कागद

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जनातलं, मनातलं
31 Dec 2010 - 9:12 am

आज लवकरच ती कामाला लागली. पोराला काखोटीला मारून आणि नायलॉनचं मळकट पोतं घेऊन ती नेहमीप्रमाणे त्या रस्त्यावर आली तेव्हा सगळीकडे कागदांचा खच पडला होता. काल संध्याकाळी तिथून गेलेल्या भव्य मोर्चात उधळलेल्या हँडबिलांनी इतरवेळी सुबक नेटका वाटणारा तो रस्ता आता मातीत खेळून आलेल्या वांड पोरासारखा दिसत होता. पोराला रोजच्यासारखं नंदूच्या टपरीच्या वळचणीला ठेवून ती भराभरा कागद गोळा करायला लागली. नेहमीपेक्षा निम्म्या वेळातच तिचं पोतं कागदांनी गच्च भरून गेलं आणि रस्ताही बर्‍यापैकी मूळ स्वरुपात आला. सगळे कागद आता संपले होते तरी ती शोधकपणे थोडा वेळ इकडे तिकडे पाहत हिंडत राहिली. बर्‍याच ठिकाणी मोर्चातल्या लोकांच्या सुटलेल्या धडक्या तुटक्या चपला आणि कंगवे वगैरे सटर फटर वस्तू पडलेल्या होत्या. ती उगिचच त्या वस्तुना पायाने एका बाजूला लोटत राहिली आणि मिळतील तेवढे तुरळक कागद गोळा करत राहिली. तास-दीड तासाने हळू हळू रस्ता जागू लागला आणि वाहनांची वर्दळ थोडी थोडी सुरू झाली. मग ती जायला वळली आणि तेवढ्यात धुळीत पडलेलं कोणाचं तरी पैशांचं पाकीट तिला दिसलं. तिचे डोळे लकाकले. आजचा दिवस तिच्यासाठी फारच चांगला निघाला होता. कोणी पाहत नाही असं पाहून तिने झटकन पाकीट उचललं आणि मग ती मागे वळून न पाहता पोतं घेऊन नंदूच्या टपरीकडे आली.

पोतं भिंतीला टेकवून ठेवलं आणि भिंतीकडेच तोंड करून तिने गुपचूप पदराआड पाकीट उघडलं. आत दहाच्या चार पाच आणि पन्नासची एक नोट होती. एवढे पैसे पाहून तर ती घबाड मिळाल्यासारखी हरखून गेली. पटकन ते पैसे तिने कनवटीला लावले आणि पाकीट दिलं पोराला खेळायला. तिने समाधानाने एक खोलवर श्वास घेतला. रोज तिला त्रास देणारा गरम बटाटेवड्याचा आणि मिसळीचा वास आज तिने आनंदाने छाती भरून घेतला. कित्येक दिवसांनी तिला आज नुस्त्या वासावर समाधान न मानता प्रत्यक्ष चव चाखायला मिळणार होती आणि तीही पोटभर खाऊन.

ती टपरीजवळ गेली आणि पाच-सहा रुपये खर्चून तिने गरमागरम वडे, पाव आणि मिसळीचा झणझणीत रस्सा घेतला. तिथेच पडलेला कालचा शिळा पेपर तिने उचलला आणि पुनः पोत्याजवळ येऊन बसली. थोडी भिंतीला आणि थोडी कागदाच्या पोत्याला असं थाटात रेलून बसून तिने पेपर खाली अंथरला आणि त्यावर खाद्यपदार्थ ठेवले. तिने मिसळ पावाचा एक घास घेतला आणि डोळे मिटून त्या चवीचा तवंग सर्वांगावर पसरताना पाहत राहिली. तिने डोळे उघडून पाहिलं तेव्हा पोरगं पाकीटात सापडलेल्या लॉटरीच्या तिकीटाशी खेळत होतं. शंभर रुपयांच्या नोटेपेक्षाही मोठं आणि रंगीबेरंगी तिकीट निरखून पाहण्यात ते गुंगून गेलं होतं. तिने त्याला हाक मारली तेव्हा त्याची तंद्री भंगली आणि आई काहीतरी खायला बोलावतेय हे पाहून हातातलं तिकीट टाकून ते आईकडे पळालं. त्याला तिने एक घास भरवला आणि दोघं एकमेकांकडे पाहून समाधानाने हसली. अंथरलेल्या पेपरमध्ये नुकत्याच टाकून दिलेल्या तिकीटाचा नंबर छापून आला आहे हे त्यांच्या गावीही नव्हतं.

(पूर्वप्रकाशित)

मुक्तकप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

काल संध्याकाळी तिथून गेलेल्या भव्य मोर्चात उधळलेल्या हँडबिलांनी इतरवेळी सुबक नेटका वाटणारा तो रस्ता आता मातीत खेळून आलेल्या वांड पोरासारखा दिसत होता.

....
रोज तिला त्रास देणारा गरम बटाटेवड्याचा आणि मिसळीचा वास आज तिने आनंदाने छाती भरून घेतला.

....
तिने मिसळ पावाचा एक घास घेतला आणि डोळे मिटून त्या चवीचा तवंग सर्वांगावर पसरताना पाहत राहिली.

अहा.... काय विलक्षण वाक्यरचना

ब्रिलियंट..

बाकी कथेतलं नाट्य तर अफलातून आहेच.. अत्यंत अत्यंत आवडले.

नेहमीच तुमचं लिखाण / कथा आवडतात खूपच.

विनायक बेलापुरे's picture

31 Dec 2010 - 9:56 am | विनायक बेलापुरे

तिने त्याला हाक मारली तेव्हा त्याची तंद्री भंगली आणि आई काहीतरी खायला बोलावतेय हे पाहून हातातलं तिकीट टाकून ते आईकडे पळालं. त्याला तिने एक घास भरवला आणि दोघं एकमेकांकडे पाहून समाधानाने हसली. अंथरलेल्या पेपरमध्ये नुकत्याच टाकून दिलेल्या तिकीटाचा नंबर छापून आला आहे हे त्यांच्या गावीही नव्हतं.
________________________________________________________________

एक माणूस प्रत्येक दगड उचलून हातातल्या लोखंडाला लावून परीस शोधत होता पण त्या यांत्रिक क्रियेमधे मधेच कुठेतरी लोखंडाचे सोने झाले होते. त्याची आठ्वण झाली.

मुलूखावेगळी's picture

31 Dec 2010 - 10:07 am | मुलूखावेगळी

छान लिहिलय

अंथरलेल्या पेपरमध्ये नुकत्याच टाकून दिलेल्या तिकीटाचा नंबर छापून आला आहे हे त्यांच्या गावीही नव्हतं.
>>> अडानि असन्यातच खरे/जास्त सुख आहे कळुन चुकलेली
--अर्धशिक्षित

मी_ओंकार's picture

31 Dec 2010 - 10:44 am | मी_ओंकार

मस्त कथा.
- ओंकार.

चाणक्य's picture

31 Dec 2010 - 11:10 am | चाणक्य

वरिलप्रमाणे

स्वाक्षरी-

शिल्पा ब's picture

31 Dec 2010 - 2:14 pm | शिल्पा ब

छान लेखन..आवडलं.

मितान's picture

31 Dec 2010 - 2:24 pm | मितान

छान ! आवडलं :)

शुचि's picture

31 Dec 2010 - 3:48 pm | शुचि

तुमचं लिखाण नेहमीच फार सुंदर असतं.

चिगो's picture

23 Feb 2013 - 4:07 pm | चिगो

प्रचंड आवडली.. अखेरच्या वाक्यात दिलेली कलाटणी तर जबराटच...

अतिशय जबरी लिखाण. कथेचा तवंग हळूहळू मनावर पसरून अखेरीस मनात शिरली कथा खोलवर !!!

लौंगी मिरची's picture

23 Feb 2013 - 11:43 pm | लौंगी मिरची

सुरेख .

अभ्या..'s picture

24 Feb 2013 - 12:02 am | अभ्या..

केवळ अप्रतिम ननि.
हि विलक्षण शब्दरचना, त्यातून एखाद्या अ‍ॅनिमेशनच्या स्टोरीबोर्डप्रमाणे व्हिजुअलाइझ होणारे कथानक आणि शेवटची ती परफेक्ट डिनुमेन्ट.
या प्रत्येकाला आणि तुम्हाला सलाम.

NiluMP's picture

24 Feb 2013 - 12:17 am | NiluMP

छोटीशीच पण लई भारी.

परिकथेतील राजकुमार's picture

26 Feb 2013 - 7:16 pm | परिकथेतील राजकुमार

ननिशेठ एकदम सुपर्ब हो.

गणपा's picture

26 Feb 2013 - 7:25 pm | गणपा

दैव देतं कर्म नेतं.. :)
लघुकथा आवडली.

शुचि's picture

26 Feb 2013 - 7:31 pm | शुचि

एवढासा प्रसंग पण काय फुलवलायत ननि!

नक्शत्त्रा's picture

27 Feb 2013 - 1:25 pm | नक्शत्त्रा

कथा आवडली.

मृत्युन्जय's picture

27 Feb 2013 - 1:30 pm | मृत्युन्जय

आयला एक चांगला धागा कसा नजरेतुन सुटला म्हणे? उत्तमच लेख. ननिंचे लेख नेहमीच चांगले असतात असे आवर्जुन नमूद करायला हवे.

रश्मि दाते's picture

27 Feb 2013 - 2:17 pm | रश्मि दाते

कथा आवडली,लीहीत राहा