लोकसभा निवडणुक निकालांचे अंदाज: माझे गेस्टीमेट किती बरोबर किती चूक?

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
17 May 2009 - 12:47 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

मी लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच उत्तर भारत , पश्चिम भारत , दक्षिण भारत , पूर्व भारत आणि एकत्रित अंदाज मार्च महिन्यात व्यक्त केले होते.लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यावर माझे स्वत:चे अंदाज व्यक्त करणे हा माझा आवडता प्रकार आहे.यावेळी प्रथमच मी हे अंदाज आंतरजालावर प्रसिध्द केले.

आता यापैकी किती बरोबर आले आणि किती चुकले हे शक्य तितक्या थोडक्यात बघू. सर्व राज्यांच्या बाबतीत निकाल (आणि कंसात माझे अंदाज)

१) जम्मू-काश्मीर:

एकूण जागा: ६
नॅशनल कॉन्फरन्स: ३ (२)
काँग्रेस: २ (१)
अपक्ष: १ (०)
भाजप: ० (२)
पीडीपी: ० (१)

या राज्यातील माझे अंदाज चुकले.जम्मू आणि उधमपूर या दोन जागा भाजप जिंकेल असा अंदाज मी व्यक्त केला होता.पण काँग्रेस ने जम्मूत १,२२,००० पेक्षा जास्त मतांनी तर उधमपूरमध्ये १३,००० पेक्षा जास्त मतांनी भाजपचा पराभव केला.पीडीपीला अनंतनागची जागा मिळेल असा अंदाज मी व्यक्त केला होता पण तिथे पक्षाच्या उमेदवाराचा नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवाराने ५,००० मतांनी पराभव केला.मेहबुबा मुफ्ती किंवा मुफ्ती महंमद सईद निवडणुकीच्या रिंगणात असते तर कदाचित ही जागा पीडीपीला मिळाली असती.मी नॅशनल कॉन्फरन्स बारामुल्ला,श्रीनगर आणि लडाख या जागा जिंकेल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यापैकी लडाखमध्ये अपक्ष उमेदवाराचा विजय झाला.बाकी दोन जागा नॅशनल कॉन्फरन्सला मिळाल्या.

जम्मू विभागातील दोन्ही जागा भाजपला मिळतील हा अंदाज चुकला.

२) हिमाचल प्रदेश:
एकूण जागा: ४
भाजप: ३ (३)
काँग्रेस: १ (१)

या राज्यातील माझे अंदाज व्यक्त केले होते अगदी तसेच आले आहेत.

३) हरियाणा:
एकूण जागा: १०
काँगेस: ९ (२)
हरियाणा जन काँग्रेस: १ (१)
भाजप: ० (४)
भारतीय राष्ट्रीय लोकदल: ० (३)

या राज्यातील अंदाज पूर्णपणे चुकले.भाजप-भारतीय राष्ट्रीय लोकदल युतीला १० पैकी ७ जागा मिळतील असा अंदाज मी व्यक्त केला होता.पण काँग्रेसने २००४ इतक्याच ९ जागा जिंकल्या.

४) पंजाब-चंडीगड:
एकूण जागा: १४ (पंजाबच्या १३+चंडीगडची १)
काँग्रेस: ९ (९)
अकाली दल: ४ (३)
भाजप: १ (२)

मी अंदाज व्यक्त केले तेव्हा भाजप-अकाली दलाच्या ५ जागा धरल्या होत्या आणि राज्यातील मोठा पक्ष म्हणून अकाली दलाच्या ३ आणि भाजपच्या २ जागा धरल्या.पण प्रत्यक्षात युतीला पाचच जागा मिळाल्या.तेव्हा या राज्यातील माझा अंदाज १००% बरोबर आला असे म्हणायला हरकत नाही.

५) दिल्ली:
एकूण जागा: ७
काँग्रेस: ७ (६)
भाजप: ० (१)

काँग्रेसचे बहुतांश वर्चस्व असेल याची कल्पना होती.पण भाजपचा पूर्णच धुव्वा उडेल असे वाटले नव्हते.तेव्हा दिल्लीतील निकालांचा कल बरोबर व्यक्त केला होता पण तो काँग्रेसच्या बाजूने थोडा अधिक झुकला.तरीही अंदाज बराचसा बरोबर असे म्हणता येईल.

६) राजस्थान:
एकूण जागा: २५
काँग्रेस: २० (१९)
भाजप: ४ (६)
इतर: १ (०)

या राज्यातही काँग्रेसचेच बहुतांश वर्चस्व असेल असा अंदाज आधी व्यक्त केलाच होता.राजस्थानातही निकालाचा कल बरोबर व्यक्त केला होता आणि तो बराचसा बरोबर असे म्हणता येईल.इतर कोणाला जागा कुठली मिळाली आहे हे बघायला हवे.

७) उत्तराखंड
एकूण जागा: ५
काँग्रेस: ५ (२)
भाजप: ० (२)
समाजवादी पक्ष: ० (१)

या राज्यातील माझा अंदाज चुकला.राज्यातील मतदार एका पक्षाला निर्विवाद कौल न देता भाजप-काँग्रेस या दोघांनाही संधी देतील असे वाटले होते.

८) उत्तर प्रदेश
एकूण जागा: ८०
बसप: २२ (५२)
समाजवादी पक्ष: २१ (१४)
काँग्रेस: २१ (५)
भाजप: ११ (६)
भारतीय लोकदल: ४ (२)
अपक्ष (कल्याण सिंह): १ (१)

या राज्यातील माझे अंदाज पूर्णपणे झोपले.अर्थातच काँग्रेस २१ जागा जिंकून जोरदार मुसंडी मारेल असे कोणत्याही ओपिनियन किंवा एक्झिट पोलवाल्याने म्हटले नव्हते.या राज्यातील निकाल तसे अनपेक्षितच लागले आहेत.या राज्यात चुकलेल्या अंदाजांपैकी थोडेथोडके बरोबर आलेले अंदाज म्हणजे कल्याण सिंह,मेनका गांधी आणि लखनौमधून लालजी टंडन हे निवडून येतील असे अंदाजात म्हटले होते ते तसेच झाले.

९) गुजरात
एकूण जागा:२६
भाजप: १५ (२०)
काँग्रेस: ११ (६)

या राज्यात भाजपचे जोरदार वर्चस्व असेल असे मला वाटले होते.पक्षाचे वर्चस्व राहिले पण वाटले होते तितक्या प्रमाणात नाही.राज्यातील कलाविषयी व्यक्त केलेले अंदाज थोडेसेच बरोबर आहेत असे म्हणता येईल.

१०) महाराष्ट्र
एकूण जागा: ४८
काँग्रेस: १७ (१३)
राष्ट्रवादी काँग्रेस: ८ (१३)
शिवसेना: ११ (८)
भाजप: ९ (१३)
अपक्ष: २ (सदाशिवराव मंडलिक,राजू शेट्टी) (०)
बहुजन विकास पक्ष: १ (०)
रिपब्लिकन पक्ष: ० (१)

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला २६ जागा तर भाजप-शिवसेनेला २१ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता.त्यापैकी एकेका पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज चुकला. मुंबईत ६ पैकी ४ जागा युती जिंकेल असे म्हटले होते. मनसेने मते मोठ्या प्रमाणावर खाल्यामुळे युती मुंबईत पार झोपली.पण इतर राज्याच्या भागात युतीला अंदाज केले होते त्यापेक्षा जागा जास्त मिळाल्या आणि भरपाई झाली.अंदाज व्यक्त करायच्या वेळी सदाशिवराव मंडलिक राष्ट्रवादी काँग्रेस सोडून अपक्ष म्हणून निवडणुक लढवतील हे नक्की नव्हते.कोल्हापुरातून राष्ट्रवादीचा विजय होईल असे धरले होते.तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या २६ जागा हा अंदाज बहुतांश बरोबर मानायला हरकत नाही.पण मुंबई आणि राज्याच्या इतर भागात व्यक्त केलेले अंदाज कमी-जास्त होऊन पूर्ण राज्यात ’बॅलन्स’ झाले. पालघरमधून बहुजन विकास पक्ष, हातकणंगलेतून राजू शेट्टी यांचा विजय आणि रामदास आठवलेंचा पराभव याचा अंदाज व्यक्त केला नव्हता.ठाण्याची जागा शिवसेना नक्की जिंकेल असे म्हटले होते तसे घडलेले नाही.तसेच विदर्भात युतीला १० पैकी ७ जागा मिळतील असे म्हटले होते त्या पाचच मिळाल्या.जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा भाजप जिंकेल असे म्हटले होते तसेच झाले.तसेच पुणे जिल्ह्यातील दोन जागा-- मावळ आणि शिरूर आणि अहमदनगरची जागा युतीने जिंकली ते अंदाजात व्यक्त केले नव्हते. तेव्हा महाराष्ट्राविषयीचे माझे अंदाज कितपत बरोबर याचा निर्णय वाचकांवर सोडतो.

११) गोवा
एकूण जागा: २
भाजप: १ (१)
काँग्रेस: १ (१)

राज्यातील निकाल अंदाज व्यक्त केले होते तसेच लागले आहेत.

१२) मध्य प्रदेश
एकूण जागा: २९
भाजप: १९ (१९)
काँग्रेस: १० (८)
बसप: ० (२)

राज्यात भाजपला अंदाज केले होते त्याप्रमाणेच १९ जागा मिळाल्या तर काँग्रेसला ८ ऐवजी १० जागा मिळाल्या.बसपला एकही जागा न मिळाली नाही.तेव्हा राज्यातील अंदाज अंशत: बरोबर असे म्हणता येईल.

१३) कर्नाटक
एकूण जागा: २८
भाजप: १९ (१९)
काँग्रेस: ६ (७)
जनता दल (धर्मनिरपेक्ष): ३ (२)

या राज्यातही भाजपला अंदाज व्यक्त केले होते तितक्याच १९ जागा मिळाल्या.तर काँग्रेसला अंदाज व्यक्त केले होते त्यापेक्षा एक जागा कमी तर जनता दल (धर्मनिरपेक्ष) ला एक जागा जास्त मिळाली.शिमोग्यातून बंगाराप्पांचा पराभव झाला आणि तिथला अंदाज चुकला.चिकबाळापूरमधून आर.एल.जलाप्पा हा तगडा उमेदवार दिला तर काँग्रेसचा विजय नक्की असे म्हटले होते.जलाप्पा वाढत्या वयामुळे निवडणुकीच्या रिंगणातून दूर राहिले पण पक्षाने माजी मुख्यमंत्री विरप्पा मोईली हा तितकाच तगडा उमेदवार दिला होता.त्यामुळे या जागेविषयीचा अंदाज बरोबर आला.चामराजनगर,मंड्या,कोलार या जागी भाजपचा पराभव होईल हा अंदाज बरोबर आला.बंगलोर,म्हैसूर,धारवाड या शहरी भागांतून आणि राज्याच्या किनारी भागातून भाजपचा विजय होईल असा अंदाज व्यक्त केला होता.त्यापैकी म्हैसूरमधून पक्षाचा थोडक्यात पराभव झाला.बाकी निकाल अंदाज व्यक्त केले तसेच लागले.तेव्हा कर्नाटकात अंदाजांचे यश मोठे आहे असे म्हणायला हरकत नाही.

१४) केरळ
एकूण जागा: २०
काँग्रेस: १३ (१३)
केरळ काँग्रेस मणी: ० (२)
मुस्लीम लीग: २ (१)
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष: ४ (३)
भारतीय कम्युनिस्ट पक्ष: ० (१)
इतर: १ (०)

राज्यात काँग्रेस आघाडीला १६ तर डाव्या आघाडीला ४ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता.त्यापैकी केरळ काँग्रेस मणी हा पक्ष मुस्लीम लीगपेक्षा मोठा आहे असे वाटून त्या पक्षाला २ तर मुस्लीम लीगला एक जागा अंदाजात दिली होती.इतर कोणी आणि कोणती जागा जिंकली आहे हे बघायला हवे.ती जागा युपीए समर्थक पक्षाने जिंकली असेल तर काँग्रेस आघाडीस १६ आणि डाव्या आघाडीला ४ हा अंदाज १००% बरोबर आला असे म्हणायला हरकत नाही.

१५) लक्षद्विपची जागा काँग्रेस जिंकेल असे म्हटले होते तसेच झाले.

१६) तामिळनाडू + पाँडेचेरी
एकूण जागा: ४० (तामिळनाडू:३९ + पाँडेचेरी: १)
युपीए: २८ (१०)
अण्णा द्रमुक आघाडी: १२ (३०)

या राज्यातील अंदाज पूर्णपणे झोपले.यात विजयकांत यांच्या डी.एम.डी.के पक्षाने द्रमुकविरोधी मते खाल्ली म्हणून असे झाले असायची जोरदार शक्यता आहे.मी राज्याच्या निकालांचे विश्लेषण माझ्या अनुदिनीत लिहिनच.पण ’गिरा तो भी टांग उपर’ असे न म्हणता या राज्यातील अंदाज चुकले आहेत हे मान्य करून ते कशामुळे चुकले आहेत याचा मागावा जरूर घेईन.म्हणजे पुढच्या वेळी चूक टाळता येईल.

१७) आंध्र प्रदेश
एकूण जागा: ४२
काँग्रेस: ३२ (१४)
तेलुगु देसम: ७ (१८)
तेलंगणा राष्ट्र समिती: २ (५)
ए.आय.एम.आय.एम: १ (१)
भारतीय कम्युनिस्ट पक्ष: ० (२)
प्रजाराज्यम: ० (२)

या राज्यातील अंदाज पूर्णपणे चुकले.बरोबर आलेले अंदाज म्हणजे हैद्राबादची जागा ए.आय.एम.आय.एम जिंकेल आणि भाजप राज्यात एकही जागा जिंकणार नाही.

१८)बिहार
एकूण जागा: ४०
जनता दल (संयुक्त): २० (१६)
भाजप: १२ (७)
राजद: ४ (११)
काँग्रेस: २ (२)
इतर: २ (०)
लोकजनशक्ती:० (४)

अंदाज लिहिताना पासवान युपीए बरोबर जाणार नाहीत आणि काँग्रेस-लालू युती होईल असे वाटत होते आणि तेच गृहित धरून अंदाज व्यक्त केले होते.काँग्रेस आणि लालू एकत्र न लढल्यामुळे त्यांचे किती नुकसान झाले हे बघायला हवे.ते विश्लेषणही वेळ मिळाल्यावर माझ्या अनुदिनीवर लिहिन.अंदाजात जनता दल(संयुक्त)-भाजप युती पुढे असेल हे म्हटले होते पण अंदाजांपेक्षा बरेच चांगले यश युतीला मिळाले.या राज्यातील अंदाज केवळ कल दाखविण्यापुरता बरोबर आला पण बराचसा चुकला असे म्हणायला हरकत नाही.

१९) झारखंड
एकूण जागा: १४
भाजप: ८ (६)
झारखंड मुक्ती मोर्चा: २ (२)
काँग्रेस: १ (२)
झारखंड विकास मोर्चा: १ (१)
इतर: २ (०)
जनता दल (संयुक्त):० (२)
राष्ट्रीय जनता दल: १ (०)

राज्यात भाजप आघाडीला एकूण ८ (भाजप:६ आणि जनता दल संयुक्त २) जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता.जनता दल (संयुक्त) ने राज्यात जागा लढविल्या होत्या की नाही माहित नाही पण भाजप आघाडीच्या ८ जागा हा अंदाज बरोबर आला. बाबुलाल मरांडींच्या पक्षाचे नाव झारखंड विकास मोर्चा असून अंदाजात लिहिल्याप्रमाणे झारखंड जनता पक्ष नाही.त्या पक्षाला १ जागा मिळेल असे म्हटले तसेच झाले. या राज्यातील अंदाज बर्‍यापैकी बरोबर आले असे म्हणायला हरकत नाही.

२०) छत्तिसगड
एकूण जागा: ११
भाजप: १० (८)
काँग्रेस: १ (३)

राज्यात भाजपचे वर्चस्व राहणार हा अंदाज बरोबर आला.पण भाजपने अंदाज व्यक्त केले होते त्यापेक्षा दोन जागा जास्त मिळवल्या.राज्यातील अंदाज अंशत: बरोबर असे म्हणता येईल.

२१) ओरिसा
एकूण जागा: २१
बिजद: १४ (४)
काँग्रेस: ६ (१३)
भारतीय कम्युनिस्ट पक्ष: १ (०)
भाजप: ० (३)
झामुमो: ० (१)

या राज्यातील अंदाज सुद्धा पूर्णपणे चुकले.

२२) पश्चिम बंगाल
एकूण जागा: ४२
तृणमूल काँग्रेस: १९
काँग्रेस: ६
डावी आघाडी: १५
भाजप: १
अपक्ष: १

राज्यात डाव्या आघाडीचे वर्चस्व राहिल असा अंदाज व्यक्त केला होता आणि त्यांना २७ तर काँग्रेस आघाडीला १५ जागा मिळतील असे म्हटले होते.पण हा अंदाज चुकला.अंदाज लिहिताक्षणी दार्जिलिंगमधून जसवंत सिंह गुरखा नॅशनल फ्रंटच्या पाठिंब्यावर निवडणुक लढवणार हे नक्की नव्हते. या राज्यातील अंदाज चुकले असे म्हणता येईल.

२३) आसाम
एकूण जागा: १४
काँग्रेस: ७
भाजप: ४
आगप: १
ए.यु.डी.एफ: १
बी.पी.एफ: १

राज्यात भाजप-आगप युतीला ७ जागा मिळतील असे अंदाजात म्हटले होते.तर प्रत्यक्षात ५ जागा मिळाल्या.काँग्रेसला ६ जागांचा अंदाज केला होता त्या ७ जागा मिळाल्या.कोक्राझारमधून ब्वितमुझियारी यावेळी अपक्ष म्हणून निवडणुक न लढवता बी.पी.एफ या पक्षाचे उमेदवार म्हणून उभे होते.त्यांचा विजय होईल हा अंदाज बरोबर ठरला.ए.यु.डी.एफ या मुस्लिमांच्या पक्षाला एक जागा मिळाली ती अंदाजात नव्हती. या राज्यातील अंदाज बर्‍यापैकी बरोबर आले असे म्हटले तर चूक ठरू नये.

२४) उत्तरपूर्वेतील इतर राज्ये
या राज्यात अंदाज केल्याप्रमाणे त्रिपुरात डाव्यांना दोन्ही, अरूणाचल प्रदेशात काँग्रेसला दोन्ही,सिक्कीममध्ये सिक्किम डेमॉक्रॅटिक फ्रंट आणि मिझोराममध्ये काँग्रेसचा विजय झाला.

सारांश:
१. उत्तर प्रदेश,तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल,ओरिसा या मोठ्या राज्यातील अंदाज पूर्णपणे चुकले. यापैकी उत्तर प्रदेश,आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला इतके चांगले यश मिळेल हा अंदाज कोणालाच व्यक्त करता आला नव्हता.
२. पंजाब,हिमाचल प्रदेश,दिल्ली,राजस्थान,मध्य प्रदेश,छत्तिसगड,काही प्रमाणावर महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक,केरळ,झारखंड,आसाम आणि अल्पशा प्रमाणात बिहार या राज्यांमधील व्यक्त केलेले अंदाज बर्‍यापैकी बरोबर आले निदान कल तरी स्पष्ट करता आला.

असो.काही राज्यांमधील अंदाज बर्‍यापैकी बरोबर आले हे माझे यशच मानतो.त्याचबरोबर मोठ्या राज्यातील अंदाज चुकले हे अपयशही माझेच. मोठ्या राज्यांमधील अंदाज का चुकले याचा विचार करायला हवा.हे सर्व अंदाज कोणताही विदा हातात नसताना राजकिय परिस्थितीचे निरिक्षण आणि विश्लेषण करून बांधले होते हे ही लक्षात घ्यायला हवे.आणि मोठ्या राज्यातील (उत्तर प्रदेश,बंगाल) अंदाज बर्‍याच नावाजलेल्या विश्लेषकांचेही चुकलेले आहेत आणि या राज्यांमधील निकाल लोकसभेचा चेहरामोहरा बदलवून टाकू शकतात.आणि अंदाज सगळेच चुकले असते तर पूर्णपणे हसे व्हायची शक्यता होती.तरीही लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच काही तासातच मी उत्तर भारतातील अंदाज मिसळपाववर प्रकाशित केले होते आणि आठवड्यात सगळे अंदाज प्रकाशित केले होते.त्या अंदाजांना थोड्या प्रमाणावर का होईना यश मिळाले याचे समाधान आहे.

प्रतिक्रिया

बबलु's picture

17 May 2009 - 2:51 pm | बबलु

क्लिंटन जी.... तुमचे बरेच अंदाज बरोबर आलेत की. काही काही राज्यात तर अगदी येक्झॅक्ट नंबर टू नंबर. चांगला अभ्यास होय.
अभिणंदन !

....बबलु

अनंता's picture

17 May 2009 - 6:50 pm | अनंता

सहमत.

अवांतर : आपले मिपाकर मित्र श्री परा यांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार निवडणूक हरल्याबद्दल त्यांच्या दु:खात सहभागी आहे.
ईश्वर त्यांना (आत्मचिंतन करण्यास) बळ देवो!!

वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!

सहज's picture

17 May 2009 - 3:35 pm | सहज

एकंदर मजा आली.

तुमच्या अभ्यासाबद्दल कौतुक आहे. मिपावरच्या चर्चेतुन आम्हाला माहीती देत राहील्याबद्दल धन्यवाद!

प्राजु's picture

18 May 2009 - 8:23 am | प्राजु

तुमच्या अभ्यासाचे कौतुक वाटते. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विकास's picture

17 May 2009 - 5:06 pm | विकास

क्लिंटनपंत :)

तुमचे अंदाज बरोबर आले आहेत. पुढे मागे राजकारणात जायचा विचार असेल तर उगाच "कुठे चुकलात" ते लिहू नका :) तसे वागलात तरच "आशास्थान" ठरू शकाल ;)

असो. आता फायनल एक्झामः

मंत्रीमंडळात काय बदल होतील असे वाटते?

आत्ताचा ऐकल्याप्रमाणे माँटेकसिंग अर्थमंत्री होण्याची शक्यता आहे.

विसोबा खेचर's picture

17 May 2009 - 5:14 pm | विसोबा खेचर

क्लिंटनसायबा,

तू जे अंदाज व्यक्त केले होतेस त्याचा हा निकालोत्तर घेतलेला लेखाजोखा आवडला!

तात्या.

नितिन थत्ते's picture

17 May 2009 - 6:32 pm | नितिन थत्ते

+१ सहमत

खराटा
(रंग माझा वेगळा)

ऋषिकेश's picture

17 May 2009 - 9:24 pm | ऋषिकेश

अंदाज व्यक्त करणे आणि नंतर पडताळ्णी करून दाखवणे या दोन्हि बद्दल कौतूक वाटले.
मनःपूर्वक अभिनंदन!

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

विकास's picture

18 May 2009 - 8:12 am | विकास

एक कुतुहलापोटी प्रश्नः जम्मू-उधमपूर मध्ये नक्की काय झाले म्हणून भाजपाला गमवावे लागले?

क्लिंटन's picture

18 May 2009 - 4:04 pm | क्लिंटन

आपल्या सर्वांच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

एक कुतुहलापोटी प्रश्नः जम्मू-उधमपूर मध्ये नक्की काय झाले म्हणून भाजपाला गमवावे लागले?

हे खरोखरच कळायला मार्ग नाही. डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जम्मू विभागात विधानसभेच्या ११ जागा जिंकल्या होत्या.२००२ मध्ये भाजपने केवळ २ जागा जिंकल्या होत्या. विधानसभा निवडणुकीतील यशामागे अमरनाथ प्रकरण होते हे तर उघडच आहे.बहुदा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होईपर्यंत अमरनाथ प्रकरणाचा प्रभाव कमी झाला असावा.नाहीतर भाजपने कमकुवत आणि काँग्रेसने तगडे उमेदवार दिले असतील तर असा परिणाम व्हायची शक्यता आहेच.दोन पक्षांचे उमेदवार नक्की कोण होते हे बघायला हवे.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

नितिन थत्ते's picture

18 May 2009 - 4:09 pm | नितिन थत्ते

कदाचित भाजपने "हॅ:, जम्मू काय आपलेच" असे गृहीत धरले असेल.

खराटा
(रंग माझा वेगळा)

विकास's picture

18 May 2009 - 9:23 pm | विकास

>>>कदाचित भाजपने "हॅ:, जम्मू काय आपलेच" असे गृहीत धरले असेल.

जास्त लॉजिकल वाटले आणि पटले.

या पुढे मतदाराला "टेकन फॉर ग्रँटेड" करणे जो कोणी सोडून देईल त्याला यश मिळायची शक्यता अधिक आहे असे वाटते.

सुनील's picture

18 May 2009 - 9:37 pm | सुनील

कदाचित भाजपने "हॅ:, जम्मू काय आपलेच" असे गृहीत धरले असेल.
जसे शिवसेनेने मुबईत, "हॅ:, मराठी काय आपलेच", असे गृहित धरले होते!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.