नॅशनल जिओग्राफिकच्या बहुधा नोव्हेंबरच्या अंकात मानवी स्मरणशक्तीवर एक अप्रतिम लेख आला होता. त्यापूर्वी सायंटिफिक अमेरिकन मासिकाच्या जुलै मधील अंकात "द मेमरी कोड" नावाने एक सुंदर लेख आला होता. हे लेख वाचून एक कथा सुचली. अद्याप अपूर्ण आहे. अर्थातच जीएंची भ्रष्ट नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे. वेळेअभावी अद्यापि पूर्ण करणे जमले नाही. मात्र कथा कशी विकसित होत आहे हे हॉटेलातील मंडळींकडून ऐकायला आवडेल. शिवाय कथेला नावही अजून दिलेले नाही. एक नाव मनामध्ये आहे. पण ते देण्यापूर्वी तुम्ही याला काय नाव द्याल?
अदृश्य धाग्याने कोणीतरी खेचावे तसा सूर्य हळूहळू खाली गेला आणि हताश मनाने अभिधान त्याच्या कुटीमध्ये परतला. कुटीसमोरील औदुंबराच्या झाडाच्या तिसर्या फांदीवरील अगदी बुंध्याजवळच्या पानांना सूर्यकिरणे सोनेरी मुलामा चढवत होती तेव्हा त्याचा बाप कुटीबाहेर पडला होता. शिकारीसाठी गेलेले सर्वंजय आणि धन्वमित्र परत आले तरी बापाच्या डोक्यावर बांधलेल्या घुंगरांचा आवाज काही आला नाही तेव्हा त्याला काळजी वाटू लागली. कोणी हाक मारली की आपण तयारच असावे अशा अविर्भावात कुटीबाहेर बसलेला त्याचा कुत्राही आता कुटुंबप्रमुखाच्या शोधासाठी आतुर झाला होता. कुटीच्या मागच्या बाजूला असलेल्या पिंपळाच्या झाडाची वाळलेली पाने वाजली आणि कुत्र्याने कान टवकारत मागे धाव घेतली.
घुंगराच्या आवाजाने अभिधानाचे कान भरुन गेले. पण आता त्याला या रोजच्या गोष्टीचा कंटाळा आला होता. कुटीसमोर रोवलेल्या खांबाच्या (हो, तोच खांब ज्याखाली दरवर्षी लांडग्याचे ताजे रक्त एका पात्रामध्ये भरून ठेवावे लागते.) डाव्या बाजूने चंद्र जेव्हा आकाशात तरंगू लागे त्या कालावधीतील एका विचित्र दिवसापासून बापाला घराचा रस्ताच आठवेनासा झाला होता. आता तर चंद्र खांबाच्या अगदी उजव्या बाजूला होता आणि इथून पाहिले तर खांब व चंद्र यामध्ये सर्वंजयाची तलवार सहज बसली असती. दर दोन पौर्णिमांच्या मध्ये निदान सहा वेळा तरी बापाला शोधण्यासाठी त्याला रानात जावे लागे. एके काळी रानातील कोणत्या सापाला किती दात आहेत आणि चार बोटे बसतील इतके जाड पट्टे असलेल्या वाघाचे शेपूट किती लांब आहे हे सुद्धा बापाला माहिती होते. आता मात्र काल रात्री खाल्ले ते मांस हरणाचे की गिधाडाचे हे त्याला आठवत नव्हते. सर्वंजयाच्या खांद्यावर उभे राहिले तरी हात पोचणार नाही इतपर्यंत उंच उडी मारणार्या घोड्यांचीही मिजास उतरवणार्या नदीच्या पात्रात लीलया सूर मारणार्या बापाला नदीपर्यंत जाताना लाल छोटी फळे असलेल्या एका झुडपाच्या डाव्या हाताला वळावे लागते हे आता सांगावे लागे. अभिधान आपला मुलगा आहे याव्यतिरिक्त एकही गोष्ट बापाला आठवत नसे. अगदी आपल्याला काहीही आठवत नाही हे देखील.
बापाप्रमाणे अभिधानही शेणाच्या काळजाचा नव्हता. पण रानात रात्री काय होईल हे सांगणे सात टेकड्यांपलीकडे राहणार्या गुरूंनाच शक्य असावे. दोन हात अंतरापर्यंत समोर काहीतरी दिसण्यासाठी मेण लावलेले लाकूड पेटवावे तर तेच अंधारात कोणीतरी आपल्याला पाहिल या भीतीने विझून जात असे. सुदैवाने वस्तीसमोरच्या पटांगणात रोवलेल्या खांबाच्या आसपास राहण्यास काहीही धोका नाही हे स्वत: गुरुंनीच सांगितल्यामुळे तिथे राहणे तरी शक्य झाले होते.
काही दिवसांपूर्वी गुरू वस्तीवर आले होते तो प्रसंग त्याला आठवला आणि हसू आवरले नाही. छातीभर पिसाप्रमाणे मऊ, शुभ्र दाढी रुळत असलेला आणि शांत डोळ्यांनी नटलेला समजूतदार चेहरा असलेला त्यांचा एक मित्र सोबत होता. सर्वंजय, अभिधान आणि धन्वमित्र या तिघांनाही प्रथमच भेटत असल्याने त्या मित्राने काही विशेष भेटवस्तू आणली आहे असे गुरुंनी सांगितल्यावर त्यांनी उत्साहाने मित्राकडे पाहिले तर मंद स्मित करत त्याने तिघांनाही आपापले घोडे घेऊन येण्यास सांगितले होते.
"भेटवस्तू तर मी तुम्हाला देणारच पण त्या भेटवस्तू निवडीचे स्वातंत्र्य मात्र मला नाही. तुम्ही स्वत:च तुम्हाला हवी ती भेटवस्तू निवडायची. प्रथम भेटवस्तू निवडीचा अधिकार कोणाला मिळावा यासाठी अर्थातच एक छोटीशी घोडेस्वारीची स्पर्धा होईल. ”
स्पर्धा म्हणताच तिघांनाही स्फुरण चढले. अभिधानाचा घोडा कृष्णवर्णीय तर सर्वंजयाचा श्वेतवर्णीय होता. वस्तीच्या मातीतूनच पुतळा तयार करावा अशा लालसर रंगाच्या धन्वमित्राच्या घोड्याच्या कपाळावर एक पिंपळपान होते. तिघेही ताबडतोब घोड्यावर स्वार झाले आणि गुरुंच्या मित्राच्या आदेशाची वाट पाहू लागले.
"अभिधानाच्या झोपडीपासून ते वस्तीच्या मध्यापर्यंत असलेल्या खांबापर्यंतचे अंतर घोड्यावर पार करायचे आहे.”
हे अंतर ऐकताच घोड्यावर बसण्यापूर्वीच स्पर्धा संपून जाईल या विचाराने तिघेही हसू लागले.
“थांबा, जास्त उतावीळ होऊ नका. स्पर्धा थोडीशी वेगळी आहे. ज्याचा घोडा सर्वात मागे राहील तो या स्पर्धेचा विजेता आणि भेटवस्तू प्रथम निवडीचे स्वातंत्र्य त्यालाच. शिवाय एकदा स्पर्धा चालू झाली आणि घोडा थांबला की स्पर्धक बाद.” असे म्हणून मित्राने गुरुंकडे पाहून एक स्मित केले. गुरुही गालातल्या गालात हसत होते.
स्पर्धेची अट ऐकून तिघांनाही हसावे की रडावे ते कळेनाच. आदेश देताच आकाशातल्या विजेशी स्पर्धा करत क्षणात क्षितिजापलीकडे जाऊन येणार्या घोड्यांना हे एवढेसे अंतर अगदी हळूहळू ओलांडायला कसे सांगायचे हा प्रश्न त्यांना पडला. सर्वंजयाने तर ताबडतोब स्पर्धेतून माघारच घेतली.
स्पर्धा सुरू झाली. आणि घोडा हळूहळू चालवताना उडालेली त्यांची धांदल पाहून गुरू आणि त्यांचे मित्र हसू लागले.
“खरे तर घोड्याऐवजी नदीपात्रात सापडणारी कासवे आणायला हवी होती या स्पर्धेसाठी.” वैतागून धन्वमित्र म्हणाला. "निदान स्पर्धेनंतर श्रमपरिहार म्हणून त्यांचे ताजे रक्त तरी प्यायला मिळाले असते.” छद्मीपणाने अभिधान म्हणाला. पन्नासएक पावलातच कंटाळून दोघेही घोड्यांवरून उतरले आणि भेटवस्तू नाही मिळाली तरी चालेल पण ही अशी फजिती करणारी स्पर्धा नको असे म्हणू लागले.
त्यावर गुरुंनी अफलातून उपाय सुचवला. अभिधानाचा घोडा धन्वमित्राकडे तर धन्वमित्राचा घोडा अभिधानाकडे देण्याचा.
हा उपाय आधी कसा बरे सुचला नाही आपल्याला.
खरेच गुरुंनाच विचारावे लागेल बापाला काय झाले आहे ते. पण त्यासाठी सात टेकड्या पार करुन जावे लागेल. अगदीच न थांबता गेलो तरी जाण्यायेण्यात निदान दोन दिवस तरी जातीलच. त्या काळात बापाला काही झाले तर या रानात एकट्याने जगणे अवघड होऊन जाईल याची टोचणी लागत असूनदेखील त्याने आपल्या लाडक्या कुत्र्याच्या भरवशावर बापाला घरी ठेवून गुरुकडे जाण्याचा निर्णय घेतला. या अडचणीतून मार्ग शोधण्यासाठी गुरू नक्कीच आपल्याला मदत करतील याची त्याला खात्री होती.
गुरुंच्या कुटीजवळ तो पोचला तेव्हा झाडावर काजव्यांची चमचम सुरु झाली होती आणि गुरू स्वत: रात्रीच्या पाकसिद्धीमध्ये गुंतले होते. रोज सायंकाळी स्वत:च्या हाताने शिजवलेले अन्न खाण्याचे त्यांचे व्रत आहे हे त्याला आठवले.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
29 Nov 2007 - 11:45 am | विसोबा खेचर
कथा चांगली वाटते आहे, इंटरेस्टींगही वाटते आहे. परंतु भाषा साधी, सहजसोपी, संवाद साधल्यासारखी असती तर बरे झाले असते. लेखन काही ठिकाणी उगाचंच शब्दबंबाळ आणि वर्णनबंबाळ वाटते आहे..
माझ्यासारख्याला अशी भाषा फारच जड जाते, वाचायला कठीण जाते...
असो, पुढील भागांकरता अनेकानेक शुभेच्छा...
आपला,
(सहजसोप्या, साध्यासुध्या भाषेतल्या लेखनाचा फ्यॅन) तात्या.
29 Nov 2007 - 12:04 pm | आनंदयात्री
कथाबीज तगडे असेल असे वाटते आहे. ओघावती भाषा आली तर अजुन छान होइल कथा.
कुटीसमोरील औदुंबराच्या झाडाच्या तिसर्या फांदीवरील अगदी बुंध्याजवळच्या पानांना सूर्यकिरणे सोनेरी मुलामा चढवत होती.
बाकी असे वाक्य वाचतांना उगाचच अभ्यास केल्यासारखे वाटते. कुटीसमोरील औदुंबराच्या झाडावर उन आले होते. असेही चालले असते, पण हे अगदी वैयक्तिक मत बरका, आधी म्हटल्या प्रमाणे कथाबीज तगडे असेल असे वाटते आहे.
(उत्कृष्ट कथा असेल अशी आशा असणारा) आनंदयात्री
29 Nov 2007 - 1:10 pm | ध्रुव
... छान झाली आहे. पुढील लेखनाला शुभेच्छा.
अवांतरः बाकी, जीए शैली जमतिये :)
--
ध्रुव
29 Nov 2007 - 1:27 pm | नंदन
सुरुवात चांगली झालीय. जी.एं.ची शैलीही जमते आहे. विस्मृतीसंबंधात कथा आहे असं वाटतंय, तेव्हा 'स्मरणाचा उत्सव जागून' हे शीर्षक चालू शकेल का? (ग्रेसच्या कवितेतली ओळ - अंधार असा घनभारी, चंद्रातून चंद्र बुडाले, स्मरणाचा उत्सव जागून जणू दु:ख घराला आले.)
पुढील भागांची वाट पाहतो आहे.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
29 Nov 2007 - 1:55 pm | आजानुकर्ण
खूपच सुंदर ओळी.
स्मरणाचा उत्सव जागून जणू दु:ख घराला आले.
- आजानुकर्ण
29 Nov 2007 - 1:36 pm | जुना अभिजित
अर्थातच जीएंची भ्रष्ट नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे.
स्वतःच्या शैलीत लिहिली तर कथेत अधिक इन्वॉल्व(!) होता येईल. लिहिणार्यालाही आणि वाचणार्यालाही. दुसर्याच्या शैलीत लिहिणे म्हणजे एक तर त्याचे विडंबन केल्यासारखे वाटते किंवा आपली शैली विकसित होत नाही. हे माझे अगदी वैयक्तिक मत आहे.
कथा एकदम सशक्त आहे. वातावरणनिर्मिती छान झाली आहे. पुढच्या भागात कथा कशी वळणार आहे माहित नाही तरी 'गुरुदक्षिणा' नाव(डोहकाळिमा, रमलखुणा, पिंगळावेळ धर्तीवर ;-)) सुचवतो. अन्यथा आहे हे नाव उत्तम आहे.
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
29 Nov 2007 - 1:45 pm | आजानुकर्ण
स्वतंत्र शैली विकसित करायला अजून वेळ आहे. ;) सध्या चांगल्या अक्षरांवर गिरवलेले उत्तम. ;)
गुरुदक्षिणा नाव योग्य ठरणार नाही. कारण गुरु निमित्तमात्र आहेत. मूळ कथा स्मरण किंवा विस्मरणावरच आहे.
बिननावाची कथा हे चुकून बिनपावाची कथा असे मीच वाचले ... मिसळपाव मनात घोळत असल्यामुळे असेल ... ;)
- आजानुकर्ण
29 Nov 2007 - 2:05 pm | मनिष
पुढे काय होते त्यावर नाव ठरेल. अल्झायमर वर आहे का?
29 Nov 2007 - 3:26 pm | विसुनाना
आजानुकर्ण, आपल्या सांगण्यानुसार मूळ लेख वाचला.
आपली कथा चांगली रंगतदार होते आहे. पुढचे भागही लवकर टाका.
'स्मरणकळा' किंवा 'आठववेणा' कसे वाटेल?
(मलाही एखादी कथा लिहाविशी वाटली.;))
29 Nov 2007 - 3:31 pm | जुना अभिजित
मलाही एखादी कथा लिहाविशी वाटली.;)
लिहावीशी की प्रसवावीशी? :)
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
29 Nov 2007 - 8:07 pm | देवदत्त
शैलीमुळे जरा वेळ लागतोय समजायला. असो, पूर्ण कथा हळू हळू उलगडेल असे वाटते.
बिननावाची कथा हे चुकून बिनपावाची कथा असे मीच वाचले .
होऊ शकते. कविता आणि आजकाल तर लेख/कथांचेही लगेच विडंबन होते. त्यामुळे असे वाटणे स्वाभाविक आहे :)
29 Nov 2007 - 9:17 pm | धनंजय
जी.एं.ची शैली साधली आहे खास.
स्मृतीविषयी ही कथा असू शकेल हे नंदन यांचे मत पटते. तसे असल्यास "बिननावाची कथा" हे शीर्षक ठीक आहे. एखादी वस्तू स्मृतीत ठेवण्यासाठी पुष्कळदा तिचे नाव लक्षात राहाणे सोयीचे असते. नाहीतर अमुक दृश्य, तमुक गंध, ढमुक ध्वनी असलेली ती अनुभूती स्मरणात एकत्र नोंदली जात नाही. (संगणकावर फाईलला नाव असावे असा संकेत आहे. फाईलसिस्टिमचा विदा असतो, त्यातील नावाची नोंदणी खोडली की फाईलच पुसून टाकली असे मानले जाते.)
या बाबतीत आठवते लुइस कॅरॉलने "ऍलिस" पुस्तकांत एका वनाचे वर्णन केले आहे, त्या वनात कोणालाच/कशालाच नावे नाहीत.
http://www.cs.indiana.edu/metastuff/looking/ch3.html.gz
त्यात ऍलिसला एक हरिणशावक भेटते. "आपण कोण" हे ठाऊक नसल्यामुळे शावक तिच्याबरोबर निर्भयपणे बागडते. वनातून बाहेर पडताच आपण "भित्रे हरिणशावक" असल्याची त्याला जाणीव होऊन, ते धूम पळून जाते!
30 Nov 2007 - 1:08 am | चित्रा
उत्सुकता वाढली आहे.
अवांतरः
नावे का अशी? यनावालांच्या कोड्यांची आठवण झाली :-)
30 Nov 2007 - 9:51 am | आजानुकर्ण
थोडीशी वेगळी व अपरिचित वाटावीत म्हणून अशी नावे घेतली.
- आजानुकर्ण
30 Nov 2007 - 4:15 am | धनंजय
> ज्याचा घोडा सर्वात मागे राहील तो या स्पर्धेचा
> विजेता आणि भेटवस्तू प्रथम निवडीचे स्वातंत्र्य त्यालाच.
हे वाक्य वाचण्यापूर्वी घोड्यांच्या आदलाबदलीने स्पर्धा कशी बदलली ते कळले नाही. पण ही युक्ती चालण्यासाठी सर्वंजयाला माघार घेणे जरुरीचे नव्हते. तिघे आपला सोडून वेगळ्या घोड्यावर बसले असते, तरीही हिरिरीने पुढे गेलेच असते. कारण आपण दुसरा घोडा आधी पोचवला, किंवा दुसर्या क्रमांकावर पोचवला, तर आपला मुळातला घोडा "जिंकायची" शक्यता ५०% असते. आपण शेवटी राहिलो तर आपला घोडा "जिंकायची" शक्यता ०% असते, म्हणून तिघेही शेवटी राहाण्यापेक्षा पुढेपुढे नेटाने जात राहातील.
30 Nov 2007 - 8:46 am | जुना अभिजित
पण घोड्यासह त्यावर बसलेला स्वारही जिंकला पाहिजे. स्पर्धा घोड्यांची नाहीये असं मला वाटतं.
उद्या शुमाकर दुसर्याच्या गाडीत बसुन जिंकला तर ती गाडी जिंकली का शुमाकर?
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
30 Nov 2007 - 9:51 am | आजानुकर्ण
सर्वंजयाच्या मते स्पर्धा अतिशय पांचट असल्याने त्याने माघार घेतली. आणि तो म्हणजे घोडेस्वार. घोडा नव्हे ;)
- आजानुकर्ण
30 Nov 2007 - 6:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कथेची सुरुवात आवडली आहे, पुढे कथा कोणती वळणे घेईल याची उत्सुकता आहे.