नौदलातील आयुष्य -१

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
17 Mar 2013 - 2:20 pm

मी १९८७ साली एम बी बी एस पास होऊन नौदलात कमिशन मिळवून मुंबईच्या नौदलाच्या रुग्णालयात इंटर्न शिप साठी कामावर रुजू झालो. तेथे २ वर्षे काम १ वर्ष इंटर्न शिप आणि १ वर्ष वैद्यकीय अधिकारी (सर्जन लेफ्टनंट) म्हणून काम करून जानेवारी १९९० मध्ये विक्रांत या विमानवाहू जहाजावर वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालो. विक्रांत तेंव्हा दुरुस्ती साठी कोरड्या गोदीत ( dry dock) होती. त्याचे पूर्ण दुरुस्तीकरण चालू होते. त्यामुळे तेथे वातानुकूलन यंत्रणा बंद होती सर्व ठिकाणी पत्र्यांना असलेली भोके तपासणे आणि बुजवणे चालू होते.१९६१ च्या डिसेंबर पासून पूर्ण पणे समुद्राच्या पाण्यात उभी असल्याने त्याच्या तालावर ठिकठिकाणी गंज चढलेला होता काही ठिकाणी तर आतले लोखंड पूर्ण सडलेले होते पण वर लावलेल्या रंगामुळे भोक पडलेले दिसत नसे. प्रत्येक पत्र्यावर वाळूचा मारा (sand blasting )करून त्याचा रंग काढत असत आणि जेथे जेथे भोक दिसेल तेथे तो भाग कापून नवा पत्रा weld(वितळ जोड) करीत असत. उड्डाण माळा(फ्लाईट डेक) वर असलेला न घसरणाऱ्या रंगाचा एक २ सेमी आकाराचा थर असतो. तो काढण्यासाठी त्यावर पहिल्याने लोखंडी हातोडीने ठोक ठोक ठोकतात आणि त्यात एकदा भेग पडली कि त्या भेगेत छिन्नी घुसवून परत ठोकत या टोकापासून त्या टोकापर्यंत तो रंग उखडून काढला जातो. पूर्ण जहाज लोखंडी आहे त्यातून त्यावर वापरलेल्या प्रत्येक यंत्राचा आवाज पूर्ण जहाजाच्या आत घुमत राहतो.आयुष्यात इतक्या प्रचंड आवाजाची मला कधीच सवय नव्हती त्यातून हा आवाज सकाळी ९ पासून ते संद्याकाळी ५ पर्यंत सतत असे.फक्त दुपारी १ ते २ जेवणाच्या वेळेला शांतता.म्हणून मी दुपारी १२.३० ला जेवण उरकून घेत असे म्हणजे १ ते २ या काळात थोडी झोपे घेत येत असे.जहाज गोदीत असल्याने बहुतेक विभागातील सैनिकांना सुट्टी दिलेली होती (फक्त अभियांत्रिकी विभाग सोडून).शांततेची किंमत काय असते ते मला तेंव्हा कळले. तुम्ही जेंव्हा जहाजावर राहत असता तेंव्हा २४ तास केंव्हाही पूर्ण शांतता कधीही मिळत नाही सर्व यंत्रांचा आवाज हा पूर्ण रिकाम्या लोखंडी खोलीत सदा सर्व काळ घुमत असतो.वर ठोक ठोक ठोक
गाणे ऐकले तर कसे येते --मालवून टाक दीप-~~ घुं घुंग घुंग ~~ चेतवून अंग अंग ~~~ घुं घुंग घुंग ---
मधल्या अवकाशात मशिनरीचा आवाज मिसळलेला येतो. शिव कुमार शर्मा जींच्या संतूर मध्ये सुद्धा असेच वेगवेगळे घोघाव्णारे आवाज येतात
त्यामुळे जहाजावर १२०० पैकी ४००-५०० लोक हजर होते. पण जवळ जवळ ६०० ते ७०० गोदी कामगार तेथे काम करीत असत.
गोदी कामगार हा एक स्वतंत्र विषय आहे. टाटा कन्सल्टन्सी च्या अहवालाप्रमाणे गोदीत १२००० कामगारांची गरज होती पण प्रत्यक्षात १९००० कामगार भरती केलेले होते. हे सर्व सिविलियन असल्याने त्यांना लष्करी नियम लागू नव्हते तर केंद्र सरकारी नियम होते. त्यातून त्यांची युनियन अतिशय ताकदवान होती त्यामुळे त्यांना विचारणारे कोणीच नव्हते.
विक्रांत ची सुकी गोदी वेगळी होती पण विक्रांतची खोली जास्त असल्यामुळे तिला त्या गोदीत फक्त पौर्णिमा किंवा अमावास्येच्या पूर्ण भरतीच्या वेळेतच नेता येत असे. हे त्या लोकांना माहित असल्याने ते बरोबर त्यादिवशी गैरहजर राहत. तेंव्हा त्यांच्या आदल्यादिवशीच्या लोकांना अतिरिक्त भत्ता( overtime pay) देऊन थांबवून ठेवावे लागत असे. या तर्हेची मनमानी चालत असून नौदलाला कहिअहि करता येत नसे. काही करण्याचा प्रयत्न केल्यास ते लोक लगेच संपावर जात आणि युनियन चे लोक विचारीत कि केंद्र सरकार पैसे देत आहे तर तुमच्या( नौदलाच्या) बापाचे काय जाते? पण हे फुकट चे दीड पट पैसे जात असल्याने नौदल सैनिकांचे इमान कुठेतरी जळत असे.
असो त्यावर मला तेथे सकाळी रुग्ण पाहिल्यावरही कोठेही जाता येत नसे कारण कोठेना कोठे तरी अपघात घडत असे.त्यातून गोदी कामगार दारू पिउन कामावर येणे हि नित्याची बाब होती. शिडीवर चढताना पडला पाय घसरला या गोष्टी रोज होत होत्या.
दारू न मिळाल्यास ते लोक थिनर सुद्धा पीत. त्यामुळे त्यांना उलट्या होत असत. असा एक महिना तेथे काढला
आम्हाला तेथे असलेल्या गोदीच्या दवाखान्यात रात्र पाळीच्या आपत्कालीन विभागात काम करावे लागत असे तेंव्हा एका रविवारी सकाळी तिथला सुरक्षा अधिकारी एका गोडी कर्मचारयाला वैद्यकीय परीक्षेसाठी घेऊन आला.अधिकार्याचे म्हणणे असे होते कि हा दारू पिउन कामावर आला होता.त्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याच्यावर कारवाई करायची होती.
मी १९८८-८९ मध्ये मानसिक रुग्ण विभागात व्यसनमुक्ती केंद्रात काम केले होते त्याप्रमाणे मी त्याची चौकशी केली, त्या सफाई कर्मचार्याने असे सांगितले कि साहेब मी २ पेग दारू प्यायलो हे सत्य आहे पण मी ते का प्यायलो ते ऐकून घ्या. मला तेथील गटार तुंबले होते ते साफ करण्यास सांगितले. त्या गटाराच्या आत एक कुत्रा मरून पडला होता आणि तो पूर्ण सडला होता आणि त्याला भयंकर वास येत होता. मी आत उतरून त्या कुत्र्याचे शेपूट पकडले तर ते शेपूट तुटून माझ्या हातात आले. पूर्ण कुत्रा भयंकर सडला होता त्या वासाने मला आत उलटी झाली.मी परत बाहेर आलो दोन पेग दारू प्यायलो आणि मग आत उतरलो आणि तो कुत्रा तुकड्या तुकड्याने बाहेर काढला.साहेब दारू प्यायलो नसतो तर मला हे काम करणे अशक्य होते.
आता मी त्या अधिकार्याला विचारले कि यावर तुझे काय म्हणणे आहे?
तो म्हणाला साहेब हा म्हणतो ते सत्य आहे पण हा दारू पिउन आत उतरलं आणि वर आला नाही तर माझी मान अडकली असती मी काय करू?
मला दोन्ही बाजू पटत होत्या पण मला वैद्यकिय प्रमाणपत्र तर द्यायचे होते. म्हणून मी पळवाट काढली.
मी लिहून दिले कि हा कर्मचारी दारू प्यायले असल्याचे मान्य करतो आहे परंतु तो दारूच्या पूर्ण अमलाखाली आहे असे वाटत नाही.
नरो वा कुंजरो वा याचा खरा अर्थ मला तेंव्हा समजला
क्रमशः

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

17 Mar 2013 - 2:24 pm | आदूबाळ

फार छान! पुभाप्र!

मोदक's picture

17 Mar 2013 - 2:32 pm | मोदक

वाचतोय...

पुभाप्र!

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Mar 2013 - 2:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमचे लिखाण वाचायला मजा येते. हजरजबाबीपणाचे तुमचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे.

पुभाप्र.

मन१'s picture

17 Mar 2013 - 3:00 pm | मन१

नक्की चूक काय बरोबर काय हे कळणं वास्तव आयुष्यात बर्‍याचदा बंद होतं; त्याचं एक क्लासिकल उदाहरण.

सोत्रि's picture

17 Mar 2013 - 4:07 pm | सोत्रि

सुबोध, तुमचा हा एक अनुभव म्हणून केलेल कथन मान्य आहे.

पण

साहेब दारू प्यायलो नसतो तर मला हे काम करणे अशक्य होते

हे स्पष्टीकरण तुम्हाला पटते? मला ती एक सबब वाटते.

नरो वा कुंजरो वा याचा खरा अर्थ मला तेंव्हा समजला

तुमची दारुवरची मते वाचल्याने, तुम्हाला ही सबब पटली ह्याचे आश्चर्य वाटले.

असो, आजही परिस्थीती बदललेली नाही. आज आपण तंत्रज्ञानात प्रगती केली असूनसुद्धा अशी कामे माणसाला हाताने करावी लागत आहेत आणि त्याने ती करावी अशी अपेक्षाही आहे हे अतिशय लज्जास्पद आहे.

- ('नरो वा कुंजरो वा' याचा खरा अर्थ अजुनही न समजलेला) सोकाजी

मलाही नाही पटले.मुम्बईत गटारांच्या छिद्रात माणसांना उतरवताना ती शुद्धीत आहेत,नशेच्या अंमलाखाली नाहीत हे पाहिले जाते. ते सुरक्षिततेसाठी असते हे खरे पण असे काम करताना नशेची आवश्यकता नसते असे वाटते.मुंबईतल्या रिक्शावाल्यांना तुम्ही गुटखा/मावा का खाता, ते वाईट असते असे सांगू गेल्यास हमखास असे उत्तर येते की क्या करें, यह धंदाही ऐसा है. ही अर्थात सबब असते.

सुबोध खरे's picture

18 Mar 2013 - 9:23 am | सुबोध खरे

साहेब, दारूवरची माझी मते ही बऱ्याच वर्षाच्या अनुभवानंतर आणि अभ्यासानंतर बनलेली आहेत.त्यावेळी मी एक अननुभवी(फक्त २ वर्षाचा अनुभव) डॉक्टर होतो त्यामुळे लोकांनी सांगितलेले सहज पटत असे. दुर्दैवाने मी एक नवनिर्मिती करू शकणारा लेखक नाही. याची मला जाणीव आहे म्हणून कोणताही बदल न करता प्रामाणिक पणे जसेच्या तसे लिहित आहे. त्यात माझ्या काय चुका झाल्या आणि काय बरोबर आहे ते कोणतेही समर्थन न देता लिहिले आहे.दुर्दैवाने गटारात खोल उतरून साफ करणारी यंत्रे माझ्या माहितीप्रमाणे अजूनही आपल्याकडे उपलब्ध नाहीत त्यामुळे १९९० साली कर्मचार्याने हाताने ते काम केले याला दुसरा उपाय नव्हता.आजही सफाई कर्मचार्यांची अवस्था फारशी चांगली नाही पण तो एक स्वतंत्र विषय आहे.

त्यावेळी मी एक अननुभवी(फक्त २ वर्षाचा अनुभव) डॉक्टर होतो त्यामुळे लोकांनी सांगितलेले सहज पटत असे. दुर्दैवाने मी एक नवनिर्मिती करू शकणारा लेखक नाही. याची मला जाणीव आहे म्हणून कोणताही बदल न करता प्रामाणिक पणे जसेच्या तसे लिहित आहे.

पटले, मुद्दा मान्य होण्यासारखा आहे. :)

- (समंजस) सोकाजी

रामचंद्र's picture

16 Jul 2024 - 1:21 am | रामचंद्र

पूर्वी मोठ्या लोखंडी टाक्यांमध्ये उतरून आतून एफआरपी लायनिंग करण्याच्या कामाचा थोडाफार अनुभव मी घेतला आहे. त्या कामात वापरल्या जाणाऱ्या केमिकल्सचा (रेझिन) वास इतका तीव्र असतो, की डोळे झोंबतात आणि तोंडात लगेच बुळबुळीत द्राव तयार होतो, ओकारी आल्यासारखं वाटतं पण थुंकावा म्हटलं तर परत टाकी चढून बाहेर यावं लागतं. अशा स्थितीत नेहमी काम करणारे दारूसारखे सोपे पर्याय शोधतात हे खरं आहे. बहुतेक ठिकाणी आवश्यक ती बचाव सामग्री कंपनी किंवा ठेकेदाराकडून पुरवली जात नाही हेही वास्तव आहे.

अर्धवटराव's picture

19 Mar 2013 - 12:20 am | अर्धवटराव

मला १००% पटते. अर्थात, तो कामगार नशेबाज होता कि प्रासंगीक पिणारा हे कळायला मार्ग नाहि.

अर्धवटराव

अभ्या..'s picture

19 Mar 2013 - 1:16 am | अभ्या..

दारु पिल्यावर संवेदना बोथट होतात

का तीव्र होतात? काही काही संवेदना अतीतीव्र झाल्याचे पण दिसते.
आमच्या इथला एक ऑफसेट मशीन ऑप्रेटर दिवसा तीन हेल्पर घेऊन काम करायचा पण रात्री ओव्हरटाइम असल्यास दारु पिउन कामाला यायचा (डेली पीणारा होता) एकच हेल्पर घेऊन त्याच क्वालीटीचे काम आटपायचा. अगदी एकदा हेल्परचा हात मशीनमध्ये उलटा पिरगळला जाउन तो खेचला जात असताना इतर सहकारी आरडाओरड करीत होते पण या दारुड्याने क्षणार्धात एक पहार मशीनमध्ये घालून त्याला वाचवलेले सुध्दा पाहिले आहे. दारु पिऊन मी जास्त अ‍ॅलर्ट असतो असे तो म्हणायचा, त्याने केलेले काम परफेक्ट असायचे. त्यातली त्याची मानसिकता आणि सवयीचा भाग मी डिफाईन करु शकत नाही.
फक्त हा एक अनुभव पाहिला आहे.

स्पंदना's picture

17 Mar 2013 - 4:16 pm | स्पंदना

अग आई ग्ग!
सोत्री साहेब जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे म्हणतात.

सोत्री साहेब जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे म्हणतात.

तो वंश आजही असावा का? असा माझा प्रश्न असल्याने मला ती सबब वाटते.

- (काही गोष्टी अनुवांशिक नसाव्यात अशा मताचा) सोकाजी

स्पंदना's picture

17 Mar 2013 - 4:57 pm | स्पंदना

येथे वंश म्हणजे "टु स्टेप इन वन्स शुज" असा अर्थ आहे.
नेमुन दिलेले काम खरच जर कोणत्याही यंत्राच्या मदतीशिवाय निव्वळ उघड्या हातांनी कराव लागण ही खरच फार वाईट बाब त्या सफाईकामगाराच्या बाबतीत. दिवसेंदिवस हलत नसेल डोळ्यासमोरुन ते दृश्य बिचार्‍याच्या म्हणुन त्याने घेतलेला एक नशेचा आधार म्हणा. त्याच्या बाबतीत हे जस्टीफाय होते आहे.

येथे वंश म्हणजे "टु स्टेप इन वन्स शुज" असा अर्थ आहे.

तो 'अभिप्रेत' अर्थ लक्षात आला होता. :)

त्याच्या बाबतीत हे जस्टीफाय होते आहे.

ह्या मताशी अजुनही सहमत नाही. हे जरा मृदंगासारखे होते आहे - दारुची नशा वाइट पण तिच नशा आधार होऊ शकते हे जस्टीफाय होणे.

- (नशा हा आधार होऊ शकत नाही असे मानणारा) सोकाजी

५० फक्त's picture

18 Mar 2013 - 8:15 am | ५० फक्त

मला वाटतं, कोणतंही तत्व हे तलवारीसारखं असतं, त्या धारदार पात्याच्या एका टोकाला, ते धारदार पातं व्यवस्थित हाताळता यावं यासाठी एक धार नसलेली मुठ असावी लागते, नुसत्या पात्याचा फार काही उपयोग नसतो,असो.

काही, व्यवसायांमध्ये नशेमध्ये राहणं हे क्रमप्राप्त आहे, त्याला उपाय नाही अन्यथा अगदी यांत्रिकीकरणानंतर देखील ती कामं नशा न्र करता करणं जवळपास अशक्य आहे. उदा. शवागारात काम करणे, दिवसातले आठ तास मुडद्यांच्या सहवासात तुम्ही रामरक्षा वाचुन काढु शकत नाही, आणि कोणी काढत असेल तर ती रामरक्षेची नशाच आहे.

काही, व्यवसायांमध्ये नशेमध्ये राहणं हे क्रमप्राप्त आहे, त्याला उपाय नाही

ह्यावर डॉक्टरांचे मत जाणून घेण्यास आवडेल.

- (उत्सुक) सोकाजी

धमाल मुलगा's picture

22 Mar 2013 - 10:06 am | धमाल मुलगा

पुण्यात (कारणाशिवाय) वैकुंठाला जाऊन एकदा भोसलेमामांना भेटाच. शक्यतो दुपारी दोन नंतर. ते गप्पांच्या मूडमध्ये असतील तर तुमच्या आमच्या सर्वसाधारण विचारशक्तीच्या पलिकडच्या कित्येक गोष्टींचा साक्षात्कार घडवून आणण्याची ताकत आहे त्या माणसात.

बाकी, सुबोधकाका,
वाचतो आहे. पुढील अनुभवकथनाच्या प्रतिक्षेत.

स्वगत : आमचे कर्नल रणजीत चितळे नाही दिसले बर्‍याच दिवसात ऑनलाईन. त्यांच्याही अनुभवकथनाची केव्हांचे वाट पाहतोय.

सुबोध खरे's picture

18 Mar 2013 - 8:47 pm | सुबोध खरे

सोत्री साहेब
मी दारू पिणे याचे कुठेही यात समर्थन केलेले नाही तसेच नशा हा आधार आहे असे मी कोठेही म्हटले नाही. फक्त दारू प्यायल्यामुळे संवेदना बोथट होतात हे जगजाहीर आहे. त्यामुळे असे अत्यंत घृणास्पद काम करणे कदाचित सोपे जात असावे. मेलेला आणि सडलेला कुत्रा तुकड्या तुकड्यांनी हाताने उचलून १० फूट खोलीवरून वर चढून आणणे हे फारच कठीण काम आहे. जरी डॉक्टर म्हणून आम्ही सडलेल्या प्रेताचे शव विच्छेदन केले असले तरी तो अनुभव आजही अंगावर काटा आणतो.त्या सफाई कर्मचार्याचा प्रामाणिकपणा कुठेतरी माझ्या मनाला भिडला. शेवटी डॉक्टर हा सुद्धा माणूस असतो आणि कितीही संतुलित बुद्धी असलेला माणूस असेल तरी संशयाचा फायदा हा अशा माणसाला दिला जातो आणि तसा मी तो दिला आणि त्या सफाई कर्मचार्याला कमी शिक्षा मिळावी असे मला वाटले ( आणि आजही वाटते). बरोबर कि चूक हे मला आजही माहित नाही.

पिवळा डांबिस's picture

18 Mar 2013 - 9:57 pm | पिवळा डांबिस

खरेसाहेब,
मला तुमचं म्हणणं पटलं. मी तुमच्याजागी असतो तर तुम्ही वागलांत तसाच वागलो असतो....
आणि अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर जर माझ्या दुर्दैवाने मी त्या माणसाच्या जागी असतो तर कुणास ठाऊक, त्याच्यासारखाच वागलो असतो....
:(

आजवर फारशी माहिती नसलेल्या विषयावरचं लेखन आहे तुमचं. आवडलं.

सफाई कर्मचा-याचे तुम्ही दिलेले उदाहरण विमनस्क करणारे आहे. त्याचे स्पष्टीकरण मी अनेक लोकांकडून (त्या प्रकारचे काम करणा-या, करावे लागणा-या) लोकांकडून ऐकले आहे. आपण अधिक चांगले तंत्रज्ञान या क्षेत्रात कधी वापरू शकणार हा एक प्रश्नच आहे.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

प्रचेतस's picture

17 Mar 2013 - 4:34 pm | प्रचेतस

रोचक.
पुढच्या भागाच्या प्रति़क्षेत.

दादा कोंडके's picture

17 Mar 2013 - 4:42 pm | दादा कोंडके

पुढच्या भागाची वाट बघतोय.

आयुष्यात इतक्या प्रचंड आवाजाची मला कधीच सवय नव्हती त्यातून हा आवाज सकाळी ९ पासून ते संद्याकाळी ५ पर्यंत सतत असे.

या वरूनच माझ्या उमेदीच्या काळातले काही अनुभव आठवले. त्यावेळी अनेक मोठ्ठ्या ऑटॉमोबील उत्पादन विभागात काम केलय. तिथं इंजीन चाचणी करण्यासाठी एक छोटीशी साउंड प्रूफ खोली असते (त्याला टेस्ट बेड म्हणतात). तिथं ऑटॉमेशन असलं तरीही त्यात एक माणूस असावा लागतो. तो बहुतेक ठिकाणी गावाकडून आलेला गरजू आणि शिकाउ जास्तीत-जास्त आयटीआय झालेला उमेद्वार असायचा. त्यामुळे ते युनिअन मध्ये येत नाहीत. इंधन, पाणी, धूर यांच्या नळ्यांवर लक्ष ठेवणे, त्या यंत्रावर इंजीन 'डॉक' करणे अशी कामे असतात. आणि त्या खोलीबाहेर चकचकीत ठिकाणी एक इंजिनीअर संगणकावर सगळी माहिती साठवणे वगैरे व्हाइट क्वालर कामे करत असतो.

त्या खोलीत खूपदा आम्हाला काम करावं लागायचं. प्रचंड आवाज, ट्र्याक्टरवगैरेचे प्लांट असतील तर इंजिन चालू असताना जमिनही हादरत असायची. दोन्-तीन तासातच वेड लागाची पाळी यायची. आणि काम जोखमीचं असायचं. त्या काळात प्रोपेलर शाफ्ट तुटण्याची उदाहरणंसुद्धा बघितली होती. सेफ्टीचे नियम, इअर मफ्स वगैरे प्रकरणं कागदावरच असायची (आहेत). सेफ्टी मॅनेजर्स विजीटला आली की काही नाटकं करावी लागाची. मला आश्चर्य तिथं आठ-आठ तास काम करणार्‍यांचं वाटायचं. पण नंतर लक्षात आलं की ती माणसं तिथं काम करून थोडी बहिरी झालेली होती. बहुतेकांच्या हाताला जखमा झालेल्या असायच्या (इजिनाची हाय प्रेशर (४० बार) वॉल्व निघाल्यामुळे एकाचीतर करंगळी तुटली होती). वाईट वाटायचं पण काहिही करू शकत नव्हतो. त्याकाळात त्यांना एका पाळीला आठ हजार रुपये मिळायचे. काही महाभाग तर सलग तीन पाळ्या करायचे आणि महिन्याला वीस-वीस हजार घरी पाठवायचे. आणि तीन-चार वर्षात 'म्हातारी' होउन कायम न होताच निघून जायची. परत नविन भरती सुरू.

विनोद१८'s picture

17 Mar 2013 - 6:55 pm | विनोद१८

एक उत्तम असा लेख.....
श्री.खरे तुमचे नवीन शब्द आवडले उदा. sand blasting साठी 'वाळूचा मारा', welding साठी 'वितळ जोड' व Flight Deck साठी 'उड्डाण माळा'......वगैरे.

विनोद१८

सुबोध खरे's picture

22 Mar 2013 - 10:34 am | सुबोध खरे

Flight Deck ला'उड्डाण माळा'पेक्षा जास्त चांगला शब्द कोणाला माहित आहे काय?वरील शब्द सुद्धा फार चांगले आहेत असे मला वाटत नाही. कोणी शब्दप्रभू यावर सुधारणा सुचवेल काय?

आदूबाळ's picture

22 Mar 2013 - 12:13 pm | आदूबाळ

उड्डाण फलाट? (फलाट हा सुद्धा "प्लॅटफॉर्म"चा अपभ्रंश आहे)
उड्डाण पठार?

पैसा's picture

17 Mar 2013 - 9:53 pm | पैसा

नेहमीप्रमाणेच मस्त!

मूकवाचक's picture

22 Mar 2013 - 12:17 pm | मूकवाचक

+१

फारएन्ड's picture

18 Mar 2013 - 2:45 am | फारएन्ड

पुढे वाचायची उत्सुकता आहे.

बॅटमॅन's picture

18 Mar 2013 - 2:57 am | बॅटमॅन

लेख आवडलाच!!! दादा कोंडक्यांचा प्रतिसादही तितकाच आवडला.

तुमचे लेखन आवडते. हेही आवडले. प्रसंग अर्थातच फारसे आवडण्यासारखे नसतात पण तो अपरिहार्य भाग आहे म्हणून येणारच. वाईट वाटते असे वाचून. घरोघरी काम करणार्‍या मोलकरणीही दातांना काळी राखुंडी टाईप पदार्थ फासून मगच कामाला सुरुवात करताना बघितले आहे. एकीला विचारले तर किक् बसते आणि काम झटपट होऊन जाते (म्हणजे केलेले कळत नाही) म्हणाली. सतत खरकटे, उष्टे बघून त्यांनाही कंटाळा येतच असणार. शिवाय त्यांच्या घरी फारशी बरी परिस्थिती नसते. मनाला काहीतरी चाळा हवा व त्यातून सवय लागत असणार.

आपले अनुभव कथन फार आवडते आहे.तसेच नरो वा कुंजरो वा थेअरी फार आवडली. :) बाकी नशा केल्या शिवाय काही पद्धतीची कामे करता येत नाही यात तथ्य वाटते.मेलेल्या प्राण्यांच्या शरिरातुन तसेच त्यांच्या हाडातु,चरबीतुन नकली "घी" बनवणारे असेच नशेत टुन्न असतात. त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर बेवडा मारल्या शिवाय काम करणे तभ्त्य, त्या ठिकाणी उभे राहणे शक्य नसते इतका भयानक वास त्या ठिकाणी असतो.
प्यारे१'s picture

18 Mar 2013 - 8:24 pm | प्यारे१

वेगळ्या क्षेत्रातले अनुभव वाचायला आवडले.

अवांतरः रामदास काकांची एक अपूर्ण कथा आठवली. कधी पूर्ण करणारेत कोण जाणे. :(

नेहमीप्रमाणे हाही भाग वाचनीय.

पुलेशु.

उपास's picture

18 Mar 2013 - 10:53 pm | उपास

एक शंका आहे, 'कर्मचारी दारू प्यायले असल्याचे मान्य करतो आहे परंतु तो दारूच्या पूर्ण अमलाखाली आहे असे वाटत नाही' असा निवाडा पूर्वी झाला असल्याने. दारु पिऊन काम केल्याचे कधी कधी (?) चालते, असा अर्थ लावला जाऊ शकतो, जे निस्श्चित हानीकारक आहे!
असो, पण एकंदर विचार करायला लावणारा अनुभव..

सुबोध खरे's picture

18 Mar 2013 - 11:32 pm | सुबोध खरे

दारू पिउन गाडी चालविली तरी जर त्याचे रक्तातील प्रमाण एका विशिष्ट पातळीच्या वर असेल तरच तो गुन्हा ठरतो. तसेच केवळ त्याने दारू प्याल्याची कबुली दिली तरी त्याचे प्रमाण धोकादायक पातळीपेक्षा जास्त आहे हे सिद्ध करावे लागले असते आणि म्हणूनच केवळ दारू प्यायली हा गुन्हा दारूच्या अमलाखाली असणे या मानाने सौम्य गुन्हा आहे.हा संशयाचा फायदा त्याला देण्यासाठी मी असे प्रमाणपत्र दिले

इन्दुसुता's picture

19 Mar 2013 - 6:04 am | इन्दुसुता

"आवडला लेख
पुढे वाचायची उत्सुकता आहे" असेच म्हणते.
"काही, व्यवसायांमध्ये नशेमध्ये राहणं हे क्रमप्राप्त आहे, त्याला उपाय नाही अन्यथा अगदी यांत्रिकीकरणानंतर देखील ती कामं नशा न्र करता करणं जवळपास अशक्य आहे. उदा. शवागारात काम करणे, दिवसातले आठ तास मुडद्यांच्या सहवासात तुम्ही रामरक्षा वाचुन काढु शकत नाही, आणि कोणी काढत असेल तर ती रामरक्षेची नशाच आहे>>
याच्याशी मात्र असहमत. अशी बरीच माणसे बघितली आहेत.

अमोल खरे's picture

19 Mar 2013 - 10:30 am | अमोल खरे

सुबोध खरेंनी लिहिलेला अनुभव ही एक फॅक्ट आहे. अशा ठिकाणी लोकं दारु न पिता काम करु शकत नाहीत. आपल्या दुर्दैवाने ही सर्व कामे अजुनही मॅन्युअल आहेत. त्यामुळे संवेदना मारुनच काम करायला लागते. मुंबईत जे कच-याचे डंपर दिसतात त्याचे ड्रायव्हर दारु पिऊन चालवतात असे ऐकिवात आहे. इतक्या भयंकर दुर्गंधीत गाडी चालवणे म्हणजे काय दिव्य आहे हे त्यांनाच माहित. आपल्या समोर जर तो डंपर असेल तर आपण त्याला ओव्हरटेक करुन जायचा प्रयत्न करतो नाहीतर शक्य तितके पाठी राहतो. आपली ही कथा तर जो तो डंपर चालवतोय त्याचे काय होत असेल... त्यामुळे नियम हे कधी कधी तोडावेच लागतात. आता ह्या सफाई कामगाराला दारु प्यायलाच लागली, पण अनेक व्हाईट कॉलर लोकं गंमत म्हणुन दारु पितात, ते वाईट आहे असं मला वाटतं.

सुबोध खरे's picture

19 Mar 2013 - 7:38 pm | सुबोध खरे

अमोल,
डम्पर मध्ये बसलेल्या माणसाला गाडी चालू असेल तोवर वास येत नाही त्याचा परिणाम म्हणून ते शक्य असेल तेंव्हा गाडी हळू करण्याऐवजी जोरात जाण्याच्या प्रयत्नात असतात.
डम्पर चा ड्रायव्हर इतका वेगात गाडी का चालवितो हा प्रश्न मी आमच्या मनोविकार तज्ञांना विचारला होता.
ते म्हणाले कि सफाई कर्मचारी हि सामाजिक उतरंडी मधील सर्वात तळाची पायरी आहे आणि सर्व लोक त्यांच्याकडे क्षुद्र नजरेने बघतात म्हणूनच त्यांची वृत्ती समाजाबद्दल अशी बेदरकार असते.
व्यंकटेश माडगुळकरांनी १९४६ साली लिहून ठेवले आहे कि गरिबीने माणूस एक तर लाचार तरी होतो नाही तर मुर्दाड! म्हणून हि माणसे असे वागताना आढळतात.

काही व्यवसायामध्ये नशेमध्ये राहणं हे क्रमप्राप्त आहे.
हे कदाचित अर्ध सत्य असेल.
परंतु लष्करात सरहद्दीवर गस्त घालणारे सैनिक हे अत्यंत एकाकी असे आयुष्य काढतात. त्यातून गस्त घालण्याचे काम अतिशय एकसुरी आणि कंटाळवाणे असते म्हणून त्यांचे काम तीन पाळ्यांमध्ये होते.पहिली पाळी सकाळी ८ ते १२ आणि रात्री ८ ते १२ अशी ४ + ४- आठ तासाची असते दुसरी पाळी दुपारी १२ ते ४ आणि रात्री १२ ते ४ अशी असते अनि तिसरी पाळी दुपारी ४ ते ८ आणि पाहते ४ ते ८
असते. अशातर्हेच्या पाळ्या आणि काश्मीर आणि उत्तर पंजाब सोडले तर दिवस दिवस काहीही होत नाही.अशा वातावरणात १० पास माणूस काय करू शकेल. जेथे वृत्तपत्र किंवा टीव्ही येत नाही फक्त रेडियो ऐकता येतो.संगीतारास नसलेला सैनिक काय करेल. फिरायल सुद्धा लांबवर जाऊ शकत नाही कारण ४ तासात परत जायचे असते. म्हणून काहीतरी करून वेळ घालवणे या साठी बरेच सैनिक दारू पितात. त्यांना २ पेग रम आठवड्यात तीनदा रेशन वर मिळते.
मी ओख्याला असताना अशीच परिस्थिती होती. मला स्वतःला सकाळी ८-१० रुग्ण बघितल्यावर दिवसभर काहीही काम नसे. १९८९ साली तेथे टीव्ही सुद्धा कराची चा दिसत असे. तेंव्हा केबल हा प्रकारच नव्हता.वृत्तपत्र सुद्धा अहमदाबाद वरून सौराष्ट्र मेल ने संध्याकाळी उशिरा येत असे केवळ माझी विचाराची बैठक पक्की असल्याने मी कधीही दारू प्यायलो नाही.अशा परिस्थितीत एक सामान्य सैनिक काय करेल?निदान दारूच्या निमित्ताने चार लोक संद्याकाळी एकत्र येत आणि थोड्याफार गप्पा होत आणि त्यांची थोडीफार करमणूक होत असे.
केवळ घाण काम करता म्हणून दारू प्यावी लागते हे मात्र तेवढे समर्थनीय नाही.मधुमेही रुग्णाच्या सडलेल्या जखमेतील वळवळणारे किडे चिमट्याने मी काढले आहेत किंवा अत्यंत वृद्धापकाळा मुळे शौचास झालेला खडा तुम्हाला बोट घालून काढावा लागतो. गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग असणार्या स्त्रियांची आतून सोनो ग्राफी करावी लागते. कर्करोग सडलेल्या अवस्थेत असेल तर सडलेल्या मासाचा वास हा पूर्ण खोलीत पसरतो आणि असा वास वातानुकुलीत खोलीतून जाण्यास २-३ तास तरी लागतात.आपण कितीही सुवासिक फवारा मारा वास जाता जात नाही. वरील सर्व कामे मी स्वतः केली आहेत म्हणून डॉक्टर जर दारू पिऊन काम करू लागला तर ते समर्थनीय नाही.

डॉक्टर जर दारू पिऊन काम करू लागला तर ?????

विन्ट्रेस्टींग आयडिया.....काय होईल यावर काथ्याकुट मधे काथ्याकुटायला हवा...... :)

वैशाली हसमनीस's picture

19 Mar 2013 - 2:24 pm | वैशाली हसमनीस

आपले लेखन वाचनीयच असते तसेच चिंतनीयही असते

सानिकास्वप्निल's picture

19 Mar 2013 - 4:12 pm | सानिकास्वप्निल

वाचत आहे
पुभाप्र

स्वाती दिनेश's picture

19 Mar 2013 - 6:55 pm | स्वाती दिनेश

आपले लेख नेहमीच वाचत असते,
लेख आवडला, पुभाप्र..
स्वाती

सुमीत भातखंडे's picture

25 Mar 2013 - 3:55 pm | सुमीत भातखंडे

वाचतोय आम्ही...पुभाप्र!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Mar 2013 - 4:45 pm | निनाद मुक्काम प...

माझे मत
खरे ह्यांनी कामगाराविषयी जे केले ते योग्य होते ,
मात्र सोत्री ह्यांनी तुमचे दारू विषयी मत पाहता ... असा प्रश्न विचारला
तेव्हा खरे साहेबांनी तेव्हा मी नवशिका होतो ,दारू विषयी माझी मते आता इतक्या वर्षानंतर बदलली आहेत असे लिहिले
पण त्यापुढे त्यांनी ह्या कामगारांचे हाल आज आता सुद्धा सुधारले नाही आहेत पण तो वेगळा विषय आहे ,अशी पाचार मारली ,
ह्यातून निर्माण होतो एकच प्रश्न आज इतक्या वर्षांच्या नंतर त्यावेळी खरे ह्यांनी कामगार प्रश्नी जो निर्णय घेतला तो योग्य का
जो प्रश्न अनुत्तरीत ठेवण्यात आला आहे ,
राही ह्यांनी त्यांचे मत स्पष्ट व्यक्त केले ,
पण खरे साहेब
राजकारणी माणसारखी दोन्ही बाजूने विधान करणे हे लष्करी माणसाचे काम नव्हे असे माझे स्पष्ट मत आहे ,
तुम्ही जरी नवशिके असला तरी कामगारा विषयी तुमचे मत बरोबर होते ,
व आज इतक्या वर्षांच्या नंतर तुमचे दारू बद्दल काहीही मत झाले
तरी तुम्ही कामगारांच्या काम करण्याच्या परिस्थितीत बदल झाला नाही आहे हे जे मत व्यक्त केले आहे ते योग्य आहे ,
तेव्हा आजच्या काळात सुद्धा ह्या कामगार लोकांना , काम करतांना दारू प्यावी लागते हे सत्य आहे , व आज सुद्धा तुमचे त्या कामगाराविश्यी मत तेच असावे असे मला वाटते ,
माझे वडील मुंबई महानगर पालिकेत सफाई खात्यात उच्च पदावर होते ,
त्यांच्या डोक्यावर लष्करातून थोडी आधी निवृत्ती घेतलेला बडा अधिकारी आला
व त्याने दारू न पिण्याचा हुकुम काढला
माझ्या वडिलांनी त्यांना सांगितले
साहेब तुम्ही लढाई वर जो जीवन मरणाचा अनुभव घेता तो आम्हाला तेथे जाऊन घेता येणार नाही ,पण ह्या सफाई कामगार गटारे साफ करतात ते सुद्धा रोज जीवन मरणाचा अनुभव घेतात
म्हणजे काय त्या लष्करी अधिकाऱ्याने काहीश्या अविश्वासाने माझ्या वडिलांना विचारले ,
तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांना एका गटारांच्या जवळ मेन ड्रेनेज पाईप च्या जवळ
काम करणाऱ्या सफाई कामगाराच्या येथे नेले ,
व सांगितले ,साहेब हा नक्कीच दारू प्यायला असेल
पण तुम्ही काही क्षण ह्या गटारात खाली उतरून प्रत्यक्ष पहा/
त्या अधिकार्याने सर्वांच्या समोर हे आव्हान स्वीकारले
पण असह्य दुर्गंधी व पुरेशी उपकरणे न मिळता काम करणारे कामगार पहिले ,
वर आल्यावर ते साहेब म्हणाले ,ह्यांन पुरेशी साधने का मिळत नाहीत
तेव्हा माझे वडील त्यांना म्हणाले
साहेब ,तुम्हाला लष्करात पुरेसे साधन सामुग्री मिळो. अथवा ना मिळो
काम करावे लागते .
तेथे शत्रूची गोळी खाऊन बलिदान दिले तर सत्कार होतो ,
ह्या कामगारांच्या बलिदानाला प्रसिद्धी सोडा ,पण त्यांचे निवृत्ती वेतन सुद्धा नियमित मिळत नाही ,
बलिदान ते कसे काय इति ,, बडा अधिकारी
माझ्या वडिलांनी त्यांनी चेंबूर च्या एम वॉर्डात नेउन कार्यालयातील एक फाईल दाखवली
त्यात गेल्या वर्षी अमुक एक संख्येंचे कामगार गटारात गाळ व मैला साचल्याने जो विषारी वायू तयार झाला होता ,त्याने गटारात घुसमटून मेलेल्या कामगारांची यादी होती.
ह्या कामगारांच्या अशिक्षित बायका जेव्हा निवृत्ती वेतन घ्यायला यायच्या तेव्हा
तेव्हा कागद पत्र अपुरे आहेत असे सांगून त्यांना तंगवले जाते ,
माझे वडील म्हणाले
ह्यांच्या कडून चहा पाणी घेणार्यांना मी कानाखाली मारले आहे ,
पण कितीजणांच्या मारू
त्यापेक्षा मी वाट्टेल त्या मार्गाने ही कागदपत्रे बनवतो , नियमात पळवाटा काढतो ,
पण ह्यांना निवृत्ती वेतन मिळवून देतो ,
तुम्ही म्हणता ह्यांच्यावर दारू पितात म्हणून कारवाई करू
साहेब निशब्ध
पुढे म्हणाला ही परिस्थिती बदलली पाहिजे ,
माझे वडील तेव्हा खेदाने म्हणाले आपल्या महानगर पालिकेत नगर सेवकांचे अभ्यास दौरे काढण्यात पैसा आहे , पण ह्या कामगारांना पुरेशी साधने पुरविण्यासाठी अजिबात नाही
ह्या देशात पैशासाठी असे जीवावर उदार होऊन मारणारे कामगार जो पर्यंत मिळतात तो पर्यंत माणसांच्या जीवाची किंमत नाही ,
म्हणूनच म्हणतो खरे साहेब
तुम्ही त्यावेळी जे केले ने नवशिके असला तरी योग्यच केले.

प्यारे१'s picture

29 Mar 2013 - 5:56 pm | प्यारे१

सुंदर प्रतिसाद.

निनाद भाऊ तुम्ही जे प्रत्येक विषयाच्या मुळाशी जाऊन विश्लेषण करुन सुंदर सुंदर प्रतिसाद देता त्याबद्दल आमच्या ज्ञानात भर पडत आहे.

कीप इट अप निनाद.
मस्त.

- प्यारे मुक्काम पोस्ट अल्जिरिया.

वेगळ्याच विषयावर वाचायला मिळाले. लेखन आवडले.

कर्नलतपस्वी's picture

16 Jul 2024 - 7:44 am | कर्नलतपस्वी

आवडला.
दारू प्यायल्यामुळे संवेदना बोथट होतात हे जगजाहीर आहे. त्यामुळे असे अत्यंत घृणास्पद काम करणे कदाचित सोपे जात असावे.

शंभर टक्के सहमत.
शवगृहात काम करणाऱा सफाई कर्मचारी कसे काम करत असेल याची कल्पनाच करवत नाही.

एकदा एक सैनिक ट्रेन मधून दुरवर झुडपात फेकला गेला. एक आठवड्याने लाईनमनच्या लक्षात आले. ते सुद्धा खुप वास येत होता व भटक्या कुत्र्यांची त्या काटेरी झुडपात शिरण्याची धडपड चालली होती. कोर्ट ऑफ इन्क्वेस्ट करण्यासाठी माझी नियुक्ती झाली. कित्येक दिवस जेवण जात नव्हते. तरी खुप लाबूंनच व फोटोच्या सहाय्याने काम उरकले. बाकीच्या म्हणजे पोलीस वगैरे लोकांनी कसे ते प्रकरण निसटले असेल.....