पुढे....
मेनका अवघ्या सोळा वर्षांची अक्षत यौवना होती, आज पहिल्यांदाच इंद्रासमोर नृत्य करीत होती. नृत्य करता-करता इंद्राची तिच्या सर्वांगावर भिर-भिरणारी नजर तिच्या ध्यानात आली. याचा अर्थ ही तिला माहीत होता. अप्सरा म्हणजे स्वर्गातल्या भोगदासी, आणि अप्सरेवर पहिला हक्क सदैव इंद्राचाच. पुढे काय होणार या कल्पनेने तिचे शरीर थरथर कापत होते. नृत्य पूर्ण झाल्यावर ती इंद्रासमोर उभी राहिली मेनका तुझ्या नृत्याने मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या सौंदर्या समोर रंभा, उर्वशी ही फिक्या आहेत. आज स्वर्गाला तुझी गरज आहे बोलता-बोलता देवेंद्र क्षणभर थांबले.
अडखळत मेनका म्हणाली - आदेश द्या देवराज, मेनका देवेंद्रचा प्रत्येक आदेश पूर्ण करण्यास सदैव तैयार आहे. देवेंद्राच्या चेहऱ्यावर स्मित उमटल, तो म्हणाला, मेनका स्वर्गावर एक मोठे संकट आले आहे. अयोध्येचा दुष्टात्मा राजा सत्यव्रत, ऋषि विश्वामित्रांच्या सहाय्याने सदेह स्वर्गात येत आहे. असे झाले तर मोठे अनिष्ट होईल विश्वामित्रांच्या तपोबला समोर इंद्राचा वज्र ही व्यर्थ आहे. विश्वामित्रांची तपस्या भंग केल्या शिवाय, सत्यव्रताला रोखणे अशक्य आहे. विश्वामित्र ब्रह्मचारी आहेत. त्यांनी स्त्रीला कधी ही स्पर्श केलेला नाही. मेनका तू अजूनही अक्षत यौवना आहे आणि कुणाही पुरुषाला भुरळ लागेल, अशा सौंदर्याची स्वामिनी आहे. तू पृथ्वी वर जा आणि आपल्या सौंदर्याचा आणि बुद्धीच्या जोरावर विश्वामित्रांची तपस्या भंग कर, वर्ष भर त्यांना आपल्या सौंदर्य जाळ्यात अडकवून ठेव. वर्षभरानंतर स्वत: मी स्वत: तुला घ्यायला पृथ्वी वर येईल. स्वर्गातील देवगण तुझे सदैव ऋणी राहतील.
आपली आज्ञा शिरोधार्य मेनका म्हणाली. इंद्राने मेनकेला स्वर्गीय दुर्बिणीतून विश्वामित्र तपस्या करत होते ती जागा दाखवली. सावळ्या रंगाचे, उंच, सुंदर धिप्पाड आणि राजबिंडे विश्वामित्रांना पाहून मेनकेला स्वत:चाच विसर पडला, केंव्हा एकदाचे पृथ्वी वर जाऊ असे तिला वाटू लागले. देवराज म्हणाल, मेनका उद्या सकाळी ज्या वेळी विश्वामित्र स्नानासाठी सरयू काठावर त्या आधी तुला तिथे पोहचायचे आहे. इंद्राची आज्ञा घेऊन मेनका आपल्या घरी परतली.
मेनका अत्यंत आनंदात होती. कधी-कधी ऋषि-मुनी, तपस्वी स्वर्गात येत, इंद्र सहित देवता त्यांच्या पाया पडत, त्यांचे आशीर्वाद घेत असत. मोह-माये पासून दूर राहणार्या या तपस्वीना, देवता ही भीत असे. शिवाय तिची आई नेहमीच म्हणायची पृथ्वी वरील स्त्रियांचे जीवन अप्सरेपेक्षा निश्चित चांगले. पृथ्वी वरील स्त्री एकाच पुरुषाला यौवन समर्पित करते, त्याला विवाह असेल म्हणतात. नवरा-बायको मिळून संसार करतात. मुलांना त्यांचा आई-वडीलांचे नाव माहीत असतात. पण इथे चिमुकल्या मेनके कित्येकदा विचारले ‘माझे वडील कोण’ पण तिची आई याचे उत्तर कधीच देऊ शकली नाही. मेनका पृथ्वीवर विश्वामित्र सोबत संसाराचे चित्र रंगवण्यासाठी, स्वर्ग सुखाला लाथ मारण्या साठी तैयार होतीच. आपल्या या कृत्या मुळे विश्वामित्रांची तपस्या भंगेल याचे तिला बाईट वाटले पण पृथ्वीवर विश्वामित्रांसोबत संसार थाटण्या साठी यात गैर काय? पण सत्यव्रत स्वर्गात प्रवेश करू शकणार नाही. स्वर्गाची प्रतिष्ठा वाचेल. आपण देवेन्द्रकडून नेहमीसाठी पृथ्वीवर राहण्यासाठी आज्ञा मागीतली, तर ते निश्चित नाही म्हणणार नाही. त्या बापुडीस काय माहीत इंद्र किती उलट्या काळजाचा आहे. असो.
नेहमी प्रमाणे सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर विश्वामित्र उठले. सर्वत्र नुकत्याच उमललेल्या फुलांचा सुगंधित वायू सर्वत्र दरवळला होता. अचानक असे वसंताचे आगमन कसे झाले हा विचार क्षणभर त्यांचा मनात आला. पण क्षणातच तो झटकून दिला, लवकर स्नान-संध्या करून दिवसाच्या तपश्चर्येला सुरवात करायची होती. लवकरात-लवकर सत्यव्रताला स्वर्गात पोहचवायचे जास्त गरजेचे. किनार्यावर वस्त्र ठेवून विश्वामित्र स्नानासाठी सरयू नदीत उतरले. अचानक वाचवा-वाचवा ही आर्त आवाज ऐकू आली, विश्वामित्राने पाहीले, समोर एक स्त्री गळ्यापर्यंत पाण्यात बुडलेली होती. विश्वामित्रांना पाहताच ती जीवाच्या आकांताने ओरडली, मुनिवर मदत करा, पुष्कळ वेळा पासून माझा पाय तळाशी अडकलेला आहे, कृपया त्वरित सोडवा अन्यथा मी पाण्यात बुडेल. विश्वामित्राने परिस्थितीची गंभीरता ओळखली. त्वरित पाण्यात बुडी मारली. तळाशी अडकलेला तिचा पाय सोडविला. त्या स्त्रीत उभे राहण्या इतकेही त्राण नव्हते. विश्वामित्राने तिला दोन्ही हातानी उचलले आणि अलगद काठावर आणून ठेवले. तिचे भिजलेले आरसपानी सौंदर्य पाहून विश्वामित्रांच्या मनाची चल बिचल सुरू झाली. कसे तरी स्वत:ला सांभाळत ते म्हणाले कोण तू, इथे कशी आली.
मी स्वर्गातली अप्सरा मेनका, रात्री आपल्या सख्यांसह सरयू नदीत जल विहारासाठी आली होती. सकाळ होण्याआधी आम्हाला स्वर्गात परतायचं होत. पण ऐनवेळी माझा पाय तळाशी अडकला. सख्या मला सोडून निघून गेल्या. आज पृथ्वीवर राहण्याचा मानवाने मला स्पर्श केला आहे, आता आयुष्यभर मला इथेच राहावे लागेल. प्रजापतीने पृथ्वीवर राहणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत जे नियम बनविले आहे आता त्यांचे पालन करणे माझे कर्तव्य आहे. विश्वामित्रांच्या डोळ्याला-डोळा भिडवित मेनका पुढे म्हणाली, मुनिवर, मी अप्सरा असले तरी ही, माझे कौमार्य अक्षत आहे, आज मला वाचविण्यासाठी, आपण माझा हात आपल्या हातात घेतला आहे. ज्या क्षणी आपण मला स्पर्श केला आहे, त्या क्षण पासून मी आपल्याला पती म्हणून स्वीकारले आहे. आता आपणच माझे सर्वस्व आहात, मला आपली भार्या म्हणून स्वीकार करा. विश्वामित्र क्षणभर गांगरले, हे कस शक्य आहे, प्राण्यांचा जीव वाचविणे, हे मानवाचे कर्तव्य आहे, कर्तव्य पालनात तुला स्पर्श करावा लागला त्यात माझा काय दोष, का म्हणून मी तुला भार्या म्हणून स्वीकार करावे?
मेनका म्हणाली, परिस्थितीला विवश होऊन आपण मला स्पर्श केला आहे हे जरी सत्य असले तरी ही पृथ्वी वरील अन्य पुरुषांकरिता मी त्याज्य आहे. आई बनल्या शिवाय स्त्री जन्म सार्थकी लागत नाही. शिवाय मी आपणास पती म्हणून स्वीकारले आहे, मज पाशी अन्य कसलाही पर्याय उरलेला नाही. आपण स्वत: डोळ्यांनी पाहू शकता, कुठला ही शारीरिक रोग आणि दोष ही माझ्यात नाही, दिसायला ही मी कुरूप नाही. आपण माझा त्याग करावा असा कुठला ही दोष माझ्यात नाही. माझ्या स्त्री धर्माच्या रक्षणासाठी आपल्याला मला स्वीकार करावे लागेल. कदाचित हीच विधात्याची इच्छा दिसते.
क्षणभर थांबून तिने विश्वामित्रांच्या चेहर्यावरचे भाव वाचले. आपले बाण व्यवस्थित घाव करतात आहे हे तिच्या लक्षात आले, शेवटचा ब्रह्मास्त्र काढायला आता काही हरकत नाही असा विचार करीत ती पुढे म्हणाली, स्वामी आपण धर्मसंकटात आहात असे वाटते, मला अनुमती द्या, सरयू नदीत प्राणांत करून मी आपल्याला धर्मसंकटातून मुक्त करते.
आपल्या मुळे एका स्त्रीचा जीव जाईल, हे विश्वामित्रांच्या मनाला पटणे शक्य नव्हते. त्यांनी विचार गेला मेनका सुंदर आहे, बुद्धिमान ही वाटते, आपली भार्या बनण्यास पात्र आहे. कदाचित विधात्याची हीच इच्छा असेल. विश्वामित्र म्हणाले, मेनका आत्महत्या करणार्याला कधीच मुक्ती मिळत नाही. मेनकेच्या चेहर्यावर स्मित उमटले, आता वेळ दडवण्यात अर्थ नव्हता, स्वामी म्हणत मेनकेने विश्वामित्रास मिठी मारली. ....असो, विश्वामित्रांची तपस्या भंगली. त्यांनी मेनके बरोबर संसार थाटला.
आता आपल्या सत्यव्रताचे काय झाले. सत्याव्रताचा अर्ध्याहून जास्त प्रवास पूर्ण जाहला होता. सदूर अंतरिक्षात तो अडकून पडला. त्याला पुढे जाता येत नव्हते. अभिमंत्रित जळाच्या सुरक्षा आवरणामुळे, देवतांना त्याला खाली पृथ्वीवर ढकलणे ही शक्य नव्हते. युगे उलटली अजूनही सत्यव्रत अंतरिक्षात अडकलेला आहे. सृष्टीच्या अंतापर्यंत त्याला मुक्ती नाही. लोक आज त्याला त्रिशंकू म्हणून ओळखतात. जो दुसर्या वर विश्वासतो, त्याची त्रिशंकू प्रमाणेच गत होते. समर्थ रामदास म्हणतात
जो दुसर्यावरी विश्वासला
त्याचा कार्यभाग बुडाला.
जो आपणची कष्टत गेला
तोचि भला. (१९/९/१६)
अर्थ: समर्थ म्हणतात: जो स्वत:च्या कार्यासाठी दुसऱ्यावर विसंबून राहतो, त्याच्या कार्याचा नाश होतो, जो स्वत: कष्ट करून कार्य तडीस नेतो, तोच शहाणा समजावा.
प्रतिक्रिया
12 Apr 2013 - 10:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कथा काही अजून वाचली नाही. एक वाचक म्हणून मी शीर्षकातच गोंधळून गेलो आहे.
शीर्षक कसं सुटसुटीत पाहिजे राव, असं वाटलं.
-दिलीप बिरुटे
13 Apr 2013 - 12:44 am | कपिलमुनी
आणि बारा आण्याचा मसाला !
कथेपेक्षा शीर्षक १२ आण्याचा झालय
17 Apr 2013 - 7:21 pm | प्रसाद गोडबोले
पण कल्पना नक्कीच छान आहे .पण गोष्टी निवडताना घोळ होतो ... जुन्या गोष्टींना जुनेच रेफरन्सेस चिकटलेले असतात ...सो वेगळेच अर्थ निघु शकतात .
.
आपण स्वतःच काल्पनिक पात्रे निर्माणुन नवीन कथा/ लघुकथा करुन निरोपण करावे ... ही नम्र सुचना
|| जय जय रघुवीर समर्थ ||