ही विक्रांत वरील सत्य गोष्ट आहे.
१९९० सालच्या मे महिन्यातील. आम्ही गोव्याच्या आसपास समुद्रात युद्ध सराव करीत होतो.
एकदा दुपारी १२.३० ते १३.३० अशा जेवणाच्या वेळेत मी जेवून आमच्या विक्रांतच्या ब्लू रूम मध्ये बडीशेप चघळत होतो तेंव्हा नौदल पोलिस अधिकारी उमेश चंद्रा माझ्या बाजूला बसला होता. दीड वाजण्याच्या ५-१० मिनिटे अगोदर तो मला म्हणाला एका मूर्ख सैनिकाची शिस्तभंग कारवाई करायची आहे तेंव्हा मी आता निघतो. मी त्याला सहज विचारले काय केस आहे? तो म्हणाला एक बिनतारी विभागाचा सैनिक विचित्रपणे वागतो आणि काम नीट करीत नाही. मी विचारले काय करतो. तर उमेश म्हणाला कि हा रात्री २ वाजता पूर्ण गणवेशात आमच्या विभागाबाहेर सुट्टीसाठी उभा होता.आता विक्रांत भर समुद्रात असताना हा पठ्ठ्या घरी कसा जाणार होता ते मला कळेना. म्हणून माझी उत्सुकता चाळवली गेली. मी पुढे खोदून विचारले कि आणि काय करतो/ उमेश म्हणाला हा असा रात्री बेरात्री सुट्टीसाठी येतो आणि दिवस कामाच्या वेळेत झोप काढतो म्हणून त्याच्या विभागाकडून तक्रार आली आहे. आणि महत्त्वाचे बिनतारी संदेश वेळेत देत नाही म्हणून त्याला विभागाची कोणतीही जबादारीची कामे देत नाहीत.
यावर मी उमेश चंद्राला एक विनंती केली कि मला या सैनिकाला भेटायचे आहे आणि जर शक्य असेल तर त्याची कारवाई उद्या कर.उमेश ने ते मान्य केले.
मी त्या सैनिकाला माझ्या दवाखान्याच्या खोलीत २ वाजता बोलावले त्याचे नाव होते पी के सिंग.याची जवळ जवळ १९ वर्षे नोकरी झालेली होती. तो आला तेंव्हा एखादा सर्वसाधारण सैनिक असावा तसा होता.त्याचे नाव गाव पत्ता सर्व विचारले अगोदर कोणत्या जहाजावर होता ते विचारले.जवळ जवळ पंधरा मिनिटे बोलणे झाले पण विशेष असे काहीच नव्हते.त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायला सुरुवात केली.बायको बद्दल विचारले तेंव्हा तो म्हणाला तिच्या बद्दल काही न बोलणे चांगले. मी खोदून विचारले तरी तो म्हणाला सर्व ठीक आहे.हे "न बोलणे चांगले" हे मला कुठेतरी डाचत होते. बराच वेळ बोलल्यावरही तो बायकोबद्दल बोलायला तयार नव्हता. शेवटी मी त्याला जायला सांगितले. फोन करून त्याच्या विभागीय चीफ(चीफ पेट्टी ऑफिसर )ला बोलावले
चीफ साहेबना विचारले तेंव्हा ते म्हणाले सर पी के सिंग जेंव्हा समुद्रावर असतो तेंव्हा ठीक असतो जेंव्हा बोट किनार्याला लागते तेंव्हा हा विचित्र वागतो. मी विचारले म्हणजे काय .ते म्हणाले कि हा घरी गेला रोज बायको बरोबर भांडणे होतात. मी विचारले कोणत्या विषयावर त्यावर ते म्हणाले कि हा म्हणतो कि माझी बायको लफडेबाज आहे. मी परत विचारले कि ती कशी आहे? ते म्हणाले त्याची बायको साधी सरळ आहे पण हाच माणूस विक्षिप्त आहे. भांडणे होतात म्हणून मी माझ्या पत्नीसोबत त्याच्या घरी गेलो तर मला म्हणतो कसा कि लफडे लपवायला आता तुम्ही बायकोला बरोबर घेऊन आलात. परत मी त्याच्याकडे जाणे टाळले. उगाच माझ्या बायकोलाच संशय येईल. दुसर्याचे सांभाळताना माझ्या घरी उगाच भांडणे होतील.
मी पी के सिंग ला परत बोलावले आणि विचारले कि बायको बरोबर तुझे सारखे भांडण का होते? तर तो फक्त एवढेच म्हणत होता कि सर ती बाईच तशी आहे.त्याच्या शी परत अर्धा तास गप्पा मारल्यावर फार काही निष्पन्न झाले नाही.
मी परत त्याच्या विभागाच्या वरिष्ठ मास्टर चीफ साहेबाना बोलावले ते म्हणाले कि पी के सिंग धड बोलत नाही कामावर लक्ष नसते रात्रि अपरात्री सुट्टीसाठी येतो त्याच्यावर आता आम्ही जबाबदारीची कामे टाकणे सोडून दिले आहे. मी मास्टर चीफ साहेबाना विचारले कि आपण त्याच्या घरी गेला होतात काय ? त्यावर ते म्हणाले कि त्याच्या घरी गेलो तर तो माझ्या बायकोशी लफडे करायला आलात काय म्हणून मला विचारतो.आणि काल तर हद्द झाली. त्याच्या बायकोचा भाऊ(मेहुणा) आला होता तर हा म्हणतो कि " अब मुझे मालूम है कि भाई बहन मे क्या चल रहा है" हे ऐकल्यावर मी ताबडतोब उमेश चन्द्रा ला फोन लावला आणि सांगितले कि मला पी के सिंग ला मनोविकार तज्ञाला दाखवायचे आहे आणि सध्या तरी त्याच्या वरील शिस्तभंग कारवाई स्थगित करा.मी विक्रांतच्या कैप्टन ला भेटून वरील सर्व हकीकत सांगितली आणि त्याला मनोविकार तज्ञाकडे भरती करण्याची परवानगी मागितली.
बोट जेंव्हा किनार्याला आली तेंव्हा मी त्याला नौदलाच्या कुलाब्याच्या अश्विनी रुग्णालयात भरती केले.
निदान -chronic paranoid schizophrenia. या रोगात रुग्णाला delusions (false but unshakable belief) किंवा छद्मी ठाम विश्वास असतो.पी के सिंग ला आपली बायको चारित्र्य हीन आहे असा ठाम विश्वास होता त्यामुळे तो कायम संशयग्रस्त झालेला होता आणि तिन्ही त्रिकाळ त्याच्या डोक्यात हाच विचार घोघावत राहत असल्याने त्याला रोजचे काम नीट करणे कठीण झाले होते.
त्यानंतर मी अश्विनी रुग्णालयात पुढ्च्या एक महिन्यात ६-७ वेळा गेलो होतो तेंव्हा आमच्या मनोविकार तज्ञ कर्नल पेठे यांच्याशी बरीच चर्चा झाली( मी त्यांच्या हाताखाली ३ महिने काम केले असल्याने त्यांच्याशी संबंध घरगुती होते) त्यांनी माझे निदान बरोबर आहे हे सांगितले पण त्यांनी सांगितले कि मी या सैनिकाला नोकरीतून निवृत्त करण्याची शिफारस करीत आहे
मी चमकून विचारले कि सर तो मुळात ६ महिन्यात निवृत्त होणार आहे त्यावर सर म्हणाले कि या रोगावर कायमचा उपाय नाही आणि तो रोगी पूर्ण बारा होत नाही. यात हा माणूस बायकोच्या चारित्र्याचा संशय घेत राहतो आणि त्यात एखादे वेळेस तो तिची हत्या करण्याची शक्यता आहे. त्याला मनोविकारासाठी निवृत्त केले तर सरकारी नियमानुसार त्याला मिळणारे निवृत्तीवेतन हे बायकोच्या नावावर जाते. म्हणून निदान पैशाच्या लोभासाठी तरी तो बायकोची हत्या करणार नाही
प्रतिक्रिया
22 Mar 2013 - 2:46 pm | इरसाल
कठीणच आहे सगळं
22 Mar 2013 - 5:08 pm | शिद
खरचं कठीण आहे...पण नेहमी घराच्या बाहेर असल्यामुळे कदाचीत त्याची मानसिक स्थिती अशी संशयी झाली असावी अशी शक्यता मला वाटते. हे घरापासुन दुर राहण्यार्यां सर्वांबद्दल सरसकट विधान नाही हे कृपया धान्यात घ्यावे.
24 Mar 2013 - 8:57 pm | सुबोध खरे
शिद साहेब,
स्किझो फ्रेनिया हा आजार मुळातून असावा लागतो तो वेगळा राहिल्यामुळे होत नाही दुर्दैवाने पी के सिंग चा आजार हा बरा न होण्यातला होता त्यामुळे प्राप्त परिस्थितीत जे शक्य होते ते आमच्या पेठे सरांनी केले.
मी सरांच्या हाताखाली काम करीत असताना त्यांना एक शंका विचारली होता कि सर फक्त ३ महिने मनोविकार शास्त्रा (psychiatry ward)मध्ये काम करून मी मनोविकाराबाबत किती शिकू शकेन. त्यावर त्यांनी सांगितले कि तुला कोणत्या रुग्णाला मनोविकार तज्ञाकडे पाठवायचे तेवढे कळले तरी मला पुरे आहे. सुदैवाने हे ३ महिने मला आयुष्यात पुढे खूप उपयोगी पडत आहेत.
22 Mar 2013 - 3:13 pm | बॅटमॅन
च्यायला!!! पण प्राप्त परिस्थितीत मार्ग काढणार्या या अधिकार्यांना मानलं ब्वॉ एकदम.
22 Mar 2013 - 4:18 pm | दादा कोंडके
असंच म्हणतो.
22 Mar 2013 - 5:13 pm | ५० फक्त
प्राप्त परिस्थितीत मार्ग काढतात म्हणुन तर ते ' अधिकारी ' होउ शकतात ना .
22 Mar 2013 - 5:29 pm | मैत्र
बरेचदा तुमचे अनुभव म्हणजे सहजपणे नजरेला न येणारा तिसरा विचार करण्याची क्षमता आणि योग्य तो कायदेशीर मार्ग काढून तो अमलात आणणारे अधिकारी.
आळशांचा राजा यांची आठवण आली.. खूप महिन्यात त्यांचा लेख नाही..
22 Mar 2013 - 3:29 pm | मन१
पण पूर्वी वाचल्यासारखं वाटत्य तुमच्याचकडून
22 Mar 2013 - 4:07 pm | मोदक
chronic paranoid schizophrenia.
ह्म्म्म..
22 Mar 2013 - 4:54 pm | तुषार काळभोर
पण, आपण जेथे नोकरी केली, तेथील प्रसंग सार्वजनिक रित्या सांगणे, हा नियमभंग नाही का?
नियमभंग नसेल तर, खरंच हे अनुभव प्रसिद्ध व्हायला हवेत. खूप वेगळं जग आहे.
22 Mar 2013 - 6:44 pm | सुबोध खरे
पैलवानसाहेब
वरील प्रसंग हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि याचा भारतीय गुप्ततेच्या कायद्याशी संबंधित माहिती शी संबंधित नाही त्यामुळे हे सार्वजनिक ठिकाणी सांगणे यात कोणताही गुन्हा नाही किंवा नियम भंग सुद्धा नाही .दुसर्याचा अनुभव त्यांना श्रेय न देता किंवा त्यांच्या परवानगीशिवाय लिहिणे हे वांडमय चौर्य होईल.
22 Mar 2013 - 7:58 pm | तुषार काळभोर
मी फक्त काळजीतून बोलून दाखवलं. नथिंग पर्सनल!
22 Mar 2013 - 5:20 pm | प्यारे१
डॉक्टरांचे अनुभव.
22 Mar 2013 - 5:41 pm | मनराव
उत्तम अनुभव.....तुम्ही आणि तुमच्या सहकार्यांनी केलेलं काम स्तुत्य आहे.....
22 Mar 2013 - 6:40 pm | सुबोध खरे
रामन राघव नावाचा खुनी माणूस हा १९६०-७० या दशकात या रोगाने आजारी होता आणि हि केस आम्हाला फोरेन्सिक मेडिसिन (न्यायवैद्यक शास्त्रात) अभ्यासाला होती
http://en.wikipedia.org/wiki/Raman_Raghav
22 Mar 2013 - 7:42 pm | रेवती
बापरे! अवघड जबाबदारी होती तुमच्यावर.
22 Mar 2013 - 9:34 pm | jaypal
कठीण परीस्थीती मधे माणुसकी,प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठा सांभाळून असे व्यापकहिताचे निर्णय घेणा-या तुम्हां सारख्यांना मझा मानाचा मुजरा.
![psyco](http://t0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcQ35yPReRvnNmxvMIE8ga9X-ANNwvb2LhjXZxNeeuv5f2O7l2MOnA)
अवांतर १) आशा करतो की प्रसंग "खरे"खुरे असले तरी नावं बदललेली असावित.
२) मिपा वरील काही धागे/प्रतिसाद पाहता(विषेशतः डु. आयडी. वाले) मला त्यांच्यात देखिल दडलेला पी.के.सिंग दिसतो ;-) मी काय करु?
22 Mar 2013 - 9:36 pm | रेवती
:)
23 Mar 2013 - 12:41 pm | स्वाती दिनेश
एक वेगळेच अनुभवविश्व तुम्ही आमच्यासमोर ह्या मालिकेतून मांडत आहात,वाचते आहेच..
स्वाती
23 Mar 2013 - 4:59 pm | वैशाली हसमनीस
वेगळाच अनुभव.उत्तम लेखन.
24 Mar 2013 - 6:48 am | धमाल मुलगा
अनुभवकथन आवडलं.
ज्या पोटतिडिकीनं तुम्ही हे प्रकरण धसास लावलं त्याचं कौतुक करावं तितकं थोडं. जर तुम्ही असा निर्णय घेतला नसता, तर कदाचित त्या वायरलेस ऑपरेटरची परिस्थिती आणखी कशी अन काय बिघडत गेली असती, तन त्याहून अधिक त्याच्यामुळं नौदलाला आणि त्याच्या कुटुंबियांना किती अन कसा त्रास झाला असता ह्याचा विचार करवत नाही. :(
डॉक्टरसाहेब, लिहिते रहा! आम्हा 'ब्लडी सिव्हिलियन्स'ना वस्तुस्थितीची अशी जाणिव करुन देत रहा.
प्रचंड कामाच्या ओझ्याखाली, कुटूंबियांपासून दूर राहणार्या अश्या कित्येक के.पी.सिंग नी असे त्रास सोसत आम्ही सुखरुप जगावं म्हणून आपल्या आयुष्याची धुळधाण करुन घेतली असेल. आम्हाला मात्र त्याचं काहीच नाही.
24 Mar 2013 - 12:58 pm | साऊ
मी तुमचे बकिचे लेखसुद्धा वाचले.
अनुभव खरच वेगळे आहेत, अम्हा सिव्हिलीयनपेक्षा नाही?
25 Mar 2013 - 3:58 pm | सुमीत भातखंडे
अनुभव
25 Mar 2013 - 4:28 pm | मदनबाण
आपले अनुभव वाचत आहे...
15 Sep 2016 - 1:39 pm | डॉ श्रीहास
जनरल प्रॅक्टीश्नर किंवा फिजीशिअनच्या ओपीडी मध्ये किमान ३०% पेशंट्सना मानसिक आजारांची लक्षणे अाढळलेली असतात, निदान होणे किंवा अंदाज येणे पण बरेचदा कठीण असते.. सर तुमच्या निदान कौशल्याला मनापासून सलाम.. _/\_
15 Sep 2016 - 9:03 pm | सुबोध खरे
डॉक्टर साहेब
इंटर्नशिप नंतर मी तीन महिने मनोविकार शास्त्राच्या वॉर्ड आणि व्यसनमुक्ती केंद्र मध्ये काम केले असल्याने त्या विषयाबद्दल मला थोडीशी माहिती झाली होती. निदान कोणत्या रुग्णाला मनोविकारतज्ञा कडे पाठवायचे एवढे मला समजू लागले होते. कौशल्य वगैरे फार मोठे शब्द आहेत.
बाकी '३०% पेशंट्सना मानसिक आजारांची लक्षणे अाढळलेली असतात" हि गोष्ट सत्य आहे. पण आपल्याकडे मनोविकार तज्ञाकडे जाणे म्हणजे कलंक आहे असे मानले जाते. मागच्या आठवड्यात माझ्याकडे एक गरोदर स्त्री आली होती तिला गरोदरपणात स्किझोफ्रेनियाचा झटका आला होता त्यामुळे तिला ECT( electro convulsive therapy) चा उपचार चार वेळेस द्यायला लागला होता. सिनेमाच्या प्रभावामुळे आपल्या बाळाला काही वाईट होईल या भीतीने ती काळजीत होती. दुर्दैवाने या उपचाराचा कोणताच साईड इफेक्ट होत नाही हे मनोविकार तज्ञ सोडून कोणालाच माहित नव्हते. त्यातून तिची सासू सारखी ते शॉक दिले आहेत, बाळ कसं आहे हे काळजीने विचारत होती. सिनेमात दाखवलेल्या भयंकर तर्हेमुळे ECT( electro convulsive therapy) सारख्या उपचाराला लोक सहज सहजी तयार होत नाहीत आणि ज्यांना तो उपचार दिला जातो तो रुग्ण म्हणजे पार कामातून गेला आहे असेच लोक संमजतात.
बाकी हिस्टेरिया,इरिटेबल बॉवेल सिंड्रोम इ रोग तर मनोविकार आहेत हे तर समाजाला सहजी स्वीकृत होणारच नाहीत.
16 Sep 2016 - 1:22 pm | डॉ श्रीहास
धन्यवाद सर, इतका त्वरित प्रतिसाद अनपेक्षित होता ....
सायकॅट्रीबद्दल मलापण प्रचंड कुतुहल आहे... फक्त निरीक्षणातून सुध्दा अनेकदा योग्य निदान करू शकलो आहे ; पण रूग्ण आजही सायकॅट्रीस्ट कडे जाणं म्हणजे फार वाईट किंवा ECT घ्यावीच लागणार, तसेच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे सिनेमांमधून भीषण चित्रं उभं केलयं त्याचा तर क्षणोक्षणी प्रत्यय येतो.
मी श्वसनविकार तज्ञ आहे मला पण रोजच इन्हेलर प्रिसक्राईब करतांना हे असेच अनेक प्रश्न आणि गैरसमजुतींना सामोरं जावं लागतं(त्यावर मला सविस्तर लिहायचं आहेच).
16 Sep 2016 - 5:20 pm | रुस्तम
लेखाची वाट पाहत आहोत...
16 Sep 2016 - 5:32 pm | जेपी
डॉक ,
शॉक देण्यामुळे मेमरी लॉस होते अस ऐकुन आहे.
16 Sep 2016 - 6:24 pm | सुबोध खरे
जे पी शेठ
काही रुग्णांच्या बाबतीत रुग्ण सुधारण्याच्या अगोदरच्या काळातील घटना किंवा प्रसंग रुग्णाला लक्षात राहत नाहीत. याला (पूर्वकालिक विस्मरण) रेट्रोग्रेड ऍम्नेशिया म्हणतात. डोक्याला मार लागल्यावरही असे होऊ शकते कि रुग्णाला काय झाले आणि कशामुळे आपण बेशुद्ध झालो हे आठवत नाही.
तसेच रुग्ण काही काळ गोंधळलेला असू शकतो. पण हा नक्की ECT चा परिणाम आहे कि स्किझो फ्रेनियाचा हे सहजा सहजी सांगता येत नाही. परंतु नैराश्य आल्यामुळे एखादा माणूस जेंव्हा आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो त्यावेळेस आपत्कालीन उपचार म्हणून ECT दिली जाते. ( अन्यथा ३०-४०% रुग्ण परतं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करु शकतात) आणि नैराश्यावर असलेल्या औषधांचा पूर्ण परिणाम होण्यासाठी ३ आठवडे पर्यंत लागू शकतात
साधारणपणे काही दिवसात ते महिन्यात हे (पूर्वकालिक विस्मरण) रेट्रोग्रेड ऍम्नेशिया बरा होऊन जातो.
आतापर्यंत उपलब्ध असलेल्या संशोधनाप्रमाणे मेंदूला कोणतेही कायमस्वरूपी नुकसान आढळून आलेले नाही.
बाकी किरकोळ दुष्परिणाम म्हणाल तर डोकेदुखी, अंगदुखी, मळमळणे सारखे परिणाम एक दोन दिवस पर्यंत राहू शकतात. हे बरेचसे त्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या भूल देणाऱ्या औषधांचे जे कोणत्याहीशल्यक्रियेनंतरही होऊ शकतात)
परंतु एकंदर या उपचार पद्धतीचा फायदा त्याच्या दुष्परिणामांपेक्षा किती तरी जास्त आहे. परंतु सिनेमा मध्ये ज्यातऱ्हेने या उपचाराबद्दल "भयानकता" दाखवलेली आहे त्यामुळे सुशिक्षित लोकसुद्धा याला सहजासहजी तयार होत नाहीत.
वरील रुग्ण हि गरोदर होती आणि वाढणाऱ्या गर्भावर औषधांचे होणारे परिणाम टाळण्याच्या दृष्टीने हि ECT औषधांपेक्षा जास्त चांगली असल्याचे आढळून आलेले आहे. शिवाय रोगामुळे(स्किझो फ्रेनिया) ती स्वतः किंवा बाळाकडे दुर्लक्ष केल्याने जे दुष्परिणाम होतात तेही ती सुधारल्याने आपोआप कमी होतात(हि स्त्री आता स्वतःची आणि गर्भाची जास्त चांगली काळजी घेऊ शकते)
16 Sep 2016 - 6:04 pm | चंपाबाई
छान