हि मी अश्विनी या नौदलाच्या कुलाबा रुग्णालयात काम करीत असतानाची गोष्ट आहे. तो मंगळवार होता. एके दिवशी रात्री दहा वाजता मला नौदलाच्या पोलिस स्टेशन वरून फोन आला कि लवकर रुग्णवाहिका पाठवा. मी चौकशी केली तेंव्हा आमच्या दोन रुग्णवाहिका बाहेर गेल्या होत्या.एक रुग्णाला पोहोचवायला आणि दुसरी आणायला गेली होती. इतर दोन रुग्णवाहिका उभ्या होत्या पण त्यात चालक नव्हता(रात्रपाळीला दोन चालक असत). मी तिथे सूचना देऊन ठेवली होती कि रुग्णवाहिका जशी येईल तशीच पोलिस स्टेशन ला पाठवा. पुढच्या दहा मिनिटात परत दोन वेळा फोन आला कि ताबडतोब रुग्णवाहिका पाठवा. मी जर वैतागून पोलिस स्टेशनला फोन केला आणि सांगितले जोवर बाहेर गेलेली रुग्णवाहिका येत नाही तोवर मी कशी पाठवणार. मला रुग्णवाहिका चालवता येत नाही नाही तर मीच घेऊन आलो असतो!!!!. त्यावर तिथला प्रभारी अधिकारी (लेफ्ट. कमांडर यादव) मला म्हणाला सर इथे एक मुलगी बहुतेक बाळंत होण्याच्या बेतात आहे त्यामुळे जितक्या लगेच जमेल तितक्या लगेच पाठवा. पुढच्या दहा ते पंधरा मिनिटात त्या मुलीला घेऊन तो अधिकारी (लेफ्ट. कमांडर यादव) रुग्णवाहिकेतून स्वतः आला. मी त्याला विचारले कि हि कोण मुलगी आहे? त्याने सांगितले कि मला माहीत नाही. ती माझ्या घरी आली आणि मला प्यायला पाणी मागितले. मी तिला पाणी दिले तर ती म्हणाली मला कळा येत आहेत आणि आता मला तुम्ही रुग्णालयात घेऊन चला.मी तिला विचारले कि तू मझ्याकडे का आलीस त्यावर ती म्हणाली कि तुम्ही नौदलाचे पोलिस आहात आणि तुम्ही मला रुग्णालयात घेऊन जाल याची खात्री आहे. घरी उगाच बायकोशी वाद नको म्हणून मी तिला प्रथम पोलिस स्टेशन ला आणले आणि तुम्हाला फोन केला. ती इतक्या वेदनेत होती कि तिला जीप मधून आणण्याची माझी हिम्मत झाली नाही. मी गडबडीत ती कोण काय ते सुद्धा विचारले नाही.
रुग्णवाहिकेत पहिले तर एक एकोणीस वर्षाची सुंदर मुलगी अतिशय वेदनेत कण्हत होती. मी त्या मुलीला रुग्णवाहिकेत आतच तपासले आणि माझ्या लक्षात आले कि ती पुढच्या फार तर अर्ध्या तासात बाळंत होणार आहे. मी त्या रुग्णवाहिकेला तसेच प्रसूती विभागात पाठवले आणि तेथे फोन केला कि एक मुलगी बाळंत होण्याच्या बेतात आहे तिला ताबडतोब टेबलवर घ्या.तिचे बाकी कागदपत्र आपण नंतर बनवू. पाच मिनिटात तिथल्या मेट्रन चा फोन आला कि सर ती मुलगी एका जे सी ओ(ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर) ची मुलगी आहे आणि तिचे लग्न झालेले नाही. तर तुम्ही ताबडतोब इथे या. आता मी उठून सरळ प्रसूती विभागात गेलो. आणि तिला विचारले कि तू कोण आहेस? त्यावर तिने दिलेली माहिती अशी होती की माझे वडील 8 गढवाल रेजिमेंट मध्ये सुभेदार आहेत. (हि 8 गढवाल रेजिमेंट तेंव्हा कुलाब्यात तैनात होती) आणि माझ्या वडिलांना सांगू नका. इकडे मेट्रन मला सांगत होती कि सर तिला सेंट जॉर्ज हॉस्पिटल ला पाठवून द्या
कारण ती नियमाप्रमाणे पात्र (एनटायटल्ड) नाही. सरकारी नियमाप्रमाणे सैनिकांची लग्न न झालेली मुलगी सर्व उपचारास पात्र असते. पण लग्न झालेली मुलगी प्रसूतीसाठी पात्र नाही. त्या नियमात लग्न न झालेली मुलगी प्रसूतीसाठी पात्र आहे कि नाही याचा उल्लेख नाही. (नियम बनवणार्याने हि शक्यता गृहीत धरली नसावी) शिवाय लश्करी संस्कृतीत बिनलग्नाची मुलगी प्रसूतीसाठी कोणी लष्करी रुग्णालयात घेऊन येईल अशी सुतराम शक्यता नाही.
मी जरा आवाज चढवून मेट्रनला गप्प केले आणि म्हटले अशा अवस्थेत ती मुलगी कुठे जाईल?आणि तिची तयारी असली तरी माझी नाही. प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून मी याची जबाबदारी घेतो आहे तेंव्हा तुम्ही तिची प्रसूती करा. तुम्हाला झेपत नसेल तर मी प्रसूती करेन ( मी स्त्रीरोग विभागात काम करीत असताना जवळ जवळ वीस प्रसूती केल्या होत्या त्यामुळे त्यावेळेस मला तेवढा आत्मविश्वास होता). यावर मेट्रनने गपचूप तिची प्रसूतीची प्रक्रिया चालू केली आणि पुढच्या सात ते आठ मिनिटात ती मुलगी माझ्यासमोरच बाळंत होऊन तिला एक गोंडस मुलगा झाला (वेळ साधारण साडे अकरा असावी).
लष्करात सैनिकावर अवलंबून असणारे त्याचे कुटुंबीय हे त्याच्या नावाने रुग्णालयात भरती होतात त्यामुळे त्या मुलीचे भरतीचे कागदपत्र हे daughter of Sub Negi म्हणून बनवले गेले. आता याची खात्री करण्यासाठी काहीतरी कागदपत्रे असणे आवश्यक असते. शिवाय हि असाधारण परिस्थिती होती म्हणून मी ८ गढवाल रेजिमेंट च्या एडज्यूटंट ला फोन केला आणि विचारले कि आपल्याकडे सुभेदार नेगी आहेत काय? त्यावर त्याने सांगितले कि आमच्याकडे दोन सुभेदार नेगी आहेत. मी परत विचारले कि ज्यांची मुलगी १९ वर्षाची आहे असे कोण आहेत त्यांच्याशी मला बोलायचे आहे कारण त्यांची मुलगी रुग्णालयात भरती झाली आहे. यावर त्याने मला सुभेदार नेगीना फोन लावून दिला. मी त्यांना मुलीबद्दल सांगितले कि तिला रुग्णालयात भरती केले आहे. त्यांनी घाबरत घाबरत विचारले सर माझी मुलगी कशी आहे. मी त्याना धीर दिला आणि सांगितले मुलगी ठीक आहे पण तिच्या भरतीची कागदपत्रे तयार करण्यासाठी आपल्याला रुग्णालयात यावे लागेल. त्यावर ते म्हणाले सर मी लगेच येतो. पुढच्या अर्ध्या तासात ते आपल्या एका मित्राला घेऊन लष्करी जीपने रुग्णालयात आले. त्यांना बाह्य रुग्ण विभागातून मी प्रसूती कक्षात घेऊन गेलो. त्यांनी घाबरत घाबरत मला सारखे मुलगी कशी आहे याची चौकशी चालविली होती. मी त्यांना मुलीला भेटवले आणि विचारले कि हीच तुमची मुलगी आहे ना? त्यावर ते हो म्हणाले आणि त्यांच्या जीवात जीव आला. यानंतर त्यांनी विचारले सर तिला काय झाले आहे आणि तिला भरती का केले आहे? मी त्यांना बाजूला घेऊन गेलो आणि सांगितले कि हा तुमचा नातू !! ती आताच बाळंत झाली आहे. यावर सुभेदार नेगींचा चेहरा पांढरा फट्ट पडला. ते दोन क्षण काहीच बोलले नाहीत मग मटकन खाली बसले आणि त्यांनी रडायला सुरुवात केली. दोन मिनिटांनी त्यांनी बोलायला सुरुवात केली. सर मै बरबाद हो गया मै किसीको मुंह दिखाने लायक नाही रहा. मुझे खुद्कुशी करनी पडेगी.पुरे गढवालमें मेरी बेइज्जति हो जायेगी. मेरे पास खुद्कुशी के अलावा कोई चारा नाही है! माझी परिस्थिती विचित्र झाली होती. एक तर प्रभारी अधिकारी म्हणून मी त्यांना सत्य परिस्थिती सांगणे भाग होते पण यातून असे काही होईल असा मी विचारच केलेला नव्हता. तरीही मी त्यांना हाताला धरून बाहेर आणले आणि सांगितले कि आपण शांत व्हा. त्यांच्या मित्राला सांगितले कि त्यांची मुलगी जरा सिरियस आहे तेंव्हा त्यांची काळजी घ्या. माझ्या सहाय्यकाला मी त्यांच्या वर नजर ठेवायला सांगितले आणि ताबडतोब ८ गढवाल रेजिमेंटच्या एडज्यूटंट ला परत फोन केला.(या वेळेस रात्रीचा एक वाजला होता) त्याला हे सांगितले कि सुभेदार नेगी अतिशय तणावाखाली आहेत आणि एखादे वेळेस आत्महत्येचा प्रयत्न करतील यासठी मला ताबडतोब त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तीन जवान पाहिजेत. एवढा फोन करून मी नेगी साहेबाना आपल्या खोलीत घेऊन गेलो त्यांच्या मित्रासोबत त्यांना एक ग्लास पाणी पाजले. एक काम्पोजची गोळी खायला लावली. काही वेळाने तीन जवानाना घेऊन तो एडज्यूटंट( तो मेजर होता. दुर्दैवाने मला त्याचे नाव आठवत नाही) स्वतः आला. त्याला मी बाजूला घेऊन परिस्थिती समजावली. मग तो नेगी साहेबाना घेऊन गेला. थोड्या वेळाने मेट्रन त्या नवजात बालकाचे जन्माचे दाखले घेऊन आल्या. बोलता बोलता त्या म्हणाल्या कि या मुलीचे एका नौदलाच्या डॉक यार्ड मधील आर्टीफायसर(हा पण जे सी ओच असतो) बरोबर प्रेम जमले होते. मी त्यांना विचारले कि हि गोष्ट नऊ महिने कशी लपून राहिली. त्यावर त्या म्हणाल्या कि मुलीचे वडील राजस्थानात लष्करी सरावावर गेले सहा महिने बाहेर होते आणि तिची आई मनोरुग्ण आहे( स्कीझो फ्रेनिया) आणि तिचा इलाज अश्विनीत चालू आहे.
दुसर्या दिवशी मी हि गोष्ट आमच्या वैद्यकीय समाजसेविकेला सांगितली आणि विचारले काय करता येईल का ते पहा.
यानंतर मी ते विसरून गेलो. शनिवारी सकाळी त्या समाजसेविका मला भेटल्या आणि त्यांनी मला पुढची कहाणी सांगितली. या मुलीचे प्रेम होते त्या आर्टीफायसरशी (त्याचे आडनाव रावत होते आणि तो गढवालीच होता) त्यांनी संपर्क केला तेंव्हा त्याने आपले तिच्याबरोबर प्रेम आहे हे मान्य केले आणि म्हणाला कि मला तिच्याशी लग्न करायचे होते. तिच्या घरच्याना प्रेम विवाह मान्य नाही आणि ती अजून लहान आहे म्हणून त्यांची तयारी नव्हती. यानंतर त्या मुलीचा त्याच्याबरोबर शुक्रवारी आर्य समाज मंदिरात रीतसर विवाह झाला. सुरुवातीला मूल अनाथाश्रमात द्यावे असे ठरत होते पण रावत म्हणाला ते मुल माझेच आहे तर त्याला अनाथाश्रमात का ठेवायचे? अशा रीतीने मंगळवारी रात्री घडलेले नाट्य शनिवारी सुखांत होऊन संपले.
प्रतिक्रिया
15 Oct 2013 - 9:34 pm | मुक्त विहारि
मस्तच.....
शेवट गोड तर सगळेच गोड...
15 Oct 2013 - 9:45 pm | अर्धवटराव
काय काय होते दुनीयादारीत... जर वेळीच योग्य हालचाली झाल्या नसत्या तर बिच्यार्या मुलीचा जीव धोक्यात आला असता. तुम्ही खरच तर्हेतर्हेचे अनुभव, आणि प्रसंगी डोकं शांत ठेऊन योग्य एक्शन घेतलीत डॉ.
15 Oct 2013 - 10:11 pm | बिपिन कार्यकर्ते
शप्पथ!!!! !!!!!!!!!!!!!!!!!!!!
15 Oct 2013 - 11:45 pm | रेवती
हम्म्म्....डॉक्टरांना बर्याच इतरही गोष्टींना तोंड द्यावे लागते याचे उदाहरण आहे म्हणावयाचे.
16 Oct 2013 - 12:01 am | प्यारे१
हम्म!
ऑल इज वेल दॅट एन्ड्स वेल!
16 Oct 2013 - 2:44 am | आदूबाळ
भारीच!
16 Oct 2013 - 2:45 am | खटपट्या
मस्त !!!
16 Oct 2013 - 5:05 am | स्पंदना
बाळ नशिबवान म्हणाय्च.
आमच्या येथे (होस्पिटल घरात आहे) एक मुलगी आई बरोबर आली, बाळ झाल्, डीसचार्जला दोघी म्हणाल्या बाळ तुम्ही ठेवुन घ्या. आता काय करायच? आमची डोक्टर वहिनी गोंधळली, ही बातमी आजुबाजुला पसरल्यावर कोपर्यावरची एक वडर समाजातली बाई आली अन ते बाळ घेउन गेली. पहिल्या वेळेमुळे काय करायच ते समजल नाही, पण मग तेथुन पुढे एन जी ओज ना संपर्क कराय्च लक्षात आल आणि मग तेथुन पुढच्या अश्या केसेस त्यांना कळवायला लागले घरातले.
16 Oct 2013 - 1:01 pm | सुबोध खरे
अपर्णा ताई ,
वर वर्णन केलेल्या घटनेच्या महिन्याभराच्या आत माझा मित्र रात्रपाळीवर असताना एक स्त्री आपल्या मुलीला घेऊन आली कि तिच्या पोटात दुखत आहे तिचे कागदपत्र बनवेपर्यंत ती गायब झाली आणि तेवढ्यात आमच्या रुग्णालयातील आया ला रडण्याचा आवाज आला म्हणून ती बाजूच्या बाथरूम मध्ये गेली तेंव्हा तेथे एक नवजात बालक रडत असलेले दिसले. तिने ते उचलून आणले तोवर या मायलेकी तेथून पोबारा करण्याच्या बेतात होत्या. केवळ ती मुलगी ओली बाळंतीण होती म्हणून जोरात चालू शकत नव्हती. त्यांना बोलावले तर त्या यायला तयार नव्हत्या. शेवटी पोलिसात देऊ अशी धमकी दिल्यावर त्या थांबल्या. त्यांना रुग्णालयात का आलात विचारले तर म्हणाल्या जर काही अघटीत घडले असते किंवा गुंतागुंत झाली असती तर रुग्णालयात पुढचा इलाज झाला असता. पण कोपर्यातल्या एका बायकांच्या बाथरूम मध्ये सुरळीत प्रसूती झाल्यावर त्यानी मुल सोडून पळून जाण्याचा विचार केला होता. मूल रुग्णालयात असल्याने मुलाची पुढची काळजी आपोआप घेतली गेली असती.
अशा परिस्थितीत जाऊ नका सांगितले तरी त्या ऐकायला तयार नव्हत्या.(भरती झाल्या असत्या तर कदाचित नौदलात सर्वाना कळेल अशी भीती असावी) शेवटी भरती व्हायला नकार देऊन वैद्यकीय सल्ल्याविरुद्ध त्या दोघी त्या मुलाला घेऊन गेल्या.पुढे त्या बालकाचे काय झाले हे देवास ठाऊक. बर्याच वेळा रुग्णालयांना हा अनुभव येतो. मूल नको असेल तरी ते चांगल्या हाती पडावे अशी त्या असहाय्य आईची इच्छा असते.
16 Oct 2013 - 9:41 am | प्रचेतस
रोचक अनुभव
16 Oct 2013 - 10:00 am | मनराव
मस्त अनुभव
.
.
.
यालाच नशिब म्हणतात......
16 Oct 2013 - 10:01 am | सौंदाळा
एकदम फिल्मी वाटणारी सत्यकथा.
16 Oct 2013 - 10:35 am | खटपट्या
एकदम फिल्मी वाटणारी सत्यकथा
कोणती अपर्णा तैंची कि डॉक्टर साहेबांची
16 Oct 2013 - 11:22 am | स्पंदना
डॉक्टर तर खर लिहीतातच खटपट्या साहेब, पण निदान आमच्या हॉस्स्पिटल मधुन किती मुले पुण्याच्या एन जी ओज तर्फे नेदरलँडला गेली आहेत ते विचारा. अन अश्या बर्याच केसेस आहेत. ही पहिली केस आम्हाला बरीच शहाणी करुन गेली. तसही घाटकोपरच्या मनिषा हॉस्पिटल मध्ये अशी कितीतरी मुले दिसतील तुम्हाला. कोल्हापुरच्या अरगडे डोक्टरांकडे तर एक बाळ नुसत्या नर्सेसनी सांभाळुन मोथ झाल. त्याला कपडे वगैरे ते टाकलेल आहे म्हणुन रोग्यांचे नातेवाईक द्यायचे, खाण पण असच. शेवटी ते बाळ पळुन खेळायला लागल, अन मग मला वाटत्य ते दत्तक दिल गेल.
खुप सगळ्या गायनॉकलोजीस्ट्सकडे हे प्रकार पहायला मिळतील.
मी स्वतः एकदा एक ल्हाणसा मुलगा पाह्यला अन घेउन जाउ या म्हनुन लागले होते. नवरोबा तयार नाही झाले. त्या बाळाची आई तेथेच हॉस्पिटल मध्ये होती. तिने सरळ सांगितल होत, माझ्याकडे आणलत तर मी मारणार. काय बोलायच? काय करायच? ती पोरगी चॅप्टर होती.
16 Oct 2013 - 10:32 pm | खटपट्या
ओह !!!
17 Oct 2013 - 11:36 am | सुमीत भातखंडे
.
16 Oct 2013 - 11:34 am | शिल्पा नाईक
@ अर्पणा,
खूप भयानक आहे, पण सत्य आहे म्हणून पटवून घ्यावे लागतेय.
कोणती आई अस करेल यावर विश्वासच नाही बसत.
त्या बिचार्या चिमुकल्यांचा काय दोष यात. त्यांनी का हे सहन करायच अस वाटून जात.
आपल्या कायद्यात अश्या आयांसाठि कोणती शिक्शा नाहीये का?
16 Oct 2013 - 11:41 am | स्पंदना
आधी फिर्याद कोण करणार हा प्रश्न येतो. जर हॉस्पिटलने फिर्याद करायची म्हंटली तर एक तर हॉस्पिटलची बदनामी (कशासाठी? देव जाणे पण कोणालाही नाव पेपरात यायला नको असत ) वर आणि पोलीसांचा एक वेगळाच ससेमिरा. भारतात तुम्ही चांगल्या कारणासाठी सुद्धा कायद्याकडे जाऊ शकत नाही. तुम्हाला त्रासच होतो. निदान अस मला माझे नातेवाईक तरी सांगतात .
16 Oct 2013 - 11:51 am | क्रेझी
Thanks Maa हा चित्रपट बघा तुम्हांला कल्पना येईल की बाळाला नाकारण्याचं एक कारण काय असू शकतं..
16 Oct 2013 - 12:13 pm | शिल्पा नाईक
ऑफीस मध्ये असल्याने नंतर बघेन. (वीकिवर थोडी कथा वाचली पण नीट कळल नाही) पण या स्त्रियांनी अधिच योग्य ती काळजी घ्यायला हवी की नाही. जन्माला घालून तुम्ही त्यांचे (बाळांचे) कीत्ती हाल करता. तेव्हा खरच काहीच नसेल का वाटत यांना?
17 Oct 2013 - 11:44 am | कोमल
भयंकर चित्रपट आहे..
नुस्तं आठवून अंगावर काटा आला..
पाहिली होता तेव्हा वाईट धक्का बसला होता..
16 Oct 2013 - 11:35 am | मृत्युन्जय
आयला लै भारी ष्टोरी. सुखांत झाला हे वाचुन बरे वाटले. लोकांनी "काळजी" घ्यावी हे उत्तम.
16 Oct 2013 - 3:27 pm | अग्निकोल्हा
.
16 Oct 2013 - 4:04 pm | हर्षद खुस्पे
तसा हा प्रश्न गंभीर आहे सर्वसाधारण सरकारी ईस्पितळामध्ये आपण सांगितली त्या प्रमाणे प्रोसेस असते. इथे पण NGO बोलावून सगळं पार पडावे लागते. आमच्या आमच्या कडे सकाळच्या OPD ला एक अंदाजे १६-१७ वर्षाची रुग्ण वडीलांच्या बरोबर आली होती. सर्वसाधारण तपासणीमध्ये शंका आल्यावर त्या रुग्णाला आमच्याकडील गर्भधारणा तपासणी (Urine Pregnancy Test) करायला सांगितली. तपासणी पूर्णपणे negative आली, पण अनुभव काही वेगळाच सांगत होता म्हणून बाहेर pathology lab मध्ये पाठवलं. तिथुन फोन आला की लघवी म्हणून रुग्णाने पाणी दिले आहे.
रिपोर्ट घेऊन रुग्ण परत आली, मग तिच्य़ा वडीलांना बाहेर उभे करून आमच्या सिस्टर ने विश्वासात घेउन विचारले की खर सांग पाणी का दिलेस तू तपासणीला. त्यावर तिने सांगितले की एका मुलावर प्रेम आहे आणि त्यातून हे झाले आहे. तिच्या वडिलांना खूप मोठा धक्का बसला. पुढे त्यांनी खाजगी दवाखान्यामध्ये तिचा गर्भपात केला असे ऐकण्यात आले. ही घटना कोकणामधिल एका खेडेगावामध्ये घडली आहे हे विशेष.
16 Oct 2013 - 4:44 pm | परिंदा
मागे मालाडला एक घटना घडलेली. एक नवजात बालक कचर्याच्या डब्याजवळ टाकून दिले होते. त्याला कावळे टोचत होते. ते रडू लागल्यावर मग लोक जमा झाले आणि ते बालक पोलिसांच्या हवाली केले. :(
16 Oct 2013 - 4:50 pm | बॅटमॅन
खतरनाक कथा........इतकेच म्हणतो. अजून काही लिहू शकत नाही.
16 Oct 2013 - 10:46 pm | मुक्त विहारि
पण नकोच....
सत्य घडणे किंवा ऐकणे फार सोपे.....पचवणे अवघड..
17 Oct 2013 - 11:40 am | सुमीत भातखंडे
पण सुखांत झाला हे बरं झालं.
अपर्णाताई आणि त्या प्रतिक्रियेच्या उत्तरात डॉक्टरांनी दिलेले अनुभव भयंकर आहेत.
18 Oct 2013 - 9:35 am | पैसा
सगळ्यांनीच आपापली जबाबदारी स्वीकारली! डॉक्टरांच्या बाबत प्रश्नच नाही. यापूर्वी अनेकदा त्यांनी केवळ उपचाराच्या पलिकडे जाऊन शक्य ते सगळं केल्याच्या कहाण्या वाचल्या आहेतच. पण त्या बाळाचं नशीब म्हणायचं.
अपर्णाने लिहिलेल्या बर्याचशा कहाण्या तर काय बोलावे? माणूस हा प्राण्यापेक्षा वाईट प्राणी आहे हे सिद्ध करणार्या आहेत. तरीही त्यातूनच नर्सेसच्या चांगुलपणाच्या जोरावर आणखीही आयुष्यं तरली गेली आहेत. अधून मधून असं चांगलं घडलेलं काही वाचायला मिळालं तर बरं वाटतं.
18 Oct 2013 - 10:51 am | माझीही शॅम्पेन
लेख छान !!!
पण इतक सविस्तर लिहिल्या साठी लेखात दिलेली नाव बदलेली असतील अशी अपेक्षा आहे !! कोणाचेही व्ययतिक आयुष्या बद्दल लिहिताना संदर्भ बदलेले पाहिजेत , बाकी तुम्ही ग्रेट आहतच !!!