१९९० साली मी विक्रांत मध्ये प्रमुख वैद्यकीय अधिकारी होतो.(मी एकटाच होतो) जहाजात साधारण पणे डॉक्टर हा कल्याण कारी(WELFARE) अधिकारी म्हणून सुद्धा काम करतो कारण त्याची बढती हि वार्षिक अहवाला वर नसते. जहाजाचे स्वास्थ्य विषयक काम हे त्याच्या अखत्यारीत येते यात सर्व स्वयंपाकी वाढपी (COOKS AND STEWARDS) यांची दर महिन्याला तपासणी करणे, स्वयमपाकघर, जेवणघर इ गोष्टीची तपासणी करणे. कीटक, उंदीर इत्यादीपासून प्रतिबंध ठेवणे हे सर्व येते तसेच सर्व सैनिक आणी अधिकारी यांची वार्षिक स्वास्थ्य/वैद्यकीय तपासणी बढतीपूर्व वैद्यकीय तपासणी हे सुद्धा येते त्यामुळे डॉक्टरला बरेच अधिकार आणी शक्ती असते.
असेच एकदा मी सकाळी ८ वाजता माझ्या केबिन मधून दवाखान्यात जात असताना वाटेत सैनिकांचे जेवणघर पहिले तर त्यात पूर्ण धूर भरला होता. आत जाऊन पहिले तर आतल्या स्वयंपाकघरात तीन स्वयंपाकी पुर्या तळत होते आणी त्याच्या तेलाचा धूर पूर्ण स्वयंपाकघरात ( KITCHEN) आणी जेवणघरात(DINING HALL) मध्ये पसरला होता.साडे आठशे सैनिकांसाठी पाच हजार पुर्या तळणे हे सोपे काम नाही हे जेवणघर पाण्याच्या खाली २ मजले होते त्यामुळे त्यात हवा येण्यासाठी तीन नळकांडी आणी धूर/ हवा बाहेर नेण्यासाठी दुसरी तीन नळकांडी होती.या तीन नळ कांड्य़ानच्या तिन्ही मोटर खराब झाल्या होत्या त्यामुळे ते स्वयंपाकी तळत असलेल्या पुर्यांचा धूर बाहेर जात नव्हता आणी तो पूर्ण दोन्ही घरात भरून राहिला होता. त्या धुरात ते तिन्ही स्वयंपाकी खोकत घुसमटत तसेच काम करीत होते. मी जाऊन त्यांच्या चीफ ला विचारले कि चीफसाहेब हा काय प्रकार आहे ? तुम्ही विद्युत विभागात कळवत का नाही? त्यावर चीफ साहेब म्हणाले सर एक मोटर खराब झाल्यावरच आम्ही तक्रार दिली आहे पण आमचे कोणी ऐकत नाही.आता तिन्ही खराब झाल्या आहेत आमची तक्रार कोणी लक्षात घेत नाही. मी त्यांना विचारले मग तुम्ही काम कसे करता त्यावर ते म्हणाले ८५० सैनिकांना जेवण तर दिलेच पाहिजे नाहीतर आम्हाला मार खावा लागेल.आणी नौदलात तुमची सबब कोण ऐकून घेतात?NOBODY IS INTERESTED IN YOUR EXCUSES.
यावर मी काहीच बोललो नाही. आणी डोक्यात विचारचक्र चालू असताना मी दवाखान्यात आलो तिथले रुग्ण पाहत असताना ते चक्र चालूच होते. थोड्या वेळाने दोन विद्युत अभियंते हसत खेळत आपल्या बढतीच्या वैद्यकीय तपासणीचे कागद माझ्या सहीसाठी घेऊन आले. ते कागद हातात आल्यावर माझी ट्यूब पेटली. मी दोघांच्या कडे पाहिलेही नाही आणी त्यांवर UNFIT असा शिक्का मारला सही केली आणी कागद त्यांच्या हातात ठेवले आणी त्यांना जायला सांगितले. दोघेही आश्चर्यचकित होऊन बघत राहिले. मी त्यांच्याशी एक शब्दही बोलायला नकार दिला आणी त्यांना जायला संगीतले. ते रागावून आपल्या विभागप्रमुखाकडे गेले. अपेक्षेप्रमाणे विभागप्रमुखांचा मला फोन आला कि डॉक्टर काय झालेWHAT IS THE PROBLEM मी त्यांना म्हटले कि ते दोघेही अपात्र आहेत. त्यावर ते म्हणाले त्यांना न बघता तुम्ही त्यांना अपात्र कसे ठरवले? यावर मी त्यांना सांगितले कि जेवण घरातील तिन्ही मोटर बंद आहेत. ज्याच्या कामाचिया जबाबदारी तुमच्या विभागाची आहे तुम्ही ती जबाबदारी पार पडत नाही म्हणून ते अपात्र आहेत. त्यावर ते वैतागून म्हणाले डॉक्टर हे निरर्थक(NONSENSE) आहे. मी त्यांना म्हटले तुम्हाला काय करायचे ते करा. मी त्यांना सरळ सांगितले कि वेल्फेअर अधिकारी म्हणून सैनिकांचे कल्याण पाहणे हे माझे काम आहे आणी मी माझी दोन कामे वेगवेगळी ठाव्णार नाही याउपर तुम्हाला कॅप्टनकडे जायचे असेल तर जा.(मी विभागप्रमुख असल्याने माझे वरिष्ठ सुद्धा कॅप्टनच होते).त्या विभागप्रमुखांकडे फक्त कमांडिंग अधिकार्याकडे (कॅप्टन) जाण्याचा पर्याय होता. पण ते बढतीच्या प्रतीक्षेत होते आणी कॅप्टनकडे जाऊन आपला पार्श्वभाग उघडा करणे त्यांना परवडणारे नव्हते.
निरुपायाने त्यांनी त्या दोन्ही अभियंत्यांना सांगितले कि तुम्ही हातात असलेले काम ठेवून स्वयंपाकघर आणी जेवणघराची पूर्ण दुरुस्ती करून द्या. डॉक्टर माझे ऐकत नाही मी काही करू शकत नाही. यावर त्या अभियंत्यांनी तिन्ही मोटर काढून डॉक यार्ड मध्ये नेल्या त्यांचे रीवैन्डिंग केले आणी त्या आणून बसवल्या त्याबरोबर तेथे काम न करणारे स्विचेस ट्यूब लाईट दिवे पंखे सर्व गोष्टी दुरुस्त केल्या. हे सर्व झाल्यावर चीफ साहेबांनी आपल्या स्वयंपाकी आणी वाढपी लोकांना मधल्या काळात कामाला लावून रंगाचा एक थर पण मारून घेतला. दुपारी जेवण झाल्यावर त्या दोन्ही अभियन्त्यानी मला काम झाले आहे असा निरोप दिला. मी ते स्वयंपाकघर आणी जेवणघर पाहण्यासाठी गेलो तर तेथे दिवाळी पूर्वी जसे घर चकाचक केले जाते तसे दिसले आणी ते सर्व स्वयंपाकी आणी वाढपी माझ्याकडे अतिशय कृतज्ञ नजरेने बघत होते. चीफ साहेब म्हणाले साहेब आम्ही एक महिना असेच एका मोटर वर काम करत होतो आमच्या विभाग प्रमुखांकडे किती वेळा गेलो पण कोणी धड लक्ष देत नव्हते. तुम्ही एकदा चा सांगितले आणी आत्ता पर्यंतच्या सर्व तक्रारी दूर झाल्या आहेत. सर इतका छान आणी चमकदार डाईनिंग हाल फक्त कोणी अति विशिष्ट व्यक्ती येते तेंव्हाच होतो. मला पण अतिशय समाधान झाले. मी त्या दोन्ही अभियंत्यांना बोलावून घेतले त्यांची माफी मागितली त्यांच्या बढतीच्या वैद्यकीय तपासणी च्या कागदावर सही केली आणी त्यांचे अभिनंदन केले.
हि बातमी सर्व सैनिकात पसरली आणी डॉक्टर काहीही करू शकतात असा माझा लौकिक काही काळासाठी झाला होता.
अशा असनद्शीर मार्गाचा वापर केल्याचे मला फारसे वाईट वाटले नाही कारण हा मार्ग मी माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरला नव्हता.
अर्थात याचा मला विक्रांत वर फार मोठा फायदा पुढचे दोन वर्षे होत होता. सैनिकांचे अन्न तपासून आणी चाखून पाहणे हा डॉक्टरच्या कामाचा भाग होता त्यामुळे तेथील स्वयंपाकी आणी वाढपी लोकांना मला काय (उदा शाही तुकडा) आवडते ते माहित होते ते अन्न ते मी आलो नाही तरी राखून ठेवीत असत आणि काहीही करून मला मोठ्या प्रेमाने खाऊ घालीत शिवाय कोणत्याही पार्टीमध्ये मी कोणत्याही कोपर्यात उभा राहिलो तरी माझी खातिरदारी व्यवस्थित होत असे. या नादात माझे वजन आठ महिन्यात नऊ किलोनी वाढले ( ५६ वरून ६५)पर्यंत. यानंतर मात्र मी थांबलो आणी माझे वजन प्रमाणात ठेवले आणी आजही २३ वर्षांनी माझे वजन ६७ किलोच आहे.
माझे असे मत आहे कि आपल्या शक्तीचा(POWER) वापर परोपकारासाठी करणे आवश्यक आहे दुसर्याला त्रास देण्यासाठी वापरतात ती शक्ती नव्हे ते उपद्रवमूल्य( NUISANCE VALUE) आहे
अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं
परोपकारः पुण्यः पापायः परपीडनम.
अठरा पुराणाचे सार हेच आहे कि दुसर्यावर उपकार करणे हे पुण्य आहे आणी दुसर्याला त्रास देणे हे पाप आहे
प्रतिक्रिया
25 Apr 2013 - 1:47 pm | प्रकाश घाटपांडे
त्या बिद्युत अभियंत्यांना तुमची मानसिक प्रकृती रोगट आहे हे उत्तम रित्या दाखवून दिले.
माझ आवडत सुभाषित.
25 Apr 2013 - 1:53 pm | मन१
चांगले काम केलेत.
पण एकूण कार्य्लयीन कामकाजाची पद्धत बघता, कुणी मनावर घेतलेच(स्वतःचे नाक कापून दुसर्याला अपशकून करायचे ठरवलेच) तर तुम्ही अडचणीतही येउ शकत होतात. रिस्क घेतल्याबद्दल आणी सत्कार्याबद्दल अभिनंदन.
25 Apr 2013 - 2:02 pm | बेकार तरुण
नेहमी प्रमाणे हा ही ले़ख उत्तम आहे.
25 Apr 2013 - 2:17 pm | अनिरुद्ध प
या कालखन्डात आपल्या सारखे अधिकारि अजून कार्यरत आहेत हे ऐकुन खूप आनन्द झाला.
25 Apr 2013 - 2:26 pm | बिपिन कार्यकर्ते
क्या बात है! आवडलं. तुमच्या लेखनातून नेहमीच असे ’एथिकल’ मुद्दे येतात. (आणि मग काही लोक वर्तुळ-त्रिकोण सिद्धांत सिद्ध करत बसतात! ;) )
लिहित रहा हो!
25 Apr 2013 - 2:49 pm | Mrunalini
खुप छान काका.... तुमच्या सारखीच स॑र्व सरकारी कर्मचार्यांना देव बुद्धी देवो. :)
25 Apr 2013 - 2:51 pm | आतिवास
चांगले काम केलेत आपण.
तुमचे लेख वाचत आहे; आवडतात. प्रत्येक वेळी काय प्रतिसाद द्यायचा तोच तोच ('आवडला' असा) म्हणून लिहित नाही. पण लेख वाचते आहे नक्की.
25 Apr 2013 - 3:27 pm | तुमचा अभिषेक
असेच म्हणतो
25 Apr 2013 - 5:56 pm | आदूबाळ
+१
25 Apr 2013 - 10:59 pm | बहुगुणी
नेहेमीप्रमाणेच लेखन आवडले.
26 Apr 2013 - 7:53 pm | अमोल खरे
असेच म्हणतो. सरकारी अधिकारी असा वागु शकतो ह्याच्यावर विश्वासच ठेवता येत नाही.
25 Apr 2013 - 3:15 pm | श्रावण मोडक
लेखन ठीकच, पण तुमचे वर्तन आवडले.
25 Apr 2013 - 3:37 pm | बॅटमॅन
+१.
असेच म्हणतो. आवडले :)
26 Apr 2013 - 9:39 pm | सस्नेह
काम टाळणार्यांकडून कटुता न येता काम करून घेणे अवघड.
ते तुम्ही धैर्याने केले.अभिनंदन (लेट)
25 Apr 2013 - 4:15 pm | ऋषिकेश
With great power comes greater responsibilities :)
25 Apr 2013 - 4:57 pm | रेवती
हेही लेखन आवडले.
25 Apr 2013 - 9:30 pm | मराठे
नाक दाबले की तोंड उघडते.
कालपरवाच 'लिडरशिप-पॉलिटिक्स इन वर्कप्लेस' नावाचा सेमिनार होता, त्यातही राजकारण हे नेहमी वाईटच असतं असं नाही. चांगल्या कामासाठीही त्याचा वापर होऊ शकतो हे सांगितलं... त्याचंच हे उदाहरण.
25 Apr 2013 - 9:43 pm | मुक्त विहारि
अजून लिहा..
25 Apr 2013 - 10:03 pm | पैसा
वाचून मजा आली!
26 Apr 2013 - 12:54 am | अग्निकोल्हा
आमचे फॅमिली डॉक्टरही असेच... वैद्यकिय ज्ञानाने प्राप्त झालेल्या अधिकारांचा आवश्यक ठिकाणी नेमका वापर करुन अक्षरशः नडणारे.
26 Apr 2013 - 1:24 am | दादा कोंडके
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
26 Apr 2013 - 6:23 am | स्पंदना
शेवटचा पॅरा वाचुन हसु आले. माणस जमेल त्या पद्धतिने प्रेम अन कृतज्ञता व्यक्त करतात. आता ती तुमच्या वजनावर आली यात त्यांचा काय दोष?
26 Apr 2013 - 6:40 am | धमाल मुलगा
तुमचे एकेक अनुभव/किस्से वाचतो तेव्हा 'अजून जगात माणुसकी शिल्लक आहे' ह्या उक्तीवरचा उडत चाललेला माझा विश्वास परत आपली मांड कसू पाहतो. :)
तुमचा एकुणातच असलेला सकारात्मक दृष्टीकोन आणि भल्यासाठीचे प्रयत्न वाचून जीव सुखावतो!
26 Apr 2013 - 7:07 am | रुस्तम
+१
26 Apr 2013 - 11:31 am | बाबा पाटील
खरे काका,तुमच्या लेखाची अक्षरशः अधाश्यासारखी वाट पहात असतो,तुमचे अनुभवविश्व बाकीच्यांचा जगण्याच्या जाणिवा समृद्ध करते. यु आर अ जिनियस..आपली वेव्हलेन्थ एकदम जुळते....
26 Apr 2013 - 12:45 pm | तेजराज किंकर
सुंदर
26 Apr 2013 - 8:34 pm | उपास
मी निराशावादी नक्कीच नाही, पण खरे काकांचे अनुभव वाचता असं वाटतं की किती किती ठिकाणी पोहोचू शकणार/ पुरे पडणार असे 'खरे' काका? सचोटी, प्रामाणिकपणा ही जीवनमुल्ये आपण हरवून बसलोय आणि मग अशा खरे काकांच्या शक्तिचा, वेळेचा ह्रास इथेच होतोय त्याचं काय? मग ही वरवरची मलमपट्टी (जरी स्तुत्य/ स्पृहणीय असली तरीही) किती ठिकाणी पुरणार, दूरगामी विचार कसा होणार समाजस्वास्थ्याचा. विचार केल्यावर आपण काहीच करु शकणार नाही असं जाणवतं आणि मग खरेकाका करतायत ते बघून माणुसकी शिल्लक आहे अशा समाधानावर आनंद मानून घेतो! :(
'खरे काका' तुमचं लिखाण मला स्वस्थ बसून देत नाही, विचार करायला भाग पाडतं, ह्या बाबूलोकांच्या सिस्टीमला/ समाजव्यवस्थेतल्या किडीला शिव्या घालण्याची धग जिवंत ठेवतं ह्यातच सगळं आलं! तुम्ही तुमचे अनुभव इथे मांडता त्याबद्दल धन्यवाद!
28 Apr 2013 - 12:13 am | प्यारे१
काहीसा असहमत. वेदना पोचते आहे मात्र खरे काका किती पुरणार वगैरे नाही आवडलं.
त्यांनी आता पर्यंत दहा व्यक्तींचे तरी किस्से दिले असावेत.
त्या दहा व्यक्तींची कुटुंबं एका व्यक्तीच्या वर्तनानं बदलली असणारेत/ आहेत.
त्यांच्यातल्या २-३ लोकांनी जरी आपाप्ला वाटा उचलला तर आणखी किमान दहा लोकांवर परिणाम होईल.
आपण त्यांचे किस्से वाचतो आहोत. चिगो सारखी एखादी व्यक्ती जी अधिकार पदावर आहे, पूर्वी आळशांचा राजा हा आयडी आपले किस्से टाकायचा (आयडी म्हणून एकेरी) इतर देखील अनेक आहेत. अशा चांगल्या व्यक्ती समाजात भरपूर आहेत.
उदा. : माणूस लाच द्यायला तयार असला तरी घ्यायला तयार नसला की काम भागतं. मी तसा आहे. बस्स. मला एखाद्या कामासाठी लाच द्यावी लागत असेल तर मी देईन. न दिल्यास भोगाव्या लागणार्या दशावतारांपेक्षा ते बरं. पण मी जिथे काम करतो तिथे मी लाच घेणार नाही. माझ्यासाठी विषय संपला.
दुर्जन एकगठ्ठा असतात नि सज्जन विखुरलेले हे खरं वास्तव आहे. नि वास्तव वास्तव असतं. त्याला दुर्दैव म्हणू शकता.
1 May 2013 - 7:18 pm | उपास
प्यारे काका, मी सुरुवातीलाच म्हटलं प्रतिसादात की मी निराशावादी मुळीच नाही, आणि खरे काका किंवा रेवतींनी म्हटल्याप्रमाणे इतर (पण मोजकेच..) चार जण चांगलं काम करतायत समाजासाठी, सुधारणेसाठी हे खूप छान आहे, स्तुत्य आहे, प्रशंसनीय आहे. पण एखाद्या रोगावर इलाज करायला जावं आणि तो रोग/ कीड पसरत जातेय हे दिसूण नैराश्य यावं असं काहीसं वाटतं. जशी पिढी बदलतेय तसं कामातली सचोटी, शुचिता हरवत चाल्लेय, प्रामाणिकपणा कमी होत चाल्लाय असं दिसायला लागतय. कामचुकारपणा, आळस, स्वतःच्या कामाविषयी अनास्था तसेच बेजबाबदारपणा अशा प्रवृत्ती सगळ्यांच्याच अंगात मुरायला लागल्या (जे प्रकर्षाने सरकारी नोकर्यांत दिसून येतं..) तर अशा किती खरे काकांची उर्जा ही सिस्टीम सरळ करण्यात व्यर्थ जाईल! आपली शिक्षण पद्धती (त्यात शिक्षकाही आले), टीव्ही चॅनेल्स आणि सिरीयल्सचा भडिमार, अवाजवई चढाओढ अशा अनेक कारणांमुळे 'संस्कार' कमी पडताहेत, 'पापभिरु' हा शब्दच आता नाहीसा होत चाल्ल्याने वरकमाई, लाचखोरी अशा अपप्रवृत्ती वाढताहेत.. वैयक्तिक पातळीवर तुम्ही म्हणताहेत तसं आपण करुच पण सामाजिक पातळीवर कसे करता येईल जेणेकरुन उद्याची पिढी सकस बनेल ह्याचा विचार व्हायला हवा! बस्स.. इतकच!
28 Apr 2013 - 12:51 am | रेवती
उपास यांच्याशी सहमत आहे. प्यारेश्वर, तुम्हे तेच म्हणताय जे उपास म्हणातायत. तुम्ही उल्लेख केलेले चिगो, आळश्यांचा राजा, आता खरेकाका आणि मिपामालक नीलकांतही आणखी अशी काही उदाहरणे ही लोकसंख्या, त्यातूनही असंस्कारित, अर्धसंस्कारित किंवा कुसंस्कारित लोकांना पुरी पडताना त्यांचा खरेच र्हास होतो. पूर्वी 'शहाण्याला श्ब्दाचा मार' असे म्हणत, आजही म्हणतात पण चार शब्दातून उचलायचे उपयोगी शब्द कोणते हेच लोकांना माहित नाही किंवा माहित असले तरी तसे न दाखवण्याचा माज दिसतो. तुम्ही खरेच पुरे पडू शकत नाही. तुम्ही दुसर्यांसाठी जाऊ दे, स्वत:साठीही जगू शकत नाही.
28 Apr 2013 - 1:05 am | प्यारे१
म्हणूनच वास्तव हे वास्तव आहे असं म्हणालो.
पूर्वीच्या तुलनेत आज सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, किर्ती, यश यांची अमर्यादित भूक हा विषय जास्त आहे. येन केन प्रकारेण आम्हाला ती हवी आहे. मार्ग कुठलाही असला तरी चालेल असं जे प्रकरण आहे त्या मध्ये वरच्या उदाहरणांनी दिलेला आशेचा किरण खूप महत्त्वाचा आहे.
ह्या सगळ्या मध्ये पाण्याअभावी मरत असलेले अनेकानेक मासे एकेक करत पाण्यात परत टाकताना पाण्यात परत टाकल्या गेलेल्या एकादेखील माशाचा वाचलेला जीव जास्त महत्त्वाचा. एवढंच. मी कदाचित जास्त आशावादी आहे.
एका माशाला पाण्यात टाकलेलं पाहून आणखी चार हात बरोबर येतील अशी अपेक्षा करतो आहे.
बाकी ते प्यारेश्वर म्हणजे मुन्नाभाई मधल्या सर्केश्वर सारखं वाटतं. असो.