वाद-संवाद

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
8 May 2013 - 9:15 am

मला उशीर झाला होता. माझी पत्नी एलीनॉर आणि मी सात वाजता रेस्टॉरंट मध्ये भेटणार होतो, पण मला चांगले साडेसात होऊन गेले होते. मला उशीर व्हायला क्लायेंटबरोबरची मीटिंग खूप वेळ चालण्याचं कारण झालं होतं. मी धावतपळत पोहोचलो आणि एलिनॉरला माझ्या उशीरा येण्याचं कारण सांगून टाकून 'सॉरी' म्हणून मोकळा झालो,

"अगं खरं तर उशीर करण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता."

"तुझा हेतू कधीच नसतो रे!"

अरे बापरे! बाईसाहेब घुश्शात होत्या तर…

"अगं सॉरी म्हंटलं ना, पण मला खरंच ती मीटिंग अर्धवट सोडून येणं अशक्य होतं!"

मी उशीर केल्याने तिला अर्ध्या तासाहून अधिक काळ गर्दीच्या ठिकाणी थांबावं लागलं याचा राग काही कमी होत नव्हता, शब्दाने शब्द वाढत गेला, आणि तिचं रागावणं शांत होणं तर राहूच दे, उलट मला हे जाणवलं की मला तिला समजावून सांगायला लागतंय आणि आपल्याला त्यात अपयश येतंय याचा मलाच राग आला आणि तो वाढत गेला. ती संध्याकाळ काही चांगली गेली नाही हे सांगायला नकोच.

त्यानंतर बऱ्याच दिवसांनी मी ही घटना माझ्या एका जवळच्या मित्राला - कुटुंब-उपचार पद्धतीचा प्राध्यापक असलेल्या केन हार्डीला - सांगत होतो, तर तो हसला.

"का रे हसलास?" - मी

"अरे तू एक चिर-परिचित चूक केलीस!" - केन म्हणाला.

"मी चूक केली?"

"होय, आणि आता एवढ्यात तू ती परत करतोयस! अरे, तू तुझ्या स्वत:च्याच दृष्टीकोनात अडकून इतरत्र पहातो आहेस. 'तू चूक केली नाहीस असं तुला वाटतं, तुझा उशीर करण्याचा हेतू नव्हता, वगैरे, वगैरे. अरे तो मुद्दाच नाही मुळी; मुद्दा हा होता की तुला उशीर झाला, that's the bottom-line truth! तू जाणून बुजून उशीर केला नसलास तरीही उशीर झाला आणि तिला थांबायला लागलं ही वस्तुस्थिती होती, त्यामुळे तुझा हेतू हा महत्वाचा नव्हे तर तिला काय परिणाम भोगायला लागला हे संवादाच्या दृष्टीने अधिक महत्वाचं नव्हतं का? तू तुझ्या 'हेतू'ला मध्यवर्ती धरून बोलत राहिलास, आणि ती तुझ्या उशीरा येण्याच्या 'परिणामा'ला चिकटून बोलत राहिली, म्हणजे तुम्हा दोघांच्या संभाषणाच्या गाड्या वेगवेगळ्या रुळांवरून चालत राहिल्या, खरं म्हणजे ते संभाषणच नव्हतं, तो संवाद नव्हता, म्हणून तो वाद झाला!"

नंतर स्वत:शीच विचार करतांना मलाही हे पटलं की आमचे दोघांचे वेग-वेगळे मुद्दे मांडणं चालू राहिलं होतं, आणि त्यात अखेर दोघांतला प्रत्येकाला असं वाटत राहिलं की माझी बाजू ऐकलीच जात नाहीये, माझ्या विषयी गैरसमज करून घेतला जातोय; आणि याचं पर्यवसान आमच्या प्रत्येकाच्या संतापात झालं होतं. अधिक विचारांती मला पटलं की 'हेतू' आणि 'परिणाम' यांतला फरक समजावून न घेणं हेच आमच्यातल्या विसंवादाचं प्रमुख कारण होतं. आयुष्यात बरेचदा विचार किंवा कृती हे महत्वाचे नसतात, परिणाम अधिक महत्वाचे असतात. समोरच्या व्यक्तीला तुमचे विचार किंवा कृती यांचा अनुभव घेता येत नाही, त्यांना अनुभुती येते ती फक्त तुमच्या कृतीच्या परिणामांची.

आणखी एक उदाहरण पाहुया:

तुम्ही तुमच्या सहकाऱ्याला इ-मेल पाठवता: "मला वाटतं आजच्या मीटिंगमध्ये तू तोंड उघडून जरा अधिक बोलायला हवं होतं."
त्याचं उत्तर येतं, "तू जरा कमी बोलला असतास तर मिळालीही असती मला संधी तोंड उघडायची!"

तुम्ही अर्थातच उचकता, पण गैरसमज दूर करायला म्हणून उत्तर पाठवता, "माझा काही तुला दुखवायचा उद्देश नव्हता, मी फक्त मदत करण्याच्या उद्देशाने लिहिलं तसं, तर तू आपल्या माझ्यावरच डाफरतो आहेस, हे फारच झालं!"

पण वातावरण निवळणं दूरच, तो तुम्हाला तुमचेच मूळचे शब्द ठळक करून पाठवतो, "तू काय लिहिलंस ते वाच जरा, 'तू तोंड उघडून जरा अधिक बोलायला हवं होतं!' ही काय पद्दत झाली मदत करण्याची?"

मग तुमचाही तोल सुटतो, आणि तुम्ही कॅपिटल अक्षरांत उत्तर देता, "BUT THAT'S NOT WHAT I MEANT!"

मग सुरू होतो एक वृद्धिंगत होत जाणारा गैरसमजाचा भोवरा. कसे अडकलात तुम्ही या भोवऱ्यात? कसं सुटायचं त्यातून?

अगदी सोप्पंय, खरं तर! जेंव्हा कधी तुम्ही कुणाला दुखवता तेंव्हा, चूक कुणाचीही असो, पुढचं संभाषण सुरू करावं ते नेहेमी तुमच्या कृतीने दुसरी व्यक्ती दुखावली गेली आहे हे आधी मान्य करून. तुमच्या उद्देशांची चर्चा खूप नंतर करा, किंवा करूच नका. कारण शेवटी तुमचे उद्देश महत्वाचे नसतातच, संबंध सुरळीत आणि आनंददायी रहाणं हे अधिक महत्वाचं. आणि त्या दुसऱ्या व्यक्तीची चूक असेल असं तुम्हाला वाटत असेल तर? तर तसं असो, एकमत होणं हे महत्वाचं नाही, सामंजस्याने वागून वाद टाळणं महत्वाचं आहे.

मग मी एलिनॉरला काय म्हणायला हवं होतं? "तुला राग आलाय हे दिसतंय, माझी वाट पहात अर्ध्या तासाहून अधिक थांबायला लागणं नक्कीच त्रासदायक असणार. आणि ही पहिलीच वेळ आहे असंही नाही, तेंव्हा क्लायेंटचं कारण सांगून मी नेहेमीच उशीर करतो असं तुला वाटणं साहजिक आहे, अगदी ते कारण खरं असलं तरी. तेंव्हा माझं चुकलंच, सॉरी!" यातलं काहीही खोटं किंवा चुकीचं नाही.

अशा परिस्थितीत तुम्ही वस्तुस्थिती मान्य केली, की तुम्ही जिंकलात. दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांना जी वस्तुस्थिती वाटते, ती न नाकारणं म्हणजेच समजुतदारपणा.

आणि त्या वर लिहिलेल्या सहकाऱ्याबरोबरच्या इ-मेल विसंवादाचं काय? सवाल-जबाबात वेळ आणि मन:शांती वाया घालवण्यापेक्षा तुम्ही थोडंसं असं लिहायला हवं : "मी तुझ्या काम करण्याच्या पद्दतीवर टीका करतोय, तेही इ-मेलच्या पडद्यामागून, असं वाटून तुला राग येणं स्वाभाविक आहे. मी तसं करायला नको होतं, प्रत्यक्ष भेटून तुझा गैरसमज आणि राग दूर करीन, तोपर्यंत फक्त सॉरी!"

मी हे 'सोप्पंय' असं वरती म्हंटलं, सहज आहे असं नाही. तर हे सहज का नाही? त्याला कारण म्हणजे आपला भावनिक विरोध. आपण साधारणपणे आपल्या अडचणी सहज मान्य करतो, दुसऱ्याच्या अडचणी मान्य करणं जमलं पाहिजे. विशेषत: आपलं वागणं हीच दुसऱ्याची अडचण असेल तर ते मान्य करणं जमलंच पाहिजे. खास करून आपण चिडून त्वेषाने काही बोलू इच्छितो तेंव्हा क्षणभर थांबून हा विचार केला पाहिजे. आणि जेंव्हा समोरची व्यक्ती आपल्याला समजून घेत नाही असं वाटतं तेंव्हाही. आपण जेंव्हा दुसऱ्याचा दृष्टीकोन मान्य करतो तेंव्हा कधी कधी आपण आपला पराभव मान्य करतो आहोत असं वाटणंही शक्य आहे, पण ते खरं नव्हे, आपण फक्त त्या दुसऱ्या व्यक्तीच्या मताचा मान ठेवतो आहोत याची जाणीव ठेवली की असं वागणं अवघड जात नाही. तुमच्या सह-वेदनेतून तुमची संवेदनशीलता दिसते.
असं संवेदनशील वागणं सोपं असं करता येईल: समोरची व्यक्ती तुमच्यावर रागावते आहे असं दिसतं तेंव्हा अशी कल्पना करा की ती व्यक्ती दुसऱ्या कुणावर तरी रागावली आहे. मग अशा वेळी तुम्ही जसे वागाल तसेच वागा, बहुतेक तुम्ही ते का चिडले आहेत ते शांतपणे ऐकाल, आणि ते किती रागावले आहेत हे तुम्हाला जाणवतंय हे त्यांनाही कळेल.

आणि अशा प्रसंगी तुम्हाला तुमचे उद्देश वा हेतू कधी उलगडून सांगता आलेच नाहीत तर? माझ्या एक आश्चर्यपूर्ण गोष्ट लक्षात आली, की एकदा मी समोरच्या व्यक्तीला जाणवणारे परिणाम मला कळले आहेत हे समजावून सांगितले, की मग माझ्या हेतूंची मीमांसा करत बसायची गरज उरत नाही, ती इच्छाच जणू उन्हातल्या धुक्यासारखी वितळून जाते. याचं कारण म्हणजे मी हेतू उलगडून सांगणं हे जर मुळात संबंध सांभाळण्यासाठी करू इच्छित असेन, आणि माझ्या वर्तनातून समोरच्या व्यक्तिच्या अनुभूतीची बूज ठेवण्याने जर नेमकं तेच साध्य होत असेल, तर हेतू समजावणं याला काहीच अर्थ उरत नाही. त्याक्षणी वाद-विषय टाळून पुढे सरकायला आम्ही दोघेही मनाने तयार असतो. आणि जेंव्हा आपलं मन जाणलं जातंय, आपली वेदना ओळखली जाते आहे याचं समाधान समोरच्या व्यक्तीला मिळतं, तेंव्हा संबंध झपाट्याने पूर्वपदावर येतात, रुसवे-फुगवे विसरून.

******************************

"What to Do When You've Made Someone Angry?" या पीटर ब्रेग्मन लिखित Harvard Business Review मधील April 23, 2013 रोजीच्या ब्लॉग/लेखाचं हे स्वैर रुपांतर. हा मूळ लेख मला आवर्जून पाठवणार्‍या अनिदा जोशींचे मनःपूर्वक आभार.
******************************************

हे लिहून झाल्यावर मी विचार केला की पीटर आणि एलिनॉर हे दोघे मराठी असते, तर पीटरने त्यांच्या वाद-संवादाचं वर्णन कसं केलं असतं? तर त्या काल्पनिक वर्णनाचा हा प्रयत्न:

---------------------------------
कारण किती किरकोळ झाले
पण शब्दाने शब्द वाढत गेले
बोलत गेलो ते तुला ऐकवत नव्हतं
तू बोललीस ते मला ऐकायचं नव्हतं

माझे टोमणे, लागट बोलणे
काय घडतंय ते तुला कळेना
तुझे धुमसणे, तोंड फिरवणे
जिंकल्याचा आनंद मला मिळेना

गैरसमजांचं जुन्या-पुराण्याच
मोहोळ उठवीत राहिलो आपण
शांत राहिलो असतो थोडंसंच
गळून पडलं असतं मीपण

झालं इतकंच की तू अन मी
वाद घालून थकून गेलो
चारच शब्द क्षमेचे
बोलायचे विसरून गेलो

राणी गं, आता कळतंय राहून राहून
तोऱ्यात मी बोलायला नको होतं
मला काय सांगायचंय त्याहून
तुला ऐकायचंय ते ओळखायला हवं होतं

आता अबोला मोड गं, आपली प्रीती गोड गं
वय वाढलं म्हणून काय, माझी मूठ सोड गं

मुक्तकविचारभाषांतर

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

8 May 2013 - 11:43 am | श्रावण मोडक

वा, लेख आवडला. अनुवाद करून आवर्जुन दिल्यबद्दल धन्यवाद.

स्पंदना's picture

8 May 2013 - 11:53 am | स्पंदना

मग भांडायच कधी? अस नाही चालणार.
मधुगुंजन लखलाभ तुम्हाला बोल रांगडा प्यार मला ।

विसरलात काय?

मुक्त विहारि's picture

8 May 2013 - 12:04 pm | मुक्त विहारि
अभ्या..'s picture

8 May 2013 - 1:44 pm | अभ्या..

मस्त मस्त. आवडले.
भांडायला पण आवडते म्हणा. ;)

ढालगज भवानी's picture

8 May 2013 - 1:49 pm | ढालगज भवानी

कविता मस्त.

आतिवास's picture

8 May 2013 - 2:11 pm | आतिवास

रोचक लेख. आवडला.
"यू" स्टेटमेंट न करता "आय" स्टेटमेंट करावं (म्हणजे 'तू चुकीचा/ची वागलास्/वागलीस' असं म्हणण्यापेक्षा "मला वाईट वाटलं" असं म्हणावं - हे ढोबळमानाने अर्थात! )असं वाचलं होतं - पण "आय स्टेटमेंट" चुकीचं केलं तर विसंवाद(च) होऊ शकतो हे लक्षात आलं. :-)

मूळ लेखाचा दुवा दिल्याबद्दल विशेष आभार. अनुवाद चांगला झाला आहे.

मला काय सांगायचंय त्याहून
तुला ऐकायचंय ते ओळखायला हवं होतं

हे छान!
एकुण लेख आवडला.

अनुवाद व कविता दोन्ही आवडले.

भानस's picture

12 Dec 2013 - 5:55 am | भानस

मग सुरू होतो एक वृद्धिंगत होत जाणारा गैरसमजाचा भोवरा. कसे अडकलात तुम्ही या भोवऱ्यात? कसं सुटायचं त्यातून?

मस्त पोस्ट.

पहाटवारा's picture

12 Dec 2013 - 9:13 am | पहाटवारा

कित्येकदा कळते पण वळत नाहि अशी गोची होउन जाते माझी तरी ..
स्वत: त्या सिचुएशन मधे असताना 'त्याच्'वेळी बोध होउन तसे वागायला जमले तर शक्य आहे .. पण बर्याचदा पाणी डोक्यावरुन जायला लागले कि मग पत्ता लागतो .. जमेल हळूहळू :)
-पहाटवारा

प्रभाकर पेठकर's picture

12 Dec 2013 - 1:37 pm | प्रभाकर पेठकर

नेहमी दूसर्‍याच्या शूज मध्ये शिरुन पाहावं.
पण असं करता करता माझ्या चपला कुठे काढून ठेवल्या हेच लक्षात नाही. बोंबला!