कहे कबीरा (१)

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
4 Sep 2013 - 2:33 pm

कहे कबीरा (१)
संत कबीरावर तीन लेख लिहण्याचा विचार आहे. पहिल्या लेखात कबीराचे चरित्र, दुसर्‍यात त्याचे विचार व तिसर्‍यात काही भजने/दोहे यांचा परिचय
पहिला भाग लिहणे फार सोपे आहे. अगदी सोपे. मी काहीही लिहले तरी बिघडत नाही कार॒ण आज आपल्याला कबीराबद्दल काहीही विश्वसनीय माहिती नाही ! त्याचा जन्म, मृत्यू, त्याचे आईवडील, बायका-मुले, त्याचे शिक्षण, त्याचे गुरू, त्याला लिहता-वाचता येत होते की नव्हते,.. थोडक्यात जा माहितीमुळे आपण माणसास "ओळखतो" असे काहीही आपणास ठोसपणे सांगता येत नाही. जगातील सर्वात अज्ञात संत. लेखकाबद्दल असेही म्हटले जाते की त्याच्या लेखनावरून तो तुम्हाला कळू शकतो. पण त्याचाही आपल्याला उपयोग नाही कारण कबीराच्या नावावर उपलब्ध असलेल्या लिखाणातले बरेच त्याच्या नावावर इतरांनी लिहले आहे. असे करण्यात कुणाला फसवणुक करावयाची इच्छा नव्हती. कबीराच्या शिष्याना मनापासून वाटत होते की आपण लिहित आहोत ते आपले नव्हे, साक्षात कबीरच आपणाकडून तसे लिहवून घेत आहे. मराठीत जसे "तुका म्हणे’ अशी मुद्रा टाकून इतरांनीही अभंग लिहले तसे हिंदीत "कहे कबीरा" असे लिहून इतरांनी. मग कबीराबद्दल आपणास आज जी काही माहिती आहे ती कशी मिळाली ? सर्व दंतकथा. या दंतकथाच पुढे "सत्य" समजल्या जाऊ लागल्या. मी आज तीन सांगणार आहे.

सुरवात जन्मापासून. कबीराचा जन्म कोणी इ.स. ११४९ मानतात तर कोणी इ.स.१३९९. जास्त मान्यता १३९९ ला व त्याचा मृत्यू इ.स. १५१९ धरून त्याचे आयुष्य १२० वर्षांचे. जन्मकथा अशी. काशीतील संत रामानंद यांना एका ब्राह्मणाने व त्याच्या विधवा सूनेने नमस्कार केला. वर न बघताच रामानंदांनी तिला "पुत्रवती भव" असा आशिर्वाद दिला. वर बघितल्यावर रामानंद गडबडले, म्हणाले "आता काय करणार, इलाज नाही. पण हिला जो मुलगा होईल तो जगद्वंद्य महात्मा होईल". ज्येष्ठ पौर्णिमेस कबीराचा जन्म झाला. आईने जन्मत:च त्याला काशीतील एका तळ्याच्या काठी सोडून दिले. निरू-निमा या विणकर जोडप्याला तो सापडला. घरी आणून त्यांनी त्याला वाढवले. निरू-निमा हे जुलाहा या जमातीचे. मुस्लिम धर्म स्विकारण्या आधी ही जमात योगी मार्गाला अनुसरणारी होती. त्यामुळे कबीराच्या लेखनात या विचारसरणीचा मोठा ठसा दिसून येतो. (जास्त माहिती पुढील लेखात.) कबीराचा गुरू कोण याबद्दल मतभेद आहेत. मुसलमान शिष्य सूफ़ी संत शेख तकी याला त्याचा गुरू समजतात तर हिन्दू शिष्य रामानंदांना. ठोस पुरावा नसला तरी रामानंदांना कबीराने गुरू कसे बनविले याच्याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. आपणास शिष्य म्हणून रामानंद स्विकारतील याची खात्री नसल्याने कबीराने एक युक्ती केली. प्रात:काळी रामानंद गंगेवर अंघोळीला जात असत. कबीर अंधारातच गंगेच्या घाटावरील पायरीवर अंगाचे मुटकुळे करून झोपला. सकाळच्या अंधारात रामानंदांचा पाय कबीराच्या डोक्याला लागला. ते दचकून "राम,राम" म्हणाले. कबीराने उठून त्यांचे पाय धरले व तो म्हणाला "तुम्ही मला राम राम दीक्षा दिली. मी तुमचा शिष्य झालो ".

काही कबीरपंथी कबीराला विरक्त समजतात. काही सांगतात त्यावा विवाह झाला होता; त्याच्या बायकोचे नाव लोई, मुलाचे कमाल व मुलीचे कमाली (या कमालीचे एक सुरेख भजन, "सैया निकस गये", आपण मिपावर पाहिले आहेच). कबीर कापड विणून आपला चरितार्थ चालवी. पण तो लोकांना उपदेश करत भरपूर फ़िरत असणार. त्याच्या लिखाणात फारसी. उर्दू, पंजाबी, भोजपुरी,मारवाडी, अवध, खडी, व्रज इत्यादी भाषांतील शब्द सहज विहरतांना दिसतात.
"मसि कागद छुयो नाही, कलम गही नहि हाथ " मी कागदाला स्पर्श केला नाही. माझ्या हातात कधी लेखणी नव्हती असे म्हणणारा कबीर हा शब्दसमुह कोठून गोळा करतो ? तर फिरत असतांना व लोकांना उपदेश करत असतांना कबीरासमोर अनाडी, अशिक्षित समाज होता. त्यांना कळेल असे काही सांगावयाचे तर ते त्या त्या समाजाच्या बोलीभाषेतलेच असले पाहिजे एवढी जाण कबीराला होती. " व्याकरण महत्वाचे नाही, काळजांत घुसणारे शब्द महत्वाचे ". आज मात्र आपणाला एका भजनाचा अर्थ समजवून घेतांना दहांदा हिंदी शब्दकोश उघडावा लागतो !
कबीराने ज्ञान मिळवले ते सत्संगात. पुस्तके वाचून तो शिकला नाही. पुस्तकी पांडित्याची तो टरच उडवतो. कर्मकांडाची खिल्ली तो करतो तेव्हा सत्पुरुष कसा वागतो यावरून त्याने आपली मते बनवलेली असतात. इतर संतांप्रमाणेच पहिली मते हळुहळु बदलत गेली. तुकाराम महाराज सुरवातीला जनसंपर्क विटाळ मानत पण अंती "अवघे जन मज झाले लोकपाळ ! सोयिरे सकळ प्राणसखे !! या अवस्थेला येऊन पोचले. ज्ञानेश्वर माऊली ते गोंदवलेकर महाराज सर्वजण अखिल प्राणीजातांवर अतूट प्रेम करत कारण परमेश्वरावरील संपूर्ण शरणागत भक्तीचा तो एक अविभाज्य भाग होता. तसेच कबीराचे झाले. हा त्याच्या जीवनाचा प्रमुख भाग म्हणून इथे फक्त नमुद करून ठेवत आहे. दुसर्‍या लेखात आपल्याला ते पहावयाचे आहेच

जन्म व वास्तव्य काशीत झाले तरी कबीराचा मृत्यू मजहर येथे झाला. आता जन्माप्रमाणे मृत्यूबद्दलही एक आख्यायिका आहे. मृत्यूनंतर त्याचे प्रेत चादरीखाली झाकून ठेवले होते व लगेच त्याच्या हिंदू व मुस्लीम अनुयायात झगडा सुरू झाला. हिंदूंना अग्नी संस्कार करावयाचे होते तर मुस्लिमांना दफन ! भांडण विकोपाला जाऊन तलवारी उपसल्या गेल्या आणि ... आकाशवाणी झाली " चादर बाजूला करून पहा ". पहातात तो तेथे कलेवर नव्हतेच. होती काही फुले. ती वाटून घेऊन हिंदूंनी त्यावर अग्नीसंस्कार केले व मुस्लिमांनी ती गाडून त्यावर थडगे बांधले !

तर अशी ही कबीराच्या आयुष्याची चित्तरकथा. बरेच वाचूनही मला एक कोडे उलगडलेले नाही. आपल्या इथे रूढीविरुद्ध लढणार्‍या तुकाराम-एकनाथांचा छळ झाला. पण हिंदू-मुस्लिम दोनही समाजातील कर्मकांडांवर झोड उठवून व पंडित-मुल्लांवर कडक टीका करूनही कबीराला असा काही त्रास झालेला दिसत नाही. काय असावे ?

शरद

धर्ममाहिती

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

4 Sep 2013 - 6:39 pm | कवितानागेश

इंट्रेस्टिंग! :)

स्पंदना's picture

5 Sep 2013 - 5:38 am | स्पंदना

व्याकरण महत्वाचे नाही, काळजांत घुसणारे शब्द महत्वाचे

कालच कुठेस ऐकल,"काळजाच्या नजरेने बघ तुला हव ते दिसेल".

पैसा's picture

5 Sep 2013 - 9:05 pm | पैसा

कबीराबद्दल वाचायला आवडेल. या सगळ्या आख्यायिकांचा अर्थ कसा लावावा हे समजत नाहीये. केवळ श्रवणभक्ती करून माणूस कुठे पोचू शकतो हे आपण सोयराच्या बाबतीत पाहिले होतेच!

दशानन's picture

5 Sep 2013 - 9:37 pm | दशानन

वाचतो आहे, आवडलं आहे हे नक्कीच!

कबीर व त्याचे दोहे हे माझ्या मनाच्या खूप जवळचे आहेत त्यामुळे पुढील भागाच उत्सुकता आहे.

वाचायचंय. दोहे नि त्याचे अर्थ वाचायला अधिक आवडतील. येऊ द्या लवकर.

वाचतोय. तुमचे लेखन म्हणजे आमच्यासारख्यांसाठी पर्वणीच. :)

रुमानी's picture

8 Sep 2013 - 11:04 am | रुमानी

वाचायल आवडेल
येउदेत लवकर....! :)