पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (१)
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
सरतेशेवटी मुंबईतल्या संधी खुणावू लागल्या. पण 'भारत एक खोज' मधल्या इवल्या इवल्या भुमिकांशिवाय काही हाती लागले नाही.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
त्याला वाटायचं अभिनय म्हणजे भुमिकेच्या अंतरंगात शिरणं. पण ते व्हायचं कसं? एन् एस् डी मधल्या वास्तव्यात अनेक गुरूंच्या हाताखालुन जाताना त्याला भुमिकेत शिरणं म्हणजे काय आणि कसं ते समजायला लागलं होतं. त्याच्यात ठासुन भरलेली अभिनयाची, संगीताची, कलेची जाण त्या सगळ्या रत्नपारख्यांच्या नजरेतुन सुटेल थोडीच! तीच अपेक्षा घेऊन जेव्हा पियुष मुंबईत आला तेव्हा मनात अनेक स्वप्नं होती. मुंबईतले त्याचे ते दिवस मात्र फार मरगळलेले होते. लाथ मारेन तिथे पाणी काढेन! असा आत्मविश्वास तयार झाला होता तोपर्यंत. पण मुंबईत कोणी विचारीना त्याला, सगळे बिझी आपापल्या कामात. ९०च्या दशकाची ती सुरवातीची वर्षे म्हणजे सगळी चित्रसृष्टीच मरगळलेली होती म्हणा ना. काही नवं, सृजनशील झालं असेल तेव्हा तर हाताच्या बोटावर मोजण्याएवढं. आला दिवस गेला म्हणावं हव तर, पण समाधान?
यहां क्या जगह हो सकती है मुझ़ जैसे इन्सान के लिए? वहीं चलो वापस, जहां से चल पडे थे बडी उम्मीदें लेकर.
पुन्हा एकदा दिल्ली. मंदिर, मस्जिद, मंडल, निरुला'ज, नवे आर्थिक वारे, नवे चेहरे आणि नवा माज. पण त्यातल्या त्यात बरं म्हणजे दिल्लीत विविध नाट्य-चळवळी चाललेल्या होत्या. हबीब तन्वीर यांची नाट्य थिएटर कंपनी, अल्काझींचा लिट्ल थिएटर ग्रुप, बॅरी जॉनचा 'टॅग', 'एन एस डी' तल्या काही जणांनी चालवलेल्या काही संस्था, एक ना अनेक! बदलत्या मनूत समाजात घडणारी स्थित्यंतरे, राजकारणातले डावपेंच, आजुबाजुला चालू असलेली सगळी खदखद ह्या मंडळींच्या कार्यातुन प्रगट होत होती. अशीच एक संस्था चालवली होती एन के शर्मा यांनी. चार समविचारी मित्र आणि स्वतः एन् के म्हणजे 'आर्ट वन' चे मालक, हमाल, नट, बोलट, सबकुछ!
दिल्लीत एन् के चा चांगला दबदबा होता नाट्यदिग्दर्शक म्हणुन. पुर्वीच्या दिवसांत एन् के आणि पियुष एका बैठकीत अनेक वेळा भेटले होते, कधी तावातावाने चर्चा, तर कधी एखाद्या धाग्यावर रमून जाऊन केलेले चिंतन. मुंबईतुन हात हलवत दिल्लीत परत आलेल्या पियुषसाठी एन् के आणि आर्ट वन म्हणजे हक्काचं ठि़काण वाटलं नसेल तरच नवल! इथे संगतही मोठी तोलामोलाची, नाटक कशाशी खातात ते कळणार्यांची. मनोज वाजपेयी, गजराज राव, आशिष विद्यार्थी अशी! पियुषने इथे काय नाही केलं? अनेक नाटकांत विविध भूमिका केल्या, नाटकांच्या संहिता लिहिल्या, संवाद लिहिले. 'हमारे दौर में' पथनाट्य खूप गाजलं त्याचं. समाजाच्या सर्व थरात पसरत चाललेली धर्मांधतेची विषवल्ली कशी समाजधारणेच्या मूळावर येऊ पहाते आहे, आपण नकळत कसे ह्या नतद्रष्ट उद्योगाला खतपाणी घालतोय असा जणु समाजापुढे निर्मम आरसाच धरला! शिवाय हे सगळं गाने-बजाने के साथ! काही वेळ स्वतःची प्रतिभा वापरून, तर कधी साहिर, कैफी आज़मी अशांच्या शब्दांना आपल्या चाली-बरहुकूम वळवून त्याने केलेली गाणी लोकांच्या मनास आली.
आर्ट वन ग्रुपने त्यावेळी केलेली इतर नाटकंही तशीचः रंजक पण उद्बोधकही! एलकुंचवारांचं शिक्षणक्षेत्रात माजलेल्या बजबजपुरीवर भाष्य करणारं 'होली' नाटक करायला घेतलं. पियुषने जीव ओतून काम केलं, गाणीही लिहिली. धर्माधर्मातली तेढ आणि त्या पार्श्वभूमीवर असणारं समंजसपणाचं महत्त्व अधिरेखित करणारं नाटक 'जब शहर हमारा सोता है!' हे पियुषने स्वतंत्रपणे लिहिलेले पहिले गाणारे नाटक. नंतर भट्टी जमु लागली. चढत्या भाजणीच्या समस्यांना हात घालणारं सकस त्याच्या लेखणितुन प्रसवु लागलं. भारतातल्या खेडोपाडी असलेलं जाती-जातींचं मरणप्राय वास्तव मांडणारे 'महाकुंड का महादान!' आणि 'वो अब भी पुकारता है'. नव्या पैशाने आलेली नवी धुंदी, धनदांडग्यांचा नंगानाच यावर नर्मविनोदी टिप्पणी करणारं 'आने भी दो यारों!'.
पियुषच्याच शब्दांत म्हणायचं तर, हवं फक्त उघडे डोळे आणि टीपकागदासारखं मन. शब्द आपोआप चालत येतात. मस्तमौला पियुष ग्वाल्हेरला असताना तुफान वाचायचा. अभ्यासक्रम गेला चुलीत, जे दिसेल ते वाचायचं हा शिरस्ता आता उपयोगी येऊ लागला. अभिजात हिंदी, बोली हिंदी, खडी बोली, सगळं सगळं वाचलेलंच आता पुन्हा नव्या शब्दांना जन्म देत होतं, नव्या अनुभवांना कवळत, आकळत होतं. पियुषच्या भाषेचा, कवितेचा सहजपणा म्हणजे ह्या सगळ्या मंथनाचं सार म्हटलं पाहिजे.
आज शुजीत सरकारला आपण ओळखतो ते विकी डोनर किंवा यहां सारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणुन. पण त्यानं पहिली पावलं टाकली होती ती 'आर्ट वन' च्या अंगणात. एन के शर्मा आणि पियुष ही जोडगोळी म्हणजे आर्ट वनचा प्राण. समाजवाद, मार्क्स आणी थिएटरची जाण दोघांना सारखीच खोल. आपली नाटके दर्जेदार, रंजक तर हवीतच पण प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा अनुभवही हवाच हा ध्यास दोघांनाही लागलेला. एन के, मनोज, आशिष आणि शुजीतसारख्या मित्रांचा सहवास म्हणजे पियुषसाठी दुधात साखर! या सर्व वातावरणात पियुषमधला कलाकार नव्या प्रयोगांना हिमतीने, बारकाईने, तब्बेतीने सामोरे जाऊ लागला.
अनुराग कश्यप नावाचा नाटकवेडा तरूण तेव्हा हंसराज कॉलेजात शिकत होता. 'जब शहर हमारा सोता है' चा प्रयोग त्याने पाहिला, ऐकला आणि पियुषच्या हरफनमौला व्यक्तिमत्वाने तो भारून गेला. पियुषची शब्दांची निवड, फेक, आवाज लावणं, गाण्यात मश्गुल होणं सगळंच भारी होतं! पण वल्ली जराशी 'हट के' टाईपची, बॉर्डरलाईन विक्षिप्त म्हणावी अशी. पुढे जाऊन या नाटकातली काही गाणी अनुरागच्या 'गुलाल' मध्ये दिसलीत. 'ओ रात के मुसाफिर', 'यारा मौला', 'जब शहर हमारा सोता है' वगैरे गाणी त्या दिवसातली.
पियुषसाठी ते सगळं वातावरण म्हटलं तर जम बसण्यासारखं होतं, म्हटलं तर मर्यादा घालणारं होतं. आजुबाजुला चाहत्यांची गर्दी वाढत चालली होती. लोक नावाजू लागले होते, अपेक्षा वाढत होत्या. त्यात पिण्याची सवय मानगुटीवर बसली होती. सुरवातीला मित्रांसोबत प्रसंगा-प्रसंगात, नंतर प्रत्येक नाटकाचा सोहळा साजरा करताना, मग डोकं फार दुखतं म्हणुन तर कधी रिकामं-रिकामं वाटतं म्हणुन. आपण पिण्याच्या आहारी केव्हा गेलो हे त्याला समजलंच नाही आणि म्हटलं तर उद्या लाथ मारू शकतो बाटलीला हा फाजिल आत्मविश्वास नडत होता. दारूच्या नशेत एक व्हायचं मात्र, पियुषची लेखणी झरझर चालायची आणि शब्द उमटायचे ते अगदी अस्सल! 'हुस्ना'चा जन्म त्या दिवसातला. तेच 'इक बगल में चांद होगा' बद्दल. कोणाला वाटेल की हे शब्द उमटले तेव्हा त्यांचा बाप नशेच्या आहारी गेला होता?
नशेचा परिणाम म्हणावा की व्यक्तिमत्वात असलेला विद्रोह आणि चळवळेपणा? पण '९५ च्या सुमारास पियुषने 'आर्ट वन' सोडली आणि पुन्हा पाचोळ्याप्रमाणे वार्यावर भिरभिर सुरू झाली.
मनाचा निर्णय होत नव्हता, कोषातल्या सुरवंटाला आकाश दिसत होते खरे पण वाढ अजुन सुरू होती..
-------
क्रमशः
प्रतिक्रिया
24 Aug 2013 - 6:47 pm | शिवोऽहम्
क्रमश: टाकायला विसरलो.
24 Aug 2013 - 7:04 pm | निवांत पोपट
पहिल्या भागात वाटलेली 'ओळख' आता सकस 'व्यक्तिचित्रा'त बदलते आहे.
अतिशय सरस! पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघायला लावण्याइतके सरस !
24 Aug 2013 - 8:59 pm | आनन्दिता
आवडते आहे... पुढचा भाग लवकर येउद्या... हुस्ना बद्दल उत्सुकता आहे....
24 Aug 2013 - 9:05 pm | पिंपातला उंदीर
माझयासाठी सध्याचा सर्वात बेस्ट धागा. लवकर पुढचा भाग टाका
24 Aug 2013 - 9:33 pm | कोमल
चांगली ओळख होईल यातून कलाकाराची..
आवडेश..
पुभाप्र..
25 Aug 2013 - 12:02 am | अनुप ढेरे
छान आहेत दोन्ही भाग. एक विचारायचय... ही महिती कशी मिळवलीत?
25 Aug 2013 - 11:10 am | शिवोऽहम्
जय गूगल बाबा की!
या कलाकाराविषयी बरंच मटेरिअल वाचायला मिळालं.
नेटवर पुर्वी आलेल्या काही मुलाखती, तू-नळीवर असलेले काही इंटरव्ह्यूज वजा विडिओज्. कारवाँ मॅगझीनवर असलेली त्याची दीर्घ मुलाखत हा मुख्य स्रोत.
25 Aug 2013 - 7:12 pm | पैसा
व्यक्तिचित्र मस्त रंगत आहे. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत
25 Aug 2013 - 7:16 pm | शिवोऽहम्
पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (३)
26 Aug 2013 - 6:12 am | स्पंदना
हा ही भाग मस्तच!
का कलाकारांच्या नशीबी अशी फरफट अन व्यसन असावीत?
26 Aug 2013 - 9:10 am | पिंपातला उंदीर
मनाची आंदोलन समजून घेणार कोणीही नसण आणि त्यातून आलेल परिपूर्ण एकटेपण, जगाचे दहा ते पाच चाकोरीमधले निकष लावून या असल्या कलांदर लोकांचे मोजमाप करणे, आणि मी जगवेगळा आहे हा शाप आहे की वरदान या आंदोलनामध्ये अडकलेल मन. हेच कारण आहे की दारूचा प्याला जवळ करावासा वाटतो. तो उलटून प्रश्न पण विचारीत नाही.