लोकसभा निवडणुका: २००९. पश्चिम भारतातील परिस्थितीविषयी माझा अंदाज

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
3 Mar 2009 - 10:31 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

माझ्या निवडणुक अंदाजाच्या पुढील भागात आता वळू या पश्चिम भारताकडे. (डिस्क्लेमरः हे अंदाज राजकिय परिस्थितीचे थोडेफार निरिक्षण करून मी बांधलेले अंदाज आहेत. ते किती बरोबर किंवा चुकीचे आहेत यासाठी १६ मे पर्यंत थांबावे लागेल)

१) गुजरात: (एकूण जागा: २६)

गुजरातमध्ये मार्च १९९८ पासून भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. ऑक्टोबर २००१ पर्यंत केशुभाई पटेल मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात भाजपाची नाव बुडती झाल्यावर पक्षाने संघप्रचारक नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री म्हणून पाठवले. गोध्राकांडानंतरच्या दंगलींनंतर मोठया प्रमाणावर धार्मिक आधारावर ध्रुवीकरण झाले आणि डिसेंबर २००२ मध्ये झालेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकींमध्ये मोठे यश मिळवले.२००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपची पीछेहाट झाली. २६ पैकी १४ जागा भाजपला १२ जागा काँग्रेसला मिळाल्या. १४ पैकी २ जागा भाजपला ४०० आणि ८०० मतांच्या आघाडीने मिळाल्या. पण त्यानंतर मोदींनी मागे वळून बघितले नाही. त्यानंतर झालेल्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका मोदींनी पक्षाला एकहाती जिंकून दिल्या. २००७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने मोठे यश मिळवले. आज गुजरातमध्ये मोदींना टक्कर देऊ शकेल असा नेता काँग्रेस पक्षाकडे नाही.तसेच मोदींनी केलेल्या विकासकामांमुळे भाजपची स्थिती भक्कम आहे असे वाटते. २६ पैकी २० जागा तरी भाजपला मिळतील असे वाटते.

एकूण जागा: २६
भाजप: २०
काँग्रेस: ६

२) महाराष्ट्र (एकूण जागा: ४८)

महाराष्ट्रासाठी दोन वेगळ्या संभावनांचा विचार करून अंदाज करत आहे. पहिली संभावना अशी की राज्यात २००४ प्रमाणेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विरूध्द शिवसेना-भाजप अशी लढत होईल. आणि दुसरी संभावना अशी की राज्यात काँग्रेस विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना विरूध्द भाजप अशी तिहेरी लढत होईल.

शक्यता क्रमांक १:

नारायण राणेंचे बंड शमल्यानंतर काँग्रेस पक्षाची स्थिती कोकणात गेल्या अनेक वर्षात नव्हती इतकी भक्कम असेल.त्यातून रामदास कदमांसारखा नेता नाराज आहे अशा बातम्या येत आहेत. तसे असेल तर कोकणात युतीची परिस्थिती नाजूक असेल. २००४ मध्ये राजापूर आणि रत्नागिरी या जागा अनुक्रमे सुरेश प्रभू आणि अनंत गीते यांनी सहज जिंकल्या होत्या.पण नारायण राणेंच्या बंडानंतर राणेंनी मालवण आणि राजापूर या विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराची अनामत रक्कम जप्त करवली होती. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधव सारखा खंदा वीर शिवसेनेने काही कारण नसताना गमावला आणि आता चिपळूणातही राष्ट्रवादीचा जोर आहे.तेव्हा तळकोकणातील दोन जागा काँग्रेस-राष्ट्रवादीलाच मिळतील. रायगडमधून अंतुलेंना तोंड देणारा समर्थ उमेदवार युतीकडे नाही. पूर्वी शेकापतून शिवसेनेत गेलेल्या दि.बा.पाटलांना उमेदवारी शिवसेनेने देऊन पाहिली.पण त्याचा उपयोग झाला नाही.ही जागा शिवसेनेने कधीच जिंकली नाही. जर अंतुले उमेदवार असतील तर काँग्रेसचा विजय नक्की.

मुंबईत राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना-भाजपची मते काही प्रमाणावर तरी खाईलच. तरीही राम नाईक, मोहन रावले, मनोहर जोशी या ३ जागा युतीला मिळायला हरकत नाही. यावेळी अरूण गवळी बसपचा उमेदवार म्हणून दक्षिण-मध्य मुंबईत उभा राहणार आहे.तरीही तो युतीविरोधी मते फोडायचे काम करून त्याचा फायदा मोहन रावल्यांना मिळेल असे वाटते. तिसरा उमेदवार मते फोडायला नसेल तर युतीला ईशान्य मुंबईची जागा जिंकणे कठिण जाते. १९८९ मध्ये त्यावेळी रिपब्लिकन पक्षात असलेल्या नीलम गोरे यांनी निवडणुक लढविल्यामुळे जयवंतीबेन मेहतांना, १९९६ मध्ये स्वत: रामदास आठवलेंनी निवडणुक लढविल्यामुळे कै.प्रमोद महाजनांना आणि १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या राममनोहर त्रिपाठींमुळे किरीट सोमैयांना विजय मिळवता आला होता. बाकी तिसरा उमेदवार नसताना १९८४,१९९१,१९९८ आणि २००४ मध्ये काँग्रेस पक्षाचे गुरूदास कामत सहज विजयी झाले होते. यावेळी सुध्दा तिसरा उमेदवार असेल असे वाटत नाही. तेव्हा यावेळी गुरूदास कामत बाजी मारायची शक्यता जास्त. प्रिया दत्तची जागा काँग्रेसला नक्की. बाकी २६/११ चा प्रभाव निदान मुंबईत तरी मतदानावर पडेल असे वाटते. तेव्हा दक्षिण मुंबईची जागा युती जिंकू शकेल. तेव्हा मुंबईत युतीला ४ आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला २ जागा मिळतील असे वाटते. गोविंदाला उमेदवारी द्यायची कसरत काँग्रेस पक्ष करेल असे वाटत नाही.आणि शाहरूख खाननेही निवडणुक लढविणार नाही असे जाहिर केले आहे. तेव्हा राम नाईकांना ही निवडणुक जिंकता यावी.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे,भिवंडी,कल्याण आणि डहाणू पैकी ठाण्याची जागा युतीकडे नक्की जाईल. कल्याणच्या जागेत बेलापूर आणि उल्हासनगर या राष्ट्रवादीच्या वर्चस्वाचा भाग समाविष्ट आहे.त्यामुळे डोंबिवली-कल्याणमध्ये युती तर बेलापूर-उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीला मताधिक्य मिळेल. पण बेलापूरची लोकसंख्या जास्त असल्यामुळे आणि तिकडे गणेश नाईकांनी राष्ट्रवादीचा गड राखला असल्यामुळे कल्याणमधून राष्ट्रवादीचे वसंत डावखरे निवडून येतील असे मला वाटते. डहाणू आणि भिवंडीविषयी सांगणे जरा अवघडच आहे. तरी ढोबळ मानाने प्रत्येकी एक जागा युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी जिंकेल असे धरतो.

उत्तर महाराष्ट्रात नाशिक-धुळे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव आहे. तेव्हा तिकडच्या ४ पैकी ३ किंवा अगदी ४ जागाही त्यांना मिळाल्या तर त्यात आश्चर्य वाटू नये. तशीच परिस्थिती भाजपची जळगावात आहे.भाजपचे खासदार प्रश्न विचारण्यासाठी पैसे स्वीकारण्याच्या प्रकरणात गोत्यात आले पण तरीही पक्षाने पोटनिवडणुकीत बाजी मारली. तेव्हा जळगावातील दोन जागा भाजपच्या नक्की असे वाटते.

विदर्भात शेतकरी आत्महत्या प्रकरणांमुळे वातावरण सरकारविरोधी आहे असे दिसत आहे. पूर्वीच्या ११ वरून मतदारसंघ पुनर्रचनेनंतर विदर्भात १० जागा झाल्या आहेत. २००४ मध्ये नागपूर वगळता सर्व जागा शिवसेना-भाजप युतीने जिंकल्या होत्या. त्यावेळी बहुजन समाज पक्षाने मोठ्या प्रमाणावर मते खाल्यामुळे युतीचे काम सोपे झाले. भंडारा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेल यांचा पराभव सुमारे ३ हजार मतांनी झाला. तिकडे बसपाच्या हत्तीने ९१ हजार मते घेतली होती. आता हत्तीचे सामर्थ्य वाढते असल्यामुळे २००४ ची पुनरावृत्ती होईल अशी चिन्हे आहेत. तरीही अनुकूल परिस्थितीचा फायदा शिवसेना-भाजपला कितपत उठवता येईल का हा प्रश्नच आहे. अशीच अनुकूल परिस्थिती असूनही चिमूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभवच झाला होता.तरीही ढोबळ मानाने विदर्भातील १० पैकी ७ जागा युती आणि ३ जागा राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस जिंकेल असे धरतो.

मराठवाड्यात मागच्या वेळी ८ पैकी ६ जागा शिवसेना-भाजप युतीने जिंकल्या होत्या. यावेळी नांदेडमधून केंद्रिय मंत्री सुर्यकांता पाटील यांना मागच्या वेळेप्रमाणेच विजय मिळेल अशी शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले लोकसभेतील संख्याबळ वाढावे म्हणून राज्यातील मंत्र्यांना लोकसभेसाठी उमेदवारी द्यायचे धोरण अवलंबले आहे.त्यात परभणीतून सुरेश वरपूडकर आणि जालन्यातून राजेश टोपे यांना उमेदवारी द्यायचे घाटत आहे.तेव्हा युतीला मराठवाड्यातून निवडणुक मागच्या वेळेप्रमाणे सोपी जाईल असे वाटत नाही. बीड मधून गोपीनाथ मुंडे नक्कीच जिंकतील.तेव्हा ढोबळ मानाने मराठवाड्यातील ४-४ जागा शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल असे मला वाटते.

पश्चिम महाराष्ट्र हा तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्लाच आहे.कोल्हापूरमधून सदाशिवराव मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघातून निवेदिता मानेंना विजय मिळवणे सोपे जाईल. हातकणंगले मधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी उभे राहिले तर ते कडवी लढत देतील पण तरीही त्यांना लोकसभा निवडणुकीत विजय मिळवता येईल असे वाटत नाही.सातारा-कराडमधून तर राष्ट्रवादीला पर्याय नाही.सांगलीतून वसंतदादांच्या पुण्याईवर गेली अनेक वर्षे प्रकाशबापू पाटिल निवडून येत असत.आता त्यांच्या नंतर प्रतीक पाटिल यांना ही निवडणुक जिंकणे जड जाऊ नये.मतदारसंघांच्या पुनर्रचनेत पुणे जिल्ह्यात ४ लोकसभा मतदारसंघ आले आहेत.बारामतीतून सुप्रिया सुळे आणि शिरूरमधून स्वत: शरद पवार उभे राहणार असे सध्याचे चित्र आहे. तिथून त्यांना पराभूत करणे स्वत: भगवंतालाही शक्य होणार नाही.मावळ मतदारसंघात कर्जत आणि पनवेल हे रायगड जिल्ह्यातील भाग समाविष्ट झाले आहेत.तिकडे शेकापचा जोर असला तरी उरलेल्या ४ विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचा जोर असल्यामुळे मावळची जागा राष्ट्रवादी जिंकेल असे वाटते. पुणे शहरात मात्र कडवी लढत असेल असे वाटते. शहर मतदारसंघात सदाशिव पेठ आणि कोथरूड हा युतीचे वर्चस्व असलेला भाग समाविष्ट आहे. हडपसर हा पूर्वी शहर मतदारसंघात असलेला भाग आता शिरूर मतदारसंघात गेला आहे.या पार्श्वभूमीवर शहर मतदारसंघातून युतीने तुल्यबळ उमेदवार दिल्यास कलमाडींना निवडणुक कठिण जाऊ शकेल.पण शहरातून बसपने डी.एस.कुलकर्णींना उमेदवारी द्यायचे घाटत आहे.ते डी.एस.के.विश्व सारख्या मोठ्या संकुलांमधून बरीच मते खेचू शकतील.अर्थात विजयी होण्यासाठी ती पुरेशी असतील असे नाही पण ती मते युतीच्या पारड्यातून जाणार असल्यामुळे डी.एस.के. यांच्या उमेदवारीमुळे युती थोडी अडचणीत येईल असे वाटते.तेव्हा पुणे शहराविषयी keeping fingers crossed.

तेव्हा शक्यता क्रमांक १ प्रमाणे निवडणुक झाल्यास पुढील चित्र उभे राहिल असे वाटते.

एकूण जागा: ४८
काँग्रेस: १३
राष्ट्रवादी काँग्रेस: १३
भाजप: १३
शिवसेना: ८
रिपब्लिकन पक्ष: १ (रामदास आठवले)

शक्यता क्रमांक २: (काँग्रेस विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना विरूध्द भाजप)

या परिस्थितीत तळकोकणात पूर्वीची राजापूरची जागा काँग्रेस ला नारायण राणेंच्या प्रभावामुळे नक्की. रत्नागिरीची जागा शिवसेनेला मिळू शकेल. कारण रत्नागिरी आणि चिपळूण असे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, भास्कर जाधवांसारखा मोहरा राष्ट्रवादीकडे आहे. रायगडची जागा काँग्रेसला मिळणे जड जाऊ नये.

मुंबईत ६ जागांमध्ये भाजपची गुजराती मते आणि शिवसेनेची मराठी मते विभागली जातील.त्यात राज ठाकरेंची मनसे शिवसेनेची मते खाईलच. राष्ट्रवादीची मुंबईत ताकद खूप जास्त नाही.नबाब मलिक आणि सचिन आहिर हे त्यांचे मुंबईतील महत्वाचे नेते आहेत.प्रिया दत्त आणि गुरूदास कामत या दोन जागा काँग्रेसला नक्कीच मिळतील. गुरूदास कामतांचे काम आणखी सोपे होईल कारण मुलुंड-घाटकोपरमधली गुजराती मते भाजपलाच मिळतील.बाकी शिवसेनेची मते आणि भांडुपमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीची मते एकत्र केली तरी ती विजय मिळवायला पुरेशी असतील असे वाटत नाही. कारण भाजपची गुजराती मते गमावल्याने झालेले नुकसान मोठे असेल.शिवसेनेच्या मोहन रावलेंना विजय मिळवणे सोपे जाईल. पण २००४ मध्ये त्या जागेवरून राष्ट्रवादीने सचिन आहिर यांना उमेदवारी दिली होती आणि त्यांना मतेही चांगली मिळाली होती.त्या जागेवरून दोन पक्षांत भांडणे होणार नाहीत याची काळजी दोन पक्षांना घ्यावी लागेल.मनोहर जोशींना माटुंग्यातून भाजपची हक्काची मते मिळणार नाहीत. तरीही दादर-परळ-लालबागमधील शिवसेनेची मते आहेतच.नेहरूनगरमध्ये राष्ट्रवादीची मते जोशींना मिळतील आणि माटुंग्यातील अमराठी मते गमावावी लागतील ती भरून निघतील.तेव्हा मनोहर जोशींना विजय मिळवणे खूप कठिण जाऊ नये. दक्षिण मुंबईत भाजपचा प्रभाव जास्त आहे.पण तरीही शिवसेना काही मते खाईलच. तेव्हा या जागेविषयी अंदाज व्यक्त करणे खूपच कठिण आहे. राम नाईकांच्या मतदारसंघातून आता गोरेगाव काढले आहे. तेथील शिवसेनेच्या मराठी मतांचा परिणाम आता त्यांच्यावर होणार नाही.तसेच पराभव झाल्यावरही गेल्या ५ वर्षांत नाईकांनी जनसंपर्क कायम ठेवला आहे. तेव्हा राम नाईकांना विजय मिळवणे कठिण जाऊ नये. तेव्हा मुंबईत शिवसेना,काँग्रेस आणि भाजप प्रत्येकी २ जागा जिंकेल असे वाटते. शिवसेना-भाजपमधील भांडणाचा फायदा काँग्रेसला व्हायची शक्यता आहे आणि पक्ष तिसरी जागाही जिंकू शकेल.

नाशिक-धुळे भागात राष्ट्रवादीचा जोर आहेच. नाशिकमधून शिवसेनेची थोडीफार मदत होऊन राष्ट्रवादीची स्थिती चांगली होईल.जळगावात सुरेश जैन शिवसेनेत परत आल्यामुळे पक्षाला थोडा तरी फायदा होईलच. तेव्हा भाजपची मते शिवसेना खाऊन त्याचा फायदा काँग्रेसला एका जागी तरी व्हायची शक्यता आहे.

विदर्भात भाजपला दोन परस्परविरोधी गोष्टींना सामोरे जावे लागेल. एक तर शिवसेनेची थोडी मते गमावावी तर लागतीलच. पण त्याच बरोबर शेतकरी आत्महत्या प्रकरणामुळे सरकारविरोधी मते भाजपला मिळतील. विदर्भात मागच्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने काही जागा बसपच्या हत्तीमुळे गमावल्या होत्या. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्रित ताकद होती.आता दोन्ही एकमेकांविरोधात असताना परिस्थिती अजून जटिल बनेल आणि अंदाज व्यक्त करणे म्हणजे तारेवरची कसरत असेल. विदर्भात काँग्रेस पक्षाची ताकद राष्ट्रवादीपेक्षा जास्त आहे. त्यात दत्ता मेघे पक्षात परतले आहेत.पक्षाकडे विलास मुत्तेमवारांसारखे ज्येष्ठ नेते आहेत.पण त्याचबरोबर सरकारविरोधी मताचा फटका त्याला बसेल. विदर्भाविषयी अंदाज व्यक्त करणे फारच कठिण आहे. तरीही १० पैकी भाजपला ४,शिवसेना-राष्ट्रवादीला ४ आणि काँग्रेसला २ जागा मिळतील असे वाटते.

मराठवाड्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस युतीला मात्र चांगले यश मिळेल असे मला वाटते. बीडची जागा भाजपाच्या गोपीनाथ मुंडेंना जिंकायला कठिण जाऊ नये. पण जागावाटपात बंडखोरी न झाल्यास राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे एकत्रित बळ ८ पैकी ६ जागा जिंकू शकेल असे वाटते. एक जागा काँग्रेस पक्षाला मिळेल असे ढोबळमानाने धरतो.

पश्चिम महाराष्ट्रात मात्र राष्ट्रवादीला मोठे यश मिळेल.शिवसेना-भाजप मतविभागणीमुळे पुणे शहरातून काँग्रेस पक्षाला यश मिळेल आणि सांगली-सोलापूर या जागा काँग्रेसच्याच असतील. बाकी कोल्हापूर,हातकणंगले,शिरूर,बारामती,मावळ,सातारा,कराड या जागा राष्ट्रवादीला नक्की.

तेव्हा शक्यता क्रमांक २ प्रमाणे महाराष्ट्रात पुढील चित्र उभे असेल असे वाटते.

एकूण जागा: ४८
राष्ट्रवादी काँग्रेस: १७
काँग्रेस: १२
शिवसेना: १०
भाजप: ८
रिपब्लिकन पक्ष: १ (रामदास आठवले)

तेव्हा शिवसेना-राष्ट्रवादी युती झाल्यास फायदा राष्ट्रवादीला मिळेल आणि नुकसान भाजपाचे होईल असे वाटते. पण विदर्भातील निकाल वेगळे लागल्यास चित्र बदलू शकते.

३) गोवा: (एकूण जागा:२)
गोव्यात १९९९ मध्ये भाजपने दोन्ही जागा जिंकल्या होत्या.पण २००४ मध्ये भाजपला एकच जागा जिंकता आली. २००७ च्या निवडणुकीतही भाजपला बहुमत मिळवता आले नाही. २००९ मध्येही २००४ सारखेच निकाल लागतील असे मला वाटते.

एकूण जागा: २
काँग्रेस: १
भाजप: १

४) दादरा नगर हवेली आणि दिव दमण (एकूण जागा २)
याविषयी अधिक भाष्य करण्यास योग्य माहिती माझ्याकडे नाही. तरीही ढोबळ मानाने भाजप आणि काँग्रेस एक एक जागा जिंकतील असे मानतो.

एकूण जागा: २
काँग्रेस: १
भाजप: १

५) मध्य प्रदेश: (एकूण जागा: २९)
सोयीसाठी मध्य प्रदेशचा समावेश पश्चिम भारतावरील लेखात करत आहे.

मध्य प्रदेशच्या जनतेने भाजपच्या शिवराज सिंह चौहान यांना बहुमताने डिसेंबर महिन्यातच निवडून दिले आहे. तेव्हा राज्यात भाजपचेच वर्चस्व राहिल असे मानण्यास जागा आहे. उमा भारती विधानसभा निवडणुकीत स्वत: पराभूत झाल्यामुळे त्यांचे जनसमर्थन उतरणीस लागले आहे. तसेच काँग्रेस पक्षात दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य, कमल नाथ असे गट आहेत. बहुजन समाज पक्ष आता राज्यात एक महत्वाचा घटक म्हणून उदयास आला आहे. त्यास रेवा भागातील दोन जागा जिंकणे शक्य होईल असे वाटते. एकंदरीत पुढील परिस्थिती राज्यात राहिल असे वाटते--

एकूण जागा: २९
भाजप: १९
काँग्रेस: ८
बहुजन समाज पक्ष: २

तर पश्चिम भारतात पुढील प्रमाणे परिस्थिती असेल असे मला वाटते.

एकूण जागा: १०७

शक्यता क्रमांक १

एन.डी.ए.
भाजप: ५४
शिवसेना: ८
एकूण: ६२

यु.पी.ए.
काँग्रेस: २९
राष्ट्रवादी काँग्रेस: १३
रिपब्लिकन पक्ष: १
एकूण: ४३

इतर:
बहुजन समाज पक्ष: २

शक्यता क्रमांक २

एन.डी.ए.
भाजप: ४९
एकूण: ४९

यु.पी.ए.
काँग्रेस: २८
रिपब्लिकन पक्ष: १
एकूण: २९

इतर:
राष्ट्रवादी काँग्रेस: १७
शिवसेना: १०
बहुजन समाज पक्ष: २
एकूण: २९

प्रतिक्रिया

विकास's picture

4 Mar 2009 - 12:46 am | विकास

हा पण चांगला लेख...

थोडक्यात: मला वाटते महाराष्ट्रात भाजप-सेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी अशाच निवडणूका लढवल्या जातील... मनसेबद्दल कमी विचार केला आहे. पण धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं अशीच मनसेने शिवसेनेची अवस्था केलेली आहे.

महाराष्ट्रापुरते बोलायचे तर मुंबई हल्ला आता सर्वजण विसरून गेलेत. वास्तवीक तो महत्वाचा (राजकारण म्हणून नाही) विषय आहे. पण "जन पळभर म्हणतील हाय हाय" अशीच अवस्था त्याची झाली आहे. असो.

गुजराथ मधे शतप्रतिशत... असणार हे नक्की असल्यासारखे वाटते.

बाकी सर्वचनिकाल मतदारांच्या मतदानावर अथवा उदासीनतेवर अवलंबून आहेत हे स्पष्ट आहे.

भास्कर केन्डे's picture

4 Mar 2009 - 1:17 am | भास्कर केन्डे

वा क्लिंटन साहेब!

हा लेख सुद्धा आवडला. मप्रला फारच थोडक्यात गुंडाळल्या सारखे वाटले. तसेही तिथे जास्त किचकटपणा नाहीये.

मुंबई-कोकण-पुणे-नाशिक या भागांवर चांगला प्रकाश टाकलात. तसाच विदर्भ-मराठवाड्यवर सुद्धा टाकयला हवा होता असे वाटते. मुंडे, विलासराव, चव्हाणांसारखे दिग्गज मराठवाड्यात आपापली शक्ती पणाला लावतील तर विदर्भात रणजित देशमुखांपासून ते गडकर्‍यांपर्यंत सर्वांना आपापले महत्व टिकवून ठेवण्यासाठी/वाढवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करायला लागतील. त्यावर जास्त भर दिला असता तर महाराष्ट्राचे विश्लेषण अधिक परिपूर्ण वाटले असते.

पण एकंदरित लेख मस्त जमला आहे यात दुमत नसावे. आपल्या व्यासंगाला सा. दंडवत! :)

आपला,
(वाचक) भास्कर

क्लिंटन's picture

5 Mar 2009 - 5:04 pm | क्लिंटन

>>मुंबई-कोकण-पुणे-नाशिक या भागांवर चांगला प्रकाश टाकलात. तसाच विदर्भ-मराठवाड्यवर सुद्धा टाकयला हवा होता असे वाटते.

हो मलाही तसेच वाटते. उत्तर प्रदेशात आता काँग्रेस-समाजवादी पक्ष युती संकटात आहे अशा बातम्या आहेत. त्याकडेही अधिक लक्ष द्यायला हवे. या सर्व सुधारणा वेळ मिळेल तशा करीनच. आपल्यालाही काही सुधारणा सुचवायच्या असतील किंवा महाराष्ट्राच्या किंवा दुसर्‍या राज्याच्या एखाद्या विभागाविषयी माझ्याकडून राहिलेले मुद्द्यांवर लिहायचे असेल तर त्याचे स्वागतच आहे.
>>पण एकंदरित लेख मस्त जमला आहे यात दुमत नसावे. आपल्या व्यासंगाला सा. दंडवत
व्यासंग वगैरे म्हणून घाबरवू नका . बाकी अंदाज कितपत बरोबर येणार हे काळच ठरवेल.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

सुनील's picture

4 Mar 2009 - 8:08 am | सुनील

अत्यंत चिकित्सक पद्धतीने केलेले विश्लेषण आवडले. महाराष्ट्राबद्दल थोडा जास्त (अगदी जिल्हानिहाय उहापोह) आवडला असता.

२६/११ चा फारसा प्रभाव मतदानावर पडेल असे वाटत नाही. तसेही राजस्थान आणि दिल्लीतील विधानसभेचे मतदान मुंबई हल्ल्यानंतर आठवड्याभरातच झाले होते. काय फरक पडला?

अवांतर - आपण शक्यता ह्या मराठी शब्दाऐवजी संभावना हा शब्द वापरलेला खटकला, तो केवळ त्या शब्दावर हिंदीची छाया आहे म्हणून नव्हे, तर संभावना ह्या शब्दाचा मराठीत एक वेगळाच अर्थ होतो म्हणून.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

क्लिंटन's picture

5 Mar 2009 - 5:13 pm | क्लिंटन

>>अत्यंत चिकित्सक पद्धतीने केलेले विश्लेषण आवडले. महाराष्ट्राबद्दल थोडा जास्त (अगदी जिल्हानिहाय उहापोह) आवडला असता.

धन्यवाद. मला शक्य आहे तितक्या खोलीत जाऊन उहापोह करायला मला आवडेलच.

>>२६/११ चा फारसा प्रभाव मतदानावर पडेल असे वाटत नाही. तसेही राजस्थान आणि दिल्लीतील विधानसभेचे मतदान मुंबई हल्ल्यानंतर आठवड्याभरातच झाले होते. काय >>फरक पडला?

हो. तसा खूप जास्त फरक पडणार नाही. मुंबई परिसरात थोडासा फरक पडेल असे वाटते.बाकी महाराष्ट्रात मतदान स्थानिक प्रश्नांवरून होईल असे वाटते.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

अमृतांजन's picture

4 Mar 2009 - 8:18 am | अमृतांजन

कोणतेही सरकार आले तरी आमच्या दैनंदिनीत तसूभरही फरक पडणार नाही.

आम्हालाच आमचे भविष्या घडवावे लागेल.

अमोल केळकर's picture

4 Mar 2009 - 9:21 am | अमोल केळकर

वा परत एकदा मस्त विश्लेषण क्लिंटन साहेब,
एक शंका
मी बेलापूर मतदार संघात येतो. इतके दिवस आमचा भाग ठाणे लोकसभेत येत होता
आपल्या वरील विवेचनात तो कल्याण लोकसभेचा भाग म्हणून दाखवला आहे.
मतदार संघाच्या पुनर्रचनेत तो कल्याण ला जोडला आहे का ?
कृपया आपल्यास माहिती असल्यास सांगावे
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

क्लिंटन's picture

5 Mar 2009 - 5:27 pm | क्लिंटन

>>मी बेलापूर मतदार संघात येतो. इतके दिवस आमचा भाग ठाणे लोकसभेत येत होता आपल्या वरील विवेचनात तो कल्याण लोकसभेचा भाग म्हणून दाखवला आहे.
>>मतदार संघाच्या पुनर्रचनेत तो कल्याण ला जोडला आहे का ?

मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण, भिवंडी आणि डहाणू-पालघर हे चार लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभेचे तब्बल २४ मतदारसंघ झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात जिल्ह्याला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. बेलापूरचा समावेश ठाणे मतदारसंघात करावा की कल्याणला याविषयी पुनर्रचना आयोगापुढे वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या. त्यातून बेलापूर कल्याणला जोडला गेला आहे. माझ्याकडून चूक झाली असल्यास ती लक्षात आणून द्यावी ही विनंती.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

अमोल केळकर's picture

5 Mar 2009 - 5:52 pm | अमोल केळकर

माझ्या माहितीप्रमाणे नवी मुंबई अजुनही ठाणे लोकसभा मतदार संघाशी संलग्न आहे.
अर्थात हा काही वादाचा मुद्दा नाही
कल्याण मधे युतीचा उमेदवार कोण असेल ? ( ही जागा भाजपा कडे आहे की शिवसेनेकडे ?)
(संभ्रमीत ) अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

क्लिंटन's picture

5 Mar 2009 - 7:41 pm | क्लिंटन

धन्यवाद अमोल केळकर,

हो. बेलापूर अजुनही ठाणे लोकसभा मतदारसंघातच आहे. आपला प्रतिसाद बघताच मी मतदारसंघ पुनर्रचना आयोगाच्या संकेतस्थळावरून महाराष्ट्राची फाईल उतरवून घेतली. म्हणजे ती माहिती अधिकृत आहे यात शंका नाही. ही फाईल http://www.delimitation-india.com/ वरून उतरवून घेता येईल. त्याप्रमाणे ठाणे लोकसभा मतदारसंघात मीरा-भाईंदर, ओवळा-माजीवडा, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे,ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तर कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण (पूर्व), डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि मुंब्रा-कळवा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्याचबरोबर माझ्याकडून आणखी एक चूक झाली होती. ती म्हणजे पूर्वी कोकणात राजापूर आणि रत्नागिरी असे दोन लोकसभा मतदारसंघ होते. आता तिकडे एकच रत्नागिरी -सिंधुदुर्ग असा एकच लोकसभा मतदारसंघ आहे. पूर्वीच्या कुलाबा मतदारसंघाचे नाव बदलून रायगड केले आहे हे मला पक्के माहित होते आणि ते बरोबर आहे.

कधीकधी माहितीच्या बाबतीत अति आत्मविश्वास आणि स्वतःच्या स्मरणशक्तीवर वाजवीपेक्षा असलेला विश्वास नडतो तसे आता झाले. आणि त्यामुळे अशी चूक झाली. मिपाकरांनी मोठ्या मनाने ती पोटात घालावी ही विनंती. पूर्व भारतावरील लेख प्रकाशित करण्यापूर्वी आधीच्या लेखामधील माहिती पुन्हा एकदा तपासून बघणार आहे. त्यात चूक आढळली तर मी ती मिपावर जाहिर करेनच. आपल्यालाही अशी काही चूक आढळली तर ती जरूर सांगावी ही विनंती. एक भगवंत सोडला तर कोणीही 'परफेक्ट' नसते आणि प्रत्येकाकडून कधीनाकधी चुका होतच असतात. आणि अशा चुकांचे लक्षात आणून दिल्यावरही समर्थन करायचा दुराग्रह माझ्याकडे नाही. माझ्या अंदाजांविषयी मतेमतांतरे असू शकतात आणि असावीत. त्यावर चर्चा व्हावी. पण अशा काही चुका आढळल्यास आणि त्या लक्षात आणून दिल्यास त्याचे स्वागतच आहे.

आता यामुळे अंदाजांमध्ये काय बदल होतील हा प्रश्न उभा राहतो. सुरवात करू या कोकणापासून. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. कणकवली हा नारायण राण्यांच्या मालवण जवळचा भाग. पूर्वी कणकवलीचा समावेश मालवण विधानसभा मतदारसंघात होता. पण आता कणकवली स्वतंत्र मतदारसंघ आहे आणि त्यात आजूबाजूचा भाग (उदाहरणार्थ देवगड) समाविष्ट आहे. तसेच पूर्वीच्या मालवण मतदारसंघातील कणकवली वगळता उरलेला प्रदेश कुडाळ विधानसभा मतदारसंघात आहे. कणकवली आणि मालवण भागात नारायण राण्यांनी शिवसेनेची अनामत रक्कम जप्त करवू असे आधीच जाहिरपणे सांगितले आणि तसे करूनही दाखवले. तसेच राजापुरातही झाले. चिपळूणमध्ये भास्कर जाधव सोडून गेल्यानंतर शिवसेनेची परिस्थिती फारशी सशक्त नाही. रत्नागिरीत राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत बाजी मारली होती. तेव्हा कोकणात शिवसेना गेल्या अनेक वर्षांत नव्हती एवढी कमजोर आहे. आणि तिकडे सेनेला विजय मिळणे खूप कठिण दिसते.

रायगड लोकसभा मतदारसंघात पेण,अलिबाग,श्रीवर्धन, महाड, दापोली आणि गुहागर मतदारसंघांचा समावेश आहे. म्हणजे रायगड जिल्ह्यातील ४ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील २ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. श्रीवर्धनमध्ये शाम सावंतांनी नारायण राण्यांबरोबर शिवसेना सोडली पण नंतरच्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि शिवसेनेचाच उमेदवार तिथून निवडून आला.तसेच गुहागरमध्ये युतीची परिस्थिती बरी आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात खेड तालुक्याचा काही भाग समाविष्ट आहे. जर रामदास कदम असंतुष्ट असतील तर त्याचा सेनेवर थोडा परिणाम नक्कीच होईल. महाड, पेण भागात शेकाप-काँग्रेसचे वर्चस्व आहे. तरीही अंतुले काँग्रेसचे उमेदवार असतील तर त्यांना रायगड जिल्ह्यात नक्कीच मताधिक्य मिळेल. तेव्हा या जागी पण काँग्रेसच बाजी मारेल असे वाटते.

ठाण्यात मात्र शिवसेनेची कोंडी व्हायची शक्यता आहे. मागच्या वेळी ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाणे,बेलापूर,कल्याण,मुरबाड,उल्हासनगर आणि अंबरनाथ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता. शिवसेनेच्या प्रकाश परांजपेंची बेलापूर,मुरबाड आणि उल्हासनगर भागातून पिछेहाट झाली होती. तरीही ठाणे आणि डोंबिवली-कल्याण भागातून त्यांना आघाडी मिळाली आणि त्यांना २५ हजार मतांनी विजय मिळाला. त्यांच्या निधनानंतर मे २००८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत आनंद परांजपे यांनी ८५-९० हजारांची आघाडी मिळाली. यावेळी ठाणे लोकसभा मतदारसंघातून डोंबिवली-कल्याण हा युतीला मताधिक्य देणारा हक्काचा भाग गेला आहे तर बेलापूर-ऐरोली हा नव्या मुंबईतील राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेला प्रदेश मात्र आहे. शिवसेनेला ठाणे आणि कोपरी-पाचपाखाडीतून मताधिक्य नक्की मिळेल. बर्‍याच अंशी माजीवड्यातून शिवसेना पुढे असेल. पण बेलापूर-ऐरोलीतून पिछेहाट होईल असे दिसते. तरीही ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, माजीवडा या भागात मिळणार्‍या मताधिक्याने शिवसेनाच बाजी मारेल असे वाटते.

कल्याण लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगेल अशी चिन्हे आहेत. ह्या मतदारसंघावर भाजपने दावा सांगितला आहे. उल्हासनगर आणि मुंब्रा-कळवा भागात युतीची पिछेहाट नकी. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत अंबरनाथमधून शिवसेनेचे साबीर शेख पराभूत झाले होते आणि राष्ट्रवादीचा विजय झाला होता. कल्याण-डोंबिवलीत जरी युतीला आघाडी मिळाली तरी ती उल्हासनगरमधून कलानींच्या कृपेने राष्ट्रवादीच्या डावखर्‍यांना आघाडी मिळेल ती भरून काढायला पुरेशी ठरेल का? बहुदा त्यामुळे कल्याणमधून युतीचा पराभव होईल असे वाटते.

तेव्हा महाराष्ट्रात माझ्या चुकीचा माझ्या अंदाजात खूप फरक पडेल असे वाटत नाही. आपले काय मत आहे?

---विल्यम जेफरसन क्लिंटन

अभद्र राष्ट्रवादी व सेना ही अनिष्ट युती होण्याची शक्यता संपुष्टात आली आणि आमचा जिव भांड्यात पडला.
तुमच्या लेखातील महाराष्ट्राच्या निकालाच्या बाबतीतली पहिलीच शक्यता योग्य वाटते.सेनाभाजपाच्या पारड्यात अजुन एका जागेची भर पडु शकली तर उत्तमच.
अतिशय सखोल विश्लेषण आहे आपले.
केळकरांना पडलेला प्रश्न मला देखिल पडलाय?
आणि जर दोन भागात मतदारसंघ दुभागला गेला असेल तर परांजपे यांच्या व्यतिरिक्त दुसरा युतीचा उमेदवार कोण असेल ह्या विचारात पडलेली?

"अनामिका"

क्लिंटन's picture

5 Mar 2009 - 5:30 pm | क्लिंटन

>>अभद्र राष्ट्रवादी व सेना ही अनिष्ट युती होण्याची शक्यता संपुष्टात आली आणि आमचा जिव भांड्यात पडला.

हो मलाही ती अनैसर्गिक युती झाली नाही म्हणून चांगलेच वाटले.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

क्लिंटन's picture

4 Mar 2009 - 10:35 pm | क्लिंटन

नमस्कार मंडळी,

थोड्या वेळापूर्वी मी दक्षिण भारताविषयीचा लेख मिपावर प्रकाशित केला आहे. हा लेख खूपच मोठा असून तो लिहायला बराच वेळ लागला. आज दिवसभरात 'पेशंटल' भेटायला अनेक लोक आले त्यामुळे मला या लेखावरील प्रतिक्रिया द्यायला वेळ मिळाला नाही. दिवसभर एका जागी बसल्यामुळे जखमेच्या जागी जरा पाय आखडल्यासारखे झाले आहे तेव्हा प्रतिक्रिया उद्या देतो. तेव्हा कृपया समजून घ्यावे ही विनंती.

सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. मी त्या सर्व वाचल्या आहेत. त्यावर माझी उत्तरे उद्या.

संपादकांना विनंती करतो की संभावना हा शब्द बदलून शक्यता हा करावा. तो बदल मला करता येत असल्यास तो मी उद्या करेन. सुधारणेबद्दल धन्यवाद.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

भास्कर केन्डे's picture

5 Mar 2009 - 12:46 am | भास्कर केन्डे

आपल्या लेखात असे बदल आपण करता येतात असा माझा तरी अनुभव आहे. तेव्हा उद्या तुम्हीच करा... बिचारे संपादक काय्-काय म्हणून करावे त्यांनी.

आणी हो, आपल्याला लवकर चांगला आराम पडावा यासाठी शुभेच्छा!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Mar 2009 - 5:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

क्लिंटनसाहेब, वाचन सुरू आहे. (पण अनेक गोष्टींप्रमाणे याही विषयाची समज नसल्यामुळे लेखाप्रमाणे अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया देता येत नाही.) पण पुढच्या लेखाचीही वाट पहात आहे.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

निखिलराव's picture

6 Mar 2009 - 2:50 pm | निखिलराव

क्लिंटनसाहेब विष्लेश्ण आवड्ले, मस्तचं.
पुण्यातुन खालील मुख्य उमेदवार रिंगणात असतील :-

A] सुरेश कलमाडी
B] डी.एस.कुलकर्णींना
C] अरुण भाटीया
D] भा.ज्.पा (जोशी, मटकरी)

आपल्याला काय वाटते ?
कोण बनेगा खासदार ?
A.......B......C........ का ..D......?