धनु राशीच्या शुक्रास पत्र -
या अप्रतिम लेखाचे स्वैर भाषांतर -
बरेच दिवस तुला सांगेन सांगेन असे म्हणत आहे - मला तू फार आवडतोस. स्वच्छंद, मनास येइल तिथे मनास येईल तेव्हा विहरणारा मनमौजी तू, या वीकेंडला एखाद्या किल्ल्यावर भटकून ये तर एखाद्या आठवड्यात कुठे फिल्म फेस्टिव्हलचाच बेत आख, क्वचित गर्दीपासून दूर वसलेल्या शांत खेड्याची सहल कर तर कुठे तळ्याकाठी पुस्तक वाचत बस. तुझ्या पायाला भिंगरी ही सदाचीच.बरं ही झाली तुझी प्रत्यक्ष केलेली भटकंती, मनाने केलेल्या प्रवासांना तर मर्यादाच नाही. तुझ्या कपाटात दर वेळेला मी नवीन नवीन पुस्तके पाहते. ऐतिहासिक, अध्यात्मिक, तत्वज्ञानाची, प्रवासवर्णनांची, कादंबर्या किती किती म्हणून सांगू. या जादुई पुस्तकांवर बसून, मनाने कित्येक देश-विदेश फिरुन येतोस तू. परक्या भाषांतील सिनेमे, संगीत हेदेखील तुझ्या खास आवडीचे. मनाने खराखुरा जीप्सी च तू, असा कसा सतत क्षितीजे विस्तारण्याच्या ध्येयाने झपाटलेला, खोल तत्वज्ञानात डुंबणारा!
जे जे उदात्त त्याचा तुला वेध. सत्यात रमणारा मस्त कलंदर असा तू. पण तुझ्यात काहीच दुर्गुण नाहीत असे काही नाही बरं का. कुठे बांधून घेणे तुला जमलय का कधी? चाकोरीचा तिटकारा असणार्या तुला एखाद्या व्यक्तीशी, जागेशी इतकच काय एखाद्या तत्वाशी एकनिष्ठ होणं अवघडच जातं. मध्ये तू सलग ३ महीने घरभाडे चुकते करण्याचे विसरलास, आणि मी विषय काढला की तू विषयांतर करायचास. जरा स्थिर हो एवढच माझं म्हणणं. तुझ्या जीवनाच्या तारुला कुठेतरी नांगर घाल, थोडा श्वास घे. पण नाही, कमिट करण्याची तुला अनाठायी भीती. मी काय म्हणते जरा एका जागी स्थिरावलास तर तुलाच तुझ्या आवडीच्या क्षेत्रांत , अधिक संधी मिळतील - जसे शिकविणे, तत्वज्ञान इतरांबरोबर वाटणे, क्षितीजे विस्तृत करणे वगैरे. स्थैर्य हे तुझ्यासाठी बंधन नाही होणार , उलट एक आकर्षक पैलूच जडेल तुझ्या मनस्वी , पक्ष्यासारख्या स्वच्छंदतेला.
तुला असलेली सच्च्या मैत्रीची आस जाणते मी. "मैत्री" - जादूभरा शब्द आहे नाही तुझ्यासाठी? असा किंवा अशी एक सवंगडी जिच्यासोबत शारीरीक, बौद्धीक, मानसिक भरारी घेत घेत तू नवे नवे प्रांत पादाक्रांत करशील. असा सखा जो ना कधी फसवेल, ना ठकवेल, ज्याला सत्याची चाड आसेल, जो जीवश्चकंठश्च असेल. ज्याला तुझ्यासमच उदात्ततेचे, महानतेचे वेड असेल.
मला कसे माहीत? अरे वेड्या भरभरुन बोलताना तूच नाही का मला सांगीतलस एके दिवशी? कोणालाही कोणत्याही परीस्थितीत, कशाही बद्दल जज न करणे हीच प्रेमाचे, संपूर्ण स्वीकाराचे लक्षण असे तूच नाही का म्हणालास? विसरलास? गुरु ग्रहाचे भाग्य तुला नेहमीच साथ देत मग ते जुगारात असो वा अगदी मैत्रीत किंवा प्रेमात. तसेही मैत्री व प्रेम या दोन भिन्न संकल्पना नाहीच तुझ्यासाठी. माझं मागणं एवढच की मानवी स्वभावातील महन्मंगलतेचा, उदात्ततेचा शोध तू असाच चालू ठेवावास. आकाशातील तार्यावर बाण सोडणार्या तुझे पाय मात्र घट्ट जमिनीवर स्थिर असावेत.
प्रतिक्रिया
1 Mar 2013 - 2:10 am | धन्या
हळुवार, मयूरपंखी, वार्याची झुळूक टाईप लेखन. भटजींना कविता लिहिता येतात हे माहिती होतं. ज्योतिषांनाही कविता लिहिता येतात हे आज कळलं. :)
जरा सिंह राशीच्या सहाव्या शुक्राबद्दल कुठे काही सापडलं तर आमच्या खवत लिंक डकवा.
1 Mar 2013 - 2:12 am | शुचि
नक्की :)
3 Mar 2013 - 2:06 pm | तिमा
मिथुन राशीतल्या सहाव्या स्थानातल्या अस्तंगत शुक्राबद्दल पण. त्यांत तो रवि, हर्षल, बुध यांच्या गर्दीत अगदी 'सँडविच' झाला आहे हो.
3 Mar 2013 - 7:06 pm | सूड
अष्टमातल्या मकरेच्या शुक्राबद्दल काय लिहीता येईल तर बघा.
3 Mar 2013 - 8:27 pm | शुचि
मलाही हवय हो ते. जवळच्या व्यक्तीचे तसे ग्रह आहेत. पण असे वाचल्याचे स्मरते की अष्टमातील शुक्र इन्टेन्सिटी देतो, तसेच सुखाचे मरण येते. जाण॑कार प्रकाश टाकतीलच.
1 Mar 2013 - 2:31 am | श्रीरंग_जोशी
ज्योतिष्याबद्दल तिटकारा असला तरी वरील लेखनातील भाषाशैली मनापासून आवडली.
1 Mar 2013 - 4:12 am | निनाद
वा मस्त उतरलं आहे पत्र.
हे वर्णन इतकं मस्त आहे की आपल्यालाही धनूचाच शुक्र हवा होता असं वाटू लागतं. :)
3 Mar 2013 - 12:52 pm | संजय क्षीरसागर
जगण्याची स्टाईल लेखाप्रमाणे आहे आणि एकही बील किंवा काम पेंडींग नाही!
3 Mar 2013 - 6:32 pm | विजुभाऊ
वृषभे जन्म/लग्न रास. दशम स्थानी शुक्र या बद्दल काही सांगाल का?
3 Mar 2013 - 9:11 pm | श्रीगुरुजी
धनू राशीचा शुक्र ७ व्या स्थानात व ५ व्या स्थानात गुरू असेल किंवा कर्क राशीचा शुक्र ७ व्या स्थानात व चंद्र ५ व्या स्थानात असेल, तर प्रेमविवाह होण्याची बरीच शक्यता असते व जोडीदार खूप चांगला मिळून वैवाहिक जीवन चांगले असते.
3 Mar 2013 - 9:20 pm | मन१
ह्यातील ज्योतिष भाग दोन मिनिटांपुरता सोडून दिला तरी स्वभावलेखन म्हनून रंजक वाटले.