"हा पावसाळा नकोसा वाटतो, राव. एकतर आपलं जिणं असं रस्त्यावरचं. त्यात ह्याचा कहर. निवारा मिळायची मारामार, '' टॉम्यानं शेरूला दु:ख बोलून दाखवलं.
"का रे कालपर्यंत त्या पारिजात सोसायटीत राहात होता ना? '' शेरूनं विचारलं.
"हो. मी आणि तांबडी सुखात नांदत होतो तिथं. दिवसभर इकडं तिकडं हुंगायचं न् रातच्याला तिथं पोट टेकायचं. चांगलं चाललं होतं. लोकही चांगले आहेत तिथले. एवढे दिवस आम्ही राह्यलो; पण कधी कुणी हाड म्हणून हुसकलं नाही. पण त्या काळ्याची नजर फिरली, नि बिघडलं बघ सगळं, '' टॉम्यानं सदगतित होऊन सांगितलं.
"अस्सा राग येतो शेरू, त्या काळ्याचा काय सांगू... परवा संध्याकाळी तांबडी माझ्या आधीच तिथं जाऊन टेकली होती. बराच वेळ माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली होती बिचारी. तिच्या ओढीनं मीही अगदी खुशीत गेलो शेपटी हलवीत. सोसायटीत शिरणार तोच काळ्यानं झेप घेऊन रस्त्याच अडवला. मला काहीच कळेना. भो-भो करीत त्यानं इथं नोएंट्रीचा इशारा दिला. मी पण कसलाये. भो-भो भुंकून ठणकावलं, तर केवढा राग आला त्याला. मागचा पुढचा विचार न करताच चालून आला माझ्यावर लेकाचा. त्यानं मला दोनदा खाली पाडल्यावर मीही एकदा त्याला पाडलं. आमचं जोरजोरात केकाटणं ऐकून सोसायटीतली चार माणसं बाहेर आली. तसा काळ्याला आणखी जोर चढला. दात विचकच, गुरगुरत आला पुन्हा माझ्या अंगावर. मी विचार केला कशाला भांडणं? एकटा असतो तर दाखविला असता इंगा. पण आपल्याबरोबर तांबडी आहे. तिचा विचार करून मीच नमतं घेतलं आणि क्यॅव... क्यॅव करीत पळ काढला. ''
"मग? '' शेरूनं औत्सुक्यानं विचारलं.
"मग काय... दुसऱ्या सोसायटीच्या भिंतीआड जाऊन बसलो थोडावेळ. पण चैन पडेना. तांबडीलाही अशीच हाकलून देईल तो काळा कुत्रा. या विचारानं मन सैरभैर झालं. लांबूनच मी अंदाज घेतला, तर तांबडी तिथंच होती. तिला पाहण्यासाठी हिम्मत करून पुन्हा पुढं आलो, तर काय... समोरचं दृश्य बघून माझं काळीज फाटलं. ''
टॉम्याची आपबिती ऐकून शेरूनं कान टवकारले. आतापर्यंत पुढचे पाय ताठ करून बसलेल्या शेरूनं पाय दुमडून सगळं शरीर जमिनीला टेकवलं आणि म्हणाला,
"तांबडीलाही फटकारलं का काळ्यानं? ''
"नाही रे बाबा. आमचं भांडण संपल्यानंतर सोसायटीतल्या लोकांनी आपापलं घर गाठलं नि या काळ्याचं फावलं. मी पुढं होऊन पाह्यलं तर हा तांबडीजवळ बसून तिला हुंगत होता. आणि ती... तीसुद्धा निपचित पडून होती शेरू. '' टॉम्याच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या. त्याचं रडणं पाहून शेरूलाही गहिवर आला. त्यानं टॉम्याला थोपटत धीर देण्याचा प्रयत्न केला,
"अरे असा लगेच का संशय घेतला तिच्यावर? एवढे दिवस तुम्ही बरोबर राहताय. ती असा धोका देणार नाही तुला. पोट टेकायला जागा मिळतेय म्हणून केला नसेल तिनं प्रतिकार. त्यात काय एवढं? ''
"मीपण तोच विचार केला होता शेरू. पण काय... ''
"पण काय? '' शेरूनं गंभीरपणे विचारलं.
"दुसऱ्या दिवशी दिवसभर तांबडीचा शोध घेत होतो. पण सापडत नव्हती. त्यामुळं माझं मनही कशात लागत नव्हतं. तिला शोधून शोधून थकलो आणि पुढच्या विसोबा चौकातील पाराजवळ विसावलो. तांबडीच्या काळजीनं जीव कासावीस झाला होता. कुठे असेल तांबडी, काय करीत असेल... तिनं काही खाल्लं असेल का, तिला काही झालं तर नसेल ना, असे विचार मनात येत असतानाच समोरच्या कचरा कुंडीत तांबडी नजरं पडली. कचऱ्यात काहीतरी खायला शोधत असावी. तिला पाहून माझ्या जिवात जीव आला. आनंद गगनात मावेनासा झाला. तिला कुशीत घेऊन गोंजाराव म्हणून पळतच तिच्याजवळ गेलो. मला पाहताच तिनं न पाहिलं करून तोड फिरवलं आणि कचरा धुंडाळत बसली. मी आपलं जाऊन तिला गोंजारायला सुरवात केली. तशी वस्सकन माझ्या अंगावर भुंकली.''
"असला चावटपणा चालणार नाही मला यापुढं. लोकं पाहतात ना, लाज आहे की नाही जरा? ''
"तिनं असं म्हटल्यावर मी काय बोलणार? काल परवापर्यंत तिला माझा हा "चावट'पणा हवा हवासा वाटत होता. पण आजच तिचा तोरा एकदम का बदलला हे तत्क्षणी माझ्या लक्षात आलं शेरू. तरीही मी संयम बाळगला. म्हटलं मूड नसेल बिचारीचा म्हणून मागं फिरलो आणि पुन्हा पाराजवळ येऊन विसावलो. बऱ्यापैकी अंधारून आलं होतं तेव्हा. ''
"मी पाठ करताच तांबडी तेथून गायब झाली तेव्हा मी बिथरलो. तिचा माग काढत काढत पारिजात सोसायटीजवळ आलो. आता शिरलो तर पुन्हा भांडणं होतील, म्हणून हळूच कंपाउंड वॉलवर उडी मारली. अंधार असल्यानं फारसं दिसतही नव्हतं. पाण्याच्या टाकीच्या कोपऱ्यातून आवाज मात्र येत होता. नीट निरखून बघितलं तर तांबडी काळ्याच्या कुशीत निर्लज्जपणे विसावली होती. ते पाहून मी अक्षरक्ष: गलितगात्र झालो. माझ्या अंगात त्राण राहिला नाही. भिंतीवरून माझा तोल गेला. मी खाली पडलो. मला उठताच येत नव्हतं. वाटलं, हे पाहण्याआधी मरण द्यायला हवं होतं देवानं... काहीकाळ तसाच निपचित पडून राहिलो. तर ह्यांचे अचकट विचकट आवाज यायला लागले. सहन होईना म्हणून बळंच शेजारच्या नीलांबरी सोसायटीत गेलो. खाली अंग टाकणार, तोच पेकाटात लाथ बसली. जिवाच्या आंकातानं केकाटलो. मागे वळून कोण आहे पाह्यलं, तर एक माणूस दगड उचलत होता. माझ्या डोळ्यासमोर तारे चमकले. म्हटलं याचा टोला बसला, तर जीवच जाणार. पायात जीव एकवटवला आणि केकाटतच तेथून धूम ठोकली. ''
"पुन्हा विसोबा चौकातल्या पाराजवळ येऊन बसलो. आपलेच आपल्याला दगा देतात, तिथं माणसांना बिचाऱ्यांना काय दोष देणार. ते आपला दुस्वास करण्यासाठीच आहेत. आता आपल्या आयुष्यात काही "मार्तंड' उरला नाही, असा विचार करून स्वतःला संपवून टाकायचं ठरवलं आणि रेल्वे स्टेशनची वाट धरली. ''
-क्रमश:
प्रतिक्रिया
20 Sep 2008 - 7:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्याच्या प्रेमभंगाचे वर्णन मात्र मस्त केलंय, अगदी गल्ल्या-गल्ल्यातले कुत्रे डोळ्यासमोर आलेत. इतक्या दिवस भंगलेल्या प्रेमाविषयी माणसं मनोगतं लिहित होती. आता कुत्र्यांची मनोगते यायला लागली आणि ती सुद्धा क्रमश :
शाब्बास ! लगे रहो. :)
आपल्या आयुष्यात काही "मार्तंड' उरला नाही.
स्सही !!!
-सॆन्डी

(टॊम्या,शेरु, तांबडीचा मित्र )
20 Sep 2008 - 7:24 pm | मदनबाण
अरे छंडू..जबरा लिवलस की तु !!
मदनबाण>>>>>
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
21 Sep 2008 - 3:53 am | फटू
कोण म्हणतं मुक्या जनावरांना कुणी वाली उरला नाही (हघ्या !!!)
आपल्या आयुष्यात काही "मार्तंड' उरला नाही
हे तर भारीच...
(जाता जाता : झंडू बाम, हाच माल तुम्ही इतरत्र कुठे दुस-या ब्रँडखाली विकलाय का हो :D )
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
21 Sep 2008 - 5:54 pm | झंडू बाम
कथेवर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
पुढ्चाही भाग आवश्य वाचा.
आपला,
झंडू बाम
21 Sep 2008 - 9:06 pm | सखाराम_गटणे™
कथा चांगली आहे.
ही सत्यकथा आहे का?
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.
22 Sep 2008 - 11:18 am | घाशीराम कोतवाल १.२
काय राव काय झकास लिवलय तुमी? कुत्राचा प्रेम भन्ग
22 Sep 2008 - 11:28 am | अनिल हटेला
हा हा हा !!!
सहीच !!!!
झंडू बाम राव ,
मस्तच आहे कि प्रेम भंग आणी
कुत्र्या ची लव स्टोरी.....
येउ देत पूढला भाग पन ....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
22 Sep 2008 - 11:28 am | सखाराम_गटणे™
षेवटी त्या कुत्र्याला हवी ती कुत्री मिळते हे दाखवा हो.
---
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.
22 Sep 2008 - 11:43 am | आनंदयात्री
छान लिहलेय झंडु राव, लेखन प्रतिभावान आहे.
पुढील भाग येउ द्या.
*संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*
22 Sep 2008 - 11:45 am | अनिल हटेला
गटणे साहेब !!
तुम्ही नेमक काय वापरता नाडी की इलास्टीक ?
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
22 Sep 2008 - 11:45 am | अनिल हटेला
गटणे साहेब !!
तुम्ही नेमक काय वापरता नाडी की इलास्टीक ?
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..