प्रिय सखे....

वेणू's picture
वेणू in जनातलं, मनातलं
26 Jul 2013 - 9:09 am

प्रिय सखे,

हे पत्र नाही, एक आवेग आहे... तो ओसरला की सारं शांत होईल... पूर्वीप्रमाणे, शांत!
फक्त हा आवेग सांभाळून घे, समजून घे.... पेलून घे...

दोन दिवस.. दोन दिवस झाले प्रचंड घूसमटते आहे.. प्रचंड!

दोन दिवसांपूर्वी तुला फोन केला... खूप आनंदात.. माझ्याकडची आनंदाची बातमी तुला न देता तो आनंद साजरा होईलच कसा...?आपली सवयच ना... लहान लहानग्या इच्छा पूर्ण झाल्या की कर फोन ...आणि फोनवरच्या शब्दांतच सिलीब्रेशन, खरं तर तेच खरं आनंदानं न्हाऊन जाणं!

अगदी तसाच तुझा नंबर डायल केला... तू फोन उचलेपर्यंत, नेमकं काय काय बोलायचंय... गेले दोन महिने बिलकूल बोललो नाहीत म्हणून शिव्या कश्या घालयच्यात ह्याची उजळणी करतच होते...
तितक्यात पलीकडून फोन उचलल्या गेला...

"हॅलो, बागेश्री!"
"कोण, काकू का?"
"नाही गं, ताई बोलतेय...."
"ताई, तू कधी आलीस सिंगापूरवरून, आणि ही माहेरी आलीये होय?"
"बागेश्री, आमचे बाबा गेले, ही ने "तुला" नाही सांगितलं???"

पुढचं सगळं बोलणं यांत्रिक होतं... प्रश्न होते, उत्तरं होते...

काकूंनी घेतला मग फोन...
काय बोलावं अशावेळी?
इथून पुढे सहजीवन नसणार त्यांचं... काय सहानुभूती, समजूत.. शब्द तोकडे, तोकडे अगदी.
अशा वेळी खरंतर भेटायलाच हवं, हात हातत घेऊन, डोळ्यांनी आधार द्यावा...
ठेवला फोन...
सगळं गर्रकन फिरलं!
मी काय सांगण्यासाठी फोन करत होते, काय ऐकून फोन ठेवला... त्यात तुझ्याशी बोलणं झालंच नाही.

काका जरा आजारी होते, तू म्हणाली होतीस, पण तडाकाफडकी सगळंच आवरून निघून जातील, नव्हतं वाटलं!

अगं,
आई किंवा बाबा, ह्यांच नसणं काय असू शकतं, ह्याचा विचारही करवत नाही.
आपली पाळं मूळं गमावणं आणि जगत रहाणं सोपं नसावंच...
त्यात असं तडका फडकी कुणी छप्परच उडवून नेलं तर हादरायला होणारच...

आपलं नातं इतकं प्रगल्भ आहे, परंतू तरिही तुला पुन्हा मी फोन केलाच नाही. तुझी आणि तुझ्या बाबांची गट्टी मी ओळखून आहे, तुला काय वाटत असेल, ते इथे जाणवतंय... काय बोलू मी फोन करून तुला... शब्दांचा दिलासा... ?
आज पहिल्यांदा शब्दांच कमी पडणं मी अनुभवतेय..

तू आणि मी उदगीरला असताना, काकांनी मारलेल्या हजार खेपा मला आठवून गेल्या, कधी पुस्तकं द्यायला, कधी भाजलेला रवा, कधी चिवडा, कधी नुसत्याच भेटी....
आधार वाटायचा, आपले घरचे येऊन जाऊन असले की अगदीच एकटे पडलो नाहीत ही भावना आनंद द्यायची, मग अभ्यासावर लक्ष देता यायचं...

शेवटी सांग ना,
आपल्याला एका व्यक्तीतलं काय प्रिय असतं गं?

त्याचं हसणं, बघणं, बोलणं, रुसणं..नाही...
तर त्याचं "असणं"
फक्त असणं....

एक व्यक्ती, एक चैतन्य!
एक असं चैतन्य, जे कधी ना कधी आपल्यापासून कायमचं दूरावणार असतं... जे दूरावू नये म्हणून फार तर फार आपण आटापिटा करू शकतो, पण ते थोपवून धरू शकत नाहीच....

त्या व्यक्तीचं दुरावणं म्हणजे एक भकास पोकळी आणि त्या पोकळीची सवय लावून पुढे जाणं म्हणजे जगणं!
ह्यासाठी आपण आपल्यालाच कारणं देऊ लागतो- 'माझं जगणं, ह्याच्यासाठी- त्याच्यासाठी- तिच्यासाठी.... किती आवश्यक आहे' हे स्वतःला पक्कं पटवलं की त्या पोकळीची सवय लागलीच समजावी....

मी कधी क्षणभर थांबते,
विचार करते... अवलोकन करते..
माझ्या ध्यानात येतं, आता येत्या काही वर्षांत माझ्या खूप जवळच्यांचे मृत्यू मला पहायचे आहेत. ते त्यांच्या वयानुसार आलेले असू शकतात किंवा दिवसेंदिवस बळावणार्या आजारपणामुळे.
त्यांची स्थिती मला दिसते आहे, आणि नजीकचं भविष्यही.

पण हा विचार मला शहारा देतो, अंगभर.

त्या प्रत्येक व्यक्तीशी माझं निराळं नातं असतं, त्यांच्याकडून मी खूप काही मिळवलेलं असतं....
त्या प्रत्येकाचं 'असणं' मला "माझ्यासाठी" हवं असतं, त्यांचं जाणं माझं फार मोठं भावनिक नुकसान असतं!
इथे माझा स्वार्थ त्या व्यक्तीला नेऊ पाहणार्या मृत्यूपेक्षाही मोठा होतो, मला मिठीत घेतो, आवळतो आणि मी त्या व्यक्तीतल्या चैतन्याची पुजा करू लागते...
                 खरं तर, हे चैतन्य संपताना.. माझ्यातलं काही संपणार असतं... नेमकं, ते संपणंच मला नको असतं...

पण; क्षणार्धात जेव्हा, ह्या कशावरच माझा कंट्रोल नाही ह्याची जाणीव होते, तेव्हा हतबुद्ध मी, माझ्या सार्या व्यक्तींकडे पहात राहते....फक्त पहात राहते!!

आणि मग,
जे प्रिय आहेत, त्यांना 'हरएक' क्षण आनंदाचाच द्यायचा हे ठरवते... हे देणं मोठ्या पातळीवर जाऊ पाहतं.. आणि मग 'फक्त देतच राहायला हवंय' इथे मी पोहोचते.. आणि त्या स्वार्थाची मिठी सुटते... मी मोकळी होते

माझ्या हातात काहीही नाही हे कळाल्यावर, मी दु:खापासूनही वेगळी होते... माळेतल्या त्या 'गळून गेलेला मोत्याला' आठवणीचं कोंदण देते... मी ह्या जगण्याला तयार होते.
असे अनेक मोती उराशी जपते, आठवणींमधे त्यांना राखून ठेवते... जरा थांबते, कधी अश्रूचा कधी हास्याचा एक क्षण त्या मोत्याला देते.... मी ह्या जगण्याला तयारच असते...
माझाही असाच मोती होईल, हे ही जाणून असते.... आता मी जगत असते.

आणि खरं सांगतेय,
शेवटी तुला 'ह्या दु:खातून बाहेर पड, सावर स्वतःला' असं सगळं सांगणं म्हणजे.. तुझ्या दु:ख सहन करण्याच्या क्षमतेला कमी लेखणं होईल. तू काय आहेस, कुठल्या ताकदीन जीणं जगतेस हे मला माहिती आहे.. म्हणून हा आवेग इथे कागदावर उतरवलाय.

ह्यावेळेस फोनवर नाहीच बोलणार, येऊन भेटेन... घट्ट मिठीच बोलेल..

तुझीच

कथाविचारअनुभव

प्रतिक्रिया

जवळच्या माणसाचा मृत्यू नंतर आपण हे शिकलो कि जे आहेत त्यांना भरभरून आनंद द्यायचा तर आपले जीवन साथक होईल.
लेख अप्रतिम आहे .

michmadhura's picture

26 Jul 2013 - 2:28 pm | michmadhura

खूप आवडलं.

कवितानागेश's picture

26 Jul 2013 - 4:31 pm | कवितानागेश

अतिशय सुंदर लिहिलयं. फार आवडलं..

स्पंदना's picture

29 Jul 2013 - 5:21 am | स्पंदना

हं!
माझ्या नात्यातले जेंव्हा हळुहळु जायला लागले, तेंव्हा खरच विचार पडला; काय होतं त्या माणसाच? इतकी सवय असते आपल्याला त्यांची, विशेषतः ज्येष्ठ! जे आपल्या लहाणपणापासुन तेथे स्थीर असतात, ते गेल्यावर हा प्रश्न अधिकच सतावु लागला. मग कधीतरी वाटतं, येव्हढे सगळे जाताहेत म्हणजे; हे जाणं काही फारस त्रासदायक नसावं जाणार्‍यासाठी. एका प्रकारे मी माझ्या "जाण्याची" मानसिक तयारीच करते म्हणा हवंतर.
तरीही जाणार्‍याचा विरह हा असतोच.
फार छान लिहीलयं वेणु.

पैसा's picture

2 Aug 2013 - 8:50 pm | पैसा

छान लिहिलंय. लेख खूप आवडला. पण पहिल्या धक्क्याबरोबरचं दु:ख इतकं सहज बाजूला सारता येणं फार कठीण.

बॅटमॅन's picture

6 Aug 2013 - 2:44 pm | बॅटमॅन

लेख वाचून ही कविता आठवली. पेष्ट करतोय. कवी आहे चार्ल्स लँब. विषय अंमळ वेगळा आहे, पण आवडेल असे वाटते.

http://www.poetryfoundation.org/poem/173784

I have had playmates, I have had companions,
In my days of childhood, in my joyful school-days,
All, all are gone, the old familiar faces.

I have been laughing, I have been carousing,
Drinking late, sitting late, with my bosom cronies,
All, all are gone, the old familiar faces.

I loved a love once, fairest among women;
Closed are her doors on me, I must not see her —
All, all are gone, the old familiar faces.

I have a friend, a kinder friend has no man;
Like an ingrate, I left my friend abruptly;
Left him, to muse on the old familiar faces.

Ghost-like, I paced round the haunts of my childhood.
Earth seemed a desart I was bound to traverse,
Seeking to find the old familiar faces.

Friend of my bosom, thou more than a brother,
Why wert not thou born in my father's dwelling?
So might we talk of the old familiar faces —

How some they have died, and some they have left me,
And some are taken from me; all are departed;
All, all are gone, the old familiar faces.

विटेकर's picture

14 Aug 2013 - 11:02 am | विटेकर

मातीवर चढणे एक नवा थर अंती !
हे स्वीकारले की तुलनेने दु:ख कमी वाटायला लागते.
आणि एकदा स्वीकारले ( म्हणजे दुसरा पर्याय च नसतो वो) जरा हलके वाटेल.

वेणू's picture

10 Aug 2013 - 4:54 pm | वेणू

सर्व वाचकांचे आभार..

सुंदर कविता बॅट्मॅन.... स्तब्ध झालेच जरावेळ

अनन्न्या's picture

10 Aug 2013 - 5:01 pm | अनन्न्या

खरच, आपल्या जवळचं कोणी जाणं, नाही विसरता येत....

पैसा's picture

10 Aug 2013 - 5:16 pm | पैसा

लेख आवडला. निखिल्याने दिलेली कविताही फार सुरेख!

बहुगुणी's picture

13 Aug 2013 - 3:00 am | बहुगुणी

आता येत्या काही वर्षांत माझ्या खूप जवळच्यांचे मृत्यू मला पहायचे आहेत. हे आतपर्यंत पोहोचलं;
कसली अगतिक भावना आहे!

वरची बॅटमॅन यांनी दिलेली कविताही हलवून गेली.

थोडीशी संबंधित, मरणाला सामोरं कसं जावं, याविषयी 'सिद्धार्थ'-कार हरमान हेस यांनी लिहिलेली Steps [Stuffen] ही कविता काही महिन्यांपूर्वी वाचून त्याचा भावानुवाद करावासा वाटला होता, तो इथे उद्धृत करतो आहे:

************
कोमेजणं हे भविष्य जसं प्रत्येक फुलाचं असावं
आयुष्याच्या हरक्षणी, तारुण्याने वार्धक्याला सामोरं जावं

प्रत्येक शहाणपणाची, गुणाची आपली एक वेळ असते
हळूहळू कालौघात नष्ट होण्याची खेळी असते

आयुष्याने बोलावलं की मनाने तयारी ठेवावी ही
नव्या भरारीची, आणि निरोपाचीही

धीराने, दु:ख न करता सामोरं जावं
नव्या, वेगळ्या बंधनांना स्वीकारावं

नव्या सुरूवातीत असते एक दडलेली किमया
जगण्याची ऊर्मी देणारी, माथ्यावर नवी छाया

एका खोलीतून दुसरीत, मग तिसरीत आनंदात जावं
पण कुठल्याही वास्तूला आपलं घर न म्हणावं

जगरहाटीची नसते इच्छा ठेवण्याची आपल्याला बंधनात
पायरी-पायरीने वर चढावं, विस्फारत्या अवकाशात

क्वचितच रहिवासी व्हावं एका विवक्षित जागेचं
नाहीतर रेंगाळतो आपण, सोयीचं आयुष्य होतं सवयीचं

जो असतो तयार चटकन् उठून प्रवासास निघायला
पांगळं करणार्‍या सवयींतून तोच मुक्त करतो स्वतःला

वेळ येईल तेंव्हा नव्या वर्तुळांत पाठवेल मृत्यूही
तोवर थांबू नये आपल्या आयुष्याचं बोलावणंही

मुक्त हो, हे हृदया माझ्या, शमू दे वेदनेला प्रत्यही

*************

हरमान हेस यांच्या आवाजातली मूळ कविता इथे ऐकायला मिळेल (यूट्यूब वरही ती उपलब्ध आहे.)

एका खोलीतून दुसरीत, मग तिसरीत आनंदात जावं
पण कुठल्याही वास्तूला आपलं घर न म्हणावं>>> अनेक जन्म मिळतात आपल्याला बहुधा.. एका खोलीतून दुसर्या खोलीत जाताना किती सहजतेने जातो आपण... आधीच्या खोलीत आपले ठसे असण्याचा अट्टहासही नसतो मुळी.. पण आपण आजन्म मात्र ठसा मागे उरावा म्हणून धडपडत राहतो... जगण्यातली ही सहजता जमावे खरंच.... आपल्या असलेल्या देहाला वास्तू मानून बसतो...

इनिगोय's picture

14 Aug 2013 - 12:02 am | इनिगोय

वय वाढतं तसं माणसं दुरावण्याच्या वेगवेगळ्या तऱ्हा समजत जातात. असलेला माणूस आता 'नसतो' तेव्हा नक्की काय नाहीसं होतं? कुठेतरी आपल्यातल्या आपलं काहीतरी नाहीसं झालेलं असतं. पण तरी निर्माण हॊणाऱ्या पोकळीचीही आहे का नाही इतकी सवय होऊन जाते. आयुष्य पुढे सरकत राहातं.

तुमचं लेखन फार राजस असतं. पत्रं हा तुमचा आवडता फाॅर्म दिसतो.. 'पत्रकथा'नंतर बऱ्याच काळाने लिहिलंत. आणि मी त्याहून उशीरा वाचलं :-)

सुहास..'s picture

14 Aug 2013 - 10:47 am | सुहास..

हम्म !