“देर आये पर दुरुस्त आये!”, भुजबळकाका चावडीवर प्रवेश करत.
“कशाची दुरुस्ती आणि कोण आलेय दुरुस्तीला?”, नारुतात्या खवचटपणे.
“अहो नारुतात्या, भोचकपणा सोडा!”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात.
“नारुतात्या खास तुमच्यासाठी, शिवसेनेची दुरुस्ती आणि दुरुस्तीला आलेत शिवसैनिक”, इति भुजबळकाका.
“कसली दुरुस्ती? काय म्हणायचे आहे तुम्हाला?”, घारुअण्णा चेहरा वाकडा करत.
“जे काम बाळासाहेबांनी फार पूर्वीच करायला हवे होते ते ह्या दसरा मेळाव्याला शिवसैनिकांनी केलं, झालं!”, इति भुजबळकाका.
“अच्छा म्हणजे सरांविषयी बोलता आहात तर आपण”, चिंतोपंत चर्चेत येत.
“हो! ‘मनोहर जोशी परत जा’, ‘मनोहर जोशी चले जाव’, शिवसैनिकांच्या अशा घोषणांमुळे सरांना व्यासपीठच नव्हे तर मेळावा सोडून जावे लागले.”, भुजबळकाका शांतपणे.
“अहो, हे तर धक्कादायक आहे!”, आता शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात येत.
“हो ना! हे जरा अतीच झाले आणि काय हो बहुजनहृदयसम्राट ह्यात तुम्हाला का एवढा आनंद झाला आहे?”, चिंतोपंत जराशा त्राग्याने.
“आनंद नाही झालाय पण जे काही झाले ते खूप उशीरा झाले असे म्हणायचे आहे. अहो, खाजवून खरूज काढायचे आणि ते चिघळले की बोंबा मारायच्या असे झाले हे सरांचे चिंतोपंत”, भुजबळकाका.
“म्हणजे काय? कसली खरूज?”, नारुतात्या बुचकळ्यात पडत.
“अहो, दादरला एका नवरात्र मंडळाच्या कार्यक्रमाला गेल्यावर त्यांनी दिली काडी लावून. ‘शिवसेनेचे नेतृत्व आता बाळासाहेबांसारखे आक्रमक राहिले नाही’ ‘असे स्फोटक विधान केले. ती आक्रमकता विसरल्याने अनेक समस्या निर्माण झाल्याची खंतही वर त्यांनी व्यक्त केली. आहे की नाही मज्जा!”, भुजबळकाका उपहासाने.
“बाळासाहेबांच्या स्मारकाचा खांदा करून, त्यावर बंदूक ठेवून त्यांनी उद्धवावर गोळ्या डागण्याचा प्रयत्न केला खरा पण तो अंगाशी आला.” इति बारामतीकर.
“अगदी बरोबर बोललात बारामतीकर! अहो सरांचा हा बामणी कावा आजचा नाहीयेय. अगदी शिवसेनेत बाळासाहेबांच्या जवळ पोहोचल्या पासूनचा आहे.”, भुजबळकाका शांतपणे.
“ओ बहुजनसम्राट असलात म्हणून उगाच काहीही बरळू नका! कसला बामणी कावा? वाट्टेल ते बोलाल काय?“, चिंतोपंत.
“अहो चिंतोपंत, इतिहास गवाह है! बहुजन समाजात, तळागाळापर्यंत शिवसेना पोहोचविण्याचे काम ज्या छगनरावांनी केले त्यांच्यावरच शिवसेना सोडण्याची वेळ यावी यामागे कोणाचा आणि कोणता कावा होता हे सर्वांना माहिती आहेच.”, इति भुजबळकाका.
“बरं! ज्या शिवसेनेमुळे आणि बाळासाहेबांमुळे त्यांचे स्वतःचे अब्जावधी रुपयांचे साम्राज्य त्यांनी उभे केले त्यांच्याच स्मारकावरून राजकारण करावे ही मात्र हद्द झाली.”, बारामतीकर तावातावाने.
“ 'बाळासाहेबांची भाषा आपण वापरत नाही, म्हणून त्यांचे स्मारक होण्यास विलंब होत आहे. त्यांची भाषा वापरली असती तर आतापर्यंत त्यांचे स्मारक उभे राहिले असते आणि आता स्मारकासाठी आंदोलन उभे राहिले तर त्यासाठी उभा राहणारा पहिला सैनिक मी असेन', असली काहीतरी कावेबाज स्टेटमेंट पत्रकारांना देण्याची ही काही त्यांची पहिलीच वेळ नाही”,भुजबळकाका
“अहो खरंआहे , एवढा जर पुळका होता स्मारकाचा तर द्यायचा एक कोपरा कोहिनूर मिलचा स्मारकासाठी पण नाही.”, इति बारामतीकर.
“अहो, मुळात स्मारक स्मारक हवेच कशाला! त्याने काय असे भले होणार आहे?”, नारुतात्या एकदम भंजाळून जात.
“अहो, इथे स्मारक हवेय कोणाला, त्याच्या आडून राजकारण करायला मिळते ना!”, बारामतीकर.
“अहो शिवसेनेत आल्यापासून फक्त राजकारणच आणि तेही घाणेरडे राजकारण करणारे सर काय म्हणताहेत बघा ‘राजकारण आणि धोरणीपण एकत्र असतात. बाळासाहेब २0 टक्के राजकारणी आणि ८0 टक्के समाजकारणी होते. त्यांनी राजकारणाला नाही तर समाजकारणाला महत्त्व दिले. बाळासाहेब निवडणुका जिंकणारे राजकारणी नव्हते, म्हणूनच ते आदर्श राजकारणी होते.’, आहे की नाही मज्जा आणि चिंतोपंत, तुमच्यासाठी ‘बामणी’ हा शब्द वगळतो, पण ह्यात तुम्हाला कावा दिसत नाही?”, भुजबळकाका हसत.
“अहो, साहेबांच्या जवळ असल्याने ह्यांनी स्वतःच्या फायद्याचे राजकारण करून, स्वतःचे भले करून घेतले खरे पण त्याचबरोबर शिवसेनेचे भले करण्याऐवजी नुकसानच केले त्यांनी. बाळासाहेबांनी मुख्यमंत्रिपदी बसवले त्याचीही चाड ठेवली नाही.”, बारामतीकर.
“चालायचेच, तुमच्या साहेबांच्याच जास्त जवळ आहेत म्हणे ते बाळासाहेबांपेक्षा, वाण आणि गुण लागायचाच मग!”, नारुतात्या गालातल्या गालात हसत.
“नारुतात्या, उगाच आमच्या साहेबांना मध्ये आणायचे काम नाही!”, बारामतीकर जरा चिडून.
“का हो का? शिवसेना आणि बाळासाहेब ह्या चर्चेत पवारसाहेबांचा विषय येणे अपरिहार्यच आहे हो!”, नारुतात्या गालातल्या गालातले हसणे चालू ठेवत.
“नारुतात्या, पोरकटपणा करून उगाच विषयांतर करू नका!”, भुजबळकाका वैतागत.
“अहो, बहुजनहृदयसम्राट, नारुतात्यांच्या बोलण्यात तथ्य आहे”, सोकाजीनाना मिश्किल हसत.
“ऑ?”, घारुअण्णा एकदम चमकून.
“अहो, दक्षिण-मध्य मुंबईच्या उमेदवारीवरून कोंडी झाल्याने दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची त्यांनी घेतलेली भेट आणि त्यानंतर त्यांनी दादरला नवरात्र मंडळात केलेला मेलोड्रामा ह्यात एक छुपे कनेक्शन नक्कीच आहे.”, सोकाजीनाना मिश्किल हसणे कायम ठेवत.
“सोकाजीनाना, स्पष्ट बोला ब्वॉ! ह्या खोपडीत काही शिरले नाही.”, नारुतात्या हार मानत.
“सोपे आहे हो सगळे. मुंबईचा नगरसेवक, स्थायी समिती प्रमुख, महापौर, विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभाध्यक्षपद असा प्रवास आणि जमा केली अफाट माया ह्यावर माणसाने ह्या वयात संतुष्ट असायला हवे की नाही? पण पंतांचा लोभ काही सुटत नाही. थोडा हे थोडे की जरुरत है असेच त्यांचे अजूनही चालले आहे. लोकसभेच्या उमेदवारीचा लोभ आणि ती धोक्यात येताना दिसणारी उमेदवारीच ह्या सगळ्या मर्कटलीला करण्यास त्यांना भाग पाडत आहे.”, सोकाजीनाना
“अहो पण सोकाजीनाना, त्याने उद्धवावर तोफा डागून काय होणार आहे?”,चिंतोपंत प्रश्नांकित चेहेर्याने.
“अहो तीच तर सरांची खासियत आहे! आधी टीका करायची मग ‘राजकारणाची आवड असेल तर उत्तम लोकप्रतिनिधी होता येते. निवडणुकीचे राजकारण करून मार्गदर्शनही करता येते. मी जुन्या काळातला नेता असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माझ्याबाबत जो निर्णय घेतील, तो मला मान्य आहे’ असली वक्तव्ये करून दबावाचे राजकारण करायचे हा सरांचा फार आवडीचा आणि जुना उद्योग आहे आणि सर त्या उद्योगात एकदम पारंगत आहेत. पण आता ‘होते’ असे म्हणावे लागेल. कारण दसरा मेळाव्यात ज्या पद्धतीने त्यांना उद्धवने कॉर्नर केले ते पाहता सरांची शिवसेनेतली सद्दी संपली याचे सूतोवाच करते.”, सोकाजीनाना पुढे बोलत, “सर व्यासपीठावर येताच शिवसैनिकांकडून त्यांना परत जाण्यास सांगणार्या घोषणा सुरू झाल्या. त्यात युवा शिवसैनिकांचा भरणा होता. शिवसैनिकांच्या गोंधळाला शिवसेना नेत्यांची मूकसंमती असल्याचे वाटावे अशी परिस्थिती होती. मनोहर जोशी यांनी व्यासपीठ सोडून जावे ही शिवसैनिकांची भावना असल्याचे चित्र उद्धव यांनी निर्माण केले. सर जेव्हा व्यासपीठावरून जाण्यास निघाले तेव्हा त्यांना रोखण्यासाठी कोणीही गेले नाही. वरून उद्धवने पुढे भाषणात 'कोणाचीही बेबंदशाही चालवून घेतली जाणार नाही' असा शालजोडीतलापण दिला!”
“थोडक्यात काय, सुंभ जळला तरीही पीळ जात नाही अशी, ‘राजकारणी आणि कावेबाज’ मनोहरपंत सरांची, आजची अवस्था आहे! काय पटते आहे का? चला, चहा मागवा!”, मंद हसतसोकाजीनाना.
भुजबळकाकांनी हसत हसत चहाची ऑर्डर देण्यासाठी टपरीवाल्या बबनला हाक मारली.
प्रतिक्रिया
14 Oct 2013 - 2:46 pm | मुक्त विहारि
एकाच दगडात लै पक्षी मारले राव....
(मेलेले पक्षी मोजण्यात गर्क आहे.)
14 Oct 2013 - 2:58 pm | अनिरुद्ध प
+१११ सहमत.
14 Oct 2013 - 2:47 pm | विजुभाऊ
अवांतरः वरील चित्रातील सर्वच्या सर्व व्यक्ती मिशाळ का दाखवल्या आहेत. नारुतात्या मिशा ठेवत नाहीत.
14 Oct 2013 - 2:54 pm | मुक्त विहारि
ह्यातले त्रिलोकेकर कोण?
ते देवानंद (ज्वेल थीफ) टाईप टोपी घातलेले का?
14 Oct 2013 - 3:03 pm | सोत्रि
मुवि,
इथे चेक करा. इथे सर्वांची सचित्र ओळख आहे!
- (चावडी आवड्णारा) सोकाजी
14 Oct 2013 - 3:11 pm | मुक्त विहारि
मस्त ओळख करून दिलीत राव
(अद्याप चावडी दुरुनच बघणारा) मुवि..
14 Oct 2013 - 3:17 pm | विटेकर
बेष्ट टायमिंग.. आज काहीतरी अपेक्षित होतेच या विषयावर
14 Oct 2013 - 4:06 pm | अग्निकोल्हा
पण काय हो चित्रात सोकाजीनानांना जरा जास्तच साइडव्हिव देण्याचे विषेश प्रयोजन ? उगाच चावडित असुन नसल्यासारखी नजर झाली ना त्यांची. अन अस्मादिक तर डिट्टो हम-तुम मधलेच दिसतात :)
14 Oct 2013 - 3:23 pm | सोत्रि
ऑ????
ते कुठे आफ्रिकेत भेटले का तुम्हाला? :O :O :O
-(विजूभाऊ नेमके काय लावून बसले असतील असा विचार करणारा) सोकाजी
14 Oct 2013 - 5:44 pm | विजुभाऊ
-(विजूभाऊ नेमके काय लावून बसले असतील असा विचार करणारा) सोकाजी
अमारुला अमारुला अमारुला
14 Oct 2013 - 3:32 pm | सौंदाळा
देर आये पर दुरुस्त आये..
लेखाबद्दल पण हेच म्हणतो, खुप दिवसांनी चावडीवर जमले सगळे
14 Oct 2013 - 5:26 pm | पैसा
फण्टास्टिक!!
14 Oct 2013 - 5:56 pm | प्यारे१
जास्त विश्लेषणाच्या भानगडीत पडू नका हो!
उगाच 'फोन' यायला सुरुवात व्हायची. ;)
-थोड्याच दिवसात एखाद्या वृत्तपत्रात सोकाजीची चावडी 'स्सुरु' होण्याच्या प्रतीक्षेत प्यारे-कका
14 Oct 2013 - 7:49 pm | सोत्रि
शुभ बोल प्यार्या तर....
- (घाबरलेला) सोकाजी
16 Oct 2013 - 3:14 pm | अभ्या..
होऊ दे सोकाजीनाना. शुभेच्छा त्यासाठी.
नेहमीप्रमाणेच आवडली आहे चावडी. दिवाळीत पण लागू देत फुल्बाज्या.
14 Oct 2013 - 7:41 pm | उपास
मस्त रंगल्यात गप्पा चावडीवर..
>> मुंबईचा नगरसेवक, स्थायी समिती प्रमुख, महापौर, विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभाध्यक्षपद असा प्रवास आणि जमा केली अफाट माया ह्यावर माणसाने ह्या वयात संतुष्ट असायला हवे की नाही? पण पंतांचा लोभ काही सुटत नाही
हे तर अगदी मनातलं.. अडवाणी, शरद पवार ह्यांच्यासारखे वयस्क नेते बघितल्यावर वाटतं की तरुण पिढीने तरी किती वाट बघायची अजून पुढे यायला, राजकारण्यांना निवृत्तीचे वय का असू नये! सर सुद्धा आता त्याच पंक्तित, मागच्या निवडणुकीत सदा सरवणकरचा बाल्या केला दादरला आणि आता सरांनी हात दाखवून अवलक्षण..!
शेवटी, ज्याला कुठे थांबायचे हे कळते तोच जिंकतो...
16 Oct 2013 - 11:30 am | तुषार काळभोर
तेंडुलकर, शुमाकर आणि फेडररचं पन तेच आहे.
14 Oct 2013 - 10:27 pm | प्रचेतस
सोत्रींचे नेहमीप्रमाणेच खुमासदार लेखन.
16 Oct 2013 - 11:36 am | किसन शिंदे
फर्मास लेख हो सोकाजीनाना. बर्याच दिवसांनी चावडीतल्या गप्पांचे दणक्यात पुनरागमन झाले तर..
16 Oct 2013 - 12:00 pm | सोत्रि
आजची छगन भुजबळांची वक्तव्ये, त्यांनीं ती चावडीवरच्या गप्पा वाचून केली असावीत, इतकी मिळती जुळती आहेत!
:)
- (चावडीचा अभिमान असलेला) सोकाजी
16 Oct 2013 - 12:07 pm | सोत्रि
इथे वाचायला मिळू शकेल!
इथे बघायला मिळेल!
- (चावडीचा अभिमानी) सोकाजी
16 Oct 2013 - 12:36 pm | किसन शिंदे
हायला! खरंचच हो सोकाजीनाना. :) भुजबळ अगदी चावडीतल्यासारखे बोलताहेत.
16 Oct 2013 - 2:39 pm | निश
म्हातार झाल म्हणुन त्त्यानी सत्तेची हाव सोडावी हे बरोबर नाही. जर त्यांच्यात काम करायची धमक असेल तर त्यानी म्हातार्या वयातही निवडणुक लढवावी व ज्याना ते नको आहेत त्यानी अश्याना पराभुत कराव. पण हे होत नाही आहे असच चित्र सध्दा दिसत आहे. हे म्हातारे नेते पुन्हा पुन्हा निवडुन येतात हे नविन त्यांच्या तुलनेने तरूण असलेल्या उमेदवारांच्या प्रचाराच अपयश आहे. पंत बोलले त्यात मला वावग काहीच दिसत नाही आहे ते म्हणाले जेव्हा सज्जन माणसे सामंजस्याच्या रस्तावर चालुन जेव्हा सत्ताधारी दाद देत नाहीत तेव्हा ते सज्जन लोक मग आक्रमकतेपणा अवलंबतात. आज मुंबई महानगर पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे मुंबईच त्यानी काय मातेर केल आहे हे तुम्ही पाहीलेलच आहे. पंतांच राजकारणी म्हणून काम खुप मोठ आहे. त्यांचा झाला तो अपमान फारच वाईट होता.मुळात जेव्हा ईतर ताकदवान नेते शिवसेना सोडुन गेले त्यांचा अपमान करण तर सोडाच पण त्याना निवडणुकीत हरवु ही शकले नाही आहेत हे शिवसेना वाले. पंत हे विचार करणारे व्यासंगी नेते असल्यामूळे ते पुन्हा ह्या अपमानातुन उभे राहतील.
16 Oct 2013 - 2:59 pm | अमोल केळकर
पंत काय करुन बसलात तुम्ही :(
अमोल केळकर