कहे कबीरा (२) कबीराचे विचार
कबीरपंथीयांची भारतातील संख्या काही लाखांत आहे. त्यांचे मठ अनेक ठिकाणी असून मठाधिपतींची संपत्ती, त्यांचा जनमानसावरील प्रभाव इ. प्रचंड आहेत. आज सहा सातशे वर्षे परंपरा असलेल्या या पंथाची विचारसरणी काय, त्याचा पाया कोणता त्याचा आज विचार करावयाचा आहे. कबीरानंतर त्याच्या चेल्यांनी बरेच फरक स्वीकारले असले तरी इथे आपण कबीराचाच विचार करणार आहोत.चार भागांत याची विभागणी केली आहे.
(१) कबीराच्या काळातील भारतातील विशेषत: उ. भारतातील समाजाची धारणा. याचा दबाव व्यक्तीवर पडतोच, कबीरावरही पडला.
(२) संत रामानंदांचा कबीरावरचा प्रभाव
(३) कबीराचे मत
(४) कबीर व महाराष्ट्रातील संत.
प्रथम आपण कबीराचा व्यक्तीगत स्वभाव बघू. तो अतिशय कलंदर, हिंदीत "फक्कड", होता. त्याला इतर काय म्हणतात,ह्याची अजिबात परवा नव्हती. स्वत:ला ग्वाही करून मनाला पटेल ते व तेवढेच तो स्वीकारत होता. स्वत:वर त्याचा धृढ विश्वास होता. आपली पहिली मते नंतर झुगारून देण्याची त्याची पूर्ण तयारी होती. बापजाद्यांनी खणलेली विहीर आहे म्हणून त्यातले खारट पाणी जन्मभर प्यायलाच पाहिजे हे त्याला मान्य नव्हते. आणि आपली ही विचारसरणी परखड भाषेत तो लोकांना सांगत असे. हो, ही भाषा वापरतांना तो ज्या अडाणी लोकांसमोर बोलत असे त्यांच्याबद्दल त्याला अपरंपार प्रेम व कळवळा होता. आणि त्या लोकाच्या हदयाला भिडण्य़ासाठी तो आपले विचार लोकांच्या बोलीभाषेत, त्यांचे खास शब्द, वाक्प्रचार, यांचा उपयोग, व्याकरणाची फिकीर न करता, काव्यात, करत असे. काव्य केव्हाही गद्यापेक्षा श्रोत्याचा ताबा घेते. कबीराचे काव्यही एकदम मनावर कब्जा म्करणारे आहे.आणि म्हणूनच हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजातील पंडित-मुल्लांवर कोरडे ओढूनही त्याला समाजात मानाचे स्थान होते.
उत्तर भारतातील धार्मिक परिस्थीतीकडे आता वळू. चातुर्वर्ण पद्धती आता पूर्णपणे रुजली होती. श्रुतीपेक्षा स्मृती (वेदापेक्षा पुराणे)जनमानसावर मोठा पगडा पाडून होती. अद्वैत वरिष्टांत मान्यताप्राप्त होते तर पुराणोक्त विचार मध्यम-कनिष्ठ गृहस्थांत. जोगी, नाथपंथी, कापालिक, कानफाटे, इ. गावोगावीं फिरून आपली मते सर्वत्र पसरवत होते. मुसलमांनाचे आक्रमण द्विधा जातीचे होते. जबरदस्ती बाहेरून हल्ला करत होती तर सूफी, प्रेमळ भक्ती, आतून पोखरण्याचा प्रयत्न करीत होती. द्रवीड प्रातांतील रामानुजांची "भक्ती" भावना याचवेळी रामानंदस्वामीं यांच्या मार्फत मूळ धरू लागली होती. योगी (जोगी, जोगडा) हे गोरखनाथांच्या हटयोग परंपरेतले. या कायिक पद्धतीने सिद्धी साध्य करता येतात म्हणून त्यांचा समाजावरील दबदबा मोठा होता. कबीर ज्या जमातीत वाढला त्या जुलवांमध्येही हटयोग लोकप्रिय होता व कबीर या साधनेत प्रवीण होता असे त्याच्या लेखनावरून दिसून येते. जोगीयांचा कर्मकांडांवर अजिबात विश्वास नव्हता व कबीराच्या मनोधारणेत याचा मोठा भाग आहे. दुसरीकडे फक्त नारायणाचे नाव घ्या व सर्व पातकांपासून मुक्ती मिळवा, तुलशीची माळ गळ्यात घातली की किमान गोलोकात जागा नक्की, असला भोळसट समज पुराणे पसरवीत होती. पापी माणसाने मरतांना आपल्या नारायण या मुलाला हाक मारली व त्या "पुण्या"ने तो वैकुंठाला गेला ही अचरट कथा सगळ्या संतांनी गायली आहे ! इस्लामातही याची कमतरता नव्हती.
कबीर ह्या वातावरणात वाढला.
कबीर लिहणे-वाचणे शिकला नाही. पण कुशाग्र बुद्धीने त्याने बर्याच लोकांकडून बर्याच गोष्टी उचलल्या. हटयोगातील त्याची जाण वरच्या दर्जाची होती पण हिन्दू तत्वज्ञान त्याला कोणी शिकवले नाही. तसे ते शक्यच नव्हते म्हणा. पण निरनिराळ्या पंथांच्या जाणकारांच्या संगतीत बसून कुशाग्र बुद्धीच्या कबीराने बर्यासच्या विचारसरणी आत्मसात केल्या. त्याच्या सुरवातीच्या लेखनात याचे पडसाद उमटलेले दिसतात. उदा. त्याची लोकप्रिय "निर्गुण भजने" त्याच्यावरील हटयोगाचा प्रभाव दाखवतात. पण याने कबीराचे समाधान झाले नाही. त्याला त्याची खरी दिशा मिळाली जेंव्हा तो स्वामी रामानंदांचा शिष्य झाला. अखेर ’भक्ती" हेच अंतिम साधन आहे हे तेथेच त्याला पटले. त्याने "रामाची" अनन्य भावाने, संपूर्ण शरणागती पत्करून, भक्ती केली. पण एक लक्षात घ्यावयाला पाहिजे; त्याचा राम म्हणजे रामायणातील दशरथपुत्र राम नव्हे. सर्व धर्मांच्या बाहेरचे, अद्वैतांच्या निर्गुण ब्रह्मा सारखे, एका सनातन सत्याला दिलेले ते एक नाव आहे. हिंदूंनी राम म्हणावे, मुस्लीमांनी रहमान, जेंव्हा ते कर्मकांडांत कोंडले जातात तेव्हा कबीर दोघांनाही झुगारून देतो. कोणतेही कर्मकांड कबीराला मान्य नाही. अत्यंत कठोर शब्दात तो कोरडे ओढतो. तो काझीला विचारतो " मुंगीच्या पायातील घुंघुरांचाही आवाज ऐकणार्याला तुझ्या बांगेची गरज काय?"
आणि पंडिताला तो विचारतो " गळ्य़ात माळा घातल्यास आणि अंगावर टिळे लावलेस म्हणून "तो" तुझ्या मनातील काळे विचार ओळखणार नाही कां ?" विधीनिषेधाला विरोध आहे तो कबीराला अज्ञ जनांबद्दलच्या असलेल्या अपार करुणेमुळे. मुल्ला पंडित या लोकांना फसवून चुकीच्या मार्गाने नेत आहेत म्हणून त्यांना विरोध. यांच्या नादी न लागता हृदयातील "रामाची" अनन्य भावाने भक्ती कर हाच त्याचा उपदेश.
द्रवीड प्रांतातील रामानुजांचा भक्ती संप्रदाय थोड्याफार फरकांनी रामानंदांनी उत्तरेत आण्ला. रामानंदांचा शिष्य झालेल्या कबीराने भक्तीभावना स्विकारली; अगदी पूर्णपणे. द्वैत-अद्वैत या रटाळ चर्चेत न पडताही आपण कबीराने हा मार्ग का स्विकारला असावा याचा अंदाज बांधू शकतो. सत्, चित् व् आनंद् ही ब्रह्माची तीन रुपे. अद्वैत तुम्हाला सत् व् चित् यांची ओळख, जाण करून देईल पण आनंद .. कधीच नाही. कबीरा सारखा मनस्वी माणुस या भावनेचा भुकेला असतो. शेवटी "ब्रह्मानंद" (एखाद्या दु:खाचे निवारण झाले किंवा एखाद्या इंद्रीयाचे तर्पण झाले म्हणून मिळतो, तसला हा आनंद नव्हे !) हाच मनाला शांती-समाधान देतो. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे इतर तत्वज्ञानांच्या मंदीरात शिरतांना तुमच्याकडे किमान काहीतरी बुद्धीमत्ता व तुम्हाला शिकवण्यास तयार असलेला गुरू ही आत्यंतिक गरज आहे. कबीराला व त्यापेक्षाही त्याच्या समोर असलेल्या आम जनतेला हे शक्यच नव्हते. त्यामुळे भक्ती हे एकमेव साधन कबीराने स्विकारले. महाराष्ट्रातही योगी ज्ञानेश्वर व पंडित वामन यांनीही हाच मार्ग अवलंबला. पण ते पुढच्या लेखात. थोडक्यात
(१) बाह्याचार व कर्मकांड यांना कबीराने पूर्णत: झिडकारले.
(२) त्याने हिंदू व मुस्लिम या दोनही धर्मांना, त्या काळात रूढ असलेल्या पद्धतीत, वरील कारणाने नाकारले.
(३) कबीर सर्वधर्मसमावेषक वगैरे कधीच नव्हता. त्याने धर्म ही कल्पनाच मोडीत काढली.
(४) त्याचा "राम" हा निर्गुण राम होता. तो स्वत:च्या हृदयान शोधावयाचा होता व तेथ्रेच त्याची भक्ती करावयाची होती.
(५) हा रामच घटाघटात बसलेला असल्याने सर्वांबद्दल प्रेम असणे अनिवार्य होते.
(६) या मार्गात "गुरू" हा घटक सर्वश्रेष्ठ होता, तो आणि फक्त तोच, तुम्हाला तारणारा असतो
एवढे नोंदवून आज थांबू. कबीर व महाराष्ट्रातील संतांचे विचारात साम्य आढळते, ते पुढील लेखात बघू.
शरद
प्रतिक्रिया
5 Nov 2013 - 12:32 pm | प्यारे१
सुंदरच!
>>>आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे इतर तत्वज्ञानांच्या मंदीरात शिरतांना तुमच्याकडे किमान काहीतरी बुद्धीमत्ता व तुम्हाला शिकवण्यास तयार असलेला गुरू ही आत्यंतिक गरज आहे. कबीराला व त्यापेक्षाही त्याच्या समोर असलेल्या आम जनतेला हे शक्यच नव्हते. त्यामुळे भक्ती हे एकमेव साधन कबीराने स्विकारले. महाराष्ट्रातही योगी ज्ञानेश्वर व पंडित वामन यांनीही हाच मार्ग अवलंबला.
आणि
>>>(६) या मार्गात "गुरू" हा घटक सर्वश्रेष्ठ होता, तो आणि फक्त तोच, तुम्हाला तारणारा असतो
वरच्या दोन्ही मध्ये थोडा विरोधाभास वाटतोय का?
5 Nov 2013 - 2:29 pm | पैसा
अजून येऊ द्या.
6 Nov 2013 - 10:53 am | रमेश आठवले
सुनो भाई साधो
कहत कबीरा सुनो भाई साधो - या पालुपदात साधो शब्दाचा अर्थ मी साधक असा करतो, कारण फटकळ स्वभावाचा कबीर कुण्या साधूला उपदेश करण्याच्या भानगडीत पडणार नाही असे मी मानतो.
6 Nov 2013 - 12:48 pm | शरद
कबीरांच्या पदांत जी संबोधने आहेत, ज्यांना त्यांनी पुकारले आहे, त्यात एक सुसंगती आहे असे दिसते. ज्यांना त्यांची मते मान्य आहेत अशांना उद्देशून लिहलेल्या पदांत "साधो" वा "संत" असा उल्लेख येतो; भले पदांत अज्ञ जनांना उपदेश केलेला असो. इथे "आपल्या" माणसाशी बोलावयाचे असते. साधारण जनतेला उद्देशून केलेल्या पदांत "भाई" असा उल्लेख येतो. इथे त्याला आपुलकी दाखवून जवळ घ्यावयाचे आहे. ते जेव्हा "पंडित" वा "पांडे" असे म्हणतात तेव्हा कबीरांना पंडितांच्या भाषेत प्रतिवाद करावयाचा असतो. ते जेव्हा "जोगिया" ला पुकारतात तेव्हा दिसून येते की कबेरांचे अशा माणसाबद्दल फार चांगले मत नही. उलट "अवधू" ’अवधो", अवधूत" तेव्हा ते हटयोगी पंथातील माणसाशी त्यांच्या भाषेत बोलत असतात. त्यांनी या पंथात बरीच प्रगती केलेली होती. इथे समोरचा मार्गातील सहप्रवासी आहे. महाराष्टातील उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वरांनी चांगदेवाला लिहलेले पत्र. आपण पुढे जेव्हा कबीरांची पदे वाचाल/ऐकाल तेव्हा याकडे अवष्य लक्ष द्या.
शरद
6 Nov 2013 - 9:15 pm | लॉरी टांगटूंगकर
पुभाप्र!
6 Nov 2013 - 9:22 pm | पिशी अबोली
सुंदरच... शेवटचे मुद्दे विशेष आवडले..
8 Nov 2013 - 3:20 am | स्पंदना
आज बसून अगदी शांतपणे वाचला हा लेख.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
8 Nov 2013 - 3:20 am | स्पंदना
आज बसून अगदी शांतपणे वाचला हा लेख.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
8 Nov 2013 - 4:08 am | रामपुरी
पुभाप्र