काही चित्रे, काही प्रेक्षक, काही संवाद... (भाग १)

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in काथ्याकूट
26 Dec 2012 - 4:07 am
गाभा: 

काही चित्रे, काही प्रेक्षक, काही संवाद...

स्थळ: युरोपातील एक मोठे चित्र- संग्रहालय व प्रदर्शन.
पात्रे: महाराष्ट्रातून आलेली काही टूरिस्ट मंडळी:

१. तळवळकर मास्तर: जुन्या पिढीचे वास्तववादी चित्रकार, आर्टस्कूलचे निवृत्त प्रिन्सिपाल.
२. डी. कुमार: नव्या पिढीचा आधुनिक चित्रकार.
३. सात्विक गुरुजी: माध्यमिक शाळेतील संकृत - कम- इतिहास- कम -पीटी- कम- चित्रकला शिक्षक.
४. गणूशेठ: गावातील एक श्रीमंत, शौकीन व्यापारी.
५. कुसुमकलिका : लेखिका- कवियत्री.
६. सदानंद : एक रसिक, समंजस जाणकार.
७,८,९ . श्री व सौ. फणसे: एक मध्यमवयीन जोडपे आणि यांचा अजय हा आर्टस्कुलात शिकणारा मुलगा.
----------------------------------------------------------------
ही मंडळी खालील चित्रासमोर उभी आहेत:

b1

तळवळकर मास्तर: व्वा. काय सुरेख चित्रे आहेत , याला म्हणतात खरी कला. शेड-लाईट, प्रपोर्शन, काम्पोझीशन सर्व फारच सुंदर.
कुसुमकलिका : खरंच. आणि चेहर्‍यावरचे भाव काय सुंदर आहेत...
डी. कुमार : डॅम इट..रॉटन...हम्बग... आय जस्ट हेट इट...
गणूशेठ: आपल्याला यातलं काही समजत नाही बघा, पण बघायला छान वाटते... विकतात काहो ही चित्रं इथे? घेउन टाकू आपण. काय लागले दोन- चार हजार तरी काय हरकत नाय.
सदानंद: अहो हे म्युझियम आहे. इथे शेकडो वर्षांपासूनच्या कलाकृती जतन केलेल्या आहेत. करोडोंमध्ये सुद्धा मिळणार नाहीत ही चित्रे. हां, विकण्यासाठी छापील प्रती असतात इथे.
सौ. फणसे: खिश्चनांची दिसतायत इथे सगळी चित्रं ... साईबाबांचं असेल का हो इथे? आज गुरुवार आहे, अनायसे दर्शन होईल...
अजय: अगं आई, काहीतरीच काय बोलतेस, इथे कसं साईबाबांचे चित्र असेल?
------------------------------------------------------------------

थोड्या वेळाने दुसऱ्या दालनात...

b2

b3

गणूशेठ: ... अगागागा ... काय हो ह्ये... लई वंगाळ.. (स्वगत: च्यामायला, लईच भारी हाईत ही टमाटम चित्रं...)
सौ. फणसे: शी: आपण इथे यायलाच नको होतं. तीस युरो वाया गेले, तेवढ्यात कुमीसाठी कॉस्मेटिक चं सामान घेता आलं असतं. चला हो आता इथून.
अजय: अगं आई, असं काय करतेस? केवढी मोठी संधी आहे शिकण्याची...
सात्विक गुरुजी: सगळीकडे नग्नतेचा सुळसुळाट. यांना आणखी काही सुचतच नाही का? (स्वगत : साला फुकट भारतात जन्मलो.. आपल्याला नाही मिळाली अशी चित्रं काढायला मॉडेल्स कधी)...
गणूशेठ: पन ह्या बाया हैत तरी कोन, आणि अश्या काहून बसल्या हैत?
तळवळकर मास्तर: अहो, न्यूड - स्टडीज आहेत यात, छान आहेत.फार कठीण असतात अशी चित्रं काढायला.
डी. कुमार: माईट बी वेल डन, बट देअर ईज नो क्रिएटिव्हिटी... जस्ट वर्कमॅनशिप. दॅट्स ऑल. एक्सप्रेशनीझम, अ‍ॅब्स्ट्रॅक्शन, दॅट इज रियल आर्ट....
गणूशेठ: आरं ढेकण्या, (डी.कुमार हा मुळात नंदकुमार ढेकणे.) लेका मराठीत बोल की जरा, आन तुला काय बी आवडेना तर हितं आलास कशापाई? आन तुला काढता येईनात अशी सुंदर चित्रं, म्हनून तू घालतोस शिव्या.
सात्विक गुरुजी: खरे आहे, हे मॉडर्न-आर्ट वाले असेच असतात.
कुससुमकलिका: अहो, यातील नग्नता ही सांकेतिक आहे. चित्रकारानं आपल्या सामाजिक जाणीवा व्यक्त करायला नग्नतेचा सहारा घेतलेला आहे. तो समाजातील नग्न सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय, स्त्रियांची त्याकाळची स्थिती, त्यांच्या दडपलेल्या भावना...त्यांचा होणारा कोंडमारा, कुचंबणा...बघा ना त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव...
सात्विक गुरुजी: अहो कसला डोंबलाचा कोंडमारा ? मस्त आरामात पहुडल्यात की त्या... पण मला कळत नाही, ही असली अश्लील चित्रं इथे मांडावीतच कशाला ?
सदानंद: श्लील-अश्लील हा सगळा समजुतींचा खेळ आहे. आपल्याकडे नाहीत का मंदिरांवर मिथुन-शिल्पे असतात? खजुराहोचे मंदिर तर पूर्ण भरलेले आहे अश्या शिल्पांनी.
... खरेतर पूर्वी नग्नता हे निरागसतेचे, पावित्र्याचे प्रतीक मानले जायचे. लहान मूल नागडे असते, तसे. शिवाय पूर्वी युरोपात चर्चमधे, राजवाड्यांमध्ये लावायला मोठमोठी चित्रं करत. ती अगदी हुबेहूब खर्‍यासारखी दिसावीत, यावर फार भर असायचा, त्यामुळे आधी नग्न व्यक्तींना हव्या त्या पोज मध्ये उभे करून नीट अभ्यास-चित्र बनवायचे. मग त्यावर कपडे वगैरे चढवून चित्र पूर्ण करायचे. शिवाय ग्रीक व रोमन पौराणीक कथा घेउन त्यात नग्नाकृती चित्रित करण्याची पद्धत असायची. आपल्याप्रमाणेच पूर्वी ग्रीक संस्कृतीत नग्नता वाईट मानली जात नसे. खरेतर ख्रिस्ती धर्माने नग्नता म्हणजे पाप, हे समीकरण रूढ केले. त्यापूर्वी जगभरात त्यात काही अनिष्ट मानले जात नसे....
...ही चित्रे आंग्र या प्रसिद्ध फ्रेंच चित्रकाराची आहेत. हा त्या काळचा फार प्रसिद्ध चित्रकार होता ...

प्रतिक्रिया

कुसुमकलिकेचे संवाद आवडले .
पूढिल भागाच्या प्रतिक्षेत .

बॅटमॅन's picture

26 Dec 2012 - 7:32 am | बॅटमॅन

अर्धवटच लिहिले की काय हो? पुढचा भाग लौकर टाका :)

वेगळा प्रयोग. पुढचे भागही येऊ द्यात..

इतके नीट जमलेले वाटले नाही.. आधुनिक चित्रकाराची भुमिका खरंच अशी असेल असे वाटत नाही.
असो, दुसर्‍या भागात अधिक रंगत येईल अशी आशा करतो

चौकटराजा's picture

26 Dec 2012 - 9:15 am | चौकटराजा

असा प्रयोग इथे मिपावर शास्त्रीय संगीताला धरून झालेला आहेच . बहुदा त्यावरून प्रेरणा घेऊन चित्रगुप्त काकानी चित्राचा विषय घेतलेला दिसतो. मला तरी हा प्रयोग आवडला. आमचे एक मित्र कमर्शियल आर्ट ला होते. ते म्हणायचे "मुळगावकार हे कसचे चित्रकार? नुसते रंग पसरले की माणूस चित्रकार होतो काय ? अ‍ॅनॉटमी कुठाय मुळगावकराकडे ? तर दुसरे म्हणायचे " एमेफ हुसेन" हा कुणीतरी शेंदूर थापून केलेला देव आहे." पिडे पिंडे चा न्याव असा असतो राव !

आता modern art ( abstractism) हा विषय घेऊन चित्रकारांची ( व चित्र पहाणार्‍यांचीही ) खूप खिल्ली पुढच्या भागात उडवा काका !

लईच वेगळ्या टोन मध्ये लिहिलास रे धागा !

सदानन्द नसता तर टॅन्जन्ट गेला असता ;)

धागानंद ;)

नि३सोलपुरकर's picture

26 Dec 2012 - 12:04 pm | नि३सोलपुरकर

का ? कोण जाणे पण हा प्रयोग तितकासा नाही पटला.

सहज's picture

26 Dec 2012 - 4:10 pm | सहज

वा! प्रयोग आवडला. पुढल्या भागाच्या प्रतीक्षेत.

अभ्यासकांकरता तसेच जेष्ठ समीक्षकांसाठी ही चित्रफीत - फिल्म डिव्हीजन की भेट - Through The Eyes Of A Painter
Release: 1967 Duration: 18mins
http://filmsdivision.org/view_video.php?movId=Nzg=&title=
जाता जाता जेष्ठ समीक्षक मंडळींनी एम एफ हुसेन ग्रेट चित्रकार तसेच ग्रेट दिग्दर्शकही कसे होते (की कसे) ते गजगामीनी - मिनाक्षी हे दोन सिनेमे पाहून सांगावे.

इष्टुर फाकडा's picture

26 Dec 2012 - 8:52 pm | इष्टुर फाकडा

मीमांसा आवडली पण बाकी पात्रे वगैरेंची गरज न्हवती असे वाटले. ष्टोरी लाईन ऐवजी अजून दोन चित्रांचा परिचय वाचायला आवडला असता.

मलाही हा प्रयोग तितकासा आवडला नाही.

सस्नेह's picture

26 Dec 2012 - 9:19 pm | सस्नेह

नुसते फोटो आणि त्यांच्यामागील माहिती दिली असती तर चांगले वाटले असते, चित्रगुप्तकाका.

चित्रगुप्त's picture

27 Dec 2012 - 1:38 am | चित्रगुप्त

चित्रकलेविषयी माहिती देण्याच्या उद्देशाने मी आजवर केलेल्या लिखाणात वेगवेगळे प्रयोग करत आलो. त्यापैकी काही कुणाला आवडले, तर कुणाला नाही. माझ्या दृष्टीने कलावंत, लेखक इ. ना सदैव प्रयोगशील असले पाहिजे. एकादा प्रयोग यशस्वी ठरला वा लोकांना आवडला, म्हणून त्याच साच्यात अडकून राहण्यातून प्रयोगशीलता खुंटते, हा एकाअर्थी कलावंत म्हणून मृत्यूच.
या लेखातील प्रसंग घडतो, तो काळ खरेतर तीस-चाळीस वर्षांपूर्वीचा आहे. त्याकाळी इंटरनेट वगैर नसल्याने आजच्या तुलनेत बर्‍याच मर्यादा होत्या. तसेच ही जी मंडळी संग्रहालयात गेलेली आहेत, ती मुंबई-दिल्लीसारख्या महानगरातील नसून लहान शहरा-गावातील आहेत. त्यामुळे त्यांचा कलाक्षेत्रातील वावर बेताचा, आणि त्याच हिशेबाने त्यांच्या जाणिवेची प्रगल्भता आहे. एका अर्थी हे माझ्या स्वतःच्या अनुभव-विश्वाचे चित्रण आहे. मी शिकत असताना आमचे आर्ट्स्कूलचे प्रिन्सिपल, त्याकाळी इंदुरातील एक आधुनिक कलावंत (याला खरेतर चित्र काढणे जमत नसे, परंतु आपण आधुनिक चित्रकार असल्याची ऐट होती. आमच्या आर्टस्कूल मधील उत्तम कलावंत असणार्‍या गुरुवर्यांनाही तो तुच्छ लेखायचा. कागदावर क्रेयॉनने रंग भरून त्यावर खिळ्याने खूप वाटोळी-वाटोळी गिजबिज गिजबिज करून लहान-लहान चित्रे बनवत असे. यातील एक दिल्लीच्या प्रदर्शनात निवडले गेल्याने तो स्वतंला इंदुरातील सर्वात महान चित्रकार समजू लागला. याचे विचार व बोलणे 'डी. कुमार' सारखे होते.... संग्रहालयात साइबाबांचेही चित्र नक्कीच असणार असे वाटणार्‍या बाईतर माझ्या नात्यातच होत्या. इंदुरात त्याकाळी एक विदुषी, कवियत्री इ. इ. होत्या, त्यांना जिथे तिथे चेहर्‍यावरचे भाव आणि स्त्रियांची कुचंबणाच दिसायची. आमचे माध्यमिक शाळेतील कलाशिक्षक हे पीटी आणि संस्कृतचेही शिक्षक होते, त्यामुळे ते वैतागलेले असायचे. हजार-पाचशेत (त्याकाळची फार मोठी रक्कम) खूपशी चित्रे विकत घेउ बघणारा एक शेठजीही ओळखीचा होता.... ही सर्व मंडळी त्या काळापासून मनात कुठेतरी घर करून होती, या लेखाच्या निमित्ताने त्या आठवणींना वाट मिळाली.
या लेखाचा (कदाचित लेखमालेचा) उद्देश अमूक एका कलाप्रकाराची भलावण करण्याचा नसून कलेविषयी एकंदरित जाणीव काहीशी प्रगल्भ व्हावी, विविध कलाप्रकार व त्यासंबंधीच्या अन्य गोष्टींवर चर्चा व्हावी, काही चित्रे नजरेखालून जावीत, असा आहे. एकाच व्यक्तीच्या दृष्टीकोणातून चित्रे बघण्यापेक्षा विविध व्यक्तींच्या दॄष्टीकोणातून ती बघण्याचा इथे प्रयत्न आहे.

नवीन मिपाकरांसाठी माझे पूर्वीचे काही धागे: (खालील दुव्यांपैकी काहींवर टिचकी मारल्यावर संपूर्ण धागा न दिसता फक्त प्रतिसादच का दिसतात हे समजले नाही)

एका तैल-चित्राची जन्मकथा (सचित्र- भाग १)
http://www.misalpav.com/node/21908

एका तैल-चित्राची जन्मकथा (भाग २ -संपूर्ण)
http://www.misalpav.com/node/21954

मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी...
http://misalpav.com/node/18587

कला, कलावंत आणि आपण : जाणिजे चित्रकर्म (भाग २)
http://www.misalpav.com/node/19482

चित्रकाराच्या नजरेतून:
http://misalpav.com/node/18741

चित्र समीक्षा :
http://misalpav.com/node/18611

संग्रहालायातील कलाकृती आणि त्यांचे विविध विषय:
http://www.misalpav.com/node/23441

एक 'वजनदार' धागा... http://misalpav.com/node/19105

सुनील's picture

27 Dec 2012 - 2:49 am | सुनील

भाग लवकर गुंडाळल्यासारखा वाटला. तरी पुढील भागात रम्गेल असे वाटते. पुभाप्र

अवांतर - सहकार्‍याच्या आग्रहाखातीर लंडनच्या टेट मॉडर्न गॅलरीत (फुकट) घालवलेली एक सुरेख दुपार आठवून गेली ;)

काळा पहाड's picture

1 Jan 2013 - 5:08 am | काळा पहाड

चित्र नं १ च्या प्रेमात आहे. बाकी हे चित्र मॅडोना व बालक चे आहे का? या एका थीम वर अक्शरशः शेकडो कलाक्रुती बनवल्या गेल्या आहेत.

चित्रा's picture

1 Jan 2013 - 6:53 am | चित्रा

प्रयोग आवडला. थोडी पु. लं. च्या साठवणीची आठवण झाली.
शेवट थोडा गडबडीत उरकला आहे असे वाटले. पण एकंदरीत थोडी दृष्टी देणारा प्रयोग.