===================================================================
किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८... (समाप्त)
===================================================================
...तोपर्यंत साडेदहा अकरा वाजत आले होते. ऑस्टेलियाच्या मध्यभागी अनुभवलेल्या आउटबॅक पार्टीच्या सुखद स्मृती घेऊन आम्ही हॉटेलवर परतलो.
आज सहलीचा बारावा दिवस. मध्य ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटी भागात असला तरी अॅलिस स्प्रिंग्जच्या परिसरात बरीच झाडी आणि पक्षी आहेत. विशेष म्हणजे वाळवंटी भाग असला तरी येथे रुक्ष करड्या रंगाच्या पक्षांबरोबर मनोहर रंगांचे आणि आकर्षक शरीररचनेचेही खूप पक्षी आहेत. सकाळच्या कोवळ्या उन्हात हॉटेलच्या नुकतेच पाणी दिलेल्या हिरवळीवरचे किडे टिपण्यासाठी झालेली त्यांची गर्दी न्याहारी करताना दिसत होती. अर्थातच बसच्या वेळेअगोदर मिळालेल्या अर्ध्या तासात त्यांची मुलाखत घ्यायला बाहेर पडलो...
गाला (Galah)...
मॅगपाय (Magpie) ...
अजून काही पक्षी...
.
आजचा पहिला थांबा होता अॅलिस स्प्रिंग्ज मरुभूमी उद्यान (Alice Springs Desert Park)...
१३०० हेक्टरवर पसरलेल्या ह्या विस्तीर्ण उद्यानात मध्य ऑस्ट्रेलियाच्या भूभागाची, वनस्पतींची, प्राण्यांची आणि त्यांच्याबद्दल मूळ निवासी लोकांच्या भावनांची मनोरंजक ओळख करून घेता येते. येथील हे सगळे प्रदर्शित करण्याची पद्धत फारच नावीन्यपूर्ण आहे. इथल्या शक्य तेवढ्या सगळ्या गोष्टी उद्यानात हिंडून त्यांच्या मूळ नैसर्गिक जागीच बघायला मिळतात. जेव्हा अगदी आवश्यक असेल तेव्हाच त्या कुंपणात अथवा छपराखाली आहेत.
पहिल्यांदा आम्ही पक्षीप्रदर्शनाचा कार्यक्रम बघायला गेलो. येथे छप्पर फक्त प्रेक्षकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठीच होते. या सर्व कार्यक्रमाचे मानाचे कलाकार खुल्या आकाशाखाली, आजूबाजूच्या निसर्गात निर्बंधपणे उडणारे पक्षी आहेत या गोष्टीवर तो कार्यक्रम प्रत्यक्ष बधितल्याशिवाय विश्वास बसणे कठीण आहे. परिसरातील पक्षी एका मागोमाग एक वॉर्डनच्या इशार्याबरोबर येत होते आणि त्यांचा कार्यक्रम सादर करून परत उडून जात होते !
पक्षीप्रदर्शनाचे प्रेक्षागृह...
आणि त्या खेळाच्या प्रांगणाची पार्श्वभूमी...
गाला...
.
घुबड...
.
ससाणा...
तोच ससाणा... वॉर्डनने फेकलेले दाणे हवेतल्या हवेत गिरक्या घेऊन पकडण्याची कलाकारी सादर करताना...
घार...
हे सर्व प्रदर्शन करतानाच वॉर्डन त्या पक्षांची खुसखुशित शैलीत माहितीही देत होता.
इतका सर्व वेळ आमच्या गडबड गोंधळाकडे किंचितही लक्ष न देता हा पिंगळा शांतपणे डुलक्या घेत होता...
उद्यानाच्या पायवाटेवर पुढचा टप्पा होता कांगारूंचा. या विभागात कांगारू मोकळे फिरत असतात आणि प्रेक्षकांना तेथे असलेल्या पायवाटेवरून खाली उतरायला बंदी आहे ! पायवाट म्हणजे या मोकळ्या विभागात कडेला दगड लावून आखलेली वाट. तिला कठडे वगैरे असला काही प्रकार नाही. आपण कांगारूंच्या अंगाला हात लावू शकू इतके जवळ असतो. मात्र "इथली कांगारूंची जात थोडी माणूसघाणी आहे. त्यामुळे त्यांना हाताळू नये" अशी सूचना आम्हाला वॉर्डनने केली होती. कांगारूही आम्ही बाजूने उभे राहून मोठ्या कौतुकाने त्यांचे फोटो काढतो आहोत तिकडे ढुंकूनही पहात नव्हते...
.
.
उद्यानात भटकून झाल्यावर तेथील चित्रपटगृहात मध्य ऑस्ट्रेलियाच्या भूगोल आणि प्राणिजीवनावरचा एक चित्रपट पाहिला आणि पोटोबासाठी परत गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी पोहोचलो. गाईडच्या सल्ल्याने तेथल्या "गोल्ड रश" काळाचे वातावरण असलेल्या एका पबमध्ये त्याच्या खास "बियर अॅन्ड चिप्स" चा आस्वाद घेतला. एक पाइंट स्थानीक डार्क बियर आणि एक मोठा पोशन त्या पबचे सिग्नेचर होममेड चिप्स... चवदार आणि पोटभरू मेन्यु होता. गोल्ड रश मधले गोल्ड नाही तर नाही, पण निदान वातावरण तरी अनुभवता आले...
.
.
.
एकदम "द गुड, द बॅड अॅन्ड द अग्ली" ची धून कानात वाजू लागली होती !
तेथे कार्ल नावाच्या एका साडेसतरा फूट लांबीच्या अजस्त्र मगरीचे कातडे ठेवलेले होते...
.
हे सगळे होईपर्यंत बारा वाजले होते आणि मग आम्ही उलुरुला जाणारे विमान पकडायला निघालो.
दोन वाजता क्वांतासलिंकचे विमान आम्हाला घेऊन ३४२ किमी एक तासांत पार करण्यासाठी उडाले आणि अॅलिस स्प्रिंगचे हे हवाई दर्शन झाले...
साधारण साडेतीनशे किमीच्या या प्रवासात मध्य ऑस्ट्रेलियाच्या रखरखीत वाळवंटी प्रदेशाचे चांगलेच दर्शन झाले...
निष्पर्ण भूमी आणि फक्त कधीकाळीच पाण्याचा स्पर्श झाला असावा अश्या वाटणार्या कोरड्या नद्या...
.
रखरखीत खडकाळ पठारे...
मधूनच लोहभस्माच्या अस्तित्वामुळे सूर्यप्रकाशात भडक रक्तवर्णाने चमकणारी भूमी...
तर मधूनच प्राचीनकाळच्या ऑस्ट्रेलियन भूमध्य सागराची निशाणी म्हणून उरलेली विस्तीर्ण लवणक्षारांची पठारे...
हा निसर्गाचा आश्चर्यकारक खेळ बघता बघता पन्नास मिनिटे हा हा म्हणता संपली. विमान खाली उतरू लागताच काता जूतांचे दर्शन झाले...
उलुरू विमानाच्या दुसर्या बाजूला होता त्यामुळे आकाशातून दिसला नाही. पण विमान धावपट्टीवरून वळल्यावर नाही म्हणायला त्यानेही चुटपुटे दर्शन दिले. उलुरु आणि काता जूता हे दोन निसर्गचमत्कार माझ्या ऑस्ट्रेलियातील आकर्षणांच्या यादीत पहिल्या आणि दुसर्या क्रमांकावर होते. त्यामुळे बस आम्हाला घेऊन हॉटेलवर न जाता सरळ काता जूताकडे निघाली याचा आनंदच झाला ! कारण आता प्रथम काता जूता पाहून नंतर मावळत्या सूर्याच्या किरणांची उलुरुवर होणारी जादू पाहायची होती !
काता जूताचा रस्ता उलुरू जवळून जातो. तेव्हा वाटेत उलुरुचे झालेले मोहक दर्शन...
.
काता जूता (Kata Tjuta) किंवा द ओल्गाज (The Olgas) म्हणजे २१-२२ चौ किमी वर पसरलेला ३६ घुमटाकृती आकारांचा विशाल प्रस्तरसमुह आहे. हे सगळे प्रस्तर सेडिंमेंटरी रॉक प्रकारात मोडतात. बहुतांश सपाट आणि इतर कोणताही मोठा डोंगर अथवा खडक नसलेल्या हजारो चौरस किमी भूमीवर असलेल्या उलुरू आणि काता जूताने प्राचीन मानवी मनात अनाकलनीय भिती, दैविक विचार आणि आदराची भावना निर्माण केली नसती तरच नवल होते. अर्थातच या विचारांचा प्रभाव त्या जमातींच्या हजारो वर्षांच्या इतिहासावर अटळ होता. मानवी वंशाच्या वाटचालीवर खोलवर परिणाम करणार्या अशा वस्तूंबद्दल माझ्या मनात, कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा न बाळगताही, एक प्रचंड आकर्षण आहे. आणि हेच कारण उलुरु आणि काता जूता माझ्या ऑस्ट्रेलियातील आकर्षणांच्या यादीत सर्वोच्च असण्याचे आहे.
उलुरु आणि काता जूता ही ठिकाणे मूळ निवासी लोकांमध्ये अत्यंत पवित्र मानली जातात आणि त्यांच्याशी संबद्धीत अनेक लोककथा प्रचलित आहेत. मात्र त्यातील खूपश्या कथा फक्त मूळ निवासी आणि तेही फक्त त्यांच्यातल्या निवडक खास दीक्षा दिलेल्या लोकांनाच सांगितल्या जातात. या कथांबाबत आणि येथील काही विशिष्ट संरक्षित स्थानांना भेट देण्याबाबत मूळ निवासी जमातींचे कायदे फार कडक आहेत.
काता जूता चे पहिले दर्शन...
जसजसे काता जूता च्या जवळ जाऊ लागलो तसे ४०,००० वर्षे एका मानवसमुहाच्या मनात आदराचे स्थान राखून असलेल्या या स्थानाबद्दलची माझी उत्सुकता वाढू लागली...
.
.
.
आम्ही बसमधून उतरून सूर्याच्या उन्हात तळपणार्या त्या प्रस्तरांना जवळून पाहायला निघालो...
.
.
.
रखरखीत वाळवंटातही मधूनच आश्चर्यकारकरीत्या एखाद्या ठिकाणी भूमीगत झर्यांच्या आधारावर तगलेली चमकत्या हिरव्या रंगाची हिरवळ डोळ्यांना सुखावत होती...
काता जूताच्या परिसरात भटकून आणि इतके दिवस मनात बाळगलेली त्या खडकांना स्पर्श करण्याची इच्छा पूर्ण केल्यानंतरही मन आणि शरीर तिथेच रेंगाळू पाहत होते. पण गाइडने केलेली वेळेची जाणीव आणि सूर्यास्ताच्या वेळेचे उलुरुचे दर्शन करण्याची इच्छा या दोन गोष्टींनी पायांना परत बसकडे निघण्याची आज्ञा केली.
काता जूता सोडता जवळ जवळ सपाट असलेल्या मध्य ऑस्ट्रेलियाच्या साधारण मध्यभागी असलेला, जमिनीवर ३४८ मीटर (समुद्रसपाटीपेक्षा ८६३ मीटर) उंच असलेला आणि ९.४ किमी घेराचा उलुरु हा एकच-एक शिळारूपी पर्वत ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वात महत्त्वाची आणि जगप्रसिद्ध नैसर्गिक खूण मानली जाते. उलुरु हे इथल्या अनांगू जमातीचे सर्वात पवित्र स्थान आहे. शिवाय त्याच्या प्राचीन, सामाजिक आणि भौगोलिक महत्त्वामुळे त्याला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मान्यता प्राप्त आहे.
बेसाल्ट, ग्रॅनाइट आणि वालुकाश्म यांनी मिळून बनलेला हा प्रस्तर त्याच्यातील धातूंच्या (मुख्यतः लोह) संयुगांमुळे त्याच्यावर पडणार्या सूर्यकिरणांच्या बदलत्या दिशेनुसार व प्रखरतेनुसार रंग बदलतो. हा नजारा पाहायला सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळी उलुरुच्या खास सफारी असतात. ज्या ठिकाणांवरून ही नैसर्गिक करामत उत्तम प्रकारे दिसते अशा मोक्याच्या ठिकाणांवर पार्किंग, निरीक्षण मनोरे, वगैरेची उत्तम सोय केलेली आहे.
सहल कंपनीने आमच्यासाठी खास मोक्याची जागा राखून ठेवली होती आणि शँपेन, स्नॅक्स, प्रत्येकाला बसायला घडीची खुर्ची अशी राजेशाही व्यवस्था केली होती. त्यामुळे आरामात बसून, हसत खेळत, खानपानासह सूर्यास्ताच्या वेळेचा उलुरु वरचा रंगसोहळा तास-दीड-तास मजेत पाहता आला. तो सगळा सोहळा तसाच्या तसा पकडणे कॅमेर्याच्या कुवतीबाहेरचे होते. शिवाय कॅमेरा त्यावेळी आपल्या मनात उठलेल्या भावना कैद करू शकत नाही ते वेगळेच.
दर ४-५ मिनिटांनी टिपलेल्या उलुरु आणि त्याच्या मागच्या आकाशाच्या बदलत जाणार्या रंगछटा...
.
.
तो रंगसोहळा मनात घोळवत हॉटेलवर गेलो. झोपेपर्यंत तो रंगांचा खेळ डोळ्यासमोर येत होता. मात्र अजून उलुरुला स्पर्श केला नव्हता त्यामुळे मन पुरेसे भरलेले नव्हते.
(क्रमशः )
===================================================================
किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८... (समाप्त)
===================================================================
प्रतिक्रिया
19 May 2013 - 1:40 pm | प्रचेतस
अद्भूत आहे हा भाग.
माणसांच्या इशार्यांसरशी येणारे पक्षी, मध्य ऑस्ट्रेलियाचा उजाड, ओसाड भाग, काता जुआचे प्रस्तरखंड, रंग बदलणारा उलुरु सारे काही अद्भूतच.
19 May 2013 - 1:43 pm | बापु देवकर
हा ही भाग मस्तच..धन्यावाद एक्कजी
19 May 2013 - 4:35 pm | nishant
वाचताना मजा येत आहे..
19 May 2013 - 6:26 pm | पैसा
ग्रेट!
19 May 2013 - 6:39 pm | प्यारे१
अद्भुतच....!
शेवटचे फोटो येडं करत आहेत.
क्लास्स्स्स्स!
19 May 2013 - 7:57 pm | सुहास झेले
क्लास !!
घारीचा फोटो विशेष आवडला. आता पुढे? :)
19 May 2013 - 8:13 pm | अजया
मस्तच आणि अद्भूत ! रंगांची किमया वेड लावत असेल!
19 May 2013 - 9:04 pm | संजय क्षीरसागर
तुम्ही नुसते पर्यटक नाही तर सौंदर्योपासक, निसर्गाप्रती एकाच वेळी कृतज्ञता आणि आकर्षण असणारे एक बहुरंगी व्यक्तिमत्त्व आहात याची नि:संदिग्ध कल्पना तुमच्या या वर्णना आणि फोटोंवरून येते,
तुमच्या प्रवास वर्णनांनी इंटरनेट आणि संकेतस्थळ यांचा अत्यंत सुयोग्य उपयोग होऊन अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण होतो आहे आणि होईल. अनंत शुभेच्छा आणि ...बस लगे रहो.
19 May 2013 - 10:23 pm | मेघनाद
मी सर्व भाग २ दिवसात वाचून काढले त्यामुळे मी स्वतःच ऑस्ट्रेलिया सफरीला निघालोय अस वाटल….
तुम्ही असेच लिहित राहा …। आम्ही वाचतो आहोत.
दोन प्रश्न : तुम्ही दम्माम चे रहिवाशी आहात का ? आणि तुम्हाला एवढ्या लांब लचक सुट्ट्या कशा मिळतात ?
19 May 2013 - 11:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
वल्ली, बापु देवकर, nishant, पैसा, प्यारे१, सुहास झेले, अजया, संजय क्षीरसागर आणि मेघनाद : आपल्या सर्वांच्या सहभागाने सहलीचा आनंद व्दिगुणीत होत आहे... धन्यवाद !
20 May 2013 - 1:54 am | सानिकास्वप्निल
उलुरुचे फोटो खासचं :)
+१११११११११
20 May 2013 - 10:12 am | कोमल
अप्रतिम.. दुसरे शब्दच नाहीत..
उलुरूचे दर्शन तर मस्तच..
खुप छान चाललीये सफर.
पुभाप्र :)
20 May 2013 - 10:50 am | श्रिया
खूप रोचक आहे हाही भाग. उलुरुचे फोटो अप्रतिम.
20 May 2013 - 1:37 pm | मोदक
शब्द संपले!
20 May 2013 - 1:59 pm | स्मिता.
उलुरूचे फोटो क्लास आहेत. ते फोटो बघूनच वाटतंय की प्रत्यक्षात तो फार अद्भुत देखावा असावा म्हणून!!
20 May 2013 - 5:48 pm | मॄदुला देसाई
पुढचा भाग लवकर येऊ द्या :)
20 May 2013 - 9:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
सानिकास्वप्निल, कोमल, श्रिया, मोदक, स्मिता. आणि मॄदुला देसाई : आपणा सर्वांना सुंदर प्रतिक्रियांसाठी धन्यवाद !
20 May 2013 - 10:29 pm | रेवती
शब्द संपले.
20 May 2013 - 11:17 pm | राघवेंद्र
वाचत आहोत.
21 May 2013 - 9:43 am | मदनबाण
च्यामारी मला बी असचं हिंडाया फिराया गावलं पायजेल ! फोटु बी लयं झ्याक काढुन राहिले की रावं तुम्ही...
असंच लिवा... :)
21 May 2013 - 10:44 am | उदय के'सागर
अप्रतिम :)
21 May 2013 - 1:55 pm | अजो
आज सर्व लिखाण वाचले. अप्रतिम आहे प्रवास वर्णन.
21 May 2013 - 9:55 pm | मराठे
निसर्गाची किमया बघताना मजा आली.
अवांतरः
नोवा चा 'ऑस्ट्रेलिया: फर्स्ट ४ बिलियन इयर्स' नावाचा प्रोग्रॅम (४ भाग आहेत) नुकताच पाहिला. त्यात ऑस्ट्रेलियाच्या भूगोलाविषयी फार छान माहिती दिली आहे. त्यातूनच फक्त तिथेच दिसणारे प्राणी / पक्षी यांबाबतही माहिती मिळते. (गूगलबाबांना विचारल्यास तो बघायला मिळेल).
21 May 2013 - 10:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
रेवती, राघव८२, मदनबाण, अधाशी उदय, अजो आणि मराठे : आपल्या सहलीतल्या सहभागासाठी धन्यवाद !
21 May 2013 - 10:23 pm | लाल टोपी
सर्व भाग वाचून प्रतिक्रिया द्यायचे ठरवले होते. पण हा भाग वाचून पाहून न राहून 'केवळ अप्रतिम' वाटले व्वा! जबरदस्त!!
22 May 2013 - 4:36 pm | बॅटमॅन
इतके दिवस फटू नीट दिसत नसल्याने कमेंट दिली नव्हती. आज दिसले, आणि मजा आली एकदम. हा भाग निव्वळ अप्रतिम झाला आहे. पक्षी अन कांगारू तर भारीच, पण तो गुड बॅड अग्लीवाला पबही खल्लासच!! उलुरु अन काता जूता तसेच विमानातून काढलेले काही फोटो तर मंगळाच्या पृष्ठभागावरचे फोटो म्हणून सहज खपून जातील रंगसोहोळाही उत्तमच. उलुरुबद्दल खूप आधी कधीतरी एकदा चांदोबामध्ये वाचलेले होते तेव्हापासून उत्सुकता लागून राहिली होती पहायची, आज अंशतः पूर्ण झाली :)
22 May 2013 - 5:31 pm | स्पंदना
उलुरु अन त्याच्या भवतालच अद्भुत वलय मलाही फार आकर्षीत करौन राह्यलय. जायच आहे इथे, पण या असल्या गोष्टींची आवड असणारी मी एकटीच आहे.

अशी ठिकाणे डोळ्यांनी पाहुन समजत नाहीत अस अगदी मनापासुन वाटत.
तुमच्या कॅमेरातुन हे सारं पाहुन फार आनंद झाला.
ऑस्ट्रेलियात विशेषत्वाने जाणवणारी गोष्ट म्हणजे इथल्या पक्ष्या प्राण्यांना माणसांचे नसणारे भय. तुम्ही जो पक्ष्यांचा शो म्हणता ना, तो अगदी रोजच्या आयुष्यात अगदी साधी साधी माणस करतात. परवा वॉर्बर्टन म्हणुन एका ठिकाणी गेलो होतो. तेथे एक ब्रिटीश म्हातारी भेटली. मी म्हातारी म्हणतेय पण पठ्ठीचा हाताचा पंजा माझ्या पंजाच्या तीनपट होता. तिच्या अंगणात कुकाबरा अंघोळ करत होते, लुच्चे कुठले बाजुची दोन ढांगांवरची नदी सोडुन हीच्या बर्डबाथमध्ये डुबक्या मारायच्या चालल्या होत्या. मी अचंब्याने पहातेय म्हंटल्यावर ती सांगु लागली. हे सातजण आहेत. हा समोरचा अजुन लहाण आहे. परवा सकाळी कुठुनसा एक सरडा पकडुन आणला अन हे दंगा घातला ओरडुन ओरडुन, त्याच्या माहितीची सर्वजण; अगदी शेजारी पाजारी जमल्यावर, मग त्याने तो सरडा इकडे तिकडे आपटुन मारला. अन मग गट्ट्म केला.
तुम्ही दाखवलेला मॅगपाय नव्हे, कावळ्यासारखा दिसणारा अन सुरेल गाणारा तो मॅगपाय. मी चित्र टाकलय. याच्या पिल्लांना जेंव्हा उडायला शिकवतात तेंव्हा एक दोन दिवस या पिल्लांना जमिनीवर रहाव लागत, अन मग त्यांच बेबी सीटींग अगदी आरामात आम्च्यावर टाकुन दिल गेल होत. अगदी पिल्लुही लागोपाठ दोन दिवस आमच्या गॅरेजमध्ये आरामात बॉक्सवर बसल होतं.
बहुतेकदा पक्ष्यांच्यात बेट लागत असावी इथे, सिग्नल सुट्ला की रस्त्याच्या कडेने भरधाव निघालेल्या गाड्यांच्या पुढ्यात आगदी जवळ जाउन सुर मारतात अन पुन्हा वर येतात. लय मस्तवाल. जीव जातो माझा. वर तारेवर बसुन गाडी जवळ आली की एकदम खाली सुर मारुन गाडीच्या बंपरच्या अगदी इंचभर जवळुन उडतो.
रेसीडेंशीअल रस्त्यावर आरामात चालत रस्ता क्रॉस केला जातो. गाडीने वेग कमी करावा अशी अपेक्षा अगदी ठ्ळकपणे दाखवली जाते. गल्लाहज, काकाकुवा, रस्त्याच्या कडेला हिरवळीवर चरत असतात. ५०भर पक्षी असतात. जवळुन चालत गेलात तर लक्ष सुद्धा देत नाहीत.
23 May 2013 - 3:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
लाल टोपी, बॅटमॅन आणि aparna akshay : अनेक धन्यवाद !
23 May 2013 - 3:22 pm | सूड
मस्तच!!
23 May 2013 - 5:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !