बोधकथा लाकूडतोड्याची

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
16 Nov 2007 - 7:04 am

मिसळपावावर येत असलेल्या सूक्ष्म/दिर्घ वगैरे कथा, पीजे वाचून एक जुनी ऐकलेली गोष्ट आठवली, जरा चढवून लिहीत आहे...

विक्रमादित्याने हट्ट सोडला नाही. त्याने झाडाजवळ जाऊन वेताळास खांद्यावर घेतले आणि परत मौनव्रतात पादक्रमण करू लागला. वेताळ विक्रमादित्यास परत पाठीवर उताणा पडलेल्या अवस्थेत राहून गोष्ट सांगू लागला...

देव प्रसन्न झाल्यामुळे सुखाने राहात असलेल्या लाकूडतोड्याच्या बायकोने आपल्या नवर्‍यास (म्हणजे त्याच लाकूडतोड्यास) कुर्‍हाड पडलेली आणि देव प्रसन्न झालेली विहीर दाखवण्याचा हट्ट केला. लाकूडतोड्या पण मोठ्या गर्वाने तिला घेऊन गेला. बायको आपल्या नवर्‍याचा प्रामाणिकपणा कौतुकाने बघण्याच्या नादात विहीर किती खोल आहे ते वाकून पाहू लागली. आणि काय, बाजूच्या झाडावर पाठमोर्‍या बसलेल्या लाकूडतोड्यास डुबूक असा जरा मोठा आवाज आला. कसला म्हणून बघायला जातो तर काय बायको विहीरीत पडल्याचे लक्षात आले. त्याने परत एकदा भोकाड पसरले.

जंगालातील देवाच्या लक्षात आले की हा तर आपल्या लाडक्या लाकूडतोड्याचा तोच भसाडा आवाज. त्याने येऊन विचारले, बाळा रडू नकोस, काय झाले ते सांग. लाकूडतोड्याने रडत रडत विहीरीत बायको पडल्याचे सांगीतले. देव म्हणाला काही काळजी करू नकोस. तात्काळ अंतर्धान पावून त्याने विहीरीत जाऊन वरती आणली. लाकूडतोड्याने बघितले तर काय ही कोणीतरी स्वर्गीय सुंदरी, आपली बायको नाहीच! पण तसे काही न म्हणता तो म्हणाला की हीच माझी बायको!

देवाला राग आला आणि म्हणाला की कुठे गेला तुझा प्रामाणिकपणा? स्वर्गातील मेनकेस तू सरळ "तीच माझी बायको" म्हणालास? थांब मी तुला आता या वेळेस शापच देतो. तशी शापवाणी उच्चारणार इतक्यात लाकूडतोड्या घाईघाईत ओरडला, थांब देवा, माझे ऐकून तरी घे...!

एव्हढी गोष्ट सांगून वेताळ थांबला आणि म्हणाला की असे काय लाकूडतोड्याला सांगायचे होते? तो स्वत:चे परस्त्री बद्दलचे आकर्षण कसे देवापुढे समजावून सांगणार होता? बरोबर उत्तर दिलेस तर ठीक, नाहीतर तुझ्या डोक्याची हजार शकले करीन.

विक्रमादित्य म्हणाला, सोपे आहे, "गेल्या वेळेस देवाने प्रसन्न होवून तीनही कुर्‍हाडी लाकूडतोड्यास भेट दिल्या. त्याला बिचार्‍याला यावेळेस काळजी वाटली असेल की यावेळेस पण देवाने जर तीन स्त्रिया (त्यातील एक धर्मपत्नी) भेट म्हणून दिल्या, तर प्रपंच या महागाईच्या दिवसात कसा चालवायचा?" पुढे विक्रमादित्य म्हणाला की मला खात्री आहे की देव त्याच्या या उत्तराने प्रसन्न झाला असेल, पण पुढे काय झाले असेल याची मात्र मला उत्सुकता आहे".

वेताळ प्रसन्न झाला आणि म्हणाला, " बरोबर विचार केलास. या काळात तुला पण एकच राणी ठेवणे जास्त योग्य ठरेल. पण ते असो, तो तुझा प्रश्न..." देव लाकूडतोड्यावर प्रसन्न झाला आणि म्हणाला, "अगदी योग्य व्यवहारी विचार केलास. शाब्बास! अरे वत्सा ही तुझीच बायको आहे फक्त तिचे मी तात्पुरते रूप बदलले होते. जा, आता ही मूळ रूपात आली, आता तुम्ही घरी जा आणि सुखाने संसार करा!".

वेताळ पुढे म्हणाला की लाकूडतोड्या बिचारा (तरीही) खूष झाला पण घरी गेल्यावर "मी होते ते ठीक. पण ते माहीत नसताना, दुसर्‍या बाईबरोबर व्यवहाराच्या नावाखाली जायची हिंमत कशी केलीत, म्हणून मार पडायचा तो पडलाच!"

एव्हढे सांगून विक्रमादित्याचे मौन मोडल्याच्या खुषीत वेताळ परत झाडावर जाऊन लटकला. विक्रमादित्य मात्र आपले घरी काय होणार या काळजीत परत एकदा वेताळाच्या मागे गेला...

कथाबालकथाविरंगुळा

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

16 Nov 2007 - 10:43 am | आनंदयात्री

जमली आहे. लिहित रहा.

-(वाचक) आनंदयात्री

विसोबा खेचर's picture

16 Nov 2007 - 10:47 am | विसोबा खेचर

कथेची भट्टी काय एवढी जमली नाय, असं माझं मत! राग नसावा...

तात्या.

ध्रुव's picture

16 Nov 2007 - 12:28 pm | ध्रुव

पण कथेपेक्षा विनोदच वाटला मला. राग नसावा.
--
ध्रुव

विसुनाना's picture

16 Nov 2007 - 1:02 pm | विसुनाना

ही कथा पूर्वी वाचल्याचे स्मरते. :)कदाचित तसे नसेलही. देजा वू!

विकास's picture

16 Nov 2007 - 5:45 pm | विकास

अहो ही फक्त मी येथे थोडासा फेरफार करून आठवणीतून उतरवली आहे. तुम्ही पहीले वाक्य पाहीले नाहीत...

>>>मिसळपावावर येत असलेल्या सूक्ष्म/दिर्घ वगैरे कथा, पीजे वाचून एक जुनी ऐकलेली गोष्ट आठवली, जरा चढवून लिहीत आहे...