सध्या मिपावर पुनर्जन्म, कर्मविपाक वगैरे वर बराच काथ्याकूट चालू आहे. म्हटल आपण पण एक जिलबी पाडावी. जमलीय का नाही ते सांगायला मोठे आहेतच...
पुनर्जन्म, कर्मविपाक वगैरे माणसाला पहिल्यापसून भुरळ पाडणारे विषय आहेत. असंख्य लोकांनी त्यावर बरेच काही लिहून ठेवले आहे, त्यावर मी अणखीन लिहिणे म्हणजे..
उपनिषदांत एका शब्दात सांगितले आहे - तत्त्वमसि|
ते समजायला कठीण जाऊ लागले म्हणून श्रीक्रुष्णांनी गीता संगितली.
तेही कठीण जाऊ लागले म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली.
आता तेही कठीण जाऊ लागले म्हणून आता ज्ञानेश्वरीवर प्रवचने होतात :)
असो. कर्मविपाक म्हणजे मला असे वाटते की - समता राखण्याच्या दृष्टीने प्रकृतीने केलेले नियम.. आपण निसर्गात पाहिले तर हे सर्वत्र पहायला मिळते. जेव्हा एक पर्वत उभा राहतो तेव्हा एक खड्डा पण पडतो. दुष्काळ पडतो तेव्हा अतिवृष्टी देखील कुठेतरी होतच असते. देवाण-घेवाण देखील जीवनाच्या सर्व स्तरांमध्ये चालूच असते. आपण काही उदाहरणे पाहू.
जीवो जीवस्य जीवनम् .. पक्षी किडे खातात, मोठे पक्षी लहान पक्ष्यांना खातात, आणि ही सा़खळी अखंड चालूच असते. याचाच वेगळ्या शब्दांत सांगयाचे झाले तर - "तुम्ही जे देता, तेच तुम्हाला मिळते", किंवा "पेराल तेच उगवेल" यातून देखील थोड्या फार फरकाने हेच सांगितले आहे.
सर्वात प्रथम हे विश्व निर्माण झाले तेव्हा सम स्थितीतच होते. आणि मला हे अशक्य वाटत नाही. सर्व जग जर एकाच मूलतत्वांपासून बनले आहे तर मग ते जन्म झाल तेव्हा सम असण्याची शक्यता आहेच.त्यामध्ये गती कशी आली हा एक प्रश्न आहे खरा, आणि विज्ञानाने ते कळेल का, आणि कधी कळेल तेही माहीत नाही.
असे म्हणतात पूर्वी कर्मविपाक नव्हता, कारण सर्वांनाच आपल्या स्वरूपाची जाणीव होती.मला असे वाटते की याचाच अर्थ असा होतो की सर्वजण आपल्या नैसर्गिक(ईश्वरी) प्रेरणेप्रमाणे वागत होते. आपण एक उदाहरण घेऊ.
आपल्या शरीरात कोट्यावधी पेशी असतात. आता त्या पेशींना त्यांचे अस्तित्व नाही का? तर आहे. त्या पेशींना हे माहीत नसते की आपण एका मोठ्या शरीराचा भाग आहोत. त्या बिचार्या आपल्या नैसर्गिक प्रेरणेप्रमाणे वागत असतात. परिणाम म्हणून शरीर चालत असते. मला असे वाटते की आपण देखील अशीच एक पेशी आहोत. एका विराट पुरुषाची. हजारो पेशी प्रतिक्षणी मरत असतात, तेव्हढ्याच परत जन्म घेत असतात. आपलेही असेच नाही का?
परंतु हे मग एव्हढ्यावर थांबत नाही. हा न्याय लावयचा झाला तर मग जे पिण्डी ते ब्रह्माण्डी आणि जे ब्रह्माण्डी ते पिण्डी नाही का? एक छोटासा डी एन ए जर संपूर्ण माणसाची कुंडली ठरवत असेल तर मग ही जाणीव अणखीनच वाढते.
मध्यंतरी निरंजन घाटे यांचे एक पुस्तक (बहुधा असंभव) वाचले होते. त्यात त्यांनी पुनर्जन्म, समाधी म्रुत्युसमीपतेचे अनुभव यांवर चालू असलेल्या संशोधनाचा परामर्ष घेतला आहे. त्यातले काही अनुभव मेंदूमधील रासायनिक क्रियांमुळे होतात असे सिद्ध झाले आहे, पण काही अजून गूढच आहेत. (खरतर मि इथे अशी विनंती करेन की कोणितरी त्या पुस्तकावर परीक्षण लिहावे.)
-------
मूळ मुद्दा कर्मविपाक जरा बाजूला गेला. कर्मविपाकाचे असे म्हणणे आहे, की तुमचे अस्तित्वच मुळी काहीतरी कर्म असलयामुळे आहे. कर्मविपाकाचे असेदेखील म्हणणे आहे की कर्म केल्याखेरीज जगणे अशक्य आहे. एका गोष्टीला स्पर्ष मला करावा लागेल- कर्मविपाकावर घेतला जाणारा पहिला अक्षेप सर्वात पहिले कर्म कसे निर्माण झाले? एक उदाहरण घेऊया. रशियामध्ये सारेजण समान आहेत म्हणून क्रांती झाली, म्हणजे सारे़जण समान झाले.म्हणजेच सुरुवात झाली - शून्यापासून. नंतर असमानता आलीच की.
तर कर्मविपाक अस म्हणतो की तुम्ही जे कर्म कराल, त्यामुळे विश्वात जी असमानता निर्माण होईल ती समान केल्याशिवाय तुम्हाला मुक्ती नाही. आता हा हिशोब कसा सम्पवायचा याबद्दल मि इथे लिहत नाही.. त्यावर तज्ञांचीच मते घ्यावीत. परंतु कर्मविपाक असेही म्हणतो की तुम्ही कर्मात लिप्त नसाल तर ही कर्मे तुम्हाला बाधत नाहीत. आता याचा अर्थ काय? मला असे वाटते की जर तुम्हाला जाणीव असेल की जे काही कर्म माझ्या हातून घडत आहे ते मी माझ्या भावनेसाठी करत नाहीये, तर हे त्या विराट पुरूषाच्या श्वासाचा भाग आहे, तर मग तुम्हाला ते कर्म बाधू शकत नाही.
असो.. पहिलीच वेळ आहे. सांभाळून घ्या.
प्रतिक्रिया
3 May 2013 - 5:31 pm | ढालगज भवानी
एक्झॅक्टली!!!
सुंदर लिहीलं आहेस.
पुरुषसूक्तातच हजारो, लाखो मुख, बाहू असलेल्या पुरुषाचे वर्णन आहे. हा पुरुष म्हणजे समाजपुरुष. आपण त्या समाज पुरषाच्या पेशीच नाही का?
3 May 2013 - 10:05 pm | सस्नेह
अत्यंत तार्किक लेखन. पटले.
कर्म हे जेव्हा श्वसन किंवा हृदयाचे स्पंदन या क्रियामितके सहज प्रेरणेने घडते तेव्हा ते कर्त्याला लिप्त करत नाही.
त्या आयुष्यात सुख दु:खे, चढ उतार येतात पण ते आवेग निर्माण करू शकत नाहीत.
4 May 2013 - 6:53 pm | अशोक पतिल
तंतोंतंत गीतेचे सार ! मी इतके सोपे विवेचन या आधी क्वचित वाचले असेल.
5 May 2013 - 9:33 am | मदनबाण
ह्म्म...
एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या जुळ्या मुलांचे आयुष्य सारखे का नसते ? असा प्रश्न डोळ्या समोर आला.
5 May 2013 - 3:01 pm | आनन्दा
कर्मविपाक आणि ज्योतिष या वेगळ्या गोष्टी आहेत.. त्या तश्या सारख्याच आहेत.. पण गल्लत होऊ नये एव्हढेच.
12 Feb 2014 - 3:45 pm | आयुर्हित
याला कारण त्यांनी या जन्मात काय कर्मे केलीत व मागच्या जन्मी काय काय उद्योग करून ठेवलेत हेच होय.
मुले जरी जुळे असतील तरी प्रत्येकाचा जन्म वेळ हा वेगळा असतो,आपल्या समोर असे काही उदाहरण असतील, तर ते मांडावीत, जेणे करून त्यावर अधिक अभ्यास करायला मिळेल.
6 May 2013 - 7:10 am | ढालगज भवानी
जो अंतरी दॄढ , परमात्मारुपी गूढ|बाह्यभागु तरी रुढ, लौकीकु जैसा||
जो इंद्रिया आज्ञा न करी,विषयांचे भय न धरी|प्राप्त कर्म नाव्हेरी, उचित जे जे||
जो कर्मेंद्रिये कर्मी,राहटता तरी न नियमी|परि तेथेचेनि उर्मी, झाकोळेना||
तो कामनामात्रे न घेपे,मोहमळे न लिंपे|जैसी जळी जळे न शिंपे,पद्मपत्र|| - ज्ञानेश्वरी (अध्याय - ३ - कर्मयोग)
6 May 2013 - 9:04 am | नितीनचंद्र
बहुदा या पुस्तकाची चर्चा इथे झाली असावी. हरीभाई ठक्कर यांचे मुळ पुस्तक " कर्मनो सिध्दांत" चा मराठी अनुवाद कर्माचा सिध्दांत अतिशय लोकप्रिय आहे. जिज्ञासुंनी वाचावा.
6 May 2013 - 12:20 pm | संजय क्षीरसागर
नाही. तुमच्या अस्तित्वाला काहीही कारण नाही. ते कोणत्याही कारणानं निर्माण होत नाही त्यामुळे ते सर्वस्वी अबाधित आहे.
कोणतंही कर्म हे शरीर आणि मन या दोन प्रतलांवर चालतं. तुम्हाला ते फक्त कळतं त्याचा कोणताही लेप लागत नाही.
तुम्ही नेहमी अकर्ता आहात त्यामुळे कायम मुक्त आहात. अस्तित्वात असमानता निर्माण होत नाही (तुमच्या मनात होते). अस्तित्व स्वयंभू आणि कायम साधला गेलेला तोल आहे. ते कॅलिडोस्कोपसारखं आहे आणि स्वतःच स्वतःला क्षणोक्षणी समान राखत जातं.
हा गैरसमज आहे. आपण कधीही कर्मलिप्त होत नाही. कर्माच्या ठिकाणी फक्त उपस्थित असतो.
असा विराट पुरूष वगैरे कुणीही नाही. तो दुसरा गैरसमज आहे. सर्व अस्तित्व निर्वैयक्तिक, स्वयंभू आणि एकसंध आहे. आपण व्यक्ती आहोत या मुळ गैरसमजातून सुटका कर्मबंधाच्या कल्पनेपासून कायमची मुक्ती आहे.
12 Feb 2014 - 3:08 pm | आनन्दा
हेच मी वर वेगळ्या शब्दात सांगितले आहे.
मान्य नाही. तुमचे अस्तित्व हेच मुळी प्रक्रुतीमधील काही ना काही असमानतेमुळे निर्माण झाले आहे.
याची जाणीव करून देणे हेच तर कर्मविपाक सिद्धांताचे उद्देश्य आहे. मी कर्म करत नाही, तर कर्माच्या ठिकाणी फक्त उपस्थित असतो, हे एकदा पचले की आपोआपच आपण कर्माने लिप्त होत नाही.
काहीतरी गफलत होते आहे. मानवी शरीर एकसंध आणि स्वयंभू आहे का? तर मग प्रक्रुती कशी असेल? मी जो विराट पुरुष म्हणत आहे ते या अस्तित्वाचे द्रुश्य रूप आहे. जसे आपल्या शरीरात हजारो पेशी असल्या तरी आपले अस्तित्व एकच असते, तसे संपूर्ण विश्व हे एकच अस्तित्व आहे.
धागा पुन्हा वर आल्याबद्दल क्षमस्व!