फटाकेमुक्त दिवाळी

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
26 Oct 2013 - 5:24 pm

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

26 Oct 2013 - 6:01 pm | नितिन थत्ते

उडवायचेच असतील तर आवाजवाले फटाके उडवा.

लेखात लिहिलेले विषारी पदार्थ मुख्यत्वे शोभेच्या फटाक्यांत असतात.

धर्मराजमुटके's picture

26 Oct 2013 - 6:50 pm | धर्मराजमुटके

म्हणजे परत ध्वनीप्रदूषणवाले बोंबा मारायला मोकळे !
असो. कल्पना नक्कीच चांगली आहे.

विषारी पदार्थांमुळे व्हायचा तो त्रास होतोच, पण जास्त त्रास ध्वनिप्रदूषणामुळे होतो. त्यामुळे आमच्या आवडीच्या झाड-भुईचक्रादि फटाक्यांवर आणलेल्या संक्रांतीला विरोध केल्या गेला आहे.

अग्निकोल्हा's picture

26 Oct 2013 - 7:11 pm | अग्निकोल्हा

क्षमस्व:

प्रकाश घाटपांडे's picture

26 Oct 2013 - 7:38 pm | प्रकाश घाटपांडे

ध्वनी वायु प्रदूषण झाले तरी चालेल पण आम्ही फटाके उडवणारच असा वर्ग हा समाजात असणारच आहे. प्रदुषणाचा परिणाम तर सर्वांवर होणार आहे. जे त्यांचे होईल ते आमचे होईल.कल क्या होगा किसको पता अभी जिंदगी का ले लो मजा| भावी पिढ्यांची चिंता आम्ही कशाला करु जे होईल ते त्या त्या वेळी बघतील.आमची पिढी तर आरामात जगते आहे ना! अंधश्रद्धांनिर्मुलनात जसे अंधश्रद्धेचे बळी हेच अंधश्रद्धेचे वाहक असतात हे समजावुन घ्यावे लागते. तसेच इथे आहे. गुटख्याच्या वेळी असेच झाले. पण त्याचे परिणाम हे त्या त्या व्यक्तिपुरते असतात. मरु दे ना गुटखा खाउन! समाजाची कीड तेवढीच कमी होईल. कशाला त्यांना समजावयला जाताय? त्यांच त्यांना समजेल त्यावेळी उशीर झाला असेल. असे म्हणणारे लोकही असायचे.
समाज शेवटी व्यक्तींचाच बनला आहे. तोच जर आत्मघातकी असेल तर समाजाचेच त्यात अंतिम नुकसान असते. समाज बदल हा केवळ प्रबोधनाने होणार नाही व केवळ कायद्यानेही होणार नाही. दोन्ही गोष्टींचा वापर होईल तेव्हा कुठे त्याचे बदल दिसू लागतील. सतीची प्रथा हे त्याचे एक उदाहरण आहे.
डॉ दाभोलकरांना जर श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर यंदापासून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करेन एवढे जरी केले तरी खूप झाले.

घाटपांडेकाका, सहमत आहेच-पण हे समीकरण पुसणे लै अवघड आहे हेही तितकेच खरे..........

अनन्न्या's picture

26 Oct 2013 - 7:40 pm | अनन्न्या

माझा लेक त्याच्या बाबांना म्हणतो, बाबा हे तुमचं बरं शास्त्र, मी फटाके वाजवायची वेळ आली तर प्रदूषण होते, पण तुम्ही लहानपणी भरपूर फटाके वाजवलेत! प्रमाण कमी करायला हरकत नाही, पण योग्य काळजी घेऊन थोडे वाजवायला काय हरकत आहे? मुलांना लहान वयात असतेच ना याचे आकर्षण! (मला अजूनही आवड्तात!)

प्रकाश घाटपांडे's picture

26 Oct 2013 - 7:48 pm | प्रकाश घाटपांडे

>>प्रमाण कमी करायला हरकत नाही, पण योग्य काळजी घेऊन थोडे वाजवायला काय हरकत आहे? मुलांना लहान वयात असतेच ना याचे आकर्षण! <<
आपण म्हणता ते बरोबर आहे.प्रमाण कमी होणे ही देखील चांगली सुरवात आहे.व्यसनी माणस जस आपल व्यसन कमी कमी करण्याचा प्रयत्न करतात. मुलांना विज्ञानाची रुची वाढवणे, ज्ञान आणि रंजन असे कार्यक्रम राबवणे, असे पर्याय दिले गेले पाहिजे.

मराठी कथालेखक's picture

27 Oct 2013 - 12:45 pm | मराठी कथालेखक

फटाके न उडविल्यास त्या पैशांत एक छोटी सहल, एखादी वस्तू, सायकल, विडीओ गेम, क्रिकेट किट ई चे आमिष दाखवा. मग हळूहळू आवड कमी होईल मुलांची.

मुक्त विहारि's picture

26 Oct 2013 - 7:59 pm | मुक्त विहारि

मी १०वी पर्यंत फटाके उडवत होतो.मोठ्या मुलाने पण १०वी झाल्यानंतर फटाके उडवणे बंद केले आहे.लहान मुलाला मात्र अज्जुन पण हौस आहे. एक्/दोन वर्षांत त्याची पण आवड कमी होईल.

यसवायजी's picture

26 Oct 2013 - 8:13 pm | यसवायजी

आवाजाचाच जास्त त्रास वृद्धांना आणी हृदय रोग्यांना होतो. आणी चुट्-पुट वाजणार्‍या शोभेच्या फटाक्यातुन डोळ्याचे पारणे फेडून घेतल्यापेक्षा '१ गाव १ गणपती' सारखा '१ गाव १ फायरवर्क्स शो' दणक्यात करायची कल्पना कशी वाटते? ज्यांना हौस आहे ते येतील पोरा बाळांना घेउन.
हां इतर देशात होतात तस्से. ;)

प्रकाश घाटपांडे's picture

28 Oct 2013 - 9:09 am | प्रकाश घाटपांडे

यसवायजी,उत्तम कल्पना आहे. पुण्यात नदीकिनारी पात्रात असे शो करणे चालु झाले आहे. तसेच संशोधन क्षेत्रातील लोकांनी पर्यावरण पुरक फटाके कसे करता येतील याचेही प्रयत्न चालू आहेत.

एस's picture

26 Oct 2013 - 8:44 pm | एस

अर्थात सगळ्या समाजसुधारणा हिंदू धर्माच्या मुळावर उठणार्‍या असतात असा दृढ समज असलेल्या व्यक्ती आणि प्रवृत्तीकडून विरोध होणारच. तिकडे लक्ष देऊ नका.

फटाके शोभेचे असोत किंवा आवाजाचे. दोन्ही प्रदूषण करतातच. त्याशिवाय ते ज्या हातांनी बनवले जातात त्या बहुतांश चिमुकल्या हातांबद्दल, त्यांच्या आरोग्याबद्दल पूर्ण अनभिज्ञ राहून, कधीकधी डोळेझाक करून आपल्या चिमुकल्यांना ते उडवू द्यायचे हा मला खरंच दांभिकपणा वाटतो. इथे यांचा धर्म काय सांगतो हे जाणून घ्यायला आवडेल.

पर्यावरणाचे बोलाल तर मनुष्यांनी आपली परिसंस्था आधीच एवढी नासवून ठेवली आहे की त्याच परिसंस्थेत, त्याच अधिवासात निसर्गाचे इतरही भाऊबंद राहतात, त्याच्या समतोलावर अवलंबून असतात हे मनुष्य केव्हाच विसरले आहेत. जेव्हा आंधळेपणाचा हा जगरनॉट गरागरा फिरू लागतो तेव्हा त्याच्या विरोधात उभे राहू पाहणार्‍या मूठभर मंडळींना तो दाद लागू देत नाही. पण म्हणून निराश व्हायचे काहीच कारण नाही. प्रयत्नांति ध्येय्यप्राप्तीचा परमेश्वर. जग बदलेन. नक्की बदलेन. सुरुवात आपल्यापासून करूयात.

मी लहान होतो तेव्हापासूनच फटाक्यांसारख्या गोष्टींपासून आपणहून बाजूला झालो. प्रबोधन स्वतःचे व इतरांचेही करणे सुरुवातीला अवघडच जाते. पण ते अशक्य मात्र नसते.

फटाक्यांविषयी - त्यातल्यात्यात इकोफ्रेन्डली असे फटाके कुठे मिळू शकतील काय याविषयी माहिती असल्यास जरूर सांगा.

चौकस२१२'s picture

30 Oct 2019 - 6:07 am | चौकस२१२

"सगळ्या समाजसुधारणा हिंदू धर्माच्या मुळावर उठणार्‍या असतात असा दृढ समज ...."
हे असं होणऱ्याला बरेचदा लेख लिहिणारे/ पत्रकार/ कलाकार/ दिग्दर्शक पण जबाबदार असतात,, समाजातील वाईट गोष्टी दाखवताना "सर्वधर्म" समभाव हि लोक पाळीत नाहीत त्यामुळे अंधश्रेढीचं विरोधात असणारा माझ्यासारखा माणूस सुद्धा २-३ वेळा हे वाचून एक दिवस वैतागतो आणि म्हणतो.. का रे बाबा तुला वाईट गोष्टी फक्त एकाच धर्मात दिसतात का?
सर्व धर्मातील/ समाजातील दाखव ना "निःपक्षपातीपणे"

असो पण फटाके आणि ते सुद्धा एवढया मोठया प्रमाणात काय हानी करीत असतील या बद्दल जागरूकता निर्माण व्हायलाच पाहिजे हे पटते .. जमेल तसे हळू हळू परिवर्तन झाले पाहिजे ...

धन्या's picture

26 Oct 2013 - 8:59 pm | धन्या

सहमत आहे !!!

प्रचेतस's picture

26 Oct 2013 - 9:04 pm | प्रचेतस

घाटपांडे काकांशी पूर्णतया सहमत.
फटाके उडवणे १०/१२ वर्षांपूर्वीच सोडले. पण तरीही दिवाळीत उडायला लागले की ते हौसेने बघायला टेरेसवर येतोच.

मनिम्याऊ's picture

26 Oct 2013 - 9:16 pm | मनिम्याऊ

नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा...

.
चालु द्या...

मुक्त विहारि's picture

26 Oct 2013 - 9:48 pm | मुक्त विहारि

नो कॉमेंट्स

मला हा एकंदर फटाकेमुक्त वगैरे विचार पटत नाही. फटाके चार दिवस वाजवले जातात. बाकी लाखो प्रकारची प्रदूषणं दररोज, अव्याहत होत असतात. फटाके हा दिवाळीचा एक महत्वाचा भाग आहे आणि ते वाजवले तर इतकं प्रदूषण नक्कीच होत नाही जितकं रोजच्या रोज जेंव्हा एकेकटे लोक, हगल्या-पादल्याला दुचाकी चारचाकी वापरतात त्यामुळे होतं.

त्यामुळे, थोडक्यात हा प्रकार म्हणजे, मोठे (बिग टिकिट म्हणतात ज्याला कॉर्पोरेट भाषेत) प्रॉब्लेम दुर्लक्षून, छोटे कुठले तरी प्रॉब्लेम मोठे करून ठेवण्याचा प्रकार झाला. हे माझं मत. आणि त्यामुळे, मी या धाग्याशी, त्यातल्या विचाराशी, असहमत.

मग गणपती, नवरात्र, इ. वेळच्या ध्वनिप्रदूषणाबद्दल मत काय आहे? बाकी वेळच्या प्रदूषणाला नाकारत कोणीच नाही, पण यावेळी कमी वेळात फार जास्त प्रदूषण होतं. ते कमी केलं तर काय वाईट आहे?

उपमा अंमळ ताणायचीच तर "बलात्कार करायला ५-१० मिनिटे, फार तर अर्धा तास लागतो, त्या इतक्या कमी वेळ चालणार्‍या त्रासाचे भांडवल कशाला करायचे?" असे म्हटल्यापैकी वाटते हे लॉजिक.

वेल्लाभट's picture

27 Oct 2013 - 6:49 am | वेल्लाभट

काहीही???

सुबोध खरे's picture

27 Oct 2013 - 12:16 am | सुबोध खरे

आपल्याकडे बरेच लोक असे आहेत कि बटर चिकन, शाही पनीर खातात आणि क्यालरीज जास्त होऊ नये म्हणून डाएट पेप्सी पितात. तसेच वर्षभर चार पावले चालत नाहीत मोटारने जाऊन पेट्रोल जाळतात. बाहेरची हवा थंड असेल तरी हि बाराही महिने मोटारचाच काय घराचा सुद्धा ए सी चालू. पण दिवाळी आली कि प्रदूषणावर भाष्य करून आपला पुरोगामीपणा दाखवतात.
घाटपांडे साहेबांसारखे कळकळीचे लोक कमीच जे चार दिवस नव्हे वर्षभर या गोष्टी करीत असतात. अशी गोष्ट सातत्याने करणे जास्त गरजेचे आहे. पण आपल्याकडे दांभिकता जास्त आहे.
मी गेली काही वर्षे शक्यतो मोटारने जाणे टाळून रेल्वेने जातो आणि जवळ जायचे असेल तर चालत जातो. लोक चिकू म्हणाले तरी चालतील. त्याने आपले वजनहि प्रमाणात राहते.मला स्वतःला फटाके फार आवडतात परंतु आता या प्रदुषणा बद्दल जागरुकपणा म्हणा (जनाची किंवा मनाची लाज म्हणा) आता मी फटाके वाजवत नाही. पण लोकांचे फटाके पाहतो जरूर. फटाक्याच्या दारूचा वास बालपणात घेऊन जातो हे मात्र खरे

सुबोध खरे's picture

27 Oct 2013 - 12:17 am | सुबोध खरे

+११ वेल्लाभट च्या प्रतिसादाला होता

वेल्लाभट's picture

27 Oct 2013 - 6:49 am | वेल्लाभट

येस सर...

अनिरुद्ध प's picture

28 Oct 2013 - 1:38 pm | अनिरुद्ध प

+१११ डॉ सुबोध खरे यान्च्याशी सहमत.

रामपुरी's picture

7 Nov 2013 - 2:40 am | रामपुरी

मोरीला बोळा आणि दरवाजा उघडा :)

माझ्या मुलाच्या शाळेत काहीतरी कार्यक्रम होता 'Go Green' चा. त्या कार्यक्रमाअंतर्गत मुलाने फटाके फोडणार नाही अशी शपथ घेतली आहे. हे त्याने मला जेव्हा सांगितले तेव्हा मला काय बोलावे तेच कळेनासे झाले होते. पण सुरुवात चांगली आहे.

-(आनंदी) सोकाजी

वेल्लाभट's picture

27 Oct 2013 - 6:33 am | वेल्लाभट

चुकीचं आहे, मुलांचा आनंद आहे यार तो; तुम्ही मोठ्या केलेल्या प्रदूषणाच्या राक्षसामुळे आता मुलांनी दिवाळी च्या चेकलिस्ट मधून फटाकेच वगळायचे??? बुलशिट!

रुस्तम's picture

27 Oct 2013 - 7:06 pm | रुस्तम

+१११११

अविनाश पांढरकर's picture

28 Oct 2013 - 11:32 am | अविनाश पांढरकर

माझा भाचा फटाके वाजवत असताना मला मी साजरी केलेली दिवाळी आठवते

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Nov 2013 - 4:10 pm | llपुण्याचे पेशवेll

आम्ही तर लई दणक्यात फटाके उडवतो. कधी गो ग्रीनची हौस म्हणून सायकले जातो जवळच्या अंतराला. पण शेवटी काळाबरोबर रहायचे तर गाडी वापरावी लागते. तसेही आवड बदलली म्हणून हल्ली आवाजाचे फटाके कमी व आकाशात जाऊन फुटणारे फटाके जास्त आवडू लागले आहेत.

कोमल's picture

7 Nov 2013 - 2:37 pm | कोमल

मुलांचा आनंद = फटाके

हे समिकरण कशावरून इतकं बरोबर आहे.
आनंद कशात मानायचा हे जर मुलांना शिकवलं तर त्यांचे हट्ट पुरवतांना ही नाकी नऊ येणार नाहीत.

बॅटमॅन's picture

7 Nov 2013 - 3:41 pm | बॅटमॅन

पूर्ण सहमत.

धर्मराजमुटके's picture

26 Oct 2013 - 11:40 pm | धर्मराजमुटके

३१ डिसेबरच्या रात्री जगभर जी जी रोषणाई केली जाते, नेत्रदिपक शोभेच्या फटाक्यांची आताषबाजी केली जाते त्याने प्रदुषण होते काय ?
ते साधारण आपण दिवाळी, नवरात्र, गणपती, लग्नाची वरात यात दारुकाम करतो त्यापे़क्षा जास्त असते की कमी असते याच्याबद्दल माहिती मिळेल काय ?
तिथेदेखील आपल्यासारखे प्रबोधन करणारे लोक आहेत का ? असतील तर ते वर्षभर हे कार्य करतात की अशा मोकाच्या वेळीच जनजागृती करतात ?

हा तर आनंदाचा मामला आहे' आपल्या चोइस चा मामला आहे. 4 दिवसाच्या दंग्या ने शष्प वाट लागत नाही. ते बालपण ते काय जे दिवाली फटाक्यांच्या धामधुमी शिवाय गेले ?

अजुनही किल्ले बनवायला हात शीवशीवतात पण....!

फटाके वाजवायला सुरुवातही उशीरा केली, आणि फटाके वाजवणं थांबवलंही लवकर. आजोबा गेले त्या वर्षी दिवाळी साजरी केली नाही. त्यानिमित्ताने घरात बसून बाहेरच्या रोषणाई आणि आतिशबाजीचा कसा त्रास होतो सगळ्यांना ते अनुभवलं. तेव्हापासून फटाके वाजवणं बंद केलं. मी राहतो ते ठिकाण जरा उंचावर आहे. टेकडीच म्हणा ना. त्यात तिसरा मजला. दिवाळीच्या दिवसात आणि त्यानंतर जवळपास आठवडाभर खिडकीतून किंवा गच्चीतून चारी दिशांकडे बघितलं तर रात्री जमीन आणि आकाश यांमध्ये एक गडद काळसर आणि धुसर पट्टा दरवर्षी नजरेस पडतो. यालाच स्मॉग म्हणतात वाटतं. एरवी वर्षभरात साधं कोणीतरी लग्ना-बिग्नाच्या निमित्ताने सुद्धा एखादी लवंगी माळ लावली तरी आकाशात पक्षांचे थवेच्या थवे घाबरून त्या आवाजाच्या ठिकाणापासून लांब सैरावैरा उडत सुटताना दिसतात. दिवाळीत त्यांचं काय होत असेल?? आपण एवढी भलीमोठी माणसं असूनही आपल्याला छोट्या फटाक्यांच्या मोठ्या आवाजाचा त्रास होतो. त्या पक्ष्यांच्या चिमुकल्या जीवांचं काय होत असेल??
आधी वाटायचं, की यार दिवाळी फक्त चार-पाच दिवसातंच का संपते? निदान दोन आठवडे तरी हवी. पण आता, 'चारच दिवस तर उडवतो फटाके' असं म्हणणारी माणसं भेटायला लागल्यापासून दिवाळी हा वन-डे फेस्ट झाला तरी चालेल. कारण आपल्या मौजेची किंमत इतरांना(आणि आपल्याला सुद्धा) त्यांच्या आरोग्याला त्रास देऊन मोजावी लागते.

'इतर देशात ३१ डिसेंबरला वगैरे उडवतात त्याचं काय?' - आपण लहान मुलं आहोत का? 'त्यानं माती खाल्ली मग मीसुद्धा खाल्ली तर काय बिघडलं?' 'सगळे रस्त्यात कचरा टाकून घाण करतात, मग मीसुद्धा फेकला तर काय मोठं होणार आहे?' 'सगळे थुंकतात कुठेही, मग मीसुद्धा थुंकतो आता' सुधारणेला सुरुवात स्वतःपासूनच करावी. आणि आपण सुधारलो की आपल्या परीने इतरांनाही सुधारावं.

कोमल's picture

7 Nov 2013 - 2:56 pm | कोमल

सहमत..
लक्ष्मीपूजन म्हणजे अमावस्या पण या दिवशी प्रदूषणाच्या ढगामूळे एक तारका सुध्दा नजरेस पडत नाही.
वारा जरी वाहात असेल तरी जळलेल्या फटाक्यांचे वास सोबत घेऊन.
ही परिस्थिती मी ज्या लहान शहरात राहाते तिथली आहे. पूण्या-मुंबई कडे काय होत असेल याची कल्पनाच केलेली बरी.
अन् स्वत: पासून सुधारणेला सुरवात झालेल्यांचे अभिनंदन आणि आभार

पुष्कळ आधी फटाक्यांशी असलेला रिश्ता तोडलेली ;)

मन१'s picture

27 Oct 2013 - 12:38 am | मन१

स्वॅप्स ह्यांच्या प्रतिसादशी बराचसा सहमत. लहानपणीही मोठ्या आवाजाची तिडिक होती. त्यामुळे त्याच्या वाटी गेलो नव्हतो.
नावापुरते एखाद दोन भुईनळे आणि भुईचक्र उडवायचो. तेसुद्धा आठवी नववीपासून बंदच झाले.
.
ह्याबाबतीत मी निराशावादी आहे. माज्झ्या कानांना असह्य असा त्रास देणे हा पब्लिकचा जन्मसिद्ध अधिकार हतबलतेतून मान्य केला आहे. आख्खा भारत देश बापानच भेट दिल्यासारख्या तोर्‍यात बहुसंख्य पब्लिक कधी सणांना धत्तड तत्त्ड करत रस्ते अडवणार, कान फाटेस्तोवर आवाज काढणार ही फ्याक्ट आहे.
तुमच्यासारखांच्या म्हणण्याकडे काणाडोळा होणार ह्याची ग्यारंटी.
तरी तुम्ही लोकं " माना के इस चमन को गुलजा़र न बना सके हम
मगर कुछ काटे तो किये कम, गुजरे जिधर से हम"
असा मानवतावादी विचार करत समजावणीच्या सुरात बोलत राहणार.
पकाकाका,तुम्हाला कधी मठ्ठ आणि कधी कमलिच्या आडमुठ्या लोकांशी सतत शांतपणे बोलण्याचा उद्वेग कसा येत नाही ह्याचं आश्चर्य वाटतं.

प्रसाद गोडबोले's picture

27 Oct 2013 - 1:56 am | प्रसाद गोडबोले

मी १`९९८ नंतरच्या एकाही दिवाळीत एकही फटाका वाजवल्याचे किंव्वा फुलबाजी उडवल्याचे स्मरत नाही कारण आवडतच नाही वेळ वाया जातो ( तेवढ्या वेळात मी चार चकल्या अन २ लाडु येक्ष्ट्रा खाऊन घेईन ना ;) )

....पण आता ह्या महाशयांनी फटाके उडववणे हे अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळीत घुसवल्याने यंदा किमान १००० रुपायाचे फटाके आणुन , टिच्चुन , उडवावेत असा मानस आहे ...

ह्या लोकांना हिंदुंच्याच सण समारंभात नेहमीच खोट का दिसते देव जाणे . आला गणपती की पाणीप्रदुषण/ ध्वनीप्रदुषण , होळीला वृक्षतोड , वारीला अस्वच्छता , दिवाळीत आता हे ...देवीपुढं बोकडाचा बळी द्यायला विरोध .... सातार्‍यात तर पाठशाळेतर्फे एकदा यज्ञ करण्यात आला होता त्यालाही यांचा विरोध ...
अरे दुसर्‍यांच्या अंधश्रध्दांविषयी विषयी बोलुन तरी दाखवाल का ? उगाचच हिंदु गपगुमान बसतात म्हणुन म्हणुन किती चेपायचे ?

(अवांतर : हिंदुंच्या जुनाट आणि कालबाह्य रुढी हटवण्याकरीता संघानेच / विहिंपनेच पुढाकारुन घेवुन श्रध्दा सबलीकरण समिती सुरु केली पाहिजे आणि भरकटत जाणार्‍या प्रथांना पुन्हा नीट केले पाहिजे .)

वेल्लाभट's picture

27 Oct 2013 - 6:39 am | वेल्लाभट

बरोबर आहे...

पण तुम्ही म्हणताय त्या लोकांनी हे सुरू केलं की तो पुन्हा एक राजकीय फार्स ठरेल. सगळ्यांना हे समजलं पाहिजे...आणि त्यांनी तसं केलं पाहिजे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Oct 2013 - 12:17 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

+७०३२३२१५८४६५४५६४६५५६१५१२३१३२१२३१८८९४४६५६५४

फटाके वाजवणं फार पूर्वीच बंद झालं.
पण रोषणाई आवडते. आवाजाच्या फटाक्यांचा मर्यादित वापर बरा वाटतो.
बाकी...
>>>अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते.

पकाकाका, मुदलात घोळ आहे की हा! ;)
दिवाळीच मनवायला नकोय ना अंधश्रद्धा निर्मूलन कर्त्यांनी. ह्या अंनिस वाल्यांची नेमकी भूमिकाच कळत नाही राव. टोटल देव ही संकल्पनाच न मानणे की देव मानणे पण ज्योतिष न मानणे की सामाजिक रुढी न मानणे की दारुबंदी करणे की स्वच्छता अभियान चालवणे की आणखी काही?

अरे नक्की काय करायचंय काय (म्हणजे तुला कशाला चौकश्या नव्हे तर खरंच नेमका काय बदल अपेक्षित आहे? ) तुम्हाला म्हणजे अंनिस वाल्यांना. लोकशिक्षण हा जास्त योग्य मार्ग नाही वाटत? बाकी जागृती आपोआपच येईल की.

प्रकाश घाटपांडे's picture

27 Oct 2013 - 7:44 pm | प्रकाश घाटपांडे

>>टोटल देव ही संकल्पनाच न मानणे की देव मानणे पण ज्योतिष न मानणे की सामाजिक रुढी न मानणे की दारुबंदी करणे की स्वच्छता अभियान चालवणे की आणखी काही? <<
या प्रश्नांच्या शोधात गेल्यावर जो प्रवास आपला होतो त्यात आपल्याला जी उत्तरे मिळत जातात त्यातूनच आपला वैचारिक विकास होत जातो. अंनिस ही देवाधर्माबद्दल तटस्थ आहे. पण धर्माची कालसुसंगत चिकित्सा केली गेली पाहिजे अशी भुमिका असते. त्यामुळे अंनिस ही देवाधर्माविरोधी आहे अशी प्रतिमा तयार होते.
>>लोकशिक्षण हा जास्त योग्य मार्ग नाही वाटत? बाकी जागृती आपोआपच येईल की.<<
तोच मार्ग योग्य आहे. चिकित्सा हा लोकशिक्षणाचाच भाग आहे. जागृती हळू हळू होतेच आहे.विज्ञानाच्या प्रगतीमुळे तो वेग वाढत जाईल.

वेल्लाभट's picture

27 Oct 2013 - 6:37 am | वेल्लाभट

चला दिवाळीच्या अतिरेक फटाक्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी आपण दिवाळीतून फटाके भाग वजा केला. ग्रेट. बाकी धर्माचे, वंशाचे लोक त्यांच्या सणांतून प्रदूषणकारक पद्धती, घटक वगळतील का?

धमाल मुलगा's picture

27 Oct 2013 - 8:33 am | धमाल मुलगा

सगळे मुद्दे पटताहेत खरं. साधारण ९-१०वीत असताना फटाके उडवणं बंद केलं ते गेल्यावर्षीपर्यंत. आमच्या राहत्या जागेपासून जवळच एक 'गार्डन'वालं कार्यालय आहे. वर्षभर लग्नं असतील तेव्हा कचकून फटाके उडवले जातात. दोन-सव्वादोन वर्षाचं आमचं पोरगं खिडकीच्या जाळीला नाक चिकटवून मान वाकडी करकरुन आतीषबाजी पहायचा प्रयत्न करायचं. त्या दिवाळीला इतक्या वर्षांनंतर घरात फटाके आणले गेले.. आता प्रदुषण वगैरे वैज्ञानीक अन 'जुन्या रुढी भंगारात काढा' वगैरे मतं एकवेळ मला पटताहेत असं म्हणू....अडीच-तीन वर्षाच्या लेकराच्या चेहर्‍यावरच्या चार दिवसांचा फटाक्यांचा आनंद अन त्या आठवणींवर पुढे निघालेला त्याचा महिना महिना...हे सुख कसं दुर्लक्षित करु?

समजसुधारणा, जुन्या रुढी, अमुक तमुक सगळे आवेशपुर्ण, त्रासलेले, प्रामाणिक प्रतिसाद वाचले. पण एकदा पोटच्या पोराच्या चेहर्‍यावरचा हा आनंद पाहिला तर असे विचार त्याक्षणी सुचतील तरी का असा प्रामाणिक प्रश्न पडला.

अडीच-तीन वर्षाच्या लेकराच्या चेहर्‍यावरच्या चार दिवसांचा फटाक्यांचा आनंद अन त्या आठवणींवर पुढे निघालेला त्याचा महिना महिना...हे सुख कसं दुर्लक्षित करु?

अगदी पटलं धमाल मुला. अरे! मला सुद्धा शाळेला दांडी मारायला मिळाली की कोण डोंगराएवढा आनंद व्हायचा. पण आमच्या पालकांनी तो निर्मळ आनंदही कधी मिळवू दिला नाही. मारुन मुटकून शाळेत पाठवायचे आणि मी रडतखडत, पाय ओढत हिरमुसल्या मनाने शाळेत जायचो. मुलाच्या भवितव्याचा विचार करून त्याचे वर्तमान सुख हिरावून घेतात हि पालकमंडळी.
फटाक्यांनी होणारे प्रदुषण आणि मुला-मोठ्यांची फटाके फोडून आनंद मिळविण्याची संधी, दोन्ही अबाधित कसे ठेवता येईल?
सर्व धर्मियांच्या ध्वनी प्रदुषणावर बंदी घाला, भेसळयुक्त इंधन (पेट्रोल-डिझेल) विकणार्‍यांवर कारवाई करा, प्रत्येक वाहनाला दर दोन वर्षांनी तपासणी बंधनकारक करा. (पीयुसी प्रमाणपत्र पुरेसे आहे? मला शंका आहे.), मलमुत्र विसर्जनाच्या सार्वजनिक सुविधा वापरायोग्य बनवा, औद्योगिक, रासायनिक कचराद्रव्य नदी-नाल्यात सोडले जाणार नाही ह्यावर लक्ष ठेवा, कारखाने, उपहारगृहे, स्मशाने येथे निर्माण होणार्‍या धुराचे उंच चिमणीद्वारे निस्सारण, अन्नातील प्रदुषण (भेसळ) ताबडतोब थांबवा, फटाक्यांच्या बाबतीत धूर करणार्‍या फटाक्यांच्या उत्पादनावर बंदी, आवाजाच्या (डेसिबल) मर्यादेवर बंदी आणि काटेकोर अमलबजावणी इ.इ.इ. उपाययोजना सक्तीने अमलात आणल्या पाहिजेत.

धमाल मुलगा's picture

27 Oct 2013 - 9:17 pm | धमाल मुलगा

शाळा-दांडी-वर्तमान सुख-भवितव्य ह्या संदर्भातलं वाक्य सरळ होतं की तिरकस ते काही मला नीट उमजलं नाही त्यामुळं मी आपलं सोयीस्कररित्या ते सरळच आहे असं गृहित धरतो. :)

बाकी मुद्यांवर अर्थातच सहमती.
ज्या इतर गोष्टी करणं शक्य आहे त्या तशाच सोडून लोकांच्या भावना, आनंद जिथे निगडीत असतात तिथे विरोध करण्यात काय हशील आहे ते मात्र आजवर मला कळालेलं नाही. (तशीही आमची आकलनक्षमता दिव्यच आहे म्हणा.) आज पुण्यासारख्या शहरांमध्ये रस्त्यावरुन जाताना नजरेच्या टप्प्यात क्षितीजाकडं नजर टाकली तर काळाकुट्ट धुराचा पट्टा दिसतो. रोज! दिवाळीसारखा चार दिवस नव्हे. त्याविरोधात पावलं उचलणं जास्त गरजेचं नाही का? रस्त्यानं जाणार्‍या आणि विशेषतः सिग्नलला थांबलेल्या सिटी-बसमधून काळ्याकुट्ट धूराचे लोटच्या लोट वहात असतात, त्याबाबत ह्या सार्वजनिक वाहनांच्या देखभालीबद्दल कुणी काही प्रयत्न का करत नाही हेही मला कळालेलं नाही.
कारखान्यांमधून सोडल्या जाणार्‍या घातक रसायनांबद्दल बोलण्यात अर्थ नाही, कारण त्या गोष्टींचं शुध्दीकरण, रिसायक्लिंग वगैरेसाठी लागणार्‍या खर्चाचा मुद्दा पुढे येऊन मग परत उत्पादनाचे भाव वाढणं वगैरे अर्थशास्त्रीय भानगडीकडं वळावं लागेल.

थोडक्यात काय, तर सॉफ्ट टार्गेट्सच नेहमी धोपटले जातात. मग ते दिवाळीतले फटाके असो नाहीतर देवदेवता असो.
असो, हे विचार म्हणजे पेठकरकाकांच्या मुद्द्याला प्रत्युतर असं नव्हे, तर विचारांच्या ओघात सुचलं ते लिहिलेलं आहे.

जाताजाता: वर्षभर जी लग्नं लागत असतात, त्या लग्नांच्या मिरवणूकीत रस्त्यातली वाहतुक थांबवून पन्नास हजार / लाखभर फटाक्यांच्या लडी लावल्या जातात, संपुर्ण मिरवणूकीत रस्ताभर फटाक्यांचा रतीब घातला जातो त्यांचे प्रबोधन कशा प्रकारे केले जाते ते वाचायला आवडेल.

प्रकाश घाटपांडे's picture

27 Oct 2013 - 11:23 am | प्रकाश घाटपांडे

मला मोठेपणी ऐकलेली 'खुलभर पाण्याची' कहाणी आठवली. देवाचा गाभारा दुधाने भरून वाहील असा संकल्प लोकशाही राजाने केला व अनासक्तिने सर्व नागरिकांना स्वतःला थेंबही न घेता सगळे दूध देवळात आणुन घालायचे आवाहन केले.
कोणी विचार करु लागला कि इतर लोक दुध टाकणार आहेत च आपली एखादा तांब्या पाण्याने काय होणार आहे? चला आपण पाणीच टाकू
कोणी विचार करु लागला कि इतर लोक साले चोर आहेत पाणी टाकतील मग आपण दुध टाकले तरी त्याचा काय उपयोग? चला आपणही पाणीच टाकू.
अशा रितिने सर्व गाभारा पाण्याने ओसंडून वाहू लागला.
तसे इथे माझ्या एकट्याच्या प्रदूषणाने काय होणार आहे इथे कितीतरी प्रदूषण करणारे अन्य घटक आहेत.माझ्या एकट्याच्या फटाके न वाजवण्याने वा कमी वाजवण्याने काय होणार आहे? फटाकेमुक्त अभियान हे अंनिस चळवळीने विवेकी लोकांना केलेले आवाहन आहे. व्यापक परिवर्तनाची चळवळ ही विवेकी विचारांची चळवळ आहे, वैज्ञानिक दृष्टीकोनाची चळवळ आहे. प्रदूषण या गोष्टी शी श्रद्धा अंधश्रद्धा धर्म याचा काही संबंध नाही. अंनिसच्या काही गोष्टी लोकांना पटत नसतील हे मान्य आहे. तिथे वाद संवाद होउ शकतात. पण इथे मुद्दा प्रदूषणाचा आहे. प्रदुषणाचे आकडे आपण पेपरमधे वाचत असतोच ना! प्रत्येक ठिकाणी अंनिसचा संबंध असलाच पाहिजे असे काही नाही.समाज प्रबोधन ही काही केवळ अंनिसची मक्तेदारी नाही.

प्रचेतस's picture

27 Oct 2013 - 8:52 pm | प्रचेतस

प्रतिसाद आवडला आणि पटला.

चेतन's picture

28 Oct 2013 - 7:24 pm | चेतन

प्रतिसाद आवडला
तसही बरेच वर्ष फटाके वाजवले नाहीत.

उगाचच : कुंडल्या तयार करुन मग जाळताना प्रदुषण होते का?

प्रसाद गोडबोले's picture

28 Oct 2013 - 8:34 pm | प्रसाद गोडबोले

उगाचच : कुंडल्या तयार करुन मग जाळताना प्रदुषण होते का?

=))
अशा रीतीने घाटपांडे काकांना घाटात गाठण्यात आले आहे ...

प्रकाश घाटपांडे's picture

28 Oct 2013 - 8:59 pm | प्रकाश घाटपांडे

:)

एस's picture

29 Oct 2013 - 12:42 am | एस

प्रदूषण या गोष्टी शी श्रद्धा अंधश्रद्धा धर्म याचा काही संबंध नाही.

तसेच विवेकी विचारांवरही एका धर्माची मक्तेदारी नाही. सामाजिक पर्यावरणाच्या विरूद्ध जाणारी तत्त्वे नाकारणे हे काही एकट्या एखाद्या धर्माच्या अनुयायांचे काम नाही. तसेच विवेकवादाची कास धरणे हेही सर्वांनाच समानपणे लागू आहे. इथे सुधारणा म्हणजे अमुक एका धर्माच्या विरुद्ध जाणारी गोष्ट असे मानण्याचेही काही काम नाही. तसं पाहिले तर जगातल्या कुठल्याही धर्माच्या मूल तत्त्वांचा सारांश हा इतर धर्मीयांच्या किंवा वर उल्लेखलेल्या सामाजिक पर्यावरणाच्या विरुद्ध नाही हे थोडे खोलात जाऊन पाहिल्यास लक्षात येईल.

दुसर्‍याची चूक हे आपल्या चुकीचे समर्थन होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जग बदलण्याची सुरुवातही आपल्यापासून करावी लागते.

पुन्हा एकदा धाग्यावरील चर्चा धाग्याच्या सारांशाकडे वळवत - दिवाळी हे निमित्त आहे. वर उल्लेखलेल्या इतर दिवशीही फटाक्यांमुळे जे प्रदूषण होते ते टाळणे आपल्या सर्वांच्याच हिताचे आहे. मग ते दिवस किंवा ती कारणे कुठलीही असोत वा कशाशीही संबंधित असोत. फटाक्यांच्या आवाजाने किंवा रोषणाईने होणारा आनंद त्यांच्यामुळे इतरांना होणार्‍या त्रासापेक्षा मोठा आहे का हे एकदा अंतर्मुख होऊन तपासले पाहिजे.

माझा एक दृढ विश्वास असा आहे की आपल्या प्रत्येकाला एक सोपा आणि एक अवघड पर्याय नेहमीच उपलब्ध असतात. सोपा पर्याय अवलंबिणे तितकेच सोपे आणि सोईचेही असते. अवघड पर्याय स्वीकारायला तसाच आत्मविश्वास आणि दृढनिश्चय लागतो. हा अवघड निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर आयुष्यातल्या पदोपदी कसा घ्यायचा याबद्दल जर आपण आपल्या नंतरच्या पिढीला शिकवू शकलो नाही तर त्याच पिढ्या कदाचित आपल्याला आरोपीच्या पिंजर्‍यात एक दिवस उभे करतील.

भ ट क्या खे ड वा ला's picture

27 Oct 2013 - 1:22 pm | भ ट क्या खे ड वा ला

लहानपणी खूप फटाके उडवले.
घरी एकदाच फटाके आणले जायचे ते तुळशीच्या लग्ना पर्यंत थोडे राखून ठेवले जायचे. हो आणि थोडे भारत जिंकला तर आणि गावस्कर ने शतक मारले तर सुद्धा
दुसर्या दिवशी कागदांच्या तुकड्यांनी भरलेले अंगण झाडायला पण मजा यायची.
मी २६/२७ वर्षाचा होई पर्यंत फटाके उडवत असे, लहानपणी तर पर्यावरण हा शब्द हि ऐकला नव्हता.
माझी मुलगी मात्र १४/१५ वर्षाची होताच फटाके फोडायची थांबली. कोणत्याही प्रकारचा उपदेश न करता
प्रदूषण वगैरे जाऊदे पण फटाका निर्मितीत बाल कामगारांचे जे शोषण होते त्यासाठी काही कठोर उपाय केले पाहिजेत अगदी किमती दुप्पट करून का होईना हे थांबवले पाहिजे.
कोकणात काही जण बागेत माकडे (केल्टी) आली कि त्यांना पळवायला फटाके वापरतात.

पिलीयन रायडर's picture

27 Oct 2013 - 3:02 pm | पिलीयन रायडर

फटाके आवडत नाहीत.. डोकं उठतं आवाजानी.. धुरानी गुदमरल्या सारखं होतं
असा त्रास होणारे लोक जगात आहेत हे लक्षात न घेता कधीही फटाके उडवतात लोक.. राग येतो.. पण काय करणार..

नावातकायआहे's picture

27 Oct 2013 - 10:42 pm | नावातकायआहे

मला फटाके उडवायला आवडतात.
मी उडवतो.
बाकी सगळ्यांना फाट्यावर मारुन उडवतो.

पैसा's picture

27 Oct 2013 - 10:59 pm | पैसा

आकाशकंदिल आणि फटाके यांचं मूळ बहुधा चिनी आहे असं वाचल्याचं आठवतं. या दोन्ही प्रथा आपल्याकडे केव्हा आणि कशा सुरू झाल्या माहित नाही.

मी लहान असताना वडील मोजके फटाके आणून तिन्ही भावंडांना वाटून द्यायचे. त्यामुळे आपोआपच नियंत्रण रहायचं. माझ्या दोन्ही मुलांना लहान असल्यापासून आवाज आणि धूर करणार्‍या फटाक्यांचं आकर्षण नाही. आम्हीच काय आणून देत होतो ते लावायचे एवढंच. माझ्या एका आतेबहिणीला जळत्या फुलबाजीमुळे फ्रॉक पेटून ७०% भाजल्याच्या जखमा झाल्या आणि तिचं पुढचं आयुष्य कठीण झालं. ते उदाहरण डोळ्यासमोर होतंच. नंतर एकदा एका बाणाचं किटाळ मुलाच्या डोळ्यात गेलं. डोळा थोडक्यात बचावला.

जरा मोठी झाल्यावर फटाके म्हणजे पैशांचा निव्वळ धूर करणे हे समीकरण त्यांच्या डोक्यात बसलं. त्यातच शिवकाशीला फटाक्याच्या कारखान्यात बालमजूर कसे काम करतात आणि त्यातले कित्येक मृत्युमुखी पडतात वगैरे वाचल्यानंतर दोन्ही मुलांनी आपणहून फटाके आणणं बंद केलं.

मला सुतळी बॉब्म वाजवण्याचं फार वेड होत ! फटाके आणताना वडिलांना मी फक्त सुतळी बॉब्मच उडवणार असे सांगुन इतर फटाके घेत नसे... सुतळी बॉब्मचा दणदणीत आवाज मला विशेष आवडायचा ! पण जेव्हा लक्षात आले की या फटाक्यांनी प्रदुषण होत आहे शिवाय कष्टाच्या पैशाचा क्षणात धुर होत आहे तेव्हा पासुन फटाके वाजवणे बंद केले.
स्वतः बद्धल विचार करताना इतरां बद्धल सुद्धा विचार करायला हवा ! जी काही थोडी फार नावाला उरलेली शुद्ध हवा आहे ती देखील पुढच्या पिढ्यांना मिळणार का ? असा विचार खरं तर प्रत्येकाने करायला हवा.
ज्यांना विचार पटतात आणि स्वतःमधे बदल घडवतात त्यांची संख्या कमी असेल,पण त्या संख्येने देखील थोडाफार फरक नक्कीच पडेल.
ज्यांना "प्राणवायु" चे महत्व कळतं आणि पटतं त्यांनी देखील यावर विचार आणि बदल का करु नये ?

जाता जाता :-
सध्या बाजारात आवाज मुक्त फटाक्यांचा नविन ब्रॅड आला आहे ! ;)
M

प्रसाद गोडबोले's picture

28 Oct 2013 - 1:24 pm | प्रसाद गोडबोले

=))

बॅटमॅन's picture

28 Oct 2013 - 6:32 pm | बॅटमॅन

=)) =))

खरंच आहे की आपलं छायाचित्रदुकान =))

रुस्तम's picture

29 Oct 2013 - 9:47 pm | रुस्तम

हा हा हा :)

कांद्यासाठी चेकाळनारे लोक दिवाळीत हजारोंच्या फटाक्यांचा धूर करतील तेव्हा कदाचित त्यांना फटाक्याची भाववाढ धुरामुळे दिसणार नाही. "यंदाची दिवाळी फटाके विरहित दिवाळी!!!"

कवितानागेश's picture

28 Oct 2013 - 6:55 pm | कवितानागेश

प्रदूषण होणार नाही असे फटाके का तयार नाहीत?

अर्धवटराव's picture

31 Oct 2013 - 3:49 am | अर्धवटराव

>>प्रदूषण होणार नाही असे फटाके का तयार नाहीत?
-- मिपा त्याकरताच सुरु केलय ना मालकांनी?? आता तुमच्यासारखे सूज्ञ संपादक देखील मिपाच्या मूळ उद्देशांबाबत अनभिज्ञ असावेत ना... ;)

बाबा पाटील's picture

31 Oct 2013 - 7:43 am | बाबा पाटील

कच्चे हरबरे खा... या फटाक्यांचा धुर जिवाला अजिबात अपायकारक नसतो.हा मनाला होनारा अपाय ज्याचा त्याने सांभाळुन घ्यावा.

रामपुरी's picture

7 Nov 2013 - 2:50 am | रामपुरी

आणि नाकाला होणारा अपाय? त्याचं काय?

फटाकेमुक्त दिवाळी, पाण्याविना रंगपंचमी या संकल्पना जरा डोक्यावरून जाणार्‍या आहेत...
कुणालाही, कुठेही, कितिही नैसर्गिक रंग फासला तरी तो धुवायला थोडेतरी पाणी लागणारच ना!...कपडे कसे धुणार?......म्ह्णजे १००% पाण्याविना रंगपंचमी करणे मलातरी शक्य वाटत नाही.....

तद्वत, दिवाळीच्या ४-५ दिवसांत मी सुतळीचा तोडा सुद्धा वाजवला नाही, तरी मी बाकी वर्षभर प्रदुषण करतोय/स्विकारतोय त्याचं काय?
हार्ले डेविड्सनचा १०-१५ गाड्यांचा ताफा गोंगाट करत गेला तर मला अप्रुप/आनंद/कुतुहल वाटते कि मी प्रदुषणाचा विचार करतो हेही बघायला पाहीजे ना...

हार्ले डेविड्सनचा १०-१५ गाड्यांचा ताफा गोंगाट करत गेला तर मला अप्रुप/आनंद/कुतुहल वाटते कि मी प्रदुषणाचा विचार करतो हेही बघायला पाहीजे ना...

कै च्या कै..
भारतातील ९०% जनता जर हार्ले डेविड्सन चालवून गोंगाट करत असेल ना तर माझं फटाक्यांशी बिलकूल वैर नाही..

तिरकीट's picture

7 Nov 2013 - 5:15 pm | तिरकीट

कितिका % जनता चालवू दे......प्रदुषणाचा विचार होतो का नाही?
किंवा किति % गाड्या चालवल्या तर त्याचा प्रदुषणावर परिणाम होत नाही?....
जर मी वाजवत असलेल्या फटाक्यांनी दुसर्‍या कुणालाही त्रास होत नसेल (वाजवल्यावर किंवा वाजवताना) तर अडचण काय आहे?

कोमल's picture

7 Nov 2013 - 9:20 pm | कोमल

मी वाजवत असलेल्या फटाक्यांनी दुसर्‍या कुणालाही त्रास होत नसेल (वाजवल्यावर किंवा वाजवताना)

>> तुम्हाला प्रत्येक वेळी कोणी सांगायला थोडीच येणार आहे की तुमच्या फटाक्यांचा त्रास होत आहे ते.
याच धाग्यावरील वडापाव किंवा पिराचा प्रतिसाद वाचाल तर तुमच्या ध्यानात येईल की ज्यांना त्रास होतो त्यांना सहन करण्या व्यतिरिक्त काही पर्याय नसतो.
आणि बाकी प्राण्यांना होणारा त्रास तर अलाहिदाच आहे.

अवांतर : हार्ले डेविडसनच्या आवाजाचे डेसिबल्स जास्तीत जास्त ९८.५ असतात आणि "सहन" करायला लागणारा वेळ ५ ते १० सेकंद

आणि फटाक्यांच्या आवा़जाचे डेसिबल्स कमीत कमी ११८ असतात आणि सहन करायची वेळ - जेवढा तुमच्या सारख्यांच्यात उत्साह असेल तेवढा

तिरकीट's picture

8 Nov 2013 - 2:39 pm | तिरकीट

बर...

गुलाम's picture

8 Nov 2013 - 7:22 pm | गुलाम

अत्यंत आक्रस्ताळी प्रतिसादावर तितकेच संयत उत्तर!!!

(बाकी देण्यालायक काही उत्तरच नव्हते तो भाग अलाहिदा :) )

एक मशीन शोधायला हवं जे आसपासची हवा खेचून त्यातले हानिकारक प्रदूषण शोषून घेऊ शकेल. हे मशीन गाडीवर ठेऊन फिरते करता येइल आणि अशी अनेक मशीन जास्त प्रदूषित रस्त्यावर ठेवता येतील. हे मशीन चालवण्याचा खर्च फटाक्यांची किंमत थोडी वाढवून वसूल करता येईल आणि मग ज्यांना फटाके उडवायचे असतील त्यांना ते उडवता येतील आणि प्रदूषणाचे परिणाम कमी होतील. अर्थात बाकीची काही बंधने पाळावीच लागतील, जसे हॉस्पिटल जवळ फटाक्यांचा मोठा आवाज नको.

मला एक कळत नाही कि अंनिसने काहिही आवाहन केले कि लोक 'अंनिस कसे फक्त हिंदूंच्या प्रथांविरुद्ध बोलते आणि ईतर धर्मियांविरुद्ध काहीच करत नाही' असे गळे का काढतात. मुळात हे आर्ग्युमेंटच चुकीचे आहे. अंनिसचे समाजसुधारणेचे काम बरोबर आहे कि चुकीचे असा वाद असु शकतो पण काम हिंदू धर्मातच का असा वाद कसा काय होऊ शकतो. काम जर चांगले आहे तर ते सर्वांसाठीच चांगले आहे आणि वाईट आहे तर सर्वांसाठीच वाईट आहे. तरिही डॉ. दाभोळकरांनी एके ठिकाणी यावर फार छान उत्तर दिले होते. त्याचा थोडक्यात सार असा -
१. अंनिस फक्त हिंदूसाठीच काम करते हा गैरसमज आहे. अंनिसने वेळोवेळी ईतर धर्मातील प्रथांविरुद्धही काम केले आहे. (उ.दा. नुकतेच अंनिसने नळदुर्गमधील एका फकिर बाबाचा भंडाफोड केला)
२. परंतु तरीही अंनिसचे जास्त (मेजर) काम हिंदु धर्मात चालते कारण अंनिसमधले बरेचशे कार्यकर्ते हिंदू असतात आणि आपल्या आजुबाजूच्या अंधश्रद्धांमुळे व्यथित होऊन अंनिस मधे आलेले असतात. शिवाय भारतात हिंदू बहुसंख्य असल्यामुळे अंनिस कडे येणारी अंधश्रद्धेची प्रकरणेही जास्त हिंदूमधीलच असतात.
३.जर एखादा हिंदू कार्यकर्ता मुस्लिम समाजातील अंधश्रद्धेविरुद्ध काही करायला गेला तर प्रबोधन होणे सोडून दोन धर्मात वितुष्ट येण्याचीच शक्यता जास्त. त्यामुळे मुस्लिम समाजातुनच पुरोगामी लोकांनी पुढे येऊन त्या धर्मात प्रबोधनाचे काम करावे अशी अपेक्षा आहे.
४. तरिही जर कुणी, बहुसंख्य असलेल्या धर्मातील अंधश्रद्धेविरुद्ध काहि काम करत असेल तर त्यात वाईट काय आहे? जर मी उद्या माझ्या घरातील कचरा झाडू घेऊन साफ करु लागलो तर घरच्यांनी माझं कौतुक करावं की "तुला स्वतःच्याच घरातला कचरा बरा दिसतो रे, बाकी घरात काय उकिरडा आहे तो नाही दिसत" अशी माझी निर्भत्सना करावी?

राहिला प्रश्न दिवाळीत फटाके ऊडविण्याला विरोध करण्याचा तर अंनिस ही विवेकवादाची चळवळ आहे. दिवाळीत काही सेकंदाच्या करमणुकीसाठी पैशांचा धूर करणे त्यातुन ध्वनी आणि वायू प्रदुषण करणे, आजारी आणि व्रुद्धांना त्रास देणे हे अविवेकी वागणे आहे आणि म्ह्णून अंनिसचा याला विरोध आहे.

(बाकी दाभोळकरांची भर दिवसा हत्या झाल्यानंतरही 'सॉफ्ट टारगेट सारखे' शब्द पाहुन अंमळ करमणुक झाली)

माझी लेक फटाक्यांच्या एवजी बंदुकीचे बार करायला लावते.स्वताच्या कानात कापसाचे बोळे घालुन...
बाकी गंमत जाउ द्या पण हीच तर भारताची उर्जा आहे,समाजातल्या जिवंतपणाचे लक्षण आहे,म्हणुनच गरिबातला गरिब देखिल स्वतःच्या मानसिक आनंदासाठी निदान लक्ष्मीपुजनाला तरी एखादा फटाका उडवतोच्,जरा मोकळेपणाने रस्त्यावर फिरा पोर ज्या मस्तीत हे चार दिवस जगतात ना त्याला भेंडी कशाचीच सर येत नाय.बच्चे है यार अभी नही करेंगे तो क्या हम जैसे मिसलपाव पे टाइमपास करेंगे.(दिल तो बच्चा है वाला बाबा पाटील.)

प्रकाश घाटपांडे's picture

30 Oct 2013 - 9:08 am | प्रकाश घाटपांडे

विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा हा सनातन प्रभात मधील लेख वाचला. लेख आवडला. लेख पटला. जे विचार पटतात ते पटतात म्हणावे मग ते कोणीही व्यक्त करोत. समजा मला फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावीशी वाटते पण अमुक एका संघटनेने ते सांगितले आहे म्हणुन मी मुद्दाम फटाके वाजवणारच ही भुमिका विवेकी वाटत नाही. असो. प्रगल्भतेची वाटचाल ह्ळू हळूच होत असते.

गुलाम's picture

30 Oct 2013 - 2:48 pm | गुलाम

+१११...
चला कुठल्या का निमित्ताने सनातन कडून चांगले काम होत असलेले पाहून बरे वाटले!!!

बॅटमॅन's picture

30 Oct 2013 - 3:15 pm | बॅटमॅन

चक्क सनातनकडून असे काही होणे लै आवडले.

प्रमोद देर्देकर's picture

30 Oct 2013 - 9:48 am | प्रमोद देर्देकर

वरिल सर्व प्रतिसाद पाहुन दोन्ही बाजु पाहुन टोकच्या भुमिका घेत आहेत असे दिसते. बाबा पाटील, गिरीजा यांचेही मत पट्ते तरी थोडे कमी फटाके उड्वुन प्रदूषण रोखणे शक्य आहे. पण फटाक्या शिवाय दिवाळी साजरी करा असे लहान मुलांना समजवुन सांगणे कठिण आहे. आणि आत्ताच बरे आपण विचर करतो कि लोकांना त्रास किंवा आजारी आणि व्रुद्धांना त्रास होतो. होळी,गणपति, दहिहंडी या वेळी राजकर्णी लोक डी. जे वाजवून आवाज ची पातळी ओलांडतात तेव्हा कुणीच काही बोलत नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

30 Oct 2013 - 10:04 am | प्रकाश घाटपांडे

मला या निमित्ताने गिरिश कुबेर यांचा लोकसत्तातील पराजयदशमी हा लेख आठवला. विचार करण्याच्या मिती कशा असतात ते वाचायला मिळते.

शिद's picture

30 Oct 2013 - 3:40 pm | शिद

दिवाळीला जसे पणत्या, रांगोळी व फराळाशिवाय पर्याय नाही तसेच फटाक्यांशिवाय देखील नाही.…
मोठ्या आवाजाचे आणि प्रदूषण करणारे फटके न आणता साधी फुलबाजी, भुईचक्र व भुईनळे आणुन आपल्या मुलांसोबत मस्त धमाल करावी… असे मला तरी वाटते.

प्रभाकर पेठकर's picture

30 Oct 2013 - 4:01 pm | प्रभाकर पेठकर

+१.

कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांचा म्हातार्या , आजारी माणसांना , लहान मुलांना किती त्रास होतो हे आपल्याला माहित आहेच. परंतु प्राण्यांना त्यांचा किती त्रास होतो ह्यावरचा १ लेख सकाळ मध्ये वाचला होता. त्यानंतर मी फटके उडवणं सोडून दिलं. आपण मोठ आवाज झाल्यावर कानावर हाथ ठेवू शकतो. पण मांजरींना, कुत्याच्या पिल्लांना , पक्ष्यांना ते सुधा करता येत नाही. कित्येक पक्षी प्राणी ह्या आवाजाने ह्दय विकाराचा झटका येवून मरतात. बहिरे होतात. गोंधळ उडाल्यामुळे गोल गोल फिरत राहतात.
पण as usual आपल्याला काय त्यांचं म्हणून कोणी लक्षदी देत नाही. आणि पोरांना जास्त फटाके दिले म्हणजे जास्त प्रेम आहे हा आई वडिलांचा गैरसमज.

पिशी अबोली's picture

7 Nov 2013 - 10:37 am | पिशी अबोली

खूपच घाबरुन जातात बिचारे...
आणि माणसांनाही त्रास होतोच. आमच्याकडे फटाक्यांच्या आवाजाने एका आजींचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. आणि हळूहळू खचत त्या गेल्या :(

प्रभाकर पेठकर's picture

7 Nov 2013 - 2:26 am | प्रभाकर पेठकर

हया वर्षी मुंबईत ध्वनी आणि वायू प्रदुषणाचे प्रमाण, मागिल कांही वर्षांच्या तुलनेत, कमी आहे. - दूरचित्रवाणीची बातमी.

सुहासदवन's picture

7 Nov 2013 - 9:09 am | सुहासदवन

मुंबईत ‘आवाज’ वाढला!

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/-/articleshow/...

प्रभाकर पेठकर's picture

7 Nov 2013 - 9:51 am | प्रभाकर पेठकर

माझा प्रतिसाद ह्या धाग्याशी सुसंगत दिवाळीच्या फटाक्यांच्या संदर्भात आहे.
इतर आवाजांसाठी वेगळा धागा काढा त्यावर भाष्य करीनच.
धन्यवाद.

ऋषिकेश's picture

7 Nov 2013 - 9:16 am | ऋषिकेश

माझ्यापुरते बोलायचे तर कळते पण वळत नाही!..
बाकी फटाके आणायचे केव्हाच थांबवले आहे मात्र आकाशात जाऊन तयार होणारी फुले आणि अग्नीबाण यांचे आकर्षण काही केल्या जात नाही :)

पिशी अबोली's picture

7 Nov 2013 - 10:34 am | पिशी अबोली

फटाके वाजवणे कधीच बंद केले आहे.
प्रदूषण, कुठेही, कोणतेही वाईटच. मग ते दिवाळीचे असो वा ३१ डिसेंबरचे...
आनंदाची गोष्ट म्हणाल तर गोड आवडणार्‍या माणसाला डायबिटीस झाला की कंट्रोल करावंच लागतं. पर्यावरणाचे एवढे प्रश्न असताना तोकडी स्पष्टीकरणे देऊन कसले साजरे करायचे आनंद? रोगाची पथ्यं कुणीतरी पाळली पाहिजेत ना?

गुलाम's picture

7 Nov 2013 - 2:05 pm | गुलाम

यावर्षी खरोखरच फटाके उडविण्याचे प्रमाण कमी झाले आहे असं दिसतंय. बेंगलोर मध्ये ३२ % (This Diwali saw a 32% dip in air pollution ) आणि पुण्यात सुमारे ६५% (फटाक्यांचा बार यंदा 'फुसकाच' - विक्रीमध्ये लक्षणीय घट ) घट झाली आहे.

अंनिस सारख्या सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांना अखेर यश येत आहे असे म्हणावे लागेल..