===================================================================
किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८... (समाप्त)
===================================================================
...तो रंगसोहळा मनात घोळवत हॉटेलवर गेलो. झोपेपर्यंत तो रंगांचा खेळ डोळ्यासमोर येत होता. मात्र अजून उलुरुला स्पर्श केला नव्हता त्यामुळे मन पुरेसे भरलेले नव्हते.
आज सगळेच भल्या पहाटे उठून सर्व तयारीनिशी बसमध्ये वेळेच्या अगोदरच येऊन बसले होते. कारण आज उलुरुवरचा सूर्योदय पहायचा होता आणि कालचा सूर्यास्ताचा सुंदर अनुभव घेतल्यावर आजच्या सूर्योदयाचा एक क्षणही चुकू नये असेच सर्वांना वाटत होते. आज पहिल्यांदा प्रवासी गाईडला निघण्याची घाई करत होते. "मी सूर्योदयाच्या वेळेची खात्री करूनच निघायची वेळ ठरवली आहे. काळजी करू नका." ह्या गाईडच्या सांगण्याची फारशी दखल न घेता, "आता सगळे आले आहेत. चला बस हलवा." असे एकमुखाने प्रवाश्यांनी सांगितल्यावर बस ठरलेल्या वेळेच्या पाच-दहा मिनिटे अगोदरच उलुरुला जाण्यास निघाली.
उलुरुचा परिघ ९.४ किमी आहे आणि त्याला चारी बाजूंनी बघण्यासाठी चारचाकीचा रस्ता व पायवाट केलेली आहे...
आमची बस सूर्योदय पाहण्याच्या मोक्याच्या ठिकाणी पोहोचली तेव्हा गर्दी खूपच कमी होती. आम्हा सर्वांनी सर्वप्रथम उत्तम जागा पकडून आपली चित्रणाची आयुधे सज्ज केली. आम्ही केलेल्या घाईचा नक्कीच फायदा झाला होता कारण पुढच्या पंधरा मिनिटात अजून दहा बारा बसेस येऊन तेथे हा हा म्हणता गर्दी उसळली.
काही मिनिटातच उलुरु पलीकडून झुंजुमुंजु झाल्याची पहिली निशाणी दिसू लागली आणि मग परत कालच्यासारखा पण उलट दिशेने प्रकाशाचा खेळ सुरू झाला आणि आम्ही निस्तब्धतेने बघत आणि फोटो काढत राहिलो...
.
.
.
दुसर्या बाजूला क्षितिजाजवळ असलेल्या काता जूतावर चाललेली प्रकाशाची जादूपण इतक्या दुरूनही लक्ष वेधून घेत होती...
सूर्य वर आल्यावर मग आम्ही उलुरुला जवळून भेटायला गेलो...
.
अगोदर सांगितल्याप्रमाणे काही विशिष्ट भागांत परक्या माणसांना प्रवेश नाही अथवा फोटो काढण्यास मनाई आहे. परंतू इतर ठिकाणी मोकळेपणाने फिरता येते. तेथे बघण्यासारख्या अनेक जागा आहेत. त्यातल्या काही ठिकाणच्या खडकांवर हजारो वर्षे जुनी चित्रे आणि संकेतीक संदेश आहेत. त्यातील काही...
.
.
बर्याच ठिकाणी वातावरणाच्या परिणामाने झीज होऊन त्या प्रस्तरावर चित्रविचित्र नक्षी तयार झाली आहे...
प्राचीन काळची हत्यारे आणि मानवी वास्तव्याच्या खुणा सापडलेली एक गुहा...
जवळून पाहिले तर काही ठिकाणचा पृष्ठभाग तर अगदी गंज लागलेल्या जुन्या लोखंडी पत्र्यासारखा दिसत होता...
एका ठिकाणी वर चढून जायला धातूचे खांब व साखळ्यांची व्यवस्था केलेली दिसत होती. मूलनिवासींना उलुरुवर कोणी चढून जावे हे आवडत नाही. पण त्याचे मुख्य कारण तेथे घसरून अथवा जोरदार वार्याच्या ओघाने माणसे उडून झालेले अपघात हे आहे. मूलनिवासी प्रवाशांना त्यांच्याकडे आलेले अतिथी समजतात आणि आपल्या पाहुण्यांना काही इजा होणे हे त्यांना दु:खदायक वाटते. पण तरीही काही धडपड्या मंडळींनी ही उलुरुवर चढायची व्यवस्था केली आहे. मात्र तेथे हवामान दर्शवणारी एक मार्गदर्शक पाटी आहे आणि तिच्यावर "चढाईस योग्य परिस्थिती" अशी नोंद असल्याशिवाय उलुरुवर चढाई करण्यास मनाई आहे.
प्राचीन काळात उलुरुच्या ठिकाणी घडलेली एक गोष्ट परक्यांना सांगायला स्थानिक जमातींची परवानगी आहे. ती तेथे लिहून ठेवलेली आहे. त्या गोष्टीप्रमाणे एका जमातीच्या एका तरुणाने दुसर्या जमातीच्या मालकीच्या जागेत जाऊन शिकार केली. हे कृत्य गुन्हा समजला जातो. शिवाय त्याने ती शिकार दुसर्या जमातीबरोबर वाटून घेतली नाही. हा दुसरा गुन्हा झाला. यामुळे दुसर्या जमातीच्या एका तरुणाने पहिल्याचा उलुरु पर्यंत पाठलाग करून त्याला बाणाने जखमी केले व शिकार ताब्यात घेतली. जमातींच्या नियमाप्रमाणे हे ठीकच होते. मात्र अजून एका नियमाप्रमाणे जखमी झालेल्या माणसाची--- मग तो शत्रू असला तरी--- शुश्रूषा करण्याची जबाबदारी जखमी करणार्यावर असते (आंतरराष्ट्रीय जिनीव्हा करारामध्ये साधारण अशाच प्रकारचे युद्ध्कैद्यांना देण्याच्या वागणूकीबद्दल एक महत्त्वाचे कलम आहे). नंतर जखमी झालेला माणूस बराच वेळ काहीही मदत न मिळाल्यामुळे मरण पावला. हे मृताच्या आईला कळले तेव्हा तिने रागावून हल्लेखोराला जाब विचारला. पण हल्लेखोर आढ्यतेने हसला आणि काहीतरी उर्मटपणे बोलला. पण मृताची आईही गप्प बसणार्यातील नव्हती. तिने आपल्या हातातील शस्त्राने त्याचा वध केला.
नंतर या गोष्टीचा बोध सांगितला जातो तो असा:
१. जमातींचे नीतिनियम पाळणे हे सगळ्यांचे कर्तव्य आहे.
२. शत्रूला शिक्षा जरूर द्या पण तोही माणूस आहे तेव्हा त्याला सामाजीक नियम वापरून माणुसकीनेच वागवायचे असते.
३. प्रत्येक गोष्टीचे काही ना काही परिणाम होतातच आणि चूक केल्यास परिणाम भोगायला लागणारच.
आज जगात ज्या पद्धतीचे राजकारण चालताना दिसते आहे त्या पार्श्वभूमीवर ही कथा "सुधारलेल्या" जगाच्या वागण्याबद्दल बरेच काही सांगून जाते.
अजून एक आश्चर्य म्हणजे जवळच्या नातेवाइकांत शरीरसंबंध झाल्यास जनुकीय रोगांचा उद्भव होतो हे ज्ञान ऑस्ट्रेलियन मूलनिवासींना प्राचीनकाळापासून आहे. ते रोग टाळण्यासाठी काही वैशिष्ट्यपूर्ण विवाह नियम मूलनिवासी पाळतात. ते थोडक्यात असे आहेत:
प्रत्येक जमातीची चार कुटुंबात विभागणी होते... समजा ती कुटुंबे "अ", "ब", "क" आणि "ड" अशी आहेत.
आता लग्नाचे नियम असे:
१. नवरा आणी नवरी एकाच कुटुंबातली नसावी.
२. नवरा "अ" आणी नवरी "ब" कुटुंबातली (किंवा त्याविरुद्ध) असली तर मुले "क" कुटुंबाचे सभासद होतील.
३. नवरा "ब" आणी नवरी "क" कुटुंबातली (किंवा त्याविरुद्ध) असली तर मुले "ड" कुटुंबाचे सभासद होतील.
४. नवरा "क" आणी नवरी "ड" कुटुंबातली (किंवा त्याविरुद्ध) असली तर मुले "अ" कुटुंबाचे सभासद होतील.
५. "अ" आणि "क" व "ब” आणी "ड" कुटुंबातील व्यक्तीत विवाह होऊ शकत नाही.
(अजूनही काही बरेच गुंतागुंतीचे आणि सामाजिक रीतीरिवाजावर आधारीत नियम आहेत ते सगळे येथे देणे विस्तारभय व माझ्या तुटपुंज्या ज्ञानामुळे शक्य नाही.)
अशी शास्त्रीय पद्धती, तीही अनेक दशसहस्त्र वर्षांपूर्वी प्रमाणित करून ती अमलात आणली गेली आहे. हे ज्ञान इतर जगात काही ठिकाणी फार तर काही हजार वर्षांपूर्वी (उदा. भारतात सगोत्र विवाह करत नाहीत, इ.) तर इतर बहुतेक ठिकाणी गेल्या एका शतका दोन शतकातच माहीत झाले आहे.
अजून एक प्रथा म्हणजे, कुटुंबातील सर्व घटक (पुरुष-स्त्रिया-मुले) ही सर्व कुटुंबाची एकत्रीत जबाबदारी समजली जाते. त्यामुळे कोणी विधवा, विधूर अथवा अनाथ झाल्यास सर्व कुटुंब योग्य मदत करून त्याची आबाळ होणार नाही याची काळजी घेते.
अश्या लोकांवर केवळ त्यांच्याकडे बंदूका नव्हत्या म्हणून वर्चस्व गाजवले गेले. त्यांना मागासलेले म्हणण्यापेक्षा "त्यांची संस्कृती वेगळी आपली वेगळी" असे म्हणणेच जास्त योग्य होईल.
===================================================================
उलुरुच्या भेटीनंतर आम्ही तडक केर्न्सला जाण्यासाठी विमानतळावर गेलो. उलुरुहून १०:२५ ला निघालेले विमान तासाभरात अॅलिस स्प्रिंग्जला पोहोचले. यापुढे आम्हाला केर्न्सला घेऊन जाणारे विमान संध्याकाळी ५:२५ ला होते. या मधल्या चार-पाच तासांचा सदुपयोग शिल्लक राहिलेली आकर्षणे बघण्यासाठी करायचा होता. ज्या कारणामुळे अॅलिस स्प्रिंग्ज हे गाव वसले ते अॅलिस स्प्रिंग्जचे टेलिग्राफ ऑफिस आम्ही विसरणे कसे शक्य होते ? :) तेच एक नव्हे तर अजून दोन आकर्षणे पाहण्याइतका वेळ बाकी होता !
प्रथम पोटोबा करून आम्ही एक मूलनिवासी केंद्र बघायला गेलो. तेथील मार्गदर्शकाने आम्हाला मध्य ऑस्ट्रेलियातील मूलनिवासी समाजजीवनाची आणि कलेची ओळख करून दिली...
रोजच्या वापरातल्या वस्तू...
.
खेळणी...
लाकडी हत्यारे...
वेगवेगळी बुमरँग्ज...
कलाकुसर...
.
.
मूलनिवासी लोकांच्या आतापर्यंतच्या अल्प परिचयानंतरही तथाकथित सुधारणे पासून दूर असलेली ही माणसे विचार, कला व संस्कृतीने एका परीने समृद्ध होती हे मानायलाच लागेल.
===================================================================
तेथून पुढे उत्सुकता जास्त न ताणता गाइड आम्हाला टेलिग्राफ ऑफिसवर घेऊन गेला.
त्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या, युरोपियन वडील आणि मूलनिवासी आई असलेल्या आणि तेथेच जन्मून मोठे झालेल्या एका ७०+ वय असलेल्या गाइडने आम्हाला ऑफिसची ओळख करून दिली. सुंदर खुसखुशीत शैलीतल्या ऐतिहासिक माहितीबरोबर त्याने त्याच्या लहानपणीच्या काळातील स्वतःचे सांगितलेले अनुभव ती भेट संस्मरणीय करून गेले...
सुरुवातीचा काही काळ हे सेंटर म्हणजे जगातल्या एका प्रचंड वाळवंटाच्या मध्यभागी असणारे एक छोटे खेडे होते. तेथील लोकांना लागणारे सर्व सामान सहा ते बारा महिन्यांनी जवळ जवळ २,००० किमी वरून येत असे. ते आणणारी गाडी...
ते सामान आणण्यासाठी नंतर उंटांचा वापर सुरू झाला. ब्रिटिशांनी हे उंट आणि त्याचे वाहक राजस्थानातून नेले. मात्र त्या काळच्या भारताबद्दलच्या अज्ञानामुळे त्यांना अफगाणी म्हणून नोंदवले गेले असा इतिहास गाइडने सांगितला...
सगळे स्टेशन फिरून झाल्यावर तेथून भारतात घरी टेलिग्रामही पाठवला. तो निश्चितच माझी एक्स संग्राह्य गोष्ट म्हणून राहील !...
सद्याच्या काळात मोर्स कोड वापरून भूमीगत तारांतून संदेश पाठवत कार्यरत असणारे सर्व जगात बहुतेक हेच एक टेलिग्राफ ऑफिस असावे. मात्र आता इतर ठिकाणच्या भूमिगत तारा निकामी झाल्याने येथून पाठवलेला संदेश अॅलिस स्प्रिंग्जहून सिडनीपर्यंतच मोर्स कोडने व भूमीगत तारेने जातो. पुढे जगभर नेहमीच्या 'ऑस्ट्रेलिया पोस्ट' ने जातो.
आपला इतिहास जिवंत ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियातील निवृत्त टेलिग्राफ कर्मचारी तेथे स्वयंस्फूर्तीने एक एक महिना पाळीपाळीने येऊन काम करतात म्हणूनच केवळ ते चालू आहे. "आता आमच्या नंतर हे बंद पडेल" अशी खंत त्यांच्या बोलण्यात सतत येत होती. कारण आता ऑस्ट्रेलियन तरुणांना हे असले काम, तेही विनामोबदला, करण्यात रस नाही.
पुढचा थांबा होता एक फक्त १३८ विद्यार्थी असलेल्या शाळेचा...
.
पण विशेष असे की ते विद्यार्थी भारतापेक्षा जास्त मोठ्या क्षेत्रफळाच्या भूमीवर विखुरलेले आहेत !...
या परिमाणाने ही फॉर्मल अभ्यासक्रम शिकवणारी जगातली सर्वात मोठी शाळा आहे! सुरुवातीला हे शिक्षण रेडिओच्या मदतीने होत असे...
.
पण आता सर्व शिक्षण आंतरजालाच्या मदतीने होते. शाळेच्या स्वतःच्या इमारतीत प्रक्षेपणाच्या सर्व सामग्रीने सुसज्य असे दोन वर्ग आहेत. खास प्रशिक्षित शिक्षक तेथून वर्गाचे तास घेतात आणि विद्यार्थ्यांशी सतत ध्वनी-चित्र-संपर्क साधून असतात.
.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी सॅटेलाईट डिश, काँप्युटर व आंतरजाल देण्याची आणि ते उत्तमरीत्या चालू ठेवण्याची जबाबदारी सरकारी खर्चाने होते. दर सत्रात एकदा तरी शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या घराला भेट देऊन तांत्रिक व्यवस्था व स्थानिक मार्गदर्शकाची तपासणी करून सर्व आलबेल असण्याची खात्री करून घेतात. दर सत्रात एकदा सर्व विद्यार्थ्यांचे अलिस स्प्रिंज्गमध्ये शाळेच्या आवारात संमेलन होते. त्यांत शिक्षण आणि करमणूक या दोन्हीवर भर देऊन मुलांची शिक्षणाची आवड वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.
मुख्य वस्त्यांपासून अतीदूर वाळवंटी प्रदेशांतील मेंढ्या-गुरे पालनाच्या केंद्रांवर राहणाऱ्या कर्मचार्यांच्या केवळ १३८ मुलांसाठी धडपडणार्या आणि विनाफायदा तत्त्वावर चालवलेल्या या संस्थेला मानाचा मुजरा आणि तिला मोलाचा हातभार लावणाऱ्या सहृदय शासनाचे अभिनंदन केल्यावाचून राहवले नाही.
एका अतीप्राचीन संस्कृतीची ओळख, आपला इतिहास जिवंत ठेवण्यासाठी वाळवंटात विनावेतन काम करणारे निवृत्त टेलिग्राफ कर्मचारी आणि भारतापेक्षा जास्त क्षेत्रफळावर विखुरलेल्या १३८ मुलांच्या शिक्षणाची काळजी वाहणारी संस्था... एका दिवसात इतकी वैविध्यपूर्ण आकर्षणे कधीच पाहिली नव्हती. केर्न्सला जाणारे विमान पकडायला निघालो तेव्हा मनांत अनेक उलट-सुलट विचारांची गर्दी झाली होती.
(क्रमशः )
===================================================================
किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८... (समाप्त)
===================================================================
प्रतिक्रिया
23 May 2013 - 5:07 pm | सामान्य वाचक
मस्त !!!!
23 May 2013 - 5:19 pm | झुळूक
सुन्दर..शब्द नहियेत माझ्याकडे...
23 May 2013 - 5:28 pm | दिपक.कुवेत
ह्या भागातली माहिती विषेश आवडली. फोटो तर नेहमीप्रमाणे उत्तम आहेतच!
23 May 2013 - 9:26 pm | प्यारे१
अप्रतिम! :)
23 May 2013 - 11:50 pm | रेवती
मूलनिवासींनी काढलेली चित्रे गोड आहेत. माहिती ग्रेटच आहे. उलुरुची छायाचित्रे मोहवणारी.
24 May 2013 - 9:28 am | प्रचेतस
रंग बदलणारा उलुरू पुन्हा एकदा आवडला.
बाकी भारतात अजूनदेखील टेलेग्राफ हापिसे चालू आहेत असे वाटते.
बाकी प्रवासवर्णन नेहमीप्रमाणेच उत्तम.
24 May 2013 - 10:21 am | उदय के'सागर
सुंदर भाग आणि माहिती :)
24 May 2013 - 10:32 am | किलमाऊस्की
हा भाग भलताच आवडला. पुभाप्र. :-)
24 May 2013 - 11:12 am | nishant
अत्ता पर्यंतचा सर्वात आवडलेला भाग. उलुरुचे सूर्योदयाचे फोटो, प्राचिन चित्रे तसेच टेलिग्राफ ऑफिस व शाळेबद्द्ल सांगितलेली माहिति - अप्रतिम... :)
पु.भा.प्र.
24 May 2013 - 2:17 pm | सुहास झेले
मस्तच..... !!
24 May 2013 - 2:41 pm | अजो
मस्त वर्णन. अप्रतिम फोटो.
24 May 2013 - 3:28 pm | बॅटमॅन
या भागातले वैविध्य प्रचंड आवडले. उलुरू इथे जास्त मस्त दिसतोय. टेलिग्राफ ऑफिस आणि मूलनिवासींच्या कथा व वस्तूही भारीच!!! यांवर निव्वळ शस्त्रबळानेच आक्रमण झालेय ही मोठी शोकांतिका आहेच, आणि पश्चातबुद्धीने ते अपरिहार्य होते असेही उद्या कोणी म्हणेल, पण ते असोच.
ती शाळाही आवडली. ऑस्ट्रेलियाच्या नकाशात जपान, यूके+आयर्लंड, न्यूझीलंड यांसोबत अजून कशाचा नकाशा आहे? टेक्सास राज्य आहे का ते?
बाकी तो गाईड भारतीय चेहरेपट्टीचा वाटतोय- त्यातही दक्षिणेकडचा एखादा आर.वेंकटपती म्हणून तो सहज खपून जाईल ;)
24 May 2013 - 6:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
हा दिवस एका अतीप्राचीन संस्कृतीपासून सुरुवात होऊन आंतरजालासारख्या अत्याधुनीक साधनाचा दूरशिक्षणासाठी करणार्या सहृदय संस्थेच्या भेटीने संपला. हा सारा एका दिवसातला ४२,००० वर्षांचा भावनीक प्रवास खरोखरच अतिशय संस्मरणीय म्हणून नेहमी मनात राहील.
आजच्या घडीला 'अनैतीक आक्रमण / अतिक्रमण' समजले जाणार्या गोष्टींना कोलोनियल इरामध्ये 'शोध मोहिमा आणि वसाहती स्थापन करणे' म्हणत असत... आणि त्याकाळचा मुख्य कायदा, "जिसकी लाठी उसकी भैस" अणि मुख्य उद्देश जमेल तेवढी संपत्ती गोळा करणे हाच होता. त्यामुळेच ज्याच्याकडे जास्त चांगली शस्त्रे होती ते जमेल तेवढा भूभाग आणि त्यावरची साधनसंपत्ती काबीज करत होते. ऑस्ट्रेलियाचा संबंध इतर जगापासून अनेक दशसहस्त्र वर्षे तुटला होता आणि मोठ्या लढायांसाठी शस्त्रे निर्माण करण्याची गरज त्यांना भासली नाही. त्यांची सर्व शस्त्रे लाकडी आणि मुख्यतः प्राण्यांची शिकार करण्यासाठी बनवलेली होती / आहेत. अर्थातच बंदुका घेउन आलेल्या आक्रमकांपुढे त्यांचा निभाव लागणे शक्य नव्हते.
डावीकडे जर्मनी आणि उजवीकडे टेक्सास राज्य आहे.
बाकी तो गाईड भारतीय चेहरेपट्टीचा वाटतोय
नक्कीच ! किनारपट्टीवरचे काही मूलनिवासी तर अगदी कोणत्याही राज्यातील भारतीय म्हणून खपून जातील अश्या चेहेरपट्टीचे आणि बांध्याचे आहेत... ते पुढच्या काही भागात दिसतीलच.24 May 2013 - 7:10 pm | बॅटमॅन
अगदी पूर्ण सहमत आहे!!! मार्मिक प्रतिसाद एकदम.
बाकी डावीकडचा जर्मनी डोळ्यात भरला नव्हता आधी.
गन्स, जर्म्स अँड स्टील या पुस्तकात तुम्ही मांडलेला मुद्दा खूप विस्तृतपणे मांडलाय त्याची या निमित्ताने आठवण झाली. इंडियन मूलनिवाशांच्या प्रतीक्षेत...
24 May 2013 - 5:37 pm | चेतन माने
मूळनिवासींनी तयार केलेल्या कलाकुसरी फार सुंदर आहेत. एवढ्या दुर्गम प्रदेशात शिक्षण पोहोचवण्याचा कार्याला सलाम.
उलुरूच्या सूर्योदयाचे फोटू तर क्लासच आलेत. उत्तम माहिती आणि इतर सर्व फोटू छान आलेत.
पुभाप्र :):):)
24 May 2013 - 6:28 pm | पैसा
दर भागाला आणखी काय विशेषणे आणू कळत नाहीये. पण मालिका मस्तच चालू आहे! ते टेलिग्राफ ऑफिस ऑस्ट्रेलियातले एकमेव आणि सगळ्यात जुने असेल. भारतात अजून चालू आहेत की!
24 May 2013 - 6:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
सामान्य वाचक, झुळूक, दिपक्.कुवेत, प्यारे१, रेवती, अधाशी उदय, हेमांगीके, nishant, सुहास झेले, अजो, चेतन माने : आपणा सर्वांना सहलितील सहभागासाठी अनेक धन्यवाद !
24 May 2013 - 7:00 pm | पैसा
मला विसरलात की राव!
24 May 2013 - 7:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
वल्ली आणी पैसा : अनेक धन्यवाद !
माझा निर्देश कडकट्ट-कडकट्ट करीत मोर्स कोड वापरून संदेशवहन करणार्या यत्रांकडे * होता. आता असलेले टेलेग्राम्स सॅटेलाईट-काँम्प्युटर-आंतरजाल यांच्या सहायाने येतात. भारतात ही प्रक्रिया १९९१ पासून सुरु झाली. अर्थात जर कुठे मोर्स कोड वापरून भूमीगत तारांतून संदेश पाठवत असतील तर आश्चर्य वाटेल (कारण ते काम जास्त खार्चिक आणि कार्यरत ठेवायला जास्त कठीण आहे) पण तसे असल्यास ती माहिती ऐकायला निश्चित आवडेल.
* तसा खास उल्लेख करायचा राहिला होता... ती तृटी आता भरून काढली आहे.
@ पैसा : तुम्हाला कसा विसरेन ? उलट हा वरचा मजकूर सांगायचा होता म्हणून हा खास स्वतंत्र प्रतिप्रतिसाद टाकला आहे. +D
24 May 2013 - 8:40 pm | पैसा
- .... .- -. -.- -..-. -.-- --- ..-
आता पुढचा प्रश्न. तिथून पाठवलेले संदेश स्वीकारून नेहमीच्या उपग्रहाद्वारे पाठवायच्या संदेशात रुपांतरित करायचं स्टेशन कुठेतरी असेल ना?
24 May 2013 - 9:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे आता वर मुख्य भागातच अधिक स्पष्टपणे लिहीले आहे, ते असे:
सद्याच्या काळात मोर्स कोड वापरून भूमीगत तारांतून संदेश पाठवत कार्यरत असणारे सर्व जगात बहुतेक हेच एक टेलिग्राफ ऑफिस असावे. मात्र आता इतर ठिकाणच्या भूमिगत तारा निकामी झाल्याने येथून पाठवलेला संदेश अॅलिस स्प्रिंग्जहून सिडनीपर्यंतच मोर्स कोडने व भूमीगत तारेने जातो. पुढे जगभर नेहमीच्या 'ऑस्ट्रेलिया पोस्ट' ने जातो.
24 May 2013 - 9:11 pm | पैसा
धन्यवाद! तरी सिडनीपर्यंत तारा आहेत म्हणजे खूपच लांब अंतरापर्यंत आहेत म्हणायच्या!
24 May 2013 - 9:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
होना. हे अंतर २,००० किमीपेक्षा थोडे जास्तच आहे.
25 May 2013 - 12:13 am | ५० फक्त
पहिल्या काही मालिकांप्रमाणेच खुप सुंदर म्हणजे कधी इकडं गेलोच तर जाताना प्रिंट आउट घेउन गेलो की बास, गाईड घ्यायची देखील गरज नाही.
असो, तुम्हाला मिनाक्षी देवरुखकर भेटल्या का हो, तिथंच असतात प्रत्येक भारतीयाची, आणि विशेषतः मिपाकराची फार काळजी आहे त्यांना, असं त्यांच्या व्यनितुन कळालं. मध्यंतरी मनीष बरोबर लग्न झालं, त्यानंतर फारशा फिरकल्या नाहीत इकडं.
25 May 2013 - 12:26 am | डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या नेहमीप्रमाणेच सुंदर, उत्साहवर्धक प्रतिसादासाठी अनेक धन्यवाद !
मिनाक्षी देवरुखकर यांच्याशी परिचय नसल्याने माझ्या या प्रवासाची त्यांना कल्पना असणे शक्य नव्हते. असो. अर्थात प्रवासात कोणी ओळखीचे आणि विशेषतः मराठी बोलणारे भेटले तर खूप आनंद होतो हे ही खरेच.
25 May 2013 - 1:25 am | सूड
असेल असेल. बाकी मीनाक्षी म्हणजे देवासारखी आहे. अस्तित्त्वात आहे म्हणतात, व्यक्तिश: पाह्यली मात्र कोणीच नाही. ;) :#
25 May 2013 - 2:06 am | बॅटमॅन
म्हणूनच देव-रुखकर म्हंजे "देवासारखा रुख केला आहे जिने अशी ती" म्हणतात होय ;) आलं लक्षात आता =))
26 May 2013 - 2:27 pm | स्पंदना
आज ऑस्ट्रेलीयाचा "सॉरी" डे आहे.
काय काय केल नाही ब्रीटीशांनी येथे?
अगदी २-२ वर्षाची मुले काढुन घेतली अॅबॉरिजन्ल्स कडुन. कशासाठी तर घरकाम करायला नोकर म्हणुन. मग त्यांचा धर्म बदलणे हे तर अगदी फार महत्वाच काम होत त्यावेळी. असो.
इस्पिकएक्का भाय सुरेख सुरेख भाग आहे हा.
मस्ताड अन मनाला भिडणारा. तुम्ही नुसतेच कोरडे राहुन प्रवास करत नाही आहात याची खात्री पटली.
26 May 2013 - 9:12 pm | कोमल
सुरेखच.. हाही भाग आवडेश..
मस्त होत आहे सफर.
पुभाप्र..
26 May 2013 - 10:50 pm | मोदक
भारी!!!!!!!!!!!!!
आता विशेषणे संपली दरवेळी एक उद्गारचिन्ह वाढवत जाणार.
हा १३ वा भाग म्हणून १३ उद्गारचिन्हे!
26 May 2013 - 10:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
aparna akshay, कोमल आणी मोदक : अनेक धन्यवाद !