बस स्टॉपवर येऊन थांबली, आणि घाईघाईनं रांगेतली गर्दी पुढंपुढं सरकू लागली. रांगेबाहेरच्या त्या काहीश्या वयस्कर इसमाशी बोलणार्या तिला बहुधा गर्दीची ही घाई कळलीच नव्हती. मागून दोनचार जणांनी आवाज दिल्यावर तिची पावलं जडपणे पुढं सरकली. तो इसमही तिच्याइतक्याच जडपणानं बाजूनं पुढेपुढे सरकत चालत होता. रांगेबरोबर तीदेखील एखाद्या यंत्रासारखी बसमध्ये चढली आणि रिकाम्या राहिलेल्या एकमेव बाकावर चक्क विंडो मिळाल्यानं तिचा चेहेरा खुलला. तो इसमही मग बसबाहेर विंडोजवळ येऊन उभा राहिला. आता बस जवळपास भरली होती. पुढचा सिग्नल बंद होता म्हणून ती स्टॉपवर उभी होती. तेवढ्यात त्या इसमाशी किती बोलू अन काय असं तिला झालं होतं...
"आणि आईला सांगा, मी दिवाळीआधी येऊन जाईन एकदा घरी.... तुमची औषधं आताच घ्या जाताना... मी उद्या ऑफिसला गेल्यावर फोन करेन आईला... त्या दुकानात गूळ स्वस्त आहे... बाकीचे पण जिन्नस स्वस्त आहेत... कधीतरी जाऊन या तिकडे"... असं काहीबाही बोलत असतानाच बस सुरू झाली आणि तिचा आवाज जडावला... बाहेरच्या त्या इसमानंही हात लांब करून खिडकीतनं तिच्या हातावर थोपटल्यासारखं केलं आणि तिनं एकदम मान फिरवली... बाहेरचा तो माणूस जडपणे हात हलवत तिला निरोप देत होता... बस पुढे सरकली आणि तिनं मागे वळून बघितलं... तो इसमही अज्ञातात हरवल्यासारखा हात उंचावून उभा होता...
आता बस रस्त्याला लागली होती... कंडक्टर समोर येताच तिनं तिकीट घेतलं आणि ती निर्धास्त झाल्यासारखी व्यवस्थित बसली. मांडीवरच्या प्लास्टिकच्या पिशवीतलं एक पॅकेट घाईघाईनं काढून आधाशासारखं तिनं दातांनीच फाडलं आणि आतला पदार्थ काढून तोंडात कोंबला... नंतर प्रत्येक पॅकेटमधला एकेक पदार्थ ती असाच तोंडात कोंबून भरत होती... बसच्या पॅसेजमधली दांडी नीट पकडून मी त्या सीटशेजारच्या खांबाला रेलून उभा होतो. अगदी तिच्यासमोरच असल्यानं त्यांचं सगळं बोलणंही मी नीट ऐकलं होतं, आणि म्हणूनच माझं कुतूहलही जागं झालं होतं. हा आपला आगाऊपणा आहे, हे लक्षात येऊनही माझे कान त्यांच्या संभाषणाकडे लागले होते. ते काही फार महत्त्वाचं आणि खाजगी बोलत नाहीयेत, हे कळूनही, कान देऊन ऐकावं असं त्या संभाषणात काय होतं ते माझं मलाच कळत नव्हतं. पण बस सुरू झाल्यावरही, माझं लक्ष तिच्या हालचालींकडे लागलं होतं, एवढं खरं... त्या पिशवीतलं पॅकेट आधाशासारखं दातांनी ओरबाडून खाणार्र्या तिला बघून मला कीव वाटू लागली. पण तिचं आजूबाजूला लक्ष नव्हतं. प्रत्येक पॅकेटमधला एकेक पदार्थ चाखून तिनं पिशवी नीट बांधली आणि ती खिडकीतून बाहेर पाहू लागली... तिच्या चेहेर्यावर काहीतरी अद्भूत भाव उमटले असावेत, असं मला उगीचच वाटलं.
आता मात्र, आपण तिच्या हालचालींवर पाळत ठेवल्यासारखं वागणं बरं नाही, असं मला वाटायला लागलं, आणि मी तिच्यावरचं लक्ष वळवलं... गाडीत नेहेमीसारखीच गर्दी... नेहेमीसारखेच दमलेभागलेले, नोकरीवरून परतणारे प्रवासी शिणल्यासारखे उभे, बसलेले होते... नवीन काहीच नव्हतं. कुणी मोबाईलवरून गप्पा मारत होतं, कुणी ‘धंद्याच्या वार्ता’ करीत होतं. मी उभा असल्यानं उगीचच गाडीभर नजर फिरवत होतो. पुढच्याच स्टॉपला तिच्या शेजारचा प्रवासी उतरल्यानं मला बसायला जागा मिळाली. आता थोडा वेळ निवांतपणा होता. मीही खिडकीबाहेर डोकावत रस्त्यावरल्या गर्दीचा चेहेरा मनावर कोरू लागलो.
तेव्हढ्यात पुन्हा तिनं ती पिशवी उघडली. पुन्हा एकदोन पदार्थ तोंडात टाकले... पण आता मघाचा तो आधाशीपणा, उतावळेपणा नव्हता... उलट, तिच्या चेहेर्र्यावर, छानशी, समाधानाची छटा स्पष्टपणे उमटली होती. हळूच तिनं हातातली ती पिशवी कुरवाळली, आणि घट्ट धरली... तिच्या हालचालींचा अर्थ शोधताना मी उगीचच हरवत चाललो होतो.
तितक्यात तिनं पर्समधला मोबाईल काढला, आणि एक नंबर फिरवून कानाला लावला. आता पुन्हा तिचं मोबईलवरचं बोलणं मला स्पष्ट ऐकायला येणार होतं. पण मी माझं लक्ष जाणूनबुजून दुसरीकडं वळवलं. मला उगीचच अपराध्यासारखं वाटत होतं. ती फोनवर बोलत होती. तिचा आवाज अगदी मोकळा होता, आणि शब्दांतला आनंद ओसंडून वहात होता. लक्ष नसतानाही मला ते जाणवलं, आणि नकळत कान पुन्हा तिकडे वळलेच. "अगं आत्ता बाबा भेटले गं स्टॉपवर..." तिनं उकळ्या फुटल्यासारख्या उतावळेपणानं पलीकडच्या बहुधा तिच्या मैत्रिणीला सांगितलं, आणि मघापासूनच्या ताणलेल्या माझ्या आगाऊ उत्सुकतेला उत्तर मिळालं. तो जडपणे तिच्याशी बोलणारा वयस्क इसम, तिचे वडील होते... "केव्हापासनं येऊन थांबले होते गं बाबा स्टॉपवर. मी साधारण याच वेळेला येते ना, ते त्यांना माहीत होतं. किती दिवसांनी अशी अचानक भेट झाली गं... इतकं बरं वाटलं बघ बाबांना भेटून... मला एकदम रडूच आलं बघ..." ती आवाजातला ओलावा लपवत पलीकडचीला भरभरून सांगत होती.
आगाऊपणानं का होईना, मी तिच्या त्या आनंदक्षणाचा साक्षीदार झालो होतो. तिच्या चेहेर्यावरल्या समाधानाचा अर्थ मला आत्ता उमगत होता. नकळत माझ्याही मनात तिच्या समाधानाचा वाटेकरी झाल्याचं समाधान उमटत होतं. नुकतंच लग्न होऊन बहुधा ती या उपनगरात राहायला आली असावी. तिचे आईवडीलही बहुधा मुंबईतच कुठे दुसर्या उपनगरात राहत असावेत. लग्न झाल्यापासून माहेरी जायला तिला बहुधा वेळ मिळाला नसावा. लग्नाची रजा संपल्यावर लगेचच दोघांचीही नोकरी सुरू झाली असणार... नवलाईचे काही दिवस संपल्यावर त्या दोघांनीही मुंबईच्या वास्तव जीवनाला वाहून घेतलं असणार. आपल्या आणि नवर्याच्या, दोघांच्याही नोकरीच्या व्यापात आणि कदाचित नव्या नवलाईत बुडालेल्या तिला माहेरी जायला उसंत मिळाली नसणार... फोनवर बोलूनच ती बहुदा आईच्या मायेची ऊब अनुभवत असणार.... मोबाईलवर ती बोलत असतानच मी एकेक तर्क लढवत होतो...
मुंबईतल्या नोकरदार तरुणांच्या दगदगीच्या जीवनाचा एक अस्सल अनुभव माझ्या बरोबरीने प्रवास करत होता. या जीवनातल्या रोजच्या व्यापात, प्रेमाच्या माणसांच्या मायेच्या छायेसाठी आसुसलेला एक जीव आपल्या जन्मदात्याच्या इवल्याश्या सहवासातला आनंद जपून ठेवण्यासाठी धडपडत होता... त्या अनोख्या मायेच्या दर्शनानं मी भारावून गेलो होतो. त्या पिशवीतल्या पदार्थांचा गोडवा मलाही जाणवून गेला... त्या पदार्थांना आईच्या हातातल्या मायेचीच चव असणार, आणि कित्येक दिवसांपासूनची त्या मायेची भूक भागवण्यासाठीच ती नकळतपणे आधाशीपणा करत असणार, हे मला उमगलं... अजूनही ती भरभरून मैत्रिणीशी बोलतच होती. पुन्हा माझे कान तिकडे लागले. तिच्या आईनं, तिला आवडणारी खजुराची चिक्की, सुकामेवा, बेदाणे असं काहीकाही त्या पिशवीतून पाठवलं होतं, आणि ते देण्यासाठी तिचे वडील मुद्दाम स्टॉपवर येऊन ताटकळत थांबले होते... त्या पिशवीत त्यांची माया भरली होती आणि ती आधाशासारखी ती माया साठवून घेत होती...
तिचं बोलणं संपलं आणि फोन बंद करून तिनं पर्समध्ये टाकला. आता ती त्या पिशवीकडे नुसतं पाहात होती... बसमधली गर्दी हळुहळू ओसरत होती. आता ती आजूबाजूला पाहात होती. मी मुद्दामच तिच्याकडे पाहात होतो. मला तिच्या डोळ्यातलं समाधान अनुभवायचं होतं. ते शोधण्यासाठी आता मी धडपडत होतो... त्याच वेळी तिची माझ्याशी नजरानजर झाली, आणि छानसं हसून तिनं हातातली पिशवी पुन्हा नीट धरली... मी तिचं सगळं संभाषण ऐकलं होतं, हे तिला माहीत असणार. मीही आपुलकीनं हसून तिच्या आनंदाला दाद दिली, आणि खूपखूप बरं वाटल्याचा भाव तिच्या चेहेर्यावर उमटला... आगांतुकपणे तिच्या भावविश्वात डोकावण्याचा प्रयत्न करताकरता अनुभवलेल्या एका हृद्गताच्या समाधानानं माझं मन भारावलं होतं. ते भारावलेपण बहुधा माझ्या नजरेतूनही ओसंडून उतरलं होतं... बिनचेहेर्याच्या गर्दीत एकटेपणानं वावरताना नकळतपणे झालेल्या एका जिव्हाळ्याच्या, मायेच्या शिडकाव्यानं मी तृप्ततृप्त झालो होतो.. काही क्षणांच्या छोट्याश्या सहवासानं मोहोरलेल्या एका मनाच्या पाकळ्या उलगडताना मी प्रत्यक्ष पाहिल्या होत्या... मुंबईतल्या गर्दीत आणि कोलाहलातही, कुठल्यातरी झाडातून उमटणारा कोकीळकंठी स्वर मला स्पष्टपणे ऐकू येत होता.. दिवसभराचा सगळा शीण मी विसरून गेलो होतो... माझ्या मनाच्या अंगणातच एका `माहेरच्या सुवासाची बरसात झाली', या आनंदात मी डुंबून गेलो होतो.
प्रतिक्रिया
28 Nov 2007 - 11:18 pm | धनंजय
छान चितारला आहे.
29 Nov 2007 - 5:22 am | सहज
तिच्या हालचालींचा अर्थ शोधताना मी उगीचच हरवत चाललो होतो.
मस्तच. लेख आवडला.
दिनेशराव आता यापुढे तुमचे नाव "नवे लेखन" मधे दिसते आहे की नाही याकडे आमचे लक्ष असणारं बर का!
29 Nov 2007 - 11:28 am | ध्रुव
फारच सुरेख झाला आहे हा लेख. प्रत्येक शब्दाबरोबर आम्हालाही तिच्या समाधानाची जाणीव होत गेली.
छान वाटलं.
--
ध्रुव
3 Dec 2007 - 9:36 pm | विसोबा खेचर
हेच म्हणतो! दिनेशराव, अजूनही अवश्य लिहा ही विनंती...
तात्या.
29 Nov 2007 - 12:09 pm | आनंदयात्री
झाला आहे लेख. त्या पोरीला झालेला आनंद अनुभवला असे वाटले, अजुन येउद्या असे अनुभव चित्रण.
29 Nov 2007 - 1:31 pm | नंदन
लिहिलं आहे. साधासा प्रसंग सुरेख रीतीने खुलवला आहे.
मीही खिडकीबाहेर डोकावत रस्त्यावरल्या गर्दीचा चेहेरा मनावर कोरू लागलो.
- हे वाक्य विशेष आवडले.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
29 Nov 2007 - 3:47 pm | स्वाती राजेश
खरेच छोटीशी गोष्ट पण सुन्दर रंगवली आहे.
मनात आठवणींचे घर करुन जाते.
5 Dec 2007 - 9:48 am | दिनेश५७
आभार!
तात्या, आणि सर्व वाचकांचे!