किवी आणि कांगारूंच्या देशांत ०३ : रोतोरुआ - अ‍ॅग्रोडोम, ते पुईया आणि तारावेरा ज्वालामुखी

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
4 May 2013 - 2:30 am

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८ (समाप्त)...

====================================================================

...सगळा कार्यक्रम संपेपर्यंत साडेदहा वाजले असावे. हॉटेलवर परत येताना सर्वांच्या तोंडी किती मजा आली याचीच चर्चा होती. खोलीत परतल्यावरच गेल्या तीन दिवसांच्या दगदगीचा थकवा जाणवू लागला. पण सहलीची छान सुरुवात झाल्याने खुशीने झोपी गेलो.

आज रोतोरुआमध्येच भटकायचे होते त्यामुळे उशीरापर्यंत झोपायला मिळाले होते. काल जेव्हा सहल निर्देशकाने बस नऊ वाजता निघेल असे सांगितले होते तेव्हा सर्व पर्यटकांनी उत्स्फूर्तपणे आनंदाने गदारोळ केला होता ! बर्‍याच दिवसांनी गाढ झोपही लागली होती. प्रसन्न सकाळ झाली आणि आळोखे पिळोखे देऊन झाल्यावर पहिले लक्ष खोलीच्या खिडकीबाहेर गेले...

.

कालच्या गडबडीत आणि संध्याकाळच्या अंधारात इकडे लक्षच गेले नव्हते. ६५,००० लोकवस्तीच्या शहरात मध्यवर्ती ठिकाणी असे निसर्गसौंदर्य दिसेल असे वाटले नव्हते ! न्याहारी आटपून उरलेल्या वेळेचा सदुपयोग करावा म्हणून हॉटेलच्या आजूबाजूला थोडा फेरफटका मारण्याचा मोह आवरला नाही...

.

.

नऊ वाजता बस आम्हाला घेऊन रोतोरुआच्या अ‍ॅग्रोडोममध्ये जायला निघाली...

न्यूझीलंडची अर्थव्यवस्था मुख्यतः शेतीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांवर अवलंबून आहे. लोकर आणि मांसाकरिता मेंढ्या पाळणे व दूध आणि मांसाकरिता गुरे पाळणे हे न्यूझीलंडचे मुख्य व्यवसाय आहेत. १७७३ साली कॅप्टन कुकने येथे प्रथम मेंढ्या आणल्या आणि १९८२ पर्यंत त्यांची संख्या ७ कोटीपेक्षा जास्त झाली होती. परंतू मंदीमुळे ती संख्या आता ४.३ कोटीपर्यंत खाली आली आहे... तरीसुद्धा हे प्रमाण न्यूझीलंडच्या दर नागरिकामागे १० मेंढ्या असे आहे ! त्यांनी या व्यवसायांचा व्यापाराबरोबर पर्यटनासाठीही खुबीने उपयोग केला आहे. पर्यटकांचे मनोरंजन करून उत्पन्न कमावण्याबरोबर असल्या कार्यक्रमांचा उपयोग न्यूझीलंडच्या उत्पादनांची प्रसिद्धी करण्यासाठीही होतो. मनावर नकळत परिणाम करून खप वाढवण्याच्या प्रकाराचा (सॉफ्ट मार्केटिंगचा) अ‍ॅग्रोडोम हा उत्तम आविष्कार आहे. परंतू या कार्यक्रमात न्यूझीलंडच्या व्यवसायांची ओळख इतक्या व्यावसायिक आणि मनोरंजक पद्धतीने सादर केली जाते की तो "तिकीट काढून" बघणे ही न्यूझीलंड भेटीतील एक आवश्यक गोष्ट होऊन बसली आहे !

या कार्यक्रमातील सर्व मेंढ्या एवढ्या प्रशिक्षित आहेत की त्या अगदी शिकवलेल्या कुत्र्यांसारख्या प्रदर्शकाचे सगळे आदेश पाळतात आणि मजेदार प्रदर्शन करत आपल्या जागेवर जाऊन उभ्या राहतात. यातली प्रत्येक मेंढी आपल्या प्रजातीचे प्रतिनिधित्व करते आणि खेळकरपणे प्रदर्शक त्यांचे विशेष उलगडत जातो. सर्वोच्च स्थानी अर्थातच लोकरीची महाराणी मरिनो मेंढी असते !

नंतर प्रदर्शक मेंढी भादरायचे प्रदर्शन करतो...

 ..................

.

कारागिराला दर मेंढीमागे मजुरी मिळते त्यामुळे हे काम करण्याची पद्धत एवढी कौशल्याची आणि जलद बनली आहे की खरोखच्या फार्मवरील कुशल कारागीर एक मेंढी ४५ ते ५० सेकंदात भादरतो ! यात लोकर नीट काढण्याबरोबर मेंढीला इजा न होऊ देणेही महत्त्वाचे असते. दर वर्षी तेथे या कारागिरीच्या स्पर्धाही होतात.

नंतर गायींचे व मेंढ्यांच्या निगेचे प्रदर्शन झाले. या सगळ्यात प्रेक्षकांचा सहभाग कार्यक्रम अजूनच मनोरंजक बनवून गेला...

कोट्यावधीच्या संख्येने असलेल्या मेंढ्या केवळ मानवी श्रमाने पाळणे अतिशय महाग आणि तोट्याचे झाले असते. त्यामुळे या कामात कुत्र्यांची मदत अपरिहार्य आहे. त्यांनी या बाबतीतले शास्त्रही फार प्रगत केले आहे. घोड्यावरचा (आणि आता मोटरसायकलवरचा) एक शेतकरी आणि चार ते आठ कुत्रे दोन ते चार हजार मेंढ्याचा व्यवसाय सांभाळतात. यासाठी कुत्र्यांच्या खास प्रजाती निर्माण केलेल्या आहेत. हे सगळे कुत्रे बहुतांश स्कॉटलंड मधून आणले जातात किंवा तेथून आणलेल्या कुत्र्यांपासून पैदास केलेले असतात. कुत्र्यांचे आदेश पारंपरिक स्कॉटिश किंवा गेलीकमध्ये दिले जातात. शांत-संथ आवाजात दिलेले हे आदेश (डावी/उजवीकडे जा, बस, लप, इकडे ये, दूर जा, काम सुरू कर, थांब, इ) शंभर दीडशे मीटरवर असलेला कुत्रा बरहुकूम पाळतो हे पाहून चकित व्हायला होते. कुत्र्यांची एक जात भुंकून मेंढ्या गोळा करते, इथपर्यंत ठीक होते. पण दुसरी एक जात अजिबात (अगदी गुरगुरण्याचाही) आवाज न करता केवळ डोळ्यांच्या जरबेवर मेंढ्या हवे तेथे एकत्र गोळा करते हे पाहून खूपच आश्चर्य वाटले...

.

अ‍ॅग्रोडोमच्या आवारात एमू, ऑस्ट्रीच, डुकरे वगैरे पालनाची व्यवस्था आणि न्यूझीलंडच्या राष्ट्रीय किवी फळाची बागही पाहता येते.
तेथून पुढे आम्ही त्यांचा राष्ट्रीय पक्षी, किवी, बघायला रेनबो स्प्रिंग नावाच्या संरक्षक क्षेत्रात (conservatory) गेलो...

येथे न्यूझीलंडचे इतरही अनेक खास प्राणी आहेत.

हा आहे तुवातरा... हा सरडा आणि डायनॉसॉरस यांच्यामधील rhynocephalids जातीचा प्राणी आहे...

हा सरडा झाडाच्या सालीत बेमालूमपणे मिसळून लपून राहतो...

आणि हे काही पक्षी...

.

.

तेथून बाहेर पडलो आणि ह्या समोर आलेल्या निसर्गाचा फोटो घेणे केवळ अपरिहार्य होते, नाही का?...

अल्पोपाहारासाठी परतताना रोतोरुआ तळ्यावर चाललेले न्यूझीलंड वायुदलाचे प्रदर्शन बघायला मिळाले...

पुढे आम्ही ते पुइया (Te Puia) या उत्तर बेटावरच्या मुख्य मावरी केंद्रावर गेलो. येथे प्रथम मावरी समाजाच्या कलेबद्दल माहिती दिली गेली. त्यांच्या प्रसिद्ध पूर्वजांचे पुतळे प्रवेश्द्वाराजवळ उभारलेले आहेत...

 ..................
 ..................

त्यांच्या चेहर्‍यावरचे गोंदण आणि पेहरावांच्या पद्धती त्यांची स्वतःची आणि जमातीची वैशिष्ट्ये दाखवतात.

या केंद्राच्या आवारातच उत्तर बेटावरचे भूगर्भातील उष्णतेने निर्माण झालेले सर्वात मोठे गरम पाण्याचे फवारे असलेली व्हाकारेवारेवा दरी आहे. एवढे मोठे गरम पाण्याचे फवारे आणि उकळत्या चिखलाचे तलाव असलेले आणि शिवाय इतके जवळ जाऊन पाहू शकू असे क्षेत्र जगात दुसरीकडे कोठेही नाही...

.

.

उकळत्या चिखलाचे तळे...

निसर्गाचा हा चमत्कार आणि तोही अगदी काही हातांच्या अंतरावरून बघताना हिमाचलातील वशिष्ठ कुंड आठवले. परतायला पाय निघत नव्हता पण पुढच्या आकर्षणाची वेळ झाली होती त्यामुळे निघणे भाग पडले.

हे पाण्यावरून उडणारे-उतरणारे विमान (फ्लोट प्लेन) माझी एका खास अतिरिक्त सफारीसाठी वाट पाहत होते...

त्यातून उडून रोतोरुआच्या परिसराची हवाई सफर सुरू केली...

.

.

या सफरीचे मुख्य आकर्षण होते १८७६ साली रोतोरुआ शेजारच्या तारावेरा पर्वतांत झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेले विवर...

.

.

आणि त्याचबरोबर तयार झालेली अनेक तळी... त्यातली दोन तळी त्यांच्या वैशिष्ट्यासह... एक निळ्या आणि दुसरे हिरव्या पाण्याचे...

अजून हे एक हवाई चित्र...

ही रोतोरुआची उच्चभ्रू बिव्हर्ली हिल...

परत आलो तेव्हा पाचच वाजले होते. मग उरलेल्या वेळेत गावातून फेरफटका मारला. ऑकलंड सुंदर होतेच पण रोतोरुआ त्याच्यावर वरताण करत होते. टुमदार इमारती आणि आखीव रेखीव रस्त्यांची शोभा पानगळीच्या सौंदर्याने भरलेले वृक्ष वाढवत होते...

.

फिरताना हॉटेलजवळच्याच एका वॉकींग प्लाझावर हे भारतीय रेस्तरॉ दिसले...

आणी आठवले की बसच्या चालकाने याच रेस्तरॉची बरीच स्तुती केली होती. हॉटेलच्या स्वागतिकानेही 'ते खूप बक्षिसे पटकावलेले रेस्तरॉ आहे' असे सांगितले होते. मग काय, फेरफटका संपवल्यावर लागलेल्या कडकडीत भुकेची सोय कोठे हा प्रश्नच मिटला होता ! मस्तपैकी कोलंबी मसाला, नान, जिरा राईस, पापड आणि शेवटी आंबा कुल्फी असा खासा बेत झाला !

या रेस्तरॉमध्ये इतर अनेक शाकाहारी-मांसाहारी पदार्थ होते तेही नक्कीच तितकेच चवदार असणार. चवदार जेवणावरून, मिळालेल्या बक्षिसांवरून, आत असलेल्या गर्दीवरून आणि सतत पार्सले घेऊन जात असलेल्या गिर्‍हाइकांवरून ते रोतोरुआमधले लोकप्रिय रेस्तरॉ असल्याची खात्री पटली.

आणखी एक खास गोष्ट म्हणजे रेस्तरॉच्या प्रदर्शनी भागात हे भलेमोठे बाजीराव-मस्तानीचे चित्र लावलेले होते...

एक पंजाबी आणि एक हिमाचली असे मालक असलेल्या, न्यूझीलंडच्या रोतोरुआमधिल भारतीय रेस्तरॉमध्ये, हे अस्सल मराठमोळे चित्र पाहून आश्चर्यमिश्रित आनंद झाला नसता तरच नवल !

(क्रमशः )

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८ (समाप्त)...

====================================================================

प्रतिक्रिया

फारच इंटरेस्टींग माहिती आणि फोटू! मेंढ्यांची लोकर काढणे, कुत्र्यांची मदत वाचून आश्चर्य वाटत होते. विमानातून काढलेले फोटू खोटे वाटावेत इतके छान आलेत. हिरव्या आणि निळ्या पाण्याची तळी मजेदार आहेत.
येथील भागांची नावे रोतोरुआ, वाईतोमो, पुईया, तारावेरा वाचून लहान मुलाने अक्षरे मनाला येतील तशी एकापुढे एक ठेवून मजेदार नावे तयार करावीत तसे वाटले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 May 2013 - 11:29 am | डॉ सुहास म्हात्रे

येथील भागांची नावे रोतोरुआ, वाईतोमो, पुईया, तारावेरा वाचून लहान मुलाने अक्षरे मनाला येतील तशी एकापुढे एक ठेवून मजेदार नावे तयार करावीत तसे वाटले. न्युझीलंडमधली जागांची बहुतेक नावे मावरी भाषेतली जशीच्यातशी किंवा फार लांब नावचे संक्षिप्तिकरण करून घेतलेली आहेत; त्यामुळे ती तशी आहेत.

श्रीरंग_जोशी's picture

4 May 2013 - 3:42 am | श्रीरंग_जोशी

न्युझीलंड देशाने आपल्या मुख्य व्यवसायाचा पर्यटनवाढीसाठी एवढा कल्पक वापर केल्याचे पाहून कौतुक वाटले.
अवांतर - आपल्याकडेही कृषी पर्यटन या संकल्पनेने गेल्या काही वर्षांत जोम धरलेला आहे.

गरम पाण्याचे फवारे असलेल्या स्थळाची चित्रे फारच आवडली.

बाकी काही हवाई छायाचित्रे तर उद्धव ठाकरेंना स्पर्धा वाटावी अशी आहेत.

जुइ's picture

4 May 2013 - 4:20 am | जुइ

फोटो आणि माहीती दोन्ही छान!!

प्रचेतस's picture

4 May 2013 - 9:19 am | प्रचेतस

सफर अधिकाधिक रोचक होत आहे.
किवी देशातील निसर्गनिर्मित आश्चर्ये फारच आवडली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 May 2013 - 11:31 am | डॉ सुहास म्हात्रे

श्रीरंग_जोशी, जुइ आणि वल्ली : आपल्या सुंदर प्रतिक्रियांसाठी धन्यवाद !

विसोबा खेचर's picture

4 May 2013 - 11:31 am | विसोबा खेचर

पुन्हा एक देखणा लेख..

सुरेख...!

संजय क्षीरसागर's picture

4 May 2013 - 11:51 am | संजय क्षीरसागर

इतक्या सुरेख वर्णनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

सुहास झेले's picture

4 May 2013 - 12:00 pm | सुहास झेले

जबरी... विमानातून काढलेले फोटो तर एकदम खास. पुढच्या भागाची वाट बघतोय :) :)

लॉरी टांगटूंगकर's picture

4 May 2013 - 12:41 pm | लॉरी टांगटूंगकर

प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया देत नसलो तर वाचतोय, अशक्य आवडतंय..
प्रत्येक वेळेला नुसतं छान छान कसं म्हणायचं हा प्रश्न पडतो :)

चेतन माने's picture

4 May 2013 - 1:04 pm | चेतन माने

हवाई फोटू एकदम अप्रतिम आलेत.
दरीच नाव व्हाकारे"वारेवा" अगदी समर्पक आहे. बहुतेक ज्वलमुखिय प्रदेश निसर्गानेसुद्धा एकदम श्रीमंत असतात खास करून बेटे.
आणि हो जेवणाची थाळी य्य्य्य्म्म्म्म्म्मस्स्श्ह्ह्ह आहे!!!
पुभाप्र :):):)

अनिरुद्ध प's picture

4 May 2013 - 1:36 pm | अनिरुद्ध प

अतिशय उत्क्रुश्ठ सादरीकरण पुढच्या भागाची वाट पहात आहे.

प्यारे१'s picture

4 May 2013 - 1:41 pm | प्यारे१

अ-च-प्रतिम!

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 May 2013 - 1:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

विसोबा खेचर, संजय क्षीरसागर, सुहास झेले, मन्द्या, चेतन माने, अनिरुद्ध प आणि प्यारे१ : आपणा सर्वांना धन्यवाद. तुमच्या सहभागाने सहलीची मजा द्विगुणित होत आहे !

पैसा's picture

4 May 2013 - 2:05 pm | पैसा

तुमचा लेख आला की आधी शेवट "क्रमशः" आहे याची खात्री करून घेते आणि मग अधाशासारखी वाचायला सुरुवात करते.

कहो ना प्यार है सिनेमात न्यूझीलंडची दृश्ये होती असं आठवतंय.

हा भाग पाहताना धणी पुरेना. विमानातून काढलेली छायाचित्रे, मेंढ्यांना कंट्रोल करणारे कुत्रे, अन भारतीय रेस्तराँ-सगळेच अत्युच्च!!! बाजीराव-मस्तानीचा फोटो तर अतिशय सुखद धक्का देणारा :) पुढे अजून काय काय असेल याची जाम उत्सुकता लागली आहे.

बाकी ते लॉर्ड ऑफ द रिंग्ज चं शूटिंग न्यूझीलंडमध्ये झालं होतं असं वाचलं, त्यासंबंधी टूरमध्ये काही कळ्ळं का? ते पहायला लै आवडेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 May 2013 - 2:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

पैसा आणि बॅटमॅन : अनेक धन्यवाद !

अनेक सिनेचित्रणांसाठी नावाजलेल्या मंतरलेल्या चैत्रबनाकडेच वाटचाल चालू आहे... पण त्या वाटेवर अजून अनेक मजेदार आकर्षणे आहेत ती पहात पुढे जायचे आहे !

मॄदुला देसाई's picture

4 May 2013 - 3:03 pm | मॄदुला देसाई

जबरदस्त वर्णन आणि भन्नाट फोटो...पुढील भागाच्या प्रतिकक्षेत :)

आपले प्रवासवर्णन वाचताना आपण अगदी नकळत त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो , आणि इथेच तुम्ही जिकतात .

आपल्या भटकंतीस सलाम .

मुक्त विहारि's picture

4 May 2013 - 9:03 pm | मुक्त विहारि

हा पण भाग आवडला..

सानिकास्वप्निल's picture

4 May 2013 - 9:17 pm | सानिकास्वप्निल

खूपचं सुरेख फोटो व उत्तम वर्णनशैली
गरम पाण्याचे फवारे असलेली व्हाकारेवारेवा दरीचे फोटो, हवाई फोटो +१
हा ही लेख अप्रतिम झालाय :)
पुभाप्र

हा आणि आधीचे २न्ही भाग वाचले... ते आवडले हे काही वेगळ्याने सांगायची गरज नाही,फोटो तर यकदम झक्कास्स्स ! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 May 2013 - 10:37 am | डॉ सुहास म्हात्रे

मॄदुला देसाई, गौरव जमदाडे, मुक्त विहारि, सानिकास्वप्निल आणि मदनबाण..... : सहलितील सहभागासाठी अनेक धन्यवाद !

सूड's picture

5 May 2013 - 7:49 pm | सूड

ते बाजीराव मस्तानी वालं चित्रं प्रचंड आवडलं !!
पुभाप्र.

कौशी's picture

6 May 2013 - 3:46 am | कौशी

आणि मस्त प्रवासवर्णन..तुमची लिखाणशैली खुप छान.

स्पंदना's picture

6 May 2013 - 5:32 am | स्पंदना

जबरदस्त भाग हा फोटोंच्या बाबतीत. मस्त.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2013 - 11:41 am | डॉ सुहास म्हात्रे

सूड, कौशी आणि aparna akshay : अनेक धन्यवाद !

महेश नामजोशि's picture

6 May 2013 - 11:59 am | महेश नामजोशि

फोटो खरच खूपच सुंदर आहेत. लिखाणाची धाटणी पण लाजवाब. असे वाटते कि आपण स्वतःच प्रवास करीत आहोत. इतका सुंदर अनुभव तुम्ही दिला आहात कि वर्णन करणे अशक्य !!! असेच पुढील भागांची वाट पाहतो आहे.
महेश नामजोशी

अप्रतिम.. वाचतो आहे, पाहतो आहे. ईनो घेतो आहे..

मोदक's picture

7 May 2013 - 4:04 pm | मोदक

(आता इथून पुढे आमच्या प्रतिक्रिया एकसुरी येतील)

भारी!! मस्त!! मजा आली!!! वैग्रै वैग्रै..

हे तुम्हाला - __/\__

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2013 - 6:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

महेश नामजोशि, गवि आणि मोदक : आपल्या सर्वांच्या सुंदर प्रतिक्रियांसाठी धन्यवाद !

मराठे's picture

7 May 2013 - 9:57 pm | मराठे

अप्रतिम! निशब्दः

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 May 2013 - 10:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !