हा लेख खूप दिवस डोक्यात होता. पण लिहायला जमले नाही आणि माझा पिंड लेखकाचा नाही असं मला वाटायचं. पण सध्या असं वाटायला लागलं की लिहिण्याची गरज आहे. गेले काही दिवस समलैंगीकतेवरून चर्चांचा बाजार उठला आहे. काही बुद्धीवादी, “पटाइत” लोकं तर स्वत:लाच निसर्ग समजून, जगातील सर्व गोष्टींना नैसर्गिक आणि अनैसर्गिक, उत्कर्ष-विनाश, असं वेगळं करू लागली आहेत. म्हणून मग विचार केला की आपणसुद्धा का नाही चार शब्द लिहावेत? म्हणून हा खटाटोप.....
अगदी शुरू से शुरुआत करायची तर मी अगदी लहान असताना मला मुलांबद्दल आकर्षण वाटायचं. ह्या आकर्षणाची सगळ्यात पहिली आठवण मी दुसरीत असतानाची. मला शिक्षा म्हणून जमिनीवर छोटं टेबल घेऊन बसवलं जायचं आणि मी मागे बसलेल्या माझ्या मित्रांच्या चड्डयांमध्ये हात घालायचो. ह्या वयात केलेल्या कुठल्याही कृत्यांना मला लेबलं (समलिंगी वगैरे) लावायची नाहीत पण एक आठवण म्हणून. पुढे आई म्हणायची की माझे वडील मला खूप मारायचे. पण का, कसं, खरंच का, हे मला काहीच आठवत नाही. आता इतर मित्रांबरोबर चर्चा केल्यानंतर असं लक्षात येतं की कदाचित माझे बायकी हावभाव त्यांना तेव्हाच लक्षात आले असतील म्हणून मला सुधरवण्याचा प्रयत्न म्हणून ते मला मारत असतील.
त्यानंतरच्या आठवणी म्हणजे प्यूबर्टी हिट केल्यानन्तरच्या. मला माहित होतं की मी वेगळा आहे. कारण माझं वेगळेपण माझ्यावर सतत ठसवलं जात होतं. मला कधी विसरूनच दिलं नाही की मी इतर मुलांसारखा, पुरुषांसारखा नाही. मला भरपुर मैत्रिणी होत्या आणि आम्ही शाळेत एकत्र जायचो आणि यायचो. शाळेतल्या एका बाइंनी एका मास्तरला सांगितलं की हा फारच मुलींमध्ये असतो आणि त्या मास्तरनी मला झोडपला होता. आमच्या वर्गात मुला-मुलींची सारखी भांडणं व्हायची. आणि मुलं “फतवा” काढायची की आजपासून मुलींशी बोलणं बंद. पण मी मुलींशी बोलायचो. आणि म्हणून मग माझ्याशीही बोलणं बंद.
साधारण आठवीत असताना मला कळलं की मला मुलांबद्दल आकर्षण आहे. इतक्या मुली आजूबाजूला असताना मला कधीही त्यांच्याबद्दल आकर्षण वाटलं नाही. माझं वागणं, बोलणं, चालणं मुलींसारखं होतं. मी मस्त लाजायचो. मला खूप भारी वाटायचं. माझ्याभोवती सारख्या मुली असायच्या म्हणून मला कन्हैय्या म्हणायचे. मला अजूनही बरीच नावं होती. चिकण्या, छक्क्या, हिजड्या, बायल्या अशी बरीच नावं होती. आणि त्यांचा वापर सुद्धा मुक्तहस्तानी व्हायचा. बर्याचदा मला हे सगळं जड जायचं आणि मी रडायचो. मग मुलीच माझी समजूत काढायच्या. तर ते बघूनसुद्धा इतर मुलं जळायची. मला मुलं आवडतात हे कोणाबरोबर शेयर करायचीसुद्धा भीती वाटायची. एकाला सांगितलं आणि त्याने सगळीकडे पसरवलं तर? अश्या वेळेस कोणाचा आधार नव्हता.
मला पुरुष म्हणून वागायचं लेक्चर दिलं जायचं. पण मला हेच समजायचं नाही की पुरुष म्हणून वागायचं म्हणजे नक्की कसं वागायचं? नैसर्गिकरीत्या मिळालेल्या शरीराने तर मी पुरुष होतो पण मनाने मी स्त्री होतो. मला लाजायाला आवडायचं. मला मुलींसारखं बोलावं, चालावं असं वाटायचं. मला त्या सगळ्या गोष्टी कराव्याशा वाटायच्या जेणेकरून मी मुलांचं / पुरूषांचं लक्ष माझ्याकडे वेधून घेईन.
म्हणजे ज्या कोणाला वाटतं की हे सगळं अनैसर्गिक आहे, तिथे माझ्याकडे चॉइसच नव्हता की माझ्याबरोबर काय होतंय. आणि ज्या वेळी आपण एखादी गोष्ट अनैसर्गिक अनैसर्गिक आहे असं म्हणतो तेव्हा आयुष्यात काय फक्त तीच गोष्ट असते का? मी पुरुष आहे आणि एखाद्या पुरुषाबरोबर मला शारीरिक संबंध ठेवायला आवडतं असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा माझ्या पूर्ण आयुष्यात काय फक्त शरीरसंबंधच असतात का? For that matter, तुमच्याही आयुष्यात फक्त शरीरसंबंधच आहेत का? दिवसातल्या १५ मिनिटामध्ये मी काय करतो ह्याचा विचार करताना माझ्या दिवसातल्या बाकीच्या २३ तास ४५ मिनीटांकडे तुम्ही दुर्लक्ष का करता? अॅनॅटॉमीच्या एका भागाला आपण इतकं का महत्त्व देतो की बाकीचं शरीर झाकोळून जावं? दोन पायांच्या मधून विचार करण्यापेक्षा, विचार करताना जर मेंदू आणि हृद्य वापरलं तर बरेचसे प्रश्न निर्माणच होणार नाहीत.
आणि हे झालं फक्त शरीराचं. मनाचं, भावनांचं काय? तुम्हाला मुली आवडतात ही भावना तुम्ही पूर्णपणे खोडून काढू शकता का? मग मला मुलं आवडतात ही भावना, मी खोडून काढावी अशी तुमची अपेक्षा का? जितक्या सहजपणे तुम्हाला मुलींविषयी आकर्षण वाटायला चालू होते, त्याच सहजपणे मला मुलं आवडायला लागतात. जितकं नैसर्गिक तुम्हाला मुलींविषयीच्या आकर्षणात वाटतं तेव्हडच नैसर्गिक मला मुलं बघताना वाटतं. एखाद्या पुरुषाबरोबर जीवन जगावं ही माझी शारिरीक कमी आणि मानसिक गरज जास्तं आहे.
आणि एक मुद्दा म्हणजे निर्मितीचा. आपण अजून किती निर्मीती करणार आहोत? अहो, त्या निर्मितीला काही लिमिट्स आहेत की नाहीत? हे म्हणजे ‘माकडाच्या हातात कोलीत' सारखा प्रकार झाला. हातात आग आणि त्या आगीबद्दल कुतूहल किंवा कौतुक. लावा सुटत सगळीकडे.......... आग हो. ;) आधीच केलेली निर्मिती सांभाळताना आपल्याला नाकीनऊ येतायत. मला वाटतं की भरमसाठ वाढणारी निर्मिती थांबवण्यासाठीच निसर्गाने केलेली युक्ती म्हणजे समलिंगत्व. (हा माझा युक्तीवाद आहे).
आणि अजून एक मुद्दा जो पाश्चात्य देशांमध्ये जास्त ऐकायला मिळतो, की समलिंगी संबंधामुळे लग्नसंस्था धोक्यात येते. अहो, तुमची लग्नसंस्थाच इतकी तकलादू झाली आहे की ती ढासळायला बाकी कशाची गरजच नाही. म्हणजे, लोकं डीव्होर्स घेतात ते ह्यांना चालतं. काही डिव्होर्स तर लग्नानंतर काही तासांनंतरच झाले आहेत (काही वेस्टर्न सेलेब्रिटीज वगैरे). ते चालतं, पण जरा कुठे दोन पुरुष किंवा दोन स्त्रिया एकत्र राहणार म्हणलं की लगेच ह्यांची लग्नसंस्था धोक्यात येते. माझ्या ओळखीत अशी काही गे जोडपी आहेत, जी २०-२५-३० वर्षं एकत्र आहेत.
त्यातून आता आम्ही गुन्हेगार. आमच्याच बेडरुममध्ये, आमच्याचसारख्या लोकांबरोबर, एकमेकांच्या पूर्ण संमतीने जरी संभोग केला तरी आम्ही गुन्हेगार. म्हणजे काही लोकं स्त्रियांवर बलात्कार करतात, त्या मुली जीवे मरतात, पण बलात्कारी मात्र फाशीच्या कलमाखाली तुरुंगात पूर्ण आयुश्य जगतात. ते सुद्धा आम्हीच भरलेल्या कराच्या पैश्यातून.
खाली एक तूनळीची लिंक टाकतो आहे. त्यातला मुलगा एका लेस्बिअन कपलकडून वाढवला गेलाय. कृपया तो पहा.
http://www.youtube.com/watch?v=yMLZO-sObzQ
Writing all these things is really overwhelming. I am not able to put my thoughts correctly. I feel I will stop here and write another thread about all these, taking my own time.
ता.क. : मी काही दिवसांसाठी कामाला बाहेर जातोय. मला तुमच्या प्रतिक्रिया वाचायला जमणार नाही. पण परत आल्यावर मी त्या नक्की वाचीन आणि उत्तरं देण्याचा प्रयत्न करीन. तुमच्या वेळासाठी धन्यवाद.
प्रतिक्रिया
13 Dec 2013 - 7:59 pm | ज्ञानव
तुमचे मुद्दे आणि तुमचे जग, तुमचे प्रश्न आणि त्याबाबत समाजाच्या ठेके दारानी चालवलेले मंथन ह्यावर भाष्य करावे एवढी प्रगल्भता माझ्यात तरी नाही. पण आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करतानाचा तो उमेदवारीचा काळ आठवतो मला २०-२२ तृतीय पंथी लोकांना घेऊन शिर्डीला जाणार का असे एकाने कुत्सितपणे विचारले होते आणि रागाच्याभरात मी हो म्हणालो होतो (वय २१ )आणि मी गाडी, परमिट ई सगळे केले आणि त्यांना नेऊन आणले. त्यांनी ज्या आदराने मला वागणूक दिली ती आज ही स्मरते.
एक माणूस म्हणून एका माणसाशी जसे वागायला हवे तशी वागणूक मला सर्वांच्या बाबतीत अपेक्षित आहे.
पण एक तक्रार हि आहे.
समलिंगी पुरुष जेव्हा लोकलमध्ये स्पर्श खेळ करतात त्याने त्रास होतो दोन कारणांनी की जर त्याला अर्वाच्य
शिव्या घालाव्यात तर इतर लोक धोपटतील त्याला जे मला पसंत नाही आणि त्याही पेक्षा आमचे सभ्य मन आम्हाला तसे करू देत नाही. आणि दुसरे कारण पुरुषांच्या डब्यात जेव्हा स्त्री येते तेव्हा आम्हीही तिच्याशी कुठलेही स्पर्श खेळ करत नाही. तुमचे सम लिंगी आकर्षण चूक की बरोबर,त्याचे समाजावर होणारे परिणाम ह्यावर भाष्य करण्याइतकी प्रगल्भता माझ्यात नाही पण तुम्ही जे लिहिले आहे त्यातली वेदना समजण्याचा प्रयत्न जरूर करू शकतो.
13 Dec 2013 - 8:48 pm | आबा
तुमची अवस्था काय होत असेल हे समजू शकतो.
13 Dec 2013 - 10:19 pm | शोधा म्हन्जे सापडेल
ज्ञानव, मला तुमचा मुद्दा पूर्ण पटतो. लोकलमध्ये होणारे स्पर्श किळसच आणतात. आणि हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही त्याबद्दल पब्लिकमध्ये बोलत नाही. पण जसं, आंब्याच्या पेटीमध्ये एखादा आंबा किडका निघतो, तसंच हे सुद्धा आहे. काही थोड्या लोकांमुळे पूर्ण वर्गच दुषित नजरेतून बघितला जातो.
14 Dec 2013 - 2:20 am | अत्रुप्त आत्मा
@ जितकं नैसर्गिक तुम्हाला मुलींविषयीच्या आकर्षणात वाटतं तेव्हडच नैसर्गिक मला मुलं बघताना वाटतं. एखाद्या पुरुषाबरोबर जीवन जगावं ही माझी शारिरीक कमी आणि मानसिक गरज जास्तं आहे. >>> अतिशय महत्वाचं!
14 Dec 2013 - 2:52 am | रामपुरी
@ मला माहित होतं की मी वेगळा आहे. कारण माझं वेगळेपण माझ्यावर सतत ठसवलं जात होतं. मला कधी विसरूनच दिलं नाही की मी इतर मुलांसारखा, पुरुषांसारखा नाही.>>> हे त्याहून जास्त महत्वाचं