किवी आणि कांगारूंच्या देशांत ०६ : क्विन्सटाउन - मिलफर्ड साउंड आणि एक अनपेक्षित हिमसफर

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
8 May 2013 - 10:59 pm

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८ (समाप्त)...

====================================================================

रात्री हॉटेलवर परत येईपर्यंत अकरा वाजले होते. असाच पाऊस पडत राहिला तर या धाडसाची राजधानी (adventure capital) म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्विन्सटाउनमधल्या कार्यक्रमांचे काय होईल याची काळजी करतच झोपी गेलो.

आज सहलीचा सहावा दिवस. सकाळी उठलो तेव्हा कालच्या पावसामुळे मनात जराशी धास्तीच होती. पण सकाळी सातलाच हॉटेलच्या बाहेर पडायचे होते आणि दोन अडीच तास बसचा प्रवास करून फिओर्डलँड राष्ट्रीय उद्यानात पोचायचे होते. त्यामुळे मनावरचे सगळे मळभ झटकून पटापट आवरले आणि न्याहारीला गेलो. नेहमीप्रमाणे प्रथम सगळे पदार्थ पाहून घ्यायचे आणि मगच हवे ते वाढून घ्यायला सुरुवात करायचे ही सवय. एक एक बघत शेवटच्या भांड्याचे झाकण उघडले आणि चाट पडलो...

क्विन्सटाउनच्या हॉटेलमध्ये नाहारीला चक्क कांदेपोहे! शेजारी भात आणि पलिकडच्या भांड्यात डाळ. न्याहारीला डाळभात काही बरी वाटली नाही. मात्र कांदेपोहे त्वरित घेतले... पण चवीच्या बाबतीत निराशा झाली, मोहरीही भरपूर टाकली होती. खाण्याच्या थोड्या प्रयत्नानंतर सरळ बशी बदलून नेहमीचे यशस्वी पदार्थ घेतले!

न्याहारीनंतर खाली लॉबीत जमा होणार्‍या सहप्रवाशांच्या गर्दीत सामील होऊन गप्पा मारू लागलो. लॉबीत आज कमळांची सुंदर पुष्पसजावट केली होती...

.

सकाळच्या काहीश्या कुंद वातावरणात आमचा प्रवास सुरू झाला...

दक्षिण बेटाच्या दक्षिण-पश्चिम टोकाला असलेले आणि १२,५०० चौ किमी परिसर असलेले फिओर्डलँड राष्ट्रीय उद्यान हे न्यूझीलंडमधील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. हिमयुगामध्ये या भागांत हिमनद्यांच्या प्रवाहाने अनेक खोल फ्योर्ड निर्माण झाल्या आहेत...


(मूळ नकाशा आंतरजालावरून साभार)

आवांतर: हिमनद्यांच्या प्रवाहाने तयार झालेल्या दर्‍यांना फिओर्ड / फ्योर्ड (fiord) असे म्हणतात आणि पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेल्या दर्‍यांना कनॅन / कन्यान (canyon) असे म्हणतात. )

या उद्यानात अश्या तर्‍हेने तयार झालेल्या अनेक फ्योर्ड आहेत, त्यातल्या बर्‍याच आता बर्फाऐवजी समुद्राच्या पाण्याने भरलेल्या आहेत... त्यांना साऊंड असे म्हणतात... साधारण आपल्याकडे खाडी म्हणतात तसाच काहीसा प्रकार. काही फ्योर्डच्या बाजूच्या डोंगरांचे कडे सरळसोट उंच आहेत आणि त्या निसर्गसौंदर्याने ओतप्रोत भरलेल्या आहेत. या सर्वांत मिलफर्ड साउंड सर्वात जास्त सुंदर आहे. आम्ही आज तिकडेच चाललो होतो.

जसजसे आम्ही उद्यानाच्या जवळ येत होतो तसतसा सूर्यही वर येत होता आणि आजूबाजूचा नजारा अधिकाधिक सुंदर होत चालला होता...

.

.

.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या शेतांत मेंढ्यांच्या बरोबर आता हरिणेही दिसू लागली. मेंढ्याच्या व्यवसायावर आर्थिक मंदीने झालेल्या परिणामांना काही अंशी सावरण्यासाठी आता येथील काही शेतकरी हरिणेही पाळू लागले आहेत कारण हरिणाचे मांस जेवणातली खासियत (गुरमे) समजली जात असल्याने त्याला अधिक किंमत मिळते व सहाजिकच अधिक फायदा मिळतो...

.

या विभागातील 'ते अनाउ' नावाच्या मुख्य गावात आम्ही कॉफी आणि अर्थातच आइसक्रीम (होकी-पोकी फेम) साठी थांबा घेतला...

.

बसच्या थांब्याजवळ हे झाड दिसले. पहिल्यांदा वाटले की फुलांनी लगडलंय. पण फोटो काढायला जवळ गेलो तर दिसले की ती चेरीसारखी फळे होती. नंतर कळले की ही इतकी आकर्षक दिसणारी फळे विषारी असतात!

 ..................

गाव छोटेखानी असले तरी स्वच्छ आणि टापटीप असणे हे आता गृहीतच झाले होते...

.

या गावातल्या एका रस्त्याच्या नावाने लक्ष वेधून घेतले...

पाश्च्यात्य कडू कॉफीऐवजी मी होकी-पोकीलाच राजाश्रय दिला... आता आणि पुढे बहुतेक वेळेसही! तरतरीत होऊन पुढे प्रवास सुरू झाला... आता उद्यानाचा मुख्य परिसर सुरू झाला होता. कधी झुडुपे तर कधी दाट जंगल लागत होते...

.

.

मध्येच एक विस्तीर्ण दरी लागली... इगलँटन व्हॅली. तेथे थोडा वेळ थांबून आम्ही आजूबाजूचे सौंदर्य शांतपणे डोळ्यांत आणि कॅमेर्‍यात साठवत साठवत पायही मोकळे करून घेतले...

.

.

.

परत प्रवास सुरू केला आणि थोड्याच वेळात आरशी तळ्यांचा (mirror lakes) हा एक अत्यंत मनोहर थांबा आला. या ठिकाणी एक छोटा लाकडी मार्ग आपल्याला जरा खालच्या पातळीवर असलेल्या तळ्यांकडे घेऊन जातो...

आणि त्या तळ्यांचे नाव अक्षरशः सार्थ झालेले पाहून आपण थक्क होण्यापलीकडे काहीच करू शकत नाही...

.

.

.

.

किती फोटो काढले तरी समाधान न होणारा नजारा!

पुढच्या वाटेत बोवेन नावाचा धबधबा लागला...

आणि हे पाणी कुठून येते त्याचा शोधही लागू लागला...

.

हिमनद्या वितळून येणार्‍या त्या पाण्यात सगळ्यांनी 'हात धुऊन घेतले’!

जरा पुढे गेल्यावर ते अनाउ आणि मिलफर्ड साऊंडला जोडणारा होमर बोगदा लागला. या अरुंद बोगद्यातून एकेरी वाहतूकच होऊ शकते. पण बोगद्याची स्वयंचलित व्यवस्था दोन्ही टोकांवर असलेल्या मार्गदर्शक संगणकीय पाट्यांवर सतत मार्गदर्शक संदेश देऊन वाहतुकीचे नियोजन करत असते...

बोगदा ओलांडून आपण जणू वेगळ्याच जगात प्रवेश करतो. आता फक्त उंच कडे आणि खोल दर्‍या दिसतात... सपाट भूमी फारशी नाहीच... खर्‍या फिओर्ड आता सुरू झाल्याची खात्री पटते...

.

मिलफर्ड साऊंडच्या सुरुवातीला एक भले मोठे स्वागतगृह आहे. येथून मिलफर्ड साऊंडच्या सगळ्या जलसफरी सुरू होतात...

तेथे अनेक बोटींच्या गर्दीत 'मिलफर्ड सॉवरीन' आमची वाट पाहत उभी होती...

हिमनदीने जमिनीवर पाडलेल्या १५ किमी लांबीच्या खोल ओरखड्यात आता टास्मान समुद्राचे पाणी घुसून मिलफर्ड साउंड तयार झाली आहे. तिच्या दोन्ही बाजूचे बरेच उभे कडे १२०० मीटरपेक्षा जास्त उंच आहेत आणि त्यांच्यावर अनेक प्रकारच्या लहान मोठ्या झुडूप-झाडांची गर्दी आहे. येथे लेडी बोवेन आणि स्टर्लिंग नावाचे दोन बारमाही धबधबे आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसांत आणखी अनेक मोसमी धबधब्यांची भर पडते.

सफारीची सुरुवात झाली स्टर्लिंग धबधब्याच्या दर्शनाने...

मधून मधून हिमाच्छादीत शिखरेही नजरेला पडत होती...

वेगवेगळ्या आकाराच्या उंच खड्या कड्यांमधून वाट काढत आमची बोट पुढे सरकत होती...

.

ढगांनी वेढलेली शिखरे असलेल्या कड्यांतून एखादा रोडावलेला झरा दिसत होता...

.

आजूबाजूचे सौंदर्य पाहायला वातानुकूलित केबिन सोडून जवळ जवळ सगळेच प्रवासी बोटीच्या सर्वात वरच्या डेकवर गर्दी करून उभे होते...

तासाभराच्या प्रवासानंतर टास्मान समुद्र दिसू लागला...

परतताना कप्तानाने बोट एका खास जागेवर अगदी किनार्‍याजवळ नेली आणि एका कातळावर सूर्यस्नान करणार्‍या समुद्रसिंहांचे अगदी जवळून दर्शन झाले...

कप्तान कसलेला दर्यावर्दी होता... परतताना त्याने बोटीचा पुढचा भाग स्टर्लिंग धबधब्याच्या इतका जवळ नेला की पुढच्या रांगेतले प्रवासी त्याच्या पाण्याच्या तुषारांनी भिजून गेले...

 ..................

परतताना ही सफारी जरा अजून लांबली असती तर बरे झाले असते असे वाटत होते. पण सहल निर्देशकाने एक खुशखबर दिली आणि मग पुढे जायची घाई वाटू लागली. सकाळी हॉटेलवरून निघताना तो मला म्हणाला होता की, "तुमची टास्मान हिमनदीवरची स्की-प्लेनची सफारी राहिली. पण इथे काही पर्यायी व्यवस्था केली तर चालेल का?" मी त्याला अर्थातच हो म्हणालो होतो, पण त्याने जोडलेल्या 'हवामानावर अवलंबून (subject to weather conditions)' या पुस्तीमुळे मी त्यानंतर तिकडे पूर्ण दुर्लक्षच केले होते. मात्र आता तो म्हणाला की, "इथल्या सर्वात उंच तुतोको हिमनदीवर जाणारी एक हेलिकॉप्टर सफारी चालू आहे. तुमची इच्छा असेल तर जागा राखून ठेवतो. सफारी संपल्यावर हेलिकॉप्टर तुम्हाला होमर बोगद्यापलीकडे सोडेल. तोपर्यंत बाकीच्या प्रवाशांना घेऊन बस तिकडे पोचेल आणि मग पुढचा प्रवास बरोबर करू." आता त्याने इतके नियोजन केले असल्यावर मला अजून काय पाहिजे होते? माझा उत्साह बघून अजून दोन प्रवासी पण तयार झाले.

बोटीच्या स्वागतगृहाच्या पलीकडेच एक हेलिपॅड होता. दहा मिनिटात आमचे हेलिकॉप्टर मिलफर्ड साउंडवरून उडू लागले आणि ही अनपेक्षित हिमनदी सफारी सुरू झाली...

.

नंतर फ्योर्डच्या कड्यांची पाहणी सुरू झाली...

मग आम्ही निघालो शुभ्र पर्वतांच्या हिमशिखरांच्या सादेला ('साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वतांची' च्या चालीवर) प्रतिसाद देण्यासाठी...

.

.

.

शेवटी हाक ऐकू आली २,७२३ मीटर उंचीच्या माउंट तुतोको आणि त्याच्या गळ्याभोवती हाताचा विळखा घालून बसलेल्या तुतोको हिमनदीची...

.

.

.

.

तेथे बर्फावर पाय ठेवला तेव्हाची मन:स्थिती वर्णन करायला शब्द नाहीत... केवळ निःशब्द !!! हेलिकॉप्टरमध्ये बसेपर्यंत इतर सहप्रवाशांशी बर्फाच्छादित तुतोको पर्वतशिखराकडे बोट दाखवून "बघा आता तेथे चाललोय" असे म्हणून विनोद करत होतो. तुतोको हिमनदी म्हणजे तुतोकोच्या पायथ्याशी, शिखरापेक्षा खूप खालच्या उंचीवर साठलेला बर्फ असणार असे साधे समीकरण डोक्यात होते. बाकीच्यांचेही तेच मत होते आणि म्हणून तेही होकार भरत विनोदात सामील होत होते. पण जेव्हा शिखराजवळच आणि शिखराच्या फारतर ५० मीटर कमी उंचीवर वैमानिकीणीने (हो स्त्री वैमानिकच होती) हेलिकॉप्टर उतरवले आणि दार उघडून खाली उतरा म्हणाली तेव्हा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही...

.

हे बघा खरोखर आमचे हेलिकॉप्टर तिथे उतरले होते....

आणि माझे पाय त्या बर्फाला टेकलेले आहेत... उगाच संशय नको +D, ;) ... (नंतर माझापण विश्वास बसावा की 'हे खरे होते, स्वप्न नव्हते' म्हणून पटकन एक फोटो काढून घेतला ! नंतर हा फोटो बघून माझ्या इतर दोन साथीदारांची आपणपण असे का केले नाही म्हणून बरीच जळजळ झाली !)

त्या हिमनदीवरून फिरून आजूबाजूचे सौंदर्य जितके मनात आणि कॅमेर्‍यात साठवता येईल तेवढे साठवण्याची सगळ्यांची धडपड चालू होती. हिमाच्छादित पर्वतशिखराच्या इतक्या जवळ उभे राहताना शिखर सर केल्यावर गिर्यारोहकांना काय वाटत असेल याची एक टक्का तरी कल्पना आली. एकच टक्का एवढ्या करिता कारण आम्ही भुर्रकन उडून तेथे गेलो होतो आणि ते अनेक वर्षांच्या सरावानंतर आणि प्रचंड श्रम करून पर्वत चढून जातात तेव्हा काही कमावल्याचा त्यांचा आनंद अलाहिदा असतो. मात्र दोघांनाही दृश्य तेच दिसते !

पायलट जेव्हा परत उडायची वेळ झाली असे म्हणाली तेव्हाच घ्यानात आले की हिमनदीवरची वीस मिनिटे संपली आणि मग शेवटचा एक जल्लोषाचा फोटो घेऊन नाखुशीनेच आम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसलो...

मग चालिका आम्हाला त्या भागाची अजून ओळख करून देऊ लागली. ती एकदम कसलेली वैमानिक होती. मोठ्या कसबाने पर्वतशिखरांवरून, दर्‍यांतून आणि कड्यांच्या जवळून हेलिकॉप्टर नेत होती...

.

.

.

.

.

.

.

.

होमर पासच्या पलीकडे आम्ही उतरलो तेव्हा इतर सर्व आमची वाट पाहतं होते. त्यांना जेव्हा कळले की आम्ही खरेच तुतोकोच्या शिखराजवळ उतरलो होतो, तेव्हाची मजा बघण्याजोगी होती !

आता सूर्य चांगलाच तळपत होता आणि सकाळच्या अंधुक प्रकाशात पाहिलेला परिसर परतीच्या प्रवासात लख्ख आणि अजूनच सुंदर दिसत होता...

.

.

.

संध्याकाळी हॉटेलवर पोचल्यावर अर्थातच उत्साहवर्धक दीर्घ शॉवर घेतला आणि एक तासानंतरचा गजर लावून ताणून दिली. उठलो तेव्हा बर्‍यापैकी अंधार झाला होता. मार्गदर्शकाकडून इथल्या रेस्तराँची माहिती झाली होतीच. एका प्रसिद्ध "फिश-एन-चिप्स" ला भेट द्यायचे ठरवले होते. वाकातिपू तळ्याच्या किनार्‍यावर वेगवेगळ्या रेस्तराँची भली मोठी रांगच आहे... त्यात सुरुवातीलाच हे रेस्तरॉ होते...

लहानसे टपरीवजा स्वयंपाकघर आणि फुटपाथवर टेबले-खुर्च्या असा साधाच अवतार होता. पण ब्ल्यू कॉडच्या खास सिग्नेचर बॅटरसह तळलेल्या तुकड्या आणि स्वतः बनवलेल्या बटाटा चिप्स (होम मेड होत्या, पॅकेटमधून काढून तळलेल्या नाही) लोक मिटक्या मारत खात होते. मीही त्यांच्यात सामील झालो.

(क्रमशः )

===================================================================

किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८ (समाप्त)...

====================================================================

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

8 May 2013 - 11:23 pm | राघवेंद्र

मस्त चालु आहे सहल...

मुक्त विहारि's picture

8 May 2013 - 11:48 pm | मुक्त विहारि

झक्कास..

मोदक's picture

8 May 2013 - 11:59 pm | मोदक

व्वा!! अप्रतीम!!

बॅटमॅन's picture

9 May 2013 - 12:11 am | बॅटमॅन

आई शप्पथ!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! केवळ नि:शब्द.

केवळ जीवघेणे सगळे. पुन्हा पुन्हा ते फोटो पाहिले, जळजळीपलीकडेही नुसते फोटो पाहून भारी वाटण्यातच वेळ कसा गेला हेच कळले नाही.

पुढचे लौक्कर येऊद्या....त्या फोटोंत आमचा गँडाल्फ नैतर फ्रोडो लपलेला आहे असा आत्ताच संशय येतोय.

सुहास झेले's picture

9 May 2013 - 12:29 am | सुहास झेले

पहिला फोटो बघून पार घायाळ झालो आणि मिरर लेक्स तर निव्वळ अप्रतिम. निसर्गाची किमया आणि त्या लोकांना निसर्ग जपायची दिलेली अक्कल पाहून हेवा वाटला. आता पुढे कुठे? :) :)

भन्नाट! ग्रेट! फोटू फार मस्त आलेत. शुद्ध मराठीतून वर्णन वाचायला छान वाटत आहे.

अप्रतीम! तुमच्या प्रत्येक प्रवासवर्णनानंतर मरायच्या आधी पहायच्या ठिकाणांमध्ये भर पडते आहे! बाकी दम्मामच्यासमोरच बाहरीनला रहाणार्या माझ्या नवर्याला तुला असे काही सुचतच नाही आम्हाला घेउन जायला म्हणुन शिव्या खाव्या लागतात्,त्या वेगळ्या!

आइसक्रीम (होकी-पोकी )चा फोटो नाही काढलात का? काढला असेल तर लोडवा ना…

प्रचेतस's picture

9 May 2013 - 10:19 am | प्रचेतस

कळस आहे हा भाग.
अतिशय नेत्रसुखद.

अस्मी's picture

9 May 2013 - 11:19 am | अस्मी

एकदम सुंदर अर्थात नेहमीप्रमाणेच..!!
मिरर लेकचे फोटो अप्रतिम खासकरून आकाश्/ढगांचे प्रतिबिंब असलेला तर मस्तच. आणि तो मिरर लेककडे जाण्याचा हिरव्यागार गर्द झाडीने व्यापलेला लाकडी मार्ग एकदम निवांत आणि शांत वाटला.

काय रंगांची उधळण आहे.. स्वर्गीय.

आणि त्या मस्तपैकी वामकुक्षी करणार्‍या सी-लायन्सच्या तण्णावून दिलेल्या आणि काही आळसटलेल्या पोजेस.

बर्फाची शुभ्रता.. सगळंच स्वर्गीय..

नि३सोलपुरकर's picture

9 May 2013 - 12:26 pm | नि३सोलपुरकर

अशक्य हो अशक्य वाटावेत असे आलेले आहेत फोटो ,मिरर लेक तर स्वर्गीय.
साहेब खरच हेवा वाटतोय राव तुमचा काय तुमचा उत्साह ग्रेट __/\___.

फोटो आणी वर्णन वाचुन खपल्या गेलो आहे.

कोमल's picture

9 May 2013 - 12:29 pm | कोमल

विलक्षण सुंदर..
पुन्हा पुन्हा पाहुन सुद्धा मन भरत नाही. हेलिकॉप्टर राइड तर बेष्टचं.
होकी-पोकी काय आहे जरा सांगा की.
पु.भा.प्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 May 2013 - 1:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

राघव८२, मुक्त विहारि, मोदक, बॅटमॅन, सुहास झेले, रेवती, अजया, निलापी, वल्ली, अस्मी, गवि, नि३सोलपुरकर आणि कोमल : उत्साहवर्धक प्रतिक्रियांसाठी धन्यवाद !

@ निलापी आणि कोमल :

होकी-पोकी हा न्युझीलंडमध्ये प्रथम बनवलेला आईस्क्रिम फ्लेवर आहे. यात मूळ व्हॅनिला आइस्क्रिम बेसमध्ये चवदार कुरकुरीत कॅरॅमिलाइझ्ड टॉफिजच्या व्हेन्स किंवा तुकडे असतात आणि ते आइस्क्रिमबरोबर चघळून / चावून खायला फार मजा येते. हे आइस्क्रिम बास्कीन रॉबीन्सचा एक फ्लेवर म्हणूनही मिळते आणि त्याचा मी त्याचा फार दिवसापासून चाहता आहे. मात्र त्याची सुरूवात न्युझीलंडमध्ये झाली हे या सहलीतच कळले.

 ...

(चित्रे आंतरजालाच्या सौजन्याने)

रुस्तम's picture

9 May 2013 - 2:28 pm | रुस्तम

धन्यवाद!!! पण तुम्ही काढलेले फोटो पाहण्यात काही वेगळी मज्जा येते…!!! तुम्हाला प्रत्यक्षात भेटायला खूप आवडेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 May 2013 - 8:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्हाला भेटायला नक्कीच आवडेल.

नानबा's picture

9 May 2013 - 2:48 pm | नानबा

पण तुम्ही काढलेले फोटो पाहण्यात काही वेगळी मज्जा येते…!!

एकदम कड्डक सहमती. तुमचे धागे वाचण्याची उत्कंठा या फोटोंमुळे आणखीच वाढते. आधीचा नॉर्वे प्रवास आणि आता हा ऑस्ट्रेलिया न्यूझिलँडचा. अवर्णनीय. खूपच. सुंदर.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 May 2013 - 11:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

वेळ असल्यास इकडेही एक नजर टाका:

http://www.misalpav.com/node/23299

धनुअमिता's picture

9 May 2013 - 4:32 pm | धनुअमिता

अप्रतिम..... सुरेख........
तुतोको शिखराचे फोटो तर अवर्णनीय!!

प्यारे१'s picture

9 May 2013 - 4:49 pm | प्यारे१

थ्यान्क यु व्हेरी मच एक्कासाहेब!
शब्दातीत सुंदर आहे सगळं. निव्वळ भरुन घेत राहावं असं निसर्गसौंदर्य!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 May 2013 - 9:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रथम फडणीस, धनुअमिता आणि प्यारे१ : आपल्याला सफरीत मजा येतेय हे वाचून खूप आनंद झाला !

दिपस्तंभ's picture

9 May 2013 - 10:36 pm | दिपस्तंभ

फोटो अप्रतिम आले आहेत. मला सर्वात आधी हाच देश पहायला आवडेल अहाहा काय तो निसर्ग, कसल्या मस्त सोयी, स्वछता, सारेच कमाल आहे. मला तर आत्ताच तिथे कायमचे रहायला जावेसे वाटत आहे.. खरे तर या देशातील लोकांची स्तुती केली पाहिजे कि ज्या प्रकारे त्यांनी पर्यावर्णाचे रकशण आणी संवर्धन केले आहे...

अवांतरः एक्का सर, आपण फोटोग्राफी चा कोर्स केला आहे का???:)

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 May 2013 - 10:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

न्युझीलंडबद्दलच्या तुमच्या मतांशी सहमत.

मी केवळ एक हौशी फोटोग्राफर आहे... कोर्स वगैर नाही केला आणि फोटोगाफीतल्या तांत्रीक गोष्टी माहित नाहीत. चांगले दृश्य, चांगली फ्रेम, चांगला फोकस, जमलेच तर थोडे प्रकाशाच्या दिशेचे समीकरण आणि क्लिक् असा साधा हिशेब, बस्स !

अर्धवटराव's picture

10 May 2013 - 12:53 am | अर्धवटराव

एक्का साहेब... दिल खुष झाला.

अर्धवटराव

मिहिर's picture

10 May 2013 - 9:46 am | मिहिर

फारच सुंदर फोटो आणि वर्णन! हा भाग विशेष आवडला.

अमोल केळकर's picture

10 May 2013 - 11:00 am | अमोल केळकर

खुप छान सफर घडवलीत :)

अमोल केळकर

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 May 2013 - 12:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

अर्धवटराव, मिहिर आणि अमोल केळकर : सफरितील सहभागाबद्दल धन्यवाद !

चेतन माने's picture

10 May 2013 - 12:01 pm | चेतन माने

सर्व फोटू एकापेक्षा एक अप्रितम आहेत आणि तुमचं लिखाण त्याला चार चांद लावत आहे.
पुभाप्र :):):)

nishant's picture

10 May 2013 - 12:14 pm | nishant

मज्जा आली वाचताना.. फोटो क्र.६ सर्वात अधिक आवडला..
पु.भा.प्र.

दिपस्तंभ's picture

10 May 2013 - 3:16 pm | दिपस्तंभ

आधीचा नॉर्वे प्रवास ची लींक द्या इथे...

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 May 2013 - 3:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

चेतन माने, nishant आणि दिपस्तंभ : अनेक धन्यवाद !

@ दिपस्तंभ : नॉर्वेच्या प्रवासाची लिंकः http://www.misalpav.com/node/24109

सानिकास्वप्निल's picture

10 May 2013 - 3:54 pm | सानिकास्वप्निल

हा सगळ्यात बेस्ट भाग आहे माझ्या मते :)
क्लास फोटोज आणी तुमचे लिखाण जबरदस्तं
+१ +१

उदय के'सागर's picture

10 May 2013 - 5:36 pm | उदय के'सागर

कधीचं वाचेन वाचेन म्हणतोय, शेवटी आज अत्ता सगळे भाग एका दमात वाचले, म्हणजे पहिला भाग वाचल्या नंतर पुढचे भाग वाचायचा मोह अवरलाच नाही हो :)
केवळ अप्रतिम प्रवास वर्णन आणि सगळे छायाचित्रं सुंदर म्हणजे अगदी 'वॉलपेपरच' हो!!! पुढील भाग लवकर येऊ द्या :)

पैसा's picture

10 May 2013 - 11:25 pm | पैसा

नेहमीचा प्रतिसाद दिला आहे असे समजा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2013 - 11:36 am | डॉ सुहास म्हात्रे

सानिकास्वप्निल, अधाशी उदय आणि पैसा : अनेक धन्यवाद ! असाच लोभ असू द्यावा.

आणि फोटोगाफीतल्या तांत्रीक गोष्टी माहित नाहीत. चांगले दृश्य, चांगली फ्रेम, चांगला फोकस, जमलेच तर थोडे प्रकाशाच्या दिशेचे समीकरण आणि क्लिक् असा साधा हिशेब, बस्स !

दादा, तुमच्याकडे एक अशी लोभस गोष्ट आहे की जिची तुम्हाला कल्पना सुद्धा नाही आणि ती म्हणजे तुमची नज़र! साला, केंव्हा काय पहावं, कसं पहावं आणि किती पहावं हेच तर पर्यटनातलं हुनर आहे. तुमच्या नज़रेतनंच तर आम्ही हा जीवघेणा निसर्ग पाहतोय, हे पर्यटन करतोय.

दिपक.कुवेत's picture

12 May 2013 - 1:22 pm | दिपक.कुवेत

निव्वळ जळजळ होत आहे. मिरर लेक्सचे फोटो तर अप्रतिम देखणे आहेत. तसे सगळेच आहेत....डावं/उजवं करण कठिण आहे राव!

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 May 2013 - 3:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

संजय क्षीरसागर आणि दिपक्.कुवेत : धन्यवाद !

सुज्ञ माणुस's picture

14 May 2013 - 9:54 am | सुज्ञ माणुस

हिमनदीची ( आणि सर्वच ) फोटू एकदम खलास :)
काही फोटो पाहून "लॉर्ड ऑफ द रिंग" ची आठवण आली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 May 2013 - 10:02 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

यशोधरा's picture

14 May 2013 - 10:21 am | यशोधरा

आमचे एकदा वाचून झाले की अज्जिबात अपडेट वगैरे करायचे नाही, सांगून ठेवते! काय राहिले वाचायचे, पहायचे अशी चुटपुट लागते ना! एकदम झायीर निषेध!

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 May 2013 - 5:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

+D +D +D

आज्ञा शिरोधार्य ! सध्यातरी फक्त शुद्धलेखनातील चुका आणि इतर भागांच्या (धाग्याच्या वर-खालच्या) लिंक्स अपडेट करतो आहे... काही खास बदल करावा लागल्यास सर्वात नविन भागात स्वतंत्र सूचना देईन. तरी निर्धास्त रहावे.

निव्वळ अप्रतिम ... आज वेळ कमी असल्याने फोटो पाहु आणि मग नंतर निवांत पाहु असे ठरवुन या भागापर्यंत आलो, पण हा सर्व भाग वाचल्याशिवाय ही राहवव्ला नाही.. पुन्हा अप्रतिम ....