पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (४)
************************************************************************************************
गुलाल करताना समाधान मिळाले पण सिनेमा रिलीज व्हायला २००९ साल उजाडावे लागले. या ना त्या कारणाने. मधल्या काळात पोटापाण्याची व्यवस्था करायलाच हवी ना! अनुराग कश्यपच्या बहुचर्चित 'ब्लॅक फ्रायडे' मध्ये थापाचा रोल केला. तो कस्टम्स इन्स्पेक्टर ज्याने पैसे खाऊन RDX ने भरलेले ट्रक्स पास करुन दिले. पुढे त्याच RDX ने मुंबईच्या नरड्यावर पाय दिला. पण हा रोल शेवटच्या एडिटिंगमध्ये कट झाला. पियुषने लिहिलेली २ गाणी मात्र 'ब्लॅक फ्रायडे' मध्ये आहेत. 'अरे रुक जा रे बंदे..' आणि 'भरम भाँप के..'. दोन्ही इंडियन ओशनने गायलीत.
हळुहळु इतर कामे मिळू लागली. मकबूल हाही मैलाचा दगड म्हणावा असा चित्रपट. मॅकबेथ् मीटस् गॉड्फादर इन मुंबई! 'बँको'च्या कॅरेक्टरवर बेतलेला 'काका' साकारताना पियुष अभिनयातला क्लास दाखवुन देतो. नासीरुद्दिन, ओम पुरी, पंकज कपूर, इरफान, तबु या जबरदस्त रथी-महारथींमध्ये पियुषचा काका अजिबात दबुन जात नाही, उलट उठून दिसतो! पोटच्या पोराची महत्त्वाकांक्षा पाहुन सुखावाणारा, साठमारीत सापडून तो चेचला जाऊ नये म्हणुन आपणच त्याला बुकलून काढणारा, हळव्या हातांनी घास भरवणारा. आधी मकबूलच्या खांद्याला खांदा लाऊन लढणारा अन मग त्याची निर्भत्सना करणारा, गोळीला गोळीने उत्तर देणारा. लक्षात राहील असा अभिनय!
आता कामं मिळू लागली होती. जरी अभिनय नाही तरी इतर काही. मनोज वाजपेयीच्या '१९७१' चा स्क्रीनप्ले, शुजीत सरकारच्या 'यहाँ' चा स्क्रीनप्ले आणि डायलॉग्ज. मधेच माधुरीच्या, यशराज फिल्म्सच्या 'आजा नचले' मध्ये एक ऑपेरा गाणेही! 'टशन' साठी गाणी आणि आमीर खानच्या 'गज़नी' साठी डायलॉग्ज. एक ना दोन..
मग २००९ मध्ये गुलाल रिलीज झाला आणि बॉलिवुडने पियुष मिश्रा या नावाची दखल घ्यायला सुरुवात केली. तो चमकलाच तसा! आधी म्हटल्याप्रमाणे हा राजकीय विषयावरचा चित्रपट. पण पियुषच्या अष्टपैलु कामाने त्यात गहिरे रंग भरले. 'राणाजी' गाण्यातले शब्द पहा: 'जब दूर देस के टॉवर में घुस जाये रे एरोप्लेन!' यातली राजकीय जाणीव, मांडणीतली स्फोटक प्रगल्भता हे मिश्रण कुठून येते? आयुष्यात घेतलेले अनुभव, मनात चरत गेलेल्या जखमा आणि उसळी घेण्याचा स्वभाव असेल कदाचित..
स्वतःच्या शैलीत, मस्तीत काम करू शकणारा पियुष आता दारूपासुन लांब राहू लागला. दारूने होणारे नुकसान फक्त शरीर उध्वस्त करते असे नव्हे तर संवेदनादेखील बोथट करते. दारूच्या कुबड्या फेकून देऊन वाटचाल करायचा निर्धार केला त्याने. आणि तब्बल पाच वर्षांच्या प्रयत्नांनी, घरच्यांच्या आधाराने आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने बाटली आडवी झाली! आता काठावर बसून शांतपणे वाहुन गेलेल्या पाण्याकडे पाहताना तो म्हणतो,
आदत जिसको समझें हो वो मर्ज़ कभी बन जाएगा
फिर मर्ज़ की आदत पड़ जाएगी, अर्ज़ ना कुछ कर पाओगे
और तबदीली की गुंजाईश ने साथ दिया तो ठीक सही..
पर उसने भी गर छोड दिया तो यार बडे पछताओगे..
आज पियुष मिश्रा या नावाला वजन आहे, ओळख मिळाली आहे. 'देवारिस्टस्' या अनोख्या कार्यक्रमात त्याचा मस्तमौला अवतार पाहाण्यासारखा आहे. सावरकरांच्या अंदमानातल्या कोठडीत गेल्यावर मन भरून आलेला, भरभरून बोलणारा पियुष बोलण्याच्या भरात जरासा फसतो. सावरकरानी अंदमान समुद्रात उडी घेतली आणि ती त्रिखंडात गाजली असे म्हणतो! पण नंतरचा त्याचा रचणारा, गाणारा अवतार नेहेमीसारखाच 'स्ट्रेट-टु-द-पॉईंट'.
असा कलाकार बॉलिवुडमध्ये किती जणांना रुचेल, पचनी पडेल, अशी शंका येते. अर्धवट, नव्या ट्रेंडच्या मागे धावणार्या निर्मात्या-दिग्दर्शकांसाठी तो आजचा 'हटके' कलावंत आहे खरा. पण पियुष मिश्रामध्ये दडलेल्या कलागुणांना वाव देणारे, हे जालीम मिश्रण जाणीवपूर्वक हाताळणारे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच असतील.
कोण्या एका गावातल्या एकुलत्या एका विहीरीच्या पाण्यात काहीतरी ऐब आला आहे हे माहित असलेला एक माणुस. कळवळून सांगतो सगळ्यांना पण कोणी त्याचे ऐकत नाही आणि पाणी घरोघरी प्यायले जाते. ऐब असला तरी गोऽड पाणी ते! पिऊन, पिऊन गावातली इतर सगळी माणसं विचित्र वागू लागतात. पण त्या सर्वांच्या लेखी वेगळा वागणारा हा एकटाच, त्यामुळे वेड्याचा शिक्का त्याच्या कपाळी यावा यात नवल नाही!
पियुष मिश्रा हा असा एक वेडा माणुस आहे...
||समाप्त||
प्रतिक्रिया
9 Sep 2013 - 12:11 am | अनुप ढेरे
खूप आवडली ही लेखमाला. छान लिहिलं आहे तुम्ही. असच अजून लोकांबद्दल पण येऊ दे.
9 Sep 2013 - 2:08 am | किसन शिंदे
हे शाब्बास!! आत्ताच वेळ मिळाला तेव्हा शेवटचे उरलेले दोन्ही भाग अधाश्यासारखे वाचून काढले. एखाद्या गोष्टीचा विचार केला की त्यावर फार सखोल लेखन करता राव तुम्ही...सलाम त्या 'हटके' पियुषला आणि त्याला अगदीयोग्य शब्दात उभा करणार्या तुम्हालाही!
9 Sep 2013 - 5:26 am | जॅक डनियल्स
लेखमालेचा शेवट पण खूप सुंदर झाला आहे, मनाला भावून गेला.
तुमच्या लेखणीला आणि पियुष मिश्रा च्या अदाकारीला सलाम !
9 Sep 2013 - 8:48 am | पिंपातला उंदीर
अंबरीश मिश्र हा माज़ा खूप आवड़ता लेखक. तुमच्यासारखेच घायाळ करनार लिहितो. तुलना करने योग्य नाही तरीहि मोह आवरला नाही. मज़ा आला. वा. फेस बूकावर यातलि काही वाक्य टाक़त आहे. तुमची परवानगी घेऊन.
9 Sep 2013 - 9:23 am | शिवोऽहम्
हाय काय न् नाय काय! टाका चेपुवर.
मित्रांनो, तुम्हाला लेख आवडले, सर्वांनी आवर्जुन सांगितले त्याबद्दल धन्यवाद!
अंबरीश मिश्र मलाही खूप आवडतात. गांधीजींवर त्यांनी लिहिलेले एक पुस्तक 'अज्ञात गांधी' आणि दुसरे 'शुभ्र काही जीवघेणे' संग्रही आहेत. त्यांचे मौज, सा. सकाळच्या दिवाळी अंकातले लेखही उत्तम असतात. त्यांच्याइतके प्रगल्भ मला लिहिता येईल त्या दिवशी मीठ-मोहर्यांनी स्वतःची दृष्ट काढेन! पण तुम्ही केलेले कौतुक पाहुन छान वाटले!
14 Sep 2013 - 7:26 pm | रमताराम
द्या टाळी. मी ही हेच म्हणणार होतो. अंबरीश मिश्रांची स्निग्ध शैलीच आठवली ही लेखमाला वाचताना. शिवोऽहम यांचे एका उत्कृष्ट मालिकेबद्दल आभार. (मागच्या एका लेखावर केलेली विनंती नि धमकी रिपीट टेलेकास्ट करतो. :) )
9 Sep 2013 - 10:48 pm | आदूबाळ
शिवोऽहम् साहेब - खूप खूप खूप सुंदर लेखमाला!
मागे सुचवल्याप्रमाणे तिगमांशू धूलियावर सुद्धा लिहा ना...
10 Sep 2013 - 10:14 am | कोमल
अतिशय सुरेख लेखमाला.. फारच छान ओळख करुन दिलीत तुम्ही पियुष मिश्राची..
__/\__
या लेखातील समाप्त शब्द वाचून "अर्र.." असं वाटलं... :(
पुलेशु.
10 Sep 2013 - 4:31 pm | एच्टूओ
नेह्मीप्रमाणेच वाचनीय!! अजून वेगळ्या वाटेवरच्या कलाकारांची ओळख करून द्या..मज़ा आएगा!! पु ले प्र...
10 Sep 2013 - 5:50 pm | जे.पी.मॉर्गन
शिवोऽहम्,
उगाच शब्द खरडण्यात अर्थ नाही. बस "सॅल्यूट"
जे.पी.
11 Sep 2013 - 10:35 am | नि३सोलपुरकर
शिवोऽहम्,
"सॅल्यूट" टु यु ऐन्ड पियुष मिश्रा.
पुलेशु.
11 Sep 2013 - 10:53 am | अद्द्या
छानच .
सुंदर लेखमाला .
अजुनी काही अश्या वेगळ्या कलाकारांबद्दल (इरफान खान , मनोज वाजपेयी ) आपण माहिती लिहाल या अपेक्षेत .
11 Sep 2013 - 11:58 am | शिवोऽहम्
मनोज वाजपेयी बद्दल विचार करतोय.. स्टे ट्यून्ड!
11 Sep 2013 - 11:07 am | पैसा
वेगळ्या वाटेवरचा लेख. असेच आणखी कलाकारांबद्दल जरूर लिहा!
14 Sep 2013 - 8:27 pm | निवांत पोपट
फारच सुंदर लेखमाला..तुम्हाला आता वेगवेगळ्या फर्माईशी तर आलेल्या आहेतच. त्या पुर्या करायचा विचार असेल तर लिस्टमध्ये 'कर दे मुझे, मुझसे ही रिहा' लिहिणार्या 'इर्शाद कामील' चे पण नाव अॅड करावे ही विनंती..
15 Sep 2013 - 4:59 am | प्यारे१
अवलिया कलाकाराबद्दल लिहीणार्या अवलिया लेखकाचंही आज दर्शन घडलं.
बरेच दिवस मिपावर पियुष मिश्रा चा बोर्ड बघत होतो पण का कुणास ठाऊक वाचलंच नाही. आज पूर्ण मालिका वाचली. म्हणजे सुरु केली वाचायला नि कधी वाचून संपली समजलंच नाही. भन्नाट लिहीताय. पियुष मिश्राना वासेपुर मध्ये बघितलंय. अभिनयाबरोबरच वरचा ओठ थोडासा वेगळाच्च आहे.
बाकी फुल्ल कलंदर वाटताय तुम्ही. दाढी वाढलेला, केस सुद्धा भरपूर, डोळ्यावर चष्मा जाड फ्रेमचा, कुर्ता, शबनम, मळकट जीन्स नि जुन्या सॅन्डल्स वाला एखादा नाटकवाला भेटावा नि बोलायला सुरुवात करावी, बोलता बोलता तिथल्या तिथं साभिनय स्क्रीप्ट वाचून नाही करुन दाखवणारा, डोळ्यात वेगळीच चमक चष्म्या तून देखील दिसणारा एक नाटकवाला म्हणजे शिवोsहम ! (असं मला वाटतंय)
हॅट्स ऑफ मालक. नवीन सेरिज सुरु करा लवकर.
19 Sep 2013 - 3:33 am | निनाद मुक्काम प...
ह्या कलाकाराचे नाव माहिती नव्हते ते आज कळले
पण माझ्या मते ह्या कलाकारांचा दिल से ह्या सिनेमातून माझी ओळख झाली. एक सी बी आय ऑफिसर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होणार्या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी झटतो. आणि रॉक स्टार मध्ये त्याचे काम अनेकांना आवडले
19 Sep 2013 - 8:26 am | शिवोऽहम्
राईट. तो पहिला रोल होता पडद्यावर आलेला.
20 Sep 2013 - 7:23 pm | मी-सौरभ
अशा मस्त कलाकारांबद्दल तुम्ही मस्त लिहीत आहाताच पण बाकीच्यांनी पण असे लेख लिहुन आमच्या सारख्या येर्यागबाळ्यांणा थोडं शाणं केलं बरच आहे की...
21 Sep 2013 - 1:14 am | अर्धवटराव
एखाद्या कलाकृतीची, कलाकाराची रसिकांना भेट होते ति काहि मिनीटे, वा तास, पण तेव्हढ्या वेळात फार काहि खाल्ल्या/पचवल्या जात नाहि. मग अशा लेखमालेतुन उलगडतात पांढर्या प्रकाशाच्या आतले इंद्रधनु.
एका पियुष मागे त्याच्या प्रवासाचा मागोवा घेणारे शिवोSहम् आहेत म्हणुन आमच्यासारख्यांना चार गोष्टी समजुन घेता येतात. याला भाग्य लागतं महाराज.
30 Sep 2013 - 9:34 am | मुक्त विहारि
पुढील लेख्मालाच्या प्रतिक्षेत
5 Apr 2017 - 11:06 am | रातराणी
मनस्वी कलाकाराची ओळख फार आवडली! अजूनही अशा काही कलाकारांबद्दल वाचायला आवडेल, फार सुंदर लिहिता तुम्ही!
7 Apr 2017 - 7:41 pm | सिरुसेरि
छान ओळख . अलिकडेच आलेल्या "तमाशा" या चित्रपटामधला , गोंधळलेल्या रणबीर कपुरला "अपनी कहानी तु मेरी जुबानसे सुनता चाहता है ?" असे फटकारणारा त्याचा "कहानीवाले बाबा" चा रोल लक्षात राहणारा होता .
13 Apr 2017 - 7:55 pm | उपेक्षित
टाळ्या टाळ्या टाळ्या
अत्यंत सुंदर आणि मनाला वाचताना अतीव समाधान देणारी लेखमाला.
पुढील लेखमालेच्या प्रतीक्षेत.