नमस्कार मंडळी !
पहिल्या भागात (http://www.misalpav.com/node/3636)आपण बर्लीनमधल्या काही महत्वाच्या वास्तूंचे दर्शन घेतले.
आता बोटीत बसून बर्लीनमधल्या 'श्प्रे' या नदीमधून प्रवास करुया.
या नदी काठी बर्लीनमधले एक जगप्रसिद्ध वस्तूसंग्रहालय आहे. पार्गामोन या संग्रहालयात आम्ही गेलो तेव्हा बाबिलॉनियन संकृतीविषयी विशेष दालन करण्यात आले होते. आम्हाला त्या संस्कृतीविषयी काही चित्रफिती, चित्रे आणि पुराणवस्तू पहायला मिळाल्या. त्या संग्रहालयात कायमस्वरुपी असे जे प्रदर्शन आहे त्यात सुद्ध अनेक मोठमोठे भग्नावशेष जतन करुन ठेवण्यात आले आहेत. त्यातीलच काही चित्रे पहा.
या संग्रहालयात चांगले तीन-चार तास फिरुन अनेक उत्तमोत्तम शिल्पे पाहुन आम्ही इजिप्शिअन संग्रहालय पाहण्यास गेलो.
वरचे उजवीकडचे चित्र हे नेफेर्तीती या राणीचे आहे. तो पुतळा तीन-साडेतीन हजार वर्षांपुर्वीचा आहे. तो अत्यंत सुस्थितीमध्ये राहिला आहे.
इजिप्तमधली काही चित्रेकाढलेली भांडी आणि दगडावर कोरलेली चित्रलिपी
काही देवता, सांकेतीक प्राणीचिन्हे
आता त्या संग्रहालयातले एक आकर्षण म्हणजे ममी.
तेथे आई-वडिल-मुले अश्या ममी ठेवल्या आहेत. त्याकाळी कुटुंबीयांना एकाच ठिकाणी दफन करत. त्यामुळे सर्व कुटुंब कालांतराने पुन्हा एकत्रच येई. तसेच बालमृत्युचा दर सुद्धा जास्त असे. खालच्या चित्रांमध्ये डावीकडे वडिल तर उजवीकडे तीन मुले आहेत.
वस्तूसंग्रहालये पाहुन झाल्यावर आम्ही बर्लीनच्या जवळचेच शहर पोट्सडाम येथे गेलो. हे शहर इतिहास प्रसिद्ध आहे कारण प्रशियाचे राजे इथे असलेल्या राजवाड्यात राहत असत. येथे एक अत्यंत महत्वाची वास्तू आहे ती म्हणजे सिसिलिअनहोफ राजवाडा.
या राजवाड्यामध्ये दुसरे महायुद्ध जिंकल्यावर ट्रुमन-चर्चील+ऍटली-स्टॅलिन यांची ऐतिहासिक भेट झाली होती. या भेटीच्या वेळी ट्रुमन-ऍटली-स्टॅलीन यांच्यात पोट्सडाम करार झाला. या वाड्यामध्ये त्या सर्व आठवणी संग्रहालयाच्या रुपात जतन करण्यात आल्या आहेत. त्या वेळचे फोटो, त्या लोकांनी वापरलेले सामान, त्यांच्या उठबसण्याच्या खोल्या, त्याच्या सहिची कागदपत्रे इत्यादी पाहण्यास मिळते. पण आतमध्ये प्रकाशचित्रणास मनाई असल्याने त्या वाड्याची बाहेरुन काढलेली चित्रे दिली आहेत.
पोट्सडाम पाहुन झाल्यावर आमचा परतीचा प्रवास चालू झाला. या बर्लीनभेटी दरम्यान अनेक भव्य वास्तू आणि ऐतिहासिक महत्वाच्या स्थळांना भेट दिली. तुम्हाला हा चित्र-प्रवास आवडला असेल अशी आशा करतो.
आपलाच,
--लिखाळ.
प्रतिक्रिया
23 Sep 2008 - 4:19 am | मृदुला
चित्रप्रवासाची कल्पना आवडली.
23 Sep 2008 - 4:44 am | प्रियाली
चित्रदर्शी फेरफटका मस्तच.
संग्रहालयातील चित्रे लाजवाब.
नेफेर्तीती (किंवा टेन कमांडमेंट्समधील आणि ममी या टुकारपटातील नेफेर्तीरी) जर्मनीत जाऊन नेफ्रॅटिटस झाली का काय? ;) ही तुतनखामुनची सावत्र आई आहे.
23 Sep 2008 - 3:16 pm | लिखाळ
नेफेर्तीती हेच बरोबर. मी चुकीचा उच्चार लिहिला..वरच्या लेखात चूक सुधारतो.
हा चेहरा आणि त्यावरचे रंग अगदी चांगले राहिलेले आहेत. या पुतळ्याला मजेने 'बर्लीन मधली सुंदर स्त्री' असे म्हणतात. :)
--लिखाळ.
23 Sep 2008 - 3:53 pm | प्रियाली
नेफेर्तीतीचा पुतळा लाजवाब आहे यात शंकाच नाही पण खरी नेफेर्तीती इतकी सुंदर असावी का माहित नाही. मुगुटाने झाकलेले नेफेर्तीतीचे डोके थोडे विचित्र आणि लांबट आकाराचे आहे. परंतु नाकी-डोळी बाई सुंदरच. ;)
तिच्या सावत्र मुलाची ही शवपेटी लक्सॉर या लास वेगासच्या हॉटेलातील. खरी नाही - मेड इन चाईना असावी. ;)
23 Sep 2008 - 4:04 pm | लिखाळ
खरेतर ती नाकी-डोळी बरी आहे असे समजले तरी त्याच पुतळ्याच्या शेजारी तिचा पूर्णाकृती पुतळा आहे.
विकिपेडिआ मध्ये चित्र आहे. (http://en.wikipedia.org/wiki/Nefertiti)
मला पुतळा आवडला नाही म्हणून मी फोटो काढला नाही :)
तीची मान लांब आणि डोके पुढे झुकलेले, तसेच पाठिला थोडे पोक काढुन ती उभी आहे. बहुधा अशक्त झाली असावी :)
मला तरी ती सुंदर वाटली नाही. तीच्या चेहर्याचा मुखवटा चांगला जतन झाला आहे इतकेच वाटले.
--लिखाळ.
24 Sep 2008 - 8:05 am | चित्रा
आवडले.
वरच्या पुतळ्याबद्दल एक शंका (!)
हा पुतळा बाकी नग्न असताना पायात काय चपलेप्रमाणे घातले आहे? आधी वाटले की पैंजणांप्रमाणे काही आहे, पण नंतर चप्पल असल्याप्रमाणे वाटले..
24 Sep 2008 - 3:32 pm | लिखाळ
आपल्या प्रश्नाचे खरे उत्तर माहिती नाही. पण शैली म्हणूनच अनेकदा विवस्त्र शिल्पे बनवत असतात.
आपले निरिक्षण चांगले आहे. पायात चपलाच आहेत. त्या तर्हेच्या चपलांचे जोड संग्रहालयात ठेवले देखील होते. आपल्या कोल्हापुरी चपले प्रमाणे कातड्याचे मोठ्या आकाराचे ते जोड होते.
एक अंदाज.
उकडत असल्याने अंगावर कपडे नसतील पण चालतान खडे बोचुनयेत म्हणून चपला :)
--लिखाळ.
24 Sep 2008 - 5:07 pm | प्रियाली
राजे महाराजांचे विवस्त्र पुतळे बनवण्याची इजिप्शियन शैली नसावी असे वाटते. नग्नता ही इजिप्शियन संस्कृतीत वर्ज्य नसली तरीही माणसाच्या हुद्द्या आणि मानाप्रमाणे त्याचे कपडे दाखवले जात. उदा. वेश्या, खेळाडू, नर्तकी, मल्ल इ. नग्न दाखवले जात. परंतु श्रेष्ठ कुटुंबातील कोणी नग्न दाखवल्याचे आठवत नाही. (होरसची चित्रे नग्न पाहिली आहेत पण ती त्याच्या बालरूपातील असून त्यात आयसीस आणि होरस या आईमुलाचे प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न अधिक वाटतो.) त्यामुळे हा पुतळा नेफेर्तीतीचाच असावा का असे म्हणायला जागा उरते. बहुधा लांब मान आणि लांबुडके डोके त्या पुतळ्याला नेफेर्तीती म्हणून सिद्ध करत असावे परंतु हा पुतळा कधी बनवला गेला त्याचा तपशील सापडला नाही. टोलेमिक काळात जर हा पुतळा बनवला गेला असेल तर नेफेर्तीतीला विवस्त्र दाखवण्याचा घाट घातला असावा कारण ग्रीक संस्कृतीत नग्नतेला (विशेषतः देव, देवता, राजे-राण्या) विशेष महत्त्व असल्याने हा पुतळा त्या काळातील असण्याची शक्यता आहे.
मलाही त्या कोल्हापुरी चपलांप्रमाणेच असल्याचे सुचले होते परंतु बहुधा वेताच्या बनल्या असाव्यात.
24 Sep 2008 - 9:22 pm | लिखाळ
>>राजे महाराजांचे विवस्त्र पुतळे बनवण्याची इजिप्शियन शैली नसावी असे वाटते.....टोलेमिक काळात जर हा पुतळा बनवला गेला असेल....... <<
ह्म्म्..बरं..असेल .. हे माहित नव्हते.
>>मलाही त्या कोल्हापुरी चपलांप्रमाणेच असल्याचे सुचले होते परंतु बहुधा वेताच्या बनल्या असाव्यात.<<
उम्म.. ती कल्पना नाही. आणि वेत हे भरपूर पावसाच्या प्रदेशात होत असावेत असा अंदाज.. त्यामुळे कातडे असणे जास्त शक्य वाटते. पण मी संग्रहालयातल्या चप्पला या दृष्टीने पाहिल्या नाहीत.
--लिखाळ.
23 Sep 2008 - 5:29 am | प्राजु
चित्रांमुळे जास्ती मजा आली.
संग्रहालय खास आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Sep 2008 - 5:31 am | बेसनलाडू
पूर्वार्ध-उत्तरार्ध एकत्रच वाचून काढले. सचित्र बर्लिनदर्शन आवडले.
(प्रवासी)बेसनलाडू
23 Sep 2008 - 8:51 am | विसोबा खेचर
मस्त चित्रं!
बोटीचं आणि राजवाड्यचं चित्रं तर क्लासच...
तात्या.
23 Sep 2008 - 9:04 am | चतुरंग
लिखाळ, आत्ताच दोन्ही भाग एकदम वाचले आणि सर्व प्रकाशचित्रांसह प्रामाणिक वर्णनशैलीतल्या लेखाचा आनंद घेतला.
असेच अजून लेख येऊदेत. जगाच्या वेगवेगळ्या भागांची सफर घरबसल्या होते आहे! :)
चतुरंग
23 Sep 2008 - 12:25 pm | प्रकाश घाटपांडे
लिखाळरावांच्या सोबत आमची बी टुर झाली बसल्या बसल्या या निमित्ताने. नाही त पैशे देउन आम्ही कव्हा जानार? लिखाळ राव अशीच फुकट टुर घडवुन आनत जा आमची.
(अप्रवासी)
प्रकाश घाटपांडे
23 Sep 2008 - 12:36 pm | प्रभाकर पेठकर
सर्व छायाचित्रे आणि त्यातून दर्शन देणारी सर्व शिल्पे जीवंत वाटतात. अभिनंदन.
23 Sep 2008 - 2:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
दोन्ही भागांतले फोटो आणि वर्णन एकदम मस्त! पुन्हा एकदा माझ्या बर्लिनमधल्या आठवणी ताज्या झाल्या.
(अवांतरः याच पोट्सडॅमच्या ऍस्ट्रॉनॉमिकल इंन्स्टिट्यूटच्या दूर्बिणीमधून नेपच्यून या ग्रहाचा शोध Johann Gottfried Galle याने लावला.)
अदिती
23 Sep 2008 - 3:37 pm | लिखाळ
माहितीमध्ये भर घातल्याबद्दल आभार.
--लिखाळ.
23 Sep 2008 - 9:17 pm | प्रियाली
हातात साप धरणारा विवस्त्र पुतळा कोणाचा हा प्रश्न सकाळपासून भेडसावत होता. हातात अजगर धरतो तो अपोलो पण अपोलोच्या हातात एक वाद्य असते आणि त्याला तो अजगर वेढे घालून असतो. इथे तर अजगराने काठीला वेढा घातला आहे. ;)
शोधाशोध केल्यावर सापडले की हा अपोलोचा पुत्र ऍस्क्लेपायस याचा पुतळा असून तो अपोलोप्रमाणेच धन्वंतरी होता.
24 Sep 2008 - 1:27 am | लिखाळ
अरे वा !
बरोबर आहे अपोलोच्या हातात वाद्य असते.. याच्या हातात नाही. ते वैद्यकशास्त्राचे चिन्ह याच्याच नावावरुन आहे असे दिसते.
--लिखाळ.
24 Sep 2008 - 1:49 am | प्रियाली
वैद्यकशास्त्राचे चिन्ह याच्यावरूनच आहे.
साप म्हणजे जीवंतपणाचे किंवा पुनर्जन्माचे लक्षण. सापाची कात झडते म्हणजे नवे जीवन, पुनर्जन्म. जे केवळ धन्वंतरी देऊ शकतो आणि काठी मला वाटतं की त्याचा या क्षेत्रातील अधिकार दर्शवतो असे काहीसे आहे.
24 Sep 2008 - 1:56 am | लिखाळ
त्या संकेतांचा अर्थ समजला. साप चिरंजीव असतो असे बहुधा आपल्याकडे सुद्धा मानले जाते असे वाटते.
>>काठी मला वाटतं की त्याचा या क्षेत्रातील अधिकार दर्शवतो असे काहीसे आहे.<<
अच्छा ! किंवा पेशंट औषध घेऊन पैसे बुडवायला लागला तर काठी हाताशी असावी म्हणून असेल :)
--लिखाळ.
24 Sep 2008 - 2:01 am | प्रियाली
असेल असेल. ;) ही आयडीया मस्तच आहे. सर्व डॉक्टरांनी अवलंबायला हवी.
24 Sep 2008 - 12:27 am | धनंजय
आवडला. बर्लिन देखो, जर्मनी देखो!
24 Sep 2008 - 12:29 am | यशोधरा
मस्त सफर घडवलीत, धन्यवाद.