सिटीबसमधले नाट्य
प्रवासी: आपलं हे एक द्या हो.
कंडक्टर (वैतागून): हे म्हणजे काय?
प्रवासी: अहो हे म्हणजे तिकीट द्या. एक सर्पोद्यान द्या.
कंडक्टर: काय नागाचा नाच बघायला चालला वाटतं?
प्रवासी: नाही हो. हे आपलं..
कंडक्टर: मग काय नागाला दुध पाजायला चाललात वाटतं?
प्रवासी: नाही नाही. तसं काही नाहीये.
कंडक्टर: मग तेथे नागाला तेथेल्या पाळणाघरात सोडायला चालले वाटतं? नाही म्हणजे पिशवी बरीच मोठी दिसतेय. गारूडी दिसताय अगदी.
(कंडक्टर "मन डोले मेरा तन डोले मेरा दिलका गया खयाल..." या चालीवर नाचतो. प्रवासीही त्यात सहभागी होतो.)
प्रवासी (भानावर येत): अहो नाही हो. मी गारूडी नाही वॉचमन आहे दुध डेअरीमध्ये. जरा काम आहे तिकडे.
कंडक्टरः अच्छा. असं आहे काय! मग हे आधी नाही सांगायच. मग काढा. चला बाहेर काढा. (प्रवासी पिशवी घट्ट पकडतो.) सुट्टे साडेबारा रूपये बाहेर काढा.
प्रवासी: मी काय म्हणतो, काही कमीजास्त नाही का होणार?
कंडक्टरः होईल ना. अपंग आहे का तुम्ही? म्हणजे लुळे, थोटे, बहीरे, मुके, आंधळे (इतर प्रवाशांकडे पाहून): काळे, गोरे, मोरे, पोरे, सोरे पुढे सरकारे!
प्रवासी: अहो, मी चांगला सरळ उभा आहे, निट बोलतो अन ऐकतो आहे? मी कशाला अपंग असणार?
कंडक्टरः तुम्हीच विचारलं होतं ना की काही कमीजास्त नाही का होणार म्हणून? बसमध्ये अपंगांना सवलत आहे हे माहीत आहे ना? चला काढा. पटकन काढा. साडेबारा रूपये काढा.
प्रवासी: तरीपण साडेबारा रूपये जरा जास्तच होतात हो. काहीतरी कमी नाहीच होणार का?
कंडक्टरः काय राव, तुम्ही काय मंडईत आहात काय भाजीपाला घ्यायला?
प्रवासी: तसं नाही हो. म्हणजे बघा, महागाई किती वाढलीये. दुध ४५ रूपये लिटर झालं आहे. (रडवेला होत) पेट्रोल डिझेल कितीतरी महाग झालंय. (आणखी रडक्या सुरात) शाळेची फी वाढलीये. टेलरची शिलाई वाढलीये. (आणखीनच रडवेला होत) कटींगचे दर वाढलेय. (अगदीच रडक्या सुरात) सांगा आता सामान्य माणसाने कसं जगायचं या असल्या महागाईत.
कंडक्टर (रडका अभिनय करत रडवेल्या सुरात): नका हो नका रडवू असं. मी पण तुमच्यासारखाच सामान्य आहे. तरीपण महागाई वाढल्यानेच तिकीटाचे पैसे कमी होणार नाही म्हणजे नाही.
प्रवासी: बरं राहीलं. मग असं केलं तर..
कंडक्टर (बोलणे तोडत): नुसते प्रश्न विचारू नका. पटकन पैसे काढा. अन कमी असतील तर जवळचे तिकीट देतो. अन नसतीलच तर बस थांबवतो. उतरून घ्या. बोला काय करू? तिकीट काढता की बस थांबवू?
प्रवासी: नाही हो. आताच मी कलेक्टर कचेरीत गेलो होतो कामाला. तेथून बसमध्ये बसतांना माझे पाकीटच मारले गेले. खिशात फक्त पाच रूपये राहीले बघा. त्यात काही जमतय का?
कंडक्टरः हे पहा, बसच कमीतकमी भाडं सात रूपये आहे. अन तुम्ही बारा वर्ष पुर्ण केलेले वाटत आहात. अपंग वैगेरेही नाहीत. म्हणजे सवलतीचे तिकीटही नाही. मी बस थांबवतो. तुम्ही येथेच उतरुन घ्या. (ड्रायव्हरला ओरडून सांगतो: ओ रामभाऊ, बस थांबवा हो!) काय कटकट आहे. खिशात पैसे नाहीत अन चालले सर्पोद्यानात.
प्रवासी (बसमधून उतरून): चला, आपल्याला थोडेच सर्पोद्यानात जायचे होते? अन ह्या मारलेल्या पाकीटात काय आहे बघू जरा. (चोरलेले पाकीट पाहतो. अन एक एक बिनकामाच्या वस्तू फेकून देत देत बोलतो) ही किराणामालाची यादी. (फेकतो) अगदीच मध्यमवर्गीय दिसतोय. हं हे एलआसीच्या हप्त्याची यादी. (फेकतो) हे पाचशे रूपये. ही आपली कमाई. (बाकीचे पाकीट फेकून देत बोलतो) चला आजचा धंदा झाला अन फुकटात प्रवासही घडला.
प्रतिक्रिया
4 Feb 2013 - 6:30 am | जेनी...
कंडक्टर रामभाऊ ला ओरडुन बस थांबवायला का सांगतो ??
कारण कंडक्टर मोस्ट्ली डबल बेल मारतो बस थांबवायची असेल तर ...
बाकि ठिक आहे ...
4 Feb 2013 - 6:39 am | पाषाणभेद
>>> कंडक्टर रामभाऊ ला ओरडुन बस थांबवायला का सांगतो ??
कारण या प्रसंगात नेहमीचा स्टॉप किंवा नियमीत प्रवाशांची चढउतार नाहीये. कंडक्टर वैतागलेला आहे. अशा प्रसंगात ड्रायव्हरचे लक्ष बसमध्येही असते. बारीक निरीक्षण करा (बसमध्ये प्रवास करत असाल तर. :-) )
>>> कारण कंडक्टर मोस्ट्ली डबल बेल मारतो बस थांबवायची असेल तर ...
थांबायसाठी डबल नाही हो सिंगल असते बेल. बारीक निरीक्षण करा (बसमध्ये प्रवास करत असाल तर. :-) )
कूणी सांगायच्या आधीच मी समजावले आहे. असो. आनंद घ्या.
4 Feb 2013 - 6:50 am | जेनी...
तेच हो ... लक्षात नाहि आलं डबल कि सिंगल ते ... ( विसरली मी :( )
पण माझा प्रश्न होता कि बेल न मारता ओरडतो का ??
उत्तर मिळालं :)
आभार :)
4 Feb 2013 - 6:37 am | स्पंदना
नाटक! नाटक!! नाटक!!!
4 Feb 2013 - 7:16 am | अत्रुप्त आत्मा
ऑफ बीट पा.भे. ;-)
5 Feb 2013 - 7:11 pm | पैसा
किश्शाचे नाटक आवडले!
5 Feb 2013 - 7:16 pm | शुचि
मनोरंजक!
5 Feb 2013 - 7:30 pm | बाबा पाटील
पण नाटकाचे तिन्ही अंक सादर व्हायला हवेत......
5 Feb 2013 - 8:14 pm | लीलाधर
व्वा पाभे छानच की ओ