विंचुर्णीचे धडे
गौरी देशपांडेचं "एकेक पान गळावया" या बहुचर्चित पुस्तकांएवढं कदाचित प्रसिद्ध नसेल पण या पुस्तकावरही गौरीचा मोहक ठसा जाणवतोच. १९९६ चं हे पुस्तक. पुस्तक रूढ अर्थाने कोणत्र्या प्रकारात बसते माहित नाही. ही विंचुर्णीची चित्रे आहेत गौरीने रेखाटलेली. त्या चित्रांची प्रेक्षक म्हणून गौरी थोडीशी दिसते. त्याबरोबर पार्श्वभूमीला तिची मुले, नवरा हेही अधे मधे दिसतात. तशी ही आत्मकथा नव्हे पण एका महत्त्वाच्या टप्प्यावर अनुभवलेलं आयुष्य इथे गौरीने रेखाटलं आहे. या पुस्तकाची प्रस्तावना, अर्पणपत्रिका तेवढीच वाचनीय आहे. आपल्याला विंचुर्णीसारख्या खेड्यात जाऊन रहायची बुद्धी का झाली याचं सुरेख वर्णन यात आहे. याला कारण झालं गौरीच्या स्वप्नातलं कम्युन! प्रत्यक्षात त्या कम्युनमधे बरं वाईट सगळंच असणार आहे विंचुर्णीसारखं. स्वप्न बघायला हवीतच पण प्रत्यक्षात आणखीही खूप काही त्याबरोबर मिळतं. पाहिजे असलेलं आणि नको असलेलंही!
पुणे मुंबईच्या गजबजाटातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त विंचुर्णीला घर बांधायला कारण झाले ते गौरीचे मेव्हणे आणि बहीण. ते आधी तिथे जाऊन राहिले होते ते पाझर तलाव आणि त्यांच्या मेंढ्यांच्या प्रकल्पासाठी. गौरीने तिथे घर बांधले आणि तिथून हलूच नये असे सुरू केले. मग घराबरोबर विंचू, साप, मांजरे कुत्री सगळी गोळा झालीच. पाहुणे रावळे मुली नातवंडे सगळे ये जा करत होते. असेच मेंढ्यांचे काम पण गौरीने गळ्यात घालून घेतले.
या घरासोबत या सगळ्या प्राणी-मित्रांची चित्रे अतिशय सुरेख उतरली आहेत मग तिथल्या गोरख, नानी, मीराबाई अशा लोकांची स्वभावचित्रे अगदी प्रत्ययकारी आली आहेत यात नवल ते काय! या सगळ्यात पार्श्वभूमीला हमखास नसणारी वीज, मग तिथे आपोआप झालेली काळोखाची सवय, पाझरतलाव, तलावात होडी चालवणारी गौरी हे सगळं मुळातून वाचलं पाहिजे.
नंतर तर पुण्याला प्रोफेसरकी स्वीकारून तिकडे रहायला जावे लागले तरी विंचुर्णीचे घर होतेच. संधी मिळताच तिथे धाव घ्यायची हे गौरीचे आयुष्य होऊन बसले. विंचुर्णीच्या लोकांना सुधारायचा प्रयत्न केल्यानंतर ते अशक्य आहे हे समजून गौरीने सोडून दिले. विंचुर्णीचे धडे हे पुस्तकाचं शेवटचं प्रकरण तर अगदी अभ्यसनीय. त्यात अशा गावांकडे आदर्शवाद म्हणून धावलेल्यांची निराशा, अशा गावकरी लोकांसाठी काम करणार्या संस्थांच यश अपयश हे सगळं गौरीने लिहिलं आहे. तसंच विंचुर्णीकडून आपल्याला काय शिकायला मिळालं तेही लिहिलं आहे.
ते म्हणजे (१)आपल्या हातून कोणाचे फार भले होणार नाही. (२)संघटना या निराशाजनक असतात. (३) माणसांना प्रेम लावले की ती आपली होतात असे नव्हे. दृष्टीआड झाली की ती मनातून हळूच निखळून जातात. हा धडा अवघड असला तरी याचा अर्थ असा नाही की माणसे जोडूच नयेत! ज्यांच्या आधारे आयुष्य काढले ती तत्त्वे फोल आणि अडगळीची म्हटल्यावर माणसाने काय करावे हा आणि असेच प्रश्न. कोणाकडून मोठ्या अपेक्षा ठेवू नयेत आणि तरी ठोकर लागलीच तर ते सगळेच मागे ठेवून पुढे चालू लागायचे हा सगळ्यात मोलाचा धडा!
पुस्तकात सामाजिक संस्थांबद्दल लिहिलेलं सगळंच पटेल असंही नाही.पण आपले सगळे ग्रह, पूर्वग्रह बाजूला ठेवले तर निव्वळ लिखाण म्हणूनही आवडू शकेल. सगळ्या पुस्तकभर वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आणि विंचुर्णीचे धडे या शेवटच्या लेखात कथनाच्या ओघात सामाजिक आणि वैयक्तिक संबंधांचा उहापोह आणि खास गौरीच्या अशा टिप्पण्या आहेत.
पुस्तकाच्या शेवटाला उपसंहारात म्हटल्याप्रमाणे गौरी अधे मधे ताजी होण्यासाठी विंचुर्णीला जाते, हवे तसे जगते, लिहिते, कष्ट करते. या सगळ्यामुळे तब्बेत छान रहाते! पण त्या विंचुर्णीला काही द्यायच्या आदर्शवादाला मात्र तिने बाजूला ठेवले आहे. शेवट गौरी म्हणते की "विंचुर्णीने मला जे काही दिले ते अनमोल आहे. खरी खंत अशी आहे की, काही कारणाने का होईना - मी विंचुर्णीला फारसे काहीच दिले नाही!"
(टीपः गौरींचे २००३ मध्ये निधन झाले.)
प्रतिक्रिया
7 Sep 2013 - 10:15 am | मुक्त विहारि
आजच वाचनालयात कॉपी ठेवायला सांगीतले आहे..
7 Sep 2013 - 10:56 am | यशोधरा
चांगलं लिहिलंस. माझंही अत्यंत आवडतं पुस्तक आहे हे.
7 Sep 2013 - 11:24 am | संजय क्षीरसागर
आवडलेल्या पुस्तकाविषयी भरभरून लिहायला हवं असं वाटतं
याविषयी विस्तारानं लिहाल का?
7 Sep 2013 - 2:05 pm | पैसा
माझा उद्देश पुस्तकाचा ओझरता परिचय करून देणे एवढाच होता. या लेखामुळे तुम्हाला मूळ पुस्तक वाचावेसे वाटले तर जरूर वाचा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे १/२ उदाहरणे इथे देते.
१) नानींना म्हटले, "बघा गोरखला!" पण ते तेवढ्यापुरतंच. 'बौद्ध' आळीतल्या नानींकडे निंबाळकरांचा गोरख थोडाच जाणार होता? माझ्या ओसरीवर, नानींच्या हातचा च्या पिताना, नाहीतर आईने भाकरी दिली नाही म्हणून उपाशी असताना नानींच्या डब्यातली भाकरी खाताना, रात्री माझ्या घरी काही कारणाने दोघांना रहावे लागले तेव्हा जाजमावर त्यांच्या शेजारी गाढ झोपताना, त्याच्या मनात नानींचा 'बौद्धपणा' आल्याचा मला कधी संशयही आला नाही. पण सारे विंचुर्णी गाव ओलांडून राजरोस काही तो त्यांना किंवा त्या त्याला विचारायला जाणार नव्हत्या हे सरळ सत्य होते. दिसत होता इतका बदलसुद्धा समाधान वाटावे इतका मोठा होता दोघांकडून.
२) नवर्यावर माया करायला आवश्यक असणार्या त्याच्या गुणात, तो मारहाण, शिवीगाळ करत नाही, हा एक महत्त्वाचा असतो हे तेव्हाच समजले.
३) माणसामाणसांतला मामला अखेर निव्वळ देण्याघेण्याचाच असतो का? माझे 'देणे' पुरे पडेना झाले की कुणीही माझ्याकडे पाठ फिरवायची की काय? तोंडदेखले चार गोड शब्द बोलणे इतकेच का कुणाशीही नाते जमू शकते या जगात?
7 Sep 2013 - 3:29 pm | संजय क्षीरसागर
येस! पण या प्रतिसादातून लेखिकेचा दृष्टीकोन आणि विषयाचा आवाका समजायला मदत झाली. आभार!
7 Sep 2013 - 12:15 pm | आतिवास
‘ विंचुर्णी’ संग्रहात नाहीये; पण विकत घेईन की नाही आता; माहिती नाही.
गौरीचं लेखन सुरुवातीला खूप आवडलं – नंतर मात्र त्यातली साचेबद्धता जाणवून कंटाळा आला.
पण ‘विंचुर्णी’ कदाचित वेगळं दिसतंय तुमच्या परिचयावरुन - सहज मिळालं तर वाचेन.
7 Sep 2013 - 12:21 pm | यशोधरा
विंचूर्णी नक्कीच वेगळं आहे इतर पुस्तकांपेक्षा. (साचेबद्धतेबद्दल सहमत, तरीही आवडतं मला तिचं लिखाण :) )
7 Sep 2013 - 7:19 pm | आदूबाळ
अगदी अगदी...
.
पैसाताई पुस्तक परिचय आवडला. नक्की वाचेन आता...
7 Sep 2013 - 1:07 pm | चित्रगुप्त
छान परिचय करून दिला या पुस्तकाचा. वाचायला हवे.
गेल्या चाळीसेक वर्षात विविध अनुभवातून हेच शिकलो ...
7 Sep 2013 - 1:37 pm | प्रचेतस
छोटासाच पण उत्तम परिचय.
7 Sep 2013 - 2:18 pm | प्यारे१
उत्तम पुस्तकपरिचय.
8 Sep 2013 - 11:48 am | विटेकर
परिक्शन आवडले
7 Sep 2013 - 2:49 pm | रुमानी
पुस्तक( विंचूर्णी ) नक्कीच वाचेन. :)
7 Sep 2013 - 2:50 pm | अग्निकोल्हा
साष्टांग दंडवत!
नक्किच वाचेन हे पुस्तक.
7 Sep 2013 - 4:23 pm | पिंपातला उंदीर
गौरी देशपांडे आणि मेघना पेठे या माझया आवडत्या लेखिका. खूप सो कॉल्ड प्रसिद्ध पुरूष लेखकांपेक्षा सकस आणि भिडणार लेखन करणार्या लेखिका. धन्यवाद पैसा ताई हा धागा सुरू केल्याबद्दल
7 Sep 2013 - 4:39 pm | रमेश आठवले
हे गाव नेमके कोठे आहे ?
7 Sep 2013 - 4:44 pm | पैसा
फलटण जवळ.
7 Sep 2013 - 5:09 pm | चित्रगुप्त
गौरी देशपांडे (१९४२-२००३) या इरावती कर्वे/ दिनकर कर्वे यांच्या कन्यका, आणि धोंडो केशव कर्वे यांची नात, हे आताच समजले.
8 Sep 2013 - 11:49 pm | रमेश आठवले
गौरीचे बंधू नंदू कर्वे हे जर्मनीहून परत आल्यानंतर फलटण येथेच निमबाळकर कृषि संशोधन केंद्रात बरीच वर्षे कार्यरत होते.
3 Oct 2016 - 11:07 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
गौरीचे बंधू नंदू कर्वे हे जर्मनीहून परत आल्यानंतर फलटण येथेच
निमबाळकर कृषि संशोधन केंद्रात बरीच वर्षे कार्यरत होते.>>>>>>>> चूक ,कर्वे हे जर्मनीहून परत आल्यावर त्यांनी फलटण इथे appropriate rural technology institute अर्थात ' आरती' ची स्थापणा केली.आज ती संस्था चालू आहे की नाही माहीत नाही.त्यांची मुलगी प्रियदर्शनी कर्वे ही पुण्यात समुचित नावाची संस्था चालवते.
फलटणला निंबाळकर कृषी संशोधन केंद्र नसून निंबकर कृषी संशोधन केंद्र आहे.इरावती कर्वे यांचे जावई बनबिहारी निंबकर यांनी ते सुरु केले.
3 Oct 2016 - 11:27 pm | बोका-ए-आझम
त्यांनी काढलेल्या सुधारित चुली कर्जत आणि पळसदरीजवळच्या आदिवासी पाड्यांमध्ये वापरल्या जाताहेत.
8 Sep 2013 - 5:38 pm | भ ट क्या खे ड वा ला
पुस्तक परिचय आवडला. "काही वाचायचे आहे"...... यादीत भर टाकली आहे .
8 Sep 2013 - 6:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान. वाचलं पाहिजे. उत्तम ओळख. धन्स.
-दिलीप बिरुटे
8 Sep 2013 - 6:41 pm | पद्मश्री चित्रे
आवडत्या लेखिकेचं एक आवडतं पुस्तक. मला जास्त आवडला सुरवातीचा भाग. गौरी तिथल्या जीवनात कशी रमत जाते ,विंचवासकट इतर प्राण्यांसोबत कशी राहू लागते ते. विंचुर्णी बदलत नाही हे उमजून ही तिचं विंचुर्णी चं प्रेम काही कमी झालं नाही . मिळालेल्या अनुभवांचे पण ते किती सुंदर आणि संयत विश्लेषण करते . आता पुन्हा वाचावसं वाटतय पुस्तक छान परिक्षण वाचून .
9 Sep 2013 - 11:39 am | लाल टोपी
पुस्तक परीक्षण आवडले अगदी वाचावे असेच पुस्तक
9 Sep 2013 - 4:39 pm | चाणक्य
परिचय.
3 Oct 2016 - 10:13 pm | शिव कन्या
पुस्तक परिचय उत्तम!साॕरी,
पण गौरिचे लेखन ना कधी मनाला भिडले, ना कधी विचारांना सकसपणा देऊन गेले!पर्सनल डायर्यांतले लेखन पुस्तकरुपात!
पण त्यांचीच कन्या उर्मिला देशपांडे हिने लिहीलेले The Pack of Lies वाचण्यासारखे आहे.
4 Oct 2016 - 6:57 am | प्रचेतस
गौरी देशपांडे म्हटलं की पटकन आठवतं तो अरेबियन नाईट्सचा अनुवाद. हे सर्व खंड मराठीत आणून त्यांनी फार मोठं काम केलंय.
4 Oct 2016 - 3:52 pm | आदूबाळ
धन्यवाद!
3 Oct 2016 - 11:09 pm | एस
उत्तम पुस्तकपरिचय.
4 Oct 2016 - 3:17 pm | पूर्वाविवेक
अतिशय सुरेख पुस्तक परिचय. नक्की वाचेन.
4 Oct 2016 - 5:17 pm | सिरुसेरि
उत्तम पुस्तकपरिचय. पु. ल. आणी सुनीताबाई देशपांडे यांनी खुप वर्षांपुर्वी एका खेडेगावामध्ये ध्येयवादाने प्रेरित होउन एक शाळा उभारली होती . पण त्यांनाही काही कटु अनुभव आल्यामुळे ती शाळा सोडावी लागली . "आहे मनोहर तरी" या पुस्तकांत या आठवणींचा उल्लेख आहे .
4 Oct 2016 - 5:44 pm | प्राची अश्विनी
परिचय आवडला. सगळ्यांना तिचे विचार पटतीलच असे नाही. पण गौरी एक मनस्वी जीवन जगली. एकच कौटुंबीक घटनेबद्दल तिचे आणि तिच्या मुलीचे विरुद्ध विचार/बाजू वाचायला मला आवडले. "निरगाठी आणि चंद्रिके ग सारिके ग" हे गौरीचे आणि पॅक ऑफ लाईज हे उर्मिला देशपांडेचे पुस्तक नक्की वाचण्यासारखे आहे .
4 Oct 2016 - 6:16 pm | पुंबा
'आहे हे असं आहे' कुणी कुणी वाचलंय? छान पुस्तक. परिचय आवडला.
4 Oct 2016 - 6:42 pm | यशोधरा
वाचलंय.
6 Oct 2016 - 2:12 am | अश्विनी वैद्य
हो वाचलय... अप्रतीम आहे.
4 Oct 2016 - 6:29 pm | रेवती
पुस्तकपरिचय आवडला.
5 Oct 2016 - 12:55 pm | उल्का
सुरेख परिचय.
5 Oct 2016 - 9:51 pm | इशा१२३
वाचलय पुस्तक.छान परिचय.
5 Oct 2016 - 9:51 pm | इशा१२३
वाचलय पुस्तक.छान परिचय.
6 Oct 2016 - 1:01 am | मनो
पुस्तकाची पहिली काही पाने इथे वाचता येतील
http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5343280407337468673?BookNa...