फटाकेमुक्त दिवाळी

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
26 Oct 2013 - 5:24 pm

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

7 Nov 2013 - 2:34 pm | ऋषिकेश

त्याचे कारण महागाई + लिक्विडीटीची कमी हे असावे

योगी९००'s picture

7 Nov 2013 - 3:37 pm | योगी९००

यावर्षी खरोखरच फटाके उडविण्याचे प्रमाण कमी झाले आहे असं दिसतंय.
महागाई हेच मुख्य कारण असे वाटते.. मी स्वतः १० वी नंतर कधीच फटाके वाजवले नाहीत. यावेळी मुलीने हट्ट केला म्ह्णून फटाके आणायला गेलो होतो. किंमतीबघून माझ्याच डोक्यात भरपूर फटाके वाजले. झाड (रु. १००), चक्र (रु १५०) वगैरे काय वाटेल त्या किंमती होत्या. बोरीवलीसारख्या ठिकाणी स्टॉलवर अत्यल्प गर्दी आणि विक्रेत्यांनी माल खपला जावा म्हणून केलेली अजीजी पाहून "फटाक्यांचे भवितव्य" लक्षात आले.

महागाईच्या निम्मित्ताने का होईना, यावेळी प्रदुषण कमी झाले म्हणायचे.

अवांतर :
बाकी संपुर्ण चातुर्मासात लक्ष्मीपुजन कसे करावे हे वाचत होतो. त्यात "लक्ष्मीचे पुजन झाल्यावर बाहेर जाऊन फटाके फोडावेत" या वाक्यामुळे जाम हसू आले. कदाचित एकाद्या चीनी माणसाने चातुर्मास लिहीले असावे...!!!

प्रकाश घाटपांडे's picture

7 Nov 2013 - 3:56 pm | प्रकाश घाटपांडे

महागाई या निमित्ताने फटाके उडवणार्‍यांचे प्रमाण कमी झाले ही असेल. पण काही वेळा पैसा आला कि त्यासोबत माज ही येतो. मग तो जिरवण्यासाठी महाग वस्तु घेउन त्याची चैन करणे ही संकल्पना येते. जेवढी म्हणुन वस्तु महाग तेवढे त्याचे माजमूल्य जास्त. शंभर रुपयाच्या नोटात तंबाखू भरुन त्याचा झुरका घेणार्‍या लोकांच्या कथा ऐकल्यात की नाहीत? कथेत पुढे याच लोकांचा दुर्दशेत शेवट होतो.

प्रभाकर पेठकर's picture

7 Nov 2013 - 4:40 pm | प्रभाकर पेठकर

महागाई ही काय आज एकदम सुरु झालेली नाही. गेली कित्येक वर्षे पाहात आहे. महागाई भडकली, महागाई भडकली असा टाहो फोडतही लोकं सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी सणासुदीला, लग्नसराईत, खास खास मुहूर्तांना सराफाच्या दुकानांत गर्दी करीतच असतात. '१९८० नंतर जन्मलेल्या पोरांचा सॉलीड लोचा' ह्या धाग्यावर तर तिशीतच गाडी/फ्लॅट घेऊन झाला आहे आणि आता काय करावे असा गहन प्रश्न आहे. लोकांच्या हातात भरपूर पैसा आहे (असावा). १० वर्षांपूर्वीचे उपहारगृहांचे दर आणि होणारी गर्दी आणि आजचे दर आणि होणारी गर्दी दोन सारखेच वाढलेले आहे. कपडेलत्ते, मोबाईल्सची महागडी मॉडेल्स, महागड्या मॉल संस्कृतीला आणि मल्टिप्लेक्सना गिर्‍हाईकांकडून मिळणारा वाढता पाठींबा पाहता फटाक्यांच्या विक्रीत आलेली घट महागाईमुळे नसावी असे वाटते.
आमची पिढी आता फटाके उडविण्याच्या वयाबाहेर आहे. तरूण पिढीत आमच्या पिढीइतके फटाक्यांचे आकर्षण उरलेले नाही. आमच्या काळात मनोरंजनाचे मार्ग मोजकेच होते त्यामुळे फटाक्यांमध्ये आनंद शोधला जायचा. हल्ली संगणक आणि मोबाईल गेम्स द्वारे तरूण पिढीला मनोरंजनाचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे फटाक्यांचे आकर्षण आहे, पण फार कमी आहे. बाल गोपाळांना शाळेतुन वगैरे ध्वनी आणि वायू प्रदुषणाची कारणे देत फटाके न उडविण्याच्या शपथाबिपथा देवविल्या गेल्या आहेत. ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून फटाक्यांचे प्रमाण घटलेले दिसत आहे.

अर्धवटराव's picture

9 Nov 2013 - 1:58 am | अर्धवटराव

शिवाय फोडाफोडीची हौस भागवायला मिपा(सारखे)संस्थळ देखील उपलब्ध आहे आज... मग कशाला कोणि उगाच फटाके विकत घेऊन फोडेल :)

प्रकाश घाटपांडे's picture

9 Nov 2013 - 8:53 am | प्रकाश घाटपांडे

सहमत आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Oct 2017 - 1:19 pm | प्रकाश घाटपांडे

या धाग्याला चार वर्षे झाली. या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शपथ दिली हे महत्वाचे आहे. अंनिस ने केलेल्या फटाके मुक्त दिवाली या आवाहनाला दर वर्षी प्रतिसाद वाढतो आहे.

नाखु's picture

21 Oct 2017 - 1:43 pm | नाखु

व्यक्तिगत दहा तरीही ती विनाफटाका दिवाळी साजरी करण्याची तयारी दाखवली आहे

तुलनेने कमी प्रमाणात फटाका वापर होतो आहे

२५ वर्षांमागे फटाका व्यवसाय केलेला पण गेल्या दहापंधरा वर्षांत फटाक्यांशी फटकुन राहिलेला नाखु

प्रकाश घाटपांडे's picture

10 Nov 2018 - 10:30 am | प्रकाश घाटपांडे

ज्या ज्या कुटुंबांनी स्वयंस्फूर्तीने आपली दिवाळी ही प्रदूषणमुक्त व पर्यावरण पुरक साजरी करुन देशाच्या प्रगतीत, वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यात हातभार लावला त्या सर्वांच अभिनंदन! ज्यांनी सर्वोच्च न्यायलयाच्या निकालाचा आदर राखून अंमलबजावणी केली त्यांचही अभिनंदन!

प्रकाश घाटपांडे's picture

27 Oct 2019 - 10:35 am | प्रकाश घाटपांडे

या धाग्याला ६ वर्शे झाली .या निमित्त आपल्यात काय काय बदल झाले याच आत्मपरिक्शन करता येईल.

फटाकेमुक्त दिवाळी अगदी लहान वयातच आत्मसात केली आहे. मुलालाही लहानपणापासूनच फटाके आवडत नाही.
मात्र देशात वितंडवाद वाढेल म्हणून कृपया राममंदिराचा विषय सोडून द्या / राम खरोखरच होता का ? होता तर देव होता का ? असले उपदेश कोणी करु नका प्लीज. त्यांना योग्य जागी फाट्यावर मारले जाईल.

प्रकाश घाटपांडे's picture

30 Oct 2019 - 11:50 am | प्रकाश घाटपांडे

राममंदीराचे कनेक्शन इथे कसे काय?

धर्मराजमुटके's picture

30 Oct 2019 - 6:20 pm | धर्मराजमुटके

राम १४ वर्षे वनवास भोगून परत आला तेव्हा दिवाळी साजरी केली जाते असे म्हणतात. आता दिवाळी संपली मात्र राममंदिराचा निकाल येणार आहे. तो संदर्भ पकडून विचारवंत कोठेही उपदेशामृत पाजू शकतात म्हणून हे क नेक्शन.
वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांनुसार मुंबईतील दिवाळी ही गेल्या १५ वर्षातील सर्वात शांत दिवाळी होती. तुमच्या शहराचे आकडे काय सांगताहेत ?

प्रकाश घाटपांडे's picture

13 Nov 2020 - 10:30 am | प्रकाश घाटपांडे

या धाग्याला आता ७ वर्शे झाली. यावरील प्रतिक्रियांचे आता पुनरावलोकन करा.कालसुसंगत होताना काहींना अतिशय त्रास झाला असेल. सगळेच लोक आपली सनातन मानसिकता वेगाने कशी बदलू शकतील हा प्रश्नही तितकाच रास्त आहे. सनातन प्रभात ने देखील सुरवातीपासून फटाक्यांना आपला विरोध दर्शवला आहे. कारण फटाके हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही. कारण काही असो पण अंनिस व सनातन वाले यांचे यावर एकमत आहे.

कोविडमुळे प्राणवायुचे महत्व या दीड दोन वर्षात लोकांना कळले असूनही वायु व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके वाजवले जातात? असा प्रश्न एका सहकार्‍याने विचारला आहे. गोष्ट खरी आहे. पर्यावरणाला निर्विवादपणे घातक असणारी गोष्ट आपल्याला समजत असूनही सुसंस्कृत समजणारे सुद्धा लोक फटाके का वाजवतात. प्राणवायुविना तडफडणारे मृत्यु आपण या काळात पाहिले आहेत, वाचले आहेत, ऐकले आहेत. आमच्या गृहसंकुलात देखील फटाके लक्ष्मीपूजनाला भरपुर उडवले. प्रबोधनाच्या तुलनेत फटाके उडवण्याची उर्मी ही जास्त असावी. फक्त निर्बुद्ध लोकच फटाके उडवतात या मताशी मी सहमत नाही.

धर्मराजमुटके's picture

5 Nov 2021 - 12:35 pm | धर्मराजमुटके

जग्गी वासुदेव यांनी फटाक्यांवर सरसकट बंदी असू नये असे प्रतिपादन केले आहे. मुलांपासून त्यांचा आनंद हिरावून घऊ नका. मुलांना दिवाळीत फटाके वाजवू द्या. त्या बदल्यात पालकांनी दोन-तीन दिवस ऑफीस ला जाताना वाहनांचा वापर करु नये आणि प्रदुषण टाळावे असे सांगीतले आहे. या बाबतीत आपले काय मत आहे ?

प्रकाश घाटपांडे's picture

5 Nov 2021 - 12:41 pm | प्रकाश घाटपांडे

जास्तीत जास्त प्रबोधन वारंवार करुन हे प्रमाण हळू हळू कमी करता येईल. फक्त निर्बुद्ध लोकच फटाके उडवतात या मताशी मी सहमत नाही. पण सुसंस्कृत लोक सुद्धा उडवताना दिसतात हे पाहून आश्चर्य वाटते हे मात्र खरे. असे का ? याचे विश्लेषण समाजमानसशास्त्रज्ञ चांगले करु शकतील

प्रकाश घाटपांडे's picture

5 Nov 2021 - 12:45 pm | प्रकाश घाटपांडे

फटाक्यामुळेच मुलांना आनंद होतो हे खरे नाही. ते कंडिशनिंग आहे. त्यांना पर्यावरणपुरक योग्य पर्याय दिले तर त्यात सुद्धा आनंद वाटेल उदा. फटाके नको विमाने उडवा हा उपक्रम पुण्यात स्वप्नशिल्प सोसायटीत राबवला आहे. बातमी https://policenama.com/pune-news-dont-firecrackers-fly-planes-a-unique-i...

बोलघेवडा's picture

5 Nov 2021 - 1:16 pm | बोलघेवडा

एक ठराविक धर्मातील चाली रितींवरच सतत हल्ले करून प्रबोधनाचा जो खोटा आव इतकी वर्षे आणला जात होता तो आता उघड पडत आहे.

त्यामुळे डबल ग्रॅज्युअट असून सुद्धा यावेळेला:

1. तब्येतीला हानिकारक असला तरी भरपूर तेलकट फराळ बनवला आणि खाल्ला.
2. देवाला काहीही नको असले तरी मंदिरात जाऊन देणगी आणि अभिषेक केला.
3. माती खणून काढल्यामुळे वनस्पती आणि सरपटणाऱ्या प्राणी चे नुकसान झाले तरी मोठ्ठा किल्ला केला.
4. आणि भरपूर फटाके आणले आणि उडवले.

श्रीगुरुजी's picture

5 Nov 2021 - 2:55 pm | श्रीगुरुजी

खालील लेखन कायप्पावर आले. ते वाचून हतबुद्ध झालो.

----------------------------------

आपले ते पुर्वज ज्यांना रीतसर अग्नी मिळाला नाही - त्यांना तो मिळावा म्हणुन अश्विन अमावास्येला “उल्कादान” नावाचा विधी करतात. काठीवर / लाकडावर / एखाद्या यष्टीवर ज्वालाग्राही पदार्थाचे (जसे तेल, कापूर, लाख, तूप इत्यादी) लेपन करून तो सामंत्रित पेटवतात. आणि पेटून निखारे वर जाणाऱ्या त्या जळत्या काठी/काठ्यांना मंत्र म्हणतांना पुरोहितास दान करतात. या प्रकाशाद्वारे आपण आपल्या अश्या पूर्वजांना मार्ग दाखवतो - ही मान्यता आहे.

अश्विन अमावास्या = लक्ष्मीपूजन = दिवाळी

फुलबाज्या, पाऊस, रॅाकेट वगैरे आगीला “वर” घेऊन जाणाऱ्या गोष्टी या उल्काच आहेत. या तिथीला (दिवाळीला) अग्नी पेटवून आपण आपल्याच पूर्वजांना अग्नी देत असतो. तस्मात् दिवाळीत फटाके (विशेषत: प्रकाशाचे) आवर्जुन फोडावेत. आपण दिवाळीलाच फटाके का फोडतो, दसऱ्याला किंवा राखीपौर्णिमेला का नाही - याचे पण हेच उत्तर आहे.

उल्कादानातील उल्का ही प्रकाशासाठी असते. आम्ही प्रकाशाचे फटाके पितरांना सद्गतीचा मार्ग दाखवण्यासाठी पेटवत असतो. सुतळीबॅाम्ब आम्ही आधी मजा म्हणुन फोडायचो. ते फोडणे कमी केले होते. पण मध्यंतरी फुरोगामी लय माजले आहेत - तर आता आम्ही आवाजी फटाके त्या कारणास्तव फोडतो.आवाजी फटाक्यांचा धर्माशी संबंध नाही - फुरोगाम्यांची जाळणे - हा एकमात्र उद्देश.

---------------------------

यावर मी दिलेले उत्तर -

"चमनचिडी, नागगोळी वगैरे सुद्धा उल्काच असतात का? रॉकेट, फुलबाज्या वगैरे पेटविताना मंत्र म्हणून पुरोहितांना दान दिले नाही तर पूवजांना अग्नी कसा मिळणार?

मुळात माणसाचा मृत्यू झाल्यानंतरचे सर्व विधी मला निरर्थक वाटतात. पार्थिव दहनापूर्वीचे विधी, दहावा-तेराव्या दिवसाचे विधी, कावळा शिवणे, वर्षश्राद्ध यात मला स्वत:ला काहीही अर्थ वाटत नाही. मृतदेहाचे शक्य तितके चांगले अवयव नातेवाईकांनी दान करून मृतदेह नंतर एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयाला द्यावा असे मला वाटते."

------------------------------

भरपूर फटाके उडवा, फटाक्यांपेक्षा जास्त प्रदूषण वाहनांमुळे होते . . . असे सांगणारे संदेश यावर्षी कायप्पावर येत आहेत.

श्रीगुरुजी's picture

5 Nov 2021 - 2:59 pm | श्रीगुरुजी

फटाके वाजवा असे आवाहन करणाऱ्या संदेशांना मी कायप्पावर दिलेले उत्तर -

------------------------------

- फटाक्यांमुळे अतिप्रचंड हवाप्रदूषण व ध्वनिप्रदूषण होते.

- प्रचंड कचरा निर्माण होतो.

- फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी आग लागून मालमत्तेचे मोठे नुकसान होते.

- फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत अनेकांचे प्राण जातात.

- फटाके बालकामगारांकडून बनवून घेतात. वीज, पंखा नसलेल्या अत्यंत भीषण परिस्थितीत ही मुले काम करतात. यातून मुलांना लहान वयातच श्वसनाचे रोग जडतात. फटाक्यांच्या कारखान्याला आग लागून काम करणाऱ्या अनेक मुलांचे प्राण जातात.

फटाके हा सर्व दृष्टीने अत्यंत घातक व उपद्रवी प्रकार आहे. फटाक्यांवर संपूर्ण बहिष्कार टाका आणि पर्यावरणहानी, वित्तहानी व मनुष्यहानी थांबवा.

यावेळी अनेक वर्षांनी मी फटाके वाजवले ! माझ्या लेकीने फटाक्यांसाठी माझ्याकडे आग्रह धरला, मग मी तिला म्हंटले की बघ मी तुला २ पर्याय देतो. इतक्या रुपयाची मिठाई किंवा त्याच किंमतीचे फटाके, तुला कोणता पर्याय हवा ? माझ्या या प्रश्नाला तिने, बाबा तुम्ही तुमच्या लहानपणी फटाके वाजवले नाहीत का ? असा प्रतीप्रश्न करुन मला क्षणात निरुत्तर केले ! :)
मी फटाके घेतले पण त्यात एक चालाखी केली, २ बॉक्स सुतळी बाँम्ब घेतले [ माझे प्रिय ] आणि पहिला सुतळी बॉम्ब तिलाच पेटायला लावला. :) मोठ्ठा आवाज झाला आणि कंपने निर्माण झाली की आजुबाजुला पार्क केलेल्या गाड्या ट्याव ट्याव आवाज करु लागल्या. तिने या आवाजाची दहशत घेतली आणि बाकीचे बॉम्ब उडवण्यास नकार दिला. मग संध्याकाळी तिला, पाऊस आणि जमीनचक्र फुलबाज्या इ. दिले. याच बरोबर काही आपटीबार देखील दिले. हे मात्र तिला आवडले, आवाजाची दहशत बसल्यानेच पुढच्यावेळी फटाक्याची मागणी कमी होते का ? ते आता पहायचे. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सीख नहीं पा रहा हूँ मीठे झूठ बोलने का हुनर,कड़वे सच से हमसे न जाने कितने लोग रूठ गये।