गुजरात विधानसभा निवडणुक अंदाजांचे मॉडेल

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
24 Oct 2012 - 6:54 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

डिसेंबर महिन्यात गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होईल आणि २० डिसेंबरला मतमोजणी होईल.मी गेले कित्येक वर्षे म्हणजे १९८९ च्या लोकसभा निवडणुकीपासून निवडणुकींच्या राजकारणात रस घेतला आहे. दरम्यानच्या काळात माझा राजकारणातला इंटरेस्ट बराच कमी झाला तरी इतक्या वर्षांपासूनची सवय अशी सहजासहजी जात नाही. त्यामुळे निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर नक्की निकाल कसे लागतील याचा अंदाज बांधणे हा माझा अगदी आवडता खेळ आहे.कधी माझे अंदाज बरोबर येतात तर कधी चुकतात. २००९ च्या लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यावर लगेचच मी मिसळपाववर माझे अंदाज जाहिर केले होते ( उत्तर भारत , पश्चिम भारत , दक्षिण भारत आणि पूर्व भारत ) आणि नंतर ते कितपत बरोबर होते याचा परामर्शही घेतला होता. यापैकी पंजाब, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक,मध्य प्रदेश,केरळ,हिमाचल प्रदेश यासारख्या काही राज्यांमध्ये अंदाज जवळपास अचूक होते तर बिहार,छत्तिसगड,गुजरात,महाराष्ट्र (मुंबई सोडून इतर महाराष्ट्र),झारखंड,आसाम यासारख्या राज्यांविषयीचे माझे अंदाज तितके बरोबर नव्हते पण निकालांचा कल बऱ्याच अंशी बरोबर ओळखता आला होता.असो.

आता गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये नक्की निकाल कसे लागतील याविषयीचा माझा अंदाज मिसळपाववर प्रसिध्द करायची वेळ आली आहे.यापूर्वीचे माझे अंदाज म्हणजे गेस्टीमेशन होते. राजकीय परिस्थिती बघून विविध राज्यांमध्ये नक्की निकाल कसे लागतील याविषयीचे माझे एका अर्थी इंट्यूशन होते.मागच्या निवडणुका हा संदर्भ घेऊन मागच्या निवडणुकांनंतर परिस्थिती किती आणि कशी बदलली आहे हा सब्जेक्टिव्ह कॉल घेऊन त्या आधारे यावेळी निकाल कसे लागतील याविषयीचे माझे आडाखे असे या अंदाजांचे स्वरूप होते.त्यासाठी कोणत्याही आकडेवारीचा अंतर्भाव केलेला नव्हता. आता गुजरात निवडणुकांच्या निकालांच्या अंदाजासाठी ही त्रुटी भरून काढायचा प्रयत्न आहे. माझी नक्की पध्दत याच लेखात पुढे लिहिणारच आहे.पण तरीही एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे या प्रकारचे विश्लेषण मी प्रथमच करत असल्यामुळे ही पध्दत कितपत योग्य/अयोग्य याविषयी मला याक्षणी काहीही माहिती नाही.यात अनेक त्रुटी असतीलही/ असतीलच. त्यामुळे प्रत्यक्ष निकाल आणि माझे अंदाज यात ०% ते १००% मधील कितीही तफावत असू शकेल.

माझी पध्दत पुढीलप्रमाणे:
१. केंद्रीय निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर जुन्या निवडणुक निकालांच्या पी.डी.एफ फाईल्स उपलब्ध आहेत.त्या सर्वप्रथम मी डाऊनलोड केल्या.अनेक खटपटी करून तो सगळा विदा मी एक्सेल शीटमध्ये घेतला. एक्सेल शीटमध्ये १९८०,१९८५,१९९०,१९९५,१९९८,२००२ आणि २००७ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल घेतले.त्याचप्रमाणे १९९९,२००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांचे विधानसभा मतदारसंघनिहाय निकालही निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.१९८० पासून सुरवात का केली याचे महत्वाचे कारण म्हणजे १९७७ ते २००७ या ३० वर्षांच्या काळात मतदारसंघांच्या भौगोलिक सीमा बदलल्या नव्हत्या.त्या अर्थी मग १९७७ च्या निवडणुकांपासून सुरवात करायला हवी. पण १९७७ चे निकाल हे आणीबाणीमुळे एकूणच ट्रेंडपेक्षा विरूध्द असलेले अपवादात्मक निकाल होते.त्यामुळे सुरवात १९७७ पासून न करता १९८० पासून केली आहे.

पूर्ण प्रक्रियेत ही सर्वात वेळखाऊ आणि किचकट पायरी आहे.अजूनही २००९ च्या लोकसभा निवडणुकांचे विधानसभा मतदारसंघनिहाय निकाल एक्सेल शीटमध्ये पूर्ण घेऊन झालेले नाहीत.ते काम या विकांतापर्यंत पूर्ण व्हायला हवे.

२. एक्सेलमध्ये पीव्होट टेबल नावाचे एक खूप चांगले टूल उपलब्ध आहे.त्याचा वापर करून १९८० ते २००७ दरम्यान राज्यात, राज्याच्या विविध विभागांमध्ये, लोकसभा मतदारसंघांमध्ये आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये मतांची टक्केवारी कळेलच. उदाहरणार्थ गुजरात राज्यात १९८० ते २००७ दरम्यान विविध पक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवारी कशी बदलली हे पुढील आकृतीत कळेलच. या आकृतीत १९९९ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकांच्या आकडेवारीचा समावेश आहे. तसेच लहान पक्षांचा समावेश केलेला नाही त्यामुळे आकृतीत दिलेल्या पक्षांच्या टक्केवारीची बेरीज १००% होणार नाही.(लहान पक्षांची टक्केवारी दाखविणारे कॉलम एक्सेल शीटमध्ये हाईड केले आहेत.) या आकृतीवरून खालील अनुमाने काढता येतील:

i. १९८० च्या निवडणुकांच्या तुलनेत १९८५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसची ४.५२% तर भाजपची ०.९७% मते वाढली. या पक्षांची मते वाढली तर जनता पक्षाची ३.६५% तर अपक्षांची ०.६०% मते कमी झाली. कॉंग्रेस पक्षाला ४.५२% मते जास्त मिळाली. आता ही मते कुठून आली असावीत? यशवंतराव चव्हाण, बलीराम भगत, किशोरचंद्र देव इत्यांदींनी १९७८ मध्ये इंदिरा गांधींच्या कॉंग्रेस पक्षापासून फारकत घेऊन स्वत:चा पक्ष काढला होता तोच तो कॉंग्रेस(यु). ही सगळी मते १९८५ मध्ये कॉंग्रेस पक्षाला मिळाली असे गृहित धरायला हरकत नसावी. तसेच जनता पक्षाच्या दोन्ही गटांची मिळून १९८० च्या तुलनेत १९८५ मध्ये ४.२८% मते कमी झाली.त्यापैकी ०.९७% मते भाजपकडे गेली आणि उरलेली ३.३१% कॉंग्रेसकडे गेली. म्हणजेच कॉंग्रेसला जास्तीची मिळालेली ४.५२% मते कशी आली याचा हिशेब मांडता येईल. (०.९७% कॉंग्रेस(यु) कडून, ३.३१% मते जनता पक्षांकडून तर ०.२४% मते अपक्ष आणि इतर पक्षांकडून).

ii. १९९० मध्ये कॉंग्रेस पक्षाची १९.८१% मते कमी झाली. तर भाजपची ११.७३% मते वाढली आणि जनता दल या नावाने असलेल्या जनता पक्षाच्या अवताराची १०.११% मते वाढली. म्हणजेच १९९० मध्ये कॉंग्रेस पक्षाची कमी झालेली मते भाजप आणि जनता दलाने घेतली.

iii. १९९८ मध्ये शंकरसिंह वाघेलांचा अखिल भारतीय राष्ट्रीय जनता पक्ष भाजपचे मोठे नुकसान करेल अशी अटकळ होती.पण तसे झाले का? तसे होताना दिसत नाही. भाजपची मते २.३०% ने तर कॉंग्रेसची मते १.९९% ने वाढली.तेव्हा वाघेलांच्या पक्षाची ११.६८% मते कुठून आली? तर ती बहुतांश अपक्षांकडून आली. राज्य पातळीवर हे चित्र दिसते पण विधानसभा मतदारसंघांच्या पातळीवर असे लक्षात येईल की वाघेलांच्या पक्षाचा भाजपला मध्य गुजरातमधील काही भाग वगळता फटका बसला नाही.तर वाघेलांच्या पक्षाने कॉंग्रेस पक्षाची मते खाल्ली.

राज्य पातळीवरील कल
अशा प्रकारे सर्व निवडणुकांविषयी अनुमाने बांधता येतील.आता याचा २०१२ च्या निवडणुकांच्या निकालांचे भाकित करायला काय उपयोग? १९८५ च्या निवडणुकांवर इंदिरा गांधींच्या हत्येची आणि १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजीव गांधींनी अभूतपूर्व यश मिळविले याची पार्श्चभूमी होती.तर कॉंग्रेस पक्षाची मते साडेचार टक्क्यांनी वाढली. १९९० च्या निवडणुकांवर १९८९ मध्ये राजीव गांधींचा झालेला पराभव आणि एकूणच देशातील कॉंग्रेसविरोधी वातावरणाची पार्श्चभूमी होती.त्यातून कॉंग्रेस पक्षाची जवळपास २०% मते कमी झाली. १९९० नंतर राज्यात भाजपचा जोर वाढला होता.त्यातून १९९५ मध्ये भाजपची मते साधारण १६% ने वाढली. सर्वसाधारणपणे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी वातावरण कसे होते (म्हणजे कॉंग्रेस पक्षाला अनुकूल/भाजपला अनुकूल इत्यादी) याची थोडीफार कल्पना मला आहेच. तेव्हा साधे त्रैराशिक मांडून त्यावेळी वातावरण तसे होते आणि अमुक इतके टक्के मते फिरली तर सध्याच्या वातावरणात राज्यपातळीवर किती टक्के मते फिरू शकतील हा सब्जेक्टिव्ह कॉल घेणे हा दुसरा टप्पा.

यात एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी आणि ती म्हणजे राज्य पातळीवर मते किती फिरतील याचा अंदाज बांधायला बेस इफेक्ट खूप महत्वाचा आहे.गुजरातमध्ये एखाद्या पक्षाचा झंझावात आहे अशी परिस्थिती दोनदा आली. १९८५ मध्ये माधवसिंह सोळंकींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाने ५५.५५% मते आणि १८२ पैकी १४९ जागा जिंकल्या तर २००२ मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने ४९.८५% मते आणि १२७ जागा जिंकल्या. १९८५ मध्ये कॉंग्रेसची मागच्या निवडणुकीच्या तुलनेत ४.५२% मते वाढली तर ८ जागा वाढल्या तर २००२ मध्ये भाजपची ५.१४% मते आणि १२ जागा वाढल्या. १९८५ मध्ये कॉंग्रेसला आणि २००२ मध्ये भाजपला मागच्या वेळच्या निवडणुकींच्या वेळच्या अनुक्रमे ५१.०३% आणि ४४.८१% मतांचा बेस होता. मुळातला बेस मोठा असेल तर त्यावर अजून वाढ करणे अधिक कठिण असते आणि अशी वाढ होऊन जागांमध्ये वाढ खूप प्रमाणावर होऊ शकत नाही.

त्याचप्रमाणे १९९० मध्ये भाजपला २६.६९% मते आणि ६७ जागा मिळाल्या होत्या.हा बेस तितका मोठा नव्हता.त्यामुळे त्यात १९९५ मध्ये भाजपला १५.८२% मते वाढवून ६७ वरून १२१ म्हणजे ५४ जागांचा घसघशीत फायदा झाला. पण त्यानंतर १९९८ मध्ये भाजपला २.३०% मते जास्त मिळाली आणि १९९५ च्या तुलनेत पक्षाच्या ६ जागा कमी झाल्या. तेव्हा जेवढा बेस मोठा तितका वाढायला वाव कमी असतो हे दिसतेच. त्याचप्रमाणे जर मुळातला बेस मोठा असेल तर फटका बसल्यास जोरदार फटका बसतो हे कॉंग्रेस पक्षाच्या १९९० मधील पराभवातून लक्षात येईल.

विभागीय पातळीवरील कल
अनेकदा कल विभागीय पातळीवर बदलू शकतात. मध्य गुजरातमध्ये अहमदाबाद, आणंद, बडोदा, छोटा उदयपूर, दोहाद, धांधुका,गांधीनगर, गोध्रा, खेडा आणि कपडवंज या १० जुन्या लोकसभा मतदारसंघांच्या क्षेत्रांमध्ये ७० विधानसभा मतदारसंघ होते. मुख्यत्वे या मतदारसंघांमध्ये २००२ मध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात दंगली झाल्या होत्या. आता या विभागात १९९८,२००२ आणि २००७ मधील निकाल लक्षात घेतल्यास दंगली हा विभागीय पातळीवर किती महत्वाचा मुद्दा होता हे कळेलच. भाजप आणि कॉंग्रेसला मिळालेली मते आणि कंसात जागा पुढीलप्रमाणे:
भाजप कॉंग्रेस
१९९५ ४१.१७%(४४) ३२.६३%(२०)
१९९८ ४२.२२%(३१) ३८.२६%(३३)
२००२ ५६.१९%(५९) ३६.५२%(११)
२००७ ४९.७१%(३७) ३८.५५%(२९)

असे म्हटले जात आहे की केशुभाई पटेल सौराष्ट्र विभागात म्हणजे राजकोट, सुरेन्द्रनगर, जामनगर, पोरबंदर, जुनागढ, अमरेली आणि भावनगर या ७ जुन्या लोकसभा मतदारसंघांच्या क्षेत्रांमधील ५० विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला डोकेदुखी निर्माण करू शकतील. तेव्हा केशुभाई पटेलांचे बंड हा मोठा मुद्दा सौराष्ट्रात असेल.

विधानसभा मतदारसंघ पातळीवरील कल
हा सगळ्यात आव्हानात्मक भाग आहे.विधानसभा निवडणुकांचे मतदारसंघ सर्वसाधारणपणे तालुकापातळीवर असतात.गुजरातमधील तालुकापातळीवरील राजकारण मला समजते असा माझा अजिबात दावा नाही.तरीही कोणत्या मतदारसंघात बंडखोरी झाली आहे का किंवा मतदारसंघांचे स्वरूप (शहरी/ग्रामीण) यावरून थोडे तरी आडाखे बांधता येतील. तसेच काहीवेळा स्थानिक उमेदवार खूपच तगडे असतात आणि त्यांना हरविणे जवळपास अशक्यच असते. उदाहरणार्थ मुख्यमंत्री नरेंद्र मोदी अहमदाबादमधील मणीनगर मतदारसंघातून निवडून येतात.पण ते दुसरीकडून निवडणुक लढवत असतील तरी (काही मतदारसंघ वगळता) त्यांचा पराभव करणे जवळपास अशक्यच असेल. त्याचाही अंतर्भाव करता येईल.

शेवटचा टप्पा म्हणजे राज्य पातळीवरील कल, विभागीय पातळीवरील कल आणि विधानसभा मतदारसंघ पातळीवरील कल superimpose करून कोणत्या मतदारसंघात किती मते फिरू शकतील याविषयी आडाखे बांधणे. आणि या विश्लेषणाला बेस कोणता घ्यावा? २००७ मध्ये झालेल्या निवडणुकांसाठीचे विधानसभा मतदारसंघ आणि आताचे विधानसभा मतदारसंघ सारखेच नाहीत.मतदारसंघांच्या भौगोलिक सीमा बदलल्या आहेत.काही जुने मतदारसंघ अस्तंगत झाले आहेत तर काही मतदारसंघ नव्याने अस्तित्वात आले आहेत.२००९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी आताप्रमाणे मतदारसंघ होते. तेव्हा २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये झालेले मतदान हाच बेस घ्यावा लागेल कारण अन्य कोणता विदा उपलब्ध नाही.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मुद्दे वेगळे असतात तेव्हा लोकसभा निवडणुकांमधील मतदान हा बेस घेतल्यास मुळातल्या बेसमध्ये करेक्शन करावे लागेलच. ते करेक्शन मी राज्यपातळीवरील कल आणि त्यामुळे किती मते फिरतील याचा आडाखा बांधताना करेन. तेव्हा २००९ मधील निकाल आणि त्यात किती मते फिरायची शक्यता आहे या बेसिसवर भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांसाठी नक्की जिंकता येतील अशा सुरक्षित जागा आणि अटीतटीची लढत होऊ शकतील अशा जागा identify करणे ही पुढची पायरी.तरीही अशा अटीतटीच्या लढतीतही कोण जिंकेल याचा काहीतरी अंदाज बांधायलाच हवा आणि तेही मी नक्कीच करेन.

अशा प्रकारे २० डिसेंबरला मतमोजणी सुरू होण्यापूर्वी माझे अंदाज जाहिर करायचा मानस आहे.मतमोजणी रविवारी व्हावी असी माझी फार इच्छा होती.पण ती काही पूर्ण होणार नाही. जमल्यास मतमोजणीच्या दिवशी रजा घेऊन चतुरंग आणि रमताराम यांनी बुध्दीबळाच्या सामन्यांचे धावते समालोचन केले होते तसे समालोचन निवडणुक निकालांचे आणि माझे अंदाज कितपत बरोबर/चूक आहेत याविषयी करायची इच्छा आहे.अर्थातच तसे करता येईलच याची खात्री मी या क्षणी देऊ शकत नाही.

माझे निवडणुक निकालांचे मॉडेल अशा प्रकारचे आहे.या मॉडेलमध्ये सगळ्यात मोठी त्रुटी निर्माण करू शकणारा घटक म्हणजे सब्जेक्टिव्हिटी.सध्याचे राजकीय वातावरण लक्षात घेता नक्की किती टक्के मते फिरतील हा कॉल पूर्णपणे सब्जेक्टिव्ह आहे.तो चुकला तर सगळेच चुकेल.दुसरे म्हणजे जातीपातींच्या आधारावर मते फिरतात.तेव्हा कोणत्या मतदारसंघात कोणत्या जातीच्या मतदारांचे वर्चस्व आहे आणि उमेदवार कोणत्या जातींचे आहेत या स्वरूपाची माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही.तिसरे म्हणजे गुजरात हे दोन पक्षांचे वर्चस्व असलेले राज्य असल्यामुळे हे मॉडेल गुजरातसाठी वापरताना एक गोष्ट स्पष्ट आहे आणि ती म्हणजे एका पक्षाविरूध्द गेलेली बरीचशी मते दुसऱ्या पक्षाला मिळणार आहेत.पण उत्तर प्रदेशसारख्या राज्यात एका पक्षाची कमी झालेली मते नक्की कोणत्या पक्षाला किती प्रमाणावर जातील हा अंदाज बांधणे तशी कठिण गोष्ट आहे.

गुजरातबरोबर हिमाचल प्रदेशचेही मॉडेल बनवायची माझी इच्छा होती.पण पहिल्याच पायरीसाठी--पीडीफ मधून एक्सेलमध्ये सगळा विदा घेणे बराच वेळ लागला त्यामुळे हिमाचलविषयीचे मॉडेल बनणार नाही.

या मॉडेलविषयी आपली मते जाणून घ्यायला आवडेल.तसेच यात काही सुधारणा सुचवता आल्यास त्यांचाही अंतर्भाव करायचा नक्कीच प्रयत्न करेन.तसेच या मॉडेलच्या यशापयशावरून भविष्यात कोणत्या सुधारणा करायला हव्यात हे पण ल़क्षात येईल.

माझा अगदी मोठा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे सगळ्या राज्यांविषयी असे मॉडेल २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बनविणे.पण यात सगळ्यात मोठी अडचण म्हणजे पीडीफ मधील विदा एक्सेल शीटमध्ये अचूकपणे घेणे.असा विदा कुठे उपलब्ध आहे का हे मी शोधायचा बराच प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही.

तसेच जर देशपातळीवरील मॉडेल बनविण्यात कोणा सदस्याला रस असेल तर 'जॉईंट मॉडेल' सुध्दा बनविता येऊ शकेल.म्हणजे माझ्या लक्षात न आलेले मुद्दे वेळीच इतर कोणी लक्षात आणून दिले तर मॉडेल अजून चांगले बनेल.

(माझा गुजरात विधानसभा निवडणुकीवरील ब्लॉगः http://gujaratvidhansabha2012.blogspot.in)

a

प्रतिक्रिया

क्लिंटन's picture

24 Oct 2012 - 6:55 pm | क्लिंटन

काही केल्या चित्र अपलोड करता आलेले नाही. तेव्हा संपादकांना जोडलेले चित्र लेखातच आणायची व्यवस्था करता आली तर खूप चांगले होईल.

धन्यवाद.

प्रचेतस's picture

24 Oct 2012 - 7:06 pm | प्रचेतस

दुरुस्त केले आहे.

लेखाबद्दल धन्यवाद.
सविस्तरपणे वाचावा लागेल.

खेडूत's picture

24 Oct 2012 - 7:01 pm | खेडूत

छान! आवडले.
(वा.खू.साठवली आहेच.)
>>> प्रत्यक्ष निकाल आणि माझे अंदाज यात ०% ते १००% मधील कितीही तफावत असू शकेल. :)

विकास's picture

24 Oct 2012 - 8:06 pm | विकास

माहितीपूर्ण आणि रोचक! केवळ नजरेखालून घातला आहे आणि वाचनखूण जपून ठेवली आहे.

अशा प्रकारे २० डिसेंबरला मतमोजणी सुरू होण्यापूर्वी माझे अंदाज जाहिर करायचा मानस आहे.

वरील वाक्य वाचले आणि ... एखाद्या सस्पेन्स गोष्टीत, गोष्टीची पूर्वपिठीका कळल्यावर, सगळे वाचत बसण्याऐवजी शेवट काय आहे हे बघायला जावे आणि पदरी क्रमशः असे वाचायला लागावे असे झाले! :( अर्थात तसे का आहे हे पूर्ण समजतो. आपल्या या प्रकल्पास मनःपूर्वक शुभेच्छा!

अर्धवटराव's picture

24 Oct 2012 - 10:55 pm | अर्धवटराव

जर हा प्रकल्प यशस्वी झाला तर २०१४ पर्यंत तुमच्या उर्वरीत आयुष्याची पैशाची सोय झाली असं समजा.

अर्धवटराव

पैसा's picture

24 Oct 2012 - 11:43 pm | पैसा

उत्तम लेख. अंदाजात शक्य तेवढी अचूकता आणण्यासाठी शुभेच्छा! ते फार कठीण आहे कारण प्रत्यक्षात अनेक घटक निवडणूक निकालांवर परिणाम करत असतात. कधी कधी मतांची टक्केवारी वाढली तरी निवडून आलेल्या जागा कमी होतात, बंडखोरीमुळे नुकसान होईल असे गृहीत धरले तरी तसे होत नाही आणि सगळ्यांचेच अंदाज चुकतात. केजरीवाल गुजरातमधे काही परिणाम घडवू शकतील का? याचे मला कुतुहल आहे. शिवाय प्रथमच मतदान करणारी तरुण मुले निकालांवर परिणाम घडवतात. मॉडेलमधे अशा गोष्टींमुळे म्हणजे एखाद्या घटकामुळे + किंवा - किती प्रमाणात फरक पडू शकतो याचा विचार करणारी (Cost-effectiveness analysis) काही आकडेवारी जर घेता आली तर निकालांचा अंदाज जास्त बरोबर लावता येऊ शकेल. प्रत्यक्ष निकालाम्च्या वेळेला तुमच्याकडून विश्लेषण ऐकायला नक्कीच आवडेल.

वामन देशमुख's picture

26 Oct 2012 - 11:05 am | वामन देशमुख

मि. क्लिंटन, आपल्या या प्रकल्पास हार्दिक शुभेच्छा!

महेश हतोळकर's picture

26 Oct 2012 - 11:09 am | महेश हतोळकर

आपल्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा. Excel बद्दल काहि मदत लागल्यास अवश्य कळवा. सहभागी होण्यास नक्की आवडेल.

बॅटमॅन's picture

26 Oct 2012 - 11:24 am | बॅटमॅन

उत्तम अ‍ॅनॅलिसिस क्लिंटन. चेन्नै मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे डैरेक्टर राजीव करंदीकर यांनी पोल रिझल्ट प्रेडिक्शनसाठी रिग्रेशन मॉडेल डिव्हेलप केले होते, त्यावर एक लेक्चर कॉलेजात झाल्याचे यावरून आठवले.

तर्री's picture

26 Oct 2012 - 4:10 pm | तर्री

क्लिंटन यांच्या लेखनातून त्यांची "वस्तुनिष्ठ " विचार करण्याची पद्धत दिसते. त्यामुळे "गुजराथ" चा निकाल ते अचूक वेधतील अशी आशा आहे.
मतांची टक्केवारी (+ / - ) ५% इतकी आली की भाकीत ९० % यशस्वी मानायला हरकत नाही. ( हया ५% मुळे जागा २५/३० येथे तेथे होतील - सत्ता समीकरण बदलेल !)
चांगले रस्ते ,२४ तास पाणी आणि वीज याचे उर्वरित भारतात जे अप्रूप आहे त्याला गुजरात मध्ये काही महत्व राहिलेले नाही.केशुभाई पटेलांचा फार प्रभाव पडणार नाही असे मला वाटते. पण तरीही ही निवडणूक मोदींना सोपी नाही. मोदी सत्तेत येणार हे गृहीत धरल्याने मतदान खूप कमी होईल ही शक्यता आहे.
मोदी जिंकायला हवेत , जिंकणार पण १०० च्या आत की दीडशे ? हाच महत्वाचा मुद्दा!

खेडूत's picture

27 Oct 2012 - 6:07 pm | खेडूत

एक बातमी: गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यंदाची विधानसभा निवडणूक मोठ्या फरकाने जिंकतील, असा दावा आज तकच्या ओपिनियन पोलमध्ये करण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षापासून मोदी यांनी मोठा विकास केला असून, २००७च्या तुलनेत भाजप पुन्हा जास्त जागा जिंकताना दिसेल, असे एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने २००७ मध्ये ११७ जागा जिंकल्या होत्या. यंदा त्यात ११ ने वाढ व ती संख्या १२८ वर जाईल, असे आज तकच्या पोलमध्ये म्हटले आहे. दुसरीकडे, काँग्रेसला आणखी फटका बसणार असून, त्यांच्या जागा ५९ वरुन ४८ वर येतील, असे भाकीत..

मात्र चाळीस मतदार संघात जनमत कल पाहून सगळ्या राज्याचा अंदाज कसा करतात माहीत नाही !

क्लिंटन's picture

27 Oct 2012 - 11:42 pm | क्लिंटन

सर्वांना शुभेच्छांसाठी धन्यवाद.

मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने २००७ मध्ये ११७ जागा जिंकल्या होत्या. यंदा त्यात ११ ने वाढ व ती संख्या १२८ वर जाईल, असे आज तकच्या पोलमध्ये म्हटले आहे.

मॉडेल बनविताना असे ओपिनिअन पोल्स वाचून बायस्ड होऊ नये म्हणून मी यासंबंधिच्या बातम्या अजिबात वाचत नाही.पण तुम्ही ही बातमी दिलीच आहेत त्यावर माझे भाष्य करतो.

गुजरातमध्ये अहमदाबाद, सुरत, बडोदा, राजकोट, भावनगर आणि जामनगर अशा एकूण ६ महानगरपालिका आहेत. त्यात निश्चितपणे शहरी क्षेत्रात मोडणारे विधानसभा मतदारसंघ (२००७ पर्यंत) होते २५. निश्चितपणे असे म्हटले कारण इतरही काही शहरी मतदारसंघ असतील. प्रत्येक मतदारसंघनिहाय तो मतदारसंघ शहरी आहे की ग्रामीण हे विश्लेषण मला अजून करायचे आहे.पण हे २५ मतदारसंघ निश्चितपणे शहरी होते. या मतदारसंघांच्या क्षेत्रांमध्ये भाजप पहिल्यापासून बलिष्ठ आहे हे १९९० पासून या मतदारसंघांमध्ये पक्षाला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागा लक्षात घेतल्या तर समजून येईल.

वर्षे मते जागा
१९९० ३७.८६% १४
१९९५ ५०.२३% २२
१९९८ ५५.९७% २१
१९९९ ५९.५३% २१
२००२ ६०.१९% २३
२००४ ५७.२८% १७
२००७ ५९.२०% १९

आता मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर याच शहरी भागात किमान ४२ मतदारसंघ झाले आहेत. या मतदारसंघामध्ये २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ५२.८२% मते आणि २९ विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली. एकूणच लोकसभा निवडणुकांपेक्षा विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी सरस आहे असे आकडेवारीतून दिसते.तरीही अगदी २००९ च्या लोकसभा निवडणुकीसारखेच निकाल लागले तरी भाजपला त्याच प्रदेशातून २९ जागा मिळायला फार जड जाऊ नये.

माझे विश्लेषण अर्थातच अजून पूर्ण झालेले नाही.तरीही सर्वसाधारण approach असा असेल.

क्लिंटन's picture

28 Oct 2012 - 10:01 pm | क्लिंटन

नमस्कार मंडळी,

खालील चित्रात गुजरातमध्ये १९८० ते २००९ या काळात विविध पक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवारी दर्शविली आहे.
Gujarat Elections

यातून एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे १९९९ पासून गुजरातच्या राजकारणाचे भाजप आणि कॉंग्रेस या दोन पक्षांभोवती ध्रुवीकरण होऊन राज्याच्या राजकारणात "बायपोलॅरिटी" आली आहे. १९८०,१९८५ आणि १९९० या निवडणुकांमध्ये एक तर जनता पक्ष किंवा जनता दल या स्वरूपात सध्या ज्याला तिसरी आघाडी म्हणता येईल ती आघाडी गुजरातमध्ये अस्तित्वात होती. पण १९९५ मध्ये जनता दलाचा जवळपास सफाया झाला तरी अपक्षांना १८.७१% इतकी घसघशीत मते मिळाली होती.आता हे अपक्ष नक्की कोण होते-- जनता दलाच्या नावावर आपण निवडून येऊ शकत नाही हे लक्षात आल्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये थोडीफार ताकद असलेले पूर्वाश्रमीचे जनता दलाचेच नेते अपक्ष म्हणून १९९५ मध्ये उभे होते की अन्य कोण हे विश्लेषण मला अजून करायचे आहे.तरी सांगायचा मुद्दा म्हणजे १९९५ मध्ये राज्यात अपक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवारी लक्षात घेता भाजप आणि कॉंग्रेस वगळता लक्षणीय मते मिळविणारे आणखी कोणी होते. पुढे १९९८ मध्ये वाघेलांच्या अखिल भारतीय राष्ट्रीय जनता पक्षाच्या रूपात तिसरा पर्याय होता.या पक्षाने भाजपपेक्षा कॉंग्रेस पक्षाचे नुकसान केले हे आधी म्हटले आहेच.या पक्षाला आणि अपक्षांना मिळून १६.९२% अशी लक्षणीय मते मिळाली.पण नंतरच्या काळात वाघेला कॉंग्रेसवासी झाले.१९९९ नंतर अपक्ष आणि इतरांना किती कमी मते मिळाली हे लक्षात घेतले तर राज्याचे राजकारण अधिकाधिक बायपोलार होत गेले आहे हा माझा मुद्दा लक्षात येईल.लोकसभा निवडणुकांमध्ये अपक्षांना मते मिळविणे कठिण असते हे त्यांना मिळालेल्या मतांवरून (१९९९ मध्ये ०.६७%, २००४ मध्ये ३.४४% आणि २००९ मद्ये ४.७७) लक्षात येईलच. पण २००२ आणि २००७ च्या विधानसभा निवडणुकांमध्येही (ज्यात अपक्ष आणि लहान पक्षांना मते मिळविणे तुलनेने सोपे असते) अपक्ष आणि लहान पक्षांना मते कमीच मिळाली आहेत.

आता याची निकालांच्या दृष्टीने काय implications आहेत?१९९८ मध्ये वाघेलांचा तिसरा पक्ष होता पण त्या पक्षाला मते खायला मुळात १९९५ मध्ये अपक्षांना मिळालेली १८.७१% इतकी घसघशीत मते होती.त्यामुळे या पक्षाने मते घेतली तरीही भाजप आणि कॉंग्रेस या मोठया पक्षांना त्याचा फटका बसला नाही. आता २०१२ मध्ये केशुभाई पटेलांचा गुजरात परित्राण पक्ष हा तिसरा पक्ष आहे. हा पक्ष भाजप आणि कॉंग्रेस या पक्षांइतका बलिष्ठ नक्कीच नाही.पण मुळातल्या बायपोलर राजकारणात या तिसऱ्या पक्षाने मते घेतली तर त्याचा फटका या दोन पक्षांनाच बसणार आहे. राज्य पातळीवरील कल लक्षात घेतले तर कदाचित हा पक्ष फारसा प्रभाव दाखवू शकेल असे वाटत नाही.पण सौराष्ट्रमधील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये या पक्षाचे अस्तित्व असेल. २००९ मध्ये महागुजरात जनता पक्ष या नावाने पक्ष स्थापन करून मोदींचे एके काळचे सहकारी गोवर्धन झाडपियांनी सौराष्ट्रमधील भावनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणुक लढवली.भावनगर हा एकेकाळचा भाजपचा बालेकिल्ला होता.१९९९, २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने ही लोकसभेची जागा १८%-२०% च्या मताधिक्याने आरामात जिंकली होती.पण २००९ मध्ये झाडपियांनी भाजपच्या नाकात दम आणला होता आणि पक्षाचा ०.९५% मताधिक्याने कसाबसा विजय झाला.पण झाडपिया भावनगर वगळता इतर भागांमध्ये फारसा प्रभाव दाखवू शकले नव्हते.आता केशुभाई पटेल आणि झाडपिया एकत्र आहेत. केशुभाई जुनागढमधील मानवदार किंवा विसावदार मतदारसंघातून निवडून येत.निदान त्या भागात केशुभाई भाजपला काही प्रमाणात फटका देऊ शकतील. तसेच केशुभाई कॉंग्रेसची मतेही काही प्रमाणावर खातीलच (१९९८ मध्ये वाघेलांच्या पक्षाने गुजरातमध्ये कॉंग्रेसचीही मते खाल्ली आणि १९९९ मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादीने भाजप-सेना युतीची मते खाल्ली यावरून असे फुटिर पक्ष विरोधी पक्षालाही डोकेदुखी करू शकतात हे लक्षात येईल). पण ही मते निकाल फिरवायला पुरेशी असतील का हे विश्लेषण नंतरच्या काळात प्रसिध्द करेन. आता हे रामायण सांगायचा हेतू काय?तर हा पक्ष भाजप आणि कॉंग्रेसचीही मते खाईल.

माझ्या विश्लेषणाचा पहिला टप्पा म्हणजे राज्यपातळीवरील कल लक्षात घेऊन ते २००९ च्या लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत २०१२ मध्ये निकालांवर कसा आणि किती परिणाम दाखवतील हे लक्षात घेणे हा आहे हे मूळ लेखात स्पष्ट केलेच आहे.राज्यपातळीवर भाजपविरोधात आणि कॉंग्रेसविरोधात "स्विंग" समजा प्रत्येकी १% असेल तर दोन्ही पक्षांची १% म्हणजे २% मते हा तिसरा पक्ष घेईल हे ढोबळ गणित आहे. राज्यपातळीवरील "स्विंग" म्हणजे नक्की काय?समजा एखाद्या पक्षाच्या बाजूने राज्यपातळीवर ३% स्विंग आहे म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात त्या पक्षाची मते ३% वाढतील. (विभागीय आणि मतदारसंघनिहाय विश्लेषण अजून करायचे आहे).या तिसऱ्या पक्षाचे अस्तित्व विश्लेषणाच्या पुढील टप्प्यांमध्ये जाणवेल.

पुढील चित्रात भाजप आणि कॉंग्रेस विरोधात/बाजूने राज्यपातळीवर किती स्विंग असेल तर भाजपच्या जागा किती कमी/जास्त होतील हे दिसते.

समजा भाजपच्या बाजूने २% आणि कॉंग्रेसच्या विरोधात १% स्विंग असेल (२००९ पासून) तर भाजपला ११७ जागा मिळतील तर भाजपच्या विरोधात २% आणि कॉंग्रेसच्या बाजूने १% स्विंग असेल तर भाजप ८९ पर्यंत खाली घसरेल असे या चित्रात दिसेल. २००९ मध्ये भाजपला १०६ मतदारसंघांमध्ये आघाडी होती हे या चित्रातून स्पष्ट होते.

आता या टेबलमध्ये दिलेल्या कोणते चित्र अधिक realistic आहे? २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा जोर होता. तसेच लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे अधिक महत्वाचे असतात.त्यातूनच त्यापूर्वीच्या (२००२/२००७) विधानसभा निवडणुकांपेक्षा कॉंग्रेसला २००४/२००९ मध्ये जास्त मते मिळाली होती. सध्या देशातील कॉंग्रेसविरोधी वातावरण लक्षात घेता आणि गुजरात राज्यात कॉंग्रेसकडे नरेंद्र मोदींना तोंड देऊ शकेल असा एकही नेता नाही हे लक्षात घेता एकंदरीत राज्यपातळीवरील कल भाजपच्या बाजूने आणि कॉंग्रेसच्या विरोधात असेल असे वाटते.तसेच नरेंद्र मोदींचे सरकारही गेले १०+ वर्षे सत्तेत आहे त्यामुळे काही प्रमाणात त्या सरकारविरोधातही प्रस्थापित विरोधी मते जातील.तेव्हा २००२ मधील ४९.८५% आणि २००७ मधील ४९.१२% मते मिळविणे भाजपला कठिण जाईल असे वाटते.भाजप ४८% च्या आसपास स्थिरावेल (+१.५% चा स्विंग) आणि कॉंग्रेस ४०% पर्यंत खाली जाईल (-३% स्विंग) असे वाटते.तेव्हा वरील टेबलमध्ये दिल्याप्रमाणे भाजप १२१ ते १२४ या दरम्यान जागा जिंकू शकेल असे वाटते.

आता विभागीय पातळीवरील आणि विधानसभा मतदारसंघ पातळीवरील कल या आकड्यात किती फरक घडवून आणू शकतील?ते माहित करून घ्यायला आणखी काही दिवस थांबावे लागेल.

(काही कारणाने या पोस्टमध्येही चित्रे दिसू शकत नाहीत. मिसळपावच्या नवीन रूपात चित्रे अपलोड करायला प्रॉब्लेम आहे का? कल्पना नाही. हाच पोस्ट http://gujaratvidhansabha2012.blogspot.in/ वर बघता येईल.)

श्रीरंग_जोशी's picture

31 Oct 2012 - 11:38 pm | श्रीरंग_जोशी

या निवडणूकीपेक्षा सप्टेंबर २०१४ मध्ये होणार्‍या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींबद्दल मला कितीतरी अधिक रस आहे.
तेव्हाही असाच प्रकल्प राबवणार असाल अन शिकाऊ स्वयंसेवक मदतीला हवे असतील तर मला नक्की कळवा, माझ्या कुवतीनुसार सहभागी होईन.

माझ्या अंदाजानुसार भा.ज.प.ला हया निवडणुकी मध्ये निखळ यश मिळणार नाही. निव्वळ गट फील वर सांगायचे ता ११० पर्यंत जागा मिळतील. मतदान कमी झाले तर मात्र १२० जागा मिळणे खरेच कठीण होईल.
२ प्रमुख करणे :
१. मोदी जिंकणार हया (अती) विश्वासाने काही मोदी समर्थक मतदान करणार नाहित.
२. लोक नियुक्त प्रतिनिधी वगळता भा.ज.प. ची संघटना ही गेल्या २ वर्षात संपली आहे. अर्थात त्या मुळे लगेचच काही फार फरक पडणार नाही थोडा फार फरक दिसेल.

विकास's picture

1 Nov 2012 - 8:23 pm | विकास

दोन्ही मुद्यांमधे तथ्य आहे.

मतदान कमी झाले तर मात्र १२० जागा मिळणे खरेच कठीण होईल

सहसा भरघोस मतदान हे सत्तापरिवर्तनाचे लक्षण मानले जाते तर, कमी मतदान हे सत्ताबदल होणार नसल्याचे. त्यादृष्टीने पाहता, हे विधान थोडे वेगळे वाटते.

तहलकाचा हा लेख रोचक वाटावा!
(क्लिंटन यांनी मॉडेल बायस्ड होऊ नये म्हणून सदर लेख वाचला नाही तरी चालेल!!! ;))

म्हणून कमी मतदान धोक्याचे आहे. भरघोस मतदान झाले तर (हया वेळी अपवादाने ) ते मोदींवरच्या विश्वासाचे असेल.
भरघोस मतदान आणि परिवर्तन हे जरी खरे असले तरीही सद्य स्थिती मध्ये कोंग्रेस ला ते शक्य नाही.

रणजित चितळे's picture

2 Nov 2012 - 6:09 pm | रणजित चितळे

लेख छान आहे आवडला. अतूरतेने वाट बघत आहे.