बालस्नेहसंमेलन

मितान's picture
मितान in जनातलं, मनातलं
20 Dec 2013 - 2:31 pm

दिवाळी झाली की शाळांना स्नेहसंमेलनाचे वेध लागतात. त्यात चिमुकल्यांच्या आनंदाला तर उधाण येतं. शिशुवर्ग आणि बालवर्गाची तर ही पहिलीवाहिली संमेलनं. पहिल्यांदाच नेहमीपेक्षा वेगळा पोषाख, नाटकात काम, गाण्यावर नाच, फॅन्सी ड्रेस, पाठांतर, गोष्ट सांगणं, लिंबू चमचा नि बेडूक उड्या ! शाळा कोणतीही असो, कोणत्याही गावातली, कोणत्याही माध्यमाची नि बोर्डाची, गरिबीतली किंवा श्रीमंतीतली ; छोट्या वर्गांच्या स्नेहसंमेलनाची धमाल सगळेकडे सारखीच ! अशाच काही संमेलनातील निरीक्षणे.

एका शाळेच्या क्रीडास्पर्धा. बेडुक उड्या. भल्या सकाळी ७:३० वाजता आपापल्या चिमुकल्यांना मैदानावर घेऊन आलेले पालक. मुलांना समजत नाहिये की आजच माझ्या बेडूक उड्या बघण्यासाठी सगळे आईबाबा एवढे का उत्सुक आहेत. बाईंना अजून उत्साह. गणवेषातल्या मुलांना मैदानावर आखलेल्या पांढर्‍या रेषेवर उभं केलं जातं. मुलं निर्विकार चेहर्‍यानं गर्दीकडे बघतायत. काहींच्या माता 'फास्ट जा हं' च्या खुणा करतायत. काहींच्या माता तक्रारीच्या सुरात लहानग्यांचे कौतुक करतायत. " काय दिवे लावते काय माहीत ! घरात तर साधी चालतच नाही. बेडूक, घोडा, गाढव, ससा अशांच्याच उड्या चाललेल्या असतात ". हे सांगताना डोळ्यातून कौतुक ओसंडून चाललेलं. मुलं आता आपसात गप्पा मारतायत. ही 'स्पर्धा' त्यांच्या गावीही नाही. पहिली शिट्टी होते. एखादा झोपाळू ऐसपैस जांभई देतो. बाकी मुलं निवांत. बाईंच्या सूचना. 'आता शिट्टी वाजली की बेडूकउड्या मारत त्या रेषेपर्यंत जायचं हं सगळ्यांनी ! ' मुलं शिकवल्याप्रमाणे सुरात 'हो...' म्हणतात. " जो तिथे आधी पोहोचेल त्याचा नंबर पहिला " मुलं काही न समजताही सवयीनं 'हो....' भरतात. शिट्टी होते.बेडूकपोजिशन मधून पुढे जाताना एकमेकांचा धक्का लागून मुलं पडतात. काही खरोखर टुणटुणत मज्जेत पुढे जातात. पडलेल्यांपैकी काहींचे भोंगे...काहींचं खिदळणं...काहींचं काहीच न सुचून जागेवर उभं राहाणं... यातलाच एखादा 'गिफ्टेड' या सगळ्यांशी देणं घेणं नसल्यासारखा अंगठा चोखत निवांत मांडी घालून पांढर्‍या लाईनवर बसून राहिलेला असतो. त्याची माता तिकडे कपाळाला हात लावून ! क्रीडा शिक्षिकांनी मात्र सगळ्यांना बेडकवायचा चंग बांधलेला असतो. त्या मुलांजवळ जाऊन काहीतरी खुसपुसतात. आता रडणारे,हसणारे,निवांत असणारे डोळे बाईंचे बोलणे प्राण कानात आणून ऐकत असतात. अचानक काय होतं माहीत नाही. "सुरु" असं म्हटल्याबरोबर आतापर्यंत डिंभक असणारे आता डराव डराव करत टणाटणा उड्या मारत स्पर्धा पूर्ण करतात. माता पिता टाळ्या वाजवत सुटकेचे निश्वास सोडतात... !!!

आज बडबडगीतांची स्पर्धा असते. जास्त संख्येनं माता नि कमी संख्येनं पिता मंडळी रांगेत बसलेली असतात. ज्यांनी स्पर्धेत भाग घेतला ती मुलं पुढच्या रांगेन नि ज्यांनी भाग घेतला नाही ती पालकांच्या जवळ. भाग घेतलेल्या मुलांमध्ये अजिबात शांतता नाही. कारण ताणच नाही !
स्पर्धा सुरू होते, बाई पहिले नाव घेतात. अनिका येते. परीक्षकांकडे तोंड करून उभी राहाते. नाव सांगते गाणं सुरू.. कोणास ठाउक कसा, पण शाळेत गेला ससा.... सश्याने उडी मारल्यावर अनिकाचे लक्ष प्रत्येक स्पर्धकाला देण्यासाठी समोर ठेवलेल्या बक्षिसांकडे जाते. गाणं थांबवते. बाई जवळ येतात. प्रेमाने सांगतात, अनिका, पुढचं गाणं म्हणणार ना ? अनिका तो प्रश्न सपशेल दुर्लक्षून बाईंनाच विचारते, ' टेडीची पेन्सिल कधी देणार ? ' ! अनिकाची माता असहाय नजरेने बाई नि परीक्षकांकडे बघत कसनुसं हसते. बाई अनिकाला पेन्सिल देतात. अनिका उड्या मारत जागेवर ! मज्जेत !

आता गोष्ट सांगण्याची स्पर्धा. वातावरण तेच. वेद गोष्ट सांगायला उभा राहातो. "ससा नि कासव पळायला लागतात. सशाला भूक लागते. मग तो मेथीचा पराठा खातो. कासवाला आई म्हणते आंघोळ झाल्याशिवाय लाडू नाही म्हणजे नाही !" त्याची माता चक्कर येऊन पडायचीच बाकी. परीक्षक जे कौतुकाने ऐकतायत ती गोष्ट सांगायची ठरलेलीच नसते. सकाळपर्यंत टोपीवाला नि माकडाची गोष्ट पोपटासारखा सांगणारं आपलं कार्टं आई नि त्याच्यातले प्रेमळ संवाद गोष्टीत का घुसडतंय ते तिला कळतंच नाही.

आज फॅन्सी ड्रेस ! सगळ्या मॉडर्न आयाआणि सोबत जनाबाई, तानाजी, शिवाजी महाराज, संत तुकाराम, भाजीवाल्या, दहीवाल्या, कृष्ण, झाशीच्या राण्या आणि विठोबा रुक्मिणी, झालंच तर भारत माता, बैलजोड्या, वाघोबा, ससे, मोर........... एकच जत्रा. कुरकुरे खाणारा भटजी, दाढीमिशांमध्येच सर्दीने हैराण शिवाजी महाराज, 'मला नाही जायचं ..' म्हणत आईच्या गळ्यात पडणारा तुकाराम, भारदस्त पगडी घातलेला पण कोकिळस्वरात " मी शेंगा खाल्ल्या नाहीत..." म्हणणारा टिळक, आतून घातलेली स्लॅक्स दिसणारा वल्कलधारी राम, मोरपिसार्‍याचे बंद गच्च बांधल्याने तिथे खाजवणारा मोर, मधेच 'मी मोबाईल आहे..' म्हणत नाचत धुमाकुळ घालणारा 'मोबाइल'.... डोळ्यांचे पारणे फिटते अक्षरशः !!!!!

आता मुख्य दिवस. मोठ्या सभागृहात पालक आपापल्या इष्टमित्रांसह आपल्या पिल्लांचा सांस्कृतिक कार्यक्रम बघायला आलेत. स्टेजच्या मागे मुलं सोडलियेत. १० शिक्षिका मिळून सुमारे ८० पोरांना तयार करतायत. मदतीसाठी आलेले निवडक पालक भराभरा पोरींना नऊवारीत गुंडाळतायत. गालांवर 'लाली' नि ओठांवर लिपस्टिक, स्केच पेन ने गोंदण नि डोळ्यात बचकभर काजळ, बॉब केलेल्या केसांना हजारो पिना लावून बांधलेले अंबाडे, त्यातही केस पुढे येऊ नयेत म्हणून डिंकाने ते चिप्प बसवलेले.एकेक जण मोठ्या कापडात गुंडाळलेला गोंडस कोबीचा गड्डा ! कोणाचे तरी कानातले सापडत नाहीत. म्हणून सोनेरी कागद कानाच्या पाळीला चिकटव, कोणाचं गळ्यातलं पदराला शिवून टाक, कोणाला बांगड्या घालून दे...चाललंय.. एकीला पूर्ण नऊवारी नेसवल्यावर, दोर्‍यांनी आवळून बांधल्यावर शू येते. तिचे ऐकून बाकीच्यांनाही. कावलेल्या बाई वरात घेऊन सगळ्यांची लुगडी सोडवत एकेकीला नेऊन आणतात. पुन्हा बांधाबांध. लुगड्यांची. कागदी गजरे नि बांगड्या घालून अखेर ग्रुप तयार. नाचाला जातो नि ठसक्यात धमाल नाचतो.मधेच आपापल्या आई-आजीला हेरून त्यांच्याकडे बघत शायनिंग मारत नसलेल्या स्टेप्सही नाचल्या जातात. ज्या स्टेपला फुगड्या आहेत. तिथे जोडीदारीणच हरवते. ती कोपर्‍यातच ठुमकत असते. तिला ओढत आणून फुगडी उशीराने साजरी होते. तोवर बाकीच्यांची पुढची स्टेप नाचणं सुरू. पण काही फरक पडत नाही. मन लावून क्रमाने नाचणं महत्त्वाचं !

मुलांचा नाच असतो विदुषकांचा. ३० विदुषक रंगीबेरंगी कपड्यात सजलेत. नाकावर फुगे, डोक्यावर टोप्या.. एकाला अचानक आईची आठवण येते. भोंगा निघतो. "आई पाहिजे..... " एका विदुषकासोबत मग बाकीचेही विदूषक रडवेले. याचा "आई पाहिजे.." चा सूर एवढ्या गर्दीत बाहेर बसलेल्या माऊलीला ऐकू जातो. ती लगबगीने विंगेत येते. तिला पाहिलं की बाळाला अजून मोठ्ठ्याने रडू येतं. बाकीचे रडण्याच्या काठावर. बाई महा अनुभवी असतात. आलेल्या मातेला बाहेर पाठवतात. आणि ठेवणीतल्या आवाजात , " सगळे विदूषक जर आता हसले नाहीत तर एकेकाला फटके देईन" असे सुनावतात. मुख्य रड्या विदूषक गप्प. बाकी गप्प. तेवढ्यात गाण्याचा नंबर. विंगेतून स्टेजवर जाताना एकेकाच्या चेहर्‍यावर हसू. गाणं सुरू होतं. रंगीत तालीम दोन वेळा झाली असूनही ३० पैकी १०-१२ विदूषकच नाचत असतात. बाकीचे पाय हलवत समोर प्रेक्षकांमध्ये आई बाबांना शोधत असतात. विशेष म्हणजे ते एकमेकांना सापडतात. मग गाण्याला उधाण येतं नि उरलेला नाच झोकात होतो !

नंतरची भाषणं, सत्कार, बक्षिसं यात कोणालाच रस नसतो. आई बाप आपल्या चिमुकल्यांनी पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्म केल्याच्या कौतुकात नि मुलं एवढ्या गर्दीत सापडले बाबा आईबाबा ! या विचारात बडबडत सुटलेले !!!
अशा रितीने हे पहिलेवहिले स्नेहसंमेलन पार पडते.
तुम्हाला आठवतायत अशा गमतीजमती ? सांगा तर मग...

शिक्षणआस्वाद

प्रतिक्रिया

जेपी's picture

20 Dec 2013 - 2:49 pm | जेपी

आवडल .
आमाला काय अजुन अनुभव न्हाय बॉ . तुर्तास हेवढच

कवितानागेश's picture

20 Dec 2013 - 3:19 pm | कवितानागेश

गमतीदार आहे हे.
नाचाच्या वेळेस समोर मुले हरवून तश्शीच उभी असतात आणि विन्गेत टीचर्स मात्र त्यांचे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत वेगवेग्ळ्या स्टेप्स करत नाचत असतात, हे एक हमखास द्रुष्य असते अश्यावेळेस. :D

प्यारे१'s picture

20 Dec 2013 - 3:26 pm | प्यारे१

भन्नाटच!

धनू_२२६'s picture

20 Dec 2013 - 3:29 pm | धनू_२२६

तुफान लिहीलय ........... नजरेसमोर आले सगळे ...

मृत्युन्जय's picture

20 Dec 2013 - 3:45 pm | मृत्युन्जय

मस्त. बालवाडीत मला कृष्ण केले होते ते आठवतय. मी कृष्ण आणि २ गोपिका असा झक्कास मामला होता. काहितरी नाच होता. मी बासरी ओठाशी धरुन उभा राहिलो आणि गर्दीत अखंडवेळ आईला शोधत होतो. आई दिसली की थोडाफार नाचायचो. तेवढ्यात आई बसलेली जागा परत मिस व्हायची. मग परत शोधत बसलो. असा खेळ पुर्णवेळ चालु राहिल्या. दोन्ही गोपिका बहुधा जरा बर्‍या नाचत होत्या. पण त्याही अश्या हरवलेल्याच होत्या थोड्याफार. नंतर "ससा ओ ससा..." मात्र मी झोकात म्हटलो होतो असे आई सांगते त्याचे बक्षिसही मिळाले. गाण्यासाठी नरड्याचा उपयोग त्यानंतर मी कधी करण्याच्या फंदात पडलो नाही ;)

माझ्या लेकाला खूप लहान असतानाच चश्मा लागला. तो पहिलीत असताना त्यांचा धनगर नाच होता. लेकाला मस्त सजवलं होतं घोंगडी,काठी देउन. पण धोतर शाळेने आणलेलं . ते कधी धुतलं होतं कुणास ठाऊक! नाच सुरु झाल्यावर धनगारांना खाज सुटायला लागली,चश्मा ,काठी आणि खाज सावरत जबरदस्त डॅन्स चालला होता. पण शेवटी एका धनगरणीची नथ्, धनगराच्या पागोट्यात अडकली,नाच बाजुला राहुन दोघांनी फ्री स्टाइल फायटींगचा डेमो दिला!! बाकीच्या धनगरांनाही त्यात इन्टेरेस्ट आल्याने त्यांनी नाच सोडुन दिला!! दमलेल्या बाई मग उरलेसुरले धनगर घेउन स्टेजमागे घेउन गेल्या. चश्मेवाला मात्र फायटींगमध्ये चश्मा पडल्याने दुसर्या नाचाच्या वेळेला मधेच धोतर सुटुन दिसणारी चड्डी, सुटलेले पागोटे आणि काठी अशा अवतारात येउन चश्मा,हशा आणि टाळ्या घेउन पळुन गेला!!!

अत्रुप्त आत्मा's picture

20 Dec 2013 - 6:33 pm | अत्रुप्त आत्मा

नाच सुरु झाल्यावर धनगारांना खाज सुटायला लागली,चश्मा ,काठी आणि खाज सावरत जबरदस्त डॅन्स चालला होता. पण शेवटी एका धनगरणीची नथ्, धनगराच्या पागोट्यात अडकली,नाच बाजुला राहुन दोघांनी फ्री स्टाइल फायटींगचा डेमो दिला!! बाकीच्या धनगरांनाही त्यात इन्टेरेस्ट आल्याने त्यांनी नाच सोडुन दिला!! दमलेल्या बाई मग उरलेसुरले धनगर घेउन स्टेजमागे घेउन गेल्या. चश्मेवाला मात्र फायटींगमध्ये चश्मा पडल्याने दुसर्या नाचाच्या वेळेला मधेच धोतर सुटुन दिसणारी चड्डी, सुटलेले पागोटे आणि काठी अशा अवतारात येउन चश्मा,हशा आणि टाळ्या घेउन पळुन गेला!!!

>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/hysterical-laughter-smiley-emoticon.gif

मितान's picture

20 Dec 2013 - 5:25 pm | मितान

अजया =))
धमाल किस्सा ! डोळ्यासमोर आलं सगळं !
परवा एका नाचात शेवटी एकमेकांची शेपटी धरून गोलात फिरायचं होतं. ते मुलं विसरली. बाईंनी विंगेतून सांगितलं. मुलं जे फिरायला लागली ते थांबेचनात !!! शेवटी माकडांचे मुखवटे घालून बाईच स्टेजवर आल्या नि साखळी तोडून सर्वांना आत घेऊन गेल्या. :))

अत्रुप्त आत्मा's picture

20 Dec 2013 - 6:38 pm | अत्रुप्त आत्मा

@" सगळे विदूषक जर आता हसले नाहीत तर एकेकाला फटके देईन" असे सुनावतात. मुख्य रड्या विदूषक गप्प. बाकी गप्प. तेवढ्यात गाण्याचा नंबर. विंगेतून स्टेजवर जाताना एकेकाच्या चेहर्‍यावर हसू. गाणं सुरू होतं. रंगीत तालीम दोन वेळा झाली असूनही ३० पैकी १०-१२ विदूषकच नाचत असतात. बाकीचे पाय हलवत समोर प्रेक्षकांमध्ये आई बाबांना शोधत असतात.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/yellow-lol-smiley-emoticon.gif

संदीप चित्रे's picture

20 Dec 2013 - 8:42 pm | संदीप चित्रे

खूप दिवसांनी असं छान काहीतरी निरागय वयाबद्दल वाचायला मिळालं.

मुक्त विहारि's picture

20 Dec 2013 - 9:00 pm | मुक्त विहारि

आवडले....

मधुरा देशपांडे's picture

20 Dec 2013 - 10:11 pm | मधुरा देशपांडे

आवडले. मस्त लिहिलंय खूप.
शाळेतल्या आठवणीना उजाळा मिळाला. आई बाबा दोघेही काय काय कल्पना लढवायचे प्रत्येक स्पर्धेसाठी. ती सगळी आधीची तयारी, साहित्याची जमवाजमव हे पण खूप आनंददायी असतं. आणि तेव्हा तर इंटरनेट वगैरे नव्हतं. मग वेशभूषा कशी करायची त्यासाठी तुम्ही कोण होणार आहात त्याप्रमाणे आधी फोटो शोधायचा, कुणालातरी विचारायचं, मग त्याप्रमाणे सगळी तयारी, घरातल्याच वस्तूंमधून मग काही करत येतंय का हे शोधायचं हे सगळं फार मस्त वाटतं. मला आईने नर्स केलं होतं एकदा, आणि त्यासाठी घरीच साडी शिवली होती, ती साडी मी पुढील स्नेहसंमेलन आले तरी नर्सची साडी म्हणून मिरवत होते. आणि कधी दवाखान्यात नर्स भेटलीच, तर अशीच साडी माझ्याकडे आहे याचा आनंद असायचा. राणी लक्ष्मीबाई झाले होते तेव्हा सगळी तयारी झाली आणि स्टेजवर जाताना मी घरात घालायच्या चप्पल घालून गेले. आता तो फोटो बघताना हातात ढाल आणि पायात स्लीपर हे बघून हहपुवा होते :)

यसवायजी's picture

21 Dec 2013 - 12:25 pm | यसवायजी

राजा चक्रमादित्य, हातात तलवार आणी पायात शिल्पर.. माझा पण असा एक फोटो आहे.. हहपुवा होते.
कृष्ण, शिवाजी महाराज, यडा वकील, आतंकवादी, फौजी असे बरेच रोल पार पाडलेत.. काय हौस असायची..
तोंडपाठ करुन गावोगाव भाषणं देत हिंडायचो.तेंव्हा जास्त समजायचे नाही,पण आता ती शोकेस, ढाली, कप, प्रशस्तीपत्रके आणी मेडल्स पहायला आवडते.

धमाल वर्णन अन निरीक्षणशक्ती !
तुफान हसले !

अमित खोजे's picture

20 Dec 2013 - 10:38 pm | अमित खोजे

मधेच आपापल्या आई-आजीला हेरून त्यांच्याकडे बघत शायनिंग मारत नसलेल्या स्टेप्सही नाचल्या जातात.

ज्या स्टेपला फुगड्या आहेत. तिथे जोडीदारीणच हरवते. ती कोपर्‍यातच ठुमकत असते. तिला ओढत आणून फुगडी उशीराने साजरी होते. तोवर बाकीच्यांची पुढची स्टेप नाचणं सुरू.

हसून हसून पुरेवाट झाली *clapping*

बहुतेक सर्व वाचकांना थेट स्टेजवर घेऊन जाणार्‍या आठवणी, मस्त मांडल्या आहेत.

आनन्दिता's picture

21 Dec 2013 - 2:59 am | आनन्दिता

धाग्याचं नाव वाचलं आणि हे आठवलं..
३:१५ :)

www.youtube.com/watch?v=pRWmISaz-pk

कलंत्री's picture

21 Dec 2013 - 9:10 am | कलंत्री

अतिशय छानपणे सर्व वर्णन वाचायाला मिळाले. लहाणपण अगदी मुर्तिमंत डोळ्यासमोर उभे राहिले. लहाणपणाच्या गोष्टी म्हणजे अखंड उर्जेचा स्त्रोत असतो. त्याच्या आठवणीही मनात ताजेतवाणेपणा निर्माण करत असतात.

देशपांडे विनायक's picture

21 Dec 2013 - 12:04 pm | देशपांडे विनायक

हैद्राबाद येथे गेलो असताना एका बाल संमेलनास उपस्थिती लावली त्याचे फोटो
आपण वर्णन केले ते किती स्थलकालातीत आहे याचा मला अनुभव आठवला
स्टेजवर या '' गौरी ''ओळखण्यासाठी फार कसरत करावी लागते

'' गौरी ''


स्टेज मागील तयारी आणि सूचनांचा शेवटचा तास


संग्राम कदम's picture

21 Dec 2013 - 12:12 pm | संग्राम कदम

लै भारी

बाबा पाटील's picture

21 Dec 2013 - 12:48 pm | बाबा पाटील

माझेी लेक पहिलेीतच आहे त्यामुळे मागचे २ - ३ वर्ष नर्सरेी पासुन हे असेच एक से बढकर अनुभवग घेत आहे. नुसता धुमाकुळ असतो राव.

सुहास..'s picture

23 Dec 2013 - 4:07 pm | सुहास..

हा हा हा !!

छान बालगोपाल किस्से !!

बर्‍याच दिवसाणी दर्शनाचे समाधान आहेच !!

इशा१२३'s picture

23 Dec 2013 - 4:24 pm | इशा१२३

लहानमुलांची संमेलन भन्नाट्टच!एकाहुनएक मजेशीर अनुभव आहेत.एकदा मुलाच्या शाळेत संमेलन होते. सिनिअर केजीचा वर्ग आणी संमेलनचा विषय होता 'गीतरामायण'.यांच्या वर्गाला 'स्वयंवर झाले सीतेचे'गाणे होते.यात चिरंजिव शत्रुघ्न झाले होते.पुर्ण गाण्यात फारसा नाच मुख्य पात्रांना नव्हताच फक्त हार घेउन उभे रहायचे होते.पण शेवटच्या काही गण्याच्या ओळींवर 'सातफेरे' करायचे होते.मग काय इतक्या वेळ उभे असलेली रामसीतेची जोडी सुसाट गोल गोल पळायला लागली.साधारण त्याच वेगात उर्मिला लष्मुणासकट पळायला लागली.भरत आणि मांडवी मात्र घटस्फोट झाल्यासारखी उभीच राहीली रागाने बघत.आणी शत्रुघ्न झालेला आमचा बाब्या हलेचना.शेवटी श्रुतकिर्ती झालेल्या त्याच्या जोडीदारीणिने त्याचा हात जोरात ओढला आणी जे गरगरा स्वतामागे फीरवलान आणी एकदाच गाण संपल.
त्याच्या पुढच्या वर्षी 'दिंडी' विषय होता.त्यात आमचा बाब्या तुकरामबुवा झालेले.चानचान सजवुन ,हातात चिपळ्या देउन बुवांना उभे केले.उभे रहायचे आणी हळुहळू गोल डोलत फीरायचे होते.स्टेजवर भरपुर संत,विठोबा रखुमाइ,वारकरी असा अख्खा वर्गच असावा.एकएक संत पुढे येउन जात होते. आता ठरल्याप्रमाणे बुवांनी याव ना!पण बुवा हातात पागोटे आणी चिपळ्या एकनाथांकडे सोपवून पुढे येउन उभे रहीले.मग टीचरने एकदाच पगोटे डोक्यावर ठेवले आणि मी हुश्श केले.आता तेच पिल्लु हायस्कुलात गेल्याने मुलींबरोबर नाचणार नाही, जाम नखरे करतात त्या असे सांगितले आहे.त्यामुळे ती मजा नाही.
मला मात्र शाळेत फारच राग आला होत बाइंचा.बालशिवाजीवर नाटक बसवले होते चवथीत असताना.मी जिजाउ झाले होते.छान नउवारि,दागीने,कंबरपट्टा,अंबाडा आणी वर गजरा जो फारच आवडायचा.सगळ नटुन शाळेत गेले तर बाईनी डोक्यावर पदर दिला आता गजरा दिसणार कसा?मला तर रडुच फुटायला लागल. मला लोंबका गजरा हवा होताना दिसणारा, पण कुण्णी माझ एकलच नाही.जिजाउ कसा लोंबका गजरा घालणार म्हने.

मृत्युन्जय's picture

23 Dec 2013 - 5:23 pm | मृत्युन्जय

वटी श्रुतकिर्ती झालेल्या त्याच्या जोडीदारीणिने त्याचा हात जोरात ओढला आणी जे गरगरा स्वतामागे फीरवलान आणी एकदाच गाण संपल.

इथे उतावळा नवर्‍याच्या ऐवजी उतावळी नवरी झाली म्हणायची ;)

प्रभाकर पेठकर's picture

23 Dec 2013 - 4:59 pm | प्रभाकर पेठकर

स्नेहसंमेलनाला जमलेले प्रेक्षक शेवटपर्यंत कार्यक्रमाला हजर राहावेत, ह्या आमच्या मुख्याध्यापकांच्या, स्वार्थी विचारातून मला 'नाच' आणि 'गाणे' ह्या दोन्ही कला सादर करण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते.

फारच हट्ट केला तेंव्हा, एकदा एका नाटिकेत उभे करण्याचे धाडस आमच्या दिग्दर्शिका बाईंनी केले. प्रत्यक्ष स्नेहसम्मेलनाच्या दिवशी मी माझ्या संवादाला जोडूनच दुसर्‍या कलाकारा(?)चा संवादही बोलून टाकला. तो कलाकार बावचळला. आता मी काय बोलू? अशा अर्थाने विंगेत उभ्या दिग्दर्शिका बाईंकडे त्याने केविलवाण्या नजरेने पाहिल्यावर 'पुढचा..पुढचा डायलॉग बोल' असा अविर्भाव बाईंनी केला. तो न समजून दुसर्‍याच एका कलाकाराने संपूर्ण संदर्भहीन असा डायलॉग घेतला. त्याने नाटक लांबउडी मारून ३ पाने पुढे गेले. सगळ्यांचीच होती नव्हती ती लिंक तुटली. सर्वजण, 'आता काय करावे?' अशा केविलवाण्या अवस्थेत एकमेकांकडे पाहू लागले. सर्वात वाईट अवस्था झाली ती एका कलाकाराची. त्याची तर एक्झीटही झाली होती त्या गाळलेल्या ३ पानांमध्ये. ते लक्षात येऊन, कोणाशी कांही न बोलता, तो खालच्या मानेने, ढुंगण खाजवत, विंगेत चालता झाला. अजून अवघड प्रसंग येऊ नये म्हणून पडदा पाडण्यात आला. प्रेक्षकांनी फार उत्स्फुर्तपणे टाळ्या वाजवल्या बुवा!

सचिन कुलकर्णी's picture

23 Dec 2013 - 5:14 pm | सचिन कुलकर्णी

काका, हसून हसून पुरेवाट झालीये. बाकीच्यांच्या अनुभवावर पण असेच काही झाले.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Dec 2013 - 12:08 am | अत्रुप्त आत्मा

@ सर्वात वाईट अवस्था झाली ती एका कलाकाराची. त्याची तर एक्झीटही झाली होती त्या गाळलेल्या ३ पानांमध्ये. ते लक्षात येऊन, कोणाशी कांही न बोलता, तो खालच्या मानेने, ढुंगण खाजवत, विंगेत चालता झाला. >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif

आमच्या शाळेत एकदा नाटकात दोन बायका(मुली) भांडतात आणि एकमेकांचे अंबाडे ओढायचा अभिनय करतात असा प्रसंग होता. त्या दोन बायकांमध्ये एक मुलगी बॉबकटवाली होती. तिला खोटा अंबाडा लावला होता.

ऐन रंगमंचावर या दोघी काय जोशात आल्या भांडताना! त्या बॉबकटवालीचा अंबाडा गजर्‍यासकट दुसरीच्या हातात. हा हशा पिकला म्हणून सांगू.

रंगमंचावर असलेली इतर पात्रेही खो खो हसत होती. पण २-३ मिनीटांत भानावर येऊन मग सगळे नीट काम करु लागले.

एकसे बढकर एक किस्से आहेत !!!

पैसा's picture

23 Dec 2013 - 8:01 pm | पैसा

लेख लै भारी आणि प्रतिक्रियातले किस्से आणखीच भारी!

आमच्या शाळेत एकदा टिपर्‍यांचा नाच बसवला होता. कृष्णाला नाचायचं नव्हतं. मग आयत्या वेळी कोणालातरी बासरी देऊन उभं करू असा विचार बाईंनी केला. माझ्या चुलतबहिणीला नाचाच्या वेळी कृष्ण बनवलं. आधी ती मस्त तयार झाली. पण स्टेजवर उभं केल्यावर तिथे उभी रहायला कशीच तयार होईना. आईऽऽ म्हणून भोकाड पसरून झालं. शेवटी कृष्णाला हातात बासरीच्या ऐवजी बिस्कीट देऊन उभं केलं!

सुहास..'s picture

23 Dec 2013 - 8:18 pm | सुहास..

आम्हाला ही जरा ( त्यावेळी ) गोर्‍या गोमट्या चेहर्‍यामुळे गोपिका करण्यात आले होते, पाचवीत होतो, एक तर तो विग ...आणि ती काचोळी.. एम्ब्रॉयडरी केलेली आतुन ...थंडीचे मॉईश्चरायजरचे दिवस ...आम्ही जाणुन बुजुन न लावणारे ;) नुसती खाजवायची , ईकडे कृष्णाभोवती गिरकी घेताना स्साली अजुन फिटिग मुळे खाज सुटायची मग एका हाताने तिथे खाजवायचे आणि दुसर्‍या हाताने टिपरी मारायची ...त्यात खुद्द बंधुराजच कृष्ण भगवान ...त्याला आजही मुड झाला की मला ...सुराधा खाजवेकर म्हणतो =))

लहाणपणी गोपिका आणि मोठेपणीचा कृष्ण ;)

तुमचा अभिषेक's picture

23 Dec 2013 - 11:09 pm | तुमचा अभिषेक

छान लिहिलेय, प्रतिसादातील किस्सेही भारी..
आपली आई मात्र नोकरी करणारी आणि आपण शाळेत दूर दादरला जिथे स्कूलबसनेच जाणे व्हायचे, ते ही अगदी ज्युनिअर केजी पासून.. त्यामुळे स्नेहसंमेलन आणि स्पर्धांचे अनुभव असले तरी आईच्या जोडीने नाहीत.. :(

लॉरी टांगटूंगकर's picture

24 Dec 2013 - 12:42 am | लॉरी टांगटूंगकर

बेक्कार हसलोय!!! सगळेच किस्से मस्त!!

चौथा कोनाडा's picture

18 Oct 2014 - 11:18 pm | चौथा कोनाडा

मस्त, गंमतीदार लिहिलेय ! वाचताना मुलांच्या जगात हरवून जायला होते.