतल जातं)
६ व अध्याय आहे. पण मला वाटतं ह्या अध्यायात हठ्योगाबद्दल सांगितलेला नसून राज योगाबद्दल (कलियुगात ह्याला शक्तिपात नाव पडलंय )
3 Jan 2014 - 5:52 pm | चित्रगुप्त
जे आहे, त्याचा सहज संपूर्ण स्वीकार असेल, तर काहीही करण्याची गरज नाही. आपोआप जे घडते, ते आनंदाने बघायचे.
3 Jan 2014 - 8:00 pm | सूड
हे आवडलं !!
3 Jan 2014 - 6:08 pm | गवि
विवेचन उत्तम आहे. पण त्यात जो विषय आहे त्याकडे शक्यतो कोणी वळू नये अशी व्यक्तिगत इच्छा..
या सर्व कल्पनाच आहेत, पण त्यांना सत्य मानल्याने भलतेच काही होऊ शकते..
असो..
3 Jan 2014 - 10:17 pm | इन्दुसुता
या सर्व कल्पनाच आहेत
कशावरून?
येथे विषयांतर होवून चर्चा भरकटेल म्ह्णून जास्त उहापोह करण्याची अपेक्षा नाही.
पण त्यात जो विषय आहे त्याकडे शक्यतो कोणी वळू नये अशी व्यक्तिगत इच्छा..
ह्याबद्दल आदर आहे.
ही इच्छा जशी वैयक्तिक आहे तसेच " या सर्व कल्पनाच आहेत" हेही तुमचे वैयक्तिक मत आहे असे जोडायला हवे होतेत असे वाटून गेले.
4 Jan 2014 - 11:40 pm | राजेश घासकडवी
+१. नियमित योगासनांनी आणि प्राणायामाने शरीराला आणि मनाला अनेक फायदे होऊ शकतात इथपर्यंत मला मान्य आहे. पण हे नाडी, कुंडलिनी वगैरेला काही अर्थ नाही. अंगातनं जाणारे इलेक्ट्रिक करंट, आतून येणारे आवाज वगैरे गोष्टी फायद्याच्या वाटत नाहीत. मिपावरच्या डॉक्टरांनी याबाबत थोडा प्रकाश टाकावा ही विनंती.
5 Jan 2014 - 1:39 pm | अनुप ढेरे
अहो त्या पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्रीचा शक्तिमान झाला होता कुंडलिनि जागृत झाल्यामुळे.
हे पहा...
http://en.wikipedia.org/wiki/Shaktimaan#Origin_of_Shaktimaan
22 Jan 2014 - 3:00 pm | परिंदा
blockquote>अंगातनं जाणारे इलेक्ट्रिक करंट, आतून येणारे आवाज वगैरे गोष्टी फायद्याच्या वाटत नाहीत.
+१००००
उगाच या करंटने मेंदूतल्या एखाद्या कक्षात काही लोचा/डॅमेज झाले तर लेने के देने होऊ शकते.
3 Jan 2014 - 10:20 pm | इन्दुसुता
शरद, विवेचन आवडले.
असेच, संक्षिप्त स्वरूपात प्राण/ अपान/ व्यान/ उदान व समान हे वायू व सुषुम्ना नाडी विषयी काही देता आले तर वाचायला आवडेल.
4 Jan 2014 - 7:11 am | राघव
आवडले.
बाकी "कुंडलिनी ही जागृत व्हायची असते, करायची नसते!" असे संतवचन आहे. त्याबद्दलही थोडे विशद करावे ही विनंती.
4 Jan 2014 - 9:14 am | चित्रगुप्त
नेमके वचन काय (आणि कुणाचे) आहे?
4 Jan 2014 - 5:56 pm | GayatriPradeep
कशी होते कुंडलिनी जागृती? जागृती नंतर पूढे काय? प्राचीन योगग्रंथात उल्लेखलेले अनुभव आजही खरोखरच येतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे अनुभव कथन. देवाच्या डाव्या हाती या बिपीन जोशी यांच्या पुस्तकात वाचावयास मिळतात
4 Jan 2014 - 6:08 pm | कवितानागेश
सुंदर पुस्तक आहे. छोटेसे, नेमके आनि सरळ साधे विवेचन.
22 Jan 2014 - 2:41 pm | म्हैस
हे पुस्तक मी पुण्यामध्ये शोध शोध शोधलं पण काही मिळालं नाही. :( ह्यामध्ये लेखकाने स्वताहून कुंडलिनी जागृत केली आहे. सगळ्यांना ते जमेल असं नाही. स्वामी मुक्तानंदांचा 'चित्शक्ती विलास ' नावाचा पुस्तक आहे. त्यातही त्यांनी कुंडलिनी जागृती नंतरचे स्वताचे अनुभव सांगितले आहेत. पण अनुभव थोडे आणि तत्वज्ञान जास्त असं असल्यामुळे थोडं बोर होऊ शकतं.