तिच्या राज्ञीपदाच्या आयुष्यातला नेहमीसारखाच आजचाही दिवस.
पण आज सकाळपासूनच जीवात जीव नाही तिच्या. एकच हुरहूर लागून राहिली आहे..
तिच्या नवऱ्याला गोकुळाच्या वाटेचे वेध लागलेत. त्याची गोकुळाच्या आठवणींनी होणारी चलबिचल इतरांच्या नाही तरी तिच्या ध्यानी येते आहे.
आणि ते ध्यानी आल्यानेच ती अस्वस्थ झाली आहे.
हा गेला आणि पुन्हा 'तिचा'च होऊन राहिला तर?
त्याच्या आयुष्याच्या तळापासून भरून असलेला 'तिच्या'साठीचा जिव्हाळा तिला ठाऊक आहे.
पण आता पुन्हा.. इतक्या वर्षांनी..?
कसं रोखावं आता ह्याला? कसं सांगावं, पुन्हा नको त्या वाटांवरून चालूस?
"सुबह-सुबह का ख्याल आज
वापस गोकुल चले मथुरा राज
मथुरा नगरपति काहे तुम गोकुल जाओ?"
मग ती त्याला राजपदाची आठवण करून देतेय.
"तू सम्राट आहेस इथला. गोपाळाचा वेष उतरवलास, डोक्यावरचं पागोटं उतरवून राजमुकुट धारण केलायस.. मग आता हातातला राजदंड बाजूला ठेवून आज बासरीवर पुन्हा "ते" सूर का काढावेसे वाटतायत रे तुला?
"राज दंड छोड़ भूमि पर वाज
फिर काहे बाँसुरी बजाओ
मथुरा नगरपति काहे तुम गोकुल जाओ?"
"विरही प्रेमिकेला पुन्हा भूल पडलीय जणू? हे राजपद जणू व्यर्थ झालंय आज तुझ्यासाठी.
तू जाणार या विचाराने नगरजन व्याकूळ आहेत.. तुझ्या बेचैनीचं कारण ठाऊक नसूनही केवळ तू अस्वस्थ आहेस म्हणूनच.
त्या तुला जीव लावणार्या नगरजनांसाठी तरी नको जाऊस रे, गेलास तर इथे कुणाला करमायचं नाही.." असं विनवून बघतेय.
"पुर नारी सारी व्याकुल नयन
कुसुम सज्जा लगे कंटक शयन
रात भर माधव जागत बेचैन"
पण छे.. काहीच पटत नाही त्याला, कालच अर्ध्या रात्री सारथ्याला घेऊन कुठेसा गेला होता.. बेचैन आहे कधीचा.
रात्रीच्या शांत घटकेत नदीच्या तीरावर जाऊन गोकुळाची चाहूल घेतोय.. गोकुळाची? का.. का राधेची...
मग सरतेशेवटी ती नाईलाजाने 'तिचा' उल्लेख करते. निकराने म्हणते..
"तुझी राधा आता गृहिणी झालीय, संसार आहे तिला.. तुझ्या विरहाचे अश्रू पुसून टाकलेत तिनं.
का तिचं दुःख पुन्हा जिवंत करायचंय तुला?
का पुन्हा गोकुळात जायचंय तुला?"
"तुम्हरी प्रिया अब पूरी घरवाली..
..बिरहा के आँसू कब के पोंछ डाली
फिर काहे दर्द जगाओ
...मथुरा नगरपति काहे तुम गोकुल जाओ..?"
लोकविलक्षण नवऱ्याची असली तरी पत्नीच ती, आणि राधा झाली तरी शेवटी 'दुसरी'च ती!
त्यामुळे राधेबद्दल सूक्ष्मशी असूयाच आहे खरंतर तिच्या मनी.
पण त्याबरोबरच या पुनर्भेटीने राधेची होईल ती सैरभैर अवस्थाही एक स्त्री म्हणून जाणून आहे ती.
रुक्मिणीने राधेची घातलेली ही आणच अखेर कृष्णाच्या पावलांना थांबवतेय.
या विनवण्या पोचल्या, म्हणून की काय पुन्हा कधी कृष्ण गेला नाही गोकुळात. 'तू तो मीच आहे', हे अवघड गुज जगाला समजावून सांगणार्या कृष्णाला राधेच्या विरहावर, त्या द्वैतावर मात्र रुक्मिणीकडून समजूत घालून घ्यावी लागली.
रुक्मिणीच्या शब्दांतून त्याच्या हे लक्षात येऊन गेलं की, गतकाळातल्या आठवणींना 'आज'च्या क्षणांमध्ये आणून पुन्हा जगता येत नाही. जगूही नये.
राधा! या नावाचा अर्थच बंधनं सोडवणारी, मोकळं करणारी. आज, आत्ताच्या क्षणाला सामोरं करणारी राधा. झाल्यागेल्या गोष्टीतल्या कडू आणि गोड अनुभवातही गुंतवून न ठेवणारी राधा.
आणि तरीही अशा त्या राधेच्याच बंधनात गुरफटलेला कृष्ण.
अन् या दोघांच्या अनवट नात्याला ओळखूनही त्याला द्यायला हवा असलेला पूर्णविराम उलगडून सांगणारी रुक्मिणी.
यांची ही सुरीली कहाणी.
-------------------------------------------------------------------
ॠतुपर्ण घोषच्या 'रेनकोट' सिनेमातलं 'मथुरा नगरपती काहे तुम..' हे गाणं गेले काही दिवस ऐकत आहे. रूढ अर्थाने हे त्या गाण्याचं रसग्रहण वगैरे नाही.
तर शुभा मुद्गलचा स्थिर, स्वच्छ अन् मृदू आवाज, नुसती साथ करण्यापुरतं साधं बॅकग्राउण्ड म्युझिक, आणि त्या शांत सुरावटींनी, आशयघन शब्दांनी अलगद दाखवून दिलेले अर्थ. इतकंच आहे..
-----------------------------------------------
प्रतिक्रिया
18 Mar 2013 - 11:59 am | मिसळलेला काव्यप्रेमी
व्वाह!!
याच सिनेमातील इतरही गाणी अगदी भन्नाट आहेत. गुलजार साहेबांची ती नज्म तर माशाअल्ला!!
इनितै तु वर दिलेल्या गाण्याची MP3 कुठे मिळेल?
18 Mar 2013 - 2:07 pm | सूड
MP3 कुठे मिळेल?
18 Mar 2013 - 8:00 pm | मोदक
सूडशेठ.. MP3 माझ्याकडे आहे.
18 Mar 2013 - 12:04 pm | स्पंदना
नाही पटत मला अस प्रेम त्याजता येतं हे.
नाही अवड्त मला कृष्ण या एकाच गोष्टीसाठी.
नाही आवडत मला राधेविषयी अस वाचायला.
अन ही सारी कळ तुझ्या लिखाणाने जागृत झाली इनिगोय.
18 Mar 2013 - 12:25 pm | बॅटमॅन
आयला अवघड आहे. बिचार्या कृष्णालाही सोडू नका तुम्ही =))
18 Mar 2013 - 8:45 pm | इनिगोय
अपर्णा, हे प्रेम त्याजणं नव्हे. अट्टहासाने त्याला पूर्णत्वाला नेणं, नात्याचं नाव देणं शक्य नाहीय, हे गोकुळात असतानाच राधेलाही आणि कृष्णालाही कळलंच असणार. म्हणून मग त्याला अशा तर्हेने मनातच ठेवणं दोघांनीही स्वीकारलं असणार.
बादवे, 'राधे, पुरुष असाही असतो' ही अप्रतिम कविता वाचली आहेस?
19 Feb 2015 - 7:28 am | स्रुजा
अप्रतिम लेख ! काय सुंदर आहे. राधा कृष्णा बद्दल वाचताना नेहेमी एक हुरहुर लागते. तुझा लेख वाचताना पण काही तरी हाललं आत.
ती कविता पण टाक ना प्रतिसादात. मी नाही वाचलेली.
19 Mar 2013 - 7:49 am | प्रीत-मोहर
+१
मलाही नाही आवडत राधा-कृष्णांबद्दल अस वाचायला.
आणि कान्हा आणि राधेला त्यांचे प्रेम पुर्णत्वाला नाही जाणार हे माहित असताना तो वृंदावनात कायमचा परतेल का?
त्याला त्याच्या प्रिय व्यक्तीला भेटुन येण्याचाही अधिकार नसावा का?
18 Mar 2013 - 12:30 pm | नगरीनिरंजन
हे गाणं मलाही प्रचंड आवडतं! पण ते रुक्मिणी कृष्णाला म्हणतेय असं मला वाटत नाही.
18 Mar 2013 - 1:59 pm | सस्नेह
खरं आहे. रुक्मिणी नव्हे, तर कृष्णाचंच एक मन हे गीत म्हणतंयसं वाटतं.
19 Mar 2013 - 8:37 am | इनिगोय
तुमचं इंटरप्रिटेशनही लिहा.. इतके अर्थ निघू शकतील अशी निर्मिती करणाऱ्या कलाकाराला पोचपावतीच होईल ती.
18 Mar 2013 - 1:59 pm | आतिवास
शुभा मुद्गल यांच्या आवाजातलं गाणं म्हणजे ऐकायलाच पाहिजे - शोधते आता.
रुक्मिणीच्या भूमिकेतून केलेलं चिंतन आवडलं.
18 Mar 2013 - 2:02 pm | सस्नेह
भागवत ऐकताना ऐकले की मथुरावासी झाल्यानंतर कृष्णाने पुन्हा वृन्दावनास भेट दिली नाही.
हे एक गूढच आहे....!
18 Mar 2013 - 2:13 pm | प्रचेतस
खूप छान लिहिलंय.
बाकी त्या जयदेव कवीचं जाम कौतुक वाटतंय.
18 Mar 2013 - 2:22 pm | बॅटमॅन
डँबीस हाये वल्ली ;)
18 Mar 2013 - 2:30 pm | प्रचेतस
:D :D :D
19 Mar 2013 - 8:40 am | इनिगोय
हरेकाचा चष्मा येगळा ;-)
18 Mar 2013 - 2:21 pm | प्यारे१
>>> राधा! या नावाचा अर्थच बंधनं सोडवणारी, मोकळं करणारी. आज, आत्ताच्या क्षणाला सामोरं करणारी राधा. झाल्यागेल्या गोष्टीतल्या कडू आणि गोड अनुभवातही गुंतवून न ठेवणारी राधा.<<<
सुरेख!
>>>'म्हणूनच कदाचित ? <<< त्या राधेच्या बंधनात गुरफटलेला कृष्ण. (असं असेल ?... यो न हृश्यति न शोचति न काड्णक्षति... यो मद्भक्त स मे प्रियः)
मस्त लिहीलंय.
18 Mar 2013 - 2:25 pm | प्यारे१
अरे लिहीलेलं कुठं गेलं?
>>>'म्हणूनच कदाचित' कृष्णच तिच्या बंधनात अडकला असेल का?
( यो न हृष्यति न शोचति न कांक्षति, शुभाशुभ परित्यागी....वगैरे आणि म्हणून 'यो मद्भक्त स मे प्रियः')
18 Mar 2013 - 2:29 pm | अक्षया
"""दोघांच्या अनवट नात्याला ओळखूनही त्याला द्यायला हवा असलेला पूर्णविराम उलगडून सांगणारी रुक्मिणी.""" हे
अप्रतिम. :)
18 Mar 2013 - 3:32 pm | किसन शिंदे
सुरेख प्रकटन!
आणखी काही गाण्यांची यादी पाठवू का? ;)
18 Mar 2013 - 3:48 pm | पैसा
गाण्याचं रसग्रहण आणि त्यापलिकडे..
19 Mar 2013 - 9:11 am | मूकवाचक
+१
18 Mar 2013 - 4:27 pm | दिपक.कुवेत
आता ह्या स्पष्टिकरणासाठि तरि आता गाण एकलच पाहिजे.....एक मि. डाउनलोडच करतो. शुभा मुदगलच्या आवाजात आहे म्हणजे प्रश्नच नाहि.
18 Mar 2013 - 4:34 pm | दिपक.कुवेत
हि घे डायरेक्ट लिंक - http://www.indiamp3.com/music/index.php?action=album&id=2286 ईकडुन तु गाणं डाउनलोड करु शकतोस. छान आहे...आत्ताच एकलं
18 Mar 2013 - 7:37 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
धन्यवाद :)
18 Mar 2013 - 9:51 pm | रेवती
लेखन आवडलं पण गाणं ऐकलेलं नाही. ते ऐकून पुन्हा वाचते.
19 Mar 2013 - 2:41 am | अभ्या..
छानच लिहिलेस इन्नातै. खूप आवडले. :)
19 Mar 2013 - 5:24 am | इन्दुसुता
मी सुद्धा गाणे ऐकले नव्हते आधी कधीच.
सुंदर गाण्याची तेवढीच छान ओळख करून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. दिपक्-कुवेत यांना लिन्क दिल्याबद्दल धन्यवाद.
दोन्ही अत्तिशय आवडले... खूप दिवसांनी काहीतरी मनापासून आवडेलसे वाचायला मिळाले.
19 Mar 2013 - 6:59 am | शुचि
तरल भावस्पर्शी प्रकटन. तात्यांनी या गाण्याचे रसग्रहण केले आहे. सापडले तर देते.
19 Mar 2013 - 7:06 am | शुचि
http://www.misalpav.com/node/8109
19 Mar 2013 - 8:48 am | इनिगोय
शुचि, खोदकामाबद्दल अ.आ.. त्या धाग्याखालचे प्रतिसाद आणि क्रान्तिचा अनुवादही सरस आहे.
19 Mar 2013 - 8:24 am | यशोधरा
सुरेख लिहिलं आहे इनि.
20 Mar 2013 - 12:13 pm | साऊ
किती काव्यात्मक आहे लेखन हे.
मला प्रतिसादसुद्धा आवडले. मिसळपाव खरतर प्रतिसादांमुळेच उठुन दिसतं.
19 Feb 2015 - 5:37 am | स्पंदना
का कुणास ठाउक!!
सकाळ पासून या गाण्याची इतकी आठवण, की काय सांगू?
19 Feb 2015 - 9:58 am | विशाखा पाटील
अतिशय सुंदर गाण्यावरचा सुंदर लेख! काय कळ उठते हे गाणं ऐकतांना...