मला आवडलेले पुस्तक हा धागा प्रतिसादानी ओसंडुन भरुन वाहु लागल्यामुळे नवा धागा सुरु करत आहे
कृपया एका प्रतिसादात एकाच पुस्तकाचा उल्लेख करावा
एका पुस्तकावर जास्त सदस्य प्रतिसाद देऊ शकतात
प्रतिसाद देताना ते पुस्तक तुम्हाला का आवडले/ त्यात वाचनीय काय आहे ते लिहावे ही विनन्ती
मिपाकरांना भेटल्यानन्तर एक गोष्ट प्रकार्षाने जाणवते की ही सर्व मंडळी वाचनप्रिय आहेत.
पुलंची पुस्तके त्याना पाठ आहेत.
त्या व्यतीरीक्तही बरेच वाचन करणारी मंडळी आहेत. कोठेही असली तरी प्रसंगी अखंडीत वाचीत जावे हे ब्रीद आपण सारेच पाळत असतो.
चला मग आपण आपल्याला आवडलेली पुस्तके शेअर करुयात. जमले तर मुम्बै/पुण्यात एखादा पुस्तक कट्टा / शेअर लायब्ररी सुरु करुया.
निदान सुरुवात तरी करुया
चाकोरी बाहेरची पुस्तके या नन्तर एक नवा धागा मला आवडलेले पुस्तक / ते का आवडले तेही साम्गायचे आहे.
एका प्रतिसादात केवळ एकाच पुस्तकाचा उल्लेख करावा म्हणजे त्या पुस्तकात काय आवडले हे सांगता येईल
तोत्तोचानः अनु चेतना गोसावी
एका लहान मुलीची कथा
लहान मुलाना एक व्यक्ती म्हणुन वागणुक द्यायला हवी .
मुलाना घालुन पाडुन बोलण्यापेक्षा " तू खरोखर एक चांगली मुलगी आहेस" हे वाक्य त्या मुलीच्या मनात एक आत्मविष्वास जागवते.
शाळेने नाकारलेले हायपर ऍक्टीव्ह मुलगी आणि तिच्या नव्या शाळेतली तिच्या सारखीच मुले
त्यांच्या शाळेतले वातावरण. युद्धावेळचे वातावरण त्याचा लहान मुलांवर होणारा परिणाम या सर्वांचे
वर्णन.
केवळ मनोरंजन न होता मुलांच्या जगात डोकावयाचे संधी देणारे पुस्तक.
"तारे जमीन पर" पहाताना मला या पुस्तकाची आठवण होत होती .
संग्रही असावेच असे पुस्तक.
प्रतिक्रिया
28 Aug 2008 - 11:53 am | शिप्रा
एक होता कार्व्हर
अनुवाद :- वीणा गव्हाणकर..
हयामध्ये जॉर्ज कार्व्हर ह्या अमेरिकेतिल निग्रो शास्त्रज्ञाच्या जिद्दिचि कथा आहे.. खुप काहि शिकण्यासार्खे आहे असे वाटले ...वाचायला सुरवात केलि आणि पुर्ण करुनच उटले..
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
28 Aug 2008 - 12:01 pm | विजुभाऊ
कार्व्हर म्हणतो
जेथे असाल तेथुन , तुमच्याकडे जे आहे ते घेउन सुरुवात करा
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
29 Aug 2008 - 4:59 am | विकास
कार्व्हर म्हणतो
जेथे असाल तेथुन , तुमच्याकडे जे आहे ते घेउन सुरुवात करा
Start where you are, with what you have, make something of it, never be satisfied.
शाळेत असताना एकदा माझ्याकडून ही वाक्ये कार्व्हर म्हणून एका कार्यक्रमात म्हणून घेतल्याचे आजही स्मरते :-)
28 Aug 2008 - 6:10 pm | टारझन
लेखक माहित नाही (बहुदा सुहास शिरवाडकर) पण "दुनियादारी" एक महान महान महान कादंबरी आहे,
१५ तास सलग बसून पुस्तक एका झटक्यात खाउन टाकलं .. जोष, रोमांच , करूणा, राग , मस्ती , आणि श्रुंगार .. सगळी भेळ एकदम ..
आणि क्लायमॅक्स असला खतरा की ४ दिवस माणूस जेऊच नये .. जबराट ... शिरीन बर तर आपण फिदाच ...
आपल्या मनातली स्वप्नकंन्या उभी राहते अशी शिरीन .. दिग्याचा आडदांड पणा .. जोश्याच्या बेन्याच्या अफलातुन क्लुप्त्या .. आणि पेरियोडिकली आपली दु:खांच्या जखमेची धपली काढणारे एम.के.श्रोत्री ....
पुण्याला गेल्यावर पहिलं काम.. "दुनियादारी"च पु:नश्च पारायण ...
दुनियादारीच्या लेखकाला मंतरलेले १५ तास दिल्याबद्दल लाख लाख आभार .. मला त्यांचा आदर बाटतो हे वे.सां.न.ल.
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
29 Aug 2008 - 2:21 am | संदीप चित्रे
टारझन...
आपली-तुपली आवड समान -- दुनियादारी !
मी ब्लॉगवर लिहिलेला हा लेख बघ :)
http://atakmatak.blogspot.com/2007/11/blog-post.html
29 Aug 2008 - 2:06 pm | भडकमकर मास्तर
सुहास शिरवाडकर
शिरवळकर ना रे ...
" नावाने आपल्याला काही फरक पडत नाही, ष्टोरी महत्त्वाची ..."असा एक रिस्पॉन्स देणार टार्या आता....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
21 Oct 2013 - 12:30 pm | जयदिप नाईक
मी दुनियादारी सतत ६ वर्ष्या झ्हाली वाचातोय जेव्हा आठवण येईल तेव्हा
28 Aug 2008 - 11:53 am | विजुभाऊ
मागील दुवा http://www.misalpav.com/node/3247
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
28 Aug 2008 - 12:57 pm | नंदन
उत्तम धागा सुरु केल्याबद्दल अभिनंदन, विजुभाऊ. आवडणार्या पुस्तकांतून एकाच पुस्तकाबद्दल लिहायचे म्हणजे कठीण काम आहे, तेव्हा नुकतेच वाचलेल्या आणि आवडलेल्या एका पुस्तकाबद्दल लिहितो.
टोनी मॉरिसन ह्या नोबेल पुरस्कारप्राप्त कृष्णवर्णीय लेखिकेची 'बिलव्हेड' ही कादंबरी. गुलामगिरीतून निसटून नवीन आयुष्य सुरू करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सेथ ह्या स्त्रीची कथा. आता गुलामी, पददलित वर्ग, कृष्णवर्णीय यांच्याबद्दलची कादंबरी म्हटली की अन्यायाचा पाढा वाचणारी, त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी मुख्य व्यक्तिरेखेने कशी धडपड केली किंवा जशी परिस्थिती आहे, तशी निमूटपणे कशी स्वीकारली इ. ढोबळ, नेहमीच्या यशस्वी कथानकांच्या साच्यात ही कादंबरी बसत नाही.
एक व्यक्ती आणि अबोध वयातील मुलीला वाढवणारी एकटी आई हा सेथचा पैलू प्रथम समोर येतो. अर्थात, गुलामीतून ती नुकतीच सुटून आली असल्याने त्याचे संदर्भ येत राहतातच. पण ते अगदी छोट्या, छोट्या जीवघेण्या वाक्यांतून. गुलामगिरीबद्दल बरेच काही लिहिले गेले असले तरी स्त्रियांच्या झालेल्या हिंसक शारीरिक शोषणाबद्दल विशेष काही लिहिले गेले नव्हते. फ्लॅशबॅकसदृश्य संवादांच्या तंत्रातून त्याचे उल्लेख मग हळूहळू येत राहतात. काहीशा त्रयस्थ पण पूर्णत: अलिप्त नाही अशा संयत पण परिणामकारक भाषाशैलीत. (लताबाईंची दु:खी गाणी जशी ओथंबून न जाता, संयत स्वरांत त्यांचा परिणाम साधतात तशी 'शुभ्र काही जीवघेणे' शैली) गुलामीतून सुटले तरी स्वतंत्र जीवन जगण्यासाठी जी ताकद, जी मूल्ये लागतात; तीच या पहिल्या पिढीत कोळपून गेली होती - आणि त्यामुळे जो गोंधळलेपणा आला त्याचंही चित्रण या कादंबरीत येतं.
आईनेच पोटच्या पोरीचा जीव घ्यावा अशी आलेली परिस्थिती. त्यातून आलेला अपराधीपणा आणि दहा-पंधरा वर्षांनी तिच्याच नावाची (बिलव्हेड), तिच्याच ठेवणीची मुलगी घरी परतल्यावर सेथला आणि तिच्या मुलीला झालेला आनंद. अतींद्रिय शक्ती आहे की जवळच्या एका गावातून अत्याचारांना कंटाळून पळून आलेली मुलगी याचं गूढ. तिच्या परतण्याने सेथच्या अपराधीपणाला मिळालेलं खतपाणी आणि त्याची भरपाई करण्यासाठी स्वतःची, घरादाराची राखरांगोळी झाली तरी तमा न बाळगणारं तिचं मातृत्व. धाकट्या डेनव्हरच्या जन्माची कहाणी. कुमार वयात आलेल्या, घरात एकटी पडलेल्या मुलीचं कुढणं आणि बिलव्हेड आल्यावर तिला हक्काची मैत्रीण, बहीण मिळाल्याचा झालेला आनंद. फक्त तीन-एकशे पानात अतिशय प्रभावीपणे ह्या सार्या थीम्स ही कादंबरी सामावून घेते.
सेथच्या आयुष्यापासून ते एकंदरीत गुलामगिरीपर्यंत, भोवतालच्या निसर्गाच्या वर्णनांपासून अमानवी शक्तींपर्यंत, नृशंस क्रौर्यापासून ते अपरंपार, सर्वस्व ओवाळून टाकणार्या प्रेमापर्यंत - अशा वैयक्तिक-वैश्विक, मानवी-अमानवी, माणसाच्या भावनांचं एक टोक ते दुसरं टोक अशा थीम्स या कादंबरीत सहजपणे, (मुद्दाम परस्परविरोधी गोष्टींची सांगड घातली गेली पाहिजे ह्या) अभिनिवेशाशिवाय येतात, हे कादंबरीच्या वाचनीयतेचं आणि लोकप्रियतेचं मुख्य कारण असावं.
टीप - ज्या मार्गरेट गार्नरवर सेथची व्यक्तिरेखा बेतली आहे, तिच्याबद्दल अधिक माहिती येथे वाचता येईल.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
28 Aug 2008 - 2:03 pm | ऋषिकेश
अपेक्षेप्रमाणे उत्तम विस्तृत प्रतिसाद :)
तुमच्या प्रतिसादाची उत्सुकतेपोटी वाटच पाहत होतो.. ही कादंबरी वाचली नाहि पण आता वाचेन. तुझे मराठी आवडते पुस्तक?
(बाकी कर्णाने आणि धनंजयने सर्वात आवडते पुस्तक सांगितले का?)
स्वगतः स्वतः सांग आधी मग चौकशा कर
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
28 Aug 2008 - 5:57 pm | मेघना भुस्कुटे
धन्यवाद गुरू!
29 Aug 2008 - 2:49 am | धनंजय
टोनी मॉरिसन यांची "साँग ऑफ सॉलोमन" ही मला फार आवडली. बिलव्हेड ही वाचायला घेतली पाहिजे आता.
28 Aug 2008 - 5:12 pm | लिखाळ
नमस्कार !
मला अनेक पुस्तके आवडली आहेत. त्यांबद्दल सवडिने लिहिनच..पण..पण
मी ४थी इयत्तेत असताना आम्हाला असलेले इतिहासाचे पाठ्यपुस्तक मला फार आवडायचे.
त्यात पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास होता. मी तेव्हा सातारच्या एका शाळेत शिकायचो. तो जुना वाडा होता. शिसवी तुळया, लिंपलेल्या भींती महिरपी आकाराच्या खिडक्या इत्यादी. एकदम शिवकाळात गेल्यासारखेच वाटायचे. आसपास सज्जनगड, अजिंक्यतारा वाहवा ! समर्थ, शिवाजी यांनी भारलेले वातावरण आणि त्यात शिवाजीचाच इतिहास पुस्तकात. मी त्यात फार रमुन जायचो.
(पुस्तकाच्या शेवटी असलेले जींजीवर स्वारी, सागरी किल्ले ही प्रकरणे मात्र फारशी आवडायची नाहित. कारण त्या वातावरणाशी कधी ओळख झाली नव्हती.)
-- (मावळा) लिखाळ.
28 Aug 2008 - 5:15 pm | विजुभाऊ
सिद्ध योगी : डॉ निषिकान्त श्रोत्री
लोम्ब्संग राम्पा च्या थर्ड आय
डॉक्टर फ्रॉम तिबेट
आणि स्टोरी ऑफ अ लामा
या तीन अद्भूत पुस्तकांचा समग्र सारांश
पुस्तकात अनेक चमत्कार आहेत
एक लामा जो उत्तम ऑटोमोबाईल इन्जीनीअर आहे. पायलट आहे सर्जन आहे
आणि लामा ही आहे
त्याच्या गुरुनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन दिव्य दृष्टी दिली ( तिसरा डोळा) ज्या योगे तो मॅग्नेटीक फिल्ड सुद्धा डोळ्यानी पाहु शकायचा. असे अनेक प्रसंग यात आहेत
त्याने देहांतर ही केले होते असे पुस्तकात आहे.
यातील माहिती खरी / खोटी हे ईंग्रजीतही वादग्रस्त आहे
तरीपण एक वेगळे लिखाण म्हणुन वाचनीय आहे
अधीक माहिती http://www.lobsangrampa.net/lobsang_rampa.html
आणि इथे उपलब्ध http://www.lobsangrampa.net/rampa_books/thirdeye.doc
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
28 Aug 2008 - 7:13 pm | दत्ता काळे
रारंगढांग - क्याप्टन पेंढारकर
दि चीपर बाय डझन - मूळ ले. . . . . गिल्बर्थ- अनुवादित - मंगला निरगुडकर
29 Aug 2008 - 9:39 am | विजुभाऊ
चीपर बाय डझन : मूळ लेखक फ्रॅन्क बंकर गिल्ब्रेथ आणि ऍन गिल्ब्रेथ
या पुस्तकाचा पुढचा भाग "बेलीज ऑन देअर टोज"
यात त्या १२ मुलांच्या आईने मुलांच्या वडिलांच्या पश्चात १२ मुलांचा सांभाळ कसा केला. एक स्त्री म्हणुन तीला व्ययसाय करताना आलेल्या अडचणी याबद्दल लिहिलेले आहे
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
28 Aug 2008 - 7:44 pm | जनोबा रेगे
आमची आवडती पुस्तके-
रुस्तूमची विजार
हास गे ग॑गू
तुटलेली नाडी
शरदकुमार नावाचा बोका
फोर्ट केम बट लायन वेन्ट
रक्ताची गुळणी
उ॑बरवाडीचा उमाजी
28 Aug 2008 - 8:16 pm | लिखाळ
मिपावर अधुनमधुन खलिल जिब्रानचा उल्लेख होत असतो. त्यावरुन आठवले म्हणून लिहितो.
वि स खांडेकरांनी अनुवाद केलेले जिब्रानचे वेचे 'सुवर्णकण' या नावाच्या पुस्तकात आहेत. पुस्तक चांगले आहे. ते अनुवाद काहिंना आवडतात काहिंना नाही. पण जिब्रानची मराठिमधून ओळख होते ते उत्तमच आहे.
पुणे मराठी ग्रंथालयातून मी हे छोटे पुस्तक आणुन वाचले होते.
आपल्याला जिब्रानबद्दल मराठीमध्ये उपल्ब्ध साहित्य माहित असल्यास कृपया सांगावे.
-- (मित्र) लिखाळ.
29 Aug 2008 - 2:06 pm | रामदास
कालच मला खलील जिब्रानचं प्रॉफेट नावाचं पुस्तक कोकणीत मिळालं. बा.भ. बोरकारांनी भाषांतर केलं आहे. १९७३ साली जाग प्रकाशनाने आनलेले हे पुस्तक चार रुपये छापील किमतीचं होतं.
पादगावकरांचे भटके पक्षी आणि प्रॉफेट एकूण खरेदी रुपये वीस फक्त.
29 Aug 2008 - 2:41 am | धनंजय
माझे "ऑल टाइम फेव्हरिट" लहानपणापासून आतापर्यंत - लुइस कॅरॉलचे "थ्रू द लुकिंग ग्लास" ("आरशातून पार जाता" या अर्थी). लहान मुलामुलींना आवडेल, कल्पनाविलासी, शब्दांशी स्वच्छंद बागडत खेळ करणारे, पण तितकेच तर्कशुद्ध, मोठ्यांनाही आवडेल, असे हे पुस्तक आहे. ("ऍलिस इन वंडरलँड"चा हा पुढचा भाग आहे.)
"निरर्थक" शब्दांशी खेळून तरी काही धूसर चित्र डोळ्यासमोर उभे राहाते, अशी एक कविता त्यात प्रसिद्ध आहे.
'Twas brillig and the slithy toves
Did gyre and gimble in the wabe
All mimsy were the borogoves
And the mome raths outgrabe.
अनुवाद तर करूच शकत नाही - शब्द निरर्थक आहेत - पण अर्थपूर्ण असल्याचा भास होतो.
भंपक सल्लाबाजीच्या कवितांची विडंबने उच्च प्रतीची आहेत. पण ही विडंबने केवळ "ट ला ट री ला री" नसून त्या भंपकपणाविरुद्ध खरीखरची टीका आहे.
इसाक वॉट्स याच्या "How doth the little busy bee" या "आळस नका करू, कामाला लागा" कवितेचे (ऍलिस इन वंडरलँड मधले) "How doth the little crocodile" हे विडंबन त्या मूळ प्रचारकी कवितेपेक्षा आता अधिक प्रसिद्ध आहे. असेच "पांढर्या शिलेदाराचे गाणे" थ्रू द लुकिंग ग्लासमध्ये आहेत. (वरील एक-दोन कडव्यांच्या कविता चुटकीसरशी वाचून होतील म्हणून त्यांचे दुवे दिले आहेत.)
अनेक तर्कदुष्ट आणि तर्कशुद्ध युक्तिवादांची भन्नाट आणि विनोदी उदाहरणे कथाप्रसंगांत आलेली आहेत. हे विनोदी संवाद या प्रतिभावंत गणितज्ञ-साहित्यिकालाच स्फुरोत. यातून हसत-अक्षरशः-खिदळत जर तर्कशास्त्राचे बाळकडू मिळाले तर काय वाईट?
---
मराठी साहित्याचे माझे हवे तेवढे वाचन नाही. पण "ययाति आणि देवयानी" नाटकाची संहिता कित्येकदा वाचलेली आहे. आधुनिक विचारसरणीत देवयानीच्या मनाचा वेध घेतानाही पौराणिक कथा आहे असेच वाटते, कुठेच मिश्रणाच्या कालबाह्यतेमुळे रसभंग होत नाही. प्रत्यक्षात थेटरात मी अगदी लहानपणी हे नाटक एकदाच पाहिले आहे. (माझ्या मते ४-५ वर्षांचा होतो. गोव्यात नारळाच्या झावळ्यांचे थेटर...) पण ही कमालीची प्रगल्भ कथा मुळीच समजली नव्हती - कशी समजणार? हल्ली "तुझं आहे तुजपाशी"चे विसावे पारायण करतो आहे. कथा म्हणून आधीच प्रिय आहे. पण घट्ट विणलेले संवाद, "नैसर्गिक" वाटतानाही प्रत्येक संवादातून कथावस्तू पुढे जाते (एकही वाक्य वायफळ "टाकलेले" नाही) - प्रत्येकवेळी थक्क होतो.
29 Aug 2008 - 3:12 am | मुक्तसुनीत
धनंजय ने "जॅबरवॉकी" या ऍलिसमधील प्रसिद्ध कवितेचा उल्लेख केला आहे. धनंजय म्हणतात , "अनुवाद तर करूच शकत नाही - शब्द निरर्थक आहेत - पण अर्थपूर्ण असल्याचा भास होतो. "
मूळ कविता आणि या अतिशय कठीण कवितेचा माझ्या एका महान मित्राने केलेला अनुवाद पहा. या मित्रापुढे मी लोटांगण घालायचा बाकी होतो ! मित्र म्हणतो : When a nonsensical poem is translated, there can be paradoxically even more dimensions of translation than one might expect. .
मूळ शीर्षक : jabberwocky
`Twas brillig, and the slithy toves
Did gyre and gimble in the wabe:
All mimsy were the borogoves,
And the mome raths outgrabe.
"Beware the Jabberwock, my son!
The jaws that bite, the claws that catch!
Beware the Jubjub bird, and shun
The frumious Bandersnatch!"
He took his vorpal sword in hand:
Long time the manxome foe he sought --
So rested he by the Tumtum tree,
And stood awhile in thought.
And, as in uffish thought he stood,
The Jabberwock, with eyes of flame,
Came whiffling through the tulgey wood,
And burbled as it came!
One, two! One, two! And through and through
The vorpal blade went snicker-snack!
He left it dead, and with its head
He went galumphing back.
"And, has thou slain the Jabberwock?
Come to my arms, my beamish boy!
O frabjous day! Callooh! Callay!'
He chortled in his joy.
`Twas brillig, and the slithy toves
Did gyre and gimble in the wabe;
All mimsy were the borogoves,
And the mome raths outgrabe.
जबडोबा
प्रकाळ होती चिकळे बोळी चक्रत होते चिखलाती
बोरग कापत मातर रापत इथुनी तिथुनी बाहरती.
बाळा! भिउनी जबडोबाच्या दात-नखांना सांभाळा
जबजब पक्षी मक्कड कुक्षी मागे असती, पळा! पळा!
नायक तलवारीला हलवे शत्रू फारा दिवसांचा
तमझाडाच्या खाली बसुनी विचार करितो क्षणिकाचा.
तितुक्या वेळी भडकत डोळे कडकत जबडोबा आला
सरकत झाडीमधुनी घुसला, बुडबुड तोंडी करी साला.
असा हाणला! तसा मारला! घावाने केले तुकडे!
जबडोबाचे डोके घेउनी नायक परते घराकडे.
"जबडोबाची मात जाहली का रे माझ्या प्रिय पोरा?
शुभ दिन आला! तमस निघाला!" आनंदी हसती जोरा.
प्रकाळ होती चिकळे बोळी चक्रत होते चिखलाती
बोरग कापत मातर रापत इथुनी तिथुनी बाहरती.
29 Aug 2008 - 3:17 am | धनंजय
अति-उत्तम!
(भाषांतर किंवा अनुवाद म्हणण्याऐवजी "रूपांतर" म्हणता येईल का?)
29 Aug 2008 - 3:32 am | सर्किट (not verified)
आपल्या ह्या महान मित्रापुढे मी इथूनच लोटांगण घालतो.
धन्य हो !
ता. क. लुईस कॅरोल, म्हणजेच चार्ल्स डॉजसन हा एक गणितज्ञ होता. अधिक माहितीसाठी , विकीपीडिया. http://en.wikipedia.org/wiki/Lewis_Carroll
ज्यांनी डॉन नुथ चे "आर्ट ऑफ प्रोग्रामिंग" वाचले आहे, त्यांना लुईस कॅरोलचा परिचय आहेच. ज्यांनी आर्ट ऑफ प्रोग्रामिंग वाचलेले नाही, त्यांना संगणक शास्त्र कळलेले नाही. त्यामुळे, संगणक शास्त्र कळणार्या सर्वांना लुईस कॅरोल परिचित आहेच.
-- सर्किट
29 Aug 2008 - 9:55 am | ऋषिकेश
असेच म्हणतो
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
29 Aug 2008 - 4:06 am | लिखाळ
मुक्तसुनित महोदय,
आपल्या मित्रापुढे लोटांगण.
आज मिपावर आल्याचे सार्थक झाले.
--लिखाळ.
29 Aug 2008 - 4:13 am | नंदन
लिखाळरावांशी सहमत आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
29 Aug 2008 - 5:03 am | विकास
आज मिपावर आल्याचे सार्थक झाले.
खरे आहे!
29 Aug 2008 - 8:46 pm | स्वाती दिनेश
कमाल आहे,लिखाळ सारखेच म्हणते.
अनुवाद ग्रेट!
स्वाती
29 Aug 2008 - 9:48 am | चतुरंग
केवळ अशक्य अनुवाद, कदाचित मूळ कवितेपेक्षाही सरस!
चतुरंग
29 Aug 2008 - 7:59 pm | कोलबेर
थक्क!
आमचेही लोटांगण..
8 Jul 2009 - 9:53 am | पाषाणभेद
आमचेही लोटांगण.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
29 Aug 2008 - 5:19 am | विकास
मला सर्वात जास्त पुस्तक आवडते अशातला भाग नाही पण एखाद्या मूड मध्ये वाचलेले आणि भावलेले पुस्तक कायम आवडते झाले असे कुठे तरी वाटते. (तेच गाण्याचे आहे) - ज्यांची नावे वर आली नाहीत ती पुस्तके देत आहे:
काही आत्ता वाचत असलेली / वाचलेली इंग्रजी पुस्तके: जी खूप नाही पण बर्यापेकी चांगली वाटली
अजून जशी आठवतील तशी...
29 Aug 2008 - 12:54 pm | विजुभाऊ
स्थलांतरःएका कारखान्याचे
दामले हे लेखक
लेखाकाने घेतलेली एक असाईनमेन्ट एका अवाढव्य स्टील प्लान्ट चे सम्पूर्ण स्थलांतर तेही पूर्व जर्मनीमधुन भारतामध्ये.
लेखक हा त्याच्या भाषेच्या ज्ञानामुळे प्रोजेक्ट को ओर्डीनेटर म्हणुन जातो.प्रोजेक्ट्सम्पेपर्यन्त त्याला आलेले लोकांचे अनुभव यात आहेत.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
29 Aug 2008 - 1:43 pm | बबलु
पॅपिलॉन -- मूळ लेखक: (खुद्द) हेन्री शॅरीअर (फ्रेंच). सत्यघटनेवर.
अनुवादः (बहुदा रविंद्र गुर्जर).
जबरी पुस्तक.
हेन्रीला न केलेल्या गुन्ह्यासाठी फ्रेंच गयाना तुरूंगात जन्मठेप (काळ्या पाण्याची शिक्षा). टोकाचं Torture.
हेन्री प्रचंड अशावादी. कोणीही कधीही न केलेला प्रयत्न करायचा ठरवतो.
फ्रेंच गयाना मधून पळायचं. पण कसं ? अति-धाडसी निर्णय. कोणाची साथ नाही. टोकाचा Strong माणूस.
पळायच्या अभ्यासाला सुरुवात. कसं पळायचं ? कसं पळायचं ?
६ वेळा पळायचे अयशस्वी प्रयत्न. प्रत्येक वेळेस दुप्पट Torture. बंद dark-cell मध्ये एकटाच कैद. पण निर्णयावर ठाम गडी.
मानलं या माणसाला !! प्रत्येक पलायनाच्या वेळेस innovative ideas.
७ व्या वेळी यशस्वी पलायन..... पाठलाग.... पळतोय..... पळतोय..... एका देशातून.... दुसर्या देशात...... अनंत अडचणी.
मधे भेटणारे अनेक लोक. कोणी चांगले... कोणी वाईट. शेवटी यशस्वी exile... व्हेनेझुएला मधे.
अप्रतिम पुस्तक. २ दिवस.... २ रात्री बसून खाल्लं होतं.
Highly Recommended.... जरूर वाचा.
....बबलु-अमेरिकन
10 Jul 2009 - 9:57 am | विशाल कुलकर्णी
असेच म्हणतो.
मी देखील पॅपिलॉनची पारायणे केली आहेत, अजुनही करतोय.
या पुस्तकाचा पुढचा भागही आला होता "बँको" या नावाने. त्यात यशस्वी पलायनानंतर लेखकाच्या बहुदा झांबियामधील पुनर्वसनाच्या प्रयत्नाचे अफलातुन चित्रण होते. अनुवादः रविंद्र गुर्जर
डेझर्टर : लेखक गंथर बान्हमान.
एक नाझी वॉर कुरिअर पर्सन.
हिटलर आणि रोमेलच्या कृर आणि नितीशुन्य युद्धनीतीने सामान्य सैनिकांची झालेली ससेहोलपट आणि त्यामुळे ऐन युद्धतळावरुन पळ काढुन जीवनाच्या शोधात निघालेल्या साहसी माणसाची सत्यकथा.
अतिषय रोमांचकारी आणि तितकीच भावुक करणारी देखील.
अनुवादः विजय देवधर
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
29 Aug 2008 - 2:05 pm | ऋषिकेश
मला आवडलेले एकच पुस्तक देता येणे अशक्य आहे. पण वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकातील आवडती पुस्तके सांगू शकतो
बालकथा:
मराठी:
फास्टर फेणे: या पुस्तकमालिकेने माझं बालपणच बदलुन टाकलं. बाकी या विषयी अधिक काहि लिहायची गरज नाहिए :)
आणि लंपनची तीनही पुस्तके
हे पुस्तक मोठं झाल्यावर वाचनात आलं पण प्रचंड आवडलं. या दोन्ही पुस्तकांत निवड करणं कठीण आहे म्हणून दोन्ही दिली आहेत.
इंग्रजी:
अर्थात,हॅरी पॉटर: बाकी अनेक पुस्तके आवडली पण हॅरीभाऊने जी जादू केली कशानेच नाहि.
भाषांतरीतः
भा.रा.भागवतांनी भाषांतर केलेल्या ज्युल व्हर्न च्या कादंबर्या: अनेक वर्षांपूर्वी जेव्हा माणसाने कल्पनाही केली नसेल अश्या कल्पनांवरची ही पुस्तके बाळगोपाळांना नकळत भरपूर माहिती देऊन जातात.
ऐतिहासिक
छावा: मी वाचलेली पहिली ऐतिहासीक कादंबरी. त्यानंतर त्याहून छान कादंबर्या अनेक वाचल्या पण छावा जी आवडून गेली तीतके कोणतेही नाहि.
आत्मचरित्र
इंग्रजी:
माय एक्सपरिमेंटस विथ ट्रुथ (इंग्रजी भाषांतर): महात्मा गांधींनी महात्मा होण्यापूर्वीची कथा ज्या प्रामाणिकपणे लिहिली आहे की हा माणूस महात्माच आहे हे पटावं (कोणाला वाचायची इच्छा असल्यास माझ्याकडे सॉफ्ट कॉपी आहे)
मराठी:
असामी असामी: यावर मी पामर काय लिहिणार
विज्ञान कथा
प्रेषकः (जयंत नारळीकर): परग्रहावरून आलेल्या व्यक्तीच्या जीवनकहाणीने मी लहानपणी भारावलो होतोच अजूनही होतो
वैज्ञानिक पुस्तक
आकाशाशी जडले नाते: खगोलशास्त्राचा मराठी भाषेत सांगोपांग परिचय करून देणारे पुस्तक प्रत्येक खगोल प्रेमीच्या संग्रही असावे असे.
सामाजिक
अविरत: समाजातील विविध थोर परंतू प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून अविरत कार्य करणार्या व्यक्तींच्या कार्याचा आणि व्यक्तींचा उत्तम परिचय.
प्रवासवर्णन
पूर्वरंगः तसं तर पुलंची तिनही वर्णनं झकास आहेतच पण त्यातही पुर्वरंग जमून गेलंय असं माझं मत आहे
भाषांतरीत कादंबरी
पॉपिलॉनः ८ वेळा उडू पाहणार्या फुलपाखराची (कैद्याची) कथा ;)
कादंबरी आणि कविता संग्रह
इथे मोठी यादी आहे . तरीही या धाग्यात टाकु का? :)
असो. इथेच थांबतो
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
29 Aug 2008 - 2:26 pm | घाटावरचे भट
विज्ञान कथा
प्रेषकः (जयंत नारळीकर): परग्रहावरून आलेल्या व्यक्तीच्या जीवनकहाणीने मी लहानपणी भारावलो होतोच अजूनही होतो
तुम्हाला 'प्रेषित' म्हणायचंय काय? प्रेषित लैच भारी पुस्तक आहे....
तसंच त्यांची 'व्हायरस' आणि 'वामन परत न आला' ही पुस्तकं पण उत्तम आहेत....
विशेषतः 'व्हायरस'मधली रेडिओ दुर्बिणीचा वापर करुन व्हायरस पाठवण्याची परग्रहवासीयांची क्लुप्ती तर लाजवाबच....
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
29 Aug 2008 - 2:40 pm | ऋषिकेश
अरेच्या मी प्रेषक कसं लिहिलं?!?!
कृपया प्रेषित वाचावे!
घाटावरचे भट, धन्यु!!!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
10 Jul 2009 - 12:22 pm | सागर
बरोब्बर बोललास ऋषिकेशा,
प्रेषित बरोबरच अभयारण्य, व्हायरस,वामन परत न आला ह्या कादंबर्या आवर्जून वाचाव्यात अशाच आहेत
जयंत नारळीकरांनी विज्ञानकथा आणि विज्ञानकादंबरी ह्या साहित्यप्रकाराला एक सन्मान मिळवून दिलेला आहे यात शंकाच नाही.
नारळीकरांची बहुतेक सर्व विज्ञानपुस्तके माझ्या संग्रही आहेत :)
(विज्ञानप्रेमी) सागर
29 Aug 2008 - 3:18 pm | राघव१
आवडलेली पुस्तके अनेक आहेत. एकाबद्दलच लिहायचे म्हणजे जरा कठीणच काम आहे. प्रत्येक पुस्तकाबद्दल एक वेगळा प्रतिसाद लिहावा लागेल मग!! ;)
मूळ पुस्तकः लेस मिझरेबल्स (फ्रेंच)
मूळ लेखकः विक्टर ह्यूगो
अनुवादः दु:ख पर्वताएवढे
अनुवादकः श्री. भा. रा. भागवत
फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळावर बेतलेली ही कादंबरी आहे.
जिऑ वालजॉ या, एका सामान्य पण आत्यंतिक शारीरिक ताकद असलेल्या, माणसाची ही कथा आहे.
अगदी साध्या अपराधासाठी त्याला तुरुंगात जावं लागतं, १९ वर्ष तुरुंगात काढल्यावर त्याला पॅरोल वर सोडण्यात येतं.
शेवटपर्यंत त्याच्या भोवती कथा फिरत असते. त्याच्यातल्या गुन्हेगाराचे होणारे परिवर्तन अन् त्या ६-७ वर्षांच्या अनाथ असहाय पोरीच्या प्रेमासाठी सर्व करायची त्याची आकांक्षा, याचे इतके सुरेख वर्णन दिसून येते ना की वडील-मुलगी या नात्याचे असले नसलेले सगळे पदर उलगडलेले दिसून येतात. अगदी ती मोठी झाल्यावर तिला कोणी मुलगा आवडतोय, ती त्याच्यावर प्रेम करतेय, आपल्यावर तिचे असलेल्या प्रेमात आता कुणीतरी वाटेकरी येणार हे बघितल्यावर होणारी जिऑची घालमेल सुद्धा आपल्याला आवडून जाते. कादंबरीचा शेवट म्हणजे तर इतका अप्रतीम आहे की ज्याचे नाव ते!!
कथानकाच्या ओघात येणारी काही मुख्य पात्रे जसे फान्तिन, जॅव्हेर, कोसेत, मारियुस, गॅव्हरोश (हे १०-१२ वर्षांचे पोर आपल्याला वेड लावून जाते!), तेनार्दिये (नवरा-बायको); असली अप्रतीम कथा सादर करतात की ही एक काल्पनीक कथा आहे असे कधी आपल्याला जाणवत सुद्धा नाही.
विक्टर ह्युगो अन् श्री. भागवतांविषयी मी अज्ञ काय बोलणार? निव्वळ अप्रतीम कलाकृती असेच या पुस्तकाचे वर्णन करता येईल.
संग्रही ठेवण्याजोगे पुस्तक. मी हा अनुवाद प्रथम श्रीरामकृष्ण मठाच्या ग्रंथालयात वाचलेले. आजपर्यंत खूप प्रयत्न केलेत पण हे पुस्तक विकत नाही मिळाले. बहुदा प्रकाशनात नाहीये आता ते. :( असो. कुणास काही माहिती मिळाली या पुस्तकाबद्दल तर जरूर सांगावी.
बाकी पुस्तकांबद्दल नवीन प्रतिसाद लिहिनच! :)
राघव
29 Aug 2008 - 4:35 pm | वैशाली हसमनीस
आपला उपक्रम फारच सुंदर आहे.
माझ्या सध्याच्या वाचनातील आवडते पुस्तक----चकवाचांदणे.--लेखक-मारुतिचितमपल्ली
अत्यंत ओघवती,प्रासादिक भाषा,वन्य जीवनातील बारीक-सारीक तपशील टिपले आहेत.सर्व स्वानुभवातून लिहीलेले असल्यामुळे अधिकच वाचनीय झाले आहे.मराठीत वन्यजीवनावर त्यामानाने फारच मोजकी पुस्तके उपलब्ध आहेत.त्यामुळेही अधिकच वाचनीय.साधी, सोपी भाषा त्यामुळे कुठेही रटाळपणा येत नाही.
29 Aug 2008 - 10:06 pm | डॉ.प्रसाद दाढे
कार्यरत (अनिल अवचट, मॅजेस्टीक) एक उत्तम पुस्तक आहे. त्यामुळे खालील थोर व्यक्ती॑च्या अप्रसिद्ध कार्याची माहीती झाली
अभय ब॑ग व राणी ब॑ग
डॉ. हिम्मतराव बावस्कर (या॑चे आत्मचरित्रही अतिशय वाचनीय आहे)
अरूण देशपा॑डे
सुरेखा चव्हाण
हिरेमठ
अवचटा॑चे 'माणस॑' अस॑च अ॑गावर काटा आणणारे पुस्तक आहे.
29 Aug 2008 - 10:33 pm | भाग्यश्री
द गोल - Eliyahu M. Goldratt.
थोडक्यात कथा अशी, एक मॅन्युफॅक्चरींग प्लॅन्ट जो अजिबातच नफा करत नसतो.. नफा कसला, प्रत्येक शिपमेंट किमान ४० आठवडे लांबलेली..! खरंतर तसं सगळं व्यवस्थित चालू आहे.. पण तरीही शिपमेंट उशीराच.. कधी हवे ते मटेरिअल उपलब्ध नाही,तर कधी नको असलेल्या मटेरिअल्स्चा ढीग होतोय! थोडक्यात गोष्टी वेळच्या वेळी होत नाहीत.. त्यातच त्या प्लॅन्ट मॅनेजरला डेडलाईन मिळते.. ३ महीन्यात काही सुधारणा नाही दिसल्या तर प्लॅन्ट बंद होणार.. एखादा माणूस असता तर सरळ, नवीन जॉब शोधून गप्प बसला असता.. पण मग तो नायक कसला? अलेक्स असं नाही करत.. तो मनापासून अगदी सर्व पणाला लावून तो प्लॅन्ट नफा कसा देईल याचा विचार करतो.. काय चुका होत आहेत.. त्या कशा सुधारता येतील वगैरे.. तो, त्याची टीम आणि अलेक्सचा फीजिक्सचा प्रोफ. जोआन.. ही मेन लोकं या पुस्तकातली.. जोआन प्रश्न विचारणार, काही बेसीक गोष्टी सांगणार.. पण डीरेक्ट प्रश्नाचं उत्तर कधीच नाही देणार.. अलेक्सला विचार करायला लावणार.. अलेक्सदेखील ज्या पद्धतीने ते प्रश्न सोडवतो..(मुलाच्या कॅम्पिंग मधे) ते सर्व अफलातून आहे! वाचलीच पाहीजे ती थॉट प्रोसेस!
पुस्तकात शेवटी काय होतं ते महत्वाचं नाही.. नायक आहे म्हटल्यावर तो यशस्वी होणारच.. पण कसा? त्या मागे त्याने काय कष्ट घेतले.. कसा विचार केला.. हे महत्वाचे.. सगळ्यात महत्वाची ऍटीट्युड! ’नमस्ते लंडन’ मधे अक्षयकुमार म्हणतो तसं, जोपर्यंत तुम्ही खरंच हरत नाही तो पर्यंत तुम्ही जिंकू शकता.. अगदी हेच विचार यात मांडले आहेत.. चिकाटी,जिद्द,रिस्क घेण्याची क्षमता,कष्ट असतील तर तुम्ही जिंकणारच! प्रेरणादायी पुस्तक !!
-भाग्यश्री
http://bhagyashreee.blogspot.com/
30 Aug 2008 - 5:11 am | मैत्र
खुपच सुंदर पुस्तक तुम्ही मांडलं आहे
गोल हे माझंही अतिशय आवडतं पुस्तक आहे ज्यामुळे मी या क्षेत्राकडे -मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनिंग कडे जास्त आकर्षित झालो.
पण हे पुस्तक ज्याला सेल्फ इम्प्रूव्हमेंट म्हणतात त्या प्रकारातलं नाही.
चिकाटी,जिद्द,रिस्क घेण्याची क्षमता,कष्ट असतील तर तुम्ही जिंकणारच! प्रेरणादायी पुस्तक !!
हे सर्व या पुस्तकाची एक बाजू किंवा मूळ विषयापलिकडच्या काही चांगल्या गोष्टी आणि कथेचा भाग आहे.
एक पुस्तक किंवा कथा म्हणून उत्तम आहे. पण तो त्याचा गाभा नाही असं मला वाटतं..
ज्याला बिझनेस नॉव्हेल म्हणतात त्या प्रकारातलं हे पुस्तक आहे
गोल्डरॅट ची पुढे प्रसिद्ध झालेल्या थिअरी ऑफ कंस्ट्रेंट्स चं हे मूळ कथाबीज आहे.तसं या आधी द रेस ही लिहिलं होतं पण असं कादंबरीच्या स्वरुपात प्रथम गोल आलं ... अतिशय उत्तम तर्हेने उलगडत जाणारी कथा, वैयक्तिक आणि व्यावसायिक संकटं अशी एकदम रिअऍलिस्टिक परिस्थिती आणि जोनाच्या क्लूज वर मार्ग काढत जाणारी ऍलेक्स ची टीम.
याचे दोन सिक्वेल आहेत इट्स नॉट लक आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट साठीचं क्रिटीकल चेन.
बॉटलनेक्स शोधून त्यावर उपाय करणं ही थिअरी आणि परंपरागत कॉस्टिंग ला विरोध किंवा त्याच्या मर्यादा हा या पुस्तकाचा इसेंस आहे. या क्षेत्रात काम करणार्या प्रत्येकाने वाचावं असं आहेच पण जसं भाग्यश्रीने म्हटलं आहे त्याप्रमाणे त्या जिद्दी साठी आणि चिकाटिसाठी सर्वांनी वाचावं.
जाता जाता: एलि गोल्डरॅट हा स्वतः इस्रायली आहे त्यामुळे जोनाह हा गुरू सर्व पुस्तकांमध्य इस्रायली ज्यू आहे :)
खुप जास्त प्रमाणात इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व.
30 Aug 2008 - 5:25 am | भाग्यश्री
अरे वा, अजुन एक गोल फॅन सापडला याबद्द्ल सहीच वाटलं! तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.. हे पुस्तक काही यु कॅन विन वगैरेच्या कॅटॅगरीतलं नाहीय.. अजुन खूप काही आहे.. मला खरंच ते मांडता नाही आलं.. मी त्या क्षेत्रातलीही नाही आहे, त्यामुळे अजुन मर्यादा येतात मांडणीवर.. पण त्या क्षेत्रातली नसूनही ते पुस्तक तेव्हढा इंटरेस्ट निर्माण करतं, शब्द,संज्ञा माहीत नसताना आपण ते वाचतच जातो, त्या थॉट प्रोसेस मधे गुंतून पडतो ते सर्व विलक्षण आहे. मी ५-६ वर्षापूर्वी वाचली ही नॉव्हेल, तेव्हा मला विशेष कळलंही नसेल कदाचित.. पण काहीतरी जबरदस्त वाचल्या सारखे वाटले.. तेव्हापासून पारायणं करते मी.. दरवेळेस काहीतरी नवीन हाताला लागतं!
तुम्ही दिलेली माहीती , ठाऊक नव्हती.. ती ही पुस्तकं आणून वाचेन आता.. धन्यवाद!
30 Aug 2008 - 4:42 pm | विजुभाऊ
मला कोणताही प्रोजेक्ट मॅनेज करताना इलियाहु भाऊची जेवढे मदत होते तेवढी इतर कशाचीच होत नाही.
द गोल भाग १ आणि २ तसेच क्रीटीकल चेन ही पुस्तके नेहमी जवळ ठेवतो.
एका सी ए ने मला ही पुस्तके वाचायला सांगितली. ऍक्ट्व्हीटी बेस्ड कॉस्टिंग साठी ही पुस्तके वाच म्हणुन.
पण एकुणच या पुस्तकानी माझे बिझनेस प्रोसेस समजुन घेण्यासाठीचे ज्ञान अद्ययावत केले.
इल्लियाहु ची इतर पुस्तकेही बेष्टच
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
30 Aug 2008 - 12:12 am | आजानुकर्ण
माझे एकमेव आवडते विचाराल तर - पिंगळावेळ
सध्या कामात त्यामुळे अधिक लिहिता येत नाही :(.
आपला,
(जीएप्रेमी) आजानुकर्ण
30 Aug 2008 - 5:10 pm | देवदत्त
पार्टनर (व. पु. काळे)
पार्टनर ही व्यक्तिरेखा, त्यातील विचार भावले. एका बैठकीत (मध्ये जेवणाची वेळ सोडून) पूर्ण पुस्तक वाचून काढले.
आणखी ही आहेत, जसे असा मी असामी, अघळपघळ. बाकी नंतर.
30 Aug 2008 - 9:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'आपण सारे अर्जुन' आवडते.
1 Sep 2008 - 5:35 pm | विकास
वपुंनी लिहीलेले 'आपण सारे अर्जुन' हे त्यांच्या उत्तर काळातील असल्याने जरासे "उदास" वाटले. पण जणू त्यालाच उत्तर असल्याप्रमाणे भारतीयांना उद्देशून लिहीलेले डॉ. डेव्हीड फ्रॉलींचे "अराईज अर्जूना" (अर्जूना, उठ जागा हो!) हे इंग्रजी पुस्तक पण वाचनीय आहे.
7 Jul 2009 - 6:23 pm | भुमन्यु
पार्टनर हे प्रत्येकाने एकदातरी लग्ना आधी वाचावे असे माझे प्रान्जळ मत आहे.
31 Aug 2008 - 5:06 am | चिंचाबोरे
अनिल अवचट यांचे "माझे छंद" आणि त्यांचि ईतरहि बरिच पुस्तके.
एका वेगळ्याच जीवनशैलिचे दर्शन होते. आयुष्याचा आनंद किति वेगवेगळ्या पद्धतिंनि आणि स्वयंपाकासारख्या लहान लहान गोष्टिंमधुनहि घेता येतो याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
इतर सर्व मिपाकरांचे अनेक उत्तमोत्तम पुस्तकांची तोंडओळख करुन दिल्याबद्दल मनापासुन आभार.
31 Aug 2008 - 5:22 am | मैत्र
फार छान पुस्तक... तसंच स्वतःविषयी, माणसं अनेक पुस्तकं आहेत. मुलखावेगळा माणुस... अतिशय साध्या शब्दात लिहिण्याची शैली.. आणि आजूबाजूला असलेल्या पण ज्यावर आपण सहसा फार विचार करत नाही किंवा कल्पना नसते अशा गोष्टी...
जगाचं संकेत न बाळगता फक्त स्वत:च्या मनाप्रमाणे आयुष्य जगलेला माणुस... आणि तरीही इतक्या लोकांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं आहे.. ओरिगामी चे मास्टर आहेत.. मुक्तांगण, कष्टकरी लोकांसाठी केलेलं काम किंवा त्यांचे हाल लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न, मेंटल हॉस्पिटलचं पत्नीबरोबर केलेलं काम.. विलक्षण आहे सारं .. एक असाधारण सहजता आहे सगळ्यात..
त्यांचे साप्ताहिक सकाळ किंवा सकाळ दिवाळी अंकांचे लेख अतिशय उत्तम असतात..
3 Sep 2008 - 5:13 pm | विजुभाऊ
अनिल अवचट यांचे "माझे छंद"
गेल्याच आठवड्यात हे पुस्तक वाचले
प्रत्येक छन्द स्वतन्त्र पुस्तक होऊ शकेल.
चित्रे स्केचेस काष्ठ शिल्पे फोटोग्राफी बासरी.... हा माणूस नक्की काय जगला आहे आष्चर्य वाटते
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
3 Sep 2008 - 5:27 pm | शिप्रा
स्वभाव विभाव
डॉ आनंद नाडकर्णी. ...
त्याचाच शब्दात विचार भावना वर्तन या विभाव त्रयीतुन बनणार्या स्वभावाच्या संगती विसंगती यांचा प्रवास म्हणजे हे पुस्तक...
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
3 Sep 2008 - 6:42 pm | विजुभाऊ
जरा थोडे अधीक लिहा ना या पुस्तकाबद्दल
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
4 Sep 2008 - 10:45 am | शिप्रा
डॉ. आनंद नाडकर्णी हे ट्।ण्याला मानसोपचारतज्ञ आहेत. ह्या पुस्तकात त्यांनी अल्बर्ट एलिस या मानसशास्त्रज्ञाने तयार केलेल्या Rational emotive theory बद्दल लिहिले आहे. म्हणजेच विवेकनिश्ट विचारसरणी..
डॉ. आनंद नाडकर्णी यांनी हि थेअरि वापरुन स्वताच्या स्वभावात तर बदल केलाच पण त्याच्याकडे येणार्या अनेक लोकांना हि थेअरि छोट्या गोश्टित वापरण्यास सागुन त्यांचे मोठे प्रश्न्न सोडवले आहेत..परिक्षेत येणारे टेन्शन पासुन जवळ्च्याचा म्रुत्यु इत्यादि अडचणिंवर मात कशि करायचि याचे मार्गदर्शन त्यांनि ह्या पुस्त्कात छोटि उदा. देउन केले आहे..
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
8 Jul 2009 - 11:23 am | अ-मोल
दी ओल्ड मॅन ऍ़ण्ड दी सी
पर्व
पानिपत
शुभ्र काही जीवघेणे
निशाणी डावा अंगठा
10 Jul 2009 - 1:06 pm | सागर
मूळ कन्नड भाषेत लिहिली गेलेली "पर्व" ही कादंबरी अत्भुत आहे.
डॉ.एस.एल. भैरप्पा यांनी स्वतः १२ वर्षे उत्तर भारतात कुरुक्षेत्र, कर्णाच्या मृत्युस्थानी, गुजरात मधे द्वारका अशा शेकडो ठिकाणी भ्रमंती करुन अतिशय अभ्यास करुन महाभारताचे हे कथानक रचले आहे.
त्या काळात प्रत्येक ठिकाणचे हवामान कसे होते आणि कोणत्या प्रकारचे अन्न खाण्यात उपयोगी आणले जात होते अशा बारीक-सारीक गोष्टींचा श्री भैरप्पा यांनी अभ्यास केल्याचे पानोपानी जाणवते.
महाभारताचे हे कथानक आत्तापर्यंत वाचलेल्या महाभारतकथांना हादरवून सोडते एवढे नक्की.
सौ. उमा कुलकर्णी यांनी या सुंदर कादंबरीचा तेवढाच सुंदर अनुवाद मराठीतून केलेला आहे.
पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊस ने प्रकाशित केलेले हे सुंदर पुस्तक अवश्य वाचण्यासारखे आहे.
(इतिहासप्रेमी) सागर
10 Jul 2009 - 2:40 pm | भोचक
हे पुस्तक वाचल्यानंतर विचारप्रक्रिया बदलली. महाभारताकडे पहाण्याचा नवा वास्तववादी दृष्टिकोन मिळाला.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
8 Jul 2009 - 11:43 am | विजुभाऊ
मागच्याच आठवड्या चित्र॑कार रवी परांजपे यांचे आत्म चरीत्र वाचले. एका कमर्शीयल आर्टीस्टचा प्रवास कसा होतो ते फारच छान सांगितले आहे.
त्यांची स्केचेस/ चित्रे/ इलस्ट्रेशन्स यावर भरभरून बोलले आहेत ते
8 Jul 2009 - 12:01 pm | सुबक ठेंगणी
विजुभाउंनी म्हटल्याप्रमाणे "तोत्तोचान्"आणि तिला तोमोई शाळेतून 'आपण जसे आहोत तसेच' जगण्यासाठी मिळालेले पाठबळ.
दुसरं म्हणजे, नॉट विदाऊट माय डॉटर" इराणमधील अमेरिकन वकिलातीवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत काम करणा-या "मूडी"या इराणी डॉक्टरशी लग्न केलेल्या बेटीची आणि तिच्या लहानग्या 'माहतोब'ची ही गोष्ट. अमेरिकेतली नोकरी गेल्यावर ही गोष्ट बेटीपासून लपवून मुडी तिला आणि माहतोबला इराणला घेऊन जातो, हळूहळू तिचा पासपोर्ट, क्रेडिट कार्ड जप्त करतो, फोनवरून तिच्या नातेवाईकांशी संपर्क करायला बंदी घालतो आणि तिचे परतीचे सगळे दोर कापले जातात. अत्यंत धर्मांध, गलिच्छ आणि स्त्रियांना केवळ त्यांच्या नव-यांची मालमत्ता समजणा-या अशा परक्या देशात बेटीचा तिच्याच नव-याकडून आणि नातेवाईकांकडून शारिरिक, मानसिक छळ सुरु होतो. बेटीचे हे इराणमधले अठरा महिने आणि शेवटी तिने स्वत:ची आणि माहतोबची करून घेतलेली सुटका ह्याची रोमांचक कहाणी. सत्य कल्पितापेक्षा किती अद्भुत असू शकता ह्याचा प्रत्यय देणारं पुस्तक.
बाकी इतिहासातले भावनेचे पैलू उलगडून दाखवणारं स्वामी
, शांता शेळक्यांचं मेघदूताचं भावांतर वगैरे वगैरे...
उत्तमोत्तम पुस्तकांची ओळख करून दिल्याबद्दल सगळ्यांचेच आभार!
20 Oct 2013 - 5:26 pm | विजुभाऊ
थ्री कप्स ऑफ टी :
हे आजादकश्मीर/अफगाणीस्थान भागात शाळा चालवणार्या एकाचे अनुभव असलेले पुस्तक खरेच रोमांचक आहे. शिक्षणामुळे समाजाची जडणघडण कशी होत जाते याचे सुंदर वर्णन आहे पुस्तकात. लेखक आठवत नाही. मेहता प्रकाशनाने पर्काशित केलेय हे पुस्तक
20 Oct 2013 - 5:31 pm | बॅटमॅन
नॉट विदौट माय डॉटर बद्दल बराच खल झालेला दिसत आहे. पण त्याची दुसरी बाजू कधीच फारशी चर्चिली जात नाही.
त्या दुसर्या बाजूशी संबंधित चर्चा इथे पाहता येईल.
20 Oct 2013 - 7:13 pm | चित्रगुप्त
लहानपणी:
अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा: (चिपळूणकरांचे भाषांतर)
मोठेपणी:
जीएंचे 'रमलखुणा'
21 Oct 2013 - 1:26 pm | मारवा
ही एक अफाट कादंबरी आहे एका विशाल पटा वर ही घडते. आपल्या महाभारत स्टाइल यात एकाच कुटुंबाच्या अनेक पिढ्यांचे व माणसांचे एक जबरद्स्त असे चित्रीकरण येते जे अत्यंत सुसंघटीत पणे मांड्ले जाते. यात लॅटीन अमेरीके च्या एका काल्पनिक गावा चा आणि त्या फाउंडर च्या कुटुंबाचा एक विलक्षण असा प्रवास मांडला जातो, यात कधीही वाचली नसतील अशी एका पेक्षा एक भन्नाट पात्रे आणी मति अक्षरशः गुंग करणारी प्रसंगे एका मागो माग येत जातात तरीही कथानक अत्यंत आखिव रेखिव जरा ही पसरत नाही यातील पात्रे त्यांची फिलॉसॉफी याचे काही वर्णन येते की ज्याचे नाव ते. ही वाचल्यानंतर मला बर्याच दिवसांनी ही माहीती कळली की या लेखकाला १९८२ चा नोबेल पुरस्कार साहीत्या साठी मिळालेला आहे आणि याची ही कादंबरी ही विश्व साहीत्यातील एक महान कादंबरी मानण्यात येते.यातील काही कोट्स देण्याचा मोह आवरत नाही ही वाचा म्हणजे कादंबरीची थोडी आयडीया येइल.
“They were so close to each other that they preferred death to separation.”
“He sank into the rocking chair, the same one in which Rebecca had sat during the early days of the house to give embroidery lessons, and in which Amaranta had played Chinese checkers with Colonel Gerineldo Marquez, and in which Amarana Ursula had sewn the tiny clothing for the child, and in that flash of lucidity he became aware that he was unable to bear in his soul the crushing weight of so much past.”
“In all the houses keys to memorizing objects and feelings had been written. But the system demanded so much vigilance and moral strength that many succumbed to the spell of an imaginary reality, one invented by themselves, which was less practical for them but more comforting.”
“In that way the long-awaited visit, for which both had prepared questions and had even anticipated answers, was once more the usual everyday conversation.”
21 Oct 2013 - 3:36 pm | म्हैस
१ होता कार्वर , शिवाजी महाराजान्वारची श्रीमान योगी, सिद्धयोगी हि ३ हि पुस्तकं एकदम भारी अहेत. जरूर वाचावीत अशी
21 Oct 2013 - 4:03 pm | कपिलमुनी
चकवाचांदण : मारूती चित्तमपल्ली यांचा आत्मचरीत्र ..
छान आहे ..
23 Oct 2013 - 3:15 pm | माम्लेदारचा पन्खा
मिलिंद बोकील यांच्या सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक.....
वाचायला घेतले की संपवल्याशिवाय खाली ठेववत नाही...
कितीही वेळा वाचले तरी नवीन वाटते दर वेळी.........
वातावरण निर्मिती अफलातून आहे......
26 Jun 2016 - 3:34 am | विजुभाऊ
शातारामा बद्दल जितका उहापोह झाल्या त्याच्ह्या १/३देखील पुस्तक चागले नाही
28 Jun 2016 - 11:49 am | समीरसूर
शांताराम खूप मोठे होते. जवळपास 1000 पाने. मी वाचले. बरीच पाने रटाळ वाटली. पण मला ठीक वाटले. अगदीच टाकाऊ नव्हते.
27 Jun 2016 - 8:04 pm | मारवा
हे पुस्तक मी सध्या वाचत आहे अजुन पुर्ण वाचुन झालेले नाही जितका भाग वाचला त्या विषयी
अमिताव घोष अतिशय आवडता लेखक त्याची बरेच दिवसांपासुन पेन्डींग असलेली द ग्लास पॅलेस सध्या वाचतोय. ही सुद्धा सुंदरच भट्टी जमवलेली आहे. मंडाले आणि रत्नागिरी पहीली दोन प्रकरणे संपली. घोष ने कादंबरीसाठी ५ वर्षे अतीपरीश्रम घेतलेले आहेत ते जाणवतात. कादंबरीची सुरुवात मंडालेत ब्रिटीश फौजांनी केलेल्या आक्रमणातुन होते. बर्माचा राजा थिबॉ त्याची फॅमिली ला इंग्रज युद्धात नमवुन रत्नागिरीला त्यांची रवानगी करतात.निर्वासित केलेल्या थिबॉ चे रत्नागिरीतले वास्तव्य, त्याचा एकाकीपणा, नॉस्टॅल्जीया, त्याच्या चार मुली, नोकर त्यांचे अफेयर्स, क्रुर राणी, बदलता भारत, श्रुड साहेब, राजाच हळुहळु होत जाणार डिग्रेडेशन, तिकडे बर्मातला सागवानचा बर्माटीक चा प्रचंड व्यापार, त्यातला हत्तींचा वापर. तिथला भन्नाट निसर्ग, साहेबाची धंद्यातली इन्व्हेन्शन्स, साहेबाच्या महत्वाकांक्षेने पोखरत जाणारा बर्मा, त्यातले आपल्याला सहसा अपरीचीत असणार्या रेसेस व लोक. फारच सुंदर उतरलय. इतिहासाची प्रचंड माहीती असुनही ती कादंबरीवर अजिबात हावी न होउ देता घोष मोठ्या कुशलतेने संक्रमणातुन जात असलेले लोक समाज फार सुंदर रेखाटतात. अत्यंत वाचनीय उत्कंठावर्धक वगैरे वगैरे आहे. इथे घोषची कॅरेक्टर्स सुरुवातीला तरी मनाची पकड घेत नाहीत पण हळुहळु ती डोक्यात सेटल होऊ लागतात. घोष ला कॅरेक्टर बिंबवायला वेळ लागतोय कारण त्याचा फोकस बहुधा जास्त मोठा असा काळावर आहे. तरी सर्वस्व गमावलेला थिबॉ फार ट्रॅजिक रेखाटलाय तो मनात घर करुन राहतो. मंडालेच्या राजवाड्यातील मुख्य हॉलला द ग्लास पॅलेस नाव त्यावरुन हे शीर्षक. कादंबरीचे मुखपृष्ठ निव्वळ अप्रतिम आहे. त्यावरची जे एम कोएट्जी ची मोजक्या शब्दातली प्रतिक्रीया पुस्तकाविषयी बरेच काही सांगुन जाते. एक सॅम्पल देण्याचा मोह आवरत नाही. ब्रिटीश आर्मीत लढणार्या भारतीय सैनिकांविषयी चा हा संवाद बघा
“In Singapore, as a young man, I worked for a time as a hospital orderly. The patients were mainly sepoys like these—Indians, back from fighting wars for their English masters. I still remember the smell of gangrenous bandages on amputated limbs; the night-time screams of twenty-year-old boys, sitting upright in their beds. They were peasants, those men, from small countryside villages: their clothes and turbans still smelt of wood-smoke and dung fires. ‘What makes you fight,’ I would ask them, ‘when you should be planting your fields at home?’ ‘Money,’ they’d say, and yet all they earned was a few annas a day, not much more than a dockyard coolie. For a few coins they would allow their masters to use them as they wished, to destroy every trace of resistance to the power of the English. It always amazed me: Chinese peasants would never do this—allow themselves to be used to fight other people’s wars with so little profit for themselves. I would look into those faces and I would ask myself: What would it be like if I had something to defend—a home, a country, a family—and I found myself attacked by these ghostly men, these trusting boys? How do you fight an enemy who fights from neither enmity nor anger but in submission to orders from superiors, without protest and without conscience?
“In English they use a word—it comes from the Bible—evil. I used to think of it when I talked to those soldiers. What other word could you use to describe their willingness to kill for their masters, to follow any command, no matter what it entailed? And yet, in the hospital, these sepoys would give me gifts, tokens of their gratitude—a carved flute, an orange. I would look into their eyes and see also a kind of innocence, a simplicity. These men, who would think nothing of setting fire to whole villages if their officers ordered, they too had a certain kind of innocence. An innocent evil. I could think of nothing more dangerous.”
“Saya.” Rajkumar shrugged offhandedly. “They’re just tools. Without minds of their own. They count for nothing.”
28 Jun 2016 - 11:47 am | समीरसूर
हा परिच्छेद खूप आवडला. 'द ग्लास पॅलेस' वाचायलाच पाहिजे. खूप ओघवती आणि हृदयाला भिडणारी भाषा!
28 Jun 2016 - 11:57 am | समीरसूर
द गॉडफादर, गॉन विथ द विंड, फॉल ऑफ जायंट्स, ऑक्टॉपस, सायक्यामोर रो, उत्तरयोगी, गुड टू ग्रेट, स्वामी, नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील), व्यक्ती आणि वल्ली, चार नगरातले माझे विश्व (जयंत नारळीकर) आणि अजून बरीच पुस्तके...यातली मी काही दोनदा वाचली आहेत.