शाळेत असताना ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ‘ असे कुठेतरी वाचले होते. हे वाचून मी (माझ्या)लहानपणी कोणत्याही बारशाला गेले किंवा नवीन बाळ झाले आहे, अशा घरी गेले, की पाळण्यातल्या बाळाचे पाय पाहण्याचा प्रयत्न करीत असे. पण ते बेटे दुपट्यात लपेटून इतक्या बंदोबस्तात ठेवलेले असत की त्यांचे नखही पाहायला मिळत नसे. एकवेळ शनिवारी संध्याकाळी देवळातल्या मारुतीच्या पायाचे दर्शन होणे सोपे, पण पाळण्यातल्या बाळाचे पाय ? नाव नको !
पुढे पुढे, ती एक म्हण आहे अन त्याचा अर्थ, बाळ मोठेपणी कोण होणार ते समजते, हे समजले.
तसेही अलीकडे पाळणे बघायला मिळणे कठीणच. त्यामुळे अलीकडच्या बाळांचे पाय कशात पहावे, हे समजत नाही. यावर बरेच डोके चालवले. ते ठप्प झाल्यावर संगणकाचे डोके गुगलवले. अन त्यातून एक भन्नाट आयडिया आली.अलीकडे आंजावर प्रश्नावल्यांची भलतीच चलती आहे. तुम्ही कोण होणार किंवा कशात यशस्वी होऊ शकता हे सांगण्यासाठी आता कुणा ज्योतिषाकडे जाण्याची मुळीच आवश्यकता नाही. फक्त दहा प्रश्नांची उत्तरे द्या. मग तुम्हीसुद्धा ठामपणे सांगू शकाल, आपण कोण होऊ शकू ते.
हे दहा प्रश्न म्हणजे तुमच्या आमच्या रोजच्या जीवनात बरेचदा ओढवणारे काही अवघड पेचप्रसंग आहेत, की ज्यावर प्रत्येकाची स्वाभाविक प्रतिक्रिया वेगवेगळी असेल. त्या प्रतिक्रियांवरून तुमचे स्वभावविशेष दिसून येतात अन त्यावरून तुम्हाला तुमचे पाय कोणत्या पाळण्यात आहेत, ते स्पष्ट दिसेल.
या पेचप्रश्न-प्रसंगांच्या खाली काही पर्याय दिले आहेत. त्यातला एक तुमचा पर्याय तुम्ही निवडायचा आहे. अन मग त्यांचा सारांश काढायचा आहे. कृपया आम्हाला व्यनी वैग्रे करू नये.
पे. प्रसंग. क्र. १
तुम्ही एक धोपटमार्गी हापिसकर आहात. इमाने-इतबारे चाकरी करण्याची तुमची किमान तीन पिढ्यांची परंपरा आहे. पण काल कसे कोण जाने, हापिसात तुमच्या हातून झालेल्या चुकीमुळे कस्टमरला १०००० रु. चे जादा बिल गेले आहे, हे (कस्टमर सेलफोन मधून बोंबलल्यामुळे) बॉसच्या नुकतेच लक्षात आले आहे. तुम्हाला बॉसचा ‘प्यारभरा बुलावा’ आला आहे. तुम्ही काय कराल ?
अ] मुखस्तंभ बनून जे होईल ते बघत राहाल.
ब] धीटपणे आपली चूक स्वत;हून कबूल कराल व मिळेल ती पनिशमेंट मुकाट्यानं भोगाल.
क] घडलेल्या चुकीला तुमच्या इम्मिजिएट वरिष्ठ कसा जबाबदार आहे हे बॉसला सयुक्तिकपणे पटवून द्याल.
ड] ती ‘चूक’ नसून १०००० रु. चा जादा माल कस्टमरच्या गळ्यात घालण्याची संधी आहे हे मोठ्या खुबीने बॉसच्या निदर्शनास आणून द्याल.
इ] सांगता येत नाही.
पे. प्रसंग. २
तुम्ही आयडियल पती आहात. तुम्ही नुकतेच बाजारातून आणलेल्या भाजीचा ढीग सौ. समोर ओतला आहे अन शिळी, किडकी, जून इ.इ. भाजी आणल्याबद्दल सौभाग्यवती तुमची खरडपट्टी काढत आहे. तुम्ही काय कराल ?
अ] टीव्हीकडे डोळे लावून ‘तुका म्हणे उगी राहावे..’ हा श्लोक मनात म्हणत स्वस्थ बसाल.
ब] आपल्याला चांगली भाजी आणण्याचं समजत नसल्याचे कबूल करून उपाशीपोटी झोपाल.
क] आज बाजारात सगळाखराबच भाजीपाला आल्याचे सौ.ला मोठ्या खुबीने पटवून द्याल.
ड] सौ.पेक्षा वरची पट्टी लावून, कोंड्याचा मांडा करण्याचे स्त्रीजातीचे कौशल्य दिवसेंदिवस कसे लुप्त होत चालले आहे, याबद्दल घोर खंत व्यक्त कराल.
इ] सांगता येत नाही.
पे. प्रसंग. ३
प्र. २. मध्ये तुम्ही सौ. आहात व खराब भाजी आणल्यामुळे पतीदेवाला उभे चिरावे कि आडवे असा विचार करत आहात. आज पिक्चरला जायचा बेत , सडक्या भाज्या स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवण्यात जाणाऱ्या वेळामुळे वाया जाणार आहे हे तुम्हाला पक्के कळून चुकले आहे. तुम्ही काय कराल ?
अ] समोर आलेल्या भाजीचे मुकाट्याने ‘बाळंतपण’ कराल.
ब] पतीदेवाच्या कानीकपाळी ओरडून संताप व्यक्त कराल.
क] ‘तुम्हाला काहीच कसे कळत नाही’ हे शांतपणे व खुबीने पतीच्या मनावर ठसवाल.
ड] खराब भाजीचे भांडवल करून आज कोपऱ्यावरच्या ‘ला-फ्रान्का’ मध्ये सामिष मेजवानी पदरात पाडून घ्याल.
इ] काही आयडीया नाही.
पे. प्रसंग. ४
दुकानातून हौसेने स्वपसंतीने आणलेला शर्ट घातल्यावर तुम्ही (आणखीनच) ‘बाळू’ कसे दिसता, हे मित्रवर्गाने पटवून दिल्याने तुम्ही शर्ट बदलून आणण्यासाठी दुकानात गेला आहेत. दुकानदार ‘एकदा विकलेला माल बदलून मिळणार नाही’ या निर्देशकाकडे तुमचे लक्ष वेधून आघाडी वर ठामपणे उभा आहे. तुम्ही काय कराल ?
अ] दुकानदाराने शर्ट बदलून देण्याची कृपा केली तरच तो बदलून आणाल.
ब] दुकानदाराने बदलण्यास नकार दिल्याबद्दल भांडण काढाल.
क] या दुकानात हलक्या प्रतीचा माल मिळतो हे दुकानातील इतर ग्राहकांच्या मनावर ठसवाल.
ड] हा शर्ट बदलून मिळाल्यास संध्याकाळी इतर मित्रांना घेऊन दुकानात खरेदीसयेण्याची दुकानदारास खात्री द्याल.
इ] नक्की सांगता येत नाही.
पे. प्रसंग५
तुम्ही यष्टी बसचे सन्माननीय प्रवासी आहात. तिकीट देऊन तुमचा प्रवास अधिकृत करण्यासाठी अन तुम्हाला उपकृत. करण्यासाठी कंडक्टरमहाशय तुमच्यापाशी येताच तुमच्या लक्षात येते की आपल्याकडे फक्त रु. ५०० च्याच काही नोटा आहेत अन तिकीट रु. ३८ फक्त आहे. आधीच्या बहुतांश तिकीटखरेदीकर्त्यांनी ५०० च्या नोटा दिल्यामुळे कंडक्टर महाशयांचे पित्त खवळले आहे. तुम्ही काय कराल ?
अ] कंडक्टरने सुटे दिले तर घ्याल नाहीतर त्याची मुक्ताफळे निमुटपणे स्वीकाराल.
ब] कंडक्टरला नम्रपणे सौजन्याने वागण्याची जाणीव करून द्याल व सर्व प्रवाशांना सुटे पैंसे वाटून देण्याची सुचना कराल.
क]कंडक्टरच्या वरची पट्टी लावून सुटे पैंसे देणे हे त्याचे कर्तव्य कसे आहे हे सांगाल.
ड] मागच्या खिशातून हळूच पन्नासची नोट काढून कंडक्टरच्या हातात ठेवाल.
इ] काही सुचत नाही.
पे. प्रसंग. ६
तुम्ही सासुरवाडीला एका लग्नाला गेला आहात. पत्रिकेत ठळक चौकटीत ‘कृपया आहेर अथवा पुष्पगुच्छ आणू नयेत.’ असे छापले असल्याने तुम्ही हात हलवतच गेला आहात. तिथे जाऊन पहाता तर भेटवस्तूची बॉक्से अन पाकिटे हातात घेतलेल्या लोकांची लाईन स्टेज च्या खालीपर्यंत आली आहे. तुम्ही काय कराल ?
अ] मागच्या पावली परत जाऊन पानाचे दुकान शोधून पाकीट पैदा कराल व मंडपात पुन्हा प्रवेश कराल.
ब] लायनीला बायपास करून थेट जेवणाच्या हॉलकडे कूच कराल.
क] आपले पाकीट मारले गेले असल्याचे चातुर्याने लग्नमंडपात जाहीर कराल.
ड] सर्वात मोठा बॉक्स ज्याच्या हातात आहे, त्याच्या जवळ उभे राहून अदबीने बॉक्स आपल्या हातात घ्याल व त्याच्याशी बोलत बोलत लाईन पार कराल. (बॉक्स हातात धरून फोटो काढून घेण्यास विसरणार नाही.)
इ] घरी परत जाल.
पे. प्रसंग. ७.
भर रहदारीचा रस्ता. पुढच्या टॅक्सीने अचानक ब्रेक दाबल्यामुळे तुम्ही कारचे ब्रेक जीव खाऊन दाबले आहेत. परिणामी, मागून येणारा क्वालिसचे नाक प्रेमळपणे तुमच्या कारच्या पृष्ठाभागाला येऊन चिकटले आहे. क़्वालिसवाला खाली उतरून तुंबळ वाक्युद्धाच्या तयारीत तुमच्याकडेच येतो आहे. तुमच्या कारमधील घड्याळ हापिसची वेळ भरत आल्याचे तुम्हाला वाकुल्या दाखवून सांगते आहे. तुम्ही काय कराल ?
अ] कर थांबवून क़्वालिसवाल्याची मुक्ताफळे मुकाटपणे ऐकून घ्याल.
ब] सुमारे १० मिनिटे खर्च करून क़्वालिसवाल्याला, समोरच्या टॅक्सीवाल्याची चूक समजावून सांगाल अन उशीर झाल्याबद्दल हापिसात जाऊन बॉसची शेलकी मुक्ताफळे आनंदाने खाल.
क] क़्वालिसवाला तुमच्यापर्यंत पोचण्याच्या आत सेकंड टाकून फरार व्हाल.
ड] क़्वालिसवाल्यावरच जाळ काढून कारच्या तडा गेलेल्या इंडिकेटर बद्दल नुकसानभरपाई मागाल.
इ] सांगता येत नाही.
पे.प्रसंग क्र.८.
सुप्रभातीची वेळ. चहाचा समाचार घेऊन झाल्यावरही न संपलेल्या पेपरातल्या समाचारांचा मोह सोडून तुम्ही पाच मिनिटात अंघोळ आटपण्याच्या इराद्याने, व्हेटो वापरून इतर सर्व अंघोळेच्छूना डावलून बाथरूममध्ये घुसला आहात. आपल्या मुलायम (?) कंठाने भीमसेन जोशींचाचुराडा करता करता एकीकडे सर्वांगावर साबणाचा मुलामा फासत आहात. सगळीकडे यथास्थित साबण फासून होताक्षणीच तुमच्या लक्षात येते की, नळाच्या पाण्याने राम म्हटला आहे. तुम्ही काय कराल ?
अ] शांतपणे सर्व साबण टॉवेलने पुसून बाहेर याल अन शहाण्या चाकरमान्याप्रमाणे वेळेत ऑफिस गाठाल.
ब] अवेळी पाणी संपवल्याबद्दल अपार्टमेन्टच्या यच्चयावत मेम्बराना शिव्या घालून कुणीतरी मोटर सुरु करून पाणी येईपर्यंत त्यांचा उद्धार करत रहाल.
क] मघाशी व्हेटो वापरून हुसकावून लावलेल्या मेंबरांची मनधरणी करून राखीव पाणीसाठा उपलब्ध करून घ्याल व आपला कार्यभाग साधाल.
ड] मागेच अक्कलहुशारीने बसवून घेतलेल्या लॉफ्ट टँकची बाथरूममधली गुप्त कळ फिरवून काम साधाल.
इ] बंद दाराआडून इतरांचा सल्ला घ्याल.
पे. प्रसंगक्र. ९
पंच पंच उष:काली तुम्ही कंपनीच्या होऊ घातलेल्या सेमिनारसाठी खचाखच भरलेल्या जनरल हॉलमध्ये नजर अन अंग चोरून प्रवेश करत आहात. चोराचोरीचे कारण म्हणजे परटाकडे इस्त्रीला दिलेला आकाशी शर्ट अन नेव्ही ब्लू पँट काल संध्याकाळी आणायचे विसरल्यामुळे तुमचा ड्रेस कोड बोंबलला आहे. सेमिनारच्या प्रारंभीच कंपनीच्या नवीन प्रॉडक्टच्या इंट्रोडक्शनची कामगिरी तुमच्यावर सोपवलेली आहे. तुम्ही काय कराल ?
अ] सर्व ड्रेसकोड-धारी उपस्थितांसमोर उभे राहून व त्यांच्या भोचक नजरांना स्थितप्रज्ञाप्रमाणे तोंड देऊन तुमच्यावर सोपवलेली जबाबदारी धैर्याने पार पाडाल.
ब] भाषणाच्या सुरुवातीला, ड्रेसकोडमध्ये नसल्याबद्दल दिलगिरी व्यक्त कराल अन कुत्सित नजरांचे धनी व्हाल.
क] आल्या आल्या प्रथम,काल रात्री घरी चोरी झाल्याचे व त्यात इतर कपड्यांसहीत युनिफॉर्मही चोरीला गेल्याचे बॉसच्या कानावर घालाल.
ड] आपल्या इतरांपेक्षा वेगळ्या ड्रेसचे उदाहरण देऊन नवीन प्रॉडक्ट इतरांपेक्षा कसे वेगळे आहे याची ही झैरात असल्याचा बहाणा करून हा मुद्दा सुरुवातीलाच खुबीने निकालात काढाल.
इ] सांगता येत नाही.
पे. प्रसंगक्र. १०.
तुम्ही उत्साही व हौशी नवमिपाकर आहात. गेल्याच आठवड्यात तुम्ही दोन ‘फोटोमात्र’ , एक तीनोळी अन एक एकोळी धागे टाकले आहेत. (त्यापैकी एकोळी धागा एकाएकी अदृश्य झाला आहे.) तुम्हाला डायऱ्या भेट मिळू लागल्या आहेत अन संपादकांच्या साखरवेष्टित खरडी येऊ लागल्या आहेत. कालच्या रविवारी तुम्ही ज्या ढाब्यात जेवण करून संध्याकाळ सार्थकी लावली, त्याचे खान्यासहित फोटो तुमच्या क्यामेऱ्यात अन ते मिपावर टाकण्याची उर्मी तुमच्या मनात उड्या मारीत आहे. तुम्ही काय कराल ?
अ] जाणून बुजून बाजार उठवल्याबद्दल डायऱ्यावाल्यांची तक्रार संपादकांकडे नोंदवाल.
ब] बाजारवाल्यांना सडेतोड उत्तरे द्याल.
क] सर्व डायऱ्यावाल्यांना फाट्यावर मारून नवीन धागा अपलोडवाल अन नवीन बाजार बघत बसाल.
ड] बाजार शांत बसण्याची वाट बघाल व तोपर्यंत बाजारवाल्यांना गोग्गोड प्रतिसाद अन संपादकांना लाडिक खरडी करत रहाल.
इ] मिपाच्या नावाने मनातल्या मनात शिमगा करून सदस्यत्व रद्द कराल.
प्रश्न प्रसंग संपले. पर्याय निवडून झाले असतील तर आता ते एकत्र करा अन खालील निकालपत्र दिल थामके वाचा.
१) ५ किंवा अधिक ‘अ’ : तुमच्या सरळ अन बाळबोध बुद्धीला तोड नाही. तुम्ही एक उत्तम चाकरमानी हापिसकर बनू शकाल. अगोदरच असाल, तर मार्ग सोडून कुठेही जाऊ नका. इथेच अधिक यशस्वी व्हाल.
२)५ किंवा अधिक ‘ब’ : तुमच्या ‘निरर्थक-कृती’ सामर्थ्याला अन सहनशक्तीला सलाम ! फुकाच्या वायफळ मुक्ताफळांचे भांडार तुमच्या घरी सदैव ओसंडत असते. तुम्ही महान भारताचे आदर्श नागरिक बनण्याला सर्वथैव लायक आहात. लगे रहो...
३)५ किंवा अधिक ‘क’ : तुम्ही एक उच्च प्रतीचे अन गेंड्याला लाजवणाऱ्या त्वचाधारी नामांकित भांडखोर गृहस्थ आहात. तुम्ही अत्यंत चाणाक्ष वकील बनू शकाल अन खोऱ्याने पैसा ओढाल. चान्स घेता ?
४)५ किंवा अधिक ‘ड’ : तुम्ही जातिवंत महाचालू राजकारणी इसम आहात. मंत्रीमंडळात उच्च स्थान मिळण्याची तुमची पात्रता आहे. मिळाले तर तुम्ही त्याचे नक्कीच ‘सोने’ करणार...!
५)५ किंवा अधिक ‘इ’ : तुमचे व्यक्तिमत्व अत्यंत लवचिक आहे. तुमचा रंग पाण्यासारखा सदा बदलत असतो. एक आदर्श पती/पत्नी म्हणून एका भाग्यशाली जोडीदाराला धन्य करण्याची उच्च पात्रता तुमच्या अंगी आहे. तुमचा संसार परिचित वर्तुळात एक मैलाचा दगड म्हणून कौतुकाने नावाजला जाईल.
६)‘अ’ ते ‘इ’ पैकी एकही स्कोर ५ पेक्षा जास्त नाही. : तुमचे व्यक्तिमत्व संमिश्र व सदैव रंग बदलणारे आहे. थांबा, निराश होऊ नका. यावरून दिसून येते की तुमची स्वत:ची निर्णयक्षमता चाळणीतल्या पाण्याइतकी खोल असल्याने तुम्ही इतरांना सल्ला देणारे एक निष्णात अन मुरब्बी सल्लागार बनू शकता. अनेक रथी महारथींना सल्ला देऊन गार करण्याची जबरदस्त किमया तुमच्यात वसत आहे. कोणत्याही गोष्टीला उपलब्ध पर्यायांपेक्षा निराळाच कोणतातरी अकल्पनीय पर्याय तुम्ही सहज शोधू शकता. तुम्ही उद्याच आपली कन्सलटन्सी सुरु करा. आम्ही नक्की येऊ सल्ला घ्यायला अन इतरांना सल्ला देण्याची तुमची कला शिकायला...
मग ठरलं ना तुमचं कोण व्हायचं ते ? आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी ! बेस्ट लक् !
प्रतिक्रिया
1 Jan 2013 - 12:42 pm | यशोधरा
मिपावर सर्वेक्षण पर्व सुरु झालेले दिसते :)
1 Jan 2013 - 1:33 pm | तर्री
चला नव्या वर्षाची सुरुवात धडाक्यात झाली आहे !
1 Jan 2013 - 1:37 pm | कलश
" मिपाकर तुम्ही कोण होणार ? " पर्व पहीलेच्या सेट्सवर परिक्षक नेमल्यास अजून मॉजॉ यॅईल नै का :-P
1 Jan 2013 - 1:46 pm | स्पंदना
तो. पा. सु.
1 Jan 2013 - 1:53 pm | पक पक पक
तो. पा. सु....?
नक्की कशा मुळे...? ;)
1 Jan 2013 - 6:36 pm | प्यारे१
_/\_
1 Jan 2013 - 10:00 pm | रेवती
पेप्र. १ धीटपणे चूक कबूल आणि पुढे मात्र काय तो बुवा/बै काय शिक्षा देईल ती मुकाट्याने इ. सहन करीन की नाही हे त्या शिक्षेवर , बॉसच्या स्वभावावर, आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून.
पेप्र.३ शांत राहणे शक्य नाही. किडकी, सडकी भाजी आणल्याने संताप नाही पण नेहमीप्रमाणे चिडचिड करीन आणि नवराही कानात बोळे घातल्याप्रमाणे कांपूटरात बघत बसेल.
पेप्र.४ याठीकाणी स्वपसंतीची साडी असे मानले आहे. एकदा नेसून बाहेरच्या धुळीत आणि धुरात जाऊन आल्यावर ती साडी ओळखू येत नाही. तीचा मूळ रंग, पोत बदलून जातो. साहजिकच वेगळी साडी म्हणून नेसता येईल. त्याच मित्रमंडळात वेगळ्या नेसून जाईन.
पेप्र.५ जोवर कंडक्टर मला कळकट नोटा का असेना, पैसे परत करतोय तोवर ठीक आहे. माझी ४६२ रू वाया घालवण्यापेक्षा मी बस सोडून देईन. अगदी भयानक गरजेपोटी तातडीने प्रवास करावाच लागत असला तर साहजिकच "कीप द चेंज" म्हणावे लागेल. ;)
पेप्र.६ आल्यापावली परत बाहेर जाऊन दुकान शोधून पाकिटे आणीन व पैसे त्यात घालून देईन. अगदी रानावनात लग्न असेल व पाकीट मिळाले नाही तर नंतर कधीतरी वधूवर भेटतील तेंव्हा आहेर करीन व मागल्यावेळी "आहेर आणू नये" बद्दल आपला झालेला गैरसमज सांगीन.
पेप्र.७ माझ्याकडे किती वेळ आहे आणि मनात किती राग साठलेला आहे त्यावर क्वालीसवाल्याला समजावणे किंवा जाळ काढणे अवलंबून असेल. क्वालीसवर आबासाहेबांची कृपा, अमूक पाटील. जय अमूक एक पक्ष लिहिले असल्यात पंगा घेणार नाही. माझ्याही गाडीवर भगवा झेंडा व वाघाचे स्टीकर लावून घेईन. क्वालीसवाला तगडा असल्यास निमूट हापिसात जाईन. टंकाळा आल्याने इथेच थांबते. या धाग्याचा क्रमश: चालला असता. ;)
3 Jan 2013 - 1:42 pm | सस्नेह
टंकाळा आल्याने इथेच थांबते. या धाग्याचा क्रमश: चालला असता.
इथेच टंकाळा आला अन क्रमशः कशाला ?
4 Jan 2013 - 12:19 am | रेवती
बघ, मी तेही स्पष्टपणे मांडायचा कंटाळा केला. या एका धाग्याचे दोन तुकडे करणे या अर्थी म्हणतीये. ;)
2 Jan 2013 - 9:46 am | बायडी
आमच्या बाबतीत तरी ‘अ’ ते ‘इ’ पैकी एकही स्कोर ५ पेक्षा जास्त नाही....
3 Jan 2013 - 1:57 pm | पैसा
लय भारी! आता याचे पण निष्कर्ष वैग्रे येणार का? :D
3 Jan 2013 - 10:30 pm | परिकथेतील राजकुमार
चार शब्दात 'सार' प्लिज.
आजकाल माऊस मोडत असल्याने आपण धागा स्क्रोलच करत नाय.
4 Jan 2013 - 1:59 pm | सस्नेह
लास्ट पॅरा प्लीज. तेच 'सार' आहे....
4 Jan 2013 - 2:07 pm | नानबा
चालू द्या, उत्तम आहे.. पण याचे निष्कर्ष कधी येणार?
4 Jan 2013 - 5:49 pm | चौकटराजा
मी पुण्याचा असल्याने व असलो तरी आनंद यात्री होणार !
4 Jan 2013 - 5:53 pm | गणपा
मी माझ्या एका भाच्याशी सहमत आहे.
त्याला कांदे बटाटे विकणारा फेरीवाला व्हायचय. :)
जी काय निवडा निवडं करायची आहे ते गिर्हाईक स्वत:च करतं. आपण फक्त तोलायचं आणि पैसे मोजायचे. ;)
4 Jan 2013 - 8:14 pm | सस्नेह
असं नै चालणार ! निदान 'स्थळ' बघताना तरी 'निवडानिवड' करावी लागणार की नै ?
का तीपण गिर्हाइकावरच ढकलणार ?
5 Jan 2013 - 12:24 pm | ५० फक्त
निवडानिवड करा नाय तर गि-हाइकावर टाका, फ्सट्रेटेशन याचचंच.
5 Jan 2013 - 12:41 pm | सस्नेह
तुम्हाला का ५० वैनींना ?